द अॅक्ट आॅफ किलिंग- असाही एक कलावंत
>> Monday, November 11, 2013
पहिले काही दिवस ते लोकांना बेदम मारत असत, मरेस्तवर. म्हणजे खरच मरेस्तवर. अतिशयोक्ती नाही. पण या पध्दतीचा खूप त्रास होता. सगळीकडे रक्त, मग ते साफ करणं मुश्कील. मग या माणसाने त्यावर एक तोडगा काढला.
वृध्दाच्या चेहर््यावर त्याचा हुशारीबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसतो. गच्चीच्या एका बाजूला एक लोखंडी खांब आहे, तिथे तो आपल्याला नेतो. मग एक लांबलचक तारेचं भेंडोळं काढतो. त्याच्या एका बाजूला छोटंसं लाकडी फळकूट. मग तो आपल्या एका माणसाला प्रात्यक्षिकात मदत करण्यासाठी बोलावतो. या मदतनीसाच्या चेहर््यावरही आपल्या बाॅसच्या कर्तुत्वाचं कौतुक आहेच. तो आनंदाने खांबाला टेकून खाली बसतो. तारेचं एक टोक खांबाला बांधलं जातं, मग मदतनीसाच्या गळ्याभोवती गुंडाळलं जातं. मग वृध्द ते फळकूट दोन्ही हातात पकडून खेचल्याचा अभिनय करतो. पाहिलंत? स्वच्छ मृत्यू. तारेने गळा आवळून. उगाच कचरा नको. एफिशिअन्सी महत्वाची. इतक्या लोकांना मारायचं तर एफिशिअन्सी ही हवीच, नाही का?
ही डाॅक्युमेन्टरी आहे जोशुआ ओपनहायमरची 'द अॅक्ट आॅफ किलिंग'. इन्डोनेशिआमधे, १९६५/६६ च्या सुमारास लाखांच्या घरात कम्युनिस्टांच्या राजकीय कारणासाठी हत्या करणार््या काही कर्तबगार मारेकर््यांवर हा आज टाकलेला प्रकाशझोत. मघाच्या वर्णनातला वृध्द यांमधलाच एक. आजही राजकीय वजन टिकून असलेलं हे नाव. म्हणतात, की त्याने व्यक्तिशः हजार माणसांना मारलं. बर््याच जणांना तारेने गळा आवळून, पण इतर मार्गही होते.
जेनोसाईड हा विषय आजकाल इतक्या अंगानी इतक्या चित्रपटांमधून पाहायला मिळतोय की त्या विषयाचीच भीती वाटावी. पूर्वी केवळ गंभीर पातळीवर केलेलं ( लाईफ इज ब्युटीफूल सारखे क्वचित अपवाद वगळता) नाझी क्रौर्याचं चित्रण चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात दाखवलं. आजही, हाॅलोकाॅस्टला या विषयात स्थान आहेच, पण 'एक्स मेन मालिका , एन्डर्स गेम' सारखे मुलांना , नवतरुणांना डोळ्यासमोर ठेवून केलेले चित्रपट, 'होमलँड, २४' सारख्या रहस्य/ अॅक्शन प्रधान मालिका, 'द अॅक्ट आॅफ किलिंग' सारखी या संकल्पनेतल्या विसंगती, विक्षिप्तपणा समोर आणणारी डाॅक्यूमेन्टरी, हे सारं पाहिलं, की जेनोसाईड हा विषय प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे किती सार्वत्रिक परिणाम करुन राहीलाय हे जाणवतं.
' द अॅक्ट आॅफ किलिंग' हे एक अजब रसायन आहे. प्रथमदर्शनी हा माहितीपट राजकीय हत्याकांडाकडे पाहाण्याचा संपूर्ण त्रयस्थ दृष्टीकोन निवडतो. यातले मारेकरी, प्रामुख्याने अन्वर आणि आदि झुलकाद्री हे स्वतःला मुळातच गुन्हेगार मानत नाहीत. त्यांचा मूळ उद्योग सिनेमा तिकिटांचा काळा बाजार करण्याचा. राजकीय घडामोडींनी त्यांना मारेकरीपदी बढती मिळाली आणि ती यांनी स्वीकारली. ज्या निर्वीकारपणे ते तिकिटं ब्लॅक करत होते, त्याच निर्विकारपणे त्यांनी लोकांचे गळे आवळायला सुरुवात केली. ओपनहायमर कुठेतरी हा निर्वीकारपणा पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि तो निर्विकारपणा हाच या सार््या प्रकरणातला सर्वात अंगावर येणारा भाग आहे.
हे लोक स्वतःला गुन्हेगार समजत नाहीत. एक प्रकारचे योध्दे समजतात. आपल्या कामाचा, आपण पसरवलेल्या दहशतीचा त्यांना अभिमान आहे. दिग्दर्शक या अभिमानाचा फायदा घेतो आणि या मंडळीना त्यांची धाडसी कारकिर्द पडद्यावर आणायला सांगतो. किंबहुना त्यांना हे सारं पुन्हा अभिनीत करण्यासाठी, चित्रीत करण्यासाठी प्रोत्साहन देतो. एका बाजूने भयंकर गुन्हेगारी वास्तव आणि दुसर््या बाजूने गँगस्टरपटात शोभण्यासारखी, थोडी या खुन्यांच्या आठवणीतून अवतरलेली आणि थोडी त्यांच्या चित्रपटप्रेमाने प्रभावित झालेली ,त्यांनीच रंगवलेली दृश्य अशा दोन रुळांवरुन या माहितीपटाची गाडी आलटून पालटून जाते.
चित्रपटाचं दिग्दर्शन आणि माहितीपटाचं दिग्दर्शन यात फरक आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन हे खूप तपशिलात जाऊन ठरवणं आणि त्याबरहुकूम जसंच्या तसं करणं शक्य असतं. माहितीपटाचं दिग्दर्शन थोडं अनप्रेडिक्टेबल असतं. त्यात मांडल्या जाणार््या विचारांची दिशा ठरवणं हे यातलं प्रमुख दिग्दर्शन. या विशिष्ट माहितीपटाच्या बाबतीत तर ते करणं ही तारेवरची कसरत करण्याइतकंच कठीण म्हणावं लागेल. इथे अन्वरच्या सहकार््यांत १९६५/६६ च्या घटनांबद्दल वेगवेगळे दृष्टीकोन पहायला मिळतात. काहिंना त्यांचा अभिमान वाटतो, काहिंना ते चुकलं असं वाटतं, काहिंना या माहितीपटात सामील होणंच पटत नाही. चित्रकर्त्यांना इथे असणारा धोका तर दुहेरी स्वरुपाचा आहे. एकतर त्यातला विचार योग्य पध्दतीने पोचतो आहे की नाही हा, आणि दुसरा अधिक थेेट. अखेर ज्यांनी हजारो माणसं मारली आहेत, त्यांना आणखी पाच दहा माणसानी काय फरक पडणार!
चुकीच्या गोष्टींचं ग्लोरीफिकेशन हा चित्रपटात नेहमीच आढळणारा एक मोठा प्रश्न आहे. एखाद्या कृत्याचा ,वागणुकीचा, वृत्तीचा कथानकात निषेध करायचा मात्र प्रत्यक्षात मिळणारा स्क्रीन टाईम, तिच्या चित्रणात आलेली नाट्यपूर्णता, सहभागी कलावंतांचं ग्लॅमर या गोष्टींमुळे त्या कृत्याला, वागणुकीला, वृत्तीला प्रसिध्दीच द्यायची असं चित्रपटांत बर््याचदा होतं. या माहितीपटांत जरी परिचित चेहरे नसले तरी त्यातली खलपुरुषांना आपली भूमिका मांडू देण्याची, आणि नंतर त्यांच्या 'फिल्म विदिन फिल्म' डिव्हाईसमधे त्यांना ते सादर करायला लावण्याची कल्पना ही भलत्या दृष्टीकोनाला उठाव देण्याची शक्यता तयार करते. त्यातून अन्वर हे खरोखरच वेधक व्यक्तिमत्व आहे, गोदारच्या मिशेलपासून टेरेन्टिनोच्या व्हिन्सेन्ट व्हेगापर्यंत कॅरीज्मॅटिक गँगस्टरांच्या परंपरेत बसणारं. मात्र 'अॅक्ट आॅफ किलिंग'चा आलेख असं ग्लोरीफिकेशन होऊ देत नाही. तो या मंडळींच्या गुन्ह्यांचं गांभीर्य त्यांच्या वागण्यातला, त्यांच्या रिएनॅक्टमेन्टमधला विक्षिप्तपणा दाखवतानाही शाबूत ठेवतो.
सामान्यतः माहितीपटांत (अपवाद वगळता) चित्रण दिसतं ते वास्तववादी स्वरुपातलं. मात्र इथलं चित्रण थोडं तर््हेवाईक आहे. त्याचे विविध प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो अगदी नेहमी दिसणारा, प्रत्यक्ष जीवनदर्शनातून येणारा वास्तववाद. यात मुलाखती, चर्चांसारखा भाग असल्याने, चित्रपटाच्या वैचारिक कसरती याप्रकारात दिसतात.
दुसरा प्रकार आहे तो चित्रकर्त्यांकडून मॅनिप्यूलेट झालेल्या वास्तवाचा. हे उघड आहे की दिग्दर्शकाची भूमिका अन्वर आणि कंपनीचं कौतुक करणारी नाही. मात्र ती तशी असल्याचा आभास त्याने अन्वर आणि कंपनीला गाफिल ठेवण्यासाठी निर्माण केला आहे. या आभासाचाच एक भाग म्हणून या गुन्हेगारांनाच त्यांच्या गुन्ह्याचं कल्पित चित्रण करायला लावण्याचा घाट घातला जातो जो चित्रकर्त्यांच्या इन्टरफिअरन्सशिवाय शक्य नाही. म्हणजे हे वास्तव असलं, तरी सोयीस्करपणे बदललेलं वास्तव आहे.
तिसरा प्रकार आहे तो फँटसीचा, कॅमेरात पकडलेल्या हत्या आणि मारेकरी बनवत असलेल्या कथित चित्रपटीय दृश्यांचा. हा भाग खूपच गडद आणि आपल्याला एक वेगळा विचार करायला लावणारा आहे. या दुष्टांवरचा प्रभाव जर चित्रपटांचाच असेल, तर आजवर आपण चित्रपटांच्या आविष्कारस्वातंत्र्याच्या बाजूने बोलत होतो त्यात तथ्य ते काय ? सारीच माणसं चित्रपटांच्या प्रभावाखाली असतात , पण वाईट माणूस या प्रभावाचा वापर अधिक प्रभावीपणे करतो असं तर हा माहितीपट सांगत नाही?
मी 'द अॅक्ट आॅफ किलिंग' पाहून चांगलाच अस्वस्थ आलो. हे संपूर्ण नाटक असेल का? ओपनहायमरच्या डोक्यातून आलेलं काहीतरी त्याने खर््याखोट्याच्या सरमिसळीतून मांडलं असेल का? पण तसं असल्यास त्याचा पुरावा मला मिळाला नाही. त्यावर लिहीलं, बोललं गेलेलं सारं, हे सारं खरं असल्याचं गृहीत धरणारं आहे. एखाद्या चित्रपटाइतकं चमत्कृतीपूर्ण असलं तरीही. म्हणतात ना, 'ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन', त्यातलाच प्रकार !
-गणेश मतकरी
4 comments:
सारीच माणसं चित्रपटांच्या प्रभावाखाली असतात , पण वाईट माणूस या प्रभावाचा वापर अधिक प्रभावीपणे करतो असं तर हा माहितीपट सांगत नाही?
What do that mean?
it means everything ,a medium, a habit, a form has a sphere of influence. each person reacts to it differently. Film is a medium, which in terms of it's drama, glamour, violent themes has more to offer to a person of a certain type. and this person takes and uses this influence. for example ,we see a lot of crime influenced by Cinema, suicides influenced by cinema. we don't see anyone being reformed using films as influence. ditto for anyone score better marks, seek rehab, remain faithful in love. it seems bad influence spreads rapidly than good influence.
Oh yeah dark context wins over hope driven sugary sweet context or even gray areas in commercial cinema for the most obvious reasons, as McKee would say "You need a Conflict". Its easier to make a kidnapping movie than L'Avventura.
For a moment there I thought you were implying that films can be more pointedly used by "bad" people to manipulate people.
Because that is negated in the film right at the end when Anwar accepts his guilt because of the film he himself made. Thats like approaching Charlie Kaufman territory.
I found the documentary pretty weird and I was bored halfway through it. It does depict genocide through a different or indifferent lense, and I do get the filmmakers attempt to save themselves, but it gets surreal pretty quickly with Anwar and his colleagues in crime roleplaying the crime scenes.....
Wikipedia page for 'pancasila' is pretty benign and as I suspected, it refers to much tauted "panch sheela" in Sanskrit. I felt the cruelty was conveyed matter of factly and didnt disturb be as much as say "One day in September", or "Chaser" (Korean).
Post a Comment