लवक्राफ्टीअन साहस - तुंबाड

>> Sunday, October 14, 2018


तुंबाड पहावा का, याचं उत्तर एका शब्दात देण्यासारखं आहे, आणि ते म्हणजेहो’. त्यापलीकडे काही मुद्द्यांची चर्चा होण्यासारखी आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट सांगून टाकायची तर श्री ना पेंडसेंच्या तुंबाडचे खोतशी तुंबाडचा काहीही संबंध नाही. हे नाव सरळ दिशाभूलही करणारं आहे, आणि पुढेमागे कोणाला त्यावर सिनेमा, मालिका करायची असेल, तर त्यावेळी ते वापरता येणार नाही. त्यामुळे अन्यायकारकही. या चित्रपटाला या नावाची काय गरज होती ? जागेचं नाव घेणं ठीक, पण याच वजनाचं दुसरं एखादं नाव नसतं घेता आलं ? असो. 

तुंबाड ही लवक्राफ्टीअन हाॅरर फिल्म आहे. आता लवक्राफ्टीअन म्हणजे काय, तर लवक्राफ्टच्या कथांवर थेट आधारीत नव्हे, तर लवक्राफ्ट भयाला ज्या पद्धतीने वापरतो, तसं वापरणारी. भूतं , झपाटलेल्या जागा, यांचा साहित्यातला, चित्रपटातला वापर आपल्याला तसा परिचीत असतो. पण आपल्या कळण्यापलीकडलं काही जेव्हा कथांमधे उतरतं, जेव्हा त्यातल्या शक्तींचा, दैवतांचा थांग हा आपल्याला समजण्यापलीकडचा असतो, तेव्हा या कथा लवक्राफ्टीअन म्हंटल्या जातात. प्रत्यक्षातहस्तरहे दैवताचं नावदेखील मुळात लवक्राफ्टने लोकप्रिय केलेल्या भयकारी दैवताचं आहे, हा आणखी एक परिचित संदर्भ.

प्रत्यक्षात तुंबाड हा धारपांच्या कथांवर आहे असं म्हंटलय, स्वतः दिग्दर्शक राही बर्वेनेही ते मान्य केलय, पण आधारीत म्हणजे नक्की काय आणि कितपत ? एका मुलाखतीत राही बर्वेने म्हंटल्याचं ऐकलं, की पहिला अर्धा तासच धारपांच्या कथेवर आधारीत आहे. ही कथाही त्याला कोणा मित्राने सांगितली ( आणि प्रत्यक्ष वाचल्यावर ती कशी वाईट होती हे त्याच्या लक्षात आलं , असा उल्लेखही तुंबाडच्या विकिपिडीआ पेजवर सापडेल. ही कथा वापरलेल्या दोन कथांमधली कोणती याचा स्पष्ट उल्लेख नाही पण तेही बहुधा पहिल्याच कथेबद्दल असावं ) वगैरे तपशील आपण ऐकले आहेत, त्यामुळे नक्की आधारीत काय आणि स्वतंत्र किती, हा एक प्रश्नही पडू शकतो. मला विचाराल, तर तुंबाडचा सुमारे दोन तृतीयांश भाग हा आधारीत आहे. प्रामुख्याने दोन कथांवर. यातली पहिली आहे स्टीवन किंगची ग्रॅम्मा ( जी हस्तरच्या संदर्भासह पूर्ण आहे ) जी धारपांनी आजी म्हणून रुपांतरीत केली होती. हा भाग चित्रपटाच्या सुरुवातीला येतो, ज्यात लहान विनायक आपल्या रहस्यमय आजीच्या संपर्कात येतो. तुंबाडच्या वाड्यात काहीतरी मोठा खजिना आहे ( हा उल्लेख ट्रेलरमधेच आहे ) आणि तो आपल्याला कसा मिळवता येईल याची चिंता विनायकला पडली आहे. धारपांची दुसरी कथा बळी, ही पुढे मध्यंतरानंतरच्या काही भागापर्यंत चालते. राही बर्वेने या दोन कथा एकत्र सांधून त्यांना पुढे वाढवलं आहे

हे कथांना एकत्र आणणं कसं जमलय असं विचारलं, तर मला ते बरच चांगलं जमलय असं वाटलं. प्रत्यक्षात या कथा सुट्या वाचल्या, तर आपण त्या या प्रकारे जोडता येतील याची कल्पना करु शकणार नाही. आता हे करताना गोंधळदेखील आहेत. सर्वात प्रमुख म्हणजे विनायकच्या पूर्वजांनी हस्तरला जागवलं हे आपण समजू शकतो, पण तो ज्या स्थानी, ज्या रुपात आहे, याबद्दल चित्रपट पुरेसं स्पष्टीकरण देत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला वाड्यात रहाणाऱ्यासरकारला खजिन्याबद्दल माहिती कशी नाही, याचंही स्पष्टीकरण नाही. चित्रपटाच्या शेवटाकडेही अशी स्पष्टीकरणं नसलेल्या जागा आहेत. तरीही काही गोष्टी आपल्या कळण्यापलीकडच्या आहेत असं लवक्राफ्टीअन लाॅजिक लावलं, तर आपण हा भाग सोडून देऊनही चित्रपटाच्या चौकटीत जे घडतय त्यात गुंतू शकतो. त्यामानाने पुण्यात घडणारा भागच अधिक विस्कळीत आहे

पण मांडणीच्या पलीकडे जाणाराही एक प्रश्न आहे जो भयकथांची रुपांतरं यशस्वी असण्यानसण्याशी जोडलेला आहे. स्टीवन किंगने आपल्या डान्स मकाब ( Danse Macabre ) या पुस्तकात त्याची विस्ताराने चर्चा केली आहे. कथांमधेही हा प्रश्न आहेच पण चित्रपटात तो अधिक सतावतो, आणि तो म्हणजे आपल्या कल्पनेतली भीती आणि तिचं दृश्यरुप यांमधला ताळमेळ. १९७९ मधे किंगने ऐकलेल्या एका भाषणात लेखक/पटकथाकार विलिअम नोलनने म्हंटलेल्यानथिंग इज सो फ्रायटनिंग ॲज व्हाॅट्स बिहाइंड क्लोज्ड डोअर’ या वाक्याच्या आधारे केलेली ही चर्चा आहे. एखाद्या बंद दारापलीकडे काही भयानक आहे असं प्रेक्षकाला सांगितलं की ते काय असेल याची प्रतिमा प्रेक्षक स्वत:च्या मनातच तयार करतो, जी फार भयावह असते. पण एकदा का दार उघडून पलीकडे काय आहे हे दाखवलं, की आधी वाटलेल्या भीतीच्या तुलनेने प्रेक्षकाला प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट फिकी वाटायला लागते. दहा फूटी राक्षस असेल तर प्रेक्षक म्हणतो, हॅ, आम्ही तर शंभर फूटी इमॅजिन करत होतो. सिनेमाचा प्राॅब्लेम हा असतो, की त्यात दार हे कधीनाकधी उघडावच लागतं. गंमत म्हणजे, या नियमाला अपवाद असं उदाहरण म्हणून किंगने वापरलय ते हाॅन्टींग ऑफ हिल हाऊस’, या शर्ली जॅक्सनच्या कादंबरीचं राॅबर्ट वाईजने केलेलं रुपांतर, जिचं नवं रुपांतर तुंबाडबरोबरच ( पण नेटफ्लिक्सवर आणि मालिकारुपात ) रिलीज झालय. वाईज आपल्या हाॅन्टींगमधे हे दार उघडतच नाही. म्हणजे प्रेक्षकांना प्रत्यक्ष भूत दिसूच देत नाही. तुंबाडचा प्राॅब्लेम हा, की तो दार फार लवकर उघडतो. मध्यंतरानंतर लगेचच. आधी केलेल्या वातावरणनिर्मीतीच्या तुलनेत दिसणारं अस्तित्व हे खरं सागायचं तर मला फार ग्रेट वाटलं नाही. पण प्राॅब्लेम हा रुपापलीकडचा आहे. एकदा ते काय आहे आणि काय करतं हे स्पष्ट झालं की या प्रकारच्या भयाला आवश्यक ती संदिग्धता निघून जाते, आणि मग नायक आणि खलनायक असा ऑब्विअस झगडा तयार होतो. आता हे द्वंद्व डोक्याइतकच शारीरही असल्याने पुढल्या भागात चित्रपट साहसपटासारखा वाटायला लागतो.

तरीही तुंबाडमधली चांगली बाब ही, की त्याच्या भयपट म्हणून यशापयशाचा, सिनेमा म्हणून असलेल्या यशापयशाशी काही संबंध नाही

राही बर्वेनेहावया मूलभूत प्रेरणेचा चित्रपटाला सबटेक्स्ट देताना सतत वापर केलेला आहे. आशयाची दिशा कळावी, म्हणून सुरुवातीलाच महात्मा गांधींचं एक उधृत येतं, आणि पुढे कथेतही आपण नकळत हा विचार लक्षात घेत रहातो. विनायकच्या वागण्यातून हाव थेटपणे दिसते. पण हस्तरची बॅकस्टोरी हीदेखील याबद्लच आहे. चित्रपटातला आणखी एक महत्वाचा धागा म्हणजे घराण्यांमधून वंशपरंपरागत पसरणारी कीड. एका कुटुंबाच्या विनाशात त्यातल्या व्यक्तींच्या स्वभावधर्मात असलेल्या विपरीत प्रवृत्तीचं कारणीभूत होणं. हे दोन्ही धागे धारपांच्या कथांमधेही आहेत, पण दिग्दर्शकाने रचलेल्या पुढल्या भागात ते अधिक टोकाला जातात. व्यक्तीश: मला चित्रपटाचा शेवट हा प्रतिकात्मक दृष्टीकोनातून अधिक प्रभावी वाटला, पण प्रत्यक्ष आशयाच्या पातळीवर फारसा पटला नाही. तुम्हालाही जर शेवटाबाबत असमाधान वाटत असेल तर प्रत्यक्ष कथानक आणि सबटेक्स्ट यांचा स्वतंत्रपणे विचार करुन बघा

चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं श्रेय राही अनिल बर्वे आणि आनंद गांधी या दोघांना दिलेलं दिसतं, पण त्याचा पाया आणि सुरुवातीचं बरच काम राही बर्वेचं आहे. त्याच्या डोळ्यासमोर असलेलाच हा चित्रपट आहे, हे त्याने फेसबुकवर टाकलेल्या स्टोरीबोर्डच्या पानांमधून स्पष्ट आहे. काही महत्वाच्या जागी पुनर्लेखन, आणि पुनर्चित्रीकरणासाठी आनंद गांधीची मदत झाली असं ऐकलय. या दोघांबरोबरच चित्रपटाच्या यशातले इतर दोन महत्वाचे भागीदार म्हणजे सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार, आणि अभिनेता /निर्माता सोहम शाह. तुंबाड हा चित्रीकरणात अतिशय प्रभावी आहे आणि त्यातला फ्रेमिंगचा, काॅम्पोझिशन्सचा विचार त्याच्या एकूण परिणामात भर घालणारा आहे. या चित्रणशैलीशिवाय चित्रपटाची कल्पना करणंही अशक्य आहे. सोहम शाह हा शिप ऑफ थिसीअस साठी लक्षात असलेला अभिनेता, तिथेही तो सहनिर्माता होता. इथे ओळखीचा एखादा नायक घेता त्यानेच विनायकचं काम करणं हे चित्रपटाच्या फायद्याचं आहे. विनायकची भूमिका कठीण आहे कारण ती अनअपाॅलोजेटिकली ग्रे आहे. विनायकचा तो चांगला असल्याचा दावा नाही, त्याच्या वागण्यातून तो कसा माणूस आहे हे स्पष्टच आहे, पण तरीही प्रेक्षकांना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटणं आवश्यक आहे. तोच चित्रपटाचा नायक आहे. त्याच्या साऱ्या गुणावगुणांसह. गांधी, कुमार आणि शाह, ही तिन्ही नावं या आधीशिप ऑफ थिसीअसचित्रपटाने गाजलेली. आता तुंबाडमधल्या सहभागाने त्यांनी आपली वेगळेपणाची आवड पुन्हा एकदा दाखवून दिली आहे

तुंबाडबद्दल दोन गोष्टी बोलल्या गेलेल्या मी ऐकल्या आहेत. एक तर हा जगातल्या उत्तम भयपटांमधला एक आहे आणि दुसरी म्हणजे त्याच्या अनेक वर्ष चाललेल्या निर्मितीची कहाणी. यातली पहिली का म्हणावी लागते हे मला कळत नाही आणि दुसरीचा प्रेक्षकांच्या चित्रपटआकलनाशी तसा संबंध नाही.

तुंबाड पहाण्यासारखा आहे का ? आहे. तो जगभरच्या प्रेक्षकांनी पहावा का ? जरुर. पण भयपट म्हणून तो खूप प्रभावी आहे असं मी म्हणणार नाही. आणि त्याची घाई काय आहे ? आपल्याकडे आत्ता आत्ता चांगल्या निर्मितीला सुरुवात होते आहे. राही बर्वेचीही प्रथम फीचर फिल्म आहे. आणखी अपेक्षा आहेतच. त्या पुऱ्याही होतील

-

ganesh matkari


11 comments:

Vishal Ranadive October 15, 2018 at 1:02 AM  

१) 'विनायक' आणि 'सदाशिव' हे वाड्यात राहण्याऱ्या म्हाताऱ्या 'सरकार' ची अनैतिक मुलं असून त्यांच्या घरात राहणारी म्हातारी ही त्या म्हाताऱ्या सरकारची आई आणि त्या मुलांची आजी आहे.
२) म्हातारीला 'हस्तर' झपाटल्याने, देवीच्या गर्भातील सोने काढण्याची पद्धत त्या म्हाताऱ्या सरकारला कळली नाही आणि त्या मुळे त्याला खजिना कधीच मिळाला नाही.

Ashish October 15, 2018 at 9:19 PM  

Correct.. if the movie over explains itself then I don't feel the excitement of finding the missing pieces of the puzzle.

म्हातारीला असेही वाटत असावे की तिच्याबरोबरचा तो शाप आणखी पुढे जाऊ नये. सरकारला रहस्य न सांगण्यामागे तिची मातृभावना असू शकते. पण विनायकाच्या हट्टापुढे आणि तिच्या अगतिक अवस्थेला कंटाळून ती मृत्यू मागते आणि त्याबदल्यात विनायक तुच्याकडून रहस्य मागतो.

आपण हे संदर्भ लावू शकतो.चित्रपटात न सांगितलेले संदर्भ लावायचे का नाही यावर एकदा आधी गणेश मतकरी यांच्याशी संवाद झाला होता.माझ्या मतांशी मतकरी पूर्णतः सहमत नव्हते असे आठवते.

ganesh October 16, 2018 at 6:43 AM  

विशाल- म्हातारी, सरकार आणि विनायक यांमधे काय नातं आहे ते उघड आहे. पण त्यामुळे सरकारला खजिना का कळू नये याला लाॅजिक नाही. कारण खजिन्याचं स्पेसिफिक रहस्य म्हातारीच विनायकला सांगते. तिच्याकडून सरकार ते का काढू शकणार नाही ?

दुसरी एक थिअरी अशी, की सरकारला ते माहीत आहे पण तो ते विनायकच्या आईला सांगत नाही. तो आता सोनं अॅक्सेस करु शकत नाही ते वयामुळे, पण पूर्वी करत असावा. मला तेही फार पटत नाही कारण सोनं मिळणारच नसेल तर त्यापेक्षा ते मिळावं म्हणून तो ठेवलेल्या तरुण स्त्रीला वा तिच्या मुलांना वापरणार नाही ?

Vishubhau October 17, 2018 at 1:17 AM  

हो माहीत असण्याची शक्यता आहे... कारण त्याचा डायलॉग आहे 'सोना कमाना पडेगा'

Ranjeet Paradkar October 17, 2018 at 1:17 AM  

रामगोपाल वर्माचा एक 'अज्ञात' नावाचा सिनेमा येऊन अज्ञातवासात गेला होता. त्या सिनेमातही - आपण उल्लेख केल्याप्रमाणे - 'बंद असलेलं दार' शेवटपर्यंत उघडतच नाही. वाटणारी अनामिक भीती, ही शेवटपर्यंत अनामिकच राहते.
जेव्हा 'अज्ञात' पाहिला होता तेव्हा हे काही मला झेपलंच नाही. आत्ता आपण सांगितलेलं 'बंद दरवाज्यामागची भीती' हे तत्व समजल्यावर त्यातली गंमत लक्षात आली.
धन्यवाद !

Vishubhau October 17, 2018 at 1:19 AM  

पुस्तक वाचताना आपण बऱ्याच वेळी रिडींग बिटविन द लाईन्स करतो आणि त्याच मुळे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं!
काही वेळेला असे चित्रपट असतील तर 'व्हीवस् बिटविन द सीन्स' करू शकतो आपण !

kaustubh October 18, 2018 at 10:27 PM  

Ek chan prayog Indian flim madhe succrsucce jhala without big production ...It is good
Project kahi kala purvi development hell madhe asun tya cha film war parinam na aanta ..
Merits throgh cam work story board and background score rain atmosphere ne film chan banavli it's make specific an impact on some aspects which is new to current Indian film making culture thank you for sharing blog i also search a lot of Dharap sir stories reference

arti October 29, 2018 at 5:06 AM  

Hi, i would like to read your take on andhadhun

Unknown October 29, 2019 at 10:42 AM  

एक वर्षाने कमेंट टाकत आहे...थोडी irrelevant वाटेल

१. मला असे वाटते की विनायक च्या आजीला बहुदा एकच व एकदाच नाण मिळालं असावं आणि त्या खटपटीत तिला बहुतेक हस्तरने तिला मारायचा प्रयत्न केला असावा आणि त्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे.
त्यामुळे तिला कुणी विचारायचा प्रयत्नच केला नसावा.
(कारण सरकारच्या बंद खोलीत लोखंडी बारच्या पाठीमागे बहुदा हस्तरच्य मूर्ती जवळ एकच कॉइन ठेवलेले दाखवले आहे जे तिने कमवले आहे.)
२. बंद दरवाजा पाठीमागचा भूत - आजी नसून, हस्तर आहे असे वाटते.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP