प्रिझनर्स , अर्थात ' अपराधी कोण? '

>> Tuesday, November 19, 2013


हाॅलिवुडमधे जशी समर ब्लाॅकबस्टर चित्रपटांचा वर्ग आहे, तसाच एक चांगल्या आशयघन चित्रपटांचाही वर्ग आहे. हे चित्रपट तुलनेने कमी प्रमाणात असले, तरी सामाजिक मूल्यव्यवस्थेवरलं भाष्य, समस्यांची उत्तम मांडणी, सखोल व्यक्तिरेखा अशी अनेक वैशिष्ट्य या चित्रपटांत पाहायला मिळतात. नावाजलेले दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी वेळोवेळी आपल्या लोकप्रिय प्रतिमांना छेद देऊन अशा चित्रपटांवर काम केलेलं दिसतं. आॅस्करच्या नामांकनांमधे या जातीचे बरेच चित्रपट पाहायला मिळतात. यातलाच एक उपप्रकार आहे तो गुन्हेगारीचा वरवरच्या आणि कथनात्मक अंगापलीकडे जाउन विचार करणार््या सिनेमाचा. या सिनेमात गुन्ह्याला महत्व आहे पण ते तो कसा केला वा कुणी केला याचा छडा लावण्यापुरतं मर्यादित स्वरुपाचं नाही. त्याला तो समाजाच्या ज्यावर्गात घडला त्याचा संदर्भ आणून देणं, त्या प्रकारच्या गुन्हेगारीची सार्वत्रिक कारणं शोधण्याचा प्रयत्न करणं, गुन्हेगाराच्या मनाचा माग घेणं वा बळी किंवा गुन्हेगार यांच्या वैचारीक उलाघालीचा तपास करणंं, असे बरेच उद्योग हे चित्रपट करतात.   जोनाथन डेमचा ' द सायल्ेन्स आॅफ द लॅम्ब्स' , डेविड फिंचरचा ' झोडिअॅक', क्लिन्ट इस्टवुडचा 'मिस्टीक रिव्हर' किंवाा बेन अॅफ्लेकचा ' गाॅन बेबी गाॅन' ही अशा चित्रपटांची काही उदाहरणं. दिग्दर्शक डेनिस विलेन्यूवचा ' प्रिझनर्स' या प्रकारातच मोडतो.
प्रिझनर्सची रचना, त्यातले प्रमुख प्लाॅट पाॅईन्ट्स आणि उलगडा पाहाता त्याला 'हूडनीट' (whodunit)च म्हणावं लागेल मात्र त्यतलं रहस्य लगेचच कळलं नाही, ( किंबहुना ते चांगलं असल्याने लक्षात यायला बर््यापैकी वेळ लागतो आणि अनेकांना त्याचा उलगडा चित्रपटाने सांगेपर्यंत न होणंही शक्य आहे) तरीही त्यात रहस्यपट म्हणून ( लक्षात घ्या- रहस्यपट म्हणून, चित्रपट म्हणून नाही) मला एक वीक पाॅईन्ट वाटतो. त्यात गुन्हेगार कोण हे आपल्याला चटकन कळलं नाही तरी कोण गुन्हेगार नाही, हे लक्षात येणं सहज शक्य आहे. याच मार्गावर पुढे विचार केला तर एलिमिनेशनने रहस्यभेद होऊ शकतो मात्र चित्रपटातल्या नाट्याची मदार ही मुळातच रहस्यभेदावर अवलंबून नाही. विषयाचा गडदपणा, परिस्थितीतून उद्भवणार््या गुन्ह्याला समांतर शक्यता आणि व्यक्तिचित्रण ,खासकरून जॅकमन आणि गिलेनाल यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांचं व्यक्तिचित्रण, हे प्रिझनर्सचे स्ट्राँग पाॅईन्ट्स आहेत.
चित्रपट अडीच तासाचा, म्हणजे तसा मोठा आहे, आणि खेळीमेळीच्या वातावरणात किंवा सेट अप वर फार वेळ फुकट न घालवता तो विषयाला तो अगदी लगेचच हात घालत असल्याने त्यातला तणावाचा भागही खूपच मोठा आहे. त्यात काही भाग व्हायलन्ट निश्चितच आहे पण तो अनावश्यक आहे असं कोणालाही म्हणता येणार नाही.
डोव्हर आणि बर्च या दोन कुटुंबात चांगली मैत्री. थँक्सगिव्हींगला एकमेकांच्या घरी जाण्याची पध्दत. यंदाही केलर ( ह्यू जॅकमन) आणि ग्रेस ( मारिआ बेलो) डोव्हर, आपल्या  मुलांसह फ्रँकलिन ( टेरेन्स हाॅवर्ड) आणि नॅन्सी ( वियोला डेव्हिस) बर्च कडे जाऊन पोचतात . मोठी मंडळी गप्पात रंगली असताना आणि मोठी मुलं टिव्ही पाहात असताना अॅना आणि बर्च कुटुंबातली धाकटी जाॅय ,कुठेतरी निसटतात. लवकरच लक्षात येतं की त्या नाहीशा झालेल्या. पोलिसांना बोलावलं जातं. डिटेक्टिव लोकी ( जेक गिलेनाल) प्रकरणाचा ताबा घेतो.  संशय येतो तो त्या सुमारास या भागात असलेल्या अॅलेक्स ( पाॅल डानो) या तरुणावर. पण अटक केल्यावर लक्षात येतं की बिचार््याची बौध्दिक वाढ बेताची, दहाएक वर्षाच्या मुलाएवढी आहे आणि असा योजनाबध्द गुन्हा तो करणं शक्य नाही. मात्र यावर केलरचा विश्वास बसत नाही. पोलिसांना जमलं नाही ते तो स्वतः करुन दाखवायचं ठरवतो आणि कबुलीजबाब मिळवण्यासाठी स्वतःच अॅलेक्सचं अपहरण करतो.
प्रिझनर्समधे दोषी / निर्दोषी किंवा न्याय/ अन्याय या संकल्पनांशी केलेला खेळ आहे. या संकल्पनांचा सांकेतिक विचार काय पध्दतीने केला जातो आणि ती व्याख्या परिपूर्ण आहे का असा विचार चित्रपट करतो. अॅलेक्स घटनास्थळी उपस्थित होता हे खरं पण तो अपराधी असल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही केलरच्या मते तो गुन्हेगार आहे. त्याने कबुलीजबाब दिलेला नाही, मात्र त्याने काय फरक पडतो, तो त्याच्याकडून वदवून घेता येणं शक्य नाही का? मुलींची वेळेत सुटका करणं हा केलरचा हेतू म्हंटलं तर योग्यच, पण वेळ जातो तसा हा हेतूही निमित्तमात्र होत जातो, आणि केलरचं वागणं टोकाला, नियंत्रणापलीकडे जातं. अॅलेक्स जर निर्दोष असेल, तर केलरलाच गुन्हेगार म्हणायला हरकत नाही, आणि खरं तर अॅलेक्स दोषी असला तरीही त्यामुळे केलरचं वागणं जस्टीफाय होत नाही. दोषाचं प्रत्यारोपण करुन दहशतवादी भूमिका स्वीकारणं आणि 'बळी तो कान पिळी' या न्यायाने कमकुवत घटकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं हे अमेरिकेचं नवं युध्दविषयक धोरण आपल्याला केलरची वागणूक पाहून आठवणं हे सहज शक्य आहे,  आणि अर्थातच हा योगायोग नसावा.
केलर आणि लोकी या यातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखा. आणि त्यांच्यातला तोल हाच खरा चित्रपटाचा तोल. मूळ अपहरणाच्या घटनेतलं नाट्य, त्यानंतरचा भावनिक संघर्ष, टाॅर्चर सारख्या भडक होण्याची शक्यता असणार््या घटना या सगळ्यामुळे चित्रपट मेलोड्रॅमॅटीक होण्याची शक्यता खूपच होती. ती टळते ती केलरची व्यक्तिरेखा खूपच तपशीलात रंगवल्याने.   सध्या हाॅलिवुडमधे अनेक नट असे आहेत जे पूर्ण फॅन्टॅस्टिक ते पूर्ण वास्तववादी अशा रेंजच्या भूमिका  सारख्याच गंभीरपणे उभ्या करतात. टोबी मॅग्वायर, डॅनीएल क्रेग, राॅबर्ट डाउनी ज्यु. अशी अनेक नावं घेता येतील. ह्यू जॅकमन हे त्यातलंच महत्वाचं नाव. एक्स-मेन मधे कोणत्याही संकटाला लीलया तोंड देणार््या वुल्वरीनचा माज केलरमधे नावालाही दिसत नाही. दोन्ही भूमिकांमधे हिंसा अंगभूत असली, तरी हा अभिनेता ज्या पध्दतीने पटकथेच्या मागणीला रिअॅक्ट होतो, ते संपूर्णपणे विरुध्द टोकांचं म्हणता येईल. ही भूमिका पूर्ण ग्रे शेड्समधली आहे , आणि केलरचं पात्रं पुढल्या भागात अधिकाधिक गडद होत जातं. असं असतानाही जॅकमन त्याच्याबद्दलची आपली सहानुभूती शाबूत ठेवतो. त्याची असहायता आपल्यापर्यंत पोचवतो.
लोकी हे गिलेनालच्या व्यक्तिरेखेचं नाव त्याच्या लो की परफाॅर्मन्सचं सूचक वाटण्यासारखं आहे. अशा रहस्यकथांमधे व्यक्तिरेखांची वजनं सामान्य कथानकांपेक्षा वेगळीच असतात. डिटेक्टीवचं पात्र स्वतःकडे खूप महत्व घेतं मात्र ते प्रत्यक्ष नाट्याला जबाबदार नसून केवळ काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणारं, बरचसं ब्लॅन्ड असतं.  त्यामुळेच होम्स पासून पाॅयरोपर्यंत डिटेक्टीव्जची सर्व पात्र ही खास चमत्कृतीपूर्ण रंगवली जातात. त्यांच्या मध्यवर्ती भूमिका या कंटाळवाण्या होणार नाहीत हे पाहाण्याचा हा प्रयत्न असतो. लोकी असा विक्षिप्तपणा बरोबर घेऊन येत नाही. तो सामान्य, गरजेपुरतं बोलणारा, पण अतिशय सेन्सिबल आणि हुशार इन्वेस्टिगेटर आहे. त्याचं तसं असणं हे पटकथेतल्या केलरच्या पात्राला काउंटरपाॅईन्ट देतं. कथेला वास्तवाशी बांधून ठेवतं. गिलेनाल हे पूर्णपणे आेळखतो. तो हिरो होण्याचा प्रयत्न करत नाही. जॅकमनचा केलर आणि गिलेनालचा लोकी पूर्ण चित्रपटाची दिशा, त्याचा फोकस ठरवतात आणि टिकवून धरतात. सर्वच उत्तम परफाॅर्मन्समधे हे दोघं खास चमकतात. आॅस्करला यातल्या एकाची किंवा दोघांचीही वर्णी लागणं सहज शक्य आहे.
किंबहुना या दोघांची, कशाला, आॅस्कर वाॅचमधे रस असणार््यांनी हा चित्रपट लक्षात ठेवावा. त्यातली इतर नावंही स्पर्धेत राहाण्याची खूप शक्यता आहे.
-  गणेश मतकरी 

4 comments:

भानस November 20, 2013 at 7:19 AM  

मला ह्यू जॅकमन भावतो. पाहायला हवा हा सिनेमा. :)

Unknown December 19, 2013 at 2:22 AM  

I was expecting 2-3 golden globe nominations for prisoners ... ekahi naahi so shocking v!!! best supporting tar havach hota

Amol Mat January 16, 2014 at 10:10 PM  

सिनेमाइतकाच तुमचा त्यावरचा लेखही आवडला. खूप छान.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP