आजचा मराठी सिनेमा २ - निर्मितीची गणितं

>> Saturday, March 26, 2016





समीक्षक म्हणून, किंवा प्रेक्षक म्हणूनही विचार करायचा , तर चित्रपटाचा प्रमुख म्हणून कोणाचं नाव घ्यावं लागेल, तर उघडच दिग्दर्शकाचं, पण प्रत्यक्षात मराठी चित्रपटांमधे, दिग्दर्शकाचं स्थान सर्वोच्च आहे का ?


खरं सांगायचं तर कोणत्याही प्रतिथयश, वा तशा होऊ पहाणाऱ्या चित्रपट उद्योगात दिग्दर्शकाला महत्व असलं, तरी प्रत्यक्षात तो एकटा काही निर्णायक स्थानावर बसलेला नसतो. बहुतेक वेळा हे स्थान, दिग्दर्शक आणि निर्माता या दोघांच्या सहयोगातून एकत्रितपणे तयार होतं. अगदी पूर्वीच्या , म्हणजे दादासाहेब फाळके, प्रभात फिल्म कंपनी सारख्या उदाहरणांकडे पाहिलं तर लक्षात येईल, की सर्जनशीलतेला त्यांच्या डोक्यात प्रमुख स्थान असलं, तरी केवळ ती असून पुरेशी नाही, हे या साऱ्यांच्याही लक्षात आलेलं होतच. केवळ क्रिएटिव दृष्टिकोन चित्रपटाला एक व्यवसाय म्हणून उभा करायला पुरेसा नाही, आणि चित्रपटात होणारा खर्च, त्याच्या निर्मितीप्रक्रियेतली गुंतागुंत, तयार चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेणं, या सगळ्याचा विचार झाल्याशिवाय इंडस्ट्री तरणार नाही, हे तेव्हाही माहित होतच. त्यामुळेच या लोकांनी निर्मितीच्या जबाबदारीलाही आवश्यक मानलं. आजही दिग्दर्शन आणि निर्मिती, या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितपणे घेणाऱ्या व्यक्ती आणि संस्था अस्तित्वात जरुर आहेत, ज्या प्रत्यक्ष चित्रपट तयार होईपर्यतचा भार स्वत: उचलतात, आणि त्यानंतर इतर निर्माता, वितरक, यांच्या सहाय्याने, तो प्रेक्षकांपर्यंत पोचवतात. पण हे कमी, आणि दिग्दर्शनात सातत्याने यशस्वी ठरलेल्या नावांमधे अधिक प्रमाणात दिसून येतं. ज्या दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटाच्या व्यावसायिक मूल्याची खात्री आहे, आणि ते मूल्य टिकवण्यासाठीच ज्यांना इतर निर्मात्यांचा वरचष्मा नको वाटतो, ते दिग्दर्शकच या प्रकारची रिस्क घेऊ शकतात.

सर्वसाधारणपणे मात्र निर्माता आणि दिग्दर्शक या भूमिका आज एकमेकांपेक्षा वेगळ्या राहिलेल्या दिसतात, आणि त्यांच्यातला कोण चित्रपट बनवण्यात पुढाकार घेतो यावर त्या त्या चित्रपटाचा दर्जा आणि बहुतांशी त्याचं भवितव्यदेखील अवलंबून असल्याचं दिसून येतं. आज जेव्हा दिग्दर्शक पुढाकार घेतो, तेव्हा दोन मार्गाने चित्रपटाचा प्रवास संभाव्य आहे. पहिला आहे, तो व्यावसायिकतेचे निकष न लावता कल्पनेला प्राधान्य देणारा आणि अव्यावसायिक निर्माते वा समविचारी आप्तांच्या सहाय्याने बनवला जाणारा चित्रपट.  आपल्याकडे मराठी चित्रपटांचं नवं वळण घेऊन येणारा पहिला चित्रपट श्वास, हाच मुळात या प्रकारचा होता. संदीप सावंत हा तरुण दिग्दर्शक आणि अनेक समविचारी निर्माते यांचं हे जाॅइन्ट व्हेन्चर कमालीचं यशस्वी ठरलं, आणि मराठी चित्रपटांचं पुनरुज्जीवन झालं. हे झालं तेव्हा अर्थात मराठी चित्रपट संपूर्ण हौसेची बाब होती, त्याच्याकडे व्यवसाय म्हणून मुळातच कोणी पहात नव्हतं. त्याच्या व्यावसायिक शक्यता लक्षात यायला बराच वेळ लागला, आणि या काळात विषय-आशय-दृष्टी यांना प्रमुख स्थान देणारे बरेच दिग्दर्शक पुढे आले. सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी, मंगेश हाडवळे आणि अशी इतर बरीच नावं या काळात पुढे आली. त्याआधीपासूनच या वळणाचं काम करत रहाणाऱ्या सुमित्रा भावे - सुनिल सुकथनकर, अमोल पालेकर या सारख्या दिग्दर्शकांनाही या नव्या प्रवाहात सामील होता आलं.

त्यांच्यातल्या काहींच्या चित्रपटांना मोठ्या वितरणसंस्थांनी ( वळू हा उमेश कुलकर्णीचा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बहुधा मुक्ता आर्ट्सने वितरणाला घेतला, तर परेश मोकाशीच्या हरिश्चंद्राची फॅक्टरीमधे युटिवीने रस घेतला) सहाय्य केलं, पण ते तसं करतील, या भरवशावर या चित्रपटांची निर्मिती झाली नव्हती. आजही या प्रकारचं काम होतं, आणि काहीशा आदर्शवादी धोरणाचे दिग्दर्शकही आहेत. मात्र मराठी सिनेमाच्या व्यावसायिक पोटेन्शिअलचा पत्ता लागल्यावर चांगलं व्यावसायिक प्रपोजल म्हणून चित्रपटाकडे पहाणाऱ्या दिग्दर्शकांचा एक वेगळा गट हळूहळू तयार झाला.

व्यावसायिक म्हणून या चित्रपटांना आणि कलामूल्याबरोबरच प्रेक्षक पसंतीचा विचार जागृत ठेवणाऱ्या या दिग्दर्शकांना कमी लेखता येणार नाही, कारण चित्रपटउद्योगाचं अस्तित्व टिकून रहायचं, तर त्यात बनलेले चित्रपट चालण्याची गरज ही ओघानेच आली. हा विचार जसा दिग्दर्शकांकडून व्हायला लागला, तसतसं मराठी व्यवसायाचं अर्थकारण ठरत गेलं. रवी जाधव आता निर्मितीत उतरला असला, तरी त्याने दिग्दर्शित बरचसं सुरुवातीचं काम या प्रकारचं असावं. नटरंग, बालगंधर्व, बीपी या चित्रपटांमधे कलात्मक अंगाला जागा आहे, पण त्याबरोबरच त्याच्याकडे एक प्रोडक्ट म्हणून पहाण्याची दृष्टी देखील आहे. या प्रकारे काम करणारा अर्थातच हा एकटा दिग्दर्शक नाही. कल्पनेचा वेगळेपणा आणि तिची मार्केटॅबिलिटी यांचा एकत्रित विचार करणारं हे एक महत्वाचं नाव, एवढच.

जसजसं मराठी चित्रपट कोण पहातं आणि ते पहाणारा प्रेक्षक काय आवडीने पाहिल याची प्रचिती येत गेली, तसतशी निर्मात्यांची बाजू ही अधिकाधिक मजबूत होत गेली. आज झी/इराॅस/एवरेस्ट/ व्हायकाॅम यासारख्या संस्था यात पुढे आहेत. दिग्दर्शकाने आपल्या कल्पना घेऊन त्यांच्याकडे येणं हे काही प्रमाणात सुरु आहेच, मात्र त्याबरोबरच आपल्या पसंतीचे आपल्या टीमने योजलेले प्राॅजेक्ट्स घेऊन पुढे येणं या संस्थांना अधिक फायद्याचं वाटतय. यासाठी ते जी टीम निवडतील, त्यात त्यांना या चित्रपटाकरता कोणता दिग्दर्शक योग्य वाटतो याला महत्व असेल. यापूर्वी दिग्दर्शकाने चांगली कल्पना आणल्यास तो बाय डिफाॅल्ट दिग्दर्शक ठरणं आता या मोठ्या संस्थांमधून कमी कमी होत जाईल आणि त्यांचं निर्मितीवरलं नियंत्रण हे त्याच प्रमाणात वाढत जाईल.

हे कलादृष्टी आणि व्यवहार यांचं काही प्रमाणात स्वतंत्रपणे तर काही प्रमाणात एकत्र येउन काम करणं सोडलं तर मराठी चित्रपटांची निर्मिती हा नुसता गोंधळ आहे. यात जे निर्माते म्हणून नव्याने उतरतात, त्यांना या व्यवसायाची किती कल्पना असते, आणि दिग्दर्शक ती किती प्रमाणात करुन देतात, हा प्रश्नच आहे. मी मघा म्हणालो, तसं काय सांगायचंय, कसं सांगायचय याची पूर्ण कल्पना असणाऱ्या वेगळ्या पठडीतल्या चित्रपटांना निर्माता मिळणं , आणि त्या निर्मात्याने दिग्दर्शकावर श्रध्दा ठेवून त्याला योग्य वाटेल ते करु देणं, हे मी रास्त मानेन, पण अशा दिग्दर्शकांचं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या निर्मात्यांचं प्रमाण फार मर्यादीत आहे. बऱ्याच निर्मात्यांना चित्रपट एक हौस म्हणून करायचा असतो.तो बनवण्याइतका पैसा त्यातल्या अनेकांकडे असतो, पण तो पुरा झाला की त्याचं काय करायचं, याचा त्यांनी, आणि अनेकदा त्यांच्या दिग्दर्शकांनी विचारही केलेला नसतो. या चित्रपटांचं भवितव्य अनेकदा काळजी वाटण्यासारखं असतं. बऱ्याचदा या निर्मात्यांचा कमाई नं होण्यालाही आक्षेप नसतो. त्यांचं चित्रपटावर नाव झळकलं याचा त्यांना आनंद असतो. दिग्दर्शकांना मीटर चालू राहिल्याचा आणि नावावर आणखी एक चित्रपट जमा झाल्याचा आनंद असतो.

आता कोणी असंही म्हणेल, की जर त्या निर्मात्या/ दिग्दर्शकाला जर स्वत:च्याच चित्रपटाची पर्वा नसेल, तर तुम्हाला काय फरक पडतो? पडतो ! मलाच का ,पण मराठी चित्रपटसृष्टी टिकावी, असं वाटणाऱ्या  प्रत्येकालाच फरक पडायला हवा. कारण पूर्ण विचारांती न काढलेल्या चित्रपटांचे अप्रत्यक्ष  दुष्परिणाम अनेक असतात.

पहिला म्हणजे या चित्रपटांच्या असण्यामुळे चित्रपटसृष्टीला आलेला खोटा फुगवटा. या फुगवट्यामुळे सृष्टीबद्दलचं एक चुकीचं चित्र उभं रहातं , त्याचबरोबर हे चित्रपट दर्जा/ नफ्याची शक्यता असण्यानसण्याची पर्वा न करता चित्रपटगृहात लावले जातात, ज्याचा परिणाम म्हणून काही एक विचार ज्यांमधे गेला आहे, अशा चित्रपटांची जागा अडवली जाते. एका आठवड्याला आम्ही एकच चित्रपट पाहू शकतो असं मानणाऱ्या बहुतेक मराठी प्रेक्षकांकडे पाहिलं की किती नुकसान होत असेल याची कल्पना यावी. मी मागच्या लेखात म्हंटल्याप्रमाणे वर्षाकाठी येणाऱ्या सव्वाशेच्या आसपास चित्रपटाच बारा पंधराच चांगले असतात. उरलेल्यातही काही वर्थव्हाईल प्रयत्न, किंवा काही एक बेनिफिट आॅफ डाऊट देऊनही असं म्हणता येईल की निदान पन्नासेक चित्रपट तरी सरळ अनावश्यक आणि दर्जाहीन या वर्गात मोडतात. आता यांच्या निर्मिती आणि वितरणात प्रत्येकी एक ते अडीच कोटी या रेंजमधे पैसा जातो, मोठ्या प्रमाणात अभिनेते, कलावंत , तंत्रज्ञ यांचा सहभाग वाया जातो. ही सगळी नासाडीच नाही का?

आता कोणी म्हणेल, की या चित्रपटातून जो रोजगार उपलब्ध होतो त्याचं काय? हा रोजगार अमुक इतकी घरं चालती ठेवू शकत नसेल काय? निश्चितच असेल. पण चित्रपटसंख्या याहून कमी केली आणि निर्मितीतली विविधता वाढवली, दर्जा सुधारत नेला तर होणारा फायदा हा एकूण मराठी सिनेमाला अधिक चांगल्या भविष्याकडे नेणार नाही का? क्षणिक नफ्यासाठी आपल्या एकूण उद्योगाच्या खोलाच चाललेल्या पावलाकडे आपण कधी लक्ष देणार आहोत?
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP