पॅसिफिक रिम- दिग्दर्शकाच्या किर्तीला साजेसा

>> Monday, July 15, 2013


हिचकाॅकने जेव्हा 'सायको' चित्रपट बनवला तेव्हा सुमार भयपटांचा सुकाळ होता. कोणीही उठून, कोणताही मध्यम दर्जाचा नटसंच घेऊन काहीही करुन ते चित्रपट चालवून दाखवत कारण लोकांना त्यांच्या शाॅक एलिमेन्ट्सचं कौतुक वाटत असे. हाॅलिवुडने प्रसिध्द केलेली चमचमती शैली या काटकसरीने केलेल्या चित्रपटांमधून दिसत़ नसे. उलट काहीसा हौशी, पध्दतशीरपणे  पटकथा न रंगवता उस्फूर्तपणे सुचेल ते केल्याचा लुक या चित्रपटांना असे.हिचकाॅकची कल्पना होती ती हीच की अशाच उथळ  धक्कापटाला जर कोणाही सटरफटर दिग्दर्शकाने न बनवता जर खर््या मास्टरने बनवलं ,तर तो किती परिणामकारक होऊ शकेल !   आणि बाकी इतिहास तर आपण जाणतोच. याच प्रकारचं तर्कशास्त्र आपण गिआर्मो डेल टोरोच्या ' पॅसिफिक रिम' चित्रपटाला लावू शकतो.

पॅसिफिक रिमच्या मूळ कल्पनेत काहीच नवीन नाही. गाॅडझीलापासून जपानी चित्रपटात अवतरुन पुढे हाॅलिवुडवरही प्रभाव पाडणारे अनेक जपानी राक्षस आपण पाहिले आहेत. कालांतराने , या राक्षसांची मुळात हिरोशिमा -नागासाकी वरल्या हल्ल्यांपासुन स्फूर्ती घेऊन , अणुयुध्दाचं प्रतीक म्हणून झालेली योजना विस्मरणात गेली आणि हे चित्रपट लक्षात राहिले ते त्यांच्या लो बजेट स्पेशल इफेक्ट्स, सुमार अभिनय, रबर सुटात दडवलेल्या माणसांच्या राक्षसलीला आणि असल्या काही अभिरुचीशून्य पण कॅम्पी घटकांमुळे. त्यांची काही बिग बजेट रुपं नवा गाॅडझिला (१९९८) , क्लोवरफील्ड (२००८ मधली उत्तम निर्मिती) अशा अमेरिकन चित्रपटांतून आलेली आहेत. आताही या चित्रपटांचे चाहाते १९१४ च्या नव्या गाॅडझिलाच्या प्रतिक्षेत आहेतच.

महाकाय यंत्रमानवही चित्रपटांसाठी असेच पुरातन. आपल्यातल्या काहींना एक किंवा दोन चॅनल टिव्हीच्या जमान्यातला 'जायन्ट रोबाट' आठवत असेलच. हल्लीच्या गाडीत रुपांतरीत होणार््या आणि अत्यंत श्रीमंती बजेट्स सह अत्यंत मूर्ख पटकथा असणार््या ट्रान्सफाॅर्मर्स मालिकेपर्यंत त्यांचीही अनेक स्थित्यंतरं आपण पाहिली आहेत. या दोन्ही प्रकारच्या राक्षस गणांना वाहिलेले चित्रपट भरपूर चाहता वर्ग असलेले पण क्वचितच कलेबिलेशी नातं सांगणारे आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.  या दोन्ही प्रकारात मोडणारे राक्षस असणारा चित्रपट पाहायला आपल्याकडला उच्चअभिरुचीदर्शक चित्रपट पाहाणारा प्रेक्षकच का, माझ्यासारखा काय वाटेल ते चित्रपट पाहाणारा माणूसही बिचकेल यात नवल ते काय? पण तरीही तो मी पाहायचं ठरवलं ते उघडच त्याला जोडलेल्या दिग्दर्शकाच्या नावाने.

केवळ जपानी राक्षसी प्राणी आणि महाकाय यंत्रमानव आणि ट्रेलर्समधे दिसणारा त्यांचा धांगडधिंगा पाहून नाक मुरडणार््या प्रेक्षकांनी यामागचा दिग्दर्शक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, कारण शेवटी चित्रपटाचा दर्जा त्याच्या दिग्दर्शकावर ठरतो. डेल टोरोने आजवर फॅन्टसीच्या प्रांतात वावरणारे पण 'टिपीकल' नसणारे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, अनेकांची निर्मिती केली आहे. त्याचा २००६ चा पॅन्स लॅबिरीन्थ हा माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. पण तो सोडूनही क्रोनोस,द डेव्हिल्स बॅकबोन, हेलबाॅय मालिका अशा विशिष्ट चित्रप्रकाराच्या व्याख्येपलीकडे जाणार््या अनेक चित्रपटांना तो जबाबदार आहे. हेलबाॅयच्या २००८ मधल्या दुसर््या भागानंतरचा हा त्याचा पुढला दिग्दर्शकीय प्रयत्न.

पॅसिफिक रिमच्या आधी एक छोटी प्रस्तावना आहे. सेट अप तयार करणारी. चित्रपटाचा वेगळेपणा या पहिल्या काही मिनिटातच आपल्या लक्षात येतो. पहिला राक्षसी प्राणी ,अर्थात कायजू,  समुद्रतळातून वर येऊन माणसापर्यंत कसा पोचला आणि त्यानंतर हे प्राणी कसे येतच राहिले हा इतिहास तो सांगतो आणि मानवाने या प्राण्यांशी लढण्यासाठी काय योजना केली तीही सांगतो. यात लगेचच लक्षात येणारी गोष्ट म्हणजे लेखक/दिग्दर्शक डेल टोरोचा तिरकस सूर. आपण आपत्तीवर मिळवलेला विजय सांगताना तो केवळ आपल्या हुशारीचे गोडवे गात नाही तर एकदा विजयाचा मार्ग दिसल्यावर आपण धोका विसरुन आपल्याच धुंदीत कसे रमलो आणि राक्षसांचा मर्चंडाईज म्हणून वापर सुरू केला हे सांगतो. चित्रपटाची तर्कशुध्द विचाराची सवय दिसते ती राक्षसांशी लढणार््या यंत्रमानवांची , येगर्सची चालक यंत्रणा तो स्पष्ट करतो तेव्हा. यातली ही दोन चालकांना मनाच्या पातळीवर एकत्र आणण्याची कल्पना ही या चित्रपटाला वेगळं बनवण्यासाठी बर््याच प्रमाणात जबाबदार आहे.

 मानवाने कायजूंवर मिळवलेला विजय पहिल्यांदा डळमळायला लागतो तो रॅले (चार्ली हुनाम) आणि यान्सी बेकेट
या बंधूंचा येगर कायजूकडून मार खातो तेव्हा. यान्सी या लढाईत मरतो आणि त्याच्याशी मनाने खरोखरच त्या क्षणी जोडला गेलेला त्याचा भाऊ इतका हादरतो की तो येगर प्रोग्रॅम सोडून परागंदा होतो. पुढल्या पाच वर्षांत कायजूंचे हल्ले वाढत जातात आणि युध्दाच्या अखेरच्या टप्प्यावर येगर प्रोग्रॅमचा संचालक स्टॅकर ( इड्रिस एल्बा)  रॅलेला शोधत येतो. मॅको( रिन्को किकुची) या जपानी तरुणीने त्याचा येगर पुन्हा वापरात आणलेला असतो. पृथ्वीवर कायजूंचा ताबा होऊ नये असं वाटत असेल तर पुन्हा स्टॅकरकडे परत जाण्यावाचून रॅलेला पर्याय नसतो.

पॅसिफिक रिम मधे सर्वात दुय्यम काय असेल, तर तो अभिनय. हे सारे काॅम्पिटन्ट आहेत, आणि ते अनेक अशक्य गोष्टी प्रेक्षकांच्या सोयीसाठी पुरेशा कन्विक्शनने करतात, पण त्यांना मुळात करण्यासारख्या  गोष्टीच कमी आहेत. डेल टोरोची दृष्टी , संकल्पना आणि ती प्रत्यक्षात आणताना त्याने सफाईदारपणे वापरलेलं तंत्रज्ञान हे इथे प्रमुख आहे.  डेल टोरोचं तंत्रज्ञानावरलं नियंत्रण हे जाॅर्ज लुकस किंवा जेम्स कॅमेराॅन यांच्या धाटणीचं आहे ,पण त्याचा विचार हा कधीच त्या दोघांइतका मेन स्ट्रीम असत नाही. विषयाची वेगवेगळ्या पातळ्यांवरली रचना, प्रश्नाच्या परस्परविरुध्द बाजू, अतिमानवी घटकांबद्दलची लव्हक्राफ्टीअन सेन्सिबिलिटी ( मूळात डेल टोरो या चित्रपटाआधी एच पी लव्हक्राफ्टच्या 'अॅट द माउन्टन्स आॅफ मॅडनेस' वर चित्रपट बनवणार होता, मात्र ते जमू शकलं नाही, मात्र या चित्रपटात किंवा हेलबाॅयमधेही त्याच्या कामावरली ही झाक स्पष्ट दिसते)  अशा गोष्टी त्याला सांकेतिक कथासूत्रांपासून बाजूला ठेवत आल्या आहेत. पॅसिफिक रिममधे स्पेशल इफेक्ट्सना भरपूर जागा आहे पण शेवटची पंधरा वीस मिनिटं सोडली तर तो त्यात वाहावत जात नाही. त्याला इतर वेगवेगळ्या गोष्टींमधे रस आहे . मघा सांगितलेलं शब्दशः दोन मनांचं जुळणं ही त्यातली प्रमुख गोष्ट. रॅले आणि मॅको यांचं एकाच येगरचा चालक बनणं ही चित्रपटातली महत्वाची घटना आहे, आणि बराचसा बिल्ड अप हा त्या दिशेने होणारा आहे. एका परीने तिच्याकडे प्रेमकथा म्हणून पाहाता येईल पण हे प्रेमाहून अधिक समजून घेणं आहे. मनाने जवळ येणं आहे. याखेरीज थोडं राजकारण , थोडं ज्या त्या गोष्टीचं कमर्शिअलायजेशन अशी काही उपसूत्रदेखील आहेत.

दिग्दर्शक या इतर घटकांमधे रमतो याचा अर्थ तो मूळ चित्रप्रकाराला बाजूला  टाकतो असा मात्र नाही. तो मूळ माॅन्स्टर मुव्हीशी प्रामाणिक आहेच. त्यात भरपूर कॅम्पीनेस, चिकार अॅक्शन ,मारामार््या, जुन्या चित्रपटांचे संदर्भ वगैरे आहेत. मात्र या गोष्टी आणि पडद्यावरलं जुजबी साहस ही या चित्रप्रकाराची मर्यादा नाही हे तो दाखवून देतो.

केवळ स्पेक्टॅकल या दृष्टीने पाहायचं तर यात दोन गोष्टी खूप उल्लेखनीय आहेत. एक म्हणजे त्यातला स्केलचा वापर. मागे गाॅडझिलाने 'साईझ डझ मॅटर' अशी टॅग लाईन वापरली होती, पण खर््या अर्थाने ती पॅसिफिक रिमला लागू होते. यात कायजू आणि येगर यांचं प्रमाण ,त्यांचा भव्यपणा , मानवाच्या तुलनेत त्यांचा अवाढव्य आकार हे खूप विचार करुन ठरवलंय आणि अनेक प्रसंगी या भव्यतेचा उत्तम वापर केलाय. सुरुवातीला यान्सीच्या मृत्यूनंतर रॅले येगरला एकटाच परत घेउन येतो आणि समुद्रकिनार््यावर कोलमडून पडतो तो प्रसंग किंवा मॅकोची आठवण अशा अनेक जागा सांगता येतील. आणि दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यातलं थ्री डी. मी 'अवतार' थ्री डी फाॅरमॅटमधे पाहिला नव्हता पण आजवर मी जे काही इतर थ्री डि चित्रपट पाहिले आहेत त्यात हा सर्वोत्तम म्हणावा लागेल. गिमिक म्हणून न वापरता स्केल आणि खोली हायलाइट करण्यासाठी केलेला हा वापर थ्री डी ला टाकाउ समजणार््यांनी जरुर पाहाण्यासारखा आहे.

डेल टाेरोने याहून अधिक चांगले चित्रपट केले आहेत आणि लॅबिरीन्थमुळे त्याने स्वतःच बार फार उंचावर नेउन ठेवला आहे. मात्र पॅसिफिक रिम सर्वोत्कृष्ट नसला तरी त्याच्या किर्तीला जागणारा आणि पुढल्या कामाबद्दलच्या अपेक्षा तशाच ठेवणारा आहे हे सहजच म्हणता येईल.
-गणेश मतकरी.

4 comments:

Digamber Kokitkar July 17, 2013 at 10:19 AM  

Kal Sangli chya single screen theater madhye pahila. Already Transformer series yeun gelya mule hya genere madhye ha director kay vegle deil hya baddal kuthul hote.
Transformer -2 tar ardhvat sodavasa vatlela...pan Rs.200.00 paid kele hote mhanun dajavlo nhavto. Ithe ti vel aali nahi.
Chitrpatat action barobar bakichya goshti na dekhil mahatva deto(Raleigh ani Mako yachi kahani)tyamule Transformar chahtyana avadnar nahi. Bhavya pana ithe pahayala milala.
Ata Mumbai la alyavar pahila 3D mdhye pahun phadsha padnar.

Ashish August 4, 2013 at 12:02 AM  

गणेश,

डेल तोरोचा हेलबॉय १,२ बघितले आहेत. त्याला एक वेगळी शैली आहे हे निश्चित मान्य. मला हे दोन्ही पिच्चर आवडले. पॅन्स लॅबिरीन्थ बघितला नाहीये.

मला या लेखावर कमेंट द्यायची होती पण मी हा चित्रपट अर्ध्यावरच सोडल्याने मला आता त्याच्या "स्टोरी" विषयी मत बनवणे योग्य वाटत नाही. पण साधारणपणे या चित्रपटात मला काय आवडले नाही ते सांगतो.

१. अनावश्यक 3D.
हा चित्रकर्त्यांचा दोष आहे असे मी म्हणणार नाही.
भारतात अद्यापि १०% थियेटर्स मध्ये व्यवस्थित 3D पिच्चर दाखवण्याचे तंत्रज्ञान असेल. मग आमच्यावर ही 3D"च" बघायची सक्ती का?
समीक्षकांनी आणि पत्रकारांनी याच्यावर थियेटर वाल्यांचे कान उपटले पाहिजेत. फेसबुक [१] वर जेव्हा मी हे टाकले तेव्हा १०-१५ कमेंट मधून सर्वांनी याचे समर्थन केले.

२. येगर चे इवोल्युशण दाखवले नाही.
एवढ्या प्रगत मशीन्स तयार होतानाचा प्रवास दाखवायला हवा होता. त्यामागचे लॉजिक पचनी पडल्याशिवाय नुसत्या हाणामाऱ्या आणि इकडून तिकडून दाखवलेले फ्यान्सी ग्राफिक्स याला अर्थ उरत नाही. आयर्नम्यान चे उदाहरण घ्या. शक्तिशाली सुट ला ऊर्जाही तेवढीच लागणार, आणि ती कशी मिळवायची हे एकदा स्पष्ट केल्यावर (आर्क रीअॅक्टर) आपले डोके तिथून निघून पुढे येते. कितीही अशक्य वाटत असले तरीही त्या भागाला आपण तात्पुरते मान्य करून पुढच्या गोष्टीसाठी तयार होतो.

अवतार मध्येहि पहिल्या काही मिनिटात आपल्याला त्या काळात तंत्रज्ञान कसे असेल याची प्रचीती येते. जेक सलीला जेव्हा यानात जाग येते तेव्हा नरेशन मध्ये आपल्याला समजलेले असते की पंडोरा 4.37 प्रकाश वर्षे दूर आहे. आणि त्यांचा प्रवास ६ वर्षे झालाय. याचाच अर्थ प्रकाशाची वेगमर्यादा ओलांडली गेली नाहीये. या शतकातले फिसिक्स चे नियम अबाधित आहेत. होतेही तसेच. स्टार वॉर्स, स्टार ट्रेक सारखे वॉर्प ड्राईव, लेझर गन्स, समांतर विश्व, अगम्य उर्जेवर चालणारी याने हे "न" दिसता पंडोरावर पोहोचल्यावर आपल्याला नेहमीची परिचयाची, पण अजस्र आणि अधिक विकसित यंत्रे दिसतात. आणि आपल्याला अगदीच वेड्यात काढल्याची भावना येत नाही. कारण दिग्दर्शक प्रेक्षकांना विश्वासात घेउन आधीच हे सूचकपणे सांगून जातो.

३. अतर्क्य गोष्टी-
मागच्या मुद्द्यात सांगितलेल्याप्रमाणे दिग्दर्शकाने प्रेक्षकांना विश्वासात घेतले नाही तर काय होते पहा-
अ. येगर चे वजन २५०० टन आहे.
एवढ्या मोठ्या मशीन्स माणसासारख्या दोन पायावर का उभ्या केल्या? त्याला चार पायाचे बनवणे योग्य नाही का? त्याने वेट डीस्ट्रीब्युषण व्यवस्थित होऊन येगर अधिक स्टेबल होईल. जर आताचे धातुशात्र वापरले तर येगर स्वत:च्या वजनामुळेच कोसळेल.
ब. येगर ला उचलून समुद्रात आणले जाते-
८ चिनूक सारखी दिसणारी हेलिकॉप्टर वापरून. हेलिकॉप्टरर्स जास्तीत जास्त ८०-१०० टन वाहू शकतात. या न्यायाने कमीत कमी २५, आणि सेफ साईड म्हणून ६०-७० हेलिकॉप्टरर्स पाहिजेत एक येगर न्यायला.

असल्या गोष्टी रामभरोसे ठेवून तुम्ही सायंस फिक्शन काढताय? प्लीज..आवरा.

४. दर ४-५ मिनिटाला मोठ्यामोठ्या आवाजात मारधाडी. कर्कश्य.. लहान मुलांचा पिच्चर बघायला आलोय का आम्ही?

५. मध्यांतरापर्यंत तरी सगळी मारधाड रात्रीच होते. त्यात पाउस, आणि त्यात 3D. रात्र का? अरे बघुदे की आम्हाला डीटेल्स जरा.
ट्रांसफॉर्मर्स मध्ये बघा.. दिवसाढवळ्या अतिशय क्लियर वातावरणात बऱ्याचशा लढाया होतात.


Ashish August 4, 2013 at 12:03 AM  

[१]आधीच्या कमेंट मध्ये उल्लेख केलेला "तो" फेसबुक अपडेट-
Ironman3 3D? No Thanks..

What's the matter with them? Do they even understand what 3D means?
Since the day I saw first trailer of Ironman 3, I decided I wouldn't watch the movie in 3D even for free. Couple or reasons-

1. I think no cinema-hall in Pune is well equipped for 3D viewings.
I don't know, mostly it seems the problem with the glasses.
2. Picture looks considerably dull and darker with the 3D glasses on. Is it intended? I don't think so. Movies like Harry Potter which mostly were shot in dark background are no good for 3D if that was intended effect.
3. It gives headache.
4. Ticket cost is more for 3D versions. 3D glasses rent extra. WTF.

Most movies are post production 3D movies. That means they were not actually shot in 3D. But this isn't true for movies like Avatar and Life of Pi. Still the 3D versions sucked.

I saw GI Joe-Retaliation at Mangala some weeks ago. Live example of what happens when crappy 3D is combined with a shitty movie. 90% of the time I watched it without 3D glasses and I didn't even feel I missed anything.

A large number of theaters in Pune show 3D version of the movies despite of above mentioned problems. So, we don't sometimes have choice. This ruined Avatar, Avengers, Harry Potter, Life of Pi for me. But I am not going to let it happen with Ironman. Apparently Amanora Inox is running a 2D version of Ironman3. Such a relief.

ganesh August 19, 2013 at 11:46 AM  

1. Ashish, Just because pune doesnt have good 3d can't be the reason not to produce them. This film had many of the best 3 D effects and was carefully designed around the technology to enhance the scale. PVR usually has a very reliable projection. Try if u have tose in Pune . Many films, like u mention are converted to 3 D later. This was not amongst thise and technology is properly used.
2. The film is sort of Homage to older films while looking at new philosophical aspects. So imagery is very Godzilaesque. There is nothing wrong with it. There are specific issues a particular filmmaker focuses on. Focusing on technical details would have resulted in a very mechanical version like transformer films. This focused more on the mind than matter. I did not find anything wrong with the approach.
3. The issues here are not purely sci fi. Next you may want to know the exact technology to combine the minds of the pilots. You have to assume certain things.
4. You should have known this from ads or trailers. And I did not feel like I was watching a children's film.other than maybe last half an hour.
5. You actually seem to like transformers more. I found them ridiculous. Pacific Rim gave me a lot to think about. transformers were kiddie films.

There is no reason that u should like it because I did and vice versa. Maybe you would have liked it more with a better 3d projection.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP