ब्लॉग वाचकांना निमंत्रण

>> Sunday, September 23, 2012




'चौकटीबाहेरचा सिनेमा' चे प्रकाशन

व.पु.काळे ह्यांच्या लोकप्रिय 'पार्टनर' या कादंबरीवर आधारित 'श्री पार्टनर' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या निमित्ताने प्रभात चित्र मंडळ आणि पर्व क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'साहित्याचे सिनेमातले रुपांतर' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. येत्या २५ सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात हा कार्यक्रम संपन्न होईल. या परिसंवादात चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी, प्रभात चित्र मंडळाचे सचिव संतोष पाठारे, चित्रपट दिग्दर्शक आणि प्रख्यात लेखक अभिराम भडकमकर, श्री पार्टनर चित्रपटाचे दिग्दर्शक समीर सुर्वे आणि ज्येष्ठ लेखक अनंत सामंत सहभागी होणार आहेत. साहित्याच्या सिनेमातल्या रुपांतराच्या विविध पैलूंवर या वेळी विस्ताराने चर्चा होईल. चित्रपट क्षेत्रातल्या नवोदितांसाठी तसेच जनसंज्ञापनाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त असलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या परिसंवादापूर्वी चित्रपट अभ्यासक गणेश मतकरी यांच्या 'चौकटी बाहेरचा सिनेमा' या पुस्तकाचे प्रकाशन होईल. ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे तसेच अभिराम भडकमकर यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होईल.
 आपला सिनेमास्कोप ब्लॉगच्या वाचकांनीही पुस्तक प्रकाशन आणि सिनेचर्चेच्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
- ब्लॉगएडिटर


Read more...

न भावलेला बर्फी

>> Monday, September 17, 2012


चित्रपट चांगला कधी असतो? तो बनवणा-यांचा हेतू चांगला असणं ,त्याला चांगला ठरवायला पुरेसं आहे का? इतर चित्रपट त्याहून वाईट ,किंवा थिल्लर असणं ,त्याला आपसूक चांगला बनवतात का? चित्रपट एखाद्या गंभीर आशयाभोवती गुंफलेला असणं ,त्याला कलाकृती म्हणून चांगलं ठरवतं का? त्याचं बॉक्स आँफिसवरलं यश? माझ्या मते यातली कोणतीही एक वा एकत्रितपणे सर्व गोष्टीदेखील चित्रपटाला चांगलं सिध्द करण्यासाठी पुरेशा नाहीत. हे खरं आहे, की यातली कोणती ना कोणती गोष्ट आपल्याला आवडू शकते ,आणि आपल्यापुरती या चित्रपटाची किंमत खूपच वाढवू शकते. मात्र अशा वेळी या चित्रपटाकडे अधिक चौकसपणे आणि वैयक्तिक आवडिनिवडीपलीकडे जाऊन पाहाणं ,हे आपल्याला चित्रपटाचा दर्जा पूर्णपणे जोखायला मदत करतं.
याच वर्षी मी एक बंगाली फिल्म पाहिली, चॅप्लीन नावाची. आपण चॅप्लीन सारख्या एका अत्यंत बुध्दिवान आणि बुध्दिवादी दिग्दर्शकाची -नटाची , जी एक हसू आणि आसूच्या संगमावरली ढोबळ प्रतिमा करुन ठेवली आहे ,तिला तोड नाही. हा अनिन्दो बॅनर्जी दिग्दर्शित चित्रपटदेखील याच प्रतिमेला पिळणारा होता. यात व्हरायटी एन्टरटेनमेन्ट शोमधे माईमसारखा पांढरा रंग चेह-याला फासून ( हे का कळलं नाही, मूकपटात काम करणारा नट काही माईम नसतो) स्लॅपस्टिक करत चॅप्लिन साकारणारा एक गरीब ( आणि अर्थात बिचारा) माणूस असतो. त्याचा एक सात वर्षांचा मुलगा असतो. पुढे या माणसाचे स्लॅपस्टिक विनोद आणि मुलाला ब्रेन ट्यूमर वा तत्सम आजार होईपर्यंत दुर्दैवाचे दशावतार, आळीपाळीने येतात. गंमत म्हणजे ही अतिशय कॅलक्युलेटिव आणि भडक फिल्मदेखील प्रेक्षकाना आवडली. सामान्य प्रेक्षकालाच नाही, तर विचार करु शकणा-या प्रेक्षकालादेखील, कारण माझ्याबरोबर प्रेक्षकात काही जाणकार दिग्दर्शकही होते ,जे या फिल्मच्या बाजूने हिरीरीने बोलत होते. का, तर चॅप्लिन आणि दु:ख यांचं घिसंपिटं, पण प्रगल्भतेचा आव आणणारं मिश्रण.असो ,चॅप्लीनची प्रतिमा आणि कडू गोड कथानक याच संकल्पनांवर आधारीत ’बर्फी’ ,या ’चॅप्लिन’च्या तुलनेत मास्टरपीसच आहे. पण 'तुलनेत' ,स्वतंत्रपणे नाही.
बर्फी पाहाताना मला पहिला प्रश्न हा पडला ,की ’बर्फी’ला चॅप्लीनच्या प्रतिमेची गरज का पडावी.( बंगाल्यांना चॅप्लिनचं काय प्रेम?) राज कपूरच्या डोळ्यापुढली ट्रँपची प्रतिमा ही मुळात चॅप्लिनने प्रेरित होती, त्यामुळे हा चॅप्लिनबरोबर राज कपूरची आठवण जागवण्याचाही प्रयत्न आहे, हे उघड आहे. मात्र ,हा हिशेब सोडल्यास फार काही कारण दिसत नाही. एक तर चॅप्लिनचा काळ मूकपटांचा असला तरी त्याची ट्रँप व्यक्तिरेखा मूक नाही. त्यामुळे त्या दृष्टिने होणारं जोडकाम अपुरं आहे. तरीहि हे गिमिक मी चालवून घेतलं असतं जर ते टेक्शचरली चित्रपटाबरोबर जात असतं . म्हणजे पूर्ण चित्रपट त्या प्रकारे हाताळला जाता ,तर.तसं काही होत नाही . सुरुवातीची थोडी पळापळ ,सिटी लाईट्सच्या ओपनिंग सिक्वेन्सवरुन घेतलेला अधिकृत चॅप्लिन होमेज मानण्याजोगा पुतळ्याचा प्रसंग आणि मधेच चिकटवल्यासारखे येणारे इन्स्पेक्टरबरोबरचे ( सौरभ शुक्ला) काही प्रसंग सोडता बर्फी चॅप्लिनसारखा वागत नाही.चित्रपटही इतर वेळा स्लॅपस्टिक वापरत नाही. मग हा अट्टाहास कशाला?
बर्फी सुरू झाल्यावर काही वेळात मला वाटायला लागलं ,की आपल्यापर्यंत हा पोचतच नाही आहे. ते काय सांगतायत ते कळतंय पण ते केवळ सांगितलं जातय. पडद्यावर उलगडताना दिसत नाही.एकतर चित्रपटाच्या वर्तमानात चालू होउन मागे जाण्यात , आणि वर स्लॅपस्टिक कसरतीत ,या व्यक्तिरेखा उभ्या करायला त्याला वेळ होईना . पुढे भूतकाळात थोडंफार सेटल झाल्यावरही व्यक्तिचित्रणाचा आनंदच होता. म्हणजे पहा, आपण श्रुती (इलेना डी'क्रूज) गावात आल्यावरच्या बर्फीबरोबरच्या ( रणबीर कपूर)  पहिल्या भेटीतली गंमत , मग पुढे तिला त्याचं अपंगत्व समजणं वगैरे समजू शकतो ,  पण मग गाणी सुरू होतात आणि प्रकरण एकदम चुंबनदृश्य आणि लग्नाच्या मागणी पर्यंत पोचतं. म्हणजे किती ही प्रगती !  तीदेखील आजच्या काळातली नाही ,तर चाळीसेक वर्षांपूर्वीची. ही प्रगती, त्यातून एक आधीच लग्न ठरलेली नॉर्मल मुलगी आणि बोलता वा ऐकता न येऊ शकणारा मुलगा यांच्या नात्यातली प्रगती ,जी कदाचित एका पूर्ण चित्रपटाचा विषय होऊ शकेलशी प्रगती कशी झाली ,ही अजिबात न दिसताही आपण गृहीत धरावी असं चित्रपट सांगतो. का ? कोणाला माहीत.
बरं ,तेवढ्याने भागत नाही. आता तो एक रहस्यमय गोष्ट सांगायला घेतो ,ज्यात एका आँटिस्टिक मुलीचं, झिलमिलचं (प्रियांका चोप्रा) अपहरण आहे . हे रहस्य मुळात इतकं फुटकळ आहे ( आणि कास्टिंगच्या निर्णयाने तर ते रहस्य उरलेलंच नाही) की त्यात थोडी गुंतागुंत करण्यासाठी गोष्ट तीन कालावधींमधे मागेपुढे जायला लागते. तरीही रहस्य पारदर्शकच राहातं हे सोडा.आता ’बर्फी’ एक नवं प्रकरण सुरू करतो जे दाखवणं पहिल्या प्रेमप्रकरणाहूनही अधिक कठीण आहे. तो बर्फी आणि झिलमिलच्या जुजबी मैत्रीचं विश्वासात, गहि-या मैत्रीत आणि अखेर प्रेमात रुपांतर झालेलं दाखवायचं ठरवतो. स्ट्रॅटेजी तीच. काही जुजबी प्रसंग घालायचे आणि गाणी घालत राहायचं.
म्हणजेच दोन अशी नाती ,जी बरीचशी शब्दांवाचून तयार होणं आवश्यक आहे ,ती तयार झाल्याचं गाण्यांच्या ,म्हणजे शब्दांच्याच मदतीने  आपल्याला सांगितलं जातं. या सा-याला उत्तम छायाचित्रणाची, रणबीर कपूर आणि प्रियांकाच्या उत्तम , आणि इलेना डिक्रूजच्या सहज अभिनयाची , ब-यापैकी गाण्यांची साथ आहे, पण हे सारं ही नाती बनताना दिसण्याची जागा घेउ शकेल का? मला वाटतं नाही.
थोडक्यात ,चित्रपट जिथे वेळ काढायचा तिथे काढत नाही, आणि फुटकळ रहस्याला नॉन लिनिअर ट्रिटमेन्ट देण्यात घालवतो. दिग्दर्शक अनुराग बसूचा एकूण अप्रोचच मला असा साध्या गोष्टी उगाच कॉम्प्लिकेटेड करण्याचा ,आणि महत्वाच्या गोष्टी बाजूला टाकण्याचा दिसतो. उदाहरणार्थ बर्फी हे नाव. आता हे नाव सरळ गोड वाटल्याने दिलं असं असू शकतं, पण नाही. त्याला एक बॅकस्टोरी. आईचा रेडिओ, मर्फी हे नाव, आईचा मृत्यू ,रेडिओ आणि मुका यामधला विरोधाभास, बोलता न आल्याने बर्फी हा उच्चार....वगैरे ,पण श्रुती बर्फीच्या प्रेमात कशी पडली यासारख्या पटकथेसाठी महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर? काहीच नाही.
नॉन लिनिअर कथानकांना स्वत:ची एक शिस्त असते. ते कधी पुढे -मागे जातात याचं एक तर्कशास्त्र असतं. त्याखेरीज विशिष्ट काळात विशिष्ट व्यक्ती अशा अशा दिसतात या प्रकारचे व्हिजुअल क्लूज असतात. (ज्यांना मला काय म्हणायचंय याचं अधिक स्पष्टिकरण हवं असेल त्यांनी मॅकगिगानचा ’विकर पार्क’ पाहावा. दोन वर्षांच्या कालावधीवर पुढे मागे करणारी गोष्ट सांगताना संपूर्ण क्लॅरीटी ठेवणारा हा चित्रपट साध्या रोमँटिक कॉमेडीचं बेमालूमपणे रहस्यपटात रुपांतर करतो.)बर्फी या शिस्तीकडे दुर्लक्ष करतो आणि ब-याचदा पाहाणा-याला गोंधळात पाडतो.
हा निरर्थक रहस्याच्या तपासात गुंतलेला सिनेमा अखेरच्या पंधरा एक मिनिटात मात्र कथानकाचे धागे चांगले बांधतो आणि समाधानकारक शेवटाची इल्युजन तयार करतो.. ’ते सुखानं नांदू लागले' हे मूळ फ्लॅशबॅक डिव्हाइसमधेच उघड असल्याने , या प्रकारचं कठीण नातं ,लग्नानंतर कसं टिकेल हे आपण विचारू शकत नाही. चित्रपट आधी जसा ते ’जमलं’ ,हे सांगतो ,तसाच आताही ,ते ’टिकलं’ असं सांगून मोकळा होतो.
कदाचित हा चित्रपट दिग्दर्शकाने न लिहिता लेखकाकडून लिहून घेतला असता तर फार बरं झालं असतं. दिग्दर्शकाला चमकदार जागा, वा इन्टरेस्टिंग दृश्यरचना सुचतात, वा उसन्या घेता येतात. मात्र पटकथेचा अर्थाच्या दृष्टिने पूर्ण विचार ,तो ब-याचदा करू शकत नाही. क्वचित अनुराग कश्यप किंवा विशाल भारद्वाज सारखा माणूस लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही करू शकतो, पण हा अपवाद, नियम नव्हे.
’बर्फी’ पाहाताना मला तेच वाटलं जे ’रॉकस्टार’ पाहाताना वाटलं होतं. कथानकात शक्यता असताना , आणि रणबीर कपूरसारखा या पिढीचा सर्वोत्तम नट उपलब्ध असताना पटकथेने चित्रपटाचा घात करणं यासारखी वाईट गोष्ट नाही. पण आपली ही रड रोजचीच आहे.  हिंदी चित्रपटांच्या पटकथा सुधारतील ही आशा फोल आहे. पण कधीकाळी त्या सुधाराव्या असं वाटत असेल, तर दिग्दर्शकानी सरसकट त्या लिहिणं बंद करणं ,हे सगळ्यात महत्वाचं पाऊल ठरेल.
- गणेश मतकरी

Read more...

साउंड आँफ नॉईस- नव्या बंडाची सुरुवात

>> Monday, September 3, 2012


एक परिचित दृश्य. भरधाव जाणारी गाडी. प्रथम दिसतो ,तो गती सूचित करणारा मागला टायर. साउंडट्रॅकवरही ,या गतीला सुसंगत असं जोरदार संगीत. मग दिसते, ती प्रत्यक्ष गाडी, एक व्हॅन. मग ही गाडी चालवणारी तरुणी, शाना पेरशाँ (अभिनेत्रीचं नावही हेच). शानाची मान संगीताच्या तालावर हलते आहे, म्हणजे हे केवळ पार्श्वसंगीत नाही. कदाचित गाडीत लावलेलं असावं. आता ती मान वळवून मागे पाहाते आणि आपल्या लक्षात येतं ,की संगीत गाडीतलंच आहे, पण म्युझिक सिस्टीमवर लावलेलं नाही. तर शानाच्या मागे एक ड्रमर बसलाय, ड्रम्सचा एक मोठासा सेट घेउन. हा मॅग्नस ( मॅग्नस यॉरहेन्सन).त्याच्या ड्रम्सच्या तालावर व्हॅनची गती वाढत चालली आहे.
केवळ परिणामासाठी घातलेलं पार्श्वसंगीत आणि कथेच्या अवकाशात प्रत्यक्ष स्थान असणारं संगीत यांची ही सरमिसळ इथे केवळ तेवढ्यापुरती गंमतीदार वाटत नाही तर ती ब-याच प्रमाणात चित्रपटाचा मूड ठरवून देते. या सरमिसळीला ‘साउंड आँफ नॉईस’ मधे महत्व आहे कारण मुळात संगीतालाच या चित्रपटाच्या संकल्पनेत केंद्रस्थान आहे. स्वीडिश-फ्रेन्च चित्रपट ‘साउंड आँफ नॉईस’ हे विनोद, गुन्हेगारी आणि संगीतिका, यांचं एक अतिशय विक्षिप्त मिश्रण आहे. विक्षिप्त अशासाठी, की यातल्या एकाही घटकाचा, तो परिचीत अर्थाने उपयोग करत नाही. इथला विनोद उपरोधाने वापरला जातो तर गुन्हेगारी प्रतिकात्मक असल्याप्रमाणे. संगीत हे  नेहमीसारखं नाच-गाण्यांच्या साथीने येत नाही, तर आँल्टरनेटिव संगीताचे तुकडे ,आविष्कारस्वातंत्र्याला वाट करुन दिल्यासारखे येतात.
 दिदर्शक ओला सिमॉन्सन आणि योहान्स स्ट्यार्न निल्सन यांचा 'साउंड आँफ नॉईस' (२०१०) हा हाय कन्सेप्ट चित्रपट आहे. इतका ,की त्यात एक सोडून दोन हाय कन्सेप्ट कथासूत्रांचं मिश्रण आहे. पहिलं आहे ते संगीत विश्वातल्या एका नामांकित कुटुंबात जन्मूनही संगीताचा गंध नसलेल्या पोलिस अधिकारी नायकाने केलेला संगीताशी संबंधित गुन्ह्यांचा तपास, आणि  दुसरं आहे, ते सर्वत्र चालू असलेल्या सुमार संगीत निर्मितीचा वीट आलेल्या बंडखोर म्युझिशीअन्सनी अकल्पनीय साधनांचा वाद्यांसारखा वापर करुन संपूर्ण शहराला वेठीला धरणं. ही दुसरी संकल्पना तर खूपच तपशीलात रंगवलेली आहे. लुइगी रूसोलोने १९१३ मधे उपलब्ध वाद्यांमधून होणारी संगीतनिर्मिती किती तोकडी आहे अशी कल्पना आपल्या 'द आर्ट आँफ नॉईसेस' या प्रबंधात मांडली होती ,ज्याच्या नावाशी चित्रपटाच्या नावाचं साम्य हा उघडच योगायोग नाही. औद्योगिक क्रांतिमुळे कानावर पडणा-या आवाजात किती बदल होत गेला आहे हे त्या प्रबंधात नोंदवलं गेलं होतं आणि या नव्या शक्यतांमुळे संगीत कसं बदलू शकतं असा त्याचा रोख होता. भविष्यात उपलब्ध होणा-या नव्या ध्वनीला त्यात सहा प्रकारांत विभागलं होतं. हे सहा प्रकारदेखील चित्रपटाच्या संकल्पनेत सहभागी होतात ते सहा बंडखोरांच्या निमित्ताने.
 मॅग्नस आणि शाना हे या बंडखोर टोळीचे प्रमुख आहेत. मॅग्नसने आपल्या संगीतक्रांतिला नव्या पातळीवर नेण्यासाठी एक योजना मांडली आहे. तिचं नाव ' म्युझिक फॉर वन सिटी अँन्ड सिक्स ड्रमर्स' , ज्यातला सहा हा आकडा अर्थातच आर्ट आँफ नॉईसेसची आठवण करून देणारा.सुरूवातीला जेव्हा मॅग्नस आपल्या योजनेचं बाड शानाच्या हवाली करतो तेव्हा ते पाहून आपल्याला फार काही लक्षात येत नाही. बरोबरच्या गंमतीदार अॅनिमेशनमधून ही योजना थोडक्यात स्पष्टही केली जाते ,मात्र आपण त्या पध्दतीचा विचार करत नसल्यास तेही आपल्याला पूर्णपणे न कळण्याची शक्यता अधिक. एका शहरात बरंच गुंतागुंतीचं आणि संगीताशी संबंधित काहीतरी घडवण्याचा प्रयत्न असावा एवढं समजलं तरी पुरे. (' म्युझिक फॉर वन अपार्टमेन्ट अँन्ड सिक्स ड्रमर्स 'ही याच मंडळींनी बनवलेली शॉर्ट फिल्म आहे ज्यावरून हा पूर्ण लांबीचा चित्रपट सुचला . ती  पाहिली असल्यास मात्र तुम्ही या बंडाची थोडीफार कल्पना करू शकता) शाना या योजनेवर खूष होते आणि तडकाफडकी ती पूर्णत्वाला नेण्याची तयारी सुरु करते.
इकडे आमाडीयूस( बेन्ड निल्सन)हा पोलिस इन्स्पेक्टर थोडा काळजीत पडलेला. महान कंपोजर मोझार्टशी जोडलं गेलेलं नाव लावणारा हा अधिकारी संगीत क्षेत्रातल्या एका नावाजलेल्या घराण्याचा भाग असतो. वडील आणि भाऊ याच क्षेत्रातली नावाजलेली व्यक्तिमत्व, पण टोन डेफ असल्याने आमाडियूसला संगीताचा गंध नाही.  घरच्या आणि बाहेरच्या लोकांकडून कायमच दुर्लक्षित राहिलेला तो, संगीताचा द्वेष करतो. संगीत विसरण्याचा प्रयत्न करणार््या या नायकाला काहितरी गडबड असल्याची शंका येते ,ती संगीतात बीट्स मोजण्यासाठी वापरलं जाणारं  मेट्रोनोम हे छोटंसं यंत्र एका अपघातस्थळी मिळाल्यावर. लवकरच बंडखोर आपला पहिला संगीत हल्ला चढवतात आणि आमाडीयूसला त्यांच्या बंदोबस्ताचं काम स्वीकारावं लागतं.
संकल्पनेच्या स्तरावर ब्रिलिअंट चित्रपटांचा ब्रिलिअन्स प्रत्यक्ष निर्मितीत टिकवणं हे कठीण काम असतं.विशेषतः जेव्हा या संकल्पना दृश्य योजनेच्या पलीकडे जाणा-या असतात तेव्हा. परफ्यूम मधे योजलेला वासासारख्या ,प्रेक्षकाला न जाणवणा-या गोष्टिचा वापर,   मेट्रिक्स मधल्या तत्वज्ञानासंबंधित कल्पना , यासारख्या गोष्टी प्रेक्षकाला खास विचार करायला न लागता त्याच्यापर्यंत पोचायला लागतात. तरच तो ककथानकाशी समरस होऊ शकतो. इथली संगीताला गुन्ह्याप्रमाणे मांडण्याची आणि या संगीताच्या खेळामुळे शहर खरोखरच हादरून जाऊ शकेल ही ,या दोन्ही कल्पना संहितेत ठिक वाटू शकतात पण सादरीकरणात त्यांचा टिकाव लागणं हे खरं आव्हान आहे.चित्रपट हे थोड्या विनोदाच्या आणि थोड्या प्रेक्षकांकडून अपेक्षित असलेल्या विलिंग सस्पेन्शन आँफ डिसबिलीफच्या मदतीने करून दाखवतो. उदाहरणार्थ बँकेवरल्या दरोड्यासारखा भासणारा संगीतप्रयोग पाहाता येईल. इथे ड्रमर्सनी बँक रॉबर्सच्या पारंपारिक वेषात येणं आणि त्याच थाटात पण महत्वाचे शब्द फिरवून बँकेतल्या लोकांना धमकावणं ('धिस इज अ गिग . वुई आर आेन्ली हिअर फॉर द म्युझिक. लिसन , अॅन्ड नोबडी विल गेट हर्ट' ) त्याला जोडून येणारा पोलिसांना खबर मिळण्याचा ,त्यांनी बँकेपर्यत येण्याचा ट्रॅक आणि अर्थात  'गिग' चा भाग असलेलं ,पण पडद्यावरल्या संकेताना पूरक असणारं वेगवान संगीत या सगळ्याचा परिणाम म्हणून ही घटना कथानकाच्या चाैकटीत विश्वसनीय होते. याच पध्दतीने चित्रपट बहुतेक प्रसंग हाताळतो आणि ब-याच प्रमाणात संकल्पनेचा परिणाम शाबूत ठेवतो.
इथे एक गोष्ट उघड आहे आणि ती म्हणजे कथानकाचा अर्थ शब्दश: घेता येणार नाही. बंडखोरांचा विरोध आहे तो मिडिआँक्रिटिला आणि आमाडियूसचा विरोध आहे तो त्याच्या कुटुंबियांच्या वर्तुळातल्या एलिटिस्ट वागण्याला. कलाविश्वाच्या अगदी खालच्या आणि अगदी वरच्या टोकांना मोडून काढत चित्रपट महत्व मांडतो ते नव्या विचारांचं, आविष्कार स्वातंत्र्याचं आणि व्यक्तिवादाचं. त्याचं हे धोरण त्याला संगीतक्षेत्रापुरतं मर्यादित ठेवत नाही, तर एक सामाजिक विधान म्हणून प्रेक्षकापुढे आणतो.
 -गणेश मतकरी

Read more...

पुन्हा वासेपूर- दुस-या पिढीची गुन्हेगारी

>> Sunday, August 26, 2012

गँग्ज आँफ वासेपुरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी गर्दी तर केली ,पण झपाट्याने त्याविषयी एक असंतोषाचं वातावरणदेखील पसरलं. याला अर्थातच कारणं होती. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे याचं अपरिचित टेक्श्चर. सरळसोट कथानक रंजक पध्दतीने सांगितलं जावं अशी आपल्या प्रेक्षकांची आपल्या चित्रपटांकडून अपेक्षा असते आणि आपल्या चित्रपटांची कथाप्रधान परंपरा पाहाता त्यांच्या दृष्टिकोनातून ती रास्तदेखील मानता येईल. या अपेक्षेने अन पोस्टरवरल्या टिपिकल सूडपटांना शोभणा-या टॅगलाईन्स वाचून गेलेला प्रेक्षक चार पाच दशकांच्या कालावधीवर पसरलेलं हे गँगस्टरपट आणि माहितीपट यांचं मिश्रण ,तेदेखील अपूर्ण शेवटासह पाहून भांबावला असल्यास आश्चर्य नाही.पोस्टरवर हा चित्रपटाचा प्रथम भाग असल्याचा अजिबात उल्लेख नसल्याने तर ब-याच जणांना चित्रपटाअखेर येणारी ’ टु बी कन्टिन्यूड ’ही सूचनादेखील प्रतिकात्मक, हे गँगवॉर असंच सुरू राहाणार ,या आशयाची देखील वाटली. सुदैवाने कश्यप कंपूने एक गोष्ट उत्तम केली.दुस-या भागाच्या प्रदर्शनात फार वेळ काढला नाही. पहिला भाग , आणि त्याबद्दलच्या भल्याबु-या प्रतिक्रिया डोक्यात असतानाच आपल्याला पुढला भाग पाहायला मिळाला.
एक गोष्ट वासेपुरच्या दुस-या भागाकडे पाहाताना लक्षात ठेवायला हवी. आणि ती म्हणजे तो पारंपारिक अर्थाने दुसरा भाग नाही. तर एका लांब चित्रपटाचा ,तो उत्तरार्ध आहे. अनुराग कश्यपने पहिला भाग सेल्फ कन्टेन्ड करण्याचा प्रयत्नही केला नाही यावरुनही ते स्पष्ट होतं . त्याच्या दृष्टिने गँग्ज आँफ वासेपूर दोन भागात पाहाणंच न्याय्य आहे. असं असतानाही, चित्रपटाचे असे दोन तुकडे करणं ,केवळ लांबीमुळे आहे असं मात्र म्हणता येणार नाही. कारण त्यात अगदी मूलभूत स्वरुपाचे काही फरक आहेत. पहिला आणि कदाचित सर्वात महत्वाचा म्हणजे पहिला भाग हा जवळजवळ सेट अप आहे ,तर दुसरा भाग मुख्य गोष्ट. दुस-या भागातल्या घटना घडण्यासाठी जी पार्श्वभूमी हवी ती तयार करण्याचं काम हे प्रामुख्याने पहिल्या भागाचं काम होतं. ही पार्श्वभूमी मुळातच इन्टरेस्टिंग होती आणि ती पुरेशा तपशीलात येण्यासाठी अडीच पावणेतीन तास आवश्यक होते असं आपण मानूनही चालू, मात्र हेदेखील तितकंच खरं, की चित्रपट पाहून असंतुष्ट राहिलेल्या प्रेक्षकांच्या असंतोषाचं खरं कारणही ,पहिल्या भागाच्या या गुणधर्माशीच संबंधित आहे. या प्रेक्षकांची चित्रपटाकडून जी अपेक्षा होती, त्या चौकटीत पहिला भाग नॉनस्टार्टर राहिला, आणि कथेचा खरा प्राण त्याने दुस-या भागासाठी राखून ठेवला. पहिल्या भागाचा एकूण अवाका, त्यात घडणा-या घटनांचा कालावधी ,चित्रपटातल्या नाट्यपूर्णतेचं आणि वास्तववादी वृत्तीचं प्रमाण हे सारंच दोन्ही भागात वेगवेगळं आहे. त्याशिवाय ज्या प्रकारे पहिला भाग उघड उघड अपूर्ण आहे, तसं दुस-या भागाचं नाही. नायकाच्या वडिलांच्या हत्येची बॅकस्टोरी असणारा हा जवळपास पूर्ण चित्रपट आहे. पहिला भाग पाहिला नसला तरी या चित्रपटाच्या प्रेक्षकाला फार फरक पडणार नाही.
वासेपुरच्या पहिल्या भागाविषयी लिहिताना मी या चित्रपटाची प्रेरणा अनुराग कश्यपला  कपोलाच्या ( आणि अर्थात पुझोच्याही ) गॉडफादर वरून मिळाली असावी असं लिहिलं होतं . मांडणी आणि तपशीलात जराही सारखेपणा नसूनही व्यक्तिरेखांचे टाईप्स ,घटनाक्रम उलगडण्यातलं वा कथानकाच्या रचनेतलं साम्य ,विशिष्ट दिशेने होणारा प्रवास , या बाबतीत दोन्ही चित्रपटात तुलना होण्याजोगी आहे.धोरणी डॉन व्हिटो कॉर्लिओनीची आठवण करुन देणारा सरदार खान (प्रथम भागातला मनोज बाजपेयी) , वडिलांवरल्या हल्ल्याने पेटून उठणा-या आणि आपल्या शीघ्रकोपीपणाचा बळी ठरणा-या सनीची आठवण करुन देणारा दानीश (विनीत कुमार) आणि काहीशा उप-या परिस्थितीत वाढलेल्या ,पण अचानक वडिलांच्या वारशाला जागणा-या आणि आपला बदला पूर्ण करणा-या मायकेलची आठवण जागवणारा फैजल (नवाझुद्दैन सिद्दिकी)ही पात्रं तर सहजच आेळखता येण्यासारखी.अर्थात वासेपुर द्वयीमधे सरदार आणि फैजल यांना अधिक वाव आहे, ते जवळजवळ एकेका भागाचे नायक आहेत. दानीशची थोडी भूमिका पहिल्या भागात असली ,तरी दुस-या भागात त्याला फारच कमी वाव आहे.वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रकरणात त्याचा लगेचच बळी जातो. फैजल आपला व्यसनीपणा थोडा बाजूला ठेवून गुन्हेगारांतल्या एकाचा त्वरीत आणि दहशत बसेलशा पध्दतीने बळी घेतो आणि आपला प्रमुख शत्रू रामाधीर सिंग (तिगमांशू धुलीया) ,याच्याबरोबर समझोत्याची बोलणी करुन सुलतान (पंकज त्रिपाठी) या दुय्यम शत्रूला दूर ठेवतो. अर्थात हा समझोता काही कायम टिकणार नसतो . त्याप्रमाणे सुलतान लवकरच त्यातून सुटण्याचा विचार करायला लागतो.
वासेपूरचा पहिला भाग न आवडलेल्यांनाही दुसरा आवडण्याची अधिक शक्यता आहे कारण तो उघडच अधिक रंजक आहे. पहिल्या भागाप्रमाणे इथेही गँगवॉर, राजकारण, बदलती सामाजिक परिस्थिती आणि हिंदी चित्रपटांचा वाढता प्रभाव यांचं टेक्स्टमधे मिश्रण आहे ,पण हे कथानक थोड्या कमी कालावधीत घडणारं आणि मुख्य कुटुंबाकडे अधिक लक्ष देणारं आहे.पहिल्या भागात सरदार खान आणि रामाधीर यांच्यातलं वैर खूप ताणलं जातं पण फार काही घडत नाही. इतकं नाही ,की अखेर सरदार खानची सूडाची योजनाही अपूर्ण राहाते. त्याउलट इथे अनेक पात्र आहेत जी व्यक्तिचित्रणात खास आहेत आणि ती सतत आपल्या किर्तीला शोभणा-या गोष्टी करताना दिसतात. फैजलला तुल्यबळ भूमिकेतली त्याची पत्नी मोहसीना ( हुमा कुरेशी), फैजलचा ब्लेड चघळणारा भाऊ परपेन्डिक्युलर (आदित्य कुमार) आणि त्याचा बिकट प्रसंगी काढता पाय घेणारा मित्र टँजंट, फैजलचा सावत्र भाऊ डेफिनेट ( झीशान काद्री) असे अनेक जण चित्रपटात वेगवेगळ्या वेळी लक्षवेधी ठरतात. प्रत्येकजण केवळ गप्पा न मारता काहीतरी करताना दिसतो ज्यात आपण गुंतलेले तर राहातोच ,वर त्यांच्या उद्योगांच्या निमित्ताने दिग्दर्शकाला काही सेट अँक्शन पीसेस घालून आपली तंत्रावरची पकड दाखवण्याची संधी मिळते. परपेन्डिक्युलरवरचा जीवघेणा हल्ला, अडचणीच्या रस्त्यातून डेफिनेटने केलेला शमशाद आलमचा पाठपुरावा, इलेक्शन बूथ लुटण्याचा प्रसंग अशी कितीतरी उदाहरणं घेता येतील.
हिंदी चित्रपटांचा वाढता प्रभाव हे पहिल्या भागातलं सूत्र इथे खूप विस्तृत पध्दतीने मांडलं जातं. मयतापासून (याद तेरी आएगी)आनंदसोहळ्यापर्यंत (माय नेम इज लखन)लाइव्ह आँर्केस्ट्रासह वाजणारी गाणी, फैजलने स्वत:च्या नाकर्तेपणाची शशी कपूर बरोबर केलेली तुलना आणि त्याने स्वत:ला सिध्द केल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वात होणारा अमिताभ बच्चनचा संचार ,त्याच्या मोहसीनाबरोबरच्या प्रेमप्रकरणादरम्यान येणारे नव्या नायकांचे संदर्भ, परपेन्डिक्युलर आणि टँजंटची मुन्ना आणि सर्किट बरोबरची तुलना अशा या वेळोवेळी निदर्शनाला आणून दिलेल्या जागा आहेत, ज्या सहजपणे या सतत बदलत्या पण कायमस्वरुपी प्रभावाकडे निर्देश करतात.
आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इथला विनोद. सामान्यत: ,टीपिकल नाट्यपूर्ण चित्रपट हे एका वेळी एका भावनेवर आपलं लक्ष केंद्रित करतात. गंभीर प्रसंगात विनोदाचा शिरकाव न होईलसं ते पाहातात. वासेपूर मात्र वेळोवेळी प्रसंगांची अँब्सर्डिटी समोर आणतो आणि विनोदाच्या जागा आपोआप तयार होतात. शोकसभेदरम्यान अत्यंत गंभीरपणे आणि संदर्भ सोडून गायल्या जाणा-या फिल्मी गाण्यापासून ते माणसाला मारायला जातेवेळी भाजीपाल्याच्या खरेदीवर केलेल्या चर्चेपर्यंत अशा अनेक जागा चित्रपटात आहेत ज्या केवळ करमणूक म्हणून विनोद करत नाहीत पण परिणामाला वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी करतात.
कश्यपचं पटकथेसाठी नाव असणा-या सत्या चित्रपटापासून आपल्या चित्रपटात दिसणा-या गुन्हेगारीचं रूप बदलायला , आणि वास्तवाच्या अधिकाधिक जवळ यायला सुरुवात झाली. गँग्ज या बदलाच्या प्रयत्नांतलाच एक महत्वाचा टप्पा मानावा लागेल. हा बदल सार्वत्रिक असेलसं वाटत नाही ,मात्र तरुण दिग्दर्शकांसाठी तो निश्चितच प्रेरक ठरेलसं वाटतं.
- गणेश मतकरी
(महाराष्ट्र टाइम्समधून)

Read more...

’अनदर अर्थ’ - बेस्ट ऑफ ऑल पॉसिबल वर्ल्डस ?

>> Tuesday, August 21, 2012




एखादा चित्रपट नक्की कशाविषयी आहे हे कसं समजायचं ? केवळ आपल्या परीचयाची काही कथासूत्र, संकल्पना , विचार हे एखाद्या विशिष्टं चित्रप्रकाराशी जोडलेले असणं ,हे ते असणारा दर चित्रपट त्याच चित्रप्रकाराच्या वर्गवारीत टाकण्यासाठी पुरेसं आहे का ? उदाहरणार्थ , चार्ल्स फॉस्टर केनने मृत्यूसमयी काढलेल्या उदगारामागच्या रहस्याचा चित्रपटभर पाठपुरावा केल्याने ’सिटिझन केन’ हा केवळ रहस्यपट होतो का? नाही , तो महत्वाकांक्षा आणि सत्तेच्या गुर्मीत ख-या आनंदाला मुकलेल्या एका बलाढ्य व्यक्तिरेखेची शोकांतिका ठरतो. जॉर्ज रोमेरोच्या परंपरेतल्या झॉम्बीजना पडद्यावर आणल्याने ’शॉन ऑफ द डेड’ हा केवळ भयपट होतो का? नाही, तो आज यंत्रवत होत चाललेल्या समाजजीवनावरची बोचरी पण अतिशय विनोदी टीका म्हणून पाहाता येतो. याच तर्कशास्त्राच्या आधारे पाहीलं , तर पृथ्वीसदृश दुस-या ग्रहाचा शोध , आंतरग्रहीय प्रवास यासारख्या घटकांचं अस्तित्व हे माइक काहील दिग्दर्शित ’अनदर अर्थ’ ला केवळ विज्ञानपट म्हणून ब्रँड करण्यासाठी पुरेसं आहे का? अर्थातच नाही.
’अनदर अर्थ’ हादेखील मिरांडा जुलाईच्या ’द फ्युचर’ सारखाच अमेरीकन इन्डीपेन्डन्ट सिनेमा, इन्डी चित्रपटांसाठी सुप्रसिध्द असणा-या सनडान्स फिल्म फेस्टीवलमधे यंदा पारितोषिक विजेता ठरलेला. लो बजेट, दिग्दर्शकाने स्वत:च छायाचित्रण आणि संकलनाची बाजू सांभाळून केलेला हा जवळजवळ द्विपात्री चित्रपट. त्यातल्या विज्ञानपटात शोभणा-या संकल्पनांचा कल्पक आणि वेगळा वापर करणारा, त्यांच्याशी निगडीत दृश्य शक्यतांना योग्य ते महत्व देणारा पण त्याच वेळी आपला पिंड सायन्स फिक्शन नसल्याची पुरेपूर जाणीव असणारा.
या चित्रपटाच्या नावातच असलेल्या ’दुस-या पृथ्वी’ला इथे महत्वाचं स्थान आहे. सुरुवातीलाच या प्रतिपृथ्वीचा शोध लागल्याचं आपल्याला सांगितलं  जातं आणि त्यानंतर येणा-या जवळपास प्रत्येक आउटडोअर चित्रचौकटीत दिसणा-या आकाशात ,या चंद्रापेक्षा कितीतरी मोठी जागा व्यापणा-या ग्रहाला प्रत्यक्ष दाखवलं जातं. एरवी सामान्य आयुष्य जगणा-या व्यक्तिरेखांच्या वास्तवदर्शी कथेत अन तशाच वास्तवदर्शी दृश्य रुपात, ही  फॅन्टसी प्रतिमा थोडा काव्यात्म अन काहीसा अचंबित करुन सोडणारा परिणाम साधते.
मात्र एक लक्षात ठेवावं लागेल, की इथलं दुस-या दुनियेचं अस्त्तित्व चित्रकर्त्याना काही वास्तववादी पध्दतीने सुचवायचं नाही. ते एक रुपक आहे. आयुष्याने आपल्याला देऊ केलेल्या संधी, आपण आयुष्यभर घेतलेले निर्णय , निवडलेली वाट ,याची चित्रपटातल्या पात्रांना ,अन आपल्यालाही , जाणीव करुन देण्याची एक क्लृप्ती आहे. आपण कसे जगलो याचा, अन कदाचित कसं जगायला हवं होतं याचाही विचार करायला भाग पाडणारं डिव्हाइस आहे. कदाचित त्यामुळेच, या ग्रहाच्या असण्यातून निर्माण होणा-या तात्विक अन तार्किक शक्यतांचा चित्रपट विचार करतो ,मात्र अशा प्रचंड ग्रहाच्या अचानक जवळ येण्यातून जी भौगोलिक संकटं उद्भवतील, त्यांचा विचार करणं पूर्णपणे टाळतो.
चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा आहे -होडा विलीअम्स (ब्रिट मार्लिंग) ही हुशार अन उज्वल भवितव्याच्या शक्यता असलेली मुलगी. या शक्यता नाहीशा होतात जेव्हा ती थोड्या नशेत आणि नुकताच पृथ्वीच्या कक्षेत आलेला नवा ग्रह पाहाण्याच्या नादात एका गंभीर अपघाताचं कारण ठरते. एका कुटुंबातली पत्नी आणि लहान मुलगा ,या अपघातात जागीच मरतात, अन संगीतकार / प्राध्यापक असणारा पती, जॉन बरोज (विलीअम मेपोथर) कोमात जातो. काही वर्षानंतर सजा भोगून बाहेर आलेल्या -होडाचं आयुष्य पूर्वीपेक्षा पार बदलून जातं.डोक्याचा वापर करावा लागेलसं कोणतंही काम टाळून ती आपल्या जुन्या शाळेत सफाई कामगार म्हणून नोकरी धरते. बरोज जिवंत असल्याचं कळताच ती माफी मागण्यासाठी त्याच्या घरी पोहोचते ,पण खरं सांगायचा धीर न झाल्याने आपण घरकामासाठी माणसं पुरवणा-या कंपनीतर्फे मोफत साफसफाईची प्रमोशनल ऑफर घेउन आल्याचं सांगते.अजून माणसात न आलेला , काळवंडलेल्या गुहेसारख्या घरात एकटाच राहाणारा जॉन ऑफर स्वीकारतो आणि -होडा दर आठवड्याला त्याच्याकडे जायला लागते. माफिचा विचार बाजूला ठेउन त्याची सेवा करण्यातच पापक्षालन मानायला लागते. या सुमारास अर्थ -२ नावाने ओळखल्या जाणा-या नव्या ग्रहाबद्दल आश्चर्यकारक तपशील कळायला लागतात. हा ग्रह पृथ्वीची संपूर्ण प्रतिकृती असतो. तीदेखील माणसांसकट. सर्व पृथ्वीवासीयांची तर तिथे प्रतिकृती असतेच , वर ग्रहांना एकमेकांचा शोध लागेपर्यंत तर त्यांची आयुष्यही एकसारखी असतात. त्यानंतर मात्र त्यांचे मार्ग बदलण्या ची शक्यता असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज असतो. आता -होडाला आशा वाटायला लागते की निदान त्या ग्रहावर तरी आपल्या हातून घडलेला अपघात टळलेला असेल अन जॉनचं कुटुंब सुखी असेल. एव्हाना ब-याच सुधारलेल्या जॉनशी तिची चांगली मैत्री झालेली असते अन सत्याची कल्पना नसलेला तो, -होडाच्या प्रेमातही पडायला लागतो.
अनदर अर्थ मधली प्रेमकथा ही छोट्या आणि अनपेक्षित प्रसंगांमधून फुलंत जाते. दोघांनी बॉक्सिंगचा व्हिडीओगेम खेळण्याचा प्रसंग -ज्यात टिव्हीचा पडदा न दाखवता केवळ -होडा आणि जॉनच्या प्रतिक्रियांवर कॅमेरा स्थिरावतो, डोकं धरुन राहाणार्या जॉनला -होडाने सांगितलेली रशियन कॉस्मोनॉटची गोष्टं, मुळात संगीतकार असणा-या जॉनने आपल्या भावना व्यक्तं करताना केलेला करवतीमधून येणा-या सूरांचा वापर ,असे तपशील कथेला तोच तोचपणा येऊ देत नाहीत.
पटकथेकडे पाहून एक गोष्ट लगेच लक्षात येते आणि ती म्हणजे ,तिच्यात येणारे नाट्यपूर्ण टप्पे ,हे त्यातल्या वैज्ञानिक संकल्पनेशी थेट जोडलेले नाहीत. बरेच स्वतंत्र आहेत. चित्रपटाचं भावनिक केंद्र ,हे -होडा आणि जॉन मधल्या बदलत्या संबंधात आहे. प्रतिपृथ्वी ही जवळजवळ पार्श्वभूमीला राहाते आणि अखेरपर्यंत हे चित्र बदलत नाही.याचाच दुसरा अर्थ म्हणजे ,दुसरी पृथ्वी न दाखवताही हा चित्रपट पाउणहून अधिक प्रमाणात तसाच होउ शकला असता.मग तरीही ती दाखवून भावनिक नाट्यात अपरिचित असणारी विज्ञानपटात शोभणारी सूत्र घालण्यामागे कारण काय ,हा प्रश्न पडण्यासारखा आहे. त्याला कारण म्हणता येईल ते त्यामुळे कथानकातून दिसायला लागणा-या वैश्विक शक्यता हेच ,अशा शक्यता , ज्या कथेला विशिष्टं पात्रांपुरती अन एका घटनेपुरती  मर्यादित न ठेवता सार्वत्रिक स्वरुप देउ शकतात. मग संकल्पनेच्या पातळीवर ही कथा कोणाचीही असू शकते. आपल्या आयुष्यातली वळणं ही नेहमीच आपल्याला आश्चर्यचकीत करणारी अन आपण विशिष्ट वेळी घेतलेल्या निर्णयाबद्दल वा आपल्यापुढे येउन ठेपणा-या संधी  वा आपत्तीबद्दल पुढे कायमच आनंद वा खेद वाटायला लावणारी असतात.दुस-या दुनियेतल्या वेगळी पावलं उचलण्याची क्षमता असणा-या आपल्याच प्रतिकृती या त्या आनंदाला वा खेदाला पुन्हा आपल्यापुढे आणतात.हे सूत्रं अधोरेखीत होतं ते वेळोवेळी येणा-या निवेदनातून ,जे कथेशी थेट संबंधित नाही. त्रयस्थ आहे.
आयुष्यातल्या अनेक अन अनपेक्षित शक्यता दाखवणारा हा काही पहिला चित्रपट नाही. पोलिश दिग्दर्शक किसलोवस्कींचा ’ब्लाईंड चान्स’, जर्मन टॉम टायक्वरचा ’रन ,लोला,रन’ , अमेरिकन पीटर हॉविटचा ’स्लायडिंग डोअर्स’ अशी अनेक उदाहरणं जागतिक सिनेमात आपण पाहू शकतो, मात्र ही उदाहरणं हे बदलते रस्ते अधिक थेटपणे ,प्रसंगातून दाखवतात. ’अनदर अर्थ’ केवळ हे रस्ते सूचित करतो, त्यासाठी कथानकाला फाटे फोडणं टाळतो.
अभिनयाबरोबर इथे सहपटकथाकार आणि सहनिर्माती अशा इतर दोन महत्वाच्या भूमिका पार पाडणा-या मार्लिंगला या विषयाचं कुतुहल असणं स्वाभावीक आहे. चित्रपटात काम करण्यासाठी अर्थशास्त्रातल्या अधिक हुकूमी करियरवर पाणी सोडणं, अन केवळ बाहुलीवजा भूमिका नाकारुन अर्थपूर्ण भूमिकांच्या शोधात स्वत: पटकथाकार बनणं असे दोन मोठे बदल तिच्या स्वत:च्या आयुष्यातच घडलेले आहेत. तिच्या कल्पनेतल्या दुस-या दुनियेत कदाचित ती नावाजलेली अर्थतज्ञ वा अधिक मोठ्या बजेटच्या चित्रपटांत केवळ सुंदर दिसण्याचं काम करणारी स्टार झाली असेल कदाचित. मात्र तसं असूनही तिला हवं ते काम, हव्या त्या पध्दतीने करू देणारी ही दुनियाच तिच्यासाठी ’ बेस्ट ऑफ ऑल पॉसिबल वर्ल्डस ’असेल ,यांत शंका नाही.
- गणेश मतकरी 

(ब्लॉगमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे काढण्यात आलेले काही लेख या आठवड्यामध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहेत.त्यातला हा पहिला लेख)

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP