पीके- सफाईदार म्हणायचा इतकच !

>> Monday, December 22, 2014



स्पॉयलर वॉर्निंग- मला वाटतं आता पीकेच्या विषयात काही रहस्य उरलेलं नाही. तरीही त्याचा विषय , किंवा विषयापेक्षाही पार्श्वभूमी आपल्या चित्रपटांसाठी नवी असल्याने जर तुम्ही पाहिला नसाल तर नं वाचलेलं उत्तम. कारण इथे प्रचंड प्रमाणात स्पॉयलर आहेत.

राजकुमार हिरानी हा सध्याच्या अत्यंत सफाईदार ( चांगल्या अर्थानेच, पण ...) आणि व्यवसायिक वर्तुळातल्या चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट पहाताना कंटाळा येत नाही. तुम्ही कथेला बांधलेले रहाता. विपुल परकीय संदर्भ असले तरी ते हुशारीने लपवले जातात आणि सामान्यत: प्रेक्षक खूष होईल हे पाहिलं जातं. बहुतेकदा काही सामाजिक आशयही मांडला जातो. त्याच्या पहिल्या दोन चित्रपटांत सफाईबरोबर एक स्पॉन्टेनिईटी होती. काहीतरी नवंच आपण पाहातोय असा भास होता. थ्री इडिअट्समधे तो कुठेसा हरवला. चित्रपटामागची मेहनत, पटकथेतली जुळवाजुळव जाणवायला लागली. तरीही, इडिअट्समधे हे चालून गेलं. सारं ओळखीचं असलं  तरी पाहाताना त्यात उस्फूर्तपणा वाटत होता. शिवाय आधीच्या चित्रपटांइतका नसला, तरी  पटकथेचा दर्जा हा खूपच चांगला होता. सर्व व्यक्तिरेखांना पुरेसे लक्षवेधी ट्रॅक्स, फ्लॅशबॅक्सचा चांगला वापर आणि उत्तम गाणी हे तर होतच. परफॉर्मन्स हा बोनस. तोही सर्वांचा तुल्यबल. अगदी शर्मन जोशीपासून करीना कपूर पर्यंत. या तीन उत्तम चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर पीके निराशा करतो, हे वेगळं सांगायला नको.
मला पीकेची थोडी आधीपासून काळजी होती. मागे एका मुलाखतीत आमिर खानला पीके व्यक्तिरेखेच्या विस्फारलेल्या डोळ्यांचं कौतुक करताना, आणि हे काहीतरी फारच वेगळं केलय या सुरात बोलताना मी एेकलं, तेव्हापासूनच. पात्राने डोळे नं मिटणं, हा व्यक्तिरेखेचा युएसपी ? सिरीअसली? हिरानीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून मी तेव्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण आता त्याची आठवण झाली ती झालीच.
पीके चित्रपटाचा विषय काय मानायचा? ती पृथ्वीवर अडकलेल्या परग्रहवासियाची गोष्ट आहे, की धर्माला आव्हान देणाऱ्या एका रॅशनल विचारवंताची? कारण यात एक अगदी मूलभूत विसंगती आहे. ती म्हणजे हे दोन स्वतंत्र चित्रपट आहेत. पीके हा परग्रहवासीयाच्या आगमनापर्यंत गोष्टी प्रत्यक्ष दाखवतो , मात्र पुढे साय फाय अँगल खुंटीला टांगून धर्मविषयक तत्वचिंतन वापरतो. पीके ( खान) हा परग्रहावरुन आला असं मानलं तर त्याचे तपशील इतके तकलादू का?  पीके मुळात इतका आपल्यासारखा कसा ?टेलिपथीने बोलणाऱ्या लोकांची स्वरयंत्र इतकी विकसित कशी ?  त्याने पृथ्वीवर येताना बरोबर काहीच आणलं कसं नाही? यानसंपर्कासाठी असलेलं यंत्र इतकं वेडगळ पध्दतीने का लावण्यात आलं होतं? मुळात तो पृथ्वीवर येतोच कशासाठी? त्याचं येणं काही अपघाती नाही  , म्हणजे त्यामागे कारण हवं, काही योजना हवी. पृथ्वीवासियांशी संपर्कानंतर काय करावं,वा तो संपर्क नं येण्यासाठी काय योजना करावी हा विचार हवा. यातलं काही पीकेमधे विचारातच घेतलेलं दिसत नाही. हिचहायकर्स गाईडमधल्या फोर्ड प्रीफेक्टची तयारीही याहून कितीतरी अधिक होती.
सायन्स फिक्शन मधे नेहमीच एक प्रश्न विचारला जातो की आपण परग्रहवासियांचे वंशज तर नाही? तंतोतंत आपल्यासारखा दिसणारा परग्रहवासी असणारा हा चित्रपट तो विचारत नाही. बालपटांमधे हा निष्काळजीपणा एकवेळ मी चालवून घेईन, पण जो चित्रपट अर्ध्याहून अधिक वेळ तर्काच्या आधारे युक्तीवाद केल्याचा दावा करतो त्यात निश्चित नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ग्रहाची वैज्ञानिक प्रगती इतकी उत्तम , तिथून आलेला परग्रहवासी हा आपला हरवलेल्या रीमोटवर तोडगा म्हणून काय शोधेल? देव का वैज्ञानिक? खासकरुन त्याला जर भाषा अवगत असेल, तर तिचा वापर तो शास्त्रज्ञांना पटवण्यासाठी करेल, का सेल्फप्रोक्लेम्ड गुरुवर्यांशी वायफळ वाद घालण्यासाठी? खरंतर एखाद्या शास्त्रज्ञाकडून  माहिती ट्रान्स्फर करुन स्वत:च रिमोट बनवणं सोपं नाही का?
बरं, पीकेचं हे जगावेगळं असणं दाखवल्यानंतर उरलेला चित्रपटभर पीके काय करतो, तर त्या वेगळेपणाचा जराही वापर न करता धर्मसंस्थांना आव्हान देतो. या भागातला पीके, फॉर ऑल प्रॅक्टीकल पर्पजेस, सामान्य माणूस आहे, ज्याचा जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन काहीसा अजब आहे. या भागापुरतं पीकेचं व्यक्तीमत्व आणि त्याचा जग्गूशी ( शर्मा) संवाद,  के-पॅक्स या उत्तम चित्रपटावरुन प्रेरित असावा असं मानायला जागा आहे. गंमत म्हणजे चित्रपटाचं एकूण रुप पहाता, इथेही के-पॅक्सप्रमाणे नायकाचं परग्रहवासी असणं - नसणं संदिग्ध ठेवलं असतं, तर त्याच्या या रिकामपणच्या उद्योगाला अर्थ तरी आला असता, पण तसंही होत नाही.
आता हे सगळं लाक्षणिक ठरवत पीकेचं एलिअन स्टेटस केवळ कथेला निमित्त आहे, असं मानलं, तर या निमित्ताच्या आंधारे चित्रपट प्रत्यक्ष कोणता वेगळा विचार मांडतो? तर कोणताही नाही. यातला धर्मविषयक चर्चेचा भाग ओ माय गॉड मधे येऊन गेल्याचं मी एेकलय ( मी ओ माय गॉड पाहिलेला नाही) पण ते सोडा , लगे रहो मुन्नाभाई मधे सौरभ शुक्लानेच वठवलेली ज्योतिषाची भूमिका आणि तिला मुन्ना ने दिलेलं आव्हान याचीच ही स्केलने मोठी केलेली आवृत्ती नाही का? पीकेचं स्वत:चं व्यक्तीमत्व तरी नवं कुठे आहे? सर्व गोष्टींचा तर्कशुध्द विचार करु पाहाणारा आणि सतत प्रश्न विचारत रहाणारा हा थ्री इडिअट्समधला रांचोच का म्हणू नये ? आता तो ओळखू येऊ नये म्हणून त्याला भोजपुरी बोली दिली ( जी तो जग्गूचा हात पकडून कधीही बदलू शकतो पण बदलत नाही) आणि डोळे न मिचकावणं वगैरे काही मॅनॅरिझम दिले,की ही व्यक्तिरेखा लगेच वेगळी होते का? शिवाय लगे रहो मुन्नाभाईच्या पटकथेचे पडसाद या चित्रपटात सतत जाणवतात ते वेगळच. नायकाच्या आयुष्यात त्याला स्वाभाविक वाटणारी पण जगाला चमत्कारिक वाटेलशी एक गोष्ट असणं ( पीकेचं परग्रहवासी असणं आणि मुन्नाला गांधी दिसणं) , त्या निमित्ताने त्याने समाजातल्या विसंगतींना तोंड फोडणं, सत्याचा आग्रह धरणं, त्याच्या चळवळीच्या निमित्ताने सारा समाज त्यात सामील होणं, नायक आणि त्याचा विरोधी यांचा सार्वजनिक मंचावर सामना होणं, ही संपूर्ण रचना दोन्ही चित्रपटात आहे. तरीही यात मुन्नाभाई वरचढ ठरतो कारण ती पटकथा मुन्नाचं रहस्य सर्वांसमक्ष फोडून त्याला अंतिमत: केवळ वैचारिक पातळीवर जिंकण्याची संधी देते. पीके या पातळीला पोचूच शकत नाही. तो आपला विवादात पीकेलाच विजयी ठरवून सोपा मार्ग स्वीकारतो.
या चित्रपटाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तो अतिशय प्रेडीक्टेबल आहे. कदाचित मुळातच परग्रहवासीयाला हिंदी चित्रपटात आणणं ही एक गोष्ट सोडली तर त्यात अनपेक्षित काही नाही. तो आपली करमणूक करत नाही असं नाही. आमीर खान एका मर्यादेत चांगला अभिनेता आहे, त्यामुळे आपल्या परीने तो स्वत: आणि चित्रपटही करमणूक करतो, पण ती प्रामुख्याने गॅग्जच्या पातळीवर. चुटके आपल्या जागी ठीक असतात, हसवतातही, पण ते पूर्ण चित्रपटाच्या एकसंध परीणामाची जागा घेऊ शकत नाहीत. खासकरुन मूळ आशयाची तसा परिणाम साधणं ही गरज असताना.
मला हा चित्रपट टाईमपास या पातळीवर ठिक वाटला. त्यापलीकडे जाण्याच्या शक्यता त्यात होत्या, ज्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मी असा विचार करुन पाहिला, की चित्रपट राजकुमार हिरानीचा असणं या अपेक्षाभंगाला कितपत जबाबदार आहे? समजा पूर्णत: बाष्कळ चित्रपट करणाऱ्या डेव्हिड धवनसारख्या एखाद्या दिग्दर्शकाने तो केला असता तर आपण आहे ते बरं मानून त्यातल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करु शकलो असतो का? तसं वाटत नाही. कदाचित अपेक्षाभंगाचं प्रमाण कमी झालं असतं, पण त्रुटी या ढळढळीत दिसत असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं नसतच.
 आज पीके हा यशस्वी चित्रपट मानला जातोय. प्राप्ती आणि कौतुक या दोन्ही पातळीवर. अपयशाचे तोटे  फारच असतात, पण अशा काही चित्रपटांचं यश हेही तोट्याचाच एक भाग असतं. लगेच न जाणवणारा हा तोटा  चित्रकर्त्यांच्या एकूण मार्गाबद्दलच शंका उपस्थित करतो. हिरानीचा पुढला चित्रपट हा या मार्गावर शिक्कामोर्तब करणारा असेल. त्यापूर्वी काही सुधारणा व्हावी, ही अपेक्षा.
- ganesh matkari 

7 comments:

Unknown December 22, 2014 at 10:54 PM  

liked ur disclaimer!! gud review!

Unknown December 22, 2014 at 11:44 PM  

मतकरी साहेब ,

"राजकुमार हिरानी हा सध्याच्या अत्यंत सफाईदार आणि व्यवसायिक वर्तुळातल्या चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहे."

"… चित्रपट राजकुमार हिरानीचा असणं या अपेक्षाभंगाला कितपत जबाबदार आहे? "

म्हणजेच राजकुमार हिरानी कडून तुम्हाला अपेक्षा आहेत म्हणून ही नोट :


पहिला मुन्नाभाई हा त्याचा सर्वात सरस चित्रपट कारण त्याची जबाबदारी फक्त दिग्दर्शनाची होती
लेखक म्हणून वि वि चोप्रा आणि लजन जोसेफ होते आणि संवाद अब्बास टायरवाला चे होते
संकलक राजीव विश्वास आणि निर्माता वि वि चोप्रा आणि वीर चोप्रा होते

दुसरया मुन्ना भाई मध्ये त्यांनी पटकथा (अभिजात जोशी आणि विनोद चोप्रा सहित), संकलन आणि दिग्दर्शन स्वतः कडे घेतले .

तिसऱ्या थ्री इडियट मध्ये देखील पुन्हा पटकथा (अभिजात जोशी सहित ), संकलन आणि दिग्दर्शन ह्या जबाबदाऱ्या होत्या.

आता पी के मध्ये तर लेखक, संकलक, निर्माता आणि दिग्दर्शक अश्या सगळ्या (महेश कोठारे टाईप ) जबाबदाऱ्या घेतल्याने सिनेमा कंसातल्या प्रमाणेच झाला आहे.

त्यामुळे निर्माता म्हणून 'इन्वेस्टमेंट' असल्यावर आर्थिक बाजूंना प्रोटेक्ट करताना आशयाशी तडजोड होऊ शकणे स्वाभाविक आहे नाही का ?

फक्त दिग्दर्शनाकडे लक्ष केंद्रित असले की सिनेमा चांगला होऊ शकतो असा काहीतरी असेल काय ??

Kulasya December 23, 2014 at 3:29 AM  

पूर्णपणे सहमत. For me it is most calculated film of Hirani. You will feel many things happened because Writer / Director wanted to. OMG movie was on same topic, which was also flawed. But more honest, direct & bold. If you see OMG someday, please share .

Jayant Jopale December 23, 2014 at 7:58 AM  

मस्त परीक्षण ..

Sanjay Joshi December 23, 2014 at 7:12 PM  

पण पटकथा, दिग्दर्शन यात सफाई नसेल तर सफाईदार तरी का म्हणायचे ?
परवाच्या भाषणात मी आवर्जून म्हणालो, वाईट चित्रपटांकडे निष्ठूरपणे पाठ फिरवणे हे प्रेक्षकांचे कर्तव्य आहे. Lets unite to say "NO" to bad films... else these lazy and dumb producers and directors will blame us for demanding lousy films. The way, Prakash Mehra, manmohan Desai and company did through Amitabh bachchan movies... for years !

Ashish December 28, 2014 at 8:32 AM  

खूप भारी नाहीये.. पण मजा आली पाहताना.
सामाजिक विषय वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या तरी एका पराग्रहवासी जीवाचा भारतात येवून जो काही गोंधळ उडू शकतो तो मस्त दाखवलाय.
मला याचे ट्रेलर पाहून शंका आली होती की आमीर कोणीतरी गतिमंद माणसाची भूमिका करतोय की काय. पण त्याला तसे न दाखवता रा.हि. ने खरेच खूप उपकार केलेत. तसेच पी.के.चे परग्रही आईबाप, भाऊ बहिण वगैरे दाखवून किंवा त्यांची आठवण येवून पी.के. रडतो वगैरे असले नेहमीचे बॉलीवूड छाप प्रकार टाळूनही खूप उपकार केले.
फोरेस्ट गंप पाहताना जशी मजा आली होती अगदी तशीच मजा आली हा पिक्चर पाहताना.

आधी मी म्हटले होते तसे मला कधीकधी तुम्ही टीकेसाठी टीका असा प्रकार करता असे वाटते.
मागे मी जेव्हा "डीटेल्स" आणि "पार्श्वभूमी" च्या बाबतीत बोललो होतो (I think it was a comment on Pacific Rim) तेव्हा तुम्ही जे मुद्दे मांडले होते ते या लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या अगदी विसंगत आहेत.

वानगीदाखल तुमच्या या कमेंट्स पहा..
http://apalacinemascope.blogspot.in/2013/07/blog-post_15.html

"2. The film is sort of Homage to older films while looking at new philosophical aspects. So imagery is very Godzilaesque. There is nothing wrong with it. There are specific issues a particular filmmaker focuses on. Focusing on technical details would have resulted in a very mechanical version like transformer films. This focused more on the mind than matter. I did not find anything wrong with the approach.
3. The issues here are not purely sci fi. Next you may want to know the exact technology to combine the minds of the pilots. You have to assume certain things. "

पी.के. ला वेगळा न्याय का? चित्रपट खूप भारी आहे असे म्हणत नाही.. पण ही विसंगती लक्षात आली म्हणून.. पासिफिक रिम तद्दन सायफाय असूनही त्यांनी मी उल्लेख केल्याप्रमाणे बरेच संदर्भ गाळले होते..पिके आपला साधासुधा हिंदी पिक्चर.. त्याच्याकडून किती त्या अपेक्षा?

पी.के. मध्ये जर सायंटिफिक विश्लेषण करत बसले असते तर ३ तासात संपला असता का? वर परत हॉलीवूड सारखे दाखवणे त्यांना बापजन्मात शक्य झाले नसते, मग नसता खटाटोप कशासाठी? त्यामुळे रा.हि. ने त्या भानगडीत न पडणे पसंत केल्याबद्दल डबल अभिनंदन.

बाकी मी तुमच्या लिखाणाचा पंखा आहे आणि तुम्हाला बारीक फोल्लो करतो..हे सांगणे नकोच. :)

Panchtarankit February 5, 2015 at 10:37 AM  

परदेशी सिनेमातील प्रसंग व जाहिराती ह्यांचा अत्यंत कल्पकतेने योग्य त्या ठिकाणी हिरानी आपल्या सिनेमात वापर करतो.
थ्री ईडीय़ट मधील परीक्षेचे पेपर मिसळण्याचा प्रसंग जाहिरातीवरून उचलला आहे अशीच उचलेगिरी रा १ मध्ये शाहरुख ने केली तर सजग प्रसार माध्यमांनी त्यास बोल लावले , अमीर चे पहिले पोस्टर पहिले तेव्हाच तो एलियन असल्याचे कळले. कारण त्यात सुद्धा टर्मिनेटर च्या अर्नोड च्या प्रवेशाची नक्कल होती.
सिनेमा हा मासेस ला लक्ष्य ठेवून बनवला होता. सध्याच्या साधू संत महंत ह्यांच्या नादी लागणारे शहरातील व गावातील सुशिक्षित व अशिक्षित जनतेला विनोदातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न होता.
आणि नुसते कोठारे नाही तर सचिन पद्धतीचे सबकुच हिरानी असे ह्या सिनेमाचे वर्णन करता येईल , माझ्यामते असे आजच्या दशकातील वितरकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे हिरानी जे यश ,आदी , करण, सुरज होऊ शकले नाहीत, हमखास यशाची खात्री हिरानी देऊ शकतो.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP