राष्ट्रीय पुरस्कार : निकष आणि दिशा
>> Monday, April 21, 2014
प्रत्येक पारितोषिकाचे स्वत:चे असे काही निकष असतात. चित्रपटक्षेत्रातली पारितोषिकंही त्याला अपवाद नाहीत. काही पारितोषिकं ही व्यावसायिक चित्रपटांचं कौतुक करण्यासाठी असतात, काही नव्या विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी, तर काही आशयघन चित्रपटांना वर आणण्यासाठी. जेव्हा आपण अमुक एका पारितोषिकासंदर्भातला निकाल पाहतो, तेव्हा त्यांच्यामागचा दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक असतं. तो न घेता आपण केवळ आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीच्या संदर्भातूनच या चित्रपटांकडे पाहिलं, तर आपण गोंधळात पडू शकतो.
राष्ट्रीय पुरस्कारांचा हेतू हा मनोरंजनापलीकडे जाऊन काही तरी सांगू पाहणाऱ्या चित्रपटांना उचलून धरणं, हा आहे. देशभरातला चित्रपट उद्योग हा व्यावसायिकतेच्या नादात प्रेक्षकशरण ठरू नये, यासाठी विचारपूर्वक केलेला हा प्रयत्न असतो. अर्थात, हे करतानाही व्यावसायिक सिनेमामध्येही कोणी काही नवं करून पाहिलं, तर त्याचा विचार जरूर केला जातो. ही पारितोषिकं ठरवण्याची प्रादेशिक आणि मध्यवर्ती अशा दोन पातळ्यांवरली योजना असते आणि प्रादेशिक ज्युरींमधेही केवळ त्या त्या प्रदेशातले लोक नसून, देशभराचं प्रतिनिधित्व असतं. या ज्युरींमध्ये सिनेमाक्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर असतात, तसाच अनेक पूर्वपारितोषिक विजेत्यांचाही त्यात सहभाग असतो. हे सांगायचा मुद्दा एवढाच की या पुरस्कारांची योजना ही शक्य तितकी न्याय्य ठेवली जाते. निकालावर काही मोजक्या व्यक्ती वा संस्थांचा प्रभाव राहणार नाही, हे निश्चित पाहिलं जातं. त्यामुळेच या निकालांवर गेल्या काही वर्षांत दिसणारा मराठी सिनेमाचा जाणवण्यासारखा प्रभाव हा महत्त्वाचा आहे.
गेल्या वर्षी ज्या मराठी चित्रपटांची या पारितोषिकासाठी पात्रता होती ती यादी आणि अंतिम निकालातला सहभाग पाहिला तर लक्षात येईल, की हा निकाल मराठीसाठी चांगला आहे. वेगळ्या वाटेने जाऊ पाहणाऱ्या चित्रपटांतली पाच महत्त्वाची नावं इथे आहेत. हेही कौतुकास्पद आहे की यातले तीन दिग्दर्शक हे नव्याने दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरले आहेत. नागराज मंजुळे (फॅण्ड्री) आणि महेश लिमये (यलो) या दोघांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. नागराजच्या 'पिस्तुल्या' या लघुपटाला याआधी राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे, आणि महेश हा गेली अनेक वर्षे उत्तम छायालेखक म्हणून प्रसिद्ध आहे. या दोघांबरोबर सतीश मनवरचाही (तुहय़ा धर्म कोंचा) हा 'गाभ्रीचा पाऊस'नंतरचा दुसराच चित्रपट आहे. या तिघांचंही, असं करिअरच्या सुरुवातीच्या काळात झालेलं कौतुक हे त्यांना आणि आज मराठी चित्रपटांत काही नव्याने करू पाहण्याची इच्छा असणाऱ्या अनेक तरुणांना प्रोत्साहन देणारं आहे यात शंकाच नाही. संदीप सावंत, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर, रवी जाधव, परेश मोकाशी, सुजय डहाके या पहिल्या-दुसऱ्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या मराठी चित्रकर्मीच्या परंपरेलाही ते साजेसं आहे. उरलेले दोन चित्रपट करणारी नावं, म्हणजे सुमित्रा भावे- सुनील सुकथनकर (अस्तु) आणि चंद्रकांत कुलकर्णी (आजचा दिवस माझा) ही तशी जुनीजाणती आहेत आणि तिघांनीही गेली अनेक वर्षे चांगला मराठी चित्रपट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
मला माझ्यापुरतं जर गेल्या वर्षीतल्या एकाच महत्त्वाच्या चित्रपटाचं नाव घ्यायला सांगितलं तर मी 'फॅण्ड्री'चं घेतलं असतं. ते नाव या पुरस्कारांत असेल अशी अपेक्षा होतीच. नागराज मंजुळे दिग्दíशत या चित्रपटात लक्षवेधी अशा अनेक गोष्टी होत्या, ज्या जागतिक चित्रपटांशी नातं सांगणाऱ्या आहेत. फॉम्र्युला टाळून प्रामाणिकपणे जे डोक्यात आहे ते मांडणं, गुंतागुंतीचं खरंखुरं व्यक्तिचित्रण, प्रखर वास्तववाद, नॉनअॅक्टर्सचा (आणि अॅक्टर्सचाही) उत्तम वापर असं बरंच काही सांगता येईल. जातिभेद आणि सामाजिक विसंवादाला त्यात स्थान जरूर होतं, पण चित्रपट त्याच्या आहारी गेला नव्हता. दिग्दर्शकीय प्रथम प्रयत्नाचं आणि सोमनाथ अवघडेसाठी बालकलाकाराचं पारितोषिक मिळवणारा हा चित्रपट माझ्यापुरता सर्वात महत्त्वाचा असला तरी सन्मानप्राप्त इतर चित्रपटांमध्येही कौतुक करण्यासारखं बरंच काही होतं. अनंत अडचणींवर मात करणाऱ्या डाऊन्स सिन्ड्रोमग्रस्त मुलीची यशोगाथा सांगणारा आणि प्रत्यक्ष त्या मुलीच्या-म्हणजे गौरी गाडगीळच्या कामाने वेगळं परिमाण मिळालेला 'यलो', तत्त्वज्ञानाची झालर असणारा 'अस्तु', आपल्या मातीतला असून फार परिचित नसणाऱ्या धर्मातरासारख्या विषयावरला 'तुहय़ा धर्म कोंचा' आणि व्यावसायिक पठडीतला असतानाही लोकप्रिय संकेतांना थारा न देणारा 'आजचा दिवस माझा' या चित्रपटांचं महत्त्व हे की त्यांनी सोपे मार्ग नाकारले. मराठी चित्रपटांकडे आज देशभरात 'काही नवं करून पाहणारी चित्रपटसृष्टी' म्हणून पाहिलं जातं. ते विधान या चित्रपटांनी सार्थ ठरवलं.
ऑस्कर पुरस्कारांच्या वेळी आपण सारे चित्रपट मिळवून पाहू शकतो आणि त्यावर निश्चितपणे विचार मांडू शकतो. दुर्दैवाने आपल्याकडे आंतरप्रदेशीय वितरण असा प्रकारच नसल्याने राष्ट्रीय पुरस्कारांमधले बरेच चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तरीही काही चित्रपटांबद्दल बोलणं आवश्यक. खासकरून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळालेला आनंद गांधी दिग्दíशत 'शिप ऑफ थिसिअस' आणि दिग्दर्शनाचं (हन्सल मेहता) व अभिनयाचं (राजकुमार राव) पारितोषिक पटकावणारा 'शाहीद.' हे दोन्ही चित्रपट नि:संशय गेल्या वर्षीच्या सर्वोत्तम चित्रपटांत होते.
'थिसिअस हा एकमेकांशी आशयसूत्राने जोडलेल्या, पण बऱ्याचशा स्वतंत्र तीन कथा मांडतो. त्या कथाही घटनाक्रमाला प्राधान्य न देता तात्त्विक चच्रेवर आधारलेल्या. पुन्हा मूळ संकल्पनाही 'स्वत्व' म्हणजे काय, अशी सहज शब्दात न मांडता येणारी. थिसिअसचं २०१२ च्या 'मामी' महोत्सवात कौतुक झालं आणि गेल्या वर्षी तो प्रदíशत झाला तेव्हाही त्यावर चांगलं लिहून आलं. प्रेक्षक प्रतिसाद मात्र त्याला फार मिळाला नाही. यंदा ऑस्करला 'द गुड रोड' हा गुजरातचा मूर्ख सिनेमा पाठवून आपण जी घोडचूक केली तेव्हाही 'थिसिअस' किंवा 'लंच बॉक्स' ही दोन नावं अधिक योग्य असल्याची चर्चा झाली होती. कदाचित या पुरस्कारानंतर तो अधिक लोक पाहतील.
'शाहीद' त्यामानाने स्ट्रेट फॉरवर्ड, पण भावनिकदृष्टय़ा प्रेक्षकाला खूप गुंतवणारा. शाहीद आजमी या वकिलाच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट अनेक महोत्सवांत गाजला होता. आपल्याकडेही त्याला दर्दी प्रेक्षकांनी आधार दिला. या दोन चित्रपटांबाबत आणि मराठी चित्रपटांबाबत चांगला निकाल देणाऱ्या ज्युरीने िहदी चित्रपटासाठी निवड केलेला 'जॉली एलएलबी' चित्रपट म्हणून चांगला, पण निकषांच्या दृष्टीने सामान्य वाटतो. 'मद्रास कॅफे', 'लंच बॉक्स', 'आँखो देखी' किंवा 'बी ए पास' यांसारख्या अधिक अर्थपूर्ण चित्रपटांमधली ही निवड थोडी आश्चर्यकारक. अर्थात, निवड समितीमधल्या सभासदांची भिन्नता ही जशी वेगळा निकाल लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, तशीच ती एखाद्या प्रसंगी अनपेक्षितपणे पारंपरिकही होऊ शकते. कथाविषयातल्या वैयक्तिक आवडीनिवडी, बाजू लढवण्याची ताकद, तत्कालीन मतप्रवाह अशा गोष्टी वेळोवेळी या निकालांवर परिणाम करू शकतातच. तरीही या वेळचा एकूण निकाल हा या पारितोषिकांकडून असणाऱ्या अपेक्षेला साजेसा मानता येईल.
यंदा पाचांतल्या तीन मराठी चित्रपटांना, म्हणजे 'फॅण्ड्री, 'आजचा दिवस माझा' आणि 'यलो' यांना चांगला प्रेक्षक प्रतिसाद लाभला. हे लक्षण जरी प्रेक्षकांच्या सरसकट आवडीनिवडीचा आढावा घेणारं नसलं, तरी योग्य वाटेवरचं पाऊल म्हणता येईल. कारण पुरस्कार महत्त्वाचे असले, तरी चित्रपट तगवतात ते प्रेक्षक, पुरस्कार नाही. चित्रपट बनतात ते लोकांनी पाहावेत म्हणून, पुरस्कारांसाठी नाही. या तीन चित्रपटांबाबत आज प्रेक्षकांनी दाखवलेली समज यापुढे अधिकाधिक विस्तारली जावी, अशी अपेक्षा आहे. तर मराठी चित्रपट आपला वेगळेपणा, नवं काही करण्याची वृत्ती शाबूत ठेवू शकतील. आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षांना साजेशी कामगिरी करून दाखवू शकतील.
- गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment