मराठी सिनेमा आणि चित्रप्रकारांचा अभाव

>> Saturday, April 9, 2016

नुकताच आपल्याकडे एक फुंतरु नावाचा सिनेमा येऊन गेला, ज्याच्याकडून प्रेक्षकांच्या फार अपेक्षा होत्या.अपेक्षांची कारणं दोन. सुजय डहाके, या दिग्दर्शकाला शाळा या त्याच्या कमिंग आॅफ एज प्रकारच्या प्रथम चित्रपटातून मिळालेलं नाव हे एक ( आजोबा, या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाला सध्या बाजूला ठेवू), आणि फुंतरु चित्रपटाच्या चमत्कारिक नावातून, ट्रेलर्समधून आणि एकूणच पी आर योजनेमधून त्याच्या सायन्स फिक्शन बाजूकडे वेधलं जाणारं लक्ष हे दुसरं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा चित्रपट लागला, तेव्हा तो तयार झालेल्या हवेच्या प्रमाणात यशस्वी ठरला नाही.

माझा असा अनुभव आहे, की जेव्हा आपण काही एक ( चांगलं वा वाईट) मत डोक्यात ठेवून चित्रपट पहातो, तेव्हा आपलं अंतिम मत दुसऱ्या बाजूला झुकण्याची  शक्यता अधिक असते. याचा अर्थ असाही नाही, की आपण कोऱ्या पाटीसारखा सिनेमा पहावा, तेही अशक्य आणि अनावश्यकच आहे. तरीही जमेल त्या प्रमाणात आपली मतं न लादता सिनेमा पाहिला, तर त्याला न्याय होण्याची शक्यता अधिक असते. फुंतरुबाबत आधी उत्सुक असलेल्या लोकांकडूनही जी टोकाची उलट मतं व्यक्त केली गेली, ती यामुळेच.

फुंतरुबद्दल एक गोष्ट उघड आहे की तो सायन्स फिक्शन आणि प्रेमकथा यांना जवळजवळ फिलाॅसाॅफिकल पातळीवर नेणाऱ्या स्पाईक जोन्जच्या ' हर ' या सिनेमाने प्रेरीत आहे. त्यातला काॅलेजचा भाग आणि दृश्यशैली, ही हर पेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे, पण त्यातले घोळही ( विशेषत: शेवट) मूळ चित्रपटासारखं करतानाही वेगळं करुन पहाण्याच्या प्रयत्नात ओढवलेले आहेत.

फुंतरू पहाणाऱ्यांनी जर त्याच्या  सायन्सकडे लक्ष न देता त्यातल्या प्रेमाच्या अंगाला अधिक महत्व दिलं असतं, किंवा सायन्स फिक्शन मधेही विज्ञानाचा हार्ड सायन्सएेवजी केवळ एक हलकी पार्श्वभूमी म्हणून वापर केला जाउ शकतो, हे लक्षात घेतलं असतं, तर त्यांना तो अधिक प्रमाणात समजू शकला असता. या प्रकारची उदाहरणं आपल्याला वेळोवेळी पहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी आलेल्या निखिल महाजन दिग्दर्शित बाजी चित्रपटाचंही काहीसं असच झालं. त्याच्या 'सुपरहिरो' फिल्म म्हणून झालेल्या प्रसिध्दीने त्याच्याभोवती वलय निर्माण केलं आणि त्यातल्या नायकाकडे काही विशिष्ट शक्ती नसल्याने, प्रेक्षकांचा तीव्र अपेक्षाभंग झाला. खरं तर बॅटमॅन, झोरो, फॅन्टम अशा अनेक महानायकांना वेगळ्या शक्ती नसतानाही सुपरहिरो वर्गात धरलं जातं, पण आपल्याकडे सुपरहिरो हा शक्तीविना असूच शकत नाही.

या प्रकारची इतर उदाहरणंही देता येतील ज्यांमधे जाऩ्र ( genre) किंवा चित्रप्रकारांचा वापर हा आपण पुरेसा समजून घेत नाही आणि तडकाफडकी निष्कर्ष काढून मोकळे होतो. ( निखिल महाजनच्याच पुणे ५२ मधला फिल्म न्वार या चित्रप्रकाराचा वापर तेव्हा अनेकांना संभ्रमात पाडून गेला होता.) याचा परिणाम म्हणून वेळोवेळी काही वेगळं करु पहाणाऱ्या चित्रपटांकडे दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, याचा दोष मी पूर्णत: प्रेक्षकांवर टाकणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीने एकाच चाकोरीत फिरत राहून वेगळे विषय , नवे फाॅर्म्युले, रचना हाताळण्याचं टाळणं, हे यामागचं एक महत्वाचं कारण आहे. प्रेक्षकांना सवयच करुन दिली नाही, तर त्यांची अभिरुची कशी तयार होणार ?

अमेरिकन सिनेमांना आपण ' व्यावसायिक, करमणूक प्रधान' वगैरे म्हणून नेहमी शिव्या देतो, पण त्यांनी उद्योगाच्या अगदी सुरुवातीपासूनच ज्या प्रकारे चित्रप्रकारांचा वापर केला, ते पहाण्यासारखं आहे. ज्याप्रमाणे साहित्यात विशिष्ट विषय आवडीने वाचणारा वाचक असतो, तसाच सिनेमातही विशिष्ट वळणाच्या चित्रपटांना पसंत करणारा प्रेक्षक असणार, हे हाॅलिवुडच्या खूप पूर्वी लक्षात आलं. त्यात त्यांच्याकडे प्रबळ निर्मितीसंस्थांनी सुरु केलेली व्यवस्था, ज्याला स्टुडिओ सिस्टीमही म्हंटलं जातं, ती फार लवकर अस्तित्वात आली, आणि विशिष्ट प्रेक्षकांसाठी विशिष्ट विषयावरचा/प्रकारचा चित्रपट, अशा भूमिकेतून निर्मिती सुरु झाली, जे आपल्याकडे अत्यंत कमी प्रमाणात झालं.

मराठी चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळ पाहिला, तर सामाजिक, एेतिहासिक, साहित्यावर आधारलेले, कौटुंबिक, संतपट, असे काही निश्चित चित्रप्रकार दिसतात, पण स्वातंत्र्योत्तर काळात हे चित्र नाहीसं झालं. या काळात हिंदीत मसाला चित्रपटांचा फाॅर्म्युला बनत गेला, जो विशिष्ट विषयाएेवजी ' करमणूक ' या लेबलाखाली जे काही येऊ शकेल, म्हणजे नाच, गाणी, मारामाऱ्या, रोमान्स, विनोद, इत्यादी गोष्टींना एकत्र आणत तयार झाला. त्याला असणारा प्रेक्षक पहाता मराठी चित्रपटांनीही बिन्डोक करमणुकीलाच प्राधान्य दिलं आणि फाॅर्म्युलाच्या शोधाला लागले. अनंत मानेच्या 'सांगत्ये एेका' चित्रपटाने हा शोध संपला आणि एकाच प्रकारच्या कथानकांवर ग्रामीण चित्रपट / तमाशापट वगैरे नावाने ओळखला गेलेला सिनेमा लोकप्रिय झाला.

गेल्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांना चित्रप्रकार म्हणता येईल, असे मराठीत दोनच पहायला मिळाले. पहिला होता, तो हा तमाशा/ग्रामिणपट, तर दुसरा नवरी मिळे नवऱ्याला, किंवा धूमधडाका, सारख्या चित्रपटांमधून पुढे आलेला तथाकथित विनोदी सिनेमा. हा विनोदी सिनेमा देखील सुरुवातीला एक चांगला पर्याय वाटला, पण झपाट्याने त्यांचा दर्जा घसरत गेला. या दोन्ही वेळा एका प्रकाराचं यश दिसल्यावर तसेच इतर प्रकार, विषय न शोधता उर्वरीत चित्रपटांनीही तेच ते, तसंच्या तसं फाॅर्म्युलाबाज पध्दतीने करण्याचा प्रयत्न केला आणि चित्रपटसृष्टीचं नं भरुन येणारं नुकसान झालं. आपल्याला नव्या शतकात शून्यापासून सुरुवात करावी लागली, ती त्यामुळेच.

एवढं सगळं होऊन आजही आपल्याकडे चित्रप्रकारांचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल, की कशाला व्हायला हवा? स्वतंत्र काम होतय हे पुरेसं नाही का? तर आहे. स्वतंत्र कामाला महत्व नक्कीच आहे. पण ते पुरेशा प्रमाणात होत असेल आणि वैविध्य साधत होत असेल तर. चित्रप्रकारांचा फायदा हा की ते अनेक विषयांसाठी मागणी तयार करतात. नवा प्रेक्षक घडवतात. अनेकदा चित्रप्रकाराची जाणीव असणं, हे विषयाची झेप अधिक उंचीवर नेण्यासाठी पुरेसं असतं, कारण प्रेक्षकाची दृष्टी नव्याने घडवावी लागत नाही. चित्रपटाचा तार्किक आराखडा, तो जाणून असतो. उदाहरणार्थ, चित्रपटाची सुरुवात जर एखाद्या गुन्ह्याने होत असेल, तर चित्रपट गॅंगस्टर फिल्म आहे, भयपट आहे, का फिल्म न्वार पध्दतीचा आहे हे जाणणारा प्रेक्षक पुढल्या घडामोडी अधिक चटकन आत्मसात करुन घेऊ शकतो आणि ज्या त्या गोष्टीच्या स्पष्टीकरणात चित्रपटाला वेळ फुकट घालवावा लागत नाही. त्यामुळे आशयाची झेप अधिक मोठी घेणं शक्य होतं. याउलट, जर प्रेक्षकाला दिशेची काहीच कल्पना नसेल, तर दिग्दर्शकाला फार मूलभूत पातळीवर स्पष्टीकरणं देण्याची सुरुवात करावी लागते.

आणि स्वतंत्र काम चित्रप्रकारात होत नाही, असं तरी कुठे आहे ? चित्रप्रकार म्हणजे आराखडा, ढोबळ चौकट, तो फाॅर्म्युला नव्हे. कथानकाची इत्यंभूत माहिती नव्हे, तर प्रेक्षकाची जाण म्हणून तो वापरला जाऊ शकतो. ही जाण असेल तर दिग्दर्शक विविध प्रकारे आपला चित्रपट रचू शकतात. कधी या अपेक्षाच्या बाजूने, कधी या अपेक्षांच्या विरोधात, तर कधी वेगळच काही मांडताना ढाच्याप्रमाणे या चित्रप्रकारांचा वापर करत. मघा उल्लेख केलेलं पुणे ५२ चित्रपटाचं उदाहरण इथे पहाता येईल. फिल्म न्वार हा चित्रप्रकार मानसिक स्थैर्य नसलेला डिटेक्टिव, रहस्यमय तरुणी, पाताळयंत्री खलनायक, या प्रकारच्या व्यक्तीरेखांचा वापर गुन्हेगारीच्या व्यक्तीनिष्ठ कथा मांडण्यासाठी करतो. चित्रीकरणातला गडदपणा, निवेदनाचा वापर, काही चमत्कृतीपूर्ण दृश्य संकल्पना या त्याच्या इतर वैशिष्ट्यांपैकी आहेत. हा वापर आपल्याला एक विशिष्ट आशय सुचवतो, पण प्रत्यक्षात चित्रपटाचा रोख  साधी गुन्हेगारी कथा मांडणं हा नसून, ग्लोबलायजेशन आणि आर्थिक सुबत्तेनंतर बदलत गेलेल्या नव्वदोत्तरी मध्यमवर्गावर टिका करण्याचा आहे. ही गुंतागुंत प्रेक्षकाला जाणवेल जर तो फिल्म न्वारसारख्या चित्रप्रकाराला जाणून असेल. अन्यथा तो नुसताच गोंधळात पडण्याची शक्यता.

चित्रप्रकारांना आपलं म्हणण्यातून, चित्रपटांमधे  ही अशी विविधांगी  वाढ होण्याच्या शक्यता दिसतात, पण तरीही आज फार मोजक्या प्रमाणात त्यांचा वापर होतो, आणि जो होतो तोदेखील राॅमकाॅम ( रोमॅंटिक काॅमेडी) , गुन्हापट, यासारख्या चारदोन परिचित प्रकारांत. आज मराठी चित्रपटाने नवं रुप धारण केल्यालाही १० हून अधिक वर्ष झाली. मग आपण अजूनही विविध विषय, आशय , यात प्रयोग का सुरु केलेले नाही? कौटुंबिक, ग्रामीण आणि प्रेमकथा यातच आपल्या चित्रपटांचा मोठा भाग अजूनही का अडकून पडलेला आहे. चित्रपटांना आज मिळणाऱ्या मर्यादीत प्रतिसादाला केवळ प्रेक्षकांना जबाबदार मानता येईल, की काही मूलभूत उपायांची गरज आहे?
- गणेश मतकरी

3 comments:

Krishna April 10, 2016 at 1:35 AM  

Aajkal barechshe marathi prekshak he Hollywood che hi prekshak pan ahetch..
N tyatale barech jan hollywoodmadhye honare veg-vegale pahatat pan, n tyala apreciate pan kartat. Tyamule asa prakar tyana kalat nahi va avadat nahi asa navhe, jar asa prakar marathit zala tar to nehamich swagatarha asato..
Pan mhanun ekhada n jamlela cinema jyat vegala kahitari try kela gelay pan cinema mhanun to far so so ahe justify nahi hot..

Unknown April 10, 2016 at 3:08 AM  

that's not the argument. Argument is, that working on genres, will open up more possibilities for Marathi, which are unexplored so far, and looking at different things will broaden the audience perspective as well. appreciating something in Hollywood is not the same as accepting it in Marathi. Many Marathi viewers like to watch south Indian cinema as well, so far , no imitation of south (there are many in the past 2 years) has been successful here. on box office or critically.

Vivek Kulkarni April 10, 2016 at 9:10 PM  

साहित्याचा असा जानर वाढवण्यासाठी उत्तम प्रकारे उपयोग होऊ शकतो. गुढकथा, भयकथा, बाबा कदम, सुहास शिरवळकर वगैरे मंडळींचं लेखन किंवा इतर भाषेतलं लेखन उदा. हिंदी पल्प फिक्शन, इंग्रजी साहित्य वगैरेंचा वापर बंदिस्त पटकथेद्वारे करता येऊ शकतो. दिवाळी अंकात खूप कथा-कादंबऱ्या प्रसिद्ध होतात पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अर्थात आपलं साहित्यही त्याला कारणीभूत आहे. ते ज्या पद्धतीने लिहितात त्यात कल्पकता, अभ्यास, अनुभवांचं विश्लेषण वगैरे बाबी नसतातच. मराठीतल्याच इतरांना प्रमाण मानून लेखन केलं जातं. स्वतंत्र शैली असणारे लेखक जवळपास नाहीतच. रत्नाकर मतकरींनी गूढकथा लिहून स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर तरी कितीसे सिनेमे आलेत म्हणून. तशा पद्धतीची मानसिकता निर्माता-दिग्दर्शक-पटकथाकार यांच्यात हवी. याने चित्रप्रकारांच्या वैविध्यतेत वाढ तर होईलच आणि प्रेक्षक सुद्धा त्यांना भावलेल्या कथा पडद्यावर बघण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करेल.

दुसरीकडे आपल्या इथे विशिष्ट पद्धतीचा सिनेमा बनवणारे दिग्दर्शक नाहीत म्हणजे जॉन फोर्ड सारख्यांनी वेस्टर्न्स बनवले तसे आपल्या इथे झालं नाही. आपल्या इथे तमाशापट किंवा बाष्कळ विनोदीपटांच्या पुढे जायला आपण तयार नव्हतो. फुन्तरूसारखा विषय जर एखाद्या विशिष्ट सिनेमाच्या प्रभावाखाली असेल तर विविध चित्रप्रकारांची अपेक्षा का धरण्यात यावी. यांना स्वतःची दृष्टी नाही जशी निखिल महाजननी प्रेक्षक परवा न करता एक फिल्म न्वार व एक सुपरहिरोपट दिला. तेही त्यातील फक्त चित्रप्रकाराची चौकट उचलून. दुसरीकडे गजेंद्र अहिरेंसारखे दिग्दर्शक कामात सातत्य ठेवतात पण हाफ बेक्ड स्वरूपाचं काम करून. सामाजिक विषय हाताळून आपण काहीतरी समाज सुधारणा करतोय असा आविर्भाव बऱ्याच जणांच्या कामात दिसतो त्यामुळे आशयघन म्हणावे असे सिनेमे सुद्धा फार तुरळक आहेत. एकूणात चित्र मिश्र स्वरूपाचं आहे.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP