गली बाॅय - तीन मॅजिकल शब्द

>> Saturday, February 16, 2019



काही दिवसांपूर्वी तरुण पिढीला मॅजिकल वाटणारे ‘ तीन शब्द’ कुठले, असं विचारलं, तर अर्थातच ‘ आय लव्ह यू’ या शब्दांचा नंबर पुढे लागायचा. अर्थात काळ तसाच रहात नाही, आणि तरुण पिढीही बदलत असतेच. त्यांच्या दिशा ठरतात, महत्वाकांक्षा अस्तित्वात येतात. आजूबाजूचा काळ आणि सामाजिक परस्थिती हिचं वजनही असतच. मग या तीन शब्दतली जादू त्यांना किती दिवस पुरेल. या व्हॅलेन्टाईन डेच्या निमित्ताने आलेल्या ‘ गली बॉय’ चित्रपटाने आपल्या तरुणांशी खरोखर संवाद साधतील, त्यांच्या मनस्थितीशी जुळतील असे तीन नवे शब्द आपल्यापुढे ठेवलेयत, आणि ते म्हणजे ‘ अपना टाईम आएगा ‘.

चित्रपटातल्या एका महत्वाच्या ( प्रसंगाने आणि अर्थानेही ) गाण्याचं ध्रुपद असलेले हे तीन शब्द चित्रपटाने टॅग लाईन म्हणून वापरणं अतिशय समर्पक आहे. गली बॉय हा एकाच वेळी प्रादेशिक आणि जागतिक आहे, पण त्याचं वास्तव हे प्रामुख्याने शहरी वळणाचं आहे. तिथली घुसमट, कोंदटपणा, वाढते ताण, सामाजिक - आर्थिक अडचणी , कुटुंबातल्या ज्येष्ठांच्या अपेक्षांची ओझी आणि त्यातून वाट काढत या तरुण पिढीने स्वत:लाच दिलेली हाक हे या चित्रपटाचं सूत्र आहे जे या तीन शब्दांमधून अतिशय चपखलपणे समोर येतं.

रॅपिंग किंवा हिप हाॅप कल्चर याची आपल्याकडे फार जुनी परंपरा नाही. १९७० च्या आसपास अमेरिकेत लोकप्रिय व्हायला लागलेल्या या संगीताचा परिणाम आपल्यावर फारच संथ गतीने झाला पण २००० च्या नंतर तो अधिक प्रमाणात दिसतो. गेल्या काही वर्षात तर हिंदीतही रॅपिंग आलेलं आहे. हे एक प्रकारचं आधुनिक लोकसंगीत म्हणता येईल, ज्यातून तरुण पिढीच्या विद्रोहाचा आवाज ऐकू येतो. गली बाॅय मधे या संगीताचा त्याला आवश्यक त्या पार्श्वभूमीसह वापर केलेला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच नेझी आणि डिवाईन या दोन रॅपर्सची नावं दिसतात ज्यांच्या संगीताचा आणि त्यांच्या सक्सेस स्टोरीचाही चित्रपटाच्या संकल्पनेत सहभाग आहे. त्यांचं लोकप्रिय गाणं ‘ मेरी गली मे’ चित्रपटासाठी नव्याने बनवण्यात आलय. या अस्सल सहभागाबरोबरच गीतांमधला बंडाचा सूर, रॅप म्हणजेच तालात म्हंटलेली पण गद्यासारखी शब्दरचना असलेली भरधाव गाणी, विशिष्ट प्रकारचं सादरीकरण, ग्राफिटीमधूनही व्यक्त होणं, अशी हिप हाॅप कल्चरची इतर मूलतत्वदेखील चित्रपटात आहेतच. पण असं असतानाही, चित्रपटात कुठेही या संस्कृतीची, संगीताची ओळख करुन दिल्याचा सूर नाही. त्यात संगीत येतं, ते नैसर्गिकपणे आल्यासारखं, त्यातल्या व्यक्तीरेखांचा आतला आवाज बनून.

गली बॉयने वापरलेली झोया अख्तर आणि रीमा कागती यांची पटकथा ही तशी परिचित वळणाची आहे. फूटलूज पासून 8 माईलपर्यंत अनेक चित्रपटांमंधून हाॅलिवुड आणि इतर ठिकाणीही प्रमुख पात्रावर आलेली दडपणं आणि त्यांना झुगारुन देत त्याचं अखेर व्यक्त होणं हे ज्या प्रकारे मांडलं गेलय त्याच प्रकारचा याचा आराखडा आहे. त्यात फारशी अनपेक्षित वळणं नाहीत पण याचा अर्थ ती दर्जेदार नाही असा काढू नये. अनेकदा पटकथेचा वापर विविध घटकांच्या सुविहीत मांडणीसाठी आधार पुरवणं इतकाच असू शकतो आणि इथे ते काम ती चोख करते. आता गली बाॅयमधले महत्वाचे घटक कोणते, तर ते म्हणजे चित्रपटाचं टेक्श्चर, तपशील आणि संवाद.

गली बॉय मधे प्रमुख पात्राचं नाव ‘मुराद’ असणं, हेच त्यातल्यात्यात ढोबळ मानावं लागेल. त्यापलीकडे त्यात दिसणारं सगळच खूपसं अस्सल, आणि वास्तववादी पद्धतीचं आहे. नेझी आणि डिव्हाईनच्या ‘मेरी गली मे’ गाण्याचा व्हिडीओ आजही इन्टरनेटवर उपलब्ध आहे, आणि तो पहाताच आपल्या लक्षात येतं की त्यातली वस्ती आणि गली बाॅयमधे दाखवलेली वस्ती यात फारसा फरक नाही. चित्रपटात या विशिष्ट गाण्याचं चित्रण अधिक प्रोफेशनल वाटणारं नक्कीच आहे, पण मूळच्या म्युझिक व्हिडीओचच ते एक्स्टेन्शन असल्यासारखं आहे. त्याच्याशी फारकत न घेता त्यातल्या कल्पनाच चित्रपटातल्या गाण्यात पुढे नेल्या आहेत. आणि चित्रपटातल्या मुरादचं विश्व हे या गाण्यातून दिसणाऱ्या विश्वाशी सुसंगत आहे. मुंबईच्या झोपडपट्ट्यांचं चित्रण करणारे अनेक चित्रपट आले आहेत, अस्सल चित्रण करणारेही त्यात आहेतच, पण तिथल्या जगण्याची कुतरओढ पटेलशी दाखवतानाही सकारात्मक पद्धतीने आणि आशावादी दृष्टीकोनातून पात्रांकडे पहाणाऱ्या दुर्मिळ चित्रपटात गली बॉय आहे. मुरादचं ( रणवीर सिंग )टिपिकल मुस्लीम कुटुंब, त्याच्या आईबरोबरचं ( अमृता सुभाष ) त्याचं नातं, ती असताना दुसरी बायको करणाऱ्या बापाचा ( विजय राज ) राग, मेडीकल स्टुडन्ट असलेल्या आणि जवळपास रहाणाऱ्या पण घरच्या बऱ्या सफीना ( आलिया भट्ट ) वरचं त्याचं प्रेम/ मैत्री, घरची बेताची परिस्थिती, परंपरेचा पगडा, ड्रायवरकी करणाऱ्या बापाचा जगण्याकडे पहाण्याचा निराशावादी दृष्टीकोन, मुरादचा मित्र मोअीन ( विजय वर्मा ) याचे भलते उद्योग, हे सगळच अगदी खऱ्यासारखं समोर येतं. हे सिनेमाचं नेपथ्य आहे, हे संवाद  ठरवून लिहिले आहेत ( संवाद विजय मौर्य - ज्याने चित्रपटात मामाची छोटी भूमिकाही केलीय ) , दिसतय त्यामागे दिग्दर्शिका झोया अख्तरचे जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय आहेत, हे आपल्याला चित्रपट पहाताना कुठेच जाणवत नाही. सफीना मुरादची बसमधली मूक भेट ज्यात या दोघांची मैत्री , त्यांची सामान्य परिस्थिती, सफीनाचं धीट व्यक्तीमत्व आणि त्यांच्या आयुष्यातलं संगीताचं स्थान हे सगळं दिसतं, किंवा बदली ड्रायवर म्हणून गेलेल्या मुरादचे गाडीतले प्रसंग असे शांत , अंतर्मुख क्षणही चित्रपटात आहेत, आणि गरज वाटेल तेव्हा बडबडही आहे. यातलं गप्प रहाणं किवा बोल बोल बोलणं या दोन्ही गोष्टी स्वाभाविक वाटणं, यात लेखन दिग्दर्शनाचं कौशल्य आहे.

पटकथेत कथानक पुढे नेण्यासाठी आणि त्याला हॅपी एन्डींगच्या दिशेने सरकवण्यासाठी दोन पात्र आहेत. मुरादला अचानक भेटलेला आणि त्याचा मार्गदर्शक झालेला रॅपर एम सी शेर ( सिद्धार्थ चतुर्वेदी ) आणि त्यांना प्रोफेशनल होण्यासाठी मदत करणारी कम्पोजर श्वेता उर्फ स्काय ( कलकी कोचलीन ). तरीही कथाविश्वात प्रवेश केल्यावर आपल्याला त्यांचं असणं, वागणं केवळ सोयीस्कर म्हणून घातलय असं वाटत नाही. तर या दोन्ही व्यक्तीरेखा चित्रपटाचाच भाग होऊन जातात. शेवटाकडे मात्र शेर आणि श्वेता दोघांनाही थोडं अधिक काम असायला हवं होतं असं मला वाटलं, पण ते नसल्याने चित्रपटाचा परिणाम कमी झाला असं मी म्हणणार नाही.

एका दृष्टीने पहाता ‘ गली बॉय ‘ हे म्युझिकल आहे. अमेरिकन म्युझिकल्स सारखी त्यातली गाणी प्रसंगांची जागा घेत नाहीत, पण हिंदी सिनेमांसारखी ती स्वतंत्र तुकड्यांसारखी चिकटवलेलीही वाटत नाहीत. मेरी गली मे, दूरी, अपना टाईम आयेगा सारखी गाणी तर सरळच चित्रपटाचा आशय पुढे नेतात. शेरला पडद्यावर इन्ट्र्यूस करणारं गाणं, श्वेताच्या घरचं रेकाॅर्डींग, किंवा दूरीचा गाडीत येणारा कवितेसारखा भाग, हे खरोखरच कथेला पुढे नेतात. त्याबरोबरच जिंगोस्तान, आजादी, काम भारी यांसारखी गाणी चित्रपट ज्या कल्चरशी संबंधित आहे त्याला आणि या कल्चरमधे कार्यरत असलेल्या इतर कलाकारांनाही चित्रपटात पाहुण्यांचं स्थान देत त्यांचं काम शोकेस करतात. यामुळे चित्रपट केवळ एका कथेपुरता मर्यादीत न रहाता एका कलाचळवळीचा भाग बनतो.

रणवीर सिंग आणि आलिया भट हे आपल्याकडचे सर्वात महत्वाचे स्टार आहेतच असं गली बॉयमधे दिसतं. रणवीर सिंग ज्या भूमिका निवडतो, आणि ज्या ताकदीने त्या साकार करतो, ते पहाता चित्रपटात काही करु पहाणाऱ्यांनी अभ्यास करावा असं निश्चित वाटतं. बॅन्ड बाजा बारात, लुटेरा, पद्मावत, सिम्बा आणि गली बॉय हे सगळं करणारा अभिनेता एक आहे, असं वाटतच नाही. दिसण्यापासून ते कामाच्या शैलीपर्यंत सगळं तो चित्रपटानुसार बदलू शकतो. सर्व खान मंडळींपेक्षाही प्रभावी कामगिरी तो येत्या काही वर्षात करेल अशी अपेक्षा आहे. आलिया ही मुळात राॅम काॅम मटिरीअल वाटली, तरी हायवे, उडता पंजाब, राजी आणि आता गली बाॅय, ही निवड आणि दाखवलेली ताकद खूपच आहे. तिही लवकरच नंबर वनला पोचली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. ही प्रमुख पात्र धरली, तरी एकूणच या चित्रपटात किंचितही कमी काम करणारं कोणी नाहीच. वर्मा आणि चतुर्वेदी विशेष उल्लेखनीय, पण दर लहानमोठी भूमिका ही चांगलीच म्हणायला हवी.

ही वर्षाची सुरुवातच आहे. पण गली बाॅय टीमने पुढे येणाऱ्या चित्रपटांना आत्ताच एक मोठं आव्हान देऊन ठेवलय. नाहीतर बऱ्याच पुरस्कारांवर त्यांचच नाव पडणार हे नक्की.

-गणेश मतकरी

6 comments:

rishistoryteller February 16, 2019 at 10:26 PM  

As usual...loved your review. Watched it yesterday, highly impressed.

HaRsHaD February 17, 2019 at 7:01 PM  

कालच पाहिला....👌👌👌 उत्तम चित्रपट बऱ्याच दिवसांनी पाहिला.
समीक्षण देखील फार छान आहे.

Yogesh Markande February 18, 2019 at 6:32 AM  

Film tar avadlich, pan ya madhale lyrics apratim aahe. Review to the point and correctly put forward.

Unknown February 27, 2019 at 9:12 PM  

Correct content & perfect effect.This year number one film will be GULLY BOY.
***APANA TIME AAYEGA****

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP