गडद आणि गमतीदार

>> Thursday, August 7, 2008


मी काही दिवसांपूर्वी एक चित्रपट पाहिला- "ए सिम्पल प्लान' नावाचा. अतिशय साधेपणाने सांगितलेली ही एक नैतिक मूल्यांच्या ऱ्हासाची गोष्ट होती. भल्या माणसांच्या हातूनही परिस्थिती कशी वाईट काम घडवते आणि एकदा घडलेली चूक आपल्याला कशी भलत्याच मार्गाला नेते, याविषयीचे हे कथानक होते.
कथानायक हॅन्क (बिल पॅक्स्टन), त्याची बायको सारा, त्याचा थोडासा मंद भाऊ जेकब (बिली बॉब थ्रॉन्टन) आणि जेकबचा मित्र लू ही तशी समाधानी माणसं. छोटी-मोठी दुःखं वागवणारी, पण जगण्यात आनंदाचे क्षण शोधणारी. एकदा हॅन्क, जेकब आणि लू ला. एक डबोलं मिळतं. एका विमानअपघाताच्या अवशेषात त्यांना लाखोंची प्राप्ती होते. मात्र ही नांदी ठरते ती त्यांच्या विनाशाची.
आपल्याला पैसा मिळाल्याचं आणि ते आपण कोणालाही न कळवता खिशात घातल्याचं गुपित, हे गुपितच राहायला हवं असतं. मग ते ठेवण्यासाठी तडजोडी या आल्याच. मग खोटं बोलणं, लोकांना फसवणं, वेळप्रसंगी हात उचलणं, प्रसंगी घातपातदेखील, अशा पायऱ्यांनी हा प्रवास होतो आणि एकदा हाती आलेले पैसे टिकवण्यासाठी आपल्या मनःशांतीचा बळी देऊनही हॅन्कला कोणत्याही थराला जाणं भाग पडतं. "सिम्पल प्लान' हा चित्रपट आपल्या कथानकाच्या बाबतीत कुठंही सोपा मार्ग निवडत नाही. सर्व संकटांतून पार पडून नायक मंडळी आनंदात राहू लागली, असा गोड शेवट दाखवून प्रेक्षकांना खूश करत नाही. त्याचा शेवट विदारक आहे आणि तो त्याच्या मध्यवर्ती कल्पनेशी पूर्णतः प्रामाणिक आहे. दिग्दर्शक सॅम रायमीने (इव्हिल डेड, स्पायडरमॅन) यांतला आशय अतिशय प्रभावीपणे पोचवला आहे. विषयात त्याच्या नेहमीच्या चमत्कृतींचा अभाव असूनही 1998 चा सिम्पल प्लान आठवण्याचं कारण म्हणजे प्रियदर्शनचा "मालामाल विकली'. विकली आणि प्लानमध्ये त्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या कल्पनेबाबत खूपच साम्य आहे; मात्र विकलीचा प्रभाव कमी होतो, तो त्याच्या हॅपीली एव्हर आफ्टर शेवटानं.
एक स्पष्टीकरण- विकली आणि प्लान यांच्या मध्यवर्ती कल्पनेत साम्य आहे म्हणजे तो प्लानचं रूपांतर आहे असं मी सांगू इच्छित नाही. कारण ते खरं नाही. विकली हे 1998 च्याच एका दुसऱ्या चित्रपटाचं सही सही रूपांतर आहे, "वेकिंग नेड डिव्हाईन' या आयरिश चित्रपटाचं.
मूळ चित्रपटात आणि मालामालमध्येही सांगितलेला गोष्टीचा प्रकार आहे तो हाच. साध्या, खलप्रवृत्ती अजिबात नसलेल्या लोकांकडून घडत गेलेल्या चुकांचा आणि वाढत जाणाऱ्या संकटांचा. (चित्रपटाचं पोस्टर, अनेक उत्तम अभिनेते पण मेजर स्टार्सचा अभाव आणि प्रियदर्शनची विनोदाची हौस यांनी सुरवातीला हा "इट् स ए मॅड, मॅड, मॅड वर्ल्ड' च्या प्रकारातल्या स्ट्रेट कॉमेडी चित्रपट असेल अशी माझ्यासकट अनेकांची समजूत झाली होती; पण "मालामाल' तितका वरवरचा नाही.) दोन्ही चित्रपटांत विनोद आहे, पण तिरकस शैलीचा.
हिंदी चित्रपटांतल्या विनोदाकडून आपल्या प्रेक्षकाची सर्वसाधारण अपेक्षा असते की त्यानं हसवावं, विचारबिचार करायला लावू नये. एस्केपिझम हा आपल्या चित्रपटांचा मूळ उद्देश असल्याने झालेला हा गोंधळ आहे. "मालामाल' एका अर्थी या गोंधळाचा बळी आहे. कारण आशयाकडे पाहायचं तर चित्रपटातल्या घटना आणि यातल्या व्यक्तिरेखांचं वागणं त्याच्या गाभ्याला धरून राहणारं, प्रामाणिक आहे. पण शेवट? तो स् ुखांत कसा व्हायचा? कारण चित्रपटाचा आलेख आणि त्यातून समोर येणारा संदेश हा नकारात्मक शेवटाची मागणी करतो, जो आपला यशस्वी व्यावसायिक दिग्दर्शक देऊ शकत नाही.
पण हा शेवटचा भाग सोडला, तर "मालामाल विकली' हा आपल्या इतर चित्रपटांच्या तुलनेत लक्षात येण्यासारखा वेगळा आहे. "विरासत'सारख्या चित्रपटांतून प्रियदर्शनने गावच्या पार्श्वभूमीवरची कथा मांडण्याची हातोटी दाखवलीच आहे. मात्र त्यात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा त्यामानाने कमी होत्या. इथे ते काम अधिकच बिकट आहे. याची कल्पना ही छोटीशीच पण चमकदार आहे.
एक छोटं गाव आहे. कर्जबाजारी झालेलं. जमीनदारीणीनं घशात घातलेलं. ती (सुधा चंद्रन) आणि तिचा गुंड भाऊ (राजपाल यादव) गावावर राज्य करताहेत. अशातच गावाच्या लॉटरी विक्रेत्याला (परेश रावल) खबर लागते, की गावात कोणालातरी एक कोटीची लॉटरी लागलीय. ती कोणाला लागली याचा तपास त्याला दारूड्या अँथनीपर्यंत पोचवतो. पण अँथनी आहे मेलेला- हातात विजयी तिकीट धरूनच. मग लॉटरी विक्रेता ठरवतो, की तिकीट स्वतःच्याच घशात घालायचं. पण तेवढ्यात तिथं येऊन पोचतो तो गावचा दूधवाला (ओम पुरी). दोघं ठरवतात, की संगनमतानं पैसे वाटून घ्यायचे; पण भागीदार वाढायला लागतात. दूधवाल्याचा हरकाम्या (रितेश देशमुख), अँथनीची बहीण (रसिका जोशी), चर्चमधला बदली धर्मोपदेशक (शक्ती कपूर) अशी यादी वाढत जाते. यातून जमीनदार पक्षाला याचा सुगावा लागतो आणि पैशांसाठी आपली सदसद्विवेकबुद्धी गहाण ठेवण्याचा प्रसंग गावकऱ्यांवर येतो.


"मालामाल'मधला नैतिक विचार त्याला इतर विनोदी चित्रपटांपासून वेगळा काढतो; मात्र हा विचार त्याच्या उत्कर्षबिंदूपर्यंत जाऊ शकत नाही. यातल्या एका प्रमुख पात्राने आत्महत्येचा निर्णय घेण्यापर्यंत यातला बोचरा विनोद आणि अर्थपूर्ण संहिता यांचा तोल राहतो. पुढे मात्र व्यावसायिक चित्रपटांचा विचार करून सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवले जातात आणि निरर्थक विनोदाच्या गदारोळात चित्रपट संपतो.
मी मघा "सिम्पल प्लान' चं उदाहरण दिलं, ते याच तुलनेकरता. "मालामाल'चा शेवट त्याच जातीतला असता तर अधिक योग्य वाटता आणि पटकथेच्या स्वरूपावरून वाटतं, की हे विनोदाचा बाज ठेवूनही शक्य झालं असतं. मात्र ही तडजोड आपण चालवून घेऊ. कारण 20% तडजोडीने जर आपल्याला 80% चांगला चित्रपट पाहता येणार असेल, तर त्यात वाईट काय!
या चित्रपटाच्या निमित्तानं मला बऱ्याचदा पडणाऱ्या प्रश्नावर मी पुन्हा विचार करायला लागलो. चांगलं रूपांतर म्हणजे नेमकं काय?
चित्रपट हा कलेआधी उद्योग (किंवा धंदा) मानला जात असल्यानं, बऱ्याचदा यशाच्या पुनरावृत्तीच्या अपेक्षेनं केलेली यशस्वी कलाकृतींची पुनर्रचना, असं या रूपांतरांचं स्वरूप असतं. मग हे यश मिळणं हे चांगल्या रूपांतराचं लक्षण मानावं का? मग त्यातल्या आशयाचा रुपांतर यशस्वी वा अयशस्वी ठरण्याशी काहीच संबंध नाही का? तर आहे.
चांगल्या रूपांतरामागे केवळ आर्थिक गणितापलीकडे जाणारा काही हेतू आवश्यक असतो. वेगळ्या भाषेत वेगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळणारं काही आपल्याही प्रेक्षकांपुढे यावं, असं जेव्हा एखाद्या दिग्दर्शकाला वाटतं आणि त्या पोटतिडिकेनं तो चित्रपट बनवतो, तेव्हा हे रूपांतर खरं अर्थपूर्ण होतं. कारण केवळ एका साच्यावरून काम न करता त्याच्या विचाराच्या गांभीर्याकडेही मग लक्ष पुरवलं जातं. "मालामाल विकली' हा असा आर्थिक फायद्यापलीकडे जाणारा चित्रपट आहे. या प्रकारचे चित्रपट आपल्याकडे कमी प्रमाणात पाहायला मिळतात, त्यामुळेच त्याच्या निर्मितीला महत्त्व आहे आणि मग त्याच्या तिकीट खिडकीवरल्या आकड्यांनी काही सिद्ध झालं तरी आपण बेधडकपणे म्हणू शकतो, की हे एक चांगलं रूपांतर आहे.
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP