यलो- स्पेशल चित्रपट
>> Saturday, April 5, 2014
चित्रपट हा मूलत: दोन प्रकारात मोडतो. चांगला आणि वाईट.
तांत्रिकदृष्ट्या पाहायचं तर मात्र त्याचे असंख्य उपप्रकार पडू शकतात. चित्रप्रकारांमधलं, अर्थात जान््रं मधलं त्याचं स्थान, तो व्यावसायिक आहे का समांतर, विषयवार वर्गीकरणात तो कुठे बसतो, त्यातले निवेदनशैलीतले प्रयोग आणि यासारख्या बर््याच इतर गोष्टींवर हे उपप्रकार आधारित असतात. मात्रं अनेकदा अशा फूटपट्ट्या लावल्याने या चित्रपटांची जात कळायला मदत होत असली , तरी त्यांच्याकडे पाहाण्याच्या दृष्टीकोनाला मर्यादा पडण्याची शक्यता असते. कारण मग त्यांची गुणवत्ता ही एकूण चित्रपटांमधे पाहिली न जाता त्यांच्याच जातीच्या इतर चित्रपटाच्या तुलनेत पाहिली जाते.
महेश लिमये या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत उत्तम काम केलेल्या सिनेमॅटाेग्राफरचा दिग्दर्शकाच्या भूमिकेतला पहिलाच चित्रपट 'यलो' - याची जात, जर अशी तपशीलात जाऊन पाहायची, तर दोन चित्रप्रकार समोर येतील. पहिला म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर आपल्यातल्या नैसर्गिक दोषासह मात करणार््या प्रमुख व्यक्तिरेखेचे चित्रपट ( उदाहरणं मुबलक, 'रेन मॅन' ते 'माय लेफ्ट फूट' आणि 'चिल्ड्रन आॅफ ए लेसर गाॅड' ते 'तारें जमीं पर' ) आणि दुसरा अर्थातच खेळाला प्राधान्य देणारा सिनेमा( पुन्हा उदाहरणं मुबलक, 'बेन्ड इट लाइक बेकहम' पासून 'द प्राईड' आणि 'चक दे, इंडिआ!' पर्यंत) . सामान्यत: हे प्रकार म्युच्यूअली एक्स्लुजिव असतात, ते एकत्र येणं संभवत नाही. ते इथे शक्य होतं , हा यलोचा एक वेगळेपणा तर त्यातल्या प्रमुख भूमिकेत, जिच्या खर््या आयुष्यापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवला आहे त्या डाउन्स सिन्ड्रोम असलेल्या गौरी गाडगीळचा आणि लहानपणच्या गौरीच्या भूमिकेत संजना रायचा प्रत्यक्ष सहभाग , हा दुसरा. आता चित्रपटाकडे त्रयस्थपणे पाहाण्याचा हा अप्रोच कितीही तर्कशुध्द असला तरी मुळात या प्रकारच्या हिशेबी नजरेने 'यलो' कडे पाहावं का, हा माझ्यापुढला खरा प्रश्न आहे. कारण काही कलाकृती अशा असतात, की त्यांचं असणं हे कोणत्याही गणितापलीकडे, फाॅर्म्युलापलीकडे असतं. त्यांचं त्या जातीतल्या इतरांशी असणारं साम्य, वा वेगळेपणा हा वरवरचा असतो. खरं तर त्या कलाकृती या केवळ त्यांच्या स्वत:सारख्याच असतात. 'यलो' हा असाच सार््या हिशेबांपलीकडे जाणारा चित्रपट आहे. तुलना अनावश्यक ठरवणारा.
सेट अपचा भाग हा कोणत्याही चित्रपटात महत्वाचा असतो. अनेक वेळा हा भाग खूपसा एक्सायटिंग नसला तरीही आवश्यक असतो. तो आपल्याला जितका या व्यक्तिरेखांबरोबर गुंतवेल तितका नंतरचा चित्रपट आपल्यासाठी अधिक प्रभावी ठरतो. यलोमधेही हा सुरुवातीचा भाग असाच महत्वाचा आहे कारण तो यातल्या व्यक्तिरेखा कोण आहेत, त्यांच्या या चित्रपटाशी निगडीत मुद्द्यांबद्द्ल काय भूमिका आहेत, हे स्पष्ट करतो. चित्रपटाच्या नायिकेला , गौरीला, पोहण्याची आवड तयार झाल्यानंतरचा भाग हा बरंचसं फोकस्ड निवेदन करणारा आहे, जो कमी कालावधीत घडतो आणि संघर्षावर भर देतो. याउलट सुरुवातीचा भाग हा अधिकतर गौरीच्या आजारामुळे तयार होणार््या कौटुंबिक आणि इतर अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्याचे तिच्या आईचे ( मृणाल कुलकर्णी) आणि मामाचे ( ऋषिकेश जोशी) मूलभूत स्वरुपाचे प्रयत्न यांवर भर देतो.
या भागात किंचित अडखळायला लावणार््या काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ गौरीच्या वडिलांची टोकाची भूमिका, किंवा शाळेच्या भागात डोकावणारा संदेश, मात्र यातला कोणताच भाग त्रासदायक होण्याइतका लांबत नाही. साध्या चित्रपटांमधे वरवर आेढूनताणून आणलेला संदेशाचा भाग हा नेहमीच खटकतो कारण तो बहुधा चिकटवलेला असतो. मात्र हा विषयच असा आहे, की या मुलांचं पूर्ण चित्रण हे त्यांच्याकडे पाहाण्याची समाजाची दृष्टी आणि त्यात काय प्रकारचा बदल आवश्यक आहे हे आेझरतं का होईना , पण सुचवल्याशिवाय पूर्णच होणार नाही. अॅक्सेप्टन्स हा यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. पालक असोत , शेजारी पाजारी वा शिक्षक, जोपर्यंत ते वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न करतात, तोवर या प्रश्नाला उत्तर नाही, असंच आपल्याला दिसतं. मात्र तुम्ही ती स्वीकारणं, हे तुम्हाला उत्तराच्या बरंच जवळ घेऊन जातं.
चित्रपटातल्या बहुतेक प्रमुख पात्रांचा दृष्टीकोन, हा या स्वीकाराचंच कोणतं ना कोणतं रुप आहे. आईने गौरीची काळजी वाटत असतानाही घर सोडण्याचा घेतलेला निर्णय, मामाने गौरीच्या खोडकर स्वभावाला, व्यक्तिमत्व विकासाला दिलेलं प्रोत्साहन, गौरीचा स्विमिंग कोच प्रताप सरदेशमुख ( उपेंद्र लिमये) याने तिला कोणतीही खास वागणूक न देता काटेकोरपणे शिस्त लावण्याचा केलेला प्रयत्न, या सार््यातून समाजाकडून अपेक्षित असणारा अॅक्सेप्टन्स दिसतो. हा विश्वास या मुलांना मोकळं करेल, त्यांची उमेद जागवेल असं सुचवतो.
या प्रकारच्या बहुतेक चित्रपटांत , प्रमुख भूमिकेत अनेक चांगले अभिनेते दिसले, तरीही या कन्डीशनमधल्या मुलीने प्रत्यक्ष भूमिका करणं हे यलोला वेगळ्या उंचीवर नेतं. ( सर्वात तरुण वयात , म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी 'चिल्ड्रन आॅफ ए लेसर गाॅड' या आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं आॅस्कर पटकावणार््या मार्ली मॅटलिन या कर्णबधीर अभिनेत्रीच्या कामाची आठवण इथे होणं साहजिक आहे) . गौरीच्या असण्याने चित्रपट केवळ मनोरंजक चित्रपट राहात नाही, तर एक वेगळा इन्स्पिरेशनल अनुभव बनतो. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत पोहण्याच्या क्षेत्रात पराक्रम दाखवून वर कलाक्षेत्रात निपुण अभिनेत्यांच्या संचाबरोबर इतकं सहजपणे काम करुन दाखवणं भल्याभल्यांना शक्य होणार नाही. आपण मनात आणलं तर काहीही करु शकतो याचा याहून मोठा पुरावा तो कोणता?
गौरीबरोबर आणि या चित्रपटातल्या अनेक ' स्पेशल ' मुलांबरोबर काम करणं सोपं नसणार हे उघड आहे. आणि ते आव्हान या टीमने एकत्रितपणे पेललं आहे. महेश लिमयेने दिग्दर्शन आणि छायाचित्रण या एरवीच अवघड पण या केसमधे तर खासच कठीण जबाबदार््या स्वीकारल्या आहेत, पण नटसंचासमोरची कामगिरी म्हणा किंवा इतर क्रूची वाढलेली जबाबदारी पाहाता कोणासाठीच हे काम सोपं नसणार हे उघड आहे. केवळ सिनेमा करायचाय हा व्यावसायिक हेतू , या प्रकारचं काम घडवून आणू शकत नाही. ते प्रेमानेही करावं लागतं. आपलं वाटून करावं लागतं. हा आपलेपणा यलो पाहाताना आपल्यापर्यंत पोचतो. आपणही त्यात गुंतून जातो.
एवढं असूनही, मला कोणी विचारलं की हा चित्रपट कोणत्या वर्गात बसतो? तो इन्स्पिरेशनल सिनेमा आहे का? तो प्रेरणा देणारा सिनेमा आहे का? आपण तो एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाहायला हवा का? तर या सार््या प्रश्नांची उत्तरं देणं मी टाळेन. याचा अर्थ ती नकारार्थी असतील असं नाही, पण ती या चित्रपटाला एका चौकटीत बसवतील. मग त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचा चित्रपट म्हणून लेबल लावून पाहिलं जाईल. त्याच्याकडे बिग पिक्चरचा एक भाग म्हणून पाहिलं जाणार नाही. आणि हा त्याच्यावर अन्याय ठरेल.
तरीही काही बोलायचं तर मी इतकंच म्हणेन, की चित्रपट हा मूलत: दोन प्रकारात मोडतो. चांगला आणि वाईट. 'यलो' हा नि:संशय एक चांगला चित्रपट आहे.
- ganesh matkari
4 comments:
गणेश, फारच स्पेशल लेख..
खुपच छान सुरवात! लेखाचा पुढचा भाग वाचाण्याची उत्सुकता वाढवणारा…. वाट पहात अाहे..
चित्रपट पाहीनच, पण लेख खूप सुंदर झालाय.
Suder lekh.
Post a Comment