लवक्राफ्टीअन साहस - तुंबाड

>> Sunday, October 14, 2018


तुंबाड पहावा का, याचं उत्तर एका शब्दात देण्यासारखं आहे, आणि ते म्हणजेहो’. त्यापलीकडे काही मुद्द्यांची चर्चा होण्यासारखी आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट सांगून टाकायची तर श्री ना पेंडसेंच्या तुंबाडचे खोतशी तुंबाडचा काहीही संबंध नाही. हे नाव सरळ दिशाभूलही करणारं आहे, आणि पुढेमागे कोणाला त्यावर सिनेमा, मालिका करायची असेल, तर त्यावेळी ते वापरता येणार नाही. त्यामुळे अन्यायकारकही. या चित्रपटाला या नावाची काय गरज होती ? जागेचं नाव घेणं ठीक, पण याच वजनाचं दुसरं एखादं नाव नसतं घेता आलं ? असो. 

तुंबाड ही लवक्राफ्टीअन हाॅरर फिल्म आहे. आता लवक्राफ्टीअन म्हणजे काय, तर लवक्राफ्टच्या कथांवर थेट आधारीत नव्हे, तर लवक्राफ्ट भयाला ज्या पद्धतीने वापरतो, तसं वापरणारी. भूतं , झपाटलेल्या जागा, यांचा साहित्यातला, चित्रपटातला वापर आपल्याला तसा परिचीत असतो. पण आपल्या कळण्यापलीकडलं काही जेव्हा कथांमधे उतरतं, जेव्हा त्यातल्या शक्तींचा, दैवतांचा थांग हा आपल्याला समजण्यापलीकडचा असतो, तेव्हा या कथा लवक्राफ्टीअन म्हंटल्या जातात. प्रत्यक्षातहस्तरहे दैवताचं नावदेखील मुळात लवक्राफ्टने लोकप्रिय केलेल्या भयकारी दैवताचं आहे, हा आणखी एक परिचित संदर्भ.

प्रत्यक्षात तुंबाड हा धारपांच्या कथांवर आहे असं म्हंटलय, स्वतः दिग्दर्शक राही बर्वेनेही ते मान्य केलय, पण आधारीत म्हणजे नक्की काय आणि कितपत ? एका मुलाखतीत राही बर्वेने म्हंटल्याचं ऐकलं, की पहिला अर्धा तासच धारपांच्या कथेवर आधारीत आहे. ही कथाही त्याला कोणा मित्राने सांगितली ( आणि प्रत्यक्ष वाचल्यावर ती कशी वाईट होती हे त्याच्या लक्षात आलं , असा उल्लेखही तुंबाडच्या विकिपिडीआ पेजवर सापडेल. ही कथा वापरलेल्या दोन कथांमधली कोणती याचा स्पष्ट उल्लेख नाही पण तेही बहुधा पहिल्याच कथेबद्दल असावं ) वगैरे तपशील आपण ऐकले आहेत, त्यामुळे नक्की आधारीत काय आणि स्वतंत्र किती, हा एक प्रश्नही पडू शकतो. मला विचाराल, तर तुंबाडचा सुमारे दोन तृतीयांश भाग हा आधारीत आहे. प्रामुख्याने दोन कथांवर. यातली पहिली आहे स्टीवन किंगची ग्रॅम्मा ( जी हस्तरच्या संदर्भासह पूर्ण आहे ) जी धारपांनी आजी म्हणून रुपांतरीत केली होती. हा भाग चित्रपटाच्या सुरुवातीला येतो, ज्यात लहान विनायक आपल्या रहस्यमय आजीच्या संपर्कात येतो. तुंबाडच्या वाड्यात काहीतरी मोठा खजिना आहे ( हा उल्लेख ट्रेलरमधेच आहे ) आणि तो आपल्याला कसा मिळवता येईल याची चिंता विनायकला पडली आहे. धारपांची दुसरी कथा बळी, ही पुढे मध्यंतरानंतरच्या काही भागापर्यंत चालते. राही बर्वेने या दोन कथा एकत्र सांधून त्यांना पुढे वाढवलं आहे

हे कथांना एकत्र आणणं कसं जमलय असं विचारलं, तर मला ते बरच चांगलं जमलय असं वाटलं. प्रत्यक्षात या कथा सुट्या वाचल्या, तर आपण त्या या प्रकारे जोडता येतील याची कल्पना करु शकणार नाही. आता हे करताना गोंधळदेखील आहेत. सर्वात प्रमुख म्हणजे विनायकच्या पूर्वजांनी हस्तरला जागवलं हे आपण समजू शकतो, पण तो ज्या स्थानी, ज्या रुपात आहे, याबद्दल चित्रपट पुरेसं स्पष्टीकरण देत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला वाड्यात रहाणाऱ्यासरकारला खजिन्याबद्दल माहिती कशी नाही, याचंही स्पष्टीकरण नाही. चित्रपटाच्या शेवटाकडेही अशी स्पष्टीकरणं नसलेल्या जागा आहेत. तरीही काही गोष्टी आपल्या कळण्यापलीकडच्या आहेत असं लवक्राफ्टीअन लाॅजिक लावलं, तर आपण हा भाग सोडून देऊनही चित्रपटाच्या चौकटीत जे घडतय त्यात गुंतू शकतो. त्यामानाने पुण्यात घडणारा भागच अधिक विस्कळीत आहे

पण मांडणीच्या पलीकडे जाणाराही एक प्रश्न आहे जो भयकथांची रुपांतरं यशस्वी असण्यानसण्याशी जोडलेला आहे. स्टीवन किंगने आपल्या डान्स मकाब ( Danse Macabre ) या पुस्तकात त्याची विस्ताराने चर्चा केली आहे. कथांमधेही हा प्रश्न आहेच पण चित्रपटात तो अधिक सतावतो, आणि तो म्हणजे आपल्या कल्पनेतली भीती आणि तिचं दृश्यरुप यांमधला ताळमेळ. १९७९ मधे किंगने ऐकलेल्या एका भाषणात लेखक/पटकथाकार विलिअम नोलनने म्हंटलेल्यानथिंग इज सो फ्रायटनिंग ॲज व्हाॅट्स बिहाइंड क्लोज्ड डोअर’ या वाक्याच्या आधारे केलेली ही चर्चा आहे. एखाद्या बंद दारापलीकडे काही भयानक आहे असं प्रेक्षकाला सांगितलं की ते काय असेल याची प्रतिमा प्रेक्षक स्वत:च्या मनातच तयार करतो, जी फार भयावह असते. पण एकदा का दार उघडून पलीकडे काय आहे हे दाखवलं, की आधी वाटलेल्या भीतीच्या तुलनेने प्रेक्षकाला प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट फिकी वाटायला लागते. दहा फूटी राक्षस असेल तर प्रेक्षक म्हणतो, हॅ, आम्ही तर शंभर फूटी इमॅजिन करत होतो. सिनेमाचा प्राॅब्लेम हा असतो, की त्यात दार हे कधीनाकधी उघडावच लागतं. गंमत म्हणजे, या नियमाला अपवाद असं उदाहरण म्हणून किंगने वापरलय ते हाॅन्टींग ऑफ हिल हाऊस’, या शर्ली जॅक्सनच्या कादंबरीचं राॅबर्ट वाईजने केलेलं रुपांतर, जिचं नवं रुपांतर तुंबाडबरोबरच ( पण नेटफ्लिक्सवर आणि मालिकारुपात ) रिलीज झालय. वाईज आपल्या हाॅन्टींगमधे हे दार उघडतच नाही. म्हणजे प्रेक्षकांना प्रत्यक्ष भूत दिसूच देत नाही. तुंबाडचा प्राॅब्लेम हा, की तो दार फार लवकर उघडतो. मध्यंतरानंतर लगेचच. आधी केलेल्या वातावरणनिर्मीतीच्या तुलनेत दिसणारं अस्तित्व हे खरं सागायचं तर मला फार ग्रेट वाटलं नाही. पण प्राॅब्लेम हा रुपापलीकडचा आहे. एकदा ते काय आहे आणि काय करतं हे स्पष्ट झालं की या प्रकारच्या भयाला आवश्यक ती संदिग्धता निघून जाते, आणि मग नायक आणि खलनायक असा ऑब्विअस झगडा तयार होतो. आता हे द्वंद्व डोक्याइतकच शारीरही असल्याने पुढल्या भागात चित्रपट साहसपटासारखा वाटायला लागतो.

तरीही तुंबाडमधली चांगली बाब ही, की त्याच्या भयपट म्हणून यशापयशाचा, सिनेमा म्हणून असलेल्या यशापयशाशी काही संबंध नाही

राही बर्वेनेहावया मूलभूत प्रेरणेचा चित्रपटाला सबटेक्स्ट देताना सतत वापर केलेला आहे. आशयाची दिशा कळावी, म्हणून सुरुवातीलाच महात्मा गांधींचं एक उधृत येतं, आणि पुढे कथेतही आपण नकळत हा विचार लक्षात घेत रहातो. विनायकच्या वागण्यातून हाव थेटपणे दिसते. पण हस्तरची बॅकस्टोरी हीदेखील याबद्लच आहे. चित्रपटातला आणखी एक महत्वाचा धागा म्हणजे घराण्यांमधून वंशपरंपरागत पसरणारी कीड. एका कुटुंबाच्या विनाशात त्यातल्या व्यक्तींच्या स्वभावधर्मात असलेल्या विपरीत प्रवृत्तीचं कारणीभूत होणं. हे दोन्ही धागे धारपांच्या कथांमधेही आहेत, पण दिग्दर्शकाने रचलेल्या पुढल्या भागात ते अधिक टोकाला जातात. व्यक्तीश: मला चित्रपटाचा शेवट हा प्रतिकात्मक दृष्टीकोनातून अधिक प्रभावी वाटला, पण प्रत्यक्ष आशयाच्या पातळीवर फारसा पटला नाही. तुम्हालाही जर शेवटाबाबत असमाधान वाटत असेल तर प्रत्यक्ष कथानक आणि सबटेक्स्ट यांचा स्वतंत्रपणे विचार करुन बघा

चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं श्रेय राही अनिल बर्वे आणि आनंद गांधी या दोघांना दिलेलं दिसतं, पण त्याचा पाया आणि सुरुवातीचं बरच काम राही बर्वेचं आहे. त्याच्या डोळ्यासमोर असलेलाच हा चित्रपट आहे, हे त्याने फेसबुकवर टाकलेल्या स्टोरीबोर्डच्या पानांमधून स्पष्ट आहे. काही महत्वाच्या जागी पुनर्लेखन, आणि पुनर्चित्रीकरणासाठी आनंद गांधीची मदत झाली असं ऐकलय. या दोघांबरोबरच चित्रपटाच्या यशातले इतर दोन महत्वाचे भागीदार म्हणजे सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार, आणि अभिनेता /निर्माता सोहम शाह. तुंबाड हा चित्रीकरणात अतिशय प्रभावी आहे आणि त्यातला फ्रेमिंगचा, काॅम्पोझिशन्सचा विचार त्याच्या एकूण परिणामात भर घालणारा आहे. या चित्रणशैलीशिवाय चित्रपटाची कल्पना करणंही अशक्य आहे. सोहम शाह हा शिप ऑफ थिसीअस साठी लक्षात असलेला अभिनेता, तिथेही तो सहनिर्माता होता. इथे ओळखीचा एखादा नायक घेता त्यानेच विनायकचं काम करणं हे चित्रपटाच्या फायद्याचं आहे. विनायकची भूमिका कठीण आहे कारण ती अनअपाॅलोजेटिकली ग्रे आहे. विनायकचा तो चांगला असल्याचा दावा नाही, त्याच्या वागण्यातून तो कसा माणूस आहे हे स्पष्टच आहे, पण तरीही प्रेक्षकांना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटणं आवश्यक आहे. तोच चित्रपटाचा नायक आहे. त्याच्या साऱ्या गुणावगुणांसह. गांधी, कुमार आणि शाह, ही तिन्ही नावं या आधीशिप ऑफ थिसीअसचित्रपटाने गाजलेली. आता तुंबाडमधल्या सहभागाने त्यांनी आपली वेगळेपणाची आवड पुन्हा एकदा दाखवून दिली आहे

तुंबाडबद्दल दोन गोष्टी बोलल्या गेलेल्या मी ऐकल्या आहेत. एक तर हा जगातल्या उत्तम भयपटांमधला एक आहे आणि दुसरी म्हणजे त्याच्या अनेक वर्ष चाललेल्या निर्मितीची कहाणी. यातली पहिली का म्हणावी लागते हे मला कळत नाही आणि दुसरीचा प्रेक्षकांच्या चित्रपटआकलनाशी तसा संबंध नाही.

तुंबाड पहाण्यासारखा आहे का ? आहे. तो जगभरच्या प्रेक्षकांनी पहावा का ? जरुर. पण भयपट म्हणून तो खूप प्रभावी आहे असं मी म्हणणार नाही. आणि त्याची घाई काय आहे ? आपल्याकडे आत्ता आत्ता चांगल्या निर्मितीला सुरुवात होते आहे. राही बर्वेचीही प्रथम फीचर फिल्म आहे. आणखी अपेक्षा आहेतच. त्या पुऱ्याही होतील

-

ganesh matkari


Read more...

गांधीविचार आणि पडदा

>> Sunday, September 30, 2018




गांधीजींना मी पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मधे रिचर्ड अॅटेनबरो दिग्दर्शित गांधी सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन्ही पदव्या लावणाऱ्या या महापुरुषाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचं नावही साधं सोपं ‘गांधी’ इतकच होतं, याचं आश्चर्य वाटेलसं वातावरण तेव्हा नव्हतं. आताही गांधींबाबत कदाचित हा बहुमानाचा आग्रह धरला जाणारही नाही. त्यांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या मवाळ धोरणामुळेच का काय कुणाला माहीत, पण त्यांच्याबद्दल उसना आदर दाखवण्यासाठी आग्रही रहाण्याची फार तसदी कुणी घेत नाही. पण संबोधन काहीही असलं, तरी ही व्यक्ती बहुसंख्यांच्या आदराला पात्र राहिली आणि गांधी या प्रामुख्याने ब्रिटीश निर्मिती असलेल्या चित्रपटातही तो आदर होताच.

 गांधीजींचं बाह्यरुप हे तसं सोपं, चटकन उचलता येण्यासारखं. पंचा, काठी, टक्कल, कृश शरीरयष्टी, यांच्या जोरावर चटकन त्यांची प्रतिमा डोळ्यांसमोर आणता येते. ( त्यामुळे अगदी लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धांमधेही ही एन्ट्री तशी परिचित असते. ) अर्थात असं ढोबळ वेषांतर वेगळं, आणि हाडामासाची व्यक्ती समोर उभी करणं वेगळं. गांधी चित्रपट पहाताना गांधीजींच्या वेषातला , चांगला नट आपल्यासमोर उभा असल्याचा भास होत नाही, तर साक्षात गांधीच समोर उभे रहातात. त्यांचं तत्वज्ञान बेन किंग्जले बोलून दाखवतो आहे, असं वाटत नाही, तर आपण गांधीजींच्या आयुष्याचे जणू साक्षीदारच होतो. प्रचंड मोठ्या काळाला आणि व्यक्तीला कवेत घेणारा हा चित्रपट ब्रिटीश दिग्दर्शकाचा असला, तरी आपल्या या महानेत्याला पूर्ण न्याय देतो. त्याला देवत्व देत नाही, पण माणूस म्हणूनच त्याचं काम किती प्रचंड, किती गौरवास्पद आहे, हे दाखवून देतो. गांधी चित्रपटाचं महत्व हे केवळ एक चांगला चित्रपट म्हणून नव्हतं, तर त्याने चित्रपटाला सामाजिक प्रबोधनाचं एक महत्वाचं साधन म्हणून वापरलं. गांधीजींचा विचार त्याने आपल्याकडे तर सर्वदूर नेलाच, वर युरोप अमेरिकेतही हे नाव विशिष्ट काळापुरतं महत्वाचं नसून सार्वकालिक आहे, हे दाखवून दिलं.

 गांधी चित्रपटाने आपल्या बायोपिक या चित्रप्रकाराची थोडी अडचण केली. नंतरच्या दर चरित्रपटाला गांधीच्या तुलनेत जोखलं जायला लागलं, आणि हे चरित्रपट त्यात हमखास कमी पडायला लागले. थोडंसं तसच, गांधीजींच्या पडद्यावरल्या प्रतिमेचंही झालं. अनेक जणांनी ही भूमिका पडद्यावर आणून पाहिली. श्याम बेनेगलांच्या ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ (१९९४)  मधे रजित कपूरने महात्मापदाला पोचण्याआधीचे तरुण गांधी साकारले. त्याखेरीज सॅम दस्तोर ( लाॅर्ड माऊंटबॅटन : द लास्ट व्हाॅईसराॅय, १९८६, जिना, १९९८ ), अन्नू कपूर ( सरदार, १९९३ ), नासीरुद्दीन शाह ( हे राम, २००० ), मोहन गोखले ( डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, २००० ) , आणि दर्शन जरीवाला ( गांधी, माय फादर, २०००), अशा अनेकांनी गांधीजींच्या ओळखीच्या रुपाला पडद्यावर साकारुन पाहिलं. यात ‘मेकिंग ऑफ महात्मा’ आणि गांधीजी आणि त्यांचा पुत्र हरीलाल यांच्यातल्या संघर्षमय नात्यावर आधारीत ‘गांधी, माय फादर’ सोडता इतर भूमिका त्या त्या चित्रपटात दुय्यम होत्या हे खरं, पण बेन किंग्जलेचा प्रभाव यातल्या कोणाला पुसून टाकता आला नाही हेदेखील तितकच खरं.
 एक गोष्ट आपण लक्षात घेता यायला हवी, ती म्हणजे गांधींचं चित्रपटात असणं, म्हणजे केवळ त्यांचं एक व्यक्तीरेखा म्हणून असणं, असा अर्थ घेता येणार नाही. तर त्यांच्या विचारांच्या प्रभावाखालच्या चित्रपटांमधेही त्यांचा अदृश्य वावर असतोच. याप्रकारचं एक प्रसिद्ध पाश्चिमात्य उदाहरण म्हणजे चार्ली चॅप्लिनचा गाजलेला चित्रपट ‘माॅडर्न टाईम्स’ (१९३६).
 १९३१ साली गांधीजी इंग्लंडला गेले असताना चार्ली चॅप्लिनने त्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मुळात गांधीजींना चित्रपटांमधे अजिबातच रस नसल्याने त्यांनी भेट नाकारायचा विचार केला, पण चॅप्लिनचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला असलेला पाठींबा लक्षात आल्यावर त्यांनी भेटीला संमती दिली. या भेटीत चॅप्लिनने त्यांना एक प्रश्न विचारला, तो म्हणजे, ‘ तुमचा यंत्रांच्या वापराला का विरोध आहे ? यंत्रावाचून सारं काम खोळंबणार नाही का?’
 त्यावर गांधीजींनी स्पष्ट केलं, की त्यांचा विरोध प्रत्यक्ष यंत्रांना नसून, यंत्रांनी माणसांची जागा घेण्याला होता. हे संभाषण चॅप्लीनला खूपच प्रभावित करुन गेलं, आणि त्यातूनच पुढे त्याला माॅडर्न टाईम्स बनवण्याची प्रेरणा मिळाली, ज्यात तथाकथित प्रगतीतून सामान्य माणसांवर ओढवणाऱ्या संकटाचं चित्रण आहे. चॅप्लिनचाच दुसरा एक प्रसिद्ध चित्रपट म्हणजे ‘ द ग्रेट डिक्टेटर’ (१९४०). हिटलरसारखा एक क्रूरकर्मा हुकूमशहा आणि त्याच्या जागी गैरसमजुतीने आलेला बिचारा गरीब न्हावी यांची ही गोष्ट आहे. या चित्रपटावरही गांधीविचारांचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. हुकूमशहाची जागा घेतलेल्या गरीब न्हाव्याने केलेलं शांतीचा संदेश देणारं भाषण , ही या विचारांचीच खूण आहे.
आपल्याकडे खूप चित्रपटांवर त्यांचा प्रभाव दिसत नाही. याचं एक कारण आपल्याकडे एकूणच विचारांपेक्षा करमणूकीला असलेलं महत्व मानता येईल. स्वातंत्र्याच्या काळात लढ्याने प्रेरीत, प्रतिकात्मक आशय मांडणारे चित्रपट जरुर येत, पण गांधीविचार हा प्रामुख्याने समाजाचा विचार होता, आणि सामाजिक, वास्तववादी विचार मांडणारे चित्रपट आपल्याकडे तसे दुर्मिळच. तरीही नितीन बोस दिग्दर्शित चंडीदास ( १९३४)  फ्रान्ज ओस्टन दिग्दर्शित अछूत कन्या (१९३६), तमिळ चित्रपट त्यागभूमी ( १९३९) , व्ही शांतारामांचा ‘ दो आंखे बारा हाथ’ (१९५७) अशा काही चित्रपटांवरचा गांधीवादाचा पगडा लक्षात येण्यासारखा आहे. अगदी अलीकडच्या काळात आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान (२००१), स्वदेस(२००४) वगैरे चित्रपटांचाही विचार या संदर्भात करता येईल.
 काळ बदलतो तसा समाज बदलतो, विचार बदलतो, धोरणं बदलतात. त्यामुळे काही वेळा सर्जनशील कलावंत विशिष्ट मूल्यविचाराला पुन्हा समोर आणून त्याच्या टिकाऊपणाचा फेरविचार करतात. अलीकडच्या काळात दोन चित्रपटांमधून गांधीवादाचा फेरविचार झालेला आहे. ते आहेत राजकुमार हिरानी दिग्दर्शित २००६ मधे आलेला हिंदी चित्रपट ‘लगे रहो मुन्नाभाई’, तर दुसरा गिरीश कासरवल्ली दिग्दर्शित २०११ चा कन्नड चित्रपट ‘कूर्मावतार’.
या दोन्ही चित्रपटांमधे महात्मा गांधी ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा नाही, मात्र वेगळ्या पद्धतीने या चित्रपटांनी गांधीजींना आपल्यापुढे आणलय. लगे रहो मधला मुन्ना हा   गांधीजींच्या विचारांनी इतका झपाटला जातो, की त्याला प्रत्यक्ष गांधीजी दिसायला लागतात. या त्याच्या मनातल्या गांधींजींच्या मदतीने मुन्ना आजच्या काळातल्या समस्यांना सामोरा जातो. त्यांच्यामार्फतच आजच्या काळावर तोडगा निघतो का, हे पडताळून पहातो. लगे रहो हा व्यावसायिक चित्रपटांसाठी अतिशय नावीन्यपूर्ण आणि तरीही गांधींची महती मांडणारा सुबोध प्रयत्न होता. यात दिलीप प्रभावळकरांनी साकारलेले गांधी, हे आज घरोघर पोचलेले आहेत.
 मुन्नाभाईच्या तुलनेत कूर्मावतारची रचना थोडी अधिक गुंतागुंतीची आहे. कासरवल्लींच्या चित्रपटात नेहमीच राजकीय विचारांचा एक महत्वाचा धागा असतो. कूर्मावतार मधेही तो आहे. गांधींच्या विचारांना-नेतृत्वाला  सोयीस्करपणे वापरलं गेलं पण अखेरच्या काळात ते एकटे पडले, याची या सिनेमाला आठवण आहे. आजही त्यांच्या तत्वज्ञानापेक्षा त्यांचा चेहराच अधिक ओळखीचा असावा, याचं दु:ख या चित्रपटाला आहे.
कूर्मावतारच्या केंद्रस्थानी आनंद राव ( शिकरीपुरा कृष्णमूर्थी ) हा कारकून आहे. तो थोडासा गांधीजींसारखा दिसतो खरा, पण त्यापलीकडे त्याला गांधीजींची फार माहिती नाही.गांधीजींवरच्या एका मालिकेचा दिग्दर्शक रावकडे अचानक येतो आणि ही महत्वपूर्ण भूमिका करण्याची विनंती करतो. आजच्या काळातला , काहीसा सामान्य राव आणि गांधीजींचं असामान्य व्यक्तिमत्व यांच्यातली साम्यस्थळं आणि विरोधाभास, यावर या चित्रपटाच्या कथानकाचा समतोल टिकलेला आहे. रावमधे गांधीजींचे काही गुणधर्म आहेत आणि भूमिका स्वीकारल्यानंतर तिचा अभ्यास करताना ते नक्की कोणते हे स्पष्ट होत जातं. रावमधे होत जाणारा बदल, त्याचं बदललेल्या जगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणं, आणि त्यातून एकटं पडत जाणं, हे एका परीने रावच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेलं , पण तरीही गांधीचरीत्राची आठवण देणारं आहे. ‘फिल्म विदीन फिल्म’ हा गांधीजींवरच्या इतर चित्रपटात न वापरला गेलेला फाॅर्म इथे कासरवल्लींनी वापरला आहे. यात मालिकेतले प्रसंग हे रावनेच वठवले असले, तरी गांधींच्या आयुष्याबद्दल बोलतात, तर रावचं बाकी आयुष्य गांधींच्या प्रतिमेचा विचार केला जातो. गांधीजींच्या जीवनाचा, विचारांचा, समाजावरल्या प्रभावाचा त्रयस्थपणे विचार करणारा हा खूप महत्वाचा सिनेमा आहे. ऐतिहासिक दाखले देणारे, नुसतच गुणवर्णन करणारे किंवा थोरवीसमोर नतमस्तक झालेल्या चित्रपटांपेक्षा, आपल्याकडल्या मोठ्या व्यक्तीमत्वांचा गांभीर्याने विचार करणाऱ्या चित्रपटांची आज गरज आहे. अर्थात ते येऊ शकतील की नाही, हे आजच्या वातावरणात अजिबातच सांगता येणार नाही.
- गणेश मतकरी

Read more...

डीकोडींग ‘संजू’

>> Saturday, June 30, 2018




एका वाक्यात सांगायचं, तर राजकुमार हिरानीचा, संजय दत्तच्या आयुष्यावर आधारलेला चित्रपट ‘संजू’ हा एकाच वेळी इन्जिनीअस आणि सामान्य चित्रपट आहे, आणि तो आवडूनदेखील मी असं म्हणेन, की राजकुमार हिरानीने तो करण्याचा मोह टाळायला हवा होता.


चित्रपट इन्जिनीअस का, तर तो त्यातला युक्तीवाद हा फार ब्रिलीअन्ट पद्धतीने मांडतो आणि प्रेक्षकाला तो जे सांगतोय ते एकच सत्य आहे, याबद्दल बराचसा कन्व्हिन्स करतो. आणि सामान्य का, तर या युक्तिवादापलीकडे तो फारसा जातच नाही म्हणून. त्यातले सुटे घटक म्हणून आपण पितृप्रेम, मैत्री, यासारख्या घटकांकडे पाहू शकतो, पण हे सर्व घटक शेवटी एकाच गोष्टीला सर्व्ह करतात, आणि ती म्हणजे यातला युक्तीवाद.

हिरानीने चित्रपट करायला नको होता असं वाटण्यामागे, दोन साधीशी कारणं आहेत. एक म्हणजे ही अजेन्डा फिल्म आहे, त्यामुळे दिग्दर्शकाला घटनांकडे न्यूट्रली न पहाता एका निश्चित दृष्टीकोनाला बांधून घ्यावं लागलय. एका तरबेज वकीलासारखी त्याची परिस्थिती झालीय. हा वकील हुशार आहे आणि आपल्या अशीलाला सोडवणारच हे त्याच्या कामातून सिद्धच आहे, पण त्याबरोबरच तो ज्या बाजूने लढतोय ती पूर्ण निर्दोष नसावी अशी समोरच्या प्रत्येकाचीच खात्री आहे. दुसरं कारण हे की हिरानीच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’सारख्या सिनेमांमधे जे पटकथेचं/ दिग्दर्शनाचं मॅजिक होतं, ते इथे उत्तम कारागिरी या स्वरुपात उरलेलं आहे. ते हुशारीने तर केलय, पण तो काय करतोय, आणि काय पद्धतीने करतोय, हे इथे पूर्णपणे एक्सपोज झालेलं आहे. असं असतानाही हिरानी आजचा महत्वाचा दिग्दर्शक राहील, संजू चित्रपट खोऱ्याने पैसे कमवेल, आणि संजय दत्तच्या बऱ्याच चाहत्यांना क्लोजर देऊन गिल्ट फ्रीही करेल, पण तरीही त्यासाठी हिरानीने ही केस पब्लिक मधे लढवायला घेणं आवश्यक होतं का , हा प्रश्न उरतोच. केवळ मुन्नाभाई म्हणून कास्ट झाल्यावर संजय दत्तच्या ओळखीला पुरेशी रंगसफेदी मिळाली होतीच, आता ही केस चालवायला घेतल्याने, उलट लोकांचं लक्ष गुन्ह्याकडे वेधलं गेलं. असो.

संजय दत्तचं आयुष्य अतिशय गुंतागुंतीचं आहे. त्याचं स्टारपुत्र असणं, स्टार म्हणून जवळपास पहिल्या सिनेमातच एस्टॅब्लिश होता होता त्याचा ड्रगयुज सर्वांसमोर येणं, त्याची अनेक लफडी, लग्न आणि वैयक्तिक आयुष्यातले गोंधळ, बहीणी आणि वडील यांच्याबरोबरचं त्याचं नातं, सिनेमाने जोडलेली नवी नाती, करीअरमधे मिळालेलं स्टारडम आणि त्याला बाॅम्बस्फोटात गुंतल्यामुळे वेळोवेळी लागत गेलेले ब्रेक्स, तुरुंगवास होऊनही वास्तवपासून सुरु झालेली त्याची नवी इनिंग आणि पुढे मुन्नाभाईच्या भूमिकेने त्याला मिळालेली सर्वमान्यता, अशी त्याच्या आयुष्यातली प्रमुख प्रकरणं मानता येतील. या सगळ्याला घेऊनही बायोपिक करता आली असती आणि ती खरोखरच एक गंभीर, आणि काॅम्प्लेक्स बायोपिक झाली असती, पण संजू तशी बायोपिक नाही. त्याबद्दल बोलताना काही प्रेक्षकांनी ‘याला बायोपिक म्हणायचं का ?’ आणि ‘तो तुटक तुटक वाटतो’ असे आक्षेप घेतले आहेत त्याला कारणीभूत हीच गोष्ट आहे की हिरानीने त्याच्या आयुष्यातला मोठा स्पॅन घेऊनही त्याला सिम्प्लीफाईड रितीने आणि सोयीस्कर पद्धतीने आपल्यापुढे मांडलय. तो हे करु शकतो का, तर का नाही ? आणि हे करुनही ती बायोपिक आहे का, तर निश्चितच, पण या मांडणीत तो व्यक्तीरेखांचा, खासकरुन विनी ( अनुष्का )आणि कमलेश ( विकी कौशल ) यांचा जो सोयीस्कर उपयोग करतो, त्यामुळे त्याचं अजेंडानिष्ठ असणं उघड होतं.

आपल्या रंगभूमीवर मध्यंतरी ‘समाजस्वास्थ्य’ हे अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित नाटक आलं होतं, त्याचा उल्लेख इथे करावासा वाटतो. र धों कर्व्यांच्या आयुष्यावर आधारीत असलेलं हे नाटक त्यांच्या चरीत्राशी प्रामाणिक होतं आणि नाटक म्हणून उत्तम होतं, पण त्यावरही बोलताना काहीजण त्याला चरीत्रनाट्य म्हणावं का हा मुद्दा काढत. चरीत्रनाट्यात किंवा चित्रपटातही चरीत्र नायकाचं ( किंवा नायिकेचं ) पूर्ण चरीत्र येणं आवश्यक नाही. कितिही छोटा आणि कितिही मोठा अवाका असला तरी चरीत्रातल्या घटनांवर आधारीत असणं, त्याला चरीत्रनाट्य/चित्रपट ठरवू शकतात. समाजस्वास्थ्यमधे रधोंच्या आयुष्यातले तीन खटले दाखवण्यात आले होते, जे ते चालवत असलेल्या समाजस्वास्थ्य या मासिकासंबंधातले होते. त्या खटल्यांच्या अनुषंगाने रधोंचं जेवढं आयुष्य प्रकाशात येईल, तेवढच इथे दाखवलं होतं. संजू साधारण हाच प्रकार करतो. मात्र समाजस्वास्थ्य मधले खटले खरे होते, इथे तसं नाही. चित्रपटाने चालवलेली संजूची केस तीन प्रश्नांची बनवली जाते , ज्यांची खरी/खोटी उत्तरं आपल्याला दिली जातात. पहिला प्रश्न म्हणजे ॲडीक्शनचा दोष संजय दत्तवर जावा का ?दुसरा, संजय दत्तने घरी एके ५६ का ठेवली ? आणि तिसरा, म्हणजे मिडीआने रिपोर्ट केल्याप्रमाणे त्याच्या घराच्या आवारात RDX चा ट्रक खरच पार्क केलेला होता का ? समाजस्वास्थ्य मधल्या केसेस कोर्टात चालवल्या जातात, तर संजू या प्रश्नांचा डिफेन्स दोन पात्रांसमोर देतो. त्याचं आत्मचरीत्र लिहू पहाणारी विनी, आणि त्याचा एकेकाळचा, पण बाॅम्बस्फोटातल्या आरोपांनंतर बिछडलेला दोस्त कमलेश. विनी हे पात्र उघडच काल्पनिक आहे. संजूच्या ॲडीक्शनला जबाबदार असलेला गाॅड, आणि त्याचा सद्वर्तनी मित्र कमलेश ही दोन्ही पात्र त्याच्या दोन्ही प्रकारच्या मित्रांचं प्रातिनिधीक रुप मानता येतील, पण कमलेशची योजना, ही प्रामुख्याने संजूला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देण्यासाठी आहे.

‘ट्रान्स्फर आॅफ गिल्ट’ नावाचं एक महत्वाचं डिव्हाईस प्रसिद्ध दिग्दर्शक आल्फ्रेड हिचकाॅक त्याच्या सिनेमात वापरत असे . ज्यात प्रत्यक्षात अपराधी व्यक्तीला सहानुभूती मिळावी म्हणून गुन्ह्याची जबाबदारी दुसऱ्या एखाद्या पात्रावर ढकलली जात असे. संजू काहीसं तेच करतो. ॲडीक्शनबाबत ही जबाबदारी ढकलली जाते ती गाॅड या व्यक्तिरेखेवर. आणि नंतरच्या केसमधे क्लीअर गुन्हेगार समोर नसल्याने, मिडीआलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. याचा निकाल देण्यासाठी समोर येतात ते विनी आणि कमलेश , जे खरं तर प्रेक्षकांचेच प्रतिनिधी आहेत. ड्रग ॲडीक्ट संजय दत्त हा भला माणूस कसा? त्याच्या वर पोलिसांनी केलेले आरोप खोटे कसे असतील ? असे प्रेक्षकांना पडलेलेच प्रश्न ही पात्र विचारतात, आणि चित्रपटाने दिलेली उत्तरं खरी मानून ते संजय दत्तला निर्दोष ठरवतात. त्यांना संजय दत्तची बाजू पटणं, हेच प्रेक्षकाला त्याची बाजू पटण्यासारखं आहे.

चित्रपटात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, जो बहुधा राजकुमार हिरानीने चित्रपट निवडण्यामागचा महत्वाचा भाग असावा. आणि ते म्हणजे मिडीआचा आज होणारा वापर. हिरानीच्या फिल्म्सकडे आपण पाहिलं, तर प्रत्येक वेळी एक टारगेट ठरवताना दिसतो, आणि त्या टारगेटचं नकारात्मक चित्र रंगवण्यात बराच वेळ घालवतो. कधी हे टारगेट मेडीकल प्रोफेशन असतं, कधी बिल्डर लाॅबी, कधी शिक्षणसंस्था. संजूमधे मिडीआ हे ते टारगेट आहे. मिडीआवर संजूने केलेली आगपाखड, हेडलाईन्सचा वापर, क्वेश्चनमार्कबद्दलचा युक्तीवाद, संपादकाची छोटी भूमिका आणि या सर्वांवर कडी म्हणजे शेवटी श्रेयनामावलीच्या दरम्यान येणारं गाणं. या सगळ्यातून हिरानी फाॅर्म्युला एक्स्पोज व्हायला लागतो. मिडीआ या प्रकरणात दोषी आहे का? काही प्रमाणात त्यांना दोष जरुर जाईल, खासकरुन जर त्यांनी माध्यमाचा गैरवापर केला असेल तर. पण चित्रपटात मिडीआला बाजू मांडायला मिळत नाही, त्यामुळे संजू प्रेक्षकांसाठी निर्दोष ठरतो, आणि गुन्हेगार ठरते ती मिडीआ.

पटकथेचा हा असा काहीसा कॅलक्युलेटेड फाॅरमॅट असल्याने चित्रपटाला अनेक महत्वाचे मुद्दे हाताळायला वेळ मिळत नाही. संजय दत्तची लग्न हा त्यातला एक मुद्दा. यात मान्यता दिसते ती नाममात्र, पण ती कशी भेटली वगैरे तपशील येत नाहीत. तिच्याआधीच्या लग्नांचा तर उल्लेखही येत नाही. वडिलांबरोबरच्या नात्याचा आलेख तपशीलात येतो, पण बाकी वैयक्तिक आयुष्य दाखवलच जात नाही. पटकथेची निवड ही सिलेक्टीव असल्याने एकूण करीअरचा उल्लेख टाळायला हरकत नाही, पण संजय दत्तच्या करीअरला पुनरुज्जीवन देणाऱ्या वास्तवचा उल्लेख नसणं खटकतं, पण तो उल्लेखाशिवायही थोडासा रिप्रेझेन्ट व्हावा म्हणून महेश मांजरेकरांचा कॅमिओ टाकला असावा, असं वाटतं. त्यामानाने मुन्नाभाई एमबीबीएस ला खूपच जास्त फुटेज मिळतं, पण त्यात बापलेकाच्या भूमिका असल्याने ते जस्टीफाईड आहे. मला आणखी एक गोष्ट खटकली ती म्हणजे गंभीर गोष्टी मांडतानाही चित्रपटाने सतत विनोदांचा आधार घेणं. प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यासाठी चित्रपटात जागा असणं आवश्यक होतं, पण दिग्दर्शकाचा कम्फर्ट झोन काॅमेडी असल्याने, चित्रपट हसण्यासाठी गरजेपेक्षा थोड्या जास्तच जागा शोधतो.

हे सारं लक्षात घेउनही चित्रपटात करमणूक होते हे खरं आहे. अवघड विषय प्रेक्षकाच्या पचनी पडेल अशी मांडणी करणंही सोपं अजिबातच नाही. त्यामुळे बेतीव वाटली तरीही राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांच्या पटकथेला श्रेय द्यायलाच हवं. मसान , लव्ह पर स्क्वेअर फुट , राझी यासारख्या चित्रपटांमधून आजचा खास लक्षवेधी अभिनेता ठरलेल्या विकी कौशलला इथे कमलेशची महत्वाची भूमिका मिळाली आहे. परेश रावल सुनील दत्तसारखा दिसत नसला, तरी त्याने काम आपल्या नेहमीच्याच सफाईने केलय. उत्तरार्धात तो अधिक पटतो. रणबीर कपूरचा परफाॅर्मन्स फ्लाॅलेस आणि त्याचा करीअर बेस्ट म्हणण्यासारखाच आहे. ट्रेलरमधे त्याचं बोलणं कॅरीकेचरीश वाटलं होतं, तसं इथे फारसं वाटत नाही. त्यामुळे चित्रपटाला फार गंभीरपणे घेतलं नाही तर तो सहज आवडण्यासारखा आहे. तरीही एकदा विषय पडद्यावर आणायचा, असं ठरवल्यावर राजकुमार हिरानीला  काही वेगळं करुन पहाण्याची संधी होती, जी त्याने घेतली असती तर... असं मात्र वाटत रहातं.
- गणेश मतकरी

Read more...

द शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस

>> Saturday, February 17, 2018


गिआर्मो डेल टोरोची सर्वोत्कृष्ट फिल्म ‘पॅन्स लॅबिरीन्थ’, आणि ‘द शेप ऑफ वाॅटर’ यांची अनेक बाबतीत तुलना होण्यासारखी आहे. फॅन्टसी आणि वास्तव यांचं मिश्रण या दोन्ही फिल्म्समधे आहे.  तिथे स्पॅनिश सिव्हील वाॅर होतं तर या सिनेमात कोल्ड वाॅर आहे. लॅबिरीन्थ मधे युद्घाची भयानकता फॅन्टसी भागात प्रतिकात्मक पद्धतीने येते, इथे कोल्ड वाॅरमधलं अविश्वासाचं आणि द्वेषाचं वातावरण त्याच पद्धतीने येतं. ‘प्रिन्सेस’ नावाने निवेदकाने संबोधलेली पण दुबळी , एकटी पडलेली नायिका आणि तिच्या संपर्कात येणारा फॅन्टसी जगातला जीव, हेदेखील दोन्हीकडे आहे. लॅबिरीन्थमधली ऑफेलिआ दुबळी आहे कारण ती लहान आहे, आणि तिची आई आर्मीत अधिकारी असलेल्या तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या पूर्ण आहारी गेलेली आहे. शेप ऑफ वाॅटरमधली इलायजा बोलू शकत नाही. जगापासून ती तुटल्यासारखी आहे. नायिकेला मदत करणारी पात्र आणि अत्यंत डार्क खलनायक हा देखील दोन्हीकडे आहे. या दोन्ही खलनायकांचा विशेष हा की ते स्वत:च्या शौर्याबद्दल , राष्ट्रप्रेमाबद्दल अभिमान बाळगतात , पण माणूसकीसारख्या साध्या गोष्टीची ते पर्वा करत नाहीत. पॅन्स लॅबिरीन्थचा शेवट आणि शेप ऑफ वाॅटरचा शेवटही सहजच तुलना करण्यासारखा आहे. का, तर प्रामुख्याने तो इन्टरप्रिटेशन प्रेक्षकावर सोडतो. तो सुखांत म्हणावा का नाही हे आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे.
तरीही या दोन चित्रपटांमधला एक मोठा फरक आहे तो वास्तव आणि फॅन्टसीची सरमिसळ करण्याच्या पद्धतीत. लॅबिरीन्थमधे फौनची भेट, त्याने सोपवलेल्या कामगिऱ्या हा पूर्ण भाग केवळ ऑफेलिआच्या डोक्यातला म्हणून वेगळा करता येतो. इथे तसं होत नाही. फॅन्टसीला सिम्बाॅलिक महत्व असलं, तरीही यातला ‘ॲसेट’  हा पाण्याखाली राहू शकणारा ह्यूमनाॅईड, हा केवळ नायिकेच्या नजरेतला नाही, तो सर्वांसाठी तितकाच खरा आहे.
चित्रपट घडतो तो १९६२ मधे, कोल्ड वाॅरच्या काळात. बाल्टीमोरमधल्या एका रहस्यमय सरकारी प्रयोगशाळेत मुकी नायिका इलायजा ( सॅली हाॅकीन्स ) साफसफाईचं काम करते. एका सिनेमा थिएटरच्या वरच्या मजल्यावर तिचं लहानसं घर आहे.  तिचा शेजारी , गाईल्स ( रिचर्ड जेन्कीन्स ) हा गे चित्रकार आणि बरोबर काम करणारी झेल्डा ( ऑक्टाविआ स्पेन्सर ) ही कृष्णवर्णीय बाई एवढेच तिचे मित्र. प्रयोगशाळेत ॲसेट ( डग जोन्स) आणला जातो तेव्हा इलायजा त्याच्याकडे स्वाभाविकपणेच ओढली जाते. त्याचं इतरांपेक्षा वेगळं असणं, बोलता न येणं हे तिला जवळचं वाटतं आणि त्याच्याशी ती स्वत:ची तुलना करायला लागते. त्याला क्रूरपणे वागवणारा कर्नल स्ट्रिकलन्ड ( मायकल शॅनन) जेव्हा ॲसेटच्या जीवावर उठतो, तेव्हा त्याला कसं वाचवायचं असा प्रश्न तिच्यापुढे उभा रहातो. यातली तिन्ही सकारात्मक पात्र ही समाजाला तिरस्करणीय आहेत. अपंग, कृष्णवर्णीय आणि होमोसेक्शुअल. याउलट यातला खलनायक हा तथाकथित राष्ट्रप्रेमी, कर्तबगार, समाजात सन्मान्य ठरलेला आहे. चित्रपटाची सबटेक्स्ट आहे ती हीच.
शेप ऑफ वाॅटरची थीम काय असा विचार केला , तर डिस्क्रिमिनेशन ही म्हणता येईल. वरवर नाॅर्मल दिसणाऱ्या समाजात किती वेगवेगळ्या पद्धतींनी माणसांना हीन लेखून बाजूला काढलं जातं याचं हे धक्कादायक चित्रण आहे. वर्ग, वर्ण , सेक्शुअल प्रेफरन्स , शैक्षणिक पात्रता, राजकीय भूमिका, अपंगत्व , रुप, अशा अनेक बाबतीतल्या डिस्क्रिमिनेशनची यात उदाहरणं आहेत. अगदी पुरुषांकडून स्त्रीयांना देण्यात येणारी कनिष्ठ वागणूकदेखील त्यात येते. यातला कर्नल हा उच्चशिक्षीत आणि उच्चपदस्थ आहे. पण तो आपल्या पत्नीला जी वागणूक देतो ती, आणि कृष्णवर्णीय, खालच्या सांपत्तिक आणि सामाजिक स्तरातून आलेल्या झेल्डाचा पती तिला जी वागणूक देतो ती, यांच्यात तुलना सहज शक्य आहे. हे सारं दाखवताना चित्रपट कुठेही प्रिची होत नाही, पण ते डेल टोरो सारख्या दिग्दर्शकाकडून अपेक्षितच आहे.
सॅली हाॅकीन्सची ही मेजर लक्षात रहाणारी भूमिका आहे जी तिला स्टार पदाला नक्कीच नेऊन बसवेल. ॲसेटचं काम करणारा डग जोन्स हा या प्रकारच्या अदृश्य भूमिका अनेकदा करतो. हेलबाॅय मालिकेतला एब सेपिअन, पॅन्स लॅबिरीन्थ मधला फौन आणि पेल मॅन , यासारख्या भूमिका जोन्जने केल्यायत. पण तो प्रत्यक्षात पडद्यावर दिसत नसल्याने आपल्याला ते लक्षात येत नाही. इथली भूमिका त्याच पठडीतली . जेन्कीन्स , स्पेन्सर हे तर सराईतच परफाॅर्मर्स आहेत. ग्रे शेड्सच्या भूमिकात मायकल शॅनन नेहमीच दिसतो पण ही भूमिका खूपच गडद आहे. ती लॅबिरीन्थमधल्या क्रूर कॅप्टन विडालची वेळोवेळी आठवण करुन देते.
मुळात शेप ऑफ वाॅटरच्या कथेचा एकूण आकार हा प्रेमकथेचा आहे, आणि चित्रपट तो शेवटपर्यंत तसाच ठेवतो. सबटेक्स्टचा सततचा वापर असतानाही, तो कुठेही कथेकडे वा पात्रांकडे दुर्लक्ष करतोय असं दिसत नाही. पूर्णपणे संगणकाच्या आहारी न जाता पण त्याचा योग्य तो वापर करुन स्पेक्टॅक्युलर चित्रपट बनवणाऱ्यांमधला डेल टोरो हा महत्वाचा दिग्दर्शक आहे आणि त्याचं हे दृश्यभागावरचं नियंत्रण इथेही दिसून येतं. पिरीअडचा वापर, किंवा बेसिक सीजी इफेक्ट्स आता किती सफाईदारपणे दाखवता येऊ शकतात हे आपल्याला माहीतच आहे. पण केवळ तंत्रज्ञान उपलब्ध असणं वेगळं आणि दिग्दर्शकाने ते अनपेक्षित पद्धतीने वापरुन दाखवणं वेगळं.
शेप ऑफ वाॅटरमधे खास लक्षात रहाण्यासारखा प्रसंग आहे तो इलायजाच्या बाथरुममधला प्रेमप्रसंग, ज्याबद्दल मी काही सांगण्यापेक्षा प्रत्येकाने तो पहावा हेच बरं. दुर्दैवाने, आपल्या सेन्साॅर बोर्डाने त्यातल्या काही शाॅट्सना कात्री लावली आहे. इतरही ठिकाणी ती लागलेली आहेच. पण त्यासाठी सिनेमा थेट छोट्या पडद्यावर पाहू नका. मी सुचवेन की आधी चित्रपट थिएटरमधे पहा आणि मग डाऊनलोड करुन पहा. एकदा थिएटरला पाहिला असल्याने, मग गिल्टी वाटायचं काही कारण नाही. नको तिथे कात्र्या लावूनही आपल्या मठ्ठ सेन्साॅर बोर्डाने या भव्य आणि फॅन्टसीत रुजलेल्या प्रेमकथेच्या माध्यमातून सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्याचं आद्य कर्तव्य पार पाडलच आहे. पण मी म्हणेन की आपल्या मुलांच्या बुद्धीमत्तेवर विश्वास असलेल्या प्रत्येकाने एकदा स्वत: पाहून मग हा चित्रपट त्यांना जरुर दाखवावा. संस्कार हे केवळ पाठ्यपुस्तकांमधून आणि धर्मग्रंथांमधून होत नाहीत. चित्रपटांमधूनही होतात.
- ganesh matkari

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP