गुलाल' - एका व्यवस्थेचा अंत

>> Wednesday, April 8, 2009व्यवस्थेवरचा राग, कडवटपणा दाखविणारा अनुराग कश्‍यपचा "गुलाल' हा सध्याच्या लक्षवेधी चित्रपटांमधला एक आहे. देशाची राजकीय व्यवस्था चालविणाऱ्या गटांचं हे एक मायक्रोपातळीवरचं चित्र आहे. देशाच्या भवितव्याविषयी असुरक्षित का वाटतं याची अचूक कारणमीमांसाच हा चित्रपट देतो.


अनुराग कश्‍यप आणि वादग्रस्तता हे आज बरेच दिवस हातात हात घालून जाताना आपण पाहिलेले आहेत. गौरव आणि निषेध हे त्याच्या दिग्दर्शन प्रयत्नांतल्या (रिटर्न ऑफ हनुमान सोडून) जवळ जवळ प्रत्येक चित्रटाने पाहिले आहेत. सेन्सॉर बोर्डाने अनिश्‍चित काळासाठी चित्रपट अडवणं (पांच), बंदी घातलेला चित्रपट तत्कालीन संदर्भ पुसट झाल्यावर प्रदर्शित होणं (ब्लॅक फ्रायडे), प्रदर्शित चित्रपटांवर समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत उलटसुलट टोकाची मतं मांडली जाणं (नो स्मोकिंग) आणि मोठ्या प्रमाणात गौरवला जाऊनही तिकीट खिडकीवर तुलनेने कमी यश मिळणं (देव डी) या सर्व गोष्टी कश्‍यपच्या चित्रपटांनी आजवर पचवलेल्या दिसतात. मात्र एवढं सगळं असूनही एक गोष्ट स्पष्ट आहे, की हा दिग्दर्शक आज महत्त्वाचा आणि लक्षवेधी आहे.
"इफ यू कान्ट विन देम, जॉईन देम' असं म्हटलं जातं. चित्रपट माध्यम हे असं खर्चिक माध्यम आहे, की तुम्ही किती वेळा मनमानी करण्याची रिस्क घेऊ शकता, याला मर्यादा आहेत. सतत प्रतिकूल परिस्थितीत चित्रपट बनवण्यातून जो आर्थिक तोटा संभवतो, त्यामुळे अनेकदा चित्रपटात पैसे घालणारे निर्माते / गुंतवणूकदार बिथरण्याची तर शक्‍यता असतेच, वर बऱ्याच वेळा अभिनेत्यांमध्येही अशा दिग्दर्शकाबरोबर काम करत राहण्याने असुरक्षितता वाढायला लागते.
मग मुख्य धारेतले कलावंत मिळेनासे होतात, अन्‌ अर्थातच लोकप्रिय नावांमुळे मिळणाऱ्या हुकमी प्रेक्षक वर्गाला मुकावं लागतं. नवे चेहरे घेऊन नवा सिनेमा करत राहण्याचा प्रयत्न ठामपणे करत राहणं, हे कठीण काम आहे आणि अशा परिस्थितीत आपला दृष्टिकोन सोडून प्रेक्षकांना पचेलसं काम करणं दिग्दर्शकानं निवडलं, तर आपण त्याला दोष देणार नाही. अनुराग कश्‍यपचा मात्र असा बाजू बदलण्याचा कोणताही विचार दिसत नाही. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "गुलाल'मध्येही हे स्पष्ट होतं.
एखादा सामान्य माणूस काहीसा अपघातानंच एखाद्या विशिष्ट स्थळी / विशिष्ट वेळी (अर्थात रॉंग प्लेस ऍट द रॉंग टाईम) येणं आणि परिस्थितीचा बळी ठरणं हे त्याच्या चित्रपटांना नवीन नाही. त्याचा "क्‍लेम टू फेम' मानल्या जाणारा "सत्या' (1998) ज्यात कश्‍यपचं नाव केवळ लेखक म्हणून होतं, हे याचं सर्वांत महत्त्वाचं उदाहरण. नंतरही कौन, शूलसारख्या त्यानं लिहिलेल्या चित्रपटांतून या कल्पनेची वेगळी रूपं पुढे येत गेली. "गुलाल'मध्येदेखील ही कल्पना वापरात आलेली दिसते. मात्र "सत्या'तला नायक आणि त्याचं विश्‍व हे "गुलाल' मधल्या दिलीप कुमार सिंग (राजा चौधरी) अन्‌ त्याच्या विश्‍वाहून कितीतरी वेगळं होतं.
"गुलाल'बद्दल मला पडलेला एक प्रश्‍न म्हणजे त्याचा प्रोटॅगोनिस्ट, किंवा थोड्या अधिक ढोबळ शब्दात म्हणायचं तर नायक कोण आहे? दिलीपपासून चित्रपट सुरू होतो; काही प्रमाणात त्याच्या दृष्टिकोनातून घटनांकडे पाहतो, मध्येच त्याची साथ सोडत नाही आणि अखेर त्यानं उचललेल्या पावलावरच संपतो. त्यामुळे तर्कशुद्ध निष्कर्ष काढायचा तर दिलीपलाच नायकाचं स्थान मिळायला हवं; मात्र घटनांच्या दृष्टीनं पाहायचं तर ही व्यक्तिरेखा फारच निष्क्रीय आहे. आणि प्रेक्षकांना धरून ठेवेलसं काहीदेखील तिच्याकडे नाही. त्यापेक्षा कितीतरी अधिक वेधक आणि चित्रपटाला व्यापणारा पूर्ण आलेख असणारी पात्रं "गुलाल'मध्ये आहेत. मग यातलं एखादं पात्र अधिक महत्त्वाचं का ठरू नये?
"गुलाल' हा राजकीय व्यवस्थेत दडलेली विनाशाची मुळं पडताळून पाहतो. त्याला पार्श्‍वभूमी आहे राजस्थानात सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजपूत संघर्षांची. डुकी बाना (केके मेनन) या राजवंशातल्या राजपुताला बंड घडवायचंय. राजपुतांची चाललेली पीछेहाट त्याला पाहवत नाही. त्यावर तोडगा म्हणून राजपुतांचं स्वतंत्र राज्य "राजपुताना' त्याला हवं आहे अन्‌ ते मिळवण्यासाठी सैन्यापासून अर्थसाह्यापर्यंत सर्व गोष्टी गोळा करणं, हा त्याचा प्रमुख उद्योग आहे. तरुणांना आपल्या बाजूला वळवणं, हाही त्याचाच एक भाग. साहजिकच कॉलेज इलेक्‍शनमध्ये ढवळाढवळ आलीच.
या बंडाची बीजं रोवली जात असतानाच दिलीप कुमार सिंग हा सरळमार्गी मुलगा कॉलेजमध्ये भरती होतो, अन्‌ योगायोगानं त्याची गाठ पडते रणंजय सिंग (अभिमन्यू सिंग) राजघराण्यातल्या तरुणाशी. रणंजय एका छोटेखानी संघर्षात दिलीपला मदत करतो आणि दोघांची जोडी जमून जाते. याच संघर्षादरम्यान संजय दिलीपची ओळख डुकी बानाशी होते आणि बाना रणंजयला आपल्या बाजूने कॉलेज इलेक्‍शन लढवायला तयार करतो. आजवर गुपचूप आपले शौक सांभाळणाऱ्या रणंजयला असं मैदानात उतरलेलं पाहून अनेक प्रतिस्पर्धी तयार होतात. लवकरच घटना अधिक रक्तरंजित होतात आणि दिलीपला या नाट्यात अधिक महत्त्वाची भूमिका पार पाडायला लागणार, अशी चिन्हं दिसायला लागतात.
आपल्या हातानं आपलं दुःख घडवणारी पात्रं, लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांच्या गडद शोकांतिका, महत्त्वाकांक्षेतून ओढवणारा सर्वनाश, अनेक लहानमोठ्या पात्रांचा काळजीपूर्वक मांडलेला पट, ही आणि यासारखी या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्यं आपल्याला शेक्‍सपिअरच्या शोकांतिकांची आठवण करून देतात. मात्र या सर्व मांडणीतही शेक्‍सपिअर आपल्या प्रमुख पात्राला जे वजन बहाल करतो, ते इथं पाहायला मिळत नाही. दिलीप या प्रकरणात गुंततो. पण यापलीकडे जाऊन तो डोकं वापरताना दिसत नाही. या व्यक्तिरेखेचा मूळ आकार, तसंच तिच्यामार्फत प्रेक्षकाला कथेशी समरस होण्याची संधी उपलब्ध होणं, हे जरी तिच्या महत्त्वाचं असण्याकडे निर्देश करणारं असलं आणि डुकी बानाच्या राज्याला सुरुंग लावणाऱ्या घटनांची सुरवातही त्याच्यापासूनच होत असली, तरी चित्रपटात ती सातत्यानं केंद्रस्थानी राहू शकत नाही. रणंजय, डुकी बाना आणि रणंजयची सावत्र बहीण किरन (आयेशा मोहन) ही तिघं अनुक्रमे केंद्रस्थान घेत जातात. त्यामुळे अनेकदा दिलीप दुर्लक्षित तर राहतोच, वर शेवटी शस्त्र उचलण्यापर्यंत जो तणाव त्याच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण होणं आवश्‍यक आहे, तो पटण्यासारखा पुढे येत नाही. केवळ युक्तिवाद म्हणून असं होण्याची शक्‍यता आपण मान्य करू शकतो; पण ते शक्‍य होण्याला पटकथेची मदत मिळत नाही.
त्यामानानं किरणचं पात्रं हे अधिक भाव खाऊन जातं. आधी लहान अन्‌ बिनमहत्त्वाचं वाटणारं हे पात्र झपाट्यानं या राजकारणातला महत्त्वाचा दुवा तर ठरतंच, वर तिच्या वागण्याला शेवटपर्यंत निश्‍चित आकार येत जातो. दिलीप जेव्हा अखेर तिला विचारतो, की "सगळे तुला वापरून घेताहेत हे तुझ्या लक्षात येत नाही का?' त्यावर तिनं केलेला "कशावरून मीच सर्वांना वापरत नाही आहे?' हा प्रतिप्रश्‍न, राजकारणातल्या एका अगदी मूलभूत स्वरूपाच्या स्ट्रॅटेजीकडे आपलं लक्ष वेधतो.
चित्रपटाच्या सुरवातीला सांगितलं जातं, की "प्यासा'मध्ये वापरण्यात आलेल्या साहीर लुधियानवीच्या "ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्‍या है!' या रचनेतल्या काही ओळी "गुलाल'मागचं प्रेरणास्थान आहेत, "ये दुनिया...'चा शेवटाजवळ वापरही केला जातो. प्रत्यक्ष चित्रपटातल्या घटना अन्‌ आंतरराष्ट्रीय राजकारण अन्‌ दहशतवाद यावर शेरेबाजी करणारं डुकीच्या भावाचं पात्र अन्‌ त्याच्याबरोबर अर्धनारीनटेश्‍वर म्हणून संबोधलं जाणारं, मात्र प्रत्यक्षात चमत्कारिक मेकअप करून पेंटोमाईम करणारं, वास्तववादी चित्रपटात न जाणारं प्रायोगिक पात्रंही जोडीला उभं केलं जातं. या तीनही गोष्टी म्हटलं तर अनावश्‍यक आहेत, ज्यांची चित्रपटाला म्हणण्यासारखी गरज नाही. "ये दुनिया...'चा इथला संदर्भ तर योग्य आहे किंवा नाही (निदान दिलीपच्या बाबतीत तरी तो निश्‍चितच अयोग्य आहे) यावर वाद करणं सहज शक्‍य आहे, आणि मूकाभिनय करणारं पात्रं वगळण्यासारखं आहे. स्पर्धेतल्या नाटकांमध्ये उत्साहानं जशा सर्व चमत्कृती भरण्याचा अट्टाहास असतो, तसा काहीसा या तीनही गोष्टींच्या वापरात दिसतो. अनुराग कश्‍यपकडून इतक्‍या अनुभवानंतर ही अपेक्षा नाही.
मात्र हे सगळं धरूनही "गुलाल'ला मी सध्याच्या लक्षवेधी चित्रपटांमधला एक म्हणेन. कश्‍यपच्या बहुतेक चित्रपटांप्रमाणे कडवटपणा, व्यवस्थेवरचा राग इथंही पाहायला मिळतो, जो त्याच्या दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग म्हणायला लागेल. इथं त्यानं राजकारणातली गुंतागुंत, त्यातलं स्वार्थाचं, भ्रष्टाचाराचं गणित हे पुरेशा स्पष्टपणे आणि वास्तवाचं भान ठेवून मांडलेलं आहे. प्रेक्षकांसाठी तडजोड करणं हे त्याच्या प्रकृतीतच नसावं, त्याप्रमाणे इथंही तसा प्रयत्न दिसून येत नाही. "गुलाल'चा भर आहे, तो व्यक्तिरेखांच्या तपशिलावर, त्यांना जिवंत करण्यावर, त्यांच्या वागण्याला कारण न चिकटवता त्यांच्या नैसर्गिक जडणघडणीवर. दिलीपच्या निष्क्रियतेविषयी किंवा वेधक नसण्याविषयी मी बोललो; पण ती वास्तवाला सोडून आहे असं मात्र मी म्हणणार नाही. यातला प्रत्येक जण हा स्वकेंद्री अन्‌ स्वतःच्या तर्कशास्त्राला अनुसरून वागणारा आहे. त्यांच्या वागण्याला हे तर्कशास्त्र हीच प्रेरणा आहे, अन्‌ इथं घडणारा संघर्षदेखील यातूनच पुढे आलेला आहे, देशाची राजकीय व्यवस्था चालवणाऱ्या गटांचं हे एक मायक्रो पातळीवरलं चित्र आहे, अन्‌ आपल्याला देशाच्या भवितव्याविषयी असुरक्षित वाटण्यासाठी दिलेली एक अचूक कारणमीमांसा!
- गणेश मतकरी

7 comments:

Abhijit Bathe April 9, 2009 at 11:00 AM  

Ganesh - another good article! I was desperately waiting for Gulal but didnt expect its music to hit me so hard. After listening to its songs, I was skeptical if the movie would live up to it, and was happy that it did. I have a different take on a few of the shortcomings you listed here, but I get your POV.

I keep harping on 'Fountainhead' and the latest quote on it from Kashyap is 'you have to kill you family if you want to become Roark'. The guy is insane and I love him for that. Bana's brother and the character with him are the products of that insanity. If I was Kashyap - my reaction would be - well, its a rather long reaction - lets not get into that.

A very good article nevertheless!

Yogesh April 12, 2009 at 5:04 AM  

गणेश,

अतिशय दर्जेदार लेख. फार आवडला. चित्रपटही तुम्ही म्हटल्याप्रमाणे लक्षणीय आहे यात शंका नाही. "ओ री दुनिया" हे गाणेही फारच सुरेख. तोंडावर पाण्याचा सपकारा मारल्याप्रमाणे जोरदार धक्का देणारे.

मात्र तुम्ही या लेखाला "एका व्यवस्थेचा अंत" असे नाव का दिले आहे? दीपक ज्या सिस्टमचा बळी ठरतो ती सिस्टम तर चित्रपटाच्या शेवटीही तशीच आहे. किंवहुना डुकी बाना-भाटी-दीपक हे सगळे गेल्यानंतरही अनागोंदी वगैरे न माजता दुसरा व्यवस्थापक ही व्यवस्था आपल्या हातात सहजपणे घेतो. याबाबत तुमचे मत वाचायला आवडेल.

मी हा लेख वाचल्यानंतर रेडिफमधला रिव्ह्यू वाचला. त्या लेखातील चित्रपटाच्या दुसर्‍या भागाबाबतचे मुद्दे पटले नाहीत. किंबहुना मला मध्यंतरापूर्वीच्या भागापेक्षाही दुसरा भाग अधिक आवडला. (मध्यंतरापूर्वीच्या भागातील अनेक प्रसंगांमध्ये सत्याची सही सही छाप आहे असे वाटले.) तुमच्या लेखात चित्रपटाच्या बलस्थानांचा नेमका वेध घेतला आहे.

असो. जाता जाता थोडे निटपिकिंग. कारणमीमांसा करणे शब्दप्रयोग योग्य आहे. कारणमीमांसा देणे असे म्हणणे चुकीचे आहे. तुमच्या इतक्या सुंदर लेखात हा चुकीचा शब्दप्रयोग खटकला म्हणून सांगितले. राग मानू नये.

ganesh April 12, 2009 at 7:40 AM  

thanks AB ani Ajanukarna.
ajanukarna,
nav ashasathi ahe ki political system madhech asleli ticha destruction chi roots ughad karna asa mala film cha swaroop watla. system pudhe jate ,but its already destroyed, ti jashi havi tashi urleli nahi asa ya navacha artha.
rediff madhla articl me pahilela nahi ,pan baghen. chuka kadhayla kahich harkat nahi matra sudharnechi guarantee nahi, karan maza marathi(kahi janana tasa watat nasla tari)agdi wait ahe. me itpat lihito he asharyach.

Waman Parulekar April 13, 2009 at 3:35 AM  

गणेशजी,
फार चांगला लेख होता. गुलाल चित्रपट फार चांगला आणि वास्तववादी होता पण फार कमी लोकांनी पाहिला. दर्जेदार आणि वास्तववादी चित्रपट फार कमी लोक पाहतात ह्याचे दुःख वाटते.
- वामन परुळेकर

ganesh April 13, 2009 at 9:15 AM  

thanks waman,
its natural, because films r portrayed as a entertainment medium always. actually ,even those who have seen gulal, have given a mixed reaction to it. i did like it a lot though.

आदित्य August 4, 2009 at 11:03 AM  

chhan lekh ahe. agadi durlakshit asNara ha chitrapat malahi pasant padla. Eka goshticha ullekh matra karavasa vatato ki tumhi gulal chya sangeeta baddal kahich lihilela nahi. Ya chitrapatache sangeet dukicha bhau zalelya naTane dilele ahe aaNi kahi gaNi tar afalatun jamali ahet.

Ayub Attar May 7, 2020 at 5:27 AM  

गुलाल-लॉक डाउन मुळे पाहता आला , खूप वर्षा पूर्वी तुमचा लेख वाचला होता , तेव्हाच ठरवले होते पाहायचा, आज चे राजकारण शी सुसंगत चित्रपट आहे . वास्तवदर्शी लेख आणि चित्रपट . धन्यवाद.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP