एन एच १०- वास्तव भयाविष्कार

>> Sunday, March 15, 2015

नवदीप सिंग या दिग्दर्शकावर परकीय प्रभाव आहे, हे काही रहस्य नाही. त्याचा मनोरमा सिक्स फीट अंडर, हा पोलान्स्कीच्या चायनाटाऊन वरुन प्रेरीत होता, पण त्याच्या रुपांतरात भारतीयांच्या पचनी न पडेलसं वाटल्याने एक मोठा बदल केला होता, ज्याने चित्रपटाची हवा थोडीशी काढून घेतली होती. तरीही , आपल्याकडल्या कल्ट चित्रपटात मनोरमाचं स्थान महत्वाचं आहे. एन एच १० वरही परकीय प्रभाव आहे, पण एखाद दुसऱ्या चित्रपटापेक्षा तो एकूणच भयपटांमधल्या रोड-हॉरर या उपप्रकाराचा प्रभाव असल्यासारखा वाटतो. 'द टेक्सस चेनसॉ मॅसकर' पासून 'वुल्फ क्रीक' पर्यंत या प्रकारची मुबलक उदाहरणं आहेत, आणि त्यांमधून या प्रकाराची सारी बलस्थानं दिग्दर्शकाने आत्मसात केली आहेत याची हा चित्रपट पाहून खात्री होते.
थोडक्यात हा चित्रप्रकार पहायचा, तर साधारण शहरी वळणाच्या तरुण तरुणीनी एखाद्या अपरिचित ठिकाणी जाणं आणि घनघोर जीवावरच्या संकटात सापडणं, हा फॉर्म्युला. संकटात काही प्रमाणात व्हेरीएशन असू शकतं, पण खूप नाही. त्यामुळे एका विशिष्ट सेट अप नंतर उरलेल्या चित्रपटाचं स्वरुप हे बहुधा एखाद्या पाठलागासारखं होऊन जातं. अशावेळी महत्व येतं ते टप्प्यांना. पात्रांना हलवत ठेवायचं, ताण वाढवत न्यायचा, सुटकेची शक्यता नसल्याचा भास तयार करत रहायचं, आणि प्रेक्षकांना श्वास रोधून पहायला लावायचं, ही या चित्रपटांची गरज. सर्वच चित्रपटांना हे जमतं असं नाही. किंबहूना हॉलिवुडमधेही हल्लीचे या चित्रप्रकारातले अनेक चित्रपट हे ताणापेक्षा हिंसेच्या विकृत दर्शनातच समाधानी असतात असंही म्हणता येईल. एन एच १० मात्र हे टप्प्याटप्प्यानी परीणाम वाढवत नेणं चांगलं जमवतो. खासकरुन पहिल्या अर्ध्या भागात.
या चित्रपटाचा सेटअप खूप कमी आहे, पण जो आहे, तोदेखील थरकाप उडवणारा. गुरगांवसारख्या विकसित होणाऱ्या भागात मीरा ( अनुष्का ) रात्री पार्टीहून घरी जात असताना ओढवलेला प्रसंग हा गेले काही दिवस कानावर येत रहाणाऱ्या बातम्यांची , त्यातून दिसणाऱ्या भीषण मनोवृत्तीचीच आठवण करुन देणारा. मात्र तो केवळ त्या मनोवृत्तीचं दर्शन घडवत नाही. तर मीरा काय प्रकारची मुलगी आहे, हेदेखील त्यात दिसून येतं. मीराची हार नं मानण्याची, विचार करत रहाण्याची आणि येईल त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची वृत्ती, इथे एका प्रसंगात चटकन समोर येते. कायद्याचं या प्रकरणात असमर्थ असणं, समाजाची या वास्तवाबद्दलची अनभिज्ञता, हे सारे मुद्दे, चटकन मांडले जातात. या प्रसंगाला आपल्या आयुष्यातून विसरण्यासाठीच मीरा आणि अर्जुन ( नील भूपालम) हे मीराच्या वाढदिवसानिमित्त कुठेतरी छान रिजॉर्टला जायचं ठरवतात. वाटेत एके ठिकाणी थांबले असताना त्यांना एका जोडप्याला मारहाण होताना दिसते आणि त्यात मधे पडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अर्जुनलाही एक झापड मिळते. चारचौघात आणि त्यातही  मीरासमोर झालेला अपमान त्याला सहन होत नाही आणि काही वेळाने या अपमानाचा बदला घेण्याची संधी येताच तो ती घेतो. पुढे धोका किती आहे हे अर्जुनच्या चटकन लक्षात येत नाही. जेव्हा ते येतं, तेव्हा परंपरेला अनुसरुन पुष्कळ उशीर झालेला असतो.
हॉरर चित्रपटांच्या पटकथेत नेहमी जाणवणाऱ्या दोन कमकुवत जागा म्हणजे पात्रांचा मूर्खपणा, आणि हिंसक दृश्यांचा अतिरेक. यातली पहिली जागा काही प्रमाणात इथेही आहेच. अर्जुनला तो कोणाच्या वाटेला जातोय हे लक्षात का येत नाही? मीरा गाडी सोडून बाहेर का पडते? हातातल्या पिस्तुलाचा वापर प्रोटॅगॉनिस्ट वा अॅन्टागाॅनिस्ट ( क्वचित एखादी वेळ वगळता) एकमेकांविरुध्द का करत नाहीत ? हे प्रश्न इथेही पडू शकतात, पण त्यांची तेवढ्यापुरती कारणं दिग्दर्शक देतो, ज्यामुळे आपण त्या विचारात अडकून रहात नाही. दुसरी जागा इथे खटकण्याइतकी जाणवत नाही, ती पटकथेच्या चतुराईमुळे. चित्रपटात काही ठिकाणी पाहाणाऱ्याचा थरकाप करणारा हिंसाचार आहे, पण त्या जागा अंतराअंतराने येतात. मधे कथानक अनेक वळणं घेत आणि मीरा /अर्जुनला चढत्या क्रमाने बिकट संकटात टाकत पुढे जातं. थेट हिंसा दाखवणाऱ्या विशिष्ट जागा सोडल्या तर उरलेल्या ठिकाणी हिंसा प्रत्यक्ष दिसण्यापेक्षा सुचवली जाते , किंवा तिचा धाक पात्रांवर वा प्रेक्षकांवर टांगता ठेवला जातो. काय घडतय , त्यापेक्षा काय घडू शकेल , याची भीती अधिक वाढवत नेली जाते.
एनएच १० किंचित लटपटतो, तो मीरा गावात पोचते तेव्हा. याचं एक कारण म्हणजे, या प्रकारचा हल्ला करणारी माणसं तालेवार घराण्यातलीच असणार आणि गावात मदत मिळण्यापेक्षा धोकाच अधिक , हे तिला कळायला हवं. तिची व्यक्तीरेखा इतकी बावळट नक्कीच नाही. त्याशिवाय गावातल्या माणसांना दूर ठेवण्यासाठी केलेली सांस्कृतिक कार्यक्रमाची योजनाही पुरेशी पटण्याजोगी नाही. इथे थोडी भीती वाटते ( खरी, चित्रपटातली नाही) की चित्रपट पारंपारिक नाट्यावर येतो की काय. पण नाही. सरपंचाच्या घरात पोचल्यावर मात्र चित्रपट पुन्हा पकड घेतो.
चित्रपटाचा आलेख जपण्यात जसा पटकथेचा मोठा हात आहे, तसा छायाचित्रण आणि संगीताचादेखील. वास्तव चित्रपटांमधे संगीत खटकतं, पण हा नुसता वास्तववाद नाही, त्यात थ्रिलरचा घटकही आहे. संगीताचा अचूक वापर आणि छायाचित्रणातलं वास्तवता आणि थरार यांचं मिश्रण मिळून चित्रपटाचा मूड तयार होतो. काही घडत नसतानाही, ते घडण्यासाठी वातावरण तयार करतो.
एन एच १० चं प्रदर्शन अतिशय योग्य वेळी झालय. विचारांची प्रगल्भता नसणारे, धर्मांध, बुरसटलेल्या विचारांचे समाजकंटक आज इतक्या प्रमाणात वाढत्या गुन्हेगारीला आणि खासकरुन स्त्रीयांवरच्या अत्याचाराला कारणीभूत ठरतायत, की हा चित्रपट हा सरळ एखाद्या वर्तमानपत्रातल्या बातमीसारखा वाटावा. त्याचा शेवट सुखांत नक्कीच नाही, पण पलायनवादाकडे झुकणारा असला, तरीही तो यातल्या सत्याची धार कमी करु शकत नाही.
माझा अनुभव हा, की त्रासदायक वास्तवाचा अतिरेक झाला, की पलायनवाद आपलासा वाटतो. जे पडद्यावर दिसतय ते घडण्याची शक्यता प्रत्यक्षात किती कमी आहे, हे माहीत असलं, तरीही वास्तववादी अंगाने जाण्यापेक्षा चित्रपट काहीसा परिचित पण न्याय्य मार्गाने गेला याचं आपल्याला बरं वाटतं आणि आपण सुखावतो. एक मात्र आहे, की एनएच १० च्या प्रकारचा , वास्तवाच्या जहालपणाची जाणीव करुन दिल्यावर येणारा सुखांत, हा पारंपारिक चित्रपटांमधल्या सुखांतासारखा नसतो. पारंपारिक चित्रपटांना एकूणच विशफुल थिंकींगचा आधार असतो, त्यांच्या लेखी सारंच मनोरंजन असतं. याउलट यासारख्या चित्रपटांना वस्तुस्थिती माहीत असते. ती प्रेक्षकांपर्यंत ठामपणे पोचवण्याचं कामही त्यांनी केलेलं असतं. त्यांचे शेवट हे फक्त प्रेक्षकांवरचा ताण किंचित कमी करण्याकरता असतात.
या विशिष्ट चित्रपटाच्या शेवटाबद्दल आणखीही एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी. तो एक प्रकारचा न्याय जरुर करत असला, तरी दिग्दर्शकाने तो ज्या ठिकाणी संपवलाय त्यावरुन तो न्याय हा किती नाजुक जागी तोललाय हे स्पष्ट होतं. गोष्ट सुखांत वा शोकांत असणं,  ही ती कुठे संपवली जाते यावर ठरतं असं म्हणतात, ते उगाच नाही.

गणेश मतकरी

2 comments:

संजोग March 17, 2015 at 11:20 AM  

अतिशय उत्तम परिचय...

संजोग March 17, 2015 at 11:20 AM  
This comment has been removed by the author.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP