‘भाई’ : पडद्यावरला की मनातला

>> Saturday, February 9, 2019





मला आठवतय तेव्हापासून मी पुल वाचलेलेच होते. त्यामुळे ते नक्की कोणत्या वयात वाचायला सुरुवात केली याचा पत्ताच नाही. बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली , पुल एक साठवण मधले अनेक लेख, खोगीर भरती, यांची सतत पारायणं सुरु असायची. त्यांच्या पुस्तकातली बरीचशी माझ्या किंवा माझ्या आजोबांच्या (माधव मनोहरांच्या ) घरी होतीच, पण काही वेळा वाचनालयातून आणलेलीही आठवतात.या सगळ्यामधून पुलंशी छान मैत्री झाली. त्यांच्या कथाकथनाच्या ( त्यांनी फार कथात्म साहित्य लिहिलेलं नाही पण यापेक्षा वेगळा शब्द काय वापरणार?) कसेट्स ऐकल्या होत्या, टिव्हीवरही ते पाहिलेलं होतं.   बाबांनी पुलंच्याव्यक्ती आणि वल्लीतसचअसा मी असामीयांचं नाट्यरुपांतर केलं होतं. त्या निमित्ताने एका नव्या रुपात पुल भेटले

मी पुलंना विनोदी लेखक समजत नाही. मी त्यांना एक उत्तम लेखक समजतो ज्यांना विनोदाची फार चांगली जाण आहे. त्यांचं विनोदी साहित्य अधिक लोकप्रिय आहेपण  त्यांचेएक शून्य मीसारख्या संग्रहातले गंभीर लेख, यशस्वी व्यावसायिक नाटकांसोबत त्यांनी केलेलंएक झुंज वाऱ्याशीसारखं गंभीर नाट्यरुपांतर, हे तर आहेच, पण चाळ किंवा व्यक्तीसारख्या वरवर विनोदी वाटणाऱ्या लेखनातही आपल्याला गंभीर सबटेक्स्ट दिसतो. त्यांच्या लिहिण्यातून आणखीही एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे त्यांचं परफाॅर्मर असणं. त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनात संवादाला महत्व आहे. ते चिंतन करण्यापेक्षा समोरच्याला काही सांगतायत असं त्यातून नेहमी जाणवतं. कधी हे खोखो हसवणारे विनोद असतात, कधी सल्ला, तर कधी तत्वज्ञान. पण ते लिहिताना त्यांनी ते आपल्यासाठीच लिहिलय, आणि व्यक्तीश: आपल्याला सांगितलं जातय असं वाटत रहातं

पुलंना मी प्रत्यक्ष भेटलेलो नाही. मी एकदा त्यांना पाहिलय. आमच्या बालनाट्यने एनसीपीएला सादर केलेल्याढग ढगोजीचा पाणी प्रतापया नाट्यप्रयोगाला ते हजर होते. यात माझी एक छोटीशी भूमिका होती आणि स्टेजवरुन त्यांना प्रेक्षकात बसलेलं पाहिलं. मध्यंतरातही पाहिलं. पण माझी काही त्यांच्या समोर जाऊन ओळख करुन घेण्याची हिंमत झाली नाही. ही ओळख आत्ता झाली. भाई - व्यक्ती की वल्ली या दोन भागातल्या चित्रपटाची पटकथा लिहिताना

बायोपिक किंवा चरीत्रपट हा प्रकार करायला नक्कीच सोपा नाही. त्यात अनेक मुद्दे आहेत. यातला प्रमुख मुद्दा म्हणजे अपेक्षित प्रेक्षकाच्या डोळ्यासमोर आधीपासून असणारी एखाद्या व्यक्तीची प्रतिमा, आणि दिग्दर्शकाने पडद्यावर आणलेली ती व्यक्ती यांमधला ताळमेळ. हा जर बसला, तर चरीत्रपट प्रेक्षकाला अत्युच्च आनंद देऊ शकतो, पण जर का बसला नाही, तर प्रेक्षक वैतागण्याची शक्यता असते. दुसरा मुद्दा म्हणजे बायोपिकसाठी निवडलेला फाॅर्म. चरीत्रपट अमुकच पद्धतीचा असावा असं सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या डोळ्यापुढे असतं, पण अमुक एका म्हणजे कोणत्या ? काही चरीत्रपट हे चरीत्रनायकाच्या आयुष्यातला विशिष्ट कालावधी निवडतात, काही विशिष्ट  पैलू निवडतात, काही व्यक्तीच्या कार्याला महत्व देतात तर काही वैयक्तिक आयुष्याला. ‘गांधीहा भारतीय प्रेक्षकासाठी आयडीअल चरीत्रपट कायमच राहील पण त्याचवेळीमेकींग ऑफ महात्मामधे श्याम बेनेगलांनी गांधीजींच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांवर लक्ष केंद्रीत केलं होतं हे आपण विसरु शकत नाही. या वेगळेपणाचं एक टोकाचं उदाहरण म्हणजे टाॅड हाईन्स दिग्दर्शित बाॅब डिलन या गायक संगीतकारावर आधारीतआय नाॅट देअर’. यात प्रत्यक्ष डिलन येतो शेवटाकडे, पण त्याआधी सहा वेगळ्या व्यक्तिरेखांमधून तुकड्यातुकड्यात डिलनचं व्यक्तीमत्व, त्याच्यावरचे प्रभाव, त्याचा दृष्टीकोन, त्याच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटना, हे मांडलं जातं, आणि त्यातूनच या चरित्रनायकाचं दर्शन आपल्याला होतं. चित्रपटातून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीचा पल्ला जर मोठा असेल, तर त्यातला अर्थ शाबूत ठेवत काही गोष्टी बदलणं आवश्यक असतं. कधी संकल्पना आणि मांडणीचा विचार करत घटनांचा काळ मागेपुढे सरकवावा लागतो, कधी काही व्यक्तीरेखा गाळाव्या लागतात तर कधी एकाच प्रकारच्या काही व्यक्तीरेखांमधून एक प्रातिनिधिक व्यक्तीरेखा उभी करावी लागते. महत्व कशाला आहे, तर ते चरित्रनायकाचं व्यक्तीमत्व आपल्यापर्यंत पोचण्याला. हे लक्षात घ्यायला हवं, की अखेर बायोपिक हादेखील चित्रपट आहे आणि त्यात चरीत्राची नाट्यमय मांडणी असणार. अन्यथा तो माहितीपट झाला असता

बायोपिक करण्याचा कोणता मार्ग योग्य , तर असं काही नाही. कोणताही मार्ग योग्य असू शकतो, जर तो दिग्दर्शकाला जे सांगायचय त्याच्याशी सुसंगत असेल. मग भाई - व्यक्ती की वल्ली बाबत असा प्रश्न उभा रहातो की त्यात दिग्दर्शक महेश मांजरेकरांना काय मांडायचय आणि त्यासाठी निवडलेला फाॅर्म योग्य मानावा की नाही ?

पु देशपांडे, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, हे आपलं दैवतच आहे. त्यांचे चाहते प्रचंड प्रमाणात. त्यांनी काम केलेली क्षेत्र अनेक. ते स्वत: परफाॅर्मर असल्याने त्यांचा चेहरा पूर्ण महाराष्ट्राला परिचित. त्यामुळे त्यांच्यावर चरित्रपट काढायचा म्हणजे अवघड काम. हा चरित्रपट कोणत्याही मार्गाने करता येऊ शकला असता. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या काळात काम केलं. यात फारसा ओव्हरलॅप नाही. चित्रपट करत असताना त्यांची प्रसिद्ध नाटकं आलेली नव्हती, नाटकांच्या वेळी चित्रपटातून निवृत्त झाले होते, इतर बाबतीतही असंच साधारण. यातलीच एखादी फेज घेऊन चित्रपट करता आला असता. किंवाआहे मनोहर तरीच्या मार्गाने जात केवळ सुनीताबाईंच्या दृष्टीकोनातून हे चित्रण  करता आलं असतं, किंवा साहित्यिक म्हणून त्यांची जडणघडण कशी होत गेली हा एक फोकस असू शकला असता. इतरही अनेक मार्ग होते. मी मांजरेकरांबरोबर या विषयावर पहिल्यांदा बोललो, तेव्हा मला लक्षात आलं की पुलंच्या व्यक्तिमत्वाचे, कामाचे विविध पैलू आणि त्यांच्यापेक्षा वेगळं व्यक्तिमत्व असणाऱ्या सुनिताबाईंबरोबरचा त्यांचा सहप्रवास, या दोन गोष्टी त्यांना दिग्दर्शक म्हणून प्रामुख्याने दिसत होत्या. त्यातले काही प्रसंग त्यांच्या डोळ्यांसमोरही होते, आणि ते कशा रितीने दृश्यात साकार करण्यात यावे याबद्दलही त्यांचा एक निश्चित विचार होता. दिग्दर्शकाला स्वच्छ दिसत असलं, की पटकथाकाराचं काम सोपं होतं. अर्थात, इथे व्यक्तीमत्व उत्तुंग असल्याने, त्यांनी आत्मचरीत्र लिहिल्याने, आणि आम्ही काम करत होतो तेव्हा चरीत्रही उपलब्ध नसल्याने ते सारं  डोळ्यासमोर आणणं, त्यातले प्रसंग निवडणं हे कठीण होतं

या दिवसात मी आणि चित्रपटाचा क्रिएटीव प्रोड्यूसर अमोल परचुरे यांनी खूप पुस्तकं मिळवली आणि वाचून काढली. त्यांनी लिहिलेलं, तसच त्यांच्यावर लिहिलेलं. यातलं काही आम्ही वाचलेलं होतं, तर काही नवीन होतं. देशपांडे आणि मंगलाताई गोडबोले यांनी लिहिलेला/ संपादित केलेला अमृतसिद्धी हा दोन खंडांचा ग्रंथ, पुलंची भाषणा-श्रुतीकांची पुस्तकं, त्यांच्या पश्चात प्रकाशित झालेलं काही साहित्य, त्यांच्यावरल्या लेखांचे संग्रह, असं बरच काही यात होतं. यातून निवड करताना दिग्दर्शकाची मूळ दृष्टी हा महत्वाचा घटक होता. इथे भाईंचं दैवतीकरण आम्हाला अपेक्षित नव्हतं, तर हा माणूस कसा होता, यात आम्हाला रस होता.

पटकथेवर काम करताना आणखीही एक कल्पना पुढे आली, की जरी आपण त्यांच्या साहित्यावर किंवा साहित्यिक म्हणून जडणघडणीवर चित्रपट करत नसलो, तरी त्यांचं साहित्य हे भवतालाच्या टोकदार निरीक्षणातून घडत गेलं, हा मुद्दा त्यांच्या कामासंबंधातला आणि व्यक्तीमत्वासंबंधातलाही महत्वाचा मुद्दा आहे, मग तो समोर आणण्यासाठी काय करता येईल ? कथा आणि कादंबरी हे दोन साहित्यप्रकार पुलंनी रुढार्थाने हाताळले नाहीत. ( साहित्याबद्द्लच्या बदलत्या व्याख्यांमधून आपण असं म्हणू शकू की बटाट्याची चाळ किंवा असा मी असामी या विशिष्ट व्यक्तीसंचाभोवती फिरणाऱ्या मालिका या त्यांच्या कादंबऱ्याच आहेत, पण तो चर्चेचा विषय झाला. ) पण इतर अनेक साहित्यप्रकारात त्यांनी लिहिलं . व्यक्तीचित्र हा त्यातला लोकप्रिय फाॅर्म, आणि त्यातही प्रत्यक्ष व्यक्तींऐवजी नमुने, किंवा कॅरॅक्टर टाईप्स वापरुन लिहिलेलंव्यक्ती आणि वल्लीहे पुलंचं अतिशय लोकप्रिय पुस्तक. मग या व्यक्तीरेखा त्यांना वेळोवेळी भेटतात असं दाखवून, पुढे या भेटी त्यांच्या लिखाणात उतरल्या असं का सूचित करु नये ! अर्थात, ‘गणगोतकिंवामैत्रसारख्या इतर व्यक्तिचित्रांच्या पुस्तकांसारख्या या व्यक्तीरेखा जशाच्या तशा अस्तित्वात नव्हत्या हे तर खरच आहे. खऱ्या भेटलेल्या अमुक व्यक्तीवरुन अमुक व्यक्तीरेखा आकाराला आली असं सुचवता यावं म्हणून चित्रपटातल्या व्यक्तीरेखांची नावं वेगळी ठेवली. ‘निरिक्षणातून लिखाणहे मांडता येण्याबरोबर आणखीही एक हेतू हे करण्याला होता, तो म्हणजे पुलंच्या साहित्याची एक झलक या निमित्ताने चित्रपटात असावी, जी अदरवाईज आली नसती

आता प्रश्न होता, तो मूळ आकृतिबंधाचा. दोन परस्पर भिन्न पण अतिशय सर्जनशील व्यक्तिमत्वांचा एकमेकांच्या साक्षीने आणि मदतीने झालेला सहप्रवास , आणि त्याला असलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक पार्श्वभूमी, हा चित्रपटाचा फोकस होता. या पलीकडे जाणारी एक गोष्ट चित्रपटात आहे, आणि ती म्हणजे भाई आणि सुनीताबाई भेटण्याआधीचं भाईंचं आयुष्य. हे दाखवणं का आवश्यक वाटलं, तर पुलंचा सुनीताबाईं भेटल्यानंतरचा प्रवास हा बराचसा सुकर आणि चढता होता. त्या आधी मात्र त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी कोणीही सामान्य माणूस खचून जाईल या प्रकारच्या होत्या. वडिलांचा मृत्यू, मिळवतं होण्याआधी पडलेली कुटुंबाची जबाबदारी, अतिशय अल्पकाळ टिकलेलं पहिलं लग्न, संघर्षाचा काळ. यातून कुठेही हार मानता पुल सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुढे जात राहिले. हा भाग दाखवणं आम्हाला महत्वाचं वाटलं, जो पुलंच्या आयुष्यातल्या नवे मार्ग शोधण्याच्या , सतत काही करत रहाण्याच्या स्वभावधर्माशी सुसंगत वाटला. पण तरीही चित्रपटाचा मूळ गाभा काय आहे हे प्रेक्षकाला सहज कळावं म्हणून चित्रपटाची सुरुवात मात्र करायचं ठरलं, ते सुनीताबाईंपासून, भाईंच्या इस्पितळातल्या दिवसात

बाकीचा पूर्ण चित्रपट, म्हणजे त्याचे दोन्ही भाग, हे इस्पितळ आणि पुलं - सुनिताबाईंचा सहप्रवास यावर केंद्रीत होतात. हे दाखवताना आम्ही असं सहज करु शकलो असतो, की प्रसंग या दोन पात्रांपुरतेच मर्यादीत ठेवायचे आणि त्यांच्या जवळची अनेक माणसं ही केवळ उल्लेखात आणायची. कदाचित हा चित्रपट नसून नाटक असतं, तर ते केलंही असतं, पण चित्रपटात तुम्ही ज्या गोष्टी दाखवणं शक्य आहे त्या दाखवाव्यात. आता हे करताना आम्ही पुलंच्या आयुष्यातली दर व्यक्ती घेऊ शकलो असतो का, तर अशक्यच. त्याने नुसती यादी समोर आली असती. यावर शक्य ( आणि बायोपिक्समधे वापरला जात असलेला ) उपाय म्हणजे निवड. जशी प्रसंगांची, तशी व्यक्तींची. जर प्रत्यक्षात दोनशे व्यक्तीरेखा असतील, तर त्यातल्या पंचवीस तरी दाखवाव्यात ज्यातून तो काळ, भाईंचा गोतावळा , त्यांचे अनेकांशी असलेले मैत्रीचे संबंध दाखवता येतील. यातल्या अनेक व्यक्ती एक दोन प्रसंगापुरत्या येऊन जातात , आणि त्या व्यक्तीही अशा ताकदीच्या , की त्यांच्यावर स्वतंत्र चरित्रपट सहज बनू शकतील. यांना दाखवणं टाळता येईल का, तर का नाही, पण टाळल्या, तर तो काळ, ते वातावरण निश्चितच उभं रहाणार नाही

हे जसं संपर्कातल्या व्यक्तींबाबत, तसच जवळच्या मित्रांबाबातही. पुलंचे अगदी पूर्वीपासून असलेले आणि कायम राहिलेले तीनचार मित्र होते. हे सगळे दाखवणं  शक्यच नाही, कारण मग तो चित्रपट राहता रिसर्च पेपर होईल. आम्ही त्यासाठी निवडली ती वसंतराव देशपांडेंची व्यक्तीरेखा जी पुलंना विशेष जवळची होती. चित्रपटावर केलेली एक गंमतीदार टिका मी  ऐकली, की पुलंचं लग्न झालं तेव्हा वसंतराव तिथे नव्हते, तरी ते दाखवणं हा जणू चित्रपटाचा गुन्हा झाला. आता वसंतराव लग्नाला नसणं हा संदर्भ अनेक ठिकाणी आहे, आणि चित्रपट बनवणाऱ्यांना तो माहीत नसेल असा अंदाज करणं हे थोर विद्वत्तेचच लक्षण. पण नसतानाही वसंतराव तिथे का दाखवले असतील असा विचार केला तर उत्तर अतिशय सोपं आहे. चित्रपटाचा भर भाई - सुनीताबाई या दोन व्यक्तीरेखांवर असल्याने इतर व्यक्ती कमी प्रसंगांमधे असणार. मग जर वसंतरावांना सहज, नैसर्गिकपणे काही प्रसंगात दाखवता आलं आणि त्यातून त्यांची मैत्री उभी करता आली तर हे गैर कशामुळे ठरतं ? हे मान्यच की जर हे सांस्कृतिक इतिहासाचं पुस्तक असतं, तर तिथे या प्रकारचं स्वातंत्र्य घेता येणार नाही, पण पुलं आणि वसंतराव यांची मैत्री हे जर चित्रपटाचं सत्य असेल तर त्या परीघात वसंतराव उपस्थित दाखवणं ग्राह्य का मानता का येऊ नये? टिम बर्टनने अत्यंत सुमार चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक एड वुड , याच्यावर एक त्याच्याच नावाची बायोपिक केली आहे. यात एका प्रसंगात वुड ऑर्सन वेल्सला भेटतो. वेल्स हा सर्वोच्च दिग्दर्शकांपैकी एक असूनही बाहेर फेकला गेलेला आणि एड वुड त्याच्या वाईट कामामुळे दुर्लक्षित. या दोघांची भेट हा सिनेमाचा एक हाय पाॅईन्ट आहे. ही भेट खरी झाली होती का ? माहीत नाही. पण चित्रपटाच्या सत्यात ते महत्वाचं आहे, आणि चित्रपट हा माहितीपट नसल्याने ते दाखवणं शक्यदेखील आहे

मला वाटतं चरीत्रपट म्हणजे काय याबद्दलच्या संभ्रमातून असे प्रश्न तयार होतात. चरीत्रपटांमधे व्यक्तीच्या आयुष्याचं ड्रॅमॅटायजेशन, त्यातलं चित्रपटाचं सत्य शाबूत ठेवत ते प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठीच त्यात माफक बदल करणं, हे चालू शकतं इतकच नाही, तर ते अपेक्षितही असतं. ‘सिनेमॅटिक लिबर्टीही पळवाट नसून योजना आहेत्याशिवाय दोन ( किंवा या केसमध्ये चार ) तासात तुम्ही कोणाचंही चरीत्र कसं दाखवू शकाल ? गेल्या महिन्यात लोकसत्तात आलेल्या लेखात चित्रपटाबद्दल काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्यात पूर्वार्धाच्या अखेरीला येणाऱ्या मैफिलीला लक्ष्य करण्यात आलं होतं. प्रत्यक्षात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी, हिराबाई बडोदेकरांच्या घरात आणि वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्व यांच्या उपस्थितीत घडणारी ही मैफल पूर्वार्धाचा हाय पाॅईन्ट आहे. ती कशी घडली असेल , याच पद्धतीने असेल का, त्यात अमुक गाणं कसं गायलं गेलं असेल, या व्यक्तींच्या गायनशैलीत फरक असताना त्या एकत्र गातीलच कशा, या प्रकारे या प्रसंगावर एक प्रश्नमालिका लेखात देण्यात आली होती. आता प्रत्यक्षात या व्यक्ती पुलंच्या जवळच्या होत्या, त्यांची मैत्री होती. अशा प्रकारच्या अनेक औपचारीक / अनैपचारीक मैफिली तेव्हा घडत. या सगळ्यांचे आपसात अतिशय सलोख्याचे संबंध होते. हा काळच अशा मोठ्या व्यक्तीमत्वांचा होता. चित्रपटातल्या मैफिलीची योजना हा काळ अचूक उभा करते. चरीत्रनायकाच्या व्यक्तीगत काळाच्या दृष्टीकोनातून पहायचं, तर यात पुल चाळीशीच्या जवळ पोचले आहेत. त्यांच्या आयुष्यात काही चढउतार येऊन गेलेले आहेत, जे चित्रपटाचा फोकस लक्षात घेऊन पडद्यावर दाखवलेलेही आहेत. पुल या मैफिलीत स्वत: गात नसले तरी त्यांचं संगीतप्रेम, चढउतारांच्या / स्वभावातल्या भिन्नतेच्या  अपरोक्ष त्यांचं आणि सुनीताबाईंचं दृढ होत गेलेलं नातं, आणि या सांस्कृतिक मुक्ततेच्या आणि मुबलकतेच्या काळातलं आयुष्य या मैफिलीत येतं. पुलंच्या चरीत्राच्या , व्यक्तीमत्वाला उभं करण्याच्या दृष्टीने यावर आक्षेप का असावा

रिचर्ड आयर या दिग्दर्शकाचाआयरिसनावाचा एक उत्कृष्ट चरीत्रपट आहे जो प्रसिद्ध लेखिका डेम आयरिस मर्डोक आणि तिचा पती जाॅन बेली यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. हा चित्रपट दोन काळात घडतो. आयरिस आणि जाॅन यांची भेट घडते तेव्हा म्हणजेच आयरिस लेखिका बनण्याआधीच्या दिवसात, आणि तिच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात जिथे आयरिसची स्मृती हरवत चाललेली आणि तिचा आपल्या आयुष्यावरचा ताबा पूर्ण सुटायला लागलेला. पहिल्या भागात ही फ्री स्पिरिटेड तरुण मुलगी म्हणून भेटते, तर अखेरीला जाॅनवर पूर्णपणे विसंबलेली. हा चित्रपट पाहून समजा कोणी म्हणालं, की यातून आम्हाला लेखिकेच्या साहित्यनिर्मितीची प्रक्रिया समजत नाही, किंवा तिची एक प्रथितयश लेखिका म्हणून आम्हाला ओळख होत नाही, तर ? किंवामेकींग ऑफ महात्मापहाताना स्वातंत्र्यलढ्यातल्या गांधींचा दिग्दर्शकाला विसर पडलाय असं म्हंटलं तर ? दर सिनेमात काय सांगितलेलं आहे हे तो पाहिल्यावर स्पष्ट दिसतं. ते पाहून मग त्या आशयासंबंधातच त्याच्या गुणवत्तेवर चर्चा व्हावी. आपल्याला चित्रपटापासून काही अपेक्षा असतात, त्या असणं स्वाभाविकही आहे. पण चित्रपट पहाताना या अपेक्षा तुमचं पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाहीत ना हे पहायला हवं

मी स्वतः भाई : व्यक्ती की वल्ली चित्रपटाच्या गुणवत्ते विषयी बोलणार नाही. तसं करणं योग्यही होणार नाही. पण इतरांनी मात्र तो पाहून त्या चित्रपटावरच मत बनवावं, आपल्या मनात चाललेल्या एखाद्या काल्पनिक सिनेमावर नाही, इतकच मी म्हणेन. याबद्दल चर्चा करणारेही अखेर त्यांना या थोर साहित्यिकाबद्दल असलेल्या प्रेमादरापोटीच बोलतात, त्यामुळे तेही समजण्यासारखं, पण त्यावर वाद घालण्यात मला अजिबात रस नाही

एक मात्र आहे. भाई च्या निमित्ताने मला एका महत्वाच्या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली. या प्राोजेक्टशी संबंधित साऱ्यांनाच; मग ते दिग्दर्शक महेश मांजरेकर असतील, संवाद लिहीणारे माझे वडील रत्नाकर मतकरी असतील, संगीत दिग्दर्शक अजित परब असेल, रंगभूषाकार विक्रम गायकवाड असतील, संकलक अभिजीत देशपांडे असेल, क्रिएटीव प्रोड्यूसर अमोल परचुरे असेल, भाई आणि सुनीताबाईंची कामं करणारे सागर देशमुख आणि इरावती हर्षे असतील, अनेक लहानमोठ्या भूमिकांत वावरलेले कलाकार असतील किंवा कॅमेरामागचा सारा क्रू असेल, सगळ्यांनाच भाईंबद्दल नुसता आदरच नव्हता, तर या सर्वांनी त्यांचं लिखाण वाचलं, ऐकलं होतं, त्यांना प्रत्यक्षात किंवा पडद्यावर पाहिलं होतं, हे व्यक्तीमत्व त्यांच्या फार जवळचं होतं आणि ते या चित्रपटामधून उभं रहावं म्हणून त्यांनी त्यांच्या बाजूने सगळे प्रयत्न केले. चित्रपटाला येणारा सकारात्मक प्रतिसाद हा आमच्यातल्या प्रत्येकाला  खूप आनंद देणारा आहे. आता चित्रपट म्हंटला, की कोणाला ना कोणाला खटकणारं काही ना काही असू शकतं, आणि ते स्वाभाविकही आहे. पण काय खटकतय याचेच हिशेब मांडण्याच्या नादात ज्या व्यक्तीचा गौरव हा चित्रपटाचा मूळ हेतू आहे, तिच्याकडे दुर्लक्ष होणार नाही, एवढी काळजी तरी प्रत्येकाने घ्यायला काहीच हरकत नाही

गणेश मतकरी


सौजन्य - अक्षरधारा

5 comments:

gandhiji40 February 9, 2019 at 4:29 AM  

It's impossible to cover all the aspects of multitalented pula s life... hats off to the honest efforts.... both parts are excellent

Rajeev.suryavanshi February 9, 2019 at 6:53 PM  

Excellent I was unable to watch the first part. But I am sure I am going to watch both the parts. People have different opinions and they try to force it on others. If P.L. or vVasantrao had liked consumption of alcohol and it is shown in the movie it's true biopic according to me. That does not tarnish the image of either person in my mind. How tight is the screenplay. How well is the editing and how the actors have performed is important for me.
Thank you

Manoj Bhalerao March 1, 2019 at 5:25 PM  

Excellent write up . I like the way you mentioned about the thinking of director and what he wants to convey ..
unfortunately not able to watch part 2..

Thanks
Manoj

Ravikiran Phadke March 6, 2019 at 12:59 AM  

No justification - as a script writer and therefore part of the team - will obliterate the fact that the impression an uninformed viewer will carry of Pu La and his friends after watching the film (Part I; I did not dare watch part II) will be that of guys whose primary interest was smoking and drinking whenever a chance presented to do so; everything else they did was primarily for supporting these 'passions'. If that is what you wanted to convey, I have nothing more to add.

Anonymous,  October 8, 2019 at 1:14 AM  

फारच फडतूस, रटाळ अन चारित्र्य हनन करणारा चित्रपट होता. ज्यांना पु ल माहित नाहीत अश्या लोकांनी जर बघितला तर त्यांना हा माणूस म्हणजे निव्वळ सिग्रेटी ओढणारा विदुषकी बेवडा वाटेल. सिनेमॅटिक फ्रिडम घ्यायची ती किती? काही मर्यादा? "मग तुम्ही काढा चित्रपट" हे उत्तर देऊन भागणार नाही.
एक काम करा: पुढचा सिनेमा ज्ञानेश्वरांवर काढा, अन दाखवा त्यांना कोकेन वगैरे ओढताना...
काय फुकून रिसर्च केला होतात तुम्ही पु लं वर, देव जाणे..

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP