मोटरसायकल डायरीज आणि क्रांतीची बीजं

>> Saturday, December 3, 2016




कॅस्ट्रो गेला आणि बंडाचा एक सिम्बाॅल हरवल्यासारखं झालं. खरं म्हणजे हरवल्यासारखंही नाही म्हणता यायचं. शक्यता अशीही वाटते की त्याचं क्युबामधल्या क्रांतीशी जोडलेलं नाव आता अधिक जागतिक होत जाईल. त्याच्या आयुष्याच्या तपशीलाला महत्व तर आहेच, क्युबा आणि जागतिक राजकारणातही तो मोठा नेता मानला जातोच, पण आता कदाचित त्या तपशीलापलीकडे जात  क्रांतीचा चिरतरुण शिलेदार म्हणून त्याचं नाव जगभरातल्या  तरुणांच्या अधिक जवळ पोचेल. हयातीत जवळचे मित्र आणि क्युबन लढ्यातले सहकारी असलेल्या  चे गेवारा ने व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या तरुणांच्या मनात पटकावलेलं स्थान, कदाचित आता मागून येणारा कॅस्ट्रोही पटकावेल. क्युबन राज्यक्रांतीचा चेहरा असणारी ही दोन नावं पुन्हा एकत्र येतील.

तरुणपणी गेलेले लोक कायम तरुणच रहातात. त्यांचे विचार, त्याची लोकांसमोरची अखेरची प्रतिमा हे काही बदलत नाही. याउलट वृद्धत्व व्यक्तीची प्रतिमा बदलत नेतं. दुर्दैवाने का असेना, पण गेवाराला कॅस्ट्रोपुढे हा अॅडव्हान्टेज मात्र आजही रहाणार. गेवाराच्या नावाचे टी शर्ट घालणाऱ्या तरुणांना त्याचं क्युबन लढ्यातलं काम, पुढे लॅटीन अमेरिकेतला बंडाचा फसलेला प्रयत्न, हत्या, याचे तपशील  माहीत नसतीलही, पण एक प्रतीक म्हणून तो चांगलाच परीचयाचा आहे. कॅस्ट्रोपेक्षाही अधिक परीचयाचा.

बरेचदा असंही होतं. लोकांपर्यंत पोचायला तुम्हाला काही गोष्टी सोप्या करुन सांगाव्या लागतात. विचार, कार्य यांचा अभ्यास हा आपल्या जागी ठीकच, पण लाल टी शर्ट वरची काळी प्रतिमा, ही कधीकधी सोपा आणि थेट संदेश देत असल्याने पटकन पोचते. अधिकांपर्यंत पोचते. फिल्म माध्यमाला आपण लोकांचं माध्यम म्हंटलं, तरी त्यातही अभ्यासपूर्ण मांडणीपेक्षा, थोडक्यात सांगितलेलं लोकांना आवडण्याची, समजण्याची शक्यता वाढते. गेवाराबद्दल स्टीवन सोडरबर्गने अभ्यासपूर्ण पद्धतीने काढलेला दोन भागातला चरित्रपट ' चे ' असताना, गेवाराच्या पुढच्या काळातल्या व्यक्तीमत्वाशी जराही संबंध नसणारा , आणि तरुण असताना गेवाराने लिहिलेल्या एका प्रवासाच्या आठवणींवर आधारीत ' द मोटरसायकल डायरीज' इतका लोकप्रिय असावा यामागेही हे सोप्या आणि थेट  आशयाचच कारण असावं.

२००४ साली वाॅल्टर सॅलीस दिग्दर्शीत ' द मोटरसायकल डायरीज' आला, तेव्हा तो समीक्षकांना आवडला, पण तो काय दृष्टीने पहावा याबद्दल त्यांच्यात मतभेद होते. आता चित्रपट चरित्रात्मक तर आहे, पण प्रत्यक्षात गेवाराच्या प्रमुख कार्यकाळातलं काहीच त्यात दिसत नाही, मग त्याला आशयाच्या दृष्टीने चांगला म्हणायचा का वाईट, का नुसताच रोड मुव्ही म्हणून सोडून द्यावं , असा काहीतरी गोंधळ झाला. ही गोष्ट खरी, की प्रत्यक्ष काम दिसलं नाही, तरी या नेत्याच्या मानसिकतेत होत गेलेला बदल, त्याचं एका सुखवस्तू कुटुंबातल्या मुलापासून ते समाजाच्या पिडीत घटकांबद्दल आपुलकी आणि त्यांच्यासाठी काही करायची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यात होणारं रुपांतर या चित्रपटात आपल्याला दिसतं. तरीही, हे थोडं मोठ्यांच्या छोट्या गोष्टीसारखं आहे. वर्गातली शेंगांची टरफलं आपण उचलणार नाही म्हणणारा मुलगा लोकमान्य टिळक होणार हे आपल्याला माहीत नसेल, तर आपण गुरुजनांची पर्वा नं करणारा आगाऊ मुलगा म्हणून त्याला सोडून देऊ. तसच, जर चित्रपटातला    २३ वर्षांचा मेडीकल स्टुडन्ट अर्नेस्टो गेवारा  पुढे कोण झाला हे जर माहीत असेल, तरच आपण त्याच्यातला बदल, एका वेगळ्या नजरेने पाहू शकू. नाहीतर ही एक साध्या आदर्शवादी मुलाची गोष्टच ठरेल.

सगळ्याच तत्कालीन समीक्षकाना जरी हे सारख्या प्रमाणात लक्षात आलं नाही, तरी चित्रपटातल्या अर्नेस्टोचं बदलणं हे लोकांपर्यंत पोचलं आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. ' चे ' या नावाबद्दल तरुणांमधे आकर्षणही होतं, आता या नावाला साजेलशी प्रतिमा उभी करणारा हा पडद्यावरला चे त्यांना भेटला. त्यांच्याच वयाचा, त्यांच्यासारखाच उत्तरं शोधणारा. या व्यक्तिरेखेशी समरस होणं त्यांना सोपं गेलं. दुसरी चांगली गोष्ट ही झाली, की चरित्राच्या ओझ्याखाली चित्रपट दबला नाही. रोड मुव्ही हा चित्रप्रकार रस्त्यावर, प्रवासात घडतो. हे प्रवास बहुधा दोन पातळ्यांवरचे असतात. प्रत्यक्ष आणि प्रतीकात्मक. ते केवळ स्थलांतर घडवत नाहीत तर सहभागी व्यक्तिरेखांमधे त्यांनी आमूलाग्र बदल घडवणं अपेक्षित असतं. या चित्रप्रकारात गेवाराचं ' मोटरसायकल डायरीज' चपखलपणे बसलं. चरित्रपट आवडणाऱ्यांना, रोड मुव्ही आवडणाऱ्यांना आणि एकूणच चित्रपट आवडणाऱ्यांनाही, तो त्याच्या साधेपणाने, आणि अभिनिवेश नं बाळगणाऱ्या अर्थपूर्णतेने पटून गेला.

मोटरसायकल डायरीजमधल्या प्रवासाच्या सुरुवातीला अर्नेस्टो गेवारा ( गेल गार्शिआ बेर्नाल ) म्हणून जी व्यक्ती होती, ती त्या प्रवासाच्या शेवटी उरली नाही. आपल्या कोषात वाढलेला, आर्थिक सुबत्तेची सवय असलेला हा मुलगा, आपला वैद्यकीय अभ्यासक्रम पुरा व्हायला थोडेच दिवस बाकी असताना रोड ट्रीपवर निघाला तो आत्मशोधासाठी नाही, तर निव्वळ एक गंमत म्हणून. आल्बेर्तो ग्रानाडो ( राॅडरिगो डे ला सेर्ना) या आपल्या मित्राच्या हौसेखातर तो यासाठी तयार झाला. ब्युनोस आयरेसपासून वेनेझुएलापर्यंत जमेल तितकी दक्षिण अमेरिका बघत बघत मोटरसायकलवरुन हा १४००० किलोमीटरचा प्रवास करायचा, अशी ही मूळ कल्पना होती. प्रत्यक्षात प्रवासाचा थोडाच भाग मोटरसायकलवरुन होऊ शकला, आणि मग पायी वा मिळेल त्या वाहनातून असं प्रवासाचं स्वरुप बनलं.

डायरीज टप्प्याटप्प्याने अधिकाधक गंभीर बनत जातो. यातला पहिला भाग तसा खेळकर पद्धतीने उलगडतो. अर्नेस्टोचं घर, प्रवासाची सुरुवात, त्याच्यासारख्याच ( किंवा त्याच्याहून ) सुखवस्तू घरातल्या त्याच्या मैत्रिणीला भेट, थोड्या गंमतीजमती वगैरे. ज्यांनी गेल गार्शिआ बेर्नालचाच 'इ तू मामा ताम्बिएन' पाहिला असेल, त्यांना चित्रपटाच्या सुरुवातीकडे पाहून हा त्यासारखाच काही प्रकार वाटेल. पण तसं नाही. इ तू मामा ताम्बिएन मधेही सामाजिक परिवर्तनाची जाण असली तरी त्यात सुखवस्तू समाज आणि ते अनभिज्ञ असलेला पिडीत समाज, असं स्वतंत्र तुकडे योजनाबद्ध रितीने केले होते. मोटरसायकल डायरीज मधे असे तुकडे नसून एकरेषीय चढता संघर्ष आहे, आणि दर भागाला त्याचं त्याचं महत्व आहे.

उदाहरणार्थ, या सुरुवातीच्या भागात मूळात अर्नेस्टो कोण होता, त्यांच्या समाजाच्या स्थितीबद्दल त्याला किती कमी माहिती होती, आणि आपल्या परीघाबाहेरचं त्याचं ज्ञान किती मर्यादित होतं, याचं चित्रण येतं. मुळातच मोडकळीला आलेली आल्बेर्तोची बाईक ज्या क्षणी निकालात निघते, त्या क्षणी परिवर्तनाला खरी सुरुवात होते. आपल्या घरात असताना जो समाज त्याच्या नजरेच्या टप्प्यापलीकडे होता, तो आता रस्त्यावर आल्यावर त्याला घेरुन टाकतो आणि त्याकडे डोळेझाक करणं आता अर्नेस्टोला शक्य होणार नसतं. रस्त्यावर रहाणारे, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले, स्वत:च्याच जमिनीवरुन उन्मत्त सत्ताधाऱ्यांकडून हकलले गेलेले लोक या दोघाना भेटतात, आणि अनेक गोष्टी नव्याने प्रकाशात येऊ लागतात. पुढचा टप्पा येतो तो १५ व्या शतकात पेरूमधल्या इन्का समाजाने वसवलेल्या माचू पिचू या वसाहतीच्या अवशेषांना ही जोडगोळी भेट देते तेव्हा. इन्का समाजाने वास्तुकलेप्रमाणेच इतरही शास्त्रात प्रगती केली होती, पण बंदुकधारी स्पॅनिअर्ड्सशी ते लढणं शक्य नव्हतं याची जाणीव गेवाराला या ठिकाणी होते, आणि कोणत्याही प्रकारचा उठाव हा शस्त्राशिवाय शक्य नाही, हे त्याच्या लक्षात येतं.

तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा घडतो तो पेरुमधल्याच कुष्ठरोग वसाहतीत, जिथे वसाहतीच्या मधून वहाणाऱ्या नदीनेच स्टाफ आणि आजार विकोपाला गेलेले रोगी यांना एकमेकांपासून दूर ठेवलेलं असतं. हे विभाजन झिडकारत गेवारा आणि ग्रानाडो संसर्ग टाळण्यासाठी हातमोजे घालणंही नाकारतात आणि मोकळेपणाने या लोकांमधे सामील होतात. या चढत्या टप्प्यांचा परमोच्च बिंदू ठरतं, ते वसाहतीतच गेवाराने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीमधे  केलेलं भाषण. छोटंसं असलं, तरी आपलं पहिलं राजकीय भाष्य, तो या भाषणात करतो. दक्षिण अमेरिकन समाज हा एकच आहे, आणि त्याचे तुकडे करुन त्यावर राज्य केलं जातय ही त्याच्या मनातली भावना इथे स्पष्ट होते, आणि रेस्ट, अॅज दे से, इज हिस्टरी.

चित्रपटाचा गाभा गंभीर असला आणि त्यात पाणी घालण्याचा प्रयत्न नसला, तरी गेवाराच्या मित्राची व्यक्तिरेखा चित्रपटाला बरचसं हलकंफुलकं ठेवते. त्यामुळे आपण त्याच्याकडे डाॅक्युमेन्टेशन सारखं न पहाता एक चित्रपट म्हणून पाहू शकतो.

आॅर्सन वेल्सने म्हंटलय, की ,' इफ यू वाॅन्ट ए हॅपी एंडींग, दॅट डिपेन्ड्स, आॅफ कोर्स, आॅन व्हेअर यू स्टाॅप द स्टोरी.' प्रत्यक्षातला गेवाराचा शेवट  सुखांत नाही. क्युबा सोडल्यावर दक्षिण अमेरिकेत क्रांती घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या गेवाराला सीआयएच्या सल्ल्यानुसार चालणाऱ्या बोलिविअन सैन्याने पकडलं आणि वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षीच त्याची हत्या केली गेली. द मोटरसायकल डायरीजचा शेवट मात्र सुखांत आहेच आणि खरं तर तो गेवाराची खरी गोष्ट सुरु होण्याच्याही आधी येणारा आहे. तरीही, तो जिथे आहे तिथे येण्याने आपण या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा अर्थ लावू शकतो, त्याच्यापासून प्रेरणा घेऊ शकतो. तरुणांमधे दडलेल्या क्रांतीची बीजं इथे दिसतात, आणि गेवारामधली काय किंवा कॅस्ट्रोमधली काय, शेवटी ही बीजच महत्वाची , नाही का?
- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP