अमेरिकन सिनेमा आणि कलामूल्य

>> Saturday, March 5, 2016

आॅस्कर निकाल हे साधारण अपेक्षेप्रमाणेच लागले. 'साधारण' म्हणण्यामागे कारण आहे. द रेवेनन्ट जे चार महत्वाचे पुरस्कार  घेऊन जाईल असं वाटलं त्यातले तीन त्यांनी मिळवले आणि त्या तिन्ही पुरस्कारांत एक प्रकारचा इतिहास घडवला. १९९४ साली 'व्हाॅट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप?' साठी पहिलं, सहाय्यक अभिनेत्याचं नामांकन मिळाल्यावर इतक्या वर्षांनी लिओनार्डो डिकाप्रिओला हा बहुचर्चित पुरस्कार एकदाचा मिळाला आणि जगभरातल्या त्याच्या चाहत्यांना आभाळ ठेंगणं झालं. सोमवारी आपल्याकडले जे लोक सोशल नेटवर्कवर होते त्यांना डिकाप्रिओला पुरस्कार मिळाल्याने किती प्रचंड आनंदाचं वातावरण आलय याची कल्पना आली असेल. जवळपास आपण व्यक्तीश: किंवा अापल्या देशानेच काहितरी मोठी कामगिरी केल्यासारखा आनंद यात होता. तो निर्भेळ, निरपेक्ष होता, त्यामुळे तो पाहून छानच वाटलं. खरी चांगली गोष्ट ही झाली की पुरस्कार मिळाला, तो खरोखर चांगल्या परफाॅर्मन्सला.

अनेकदा असं होतं, की चार पाचदा नामांकन होऊन पुरस्कार मिळाला नाही, तर हळूहळू त्या व्यक्तीबद्दल सहानुभूतीची लाट पसरायला लागते, आणि फार ग्रेट नसलेल्या कामाबद्दलही पुरस्कार देऊन टाकण्यात येतो. वेगळ्या विभागातलं एक उदाहरण द्यायचं, तर मार्टीन स्कोर्सेसीला दिग्दर्शनाची जी पहिली पाच नामांकनं मिळाली, त्यात 'रेजिंग बुल'पासून 'गुडफेलाज' पर्यंत त्याचे अनेक महत्वाचे , स्वतंत्र चित्रपट होते. प्रत्यक्षात जो चित्रपट सहाव्या खेपेला त्याला दिग्दर्शनाचं आॅस्कर देऊन गेला, तो होता 'द डिपार्टेड', हॅान्गकाॅन्गच्या इन्फर्नल अफेअर्सचा रिमेक. हा चित्रपट चांगला असला, तरी हे स्कोर्सेसीचं सर्वोत्कृष्ट काम नक्कीच नाही. डिकाप्रिओचं असं झालं नाही. हा कदाचित त्याचा आजवरचा सर्वोत्तम परफाॅर्मन्स नसेल, पण निश्चितच त्याच्या चांगल्या कामातला एक आहे.

उरलेली जी दोन पारितोषिकं रेवेनन्टने मिळवली त्यात लुबेज्कीचं छायालेखनाचं लागोपाठ तिसरं आॅस्कर , आणि अलेहान्द्रो इन्यारितूचं दिग्दर्शनाचं लागोपाठ दुसरं ( गेल्या साठ / पासष्ट वर्षात दिग्दर्शनाचा पुरस्कार दोन वर्ष लागोपाठ एका व्यक्तीला मिळालेला नाही) आॅस्कर, असे पुरस्कार होते. या तीनही अपेक्षित पुरस्कारांनंतर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पारितोषिकही त्यांनाच मिळावं अशी अपेक्षा होती, जे झालं नाही. उलट 'स्पाॅटलाईट' सारखा त्यामानाने छोटा , आशयप्रधान चित्रपट ते घेऊन गेला. हे अनपेक्षित नक्कीच नव्हतं, कारण 'स्पाॅटलाईट' आणि 'द बिग शाॅर्ट' यांचा आशयच त्यांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत अस्सल स्पर्धक म्हणून उभा करणारा होता. पण रेवेनन्टच्या तीन पुरस्कारांनंतर त्यांच्या बाजूने पारडं झुकलं असताना हे होणं, हा वेगळेपणा. स्पाॅटलाईट बद्दल पहायचं तर त्यांना एकूण दोनच पुरस्कार आहेत. एक स्वतंत्र पटकथेचा आणि दुसरा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा. सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम असल्याचा धोषा लावणाऱ्यांना हा वेक अप काॅल म्हणता येईल का? नक्कीच.

अशा आॅस्करमय झालेल्या वातावरणात, फेसबुकवर एक पोस्ट पहायला मिळाली, ती आॅस्करला विरोध करणारी. आॅस्कर केवळ इंग्रजी चित्रपटांबद्दलचे पुरस्कार असतात आणि या चित्रपटांमधे काहीही पहाण्यासारखं नसतं, त्यापेक्षा युरोपिअन चित्रपटच कसे चांगले, चित्रभाषा आणि हाताळलेले विषय यात उजवे असतात, आणि एकूण हाॅलिवुड त्याबरोबर आॅस्कर पुरस्कारही कसे टाकाऊ आहेत, या प्रकारची ही पोस्ट होती. तिचा काहीसा सेन्सेशनल शेवट होता, तो "हा असला हाॅलिवुड सिनेमा पहाण्यासाठी मी नालायक असल्याचा  मला अभिमान आहे", असा. गंमत म्हणजे या विचारात काहीही नवं नाही, किंबहुना ते जुने( जुनाटही)  आणि कदाचित तीसेक वर्षांपूर्वी खरोखर व्हॅलिड वाटणारे असावेत या प्रकारचे आहेत. ( तेही खूप नाही, कारण ज्या युरोपिअन सिनेमाचे हे विचार गोडवे गातात त्यातलीच फ्रेन्च न्यू वेव्ह सुरु करणाऱ्या समीक्षक-दिग्दर्शकांनी १९४०/५० मधे हाॅलिवुडने केलेल्या कामाला कला म्हणून मान मिळवून देऊन त्यांचं रास्त कौतुकही केलेलं आहे.) त्यानंतरच्या काळात अमेरिकन चित्रपटात झालेला बदल, या लोकांच्या खिजगणतीत नाही.

आपल्याकडे अमेरिकन चित्रपटांना प्रामुख्याने विरोध झाला तो इन्टेलिजन्शीआकडून , चित्रपट पंडितांकडून, समांतर सिनेमाची चळवळ उभी करणाऱ्या दिग्दर्शका- कलावंतांकडून, आणि काही प्रमाणात फिल्म स्कूलमधे शिकून आलेल्या विद्यार्थ्यांकडून. या विरोधकातल्या किती जणांनी अमेरिकन सिनेमाला आपल्याकडे वितरीत होणाऱ्या ब्लाॅकबस्टर सिनेमांच्या पलीकडे जाऊन पाहिलं, हा एक संशोधनाचाच विषय आहे. ज्यांनी ते पाहिलं, त्यांचा विरोध पुढे मावळत गेला अशीही उदाहरण आहेत.

हाॅलिवुडला एकूण अमेरिकन सिनेमा समजणं ही मोठी चूक आहे, तरीही आपल्याकडे जसा हिंदी सिनेमा/ बाॅलिवुड हेच राष्ट्रीय सिनेमा मानलं जातं, आणि त्यापलीकडल्या कामाकडे दुर्लक्ष करण्याचा कल असतो तसच हे काहीसं. अमेरिकन सिनेमाला होणारा विरोधदेखील प्रामुख्याने याच गृहीतकावर आधारलेला असतो. हाॅलिवुड म्हणजे चार लोकांची करमणूक करण्याच्या हेतूने बनवलेला सवंग सिनेमा, त्याला कलाधिष्ठान नाही, हा यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे केवळ मार्केटिंग आणि ब्रॅन्डींग या जोरावर हा सिनेमा पुढे आला आहे. त्यामुळे दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर हा कन्झ्युमरीझम आहे. दुसरं काही नाही. या प्रोडक्टला दर्जा नाही, केवळ ते विकायला बसलेल्यांना, ते कसं विकायचं, ते  माहित आहे. तिसरा म्हणजे अर्थातच अमेरिका बाह्य चित्रपटांचं कौतुक , मग ते युरोपापर्यंत न थांबता टर्की, इराण पर्यंत पोचतं. आणि अखेरचा मुद्दा म्हणजे अमेरिकेची राजकीय भूमिका, जी त्यांच्या चित्रपटातून पुढे येते, आणि जिचा धिक्कार करणं आवश्यक आहे ( तो धिक्कार, हाॅलिवुडमधे काम करणारे लोकच अनेकदा करत असतात, हे कोणी लक्षात घेणार नाही) . अशा विरोधाला काय उत्तर द्यायचं हे अनेकदा कळेनासं होतं, कारण आपला मुद्दा सिध्द करण्यासाठी ही मंडळी काही उदाहरणं देताना दिसत नाही, आणि आपण उदाहरणांसह आपला काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्या उदाहरणांना निव्वळ अपवाद म्हणून बाजूला टाकलं जातं.

अमेरिकन चित्रपटाने सुरुवातीपासूनच पध्दतशीर आणि बरीचशी निर्मितीसंस्थांच्या हाताखाली असणारी निर्मिती केली हे खरं आहे, पण मूळचे अमेरिकन तसेच तिथे मिळणाऱ्या संधीमुळे जगभरातून त्यांच्याकडे आकर्षित झालेले दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून त्यांच्याकडे खूप दर्जेदार काम झालेलं आहे. विशेषत १९८० च्या दशकात झालेला सनडान्स चित्रपट महोत्सवाचा उत्कर्ष आणि त्यातून अमेरिकन इंडिपेन्डन्ट सिनेमाला आलेलं महत्व, यामुळे त्यांच्या चित्रपटाचं रुप बदलायला मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. रिचर्ड लिन्कलेटर, डेव्हिड लिंच, स्टीवन सोडरबर्ग, वेस अॅंडरसन, डेव्हिड फिंचर, क्रिस्टफर नोलन, क्वेन्टीन टेरेन्टीनो या आणि अशा इतरही अनेक दिग्दर्शकांचं काम हे अजिबातच दुर्लक्ष करण्यासारखं नाही. मात्र ते डोळसपणे पाहून मग त्यावर आपलं मत बनवलं पाहिजे. मुख्य म्हणजे आजचा अमेरिकन सिनेमा व्यवसाय आणि कला यांचं मिश्रण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.

अमेरिकन चित्रपट हे 'केवळ करमणूक' करतात हा आरोप ( यात आरोप करण्यासारखं तरी काय आहे !)  केला जातो खरा, पण तेही खरं नाही . खरा विरोध असतो, तो गोष्ट सांगण्याला . गोष्ट सांगणारा सिनेमा हा कलाप्रकार म्हणून कुठेतरी कमी आहे आणि गोष्टीपेक्षा चिंतनाला महत्व देणारा, वा काही न घडवणारा, वास्तवाच्या आभासातून परिस्थितीवर भाष्य करु पहाणारा सिनेमा कला म्हणून श्रेष्ठ असं या विरोधकांच्या मनावर कुठेतरी बिंबवलेलं असतं. युरोपीअन चित्रपटात अशी मांडणी असण्याचं प्रमाण अधिक असल्याने सबकाॅन्शसलीच त्यांना तो सिनेमा अधिक वरचढ वाटतो. युरोपिअन प्रेक्षकांना या प्रकारचे चित्रपट पहाण्याची हाॅलिवुडपेक्षा अधिक सवय आहे, त्यामुळे तो सिनेमा त्यांना अधिक जवळचा वाटतो. (हे खरं असलं , तरी याचा अर्थ रंजक सिनेमा त्याच्याकडे नाहीच असं नाही. सर्वच चित्रपट उद्योगात धंदेवाईक चित्रपटांना स्थान आहे. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने तो नाहीसा होत नाही.) याउलट  अमेरिकन सिनेमा हा गोष्ट सांगत असल्याने तो प्रेक्षक धार्जिणा , अशी समजूत तयार झालेली आहे. जितकं घडणं कमी, तितकं कलामूल्य अधिक,असा काही नियम नाही. असायलाही नको.

सिनेमाला गोष्ट आहे की नाही, तो कोणत्या देशात बनला, त्यात अभिनेते स्टार्स आहेत  का नाॅनअॅक्टर्स, त्याला नफा झाला का तोटा, यावर चित्रपटाचं मूल्य ठरु नये. ते एकाच प्रकारे ठरवावं, चित्रपट त्रयस्थपणे , कोणत्याही विचारशैलीच्या ओझ्याखाली न येता पाहून. ज्यांचा अमेरिकन चित्रपटाला मनापासून विरोध आहे त्यांना मी एकच म्हणेन, की गेल्या आणि या वर्षीच्या आॅस्करमधे सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी नामांकनात आलेल्या चित्रपटांची यादी समोर ठेवा आणि संधी मिळेल तसे ते पहात चला. ते तुम्हाला युरोपिअन वा आशियाई चित्रपटापेक्षा वेगळे जरुर वाटतील, आणि का नाही, जरुर वाटावे. ते वेगळ्या संस्कृतीतून आलेच आहेत. तरीही त्यातले बहुसंख्य चित्रपट तुम्हाला फायदा डोळ्यासमोर ठेउन केलेले, निव्वळ करमणूकप्रधान वाटणार नाहीत हे मी खात्रीने सांगतो. हे चित्रपट पाहूनही तुमचं मत बदललं नाही, तर पुन्हा बोलूच.
- गणेश मतकरी

1 comments:

Unknown March 8, 2016 at 12:47 PM  

अगदी सहमत.. नोलानचा 'मेमेंटो' हा कुठल्याही तथाकथित फॉर्म्युलाईक गोष्टींना शरण न जाता, आपली एक वेगळी छाप सोडून जातो.. पॉल थॉमस अँडरसनचा 'देअर विल बी ब्लड', जिम शेरिडानचा 'इन द नेम अॉफ फादर', जिम जारमुशचा 'डेड मँन', इनरित्तूचा 'बेबल' हे सिनेमे , ही वेगळ्या अमेरिकन सिनेमाची काही उदाहरणे आहेत... आणखीही खूप सांगता येतील...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP