परिणामकारक स्विंग व्होट
>> Tuesday, April 28, 2009
निवडणुका हाच विषय सध्या ऐरणीवर आहे. हाच विषय केंद्रस्थानी ठेवून विविध मतप्रवाह उलगडून दाखविणारे वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटही आहेत. "स्विंग व्होट' हा त्यापैकीच एक. सामान्य माणूस आणि सामाजिक, राजकीय व्यवस्थेची सांगड दाखवणारा, सकारात्मक संदेश देत वेगळी वाट जोखणारा हा चित्रपट. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विषयाशी संबंधित तीन चित्रपटांच्या रसग्रहण मालिकेतील हा पहिला चित्रपट...
मतदान करणं हे पॉलिटिकली करेक्ट आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. युक्तिवाद करायचा, तर मतदानाची बाजू घेणारा त्यात वरचढ ठरणार, हेही उघडच आहे. सध्या वृत्तपत्रांमध्ये सेलिब्रिटीपासून सामान्य माणसापर्यंत सगळे मतदान करणं कसं बरोबर आहे, हेच सांगताहेत. मीदेखील सर्वांप्रमाणेच यातली प्रत्येक बाजू पुष्कळ वेळा ऐकली आहे. तरीदेखील एका प्रश्नाचं काही समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही. निवडणुकीला उभं राहणं हे काही सोपं नाही. पक्षीय राजकारण, भ्रष्टाचार, निवडून येण्यासाठी असलेली पैशांची प्रचंड गरज, यातून त्या ठिकाणी पोचणारा माणूस प्रामाणिक असण्याची शक्यता किती कमी आहे, हे लक्षात यायला आपण संख्याशास्त्राचे तज्ज्ञ असण्याची गरज नाही. त्यामुळे उभा राहणारा प्रत्येकच जण जर संशयास्पद चारित्र्याचा असेल, तर मतदान केलं काय अन् नाही केलं काय, "अ' उमेदवार निवडला गेला अन् "ब' उमेदवार पडला तर फरक काय पडणार, नाही का?
अर्थात माझ्या सोप्या प्रश्नाला अनेक विद्वत्ताप्रचुर उत्तरं आहेत, हे मला माहीत आहे. आणि त्यातली अनेक मी ऐकलेलीही आहेत. मात्र ती मला पूर्णतः पटलेली नसल्याने मी आजवर मतदान केलेलं नाही, हे मान्य करणंदेखील बेजबाबदारपणाचं आहे, हेदेखील मान्य; पण आहे ही वस्तुस्थिती आहे.
नुकताच मी एक चित्रपट पाहिला. त्याचा नायक मात्र माझ्याहून कितीतरी अधिक बेजबाबदार होता. म्हणजे मी निदान मतदान न करण्याला काहीतरी थातूरमातूर कारण तरी देऊ शकतो. या माणसाला ते देण्याची तर गरज वाटत नव्हतीच, वर इलेक्शन जवळ आलंय, याचाही त्याला पत्ता नव्हता.
हा चित्रपट होता गेल्या वर्षीचा "स्विंग व्होट' आणि नायक होता बड (केव्हिन कॉसनर... अतिशय उत्तम कास्टिंगचा नमुना). खरं तर "बेजबाबदार' हा एकच शब्द बड या व्यक्तिरेखेची पूर्ण कल्पना यायला पुरेसा आहे. बडचं आयुष्य हे एक अत्यंत सामान्य नोकरी करणं, तिथेही कामचुकारपणा करणं, चिकार बिअर पिणं आणि बाकी फारसं काहीच न करणं यात व्यतीत होतंय.
नाही म्हणायला त्याच्या आयुष्यात एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे त्याची मुलगी मॉली (मॅडलिन कॅरॉल). 12 वर्षांची मॉली ही आतापासूनच एक अत्यंत जबाबदार नागरिक आहे आणि बापाला सकाळी उठवून जबरदस्ती कामावर धाडण्यापासून घर सांभाळण्यापर्यंत सर्व गोष्टी तर ती करतेच, वर ती शाळेत अत्यंत हुशार आहे, आणि आपल्या सामाजिक हक्कांची तिला स्पष्ट जाणीव आहे. आपल्या वडिलांनीदेखील आपल्याप्रमाणेच सामाजिक, राजकीय घडामोडींत रस घ्यावा, असं तिला वाटतं. या विशिष्ट दिवशीदेखील बापाने चार जागरूक नागरिकांप्रमाणे मतदान केंद्रावर हजेरी लावावी, असं तिला वाटतं. कारण हा एक महत्त्वाचा दिवस आहे. या निवडणुकीचा निकाल हा व्हाइट हाउसमधला पुढला रहिवासी कोण, याचं उत्तर देणारा आहे.
अर्थात, अपेक्षेप्रमाणेच बड वेळेवर मतदान केंद्रात पोचू शकत नाही आणि तिथल्या अदृश्य सुरक्षाव्यवस्थेचा फायदा घेऊन मॉली बडच्या नावाने मतदानाचा एक निमयशस्वी प्रयत्न करते. दुर्दैवाने मतदार रजिस्टर होतो, पण मत मात्र कोणालाच पडत नाही.
मुख्य धारेच्या व्यावसायिक चित्रपटात शोभण्यासारख्या योगायोगानंतर असं लक्षात येतं, की राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हा निकाल टाय झाला आहे. टायब्रेकर ठरणार आहे ते बडचं मत. त्याने मुळातच न दिलेलं, मात्र आता देण्यावाचून इलाज नसलेलं. ही बातमी फुटताच बड एका प्रचंड गदारोळाच्या केंद्रस्थानी खेचला जातो. त्याच्या छोटेखानी गावाचा दरारा अमेरिकाभर पसरतो आणि अमेरिकेच्या चालू (पण इंटेंडेड) राष्ट्राध्यक्षांशी एकेरीवर बोलण्याइतक्या उच्चस्थानी तो जाऊन बसतो.
जोशुआ मायकेल स्टर्न या दिग्दर्शकाचा हा चित्रपट फ्रॅंक काप्राच्या चाहत्यांना जरूर आवडेल. ""मि. स्मिथ गोज टु वॉशिंग्टन', "मीट जॉन डो'सारख्या चित्रपटातून त्यांनी जी सामान्य माणूस आणि सामाजिक, राजकीय व्यवस्था यांची सांगड घातली होती, त्याच प्रकारचा हा प्रयत्न आहे. यातलं उपहास, विनोद आणि मेलोड्रामा याचं प्रमाणही त्याच चित्रपटांशी नातं सांगणारं आहे.
बॉलिवूड म्हणा किंवा हॉलिवूड, व्यावसायिक चित्रपटांचा एक नेहमीचा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे ते खूपच प्रेडिक्टेबल असतात. त्यातल्या अडचणी या अखेर शेवटच्या रिळात सोडवण्यासाठीच तयार केल्या गेल्याचा भास ते पाहताना होतो. जितका चित्रपट अधिक सफाईदार, जितका त्यातला प्रोटेगॉनिस्ट किंवा नायक अधिक सांकेतिक प्रकारचा, जितका त्यातल्या व्यक्तिरेखांचा आलेख अधिक उठावदार, जितकी त्याची रचना ओळखीची वाटणारी तितका त्याचा शेवट अधिक परिचयाचा. आणि जितका शेवट अधिक परिचयाचा तेवढा त्याचा परिणामही. जागतिक चित्रपटातले शिलेदार किंवा कलात्मक समांतर चित्रपटातले अग्रणी व्यावसायिक चित्रपटाला जी नावं ठेवतात यामागे हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. हा चित्रपट रंगतदार होऊ शकतो, मात्र तो अनपेक्षित गोष्टी क्वचित करतो. ओळखीचा, सवयीचा मार्ग सोडून त्याचं पाऊल क्वचित पडतं. स्विंग व्होटबद्दल मात्र मी असं जरूर म्हणेन, की तो वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा शेवट (जो मी अर्थातच सांगणार नाही) हा त्यातल्या त्यामानाने उघड संदेशालाच अधोरेखित करत असला तरी तो निश्चितच सरधोपट नाही; किंबहुना तो न्याय्य आहे.
"स्विंग व्होट'मध्ये दोन ट्रॅक आहेत. पहिला आहे तो बाप-मुलीच्या नात्याचा. चित्रपट सुरू होतो तेव्हा ते टोकाला गेल्याचं जाणवतं, अन् दोघांनाही एकमेकांविषयी खरं प्रेम वाटत असलं, तरीही या परिस्थितीत ते फार काळ जमवून घेणं कठीण दिसतं. बडने आपल्यावरची जबाबदारी ओळखणं, सलोखा घडवून आणणं, आणि मुलीला आपली लाज वाटेलसा प्रसंग पुन्हा कधीही उद्भवणार नाही, अशी सुधारणा स्वतःत घडवून आणणं, हा इथला प्रवास आहे. दुसरा ट्रॅक आहे तो राजकारणाचा अन् पत्रकारितेचा.
या ट्रॅकला चित्रपट ज्या पद्धतीने हाताळतो ते इंटरेस्टिंग आहे. त्याला राजकारण अन् चित्रपट अन् पत्रकारिता या दोन्हींचे वाईट चेहरे माहीत आहेत; पण तो चिखलफेकीवर उतरत नाही. किंबहुना रिपब्लिकन पक्षाचा सत्तेवर असलेला अध्यक्ष अँड्रूबून (केल्सी ग्रामर) आणि त्याच्या विरोधातला डेमोक्रॅट डोनल्ड ग्रीनचीफ (डेनिस हॉपर) या दोघांनाही तो कुटिल राजकारणी म्हणून चित्रित न करता मुळात बरी, पण सत्तेपायी कधी कधी भरकटत जाणारी माणसं म्हणून चित्रित करतो. एका परीने हे अधिक महत्त्वाचं निरीक्षण आहे. कारण ते निवडणूक हा प्रकार माणसाच्या अंगभूत भलेपणालाही जुमानत नाही हे दाखवून देतं. विशिष्ट व्यक्तीपेक्षा एका समाजरीतीवर बोट ठेवतं. चित्रपट याची जाणीव करून देतो, की उमेदवार कसाही असला, त्याची मतं कितीही क्रांतिकारी असली किंवा राजकीय पवित्रा कितीही सच्चा असला, तरी एकदा रिंगणात उतरल्यावर वैयक्तिक चांगुलपणा टिकत नाही. जेव्हा लोकांनी तुम्हाला मत देणं अपेक्षित असेल तेव्हा तुम्ही ज्यांना जे अपेक्षित आहे तेच बोलून दाखवणार, हे नक्की. त्यामुळे मत मागताना प्रत्येकाचा आव हा "ग्रेटर कॉमन गुड' साधण्याचा असला, तरी त्यामागे असतो तो खरा स्वार्थ. आज ही निवडणूक जिंकली पाहिजे ही इच्छा- जी अखेर सगळ्याला पुरून उरते.
स्विंग व्होट ज्या पद्धतीने हे दोन ट्रॅक एकमेकांत मिसळतो ते मात्र पाहण्यासारखं आहे. यात हार्डकोअर राजकारण कुठेही नाही, मात्र बडच्या व्यक्तिमत्त्वात होणारा बदल, त्याने आपला आजवरचा नाकामपणा झटकून टाकणं आणि एका निर्णयापर्यंत येणं, हे प्रेक्षकापर्यंत थेट पोचणार आहे. रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट यातल्या कोणाच्याही बाजूला न जाता अन् कोणालाही प्रत्यक्ष विरोध न करता हे केलेलं दिसतं आणि हे जमण्याचं प्रमुख कारण केव्हिन कॉसनर हे आहे. एरवी या प्रकारच्या बदलाचा चिकटवलेलं वाटण्याची शक्यता होती. केवळ हा स्टार तो बदल पटण्यासारखा करून दाखवू शकतो. विशेषतः शेवटच्या भाषणात अन् त्यानंतरच्या मोजक्या क्षणांमध्ये तो या भूमिकेला अतिशय परिणामकारक ठरतो.
स्विंग व्होटचा संदेश हा "प्रत्येक मताला महत्त्व आहे' हे सांगत असल्याचं उघड आहे; मात्र तो प्रचारकी न होण्याची काळजी चित्रपट घेतो. राजकारण्यांच्या गुंतागुंतीत न पडताही नागरिकांच्या सामाजिक जाणिवेला आव्हान देतो. राजकारण्यांमध्ये बदल तेव्हाच होईल- जेव्हा जनता आपल्या हक्कांबद्दल जागरूक होईल, हे थोडक्यात दाखवून देतो.
"स्विंग व्होट' संपला तेव्हा क्षणभर मीही मतदानविरोधातली माझी उत्तरं तपासून पाहिली, आणि आपलं काही चुकतंय का, असा विचार करायला लागलो. एका व्यावसायिक, रंजनवादी चित्रपटाला या प्रकारचा सकारात्मक संदेश देणं शक्य झाल्याचं कौतुक वाटलं ते वेगळंच.
-गणेश मतकरी