हर- निराळी प्रेमकथा

>> Sunday, February 2, 2014


'पास्ट इज ए स्टोरी वुई टेल अवरसेल्व्ज'
समॅन्था, हर

'हर' या स्पाइक जोन्ज दिग्दर्शित चित्रपटाला नायिकाविरहीत रोमँटिक काॅमेडी म्हणणं टेम्प्टिंग असलं तरी योग्य नाही, कारण चित्रपटात (अगदी योग्य कारणासाठी) प्रत्यक्षात न दिसणार््या नायिकेचं अस्तित्व आपल्याला  पदोपदी जाणवत राहातं. स्कार्लेट जोहॅन्सनने दिलेला , तिला व्यक्तिमत्व देणारा समॅन्थाचा आवाज हे यातलं प्रमुख कारण असलं, तरी तेवढंच कारण नाही. गोल्डन ग्लोब जिंकून आॅस्कर स्पर्धेत असणारी जोन्जचीच उत्तम पटकथा, दिग्दर्शनात नायकाचा प्रत्यक्षातला एकटेपणा न जाणवू देणं, आणि वाकीन फिनिक्सचा प्रेक्षकाला पहिल्या दोन मिनीटातच गुंतवणारा अभिनय अशा बर््याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. मात्र मी त्यापलीकडे जाऊन म्हणेन, की राॅम काॅम्सचा एक सुखान्त आणि ' बाॅय मीट्स गर्ल, बाॅय लूजेस गर्ल, बाॅय गेट्स गर्ल' या परिचित रचनेतून मिळणारा, आणि मनोरंजन हा हेतू ठामपणे डोक्यात ठेवणारा फाॅर्म असतो. 'हर' या परिचित संकेतांमधे राहाण्याचा प्रयत्न करत नाही. तो त्यापलीकडे जाउन प्रेम, अस्तित्व, जाणीवा, जगणं याबद्दल फिलाॅसाॅफीकल प्रश्न उपस्थित करतो. मेट्रिक्स सारख्या चित्रपटांनी सत्य म्हणजे काय हे शोधणारे देकार्तचे विचार, ब्रेन इन ए वॅट सारख्या संकल्पना पुढे आणत माणसाला मिळणारी जाणीव हेच सत्य, मग ती कृत्रिम पध्दतीने अस्तित्वात आलेली का असेना, असा विचार मांडला होता. हर त्याही पुढे जात ही जाणीव जिवंत व्यक्तीला असण्याची गरज क्वेश्चन करतो. काॅन्शसनेस, मग तो कोणत्याही प्रकारचा का असेना, हा त्याच्या लेखी जिवंतच आहे, मग तो ए आय, अर्थात आर्टीफिशअल इंटेलिजन्स का असेना!
चित्रपट थोडासा भविष्यात, म्हणजे अनेक विज्ञानपटात वापरल्या जाणार््या ' नजिकचा भविष्यकाळ' या सोयीस्कर काळात घडतो. हा काळ आजच्यापेक्षा फार वेगळा नाही, मात्र यंत्रविश्व खूपच अद्ययावत आणि सोफिस्टीकेटेड झालय, पर्यायाने, त्यावर विसंबणारा माणूस, जनसंपर्कापासून दूर, अधिकच एकटा पडला आहे. हे आजच्या जगाचं लाॅजिकल एक्स्टेन्शन असणारं आयसोलेशन हर मधे फार प्रभावीपणे येतं. नात्यांमधे वाढत चाललेली क्षणभंगूरता, स्वातंत्र्याच्या कल्पनांमधून तुटत चाललेले संबंध, प्रत्येक व्यक्तिचं आपल्यापुरतं विश्व, हे या जगाचं वैशिष्ट्य आहे. या जगाच्या रहिवाश्यांनाही सोबतीची गरज आहे, पण हा शोध त्यांना या व्यक्तिगत विश्वाबाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करण्यापेक्षा त्या विश्वातच अधिक खोलवर नेताना दिसतो.
'हर' मधला प्रोटॅगनिस्ट आहे थिओडोर (फिनिक्स). थिओडोर पत्रलेखक आहे. पत्रलेखनाची कला संगणकाच्या प्रभावाखाली नामशेष होत चालली आहे, मात्र काही खास पत्रव्यवहार हाताने लिहील्यासारखे फाॅन्ट वापरुन लिहीणं ,हा व्यवसाय बनला आहे. थिओडोर या कामात खूपच हुशार आहे. स्वत: बिकट घटस्फोटातून अन एक प्रकारच्या डिप्रेशनमधून जात असतानाही इतरांना प्रेमादराची पत्र लिहून देण्याचं काम तो सफाईने करतोच आहे. अशातच तो आपला संगणक अपडेट करतो आणि आपल्या नव्या ओ एस (आॅपरेटींग सिस्टीम) बरोबर त्याचा संवाद सुरू होतो. आजवरच्या ओ एस च्या तुलनेत अधिक अद्ययावत असणारी ही सिस्टीम जणू स्वत:चं व्यक्तिमत्व घेऊन येते. स्वत:ला समॅन्था ( जोहॅन्सन) असं नावही ठेवते. तिचा संचार थिआेडोरच्या  संगणकांपासून त्याच्या फोन्सपर्यंत असल्याने,  संपर्कातून जवळीक वाढते आणि शरीरविरहीत मैत्री सुरू होते, लवकरच प्रेमापर्यंत पोचते. आपल्याला शरीर नसल्याची अडचण भरुन काढण्यासाठी  समॅन्था सुरूवातीला काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करते पण त्यात यश न मिळताही प्रेम तसंच राहातं.दिवस जातात तशी समॅन्था स्वत: अधिकाधिक मानवसदृश बनण्याचा प्रयत्न करायला लागते. प्रत्यक्ष नाही पण वैचारीक पातळीवर. पण मानव बनण्यातही धोका हा असतोच. शेवटी मानव म्हंटला की स्वातंत्र्य आलं, आणि हे स्वातंत्र्य मिळताच समॅन्था थिओडोरशी स्वत:ला बांघून राहीलच याची काय खात्री?
माणूस असणं, स्वत:चं व्यक्तिमत्व असणं म्हणजे काय, हा प्रश्न 'हर' मधे खूप महत्वाचा ठरतो, आणि त्यावर सोपं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. केवळ त्याचे विविध पैलू आपल्यापुढे मांडले जातात. समॅन्थाचं व्यक्ती नसूनही स्वतंत्र व्यक्तिमत्व असणं आणि त्याला विरोधाभास असणारं थिओडोरचं प्रत्यक्ष माणूस असून सतत कोणानाकोणात गुंतून , कोणानाकोणावर अवलंबून राहाणं हे नात्यांबद्दल, त्यांच्या बनण्या टिकण्याबद्दल, त्यांच्या खोली अन सच्चेपणाबद्दल आपल्याला विचार करायला भाग पाडतं. इतकं, की त्याबद्दल खूप विचारही कदाचित त्रासदायक ( चांगल्या अर्थाने) ठरावा.
स्पाईक जोन्जची वेगळ्या आणि हाय कन्सेप्ट फिल्म्स करण्याबद्दल ख्याती आहे. खासकरुन चार्ली काॅफमनच्या पटकथा असणारे बीईंग जाॅन मालकोविच (१९९९) आणि अॅडॅप्टेशन ( २००२) यांची खास नावं घ्यावी लागतील. मात्र महत्वाचं हे, की तो संकल्पनेला दृश्य रुप आणण्याच्या भानगडीत स्पेशल इफेक्ट्सच्या नादी लागून वाहावत जात नाही. त्याची मांडणी गरजेपुरती, मिनिमलीस्ट असते. हर हा कदाचित त्याचा सर्वात पाॅलिश्ड वाटणारा चित्रपट असावा, मात्र याचा अर्थ तो दृश्य चमत्कारांना स्थान देतो असं नाही. इथेही, तो भविष्य दाखवण्यापुरते काही आधुनिक घटक अधोरेखित करतो, म्हणजे मल्टीमिडिआचं बदलतं रुप, यंत्रांचा साध्या आयुष्यात वाढत जाणारा शिरकाव, आर्किटेक्चर, इन्टीिरअर डिझाईनमधे दिसणारा देखणा परकेपणा अशा जागा इथे आहेत मात्र त्या आशयाला पूरक राहातात, त्यावर कुरघोडी करु पाहात नाहीत. समॅन्थाला दृश्यरुप देण्याचा नादही चित्रपट सोडतो आणि आवाजानेच तिला खरी करत आणतो.
फ्रेन्च समीक्षक मिशेल शिआें  यांच्या लिखाणात 'अकुजमेत्र' नावाची एक संकल्पना दिसून येते. ती आवाजाच्या अशा वापराला उद्देशून आहे ज्यात हा आवाज व्यक्तिची जागा घेताे. प्रत्यक्षात चित्रपटात व्यक्ति दिसली नाही तरी प्रेक्षकाच्या मनात तिचं अस्तित्व तयार होण्याचं काम हा आवाज करतो. अनेक परिचित चित्रपटांमधे आपण ही क्लुप्ती पाहिलेली आहे.सायकोमधली नाॅर्मन बेट्सच्या आईची व्यक्तिरेखा, २००१-ए स्पेस ओडिसीमधला हॅल, मून चित्रपटात केविन स्पेसीचा आवाज असणारा गर्टी, थोड्या माफक प्रमाणात आपल्या लन्चबाॅक्समधे इलाच्या अदृश्य शेजारीणबाईंच्या व्यक्तिरेखेबद्दलही हे म्हणता येईल. 'हर' मधली समॅन्था, हे या डिव्हाइसचं चांगलं आणि गिमिकपलीकडे जाणारं उदाहरण मानता येईल. कारण या भूमिकेला केवळ आवाज असणं ही चमत्कृती नाही, हे वास्तवच आहे. किंबहुना याप्रकारच्या नात्यांपासून आपण फार दूर आहोत असंही म्हणता येणार नाही.  अॅपलने वापरात आणलेल्या 'सिरी' ची समॅन्था वंशज आहे हे उघड आहे. आपला आजही या यंत्राबरोबर असणारा वाढता संबंध पाहाता हा नजिकचा भविष्यकाळ खरच नजिक आहे, हे नक्की.
जोहान्सनने आजवर खूप इन्टरेस्टिंग भूमिका केल्या आहेत. गेल्या वर्षी तिने केलेल्या 'डाॅन जाॅन' आणि 'हर' या दोन्ही चित्रपटात तिने परस्परविरोधी प्रवृत्तींना फार चांगल्या पध्दतीने मांडलं आहे. तरुण, सुंदर असून आयुष्याकडे अत्यंत सुपरफिशिअली पाहाणारी डाॅन जाॅनमधली बार्बरा शुगरमन ही एक प्रकारे प्रत्यक्ष अस्तित्व नसतानाही जगणं म्हणजे काय हे समजलेल्या समॅन्थाच्या अगदी उलट म्हणता येईल. या दोन्ही ठिकाणी ती आपल्यापर्यंत पोचते, हे अभिनेत्री म्हणून तिचं कौशल्य.
'हर' ची कल्पना कोणी एेकली, तर एकतर ती खूप बाळबोध तरी वाटेल, किंवा गिमिकी तरी.  मात्र हर या दोन्ही वर्णनात बसत नाही. गेल्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट प्रेमकथांमधे गणला जाऊ शकणारा पण प्रगल्भ असा हा चित्रपट हा बदलत्या काळाबरोबर बदलत जाणार््या जगण्याचा वेध घेतानाच आपल्या मूलभूत प्रेरणांचाही सहज विचार करतो. त्याचा मूळचा विक्षिप्तपणा त्याला नामांकन मिळवून देऊनही आॅस्करच्या सर्वोच्च पुरस्कारापर्यंत नेणार नाही हे नक्की, पण त्याने काहीच फरक पडत नाही. मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधे त्याचं स्थान मात्र निश्चित आहे.
- ganesh matkari

6 comments:

Digamber Kokitkar February 2, 2014 at 11:32 PM  

kalch pahila. Khup sundar chitrpat aahe.
Hi post vachun ajun changla samjala.

त्याचा मूळचा विक्षिप्तपणा त्याला नामांकन मिळवून देऊनही आॅस्करच्या सर्वोच्च पुरस्कारापर्यंत नेणार नाही हे नक्की.
Ase Ka??

ganesh February 3, 2014 at 12:08 AM  

Usually, Oscar winners are straightforward films, which appeal to most people. their definition of being awards for main stream Hollywood and most voters being affiliated with commercial films is part of it. also, people look at this as a curiosity than something with a direct impact. compare to an impact of a poem against a novel. When against films like Dallas buyers club or 12 years a slave which deal with much larger subjects with complexity, a small film like this is unlikely to win, however good.

Aniket Samudra February 4, 2014 at 4:34 AM  

माहीतीबद्दल धन्यवाद, स्टोरी वाचुन तरी चांगला वाटतो आहे.

नक्की बघेन..

अनिकेत
http://manaatale.blogspot.in

Manu February 5, 2014 at 2:49 AM  

Nicely written! Aptly talks about depth of the movie!

venkynandre February 19, 2014 at 11:54 AM  

So nice. You r my favorite critics.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP