बॉयहूड- बारा वर्षांचा प्रवास

>> Friday, February 13, 2015


अॅन्डी वॉरहॉल या वादग्रस्त कलाकाराचा एक चित्रपट आहे. 'एम्पायर' नावाचा. लांबी आठ तासाच्या आसपास. त्यात कलाकार कोण म्हणायचं, तर फक्त एम्पायर स्टेट बिल्डींग.  एका विशिष्ट जागी कॅमेरा लावून सूर्यास्तापासून ते रात्रीच्या एका प्रहरापर्यंत या इमारतीचं केलेलं हे चित्रण. सूर्यास्ताची वेळ , मग काळोख, दिवे लागणं , या प्रकारे हे चित्रण पुढे सरकतं. घडत म्हंटलं तर काहीच नाही, पण हे 'काहीच नाही', चिकार काळ घडतं. २०१४ मधे या चित्रपटाचा एक पूर्ण लांबीचा खेळ करण्यात आला. आणि तो पहाताना कंटाळा येणार हे गृहीत धरून गेलेले प्रेक्षकही या वरवर साध्या चित्रपटाच्या ताकदीने गडबडले. हा चित्रपट करतो काय, तर काळाची नोंद ठेवतो . आणि चित्रपटाची काही घडण्याची, घडवण्याची गरज संपली की प्रेक्षक लहान सहान गोष्टींमधे अडकत जातो. इमारतीवरल्या दिव्यांचे पॅटर्न, काचेवरची प्रतिबिंब, अंधारात दिसणारा इमारतीचा भारदस्त आकार, इतरही. अर्थात, एम्पायर हा एक प्रयोग आहे. चित्रपट हा परिचित आकार, माध्यम वापरत असला तरी तो मानला जातो तो कलाकृती म्हणून. त्याला रिअल वर्ल्ड अॅप्लिकेशन नाही. मात्र त्या पातळीवर जाऊ शकणारी  कलादृष्टी आणि  विचार असणारा आणि तो प्रेक्षकांना कळेलशा पध्दतीने त्यांच्यापर्यंत पोचवू शकणारा, मला वाटतं रिचर्ड लिंकलेटर हा एकमेव दिग्दर्शक आज समांतर आणि व्यावसायिक अमेरिकन चित्रपटात कार्यरत असेल. त्यामुळेच, यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत 'बर्डमॅन' खालोखाल महत्वाचा चित्रपट म्हणून त्याच्या ' बॉयहूड' कडे पहावं लागेल.

काळाला आपल्या चित्रपटात पकडण्याचा लिंकलेटरचा प्रयत्न जुनाच आहे. त्याच्या बीफोर चित्रत्रयीत ( बीफोर सनराईज, बीफोर सनसेट, बीफोर मिडनाईट) मधे त्याने जेसी आणि सेलीन या दोन पात्रांना आपल्याला नऊ नऊ वर्षांच्या कालावधीने भेटवलं, मात्र हे अंतर केवळ चित्रपटातल्या काळात नव्हतं, तर चित्रीकरणाच्या काळातही (१९९५/२००४/२०१३) होतं. त्यामुळे व्यक्तीरेखांमधला बदल हा संपूर्ण होता. त्यांच्या वयात, अनुभवात, व्यक्तीमत्वात दिसणारा होता. बीफोर मालिका आणि बॉयहूडची तुलना केली, तर दिसतं, की  बॉयहूडमधे या दिग्दर्शकाने एक पाऊल पुढेच टाकलं आहे.

बॉयहूडचा चित्रप्रकार पहायचा तर त्याला 'कमिंग ऑफ एज' चित्रपट म्हणता येईल. म्हणजे बालपण सरुन वयात येण्याचा मोठा टप्पा दाखवणारा चित्रपट. मात्र इथलं वयात येणं केवळ कथेपुरतं नाही, तर इथे आपण चित्रपटाच्या नायकाच्या भूमिकेतल्या एलार कोल्ट्रेनला,  आपल्या डोळ्यांसमोर वाढताना, मोठं होताना पाहू शकतो. वयाच्या सहाव्या वर्षापासून ते थेट अठराव्या वर्षापर्यंत. ते शक्य व्हावं म्हणून चित्रपटाचं शेड्यूलही २००२ ते २०१३ असं लांबच लांब ठरवलं गेलं, आणि लिन्कलेटर आणि त्याच्या कलाकारांनी दरवर्षी थोडा थोडा भाग चित्रीत करत चित्रपट पूर्णत्वाला नेला. आपल्यासारख्या, पडद्यावर धावताधावता दहा ते पंचवीस अशी वयाची उडी मारणाऱ्या नायकांचे हिंदी चित्रपट रिचवलेल्या  प्रेक्षकांना, हे असं काही घडवलं जाऊ शकत हा एक  कल्चर शॉकच आहे, पण कोणत्याही देशात, चित्रपटसृष्टीत, या प्रकारचा प्रयोग हा दुर्मिळच ठरावा.

कोल्ट्रेनने रंगवलेली मेसन ईव्हान्स ज्यु. ही एकच व्यक्तीरेखा इथे आपल्याला डोळ्यांसमोर वाढताना दिसते असंही नाही, तर एक संपूर्ण कुटुंब दिसतं. मेसनची बहिण समॅन्था हिच्या भूमिकेतली लिंकलेटरची मुलगी लोरेली , आणि आईबापाच्या भूमिकेतले पॅट्रिशिआ आर्केट ( ऑलिविआ इवान्स) आणि बीफोर चित्रत्रयीसह  लिंकलेटरच्या चित्रपटात वेळोवेळी दिसणारा इथन हॉक ( मेसन इवान्स सि.) या चौघांचं हे कुटुंब आहे. या चारही अभिनेत्यांना या कालावधीत हळूहळू सहजपणे बदलत जाताना पहाणं हा एक अद्भुत प्रकार आहे. खासकरुन त्या दोन पोरांना, कारण त्यांच्यातला बदल अधिक मूलभूत स्वरुपाचा, त्यांचं व्यक्तिमत्व घडवणारा आहे.

आता बारा वर्ष चालणारी कथा, म्हणजे घडवणार तरी काय, हा प्रश्नच व्यर्थ आहे, कारण सामान्यत: ज्या प्रकारची गती चित्रपटांना दिली जाते तशी गती , तसं नाट्य इथे अपेक्षितच नाही. इथे जे नाट्य आहे, ते वास्तवाशी जोडलेलं, सामान्य माणसांच्या आयुष्यात ज्या प्रकारे ते येऊ शकेल तेवढं आणि तेवढच. पण त्याला तरी कमी कसं म्हणायचं. एक सहा वर्षांच्या मुलाचं आपल्या डोळ्यांसमोर  एका तरुणात रुपांतर होणं यापेक्षा अधिक नाट्यपूर्ण काय असेल?

असं असूनही, हा माहितीपट नाही. त्याला एक रचना आहे. त्यातल्या व्यक्तिरेखांना एक चढा आलेख आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतं ते पॅट्रिशिआ आणि तिची मुलं, यांचं तीन माणसांचं कुटुंब. तिची ओढाताण, तिने पुढलं शिक्षण घ्यायचं ठरवणं आणि आपल्या आईकडे रहायला जाणं . मुलांची बसून गेलेली घडी त्यातून विस्कटणं आणि एका नव्या जागी ती बसवणं भाग पडणं. पॅट्रीशिआ आणि मेसन सि. हे एकत्र रहात नाहीत,आणि पॅट्रीशिआचा त्याच्या निष्काळजीपणावर पूर्ण विश्वास आहे, पण दोघांनाही एकमेकांचं मुलांवर प्रेम आहे हे माहीत आहे, आणि हे संबंध टिकावे म्हणून ते जमेल ते सगळं करतात. पुढे या सर्वांच्याच आयुष्यात अनेक स्थित्यतरं येत जातात, पण नातं टिकवण्याचा प्रयत्नही केला जातो, अगदी प्रामाणिकपणे.

हे घडताना आपल्याला अमेरिकन आयुष्याची एक छान, साधी झलक मिळत रहाते. ज्या काळात हे सारं घडतय, तो काळही अगदी साध्या तपशीलांमधून नोंदवला जातो. हे तपशीलही अगदी ठळक असण्याची गरज नसते.  मेसनने केस वाढवणं, त्याच्या सावत्र वडीलांनी त्याच्या मनाविरुध्द ते भादरुन टाकणं आणि या बदललेल्या लुकला वर्गातल्या एका मुलीची पसंती मिळणं, इतक्या साध्या गोष्टींनीही आपल्याला त्या काळाचा एक संदर्भ तयार होऊ शकतो. आपण या साऱ्या घडण्याला जवळून पहातो, एखाद्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य न्याहाळत असल्याप्रमाणे. अर्थात बारा वर्ष या साऱ्याना एकत्र सलगपणे पाहिल्याने, आणि त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे न्याहाळल्याने आपल्याला थेटपणे  या व्यक्तीरेखांबद्दलचीआणि अप्रत्यक्षपणे एकूणच जगण्याबद्दलची एक दृष्टी तयार होते. यातले मेसन आणि समॅन्था मोठे होऊन जसे बनतात, जे बनतात त्यात त्यांच्या मूळ प्रवृत्तीचा भाग किती? विभक्त कुटुंबाचा त्यांच्या संवेदनशीलतेवर काही परिणाम झाला असेल का? मेसन सि. चा सत्प्रवृत्त अव्यवस्थितपणा आणि पॅट्रीशिआचं मुलांना जपत रहाणं नसतं, तर ही मुलं कोणी वेगळीच आली असती का?

आपण हाय कॉन्सेप्ट सायन्स फिक्शन, वा फिलॉसॉफिकल वळणाच्या चित्रपटांमधे फ्री विल विरुध्द डिटर्मिनिझम हा झगडा पहातो. माणसाला निर्णयाचं स्वातंत्र्य आहे का तो केवळ एका ठराविक रस्त्यावरच चालू शकतो, हा प्रश्न जितका त्या चित्रपटांमधे महत्वाचा आहे ,तितकाच इथेही, कारण इथे तो कोणत्या कल्पनाविष्काराशी जोडला नसून वास्तवाशी संबंधित आहे. यातल्या मेसन वा समॅन्थाला आपला रस्ता निवडायचं स्वातंत्र्य आहे की ते ज्या परिस्थितीच्या चौकटीत आहेत, ती चौकटच त्याचा रस्ता आखून देतेय असा हा प्रश्न. व्यक्ती आणि समाज यांच्या परस्परसंबंधाचा विचार करायला लावणारा. तोही आपण काही फार नवं करतोय, असा अविर्भाव न आणता.

बॉयहूड ऑस्कर मिळवेल अशा भ्रमात मी नाही, खरं तर त्याला ते मिळालं, तर मला थोडी फसगतच झाल्यासारखं वाटेल. कारण बॉयहूड चं वळण हे व्यावसायिक चित्रपटांचं नसून इंडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंडीपेन्डन्ट सिनेमा या संस्कृतीचं आहे. त्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि ऑस्करच्या आदल्या रात्री दिल्या जाणाऱ्या इंडीपेन्डन्ट स्पिरीट अवॉर्ड्समधेही बॉयहूडला नॉमिनेशन आहेच. आणि ते अवॉर्ड बॉयहूडने मिळवणं , हे ऑस्कर मिळवण्यापेक्षा अधिक योग्य होईल. ऑस्कर ही व्यावसायिक चित्रपटांसाठी दिली जाणारी पारितोषिकं आहेत, आणि आशयाबरोबरच व्यावसायिकता दिसणं हे त्या पुरस्कारासाठी आवश्यक वाटतं, जे बॉयहूडमधे जवळजवळ नाहीच. पण कोणी असंही विचारु शकतं , की मग या किंवा अशा चित्रपटांना ऑस्कर नामांकन तरी का मिळावं, तर त्याचं उत्तर हे, की नामांकनं ही अनेकदा कामाचा मान ठेवण्यासाठीही असतात. हे दिग्दर्शक महत्वाचं काम करतायत आणि ते काम अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅन्ड सायन्सेस ने अर्थात हॉलिवुडने ओळखलय असा त्या नामांकनांचा अर्थ असू शकतो. पुरस्कार जेवढा महत्वाचा तेवढंच हे नामांकनही, याबद्दल कोणतीही शंका असू नये.
-गणेश मतकरी

1 comments:

Kshipra Kankariya April 9, 2015 at 6:29 PM  

I watched the film and loved it. It's a great review too!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP