हाॅफमन

>> Sunday, February 9, 2014


"द जाॅब इजन्ट डिफिकल्ट. डूइंग इट वेल इज डिफिकल्ट."

फिलिप सिमोर हाॅफमन, अभिनयाविषयी बोलताना.
(जुलै २३, १९६७-फेब्रुवारी ४, २०१४)

अभिनेते दोन प्रकारचे असतात. पहिले मोठ्या थोरल्या भूमिकांमधे वाजागाजा करत येतात. तुमचं लक्ष हे त्यांच्याकडे जाण्याआधी त्यांच्या भोवतीच्या वलयाकडे जातं आणि त्यांच्या भूमिकांमधेही त्या त्या व्यक्तिरेखांपेक्षा त्यांच्या स्वत:ची ठाशीव प्रतिमाच जाणवत राहाते. किंबहुना अनेकदा ही प्रतिमा हवीशी वाटल्यानेच आपण या अभिनेत्यांना स्वीकारतो.

 याउलट दुसर््या प्रकारचे अभिनेते कधी तुमच्या भावविश्वाचा भाग होऊन जातात अनेकदा तुम्हाला कळतही नाही. त्यांच्या येण्यात आव नसतो, 'माझ्याकडे पहा' असं ते आपल्या भूमिकांमधून सुचवत नाहीत, अनेकदा ते छोट्या भूमिकांमधेही नजरेला पडतात आणि त्यांच्यातला नट आपल्याला दिसतच नाही. आपल्यापुरते ते ती व्यक्तिरेखाच असतात. हळूहळू या मंडळींना पडद्यावर पहात राहायची आपल्याला सवय होऊन जाते. मग कधीतरी आपण लक्षात ठेवून त्यांचं नाव जाणून घेतो आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवायला लागतो. कधीमधी जुने चित्रपट पाहातानाही यांची गाठ पडते आणि आपल्याला तेव्हा आवडलेली ती अमुक तमुक भूमिका यांनीच केली होती बरं का, असा सुखद धक्का आपल्याला अनुभवता येतो. ही मंडळी बहुधा अपेक्षाभंग करत नाहीत. तुमच्या संपादन केलेल्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीत. म्हणजे निदान आपल्या कामात तरी . कधीकधी मात्र त्यांचं व्यक्तिगत आयुष्यच त्यांना असा पेच घालतं, की गोष्टी कधी हाताबाहेर गेल्या कोणालाच कळत नाही. वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी  फिलीप सिमोर हाॅफमनचा ड्रग ओव्हरडोसने झालेला अंत अशाच एका दुर्दैवी पेचाशी जोडण्यापलीकडे आपण काही करु शकत नाही.

आपल्याकडे इंग्रजी चित्रपट पहायला मिळण्याचं प्रमाण गेल्या वीसेक वर्षात, म्हणजे हाॅफमनच्या कारकिर्दीदरम्यान सुधारत गेलं असलं, तरी ते फार भरवशाचं नाही. त्यामुळे लोकप्रिय चित्रपट हमखास येत असले, तरी अधिक आशयगर्भ चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसण्याची खात्री नाही. अर्थात आपण ते या ना त्या मार्गाने पाहू शकतो पण अशा रँडम बघण्यात दिग्दर्शका, लेखका , अभिनेत्यांच्या कामाचा आलेख विस्कळीत होऊन जातो. त्याचा वेगळा अभ्यास केल्याशिवाय या कलावंतांची वाढ कधीपासून कशी होत गेली हे आपल्याला कळायला मार्ग उरत नाही. माझ्या लक्षात हा अभिनेता आला तो पाॅल थाॅमस अँडरसन दिग्दर्शीत आँसाब्ल चित्रपटात, मॅग्नोलिआ मधे  . चित्रपट जरी १९९९चा असला तरी मी पाहीपर्यंत आणखी दोनतीन वर्ष उलटली होती. या चित्रपटात नटसंच प्रचंड होता. अगदी टाॅम क्रूजपासून वय आणि प्रसिध्दीच्या सर्व पायर््यांवरले लाेक होते. तरीही त्यातलं हाॅफमनने उभं केलेलं, सद्वर्तनी मेल नर्सचं पात्र लक्षात राहीलं. नंतर मी लगेचच  दोन वर्ष आधी म्हणजे १९९७ ला आलेला, अँडरसनचाच बूगी नाईट्स पाहिला आणि हा अभिनेता जे करतोय ते पाहिलं पाहिजे असं निश्चित ठरलं.

पाॅर्न इन्डस्ट्रीचं थबकवणारं  चित्रण करणार््या 'बूगी नाईट्स'ला हाॅफमनची ब्रेकिंग आऊट फिल्म मानलं जातं. म्हणजे या चित्रपटातल्या गे बूम आॅपरेटरच्या भूमिकेपासून तो लोकांच्या नजरेत आला. याआधीही त्याने लोकप्रिय आणि समीक्षकप्रिय चित्रपटांमधून छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या पण हाॅफमनची ताकद इथे लक्षात यायला लागली. आणि एकदा ती आली म्हणताच त्याच्यापुढे अनेक नव्या वाटा खुल्या झाल्या.

हाॅफमनचं रुप सांकेतिक प्रमुख भूमिकांना चालणारं नव्हतं. मोठं डोकं, जाडगेली शरीरयष्टी यांमुळे त्याला परिचित वळणाच्या भूमिका मिळणार नाहीत हे उघड होतं, पण त्या तशा मिळण्याची गरजही नव्हती. कारण नायक म्हणून त्याने स्वत:ला पाहिलंच नाही. त्याने स्वत:साठी जागा शोधली ती खलनायकी नव्हे, पण नकारात्मक, थोड्या आडवळणाच्या व्यक्तिरेखांत. 'पॅच अॅडम्स' (१९९८) मधला , नायकाच्या आपल्या डाॅक्टरी पेशाकडे गांभीर्याने न पाहाण्याचा राग असणारा रुममेट ( हा चित्रपट मुन्नाभाई एम बी बी एस मागची प्रेरणा आहे आणि त्यातली डाॅ अस्थानाची भूमिका साकारताना, बोमन इरानीने या व्यक्तीरेखेपासून स्फूर्ती घेतल्याचं जाणवतं), 'द टॅलेन्टेड मिस्टर रिपली' (१९९९) मधला रिपलीचा डाव ओळखणारा पण तरीही त्याला तुच्छ लेखत राहाणारा फ्रेडी,  'आॅल्मोस्ट फेमस' (२०००) मधला आपल्या 'अनकूल' असण्याबद्दल अभिमान बाळगणारा संगीत क्षेत्रातला पत्रकार लेस्टर बँग्ज, अशा अनेक लक्षात राहाण्यासारख्या भूमिका त्याने केल्या. त्याचा विशेष हा होता की तो या काहीशा बेतीव भूमिकांनाही चटकन खर््या करुन सोडत असे. या काहीशा स्वार्थी, आक्रस्ताळ्या, विक्षिप्त पात्रांनाही सहानुभूती मिळवून देत असे.

या सार््या भूमिकांची लांबीही खूप मोठी होती अशातला भाग नाही. पण हाॅफमनचा वावर, वाक्यांची फेक, समोरच्या नायकांची पत्रास न ठेवता भूमिकेत शिरण्याची तयारी, यामुळे तो एखाद दुसर््या प्रसंगातही लक्षात राहायचा. त्याच्या पात्रांच्या वृत्तीत जरी साम्य असलं तरी प्रत्यक्षात यातली प्रत्येक पडद््यावर साकारताना त्याने स्वत:मधे आमूलाग्र बदल घडवला. त्याने स्वत:ची शैली किंवा प्रतिमा होऊ दिली नाही.

हाॅफमनचं रुप आणि त्याच्या सुरुवातीच्या काळातल्या छोटेखानी भूमिका यांनी तो मध्यवर्ती भूमिकांपर्यंत कसा जाईल , हा प्रश्न होताच, जो सुटला बेनेट मिलर दिग्दर्शित कापोटी (२००५) चित्रपटाने. हाॅफमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं आॅस्कर मिळवून देणार््या या चित्रपटात त्याने कॅन्ससमधल्या एका कुप्रसिध्द हत्याकांडावर आधारीत  'इन कोल्ड ब्लड'  हे प्रचंड गाजलेलं पुस्तक लिहिणार््या ट्रुमन कापोटींची भूमिका साकारली होती. आपल्या एरवीच्या व्यक्तिमत्वाशी पूर्ण फारकत घेणार््या या भूमिकेने हाॅफमन स्टार झाला.तोही 'स्टार'  या पदाच्या पारंपारिक गुणवैशिष्ट्यांशी अर्थाअर्थी संबंध नसताना. सिडनी लूमेट दिग्दर्शित  'बीफोर द डेव्हिल नोज यू आर डेड' (२००७)  मधला सारी गणितं चुकत जाणारा भ्रष्ट फिनान्स एक्झिक्युटीव, चार्ली काॅफमनच्या 'सिनेकडकी, न्यू याॅर्क'(२००८) मधला वास्तव आणि कल्पिताच्या सीमेवर भरकटणारा नाट्यदिग्दर्शक, जाॅन पॅट्रिक शॅनलीच्या 'डाउट' (२००८) मधला संशयाच्या छायेतला धर्मोपदेशक अशा अनेक प्रमुख भूमिका त्याने पुढल्या काळात केल्या. अनेक पुरस्कार आणि नामाकनं मिळवली .  'जॅक गोज बोटींग' (२०१०) या चित्रपटातून दिग्दर्शनातही पदार्पण केलं.

अनेक वर्षांपासून तो ब्राॅडवेवरही दिग्दर्शन आणि अभिनय करतच होता. आर्थर मिलरच्या 'डेथ आॅफ ए सेल्समन' या सुप्रसिध्द नाटकाच्या २०१२ मधल्या पुनरुज्जीवनात त्याने केलेली विली लोमॅन ही मध्यवर्ती भूमिका त्याच्या रंगभूमीवरल्या करीअरचा हायलाईट मानली जाते. त्याच्या मृत्यूनंतर श्रध्दांजली म्हणून पाच फेब्रुवारीला पावणेआठवाजता ब्राॅडवे नाट्यगृहांचे दिवे एका मिनिटाकरता मंद करण्यात आले, यावरुनही हाॅफमनचा या क्षेत्रातला दबदबा दिसून येतो.

कोणताही कलावंत गेल्याचं दु:ख हे असतंच पण या प्रकारचा अष्टपैलू कलावंत जेव्हा आपल्या कारकिर्दीच्या मध्यावर निघून जातो तेव्हाची भावना ही थोडी हताश करणारी असते. फिलीप सिमोर हाॅफमनचा व्यसनापायी ओढवलेला मृत्यू ही घटना त्यातलीच एक. वीस बावीस वर्षांपूर्वी त्याने या व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि पुढली अनेक वर्षं तो यशस्वीही ठरला.पण शेवटी त्याच्या व्यक्तीगत आयुष्याने त्याला दगा दिलाच.  हाॅलिवुडमधल्या सर्वात जिव्हारी लागणार््या शोकांतिकांमधे एकीची भर पडली असं म्हणणं नक्कीच चुकीचं ठरणार नाही.

आज हाॅफमनची जागा रिकामी आहे. ती कोणी इतक्यात भरून काढेल असं वाटत नाही.

- ganesh matkari

1 comments:

vikas February 16, 2014 at 8:09 AM  

Nice article as always. Sir can you please post your opinion about recent marathi movie s like duniadari , timepass and especially fandry. I have watched and liked them but I would s till like your comments on them

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP