स्टार ट्रेकची नवी भरारी
>> Friday, June 26, 2009
स्टार ट्रेकच्या आजवरच्या सर्व चित्रपटांना मिशनचं स्वरूप होतं. काही प्रमाणात ते इथंही आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन ही ओरिजिन स्टोरी आहे. स्टार ट्रेक ज्या हेतूनं नव्या भरारीला सिद्ध झालं, ते हेतू यशस्वी झाले आहेत यात शंका नाही. आपल्याकडचा प्रतिसाद गृहीत न धरताही ही निर्मिती यंदाच्या यशस्वी चित्रपटातली एक आहे.
भारतीय रसिक हा बहुतांशी वास्तववादाचा प्रेमी आहे. हा वास्तववाद म्हणजे न्यूजरील फूटेज किंवा इटालियन निओरिऍलिझमशी नातं सांगणारा थेट वास्तववाद नव्हे, तर अधिक लवचिक पद्धतीचा, सोपा करून सांगितलेला वास्तववाद. थोडक्यात सांगायचं, तर कोणतीही गोष्ट ऐकता-वाचताना, चित्रपटात पाहताना तिची मूळ चौकट परिचित, रोजच्या आयुष्यातली असणं ही आपली गरज आहे. एकदा ही बाह्य चौकट आखून घेतली की मग त्या चौकटीच्या आत कितीही कल्पनाविलास केलेला आपल्याला चालतो. उदाहरणार्थ, लोकप्रिय हिंदी चित्रपटातल्या व्यक्तिरेखाच घेऊ. त्या ओळखीच्या जगात वावरणाऱ्या, ओळखीचे व्यवसाय करणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्याची, अधिक वरच्या पट्टीतली आवृत्ती असल्या की आपलं भागतं. मग या तथाकथित वास्तवाचा आभास आणत त्यांनी कितीही तार्किक कोलांट्या मारलेल्या आपण चालवून घेऊ शकतो.
याउलट उघड "फॅन्टसी जॉनरं' मात्र आपण थेट नाकारतो तरी किंवा मुलांसाठीचा म्हणून त्याला एका सोयीस्कर लेबलाखाली टाकतो. परभाषीय साहित्य, चित्रपटांनाही आपण एका मर्यादेपलीकडे चालू देत नाही. त्यामुळेच आपल्या पुस्तकाच्या दुकानात वास्तवाचं सोंग आणून कल्पितकथा सांगणाऱ्या जेफ्री आर्चर किंवा जॉन ग्रिशमचा जेवढा खप संभवतो, तेवढा उघड कल्पित साहित्य असणाऱ्या फिलिप के. डिक किंवा स्टीफन किंगचा संभवत नाही. या दृष्टिकोनामुळे आपलं साहित्य, चित्रपट हेदेखील एका विशिष्ट प्रकारे, एका मर्यादित परिघात घडत आलेले आहेत. जी विविधता पाश्चात्त्य साहित्यात, चित्रपटांत पाहण्यात येते, ती आपल्याकडे आलेली दिसत नाही.
ही वास्तवापासून दूर जाणाऱ्या कलाकृतीना निकृष्ट ठरवण्याची, आपल्या व्यक्तिगत आवडीच्या तराजूतच त्यांना तोलून काढण्याची वृत्ती जर आपण बाजूला ठेवू शकलो, तर आपल्यासाठी कितीतरी नवी दालनं झटक्यात उघडतील.
हे सगळं आताच लिहायचं कारण म्हणजे "स्टार ट्रेक' चित्रपट आणि आपल्या तिकीट खिडकीवर त्याला मिळणारा जगभराच्या तुलनेत अल्प प्रतिसाद. खरं तर "स्टार ट्रेक' आपल्याला परिचित नाही असं मुळीच नाही. ओरिजिनल "स्टार ट्रेक' मालिका वीसेक वर्षांपूर्वी आपल्याकडे टीव्हीवर दाखवण्यात आली होती आणि तिला प्रेक्षक वर्गही चिकार होता. अर्थात तेव्हाही आपल्याकडे आधी सांगितल्यासारखाच दृष्टिकोन असल्यानं हा प्रेक्षकवर्ग प्रामुख्याने "बाल' प्रेक्षकवर्ग होता. याउलट इतर जगभरात ही मालिका सर्व वयाच्या प्रेक्षकांनी सारख्याच आपलेपणानी पाहिली. पुढे "द नेक्स्ट जनरेशन,' "डिप स्पेस नाईन' आणि "एन्टरप्राईज'मध्ये पिढ्या अन् कलाकार बदलत मालिका वेगवेगळ्या रूपात आली. आपल्याकडेही यातल्या अनेक भागांचं प्रक्षेपण विविध चॅनल्सवर झालं. चित्रपट मात्र आपल्याकडे फारसे आले नाहीत. 1976 पासून "स्टार ट्रेक'चे सुमारे दहा चित्रपट पडद्यावर आलेले आहेत. त्याच्या चाहत्या वर्गानं त्यातल्या सुमारे अर्ध्यांना डोक्यावर घेतलं. (कारण विषम क्रमांकाचे मालिकेतले चित्रपट वाईट असल्याचं शपथेवर सांगणारे अनेक चाहते आहेत.) अन् चित्रपटगृहात नव्हे पण व्हिडिओ लायब्रऱ्यांमधून ते उपलब्धही आहेत. त्यामुळे काही प्रमाणात फॅन बेस आपल्याकडेही नक्कीच होता. अर्थात अशी शक्यता आहे, की तेव्हाचा बाल प्रेक्षक आता प्रौढ झाल्यानं त्यानं आता आपल्या वयाला शोभून दिसणारे इतर चित्रपट पाहणं पसंत केलं असावं, अन् स्टार ट्रेककडे दुर्लक्ष करणं.
"स्टार ट्रेक' हा सायन्स फिक्शन चित्रपट आहे. इथं एक लक्षात घ्यायला हवं, की सायन्स फिक्शन या लेबलाखालीही काही उपप्रकार आहेत, अन् त्याखाली फार वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येऊ शकतात. 2001 : ए स्पेस ओडिसी, स्टार वॉर्स मालिका अन् स्टार ट्रेक मालिका ही प्रामुख्याने अवकाशात घडणाऱ्या चित्रपटांची तीन लोकप्रिय नावं पाहिली तरी यातला प्रत्येक उपप्रकार दुसऱ्यापेक्षा खूप वेगळा आहे असं दिसून येईल. "2001' हे अधिक गंभीर उदाहरण आहे. वैज्ञानिक संकल्पनांचा खोलात जाऊन विचार करणारं. त्याच्या लेखनातला आर्थर सी. क्लार्क यांचा सहभागच त्याचं स्वरूप स्पष्ट करणारा आहे. "स्टार वॉर्स'चं केवळ रूप विज्ञानकथेचं आहे, पण मुळात ती चांगल्या अन् वाईटामधला सनातन संघर्ष दाखवणारी परीकथा आहे. या उलट स्टार ट्रेक सरळ सरळ अँक्शन अँडव्हेंचर आहे.
"स्टार ट्रेक' चा हा नवा भाग दोन प्रमुख हेतू समोर ठेवून निर्मिलेला आहे. पहिला आहे तो जुन्या, मूळ मालिकेच्या अन् त्यामुळे अजरामर झालेल्या "कॅप्टन क्लर्क, मि. स्पॉक, डॉ. मॅककॉय, स्कॉटी या व्यक्तिरेखांच्या चाहत्या वर्गाला मालिककेडे पुन्हा खेचून आणणं, मधल्या काळात फुटलेल्या फाट्यांनी अन् बदलत गेलेल्या स्वरूपानी जे दूर गेले त्यांना परत बोलावण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरा हेतू आहे तो उघडच नवे चाहते तयार करणं. स्टार ट्रेक फ्रॅन्चाइजने आजवर निर्मात्यांना प्रचंड प्रसिद्धी अन् पैसा मिळवून दिलेला आहे. तो तसाच मिळत राहावा असं वाटत असेल तर केवळ जुनी पिढी उपयोगाची नाही, तर नवीन प्रेक्षक तयार होणं आवश्यक आहे. स्ट्रार ट्रेक हे दोन्ही करण्यात यशस्वी होतो, ते त्यातल्या मध्यवर्ती कल्पनेमुळे.
स्टार ट्रेकच्या आजवरच्या सर्व चित्रपटांना मिशनचं स्वरूप होतं. काही प्रमाणात ते इथंही आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन ही ओरिजिन स्टोरी आहे. सामान्यतः ओरिजिन स्टोरीज या सुपर हिरोंशी जोडलेल्या असतात. कारण त्यांना त्याच्या विशिष्ट शक्ती कशा मिळाल्या हे त्या कथांमध्ये सांगितलं जातं. इथं स्टार ट्रेकच्या प्रमुख व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी काय, त्या एकमेकांना कशा भेटल्या आणि ही टीम कशी तयार झाली हे इथं दिसतं. मात्र त्यापलीकडे जाऊन काही विशेष गोष्टी हा चित्रपट करतो. आपल्या टाईम ट्रॅव्हलच्या घटकामुळे तो प्रीक्वल आणि सीक्वल यांचं एक वेगळं मिश्रण तयार करतो. वयोवृद्ध स्पॉकच्या भूमिकेत मूळ स्पॉक लिअनर्ड निमॉयला आणून मूळ मालिकेला या नव्या भागाबरोबर सांधतो आणि समांतर कालप्रवाहाच्या कल्पनेनं मूळ मालिका अन् या भागात राहिलेल्या विसंगतीचाही समाचार घेतो. एकदा या कालप्रवाहात खंड पडून तो वेगळ्या रस्त्यानं जायला लागल्याचं मान्य केलं, की नवा स्टार ट्रेक घडवून आणत असलेले सर्व बदल आपोआपच ग्राह्य ठरतात आणि चाहत्यांना जुने संदर्भ उकरून बोटं दाखवायला जागा उरत नाही.
चित्रपट जवळपास सलीम जावेद शैलीत सुरवात करतो. भविष्यात आलेलं रोम्युलन अवकाशयान नाराडा आणि त्याचा बंडखोर कॅप्टन नीरो (एरिक बाना) विरुद्ध यू.एस.एस. केल्विन आणि त्याचा बदली कॅप्टन जॉर्ज कर्क (क्रिस हे हेम्सवर्थ) यांमध्ये अवकाशात चाललेल्या युद्धामध्ये केल्विनचा पाडाव होतो, पण कर्क आपला पराक्रम दाखवत जवळपास आठशे लोकांचे प्राण वाचवतो. यात त्याची गरोदर पत्नीदेखील असते. मरण्यापूर्वी तो आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचं रडणं ऐकतो अन् त्याचं बारसंही करतो.
अनेक वर्षांनी उडाणटप्पू, पण अतिशय हुशार जेम्स टी कर्क (क्रिस पाईन) स्टार फ्लीटमध्ये भरती होतो. मॅककॉय (कार्ल अर्बन) आणि उहूरा (झो सालदाना) त्याच्या बरोबरच शिकत असतात. अखरेच्या परीक्षेत कर्कने लबाडी केल्याचा आरोप ठेवला जातो, तो तरुण व्हल्कन ऍम्बॅसडर स्पॉक (झॅकरी क्विन्टो) कडून. विद्यालयात उपसलेल्या तलवारी पुढे उपसलेल्याच राहतात. आणीबाणीच्या प्रसंगी सर्वांनाच व्हल्कन ग्रहाच्या दिशेनं निघावं लागतं, मात्र भांडण संपत नाही. पुढे यानाचा ताबा स्पॉककडे दिला जातो आणि त्याला विरोध करणाऱ्या कर्कची एका निर्मनुष्य ग्रहावर हकालपट्टी करण्यात येते. कर्क आणि स्पॉक यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित होणं दुरापास्त होऊन बसतं. भविष्यात स्पॉकच्या हातून घडलेल्या चुकीची सर्वांनाच मोठी किंमत द्यायला लागेलशी चिन्हं दिसायला लागतात.
दिग्दर्शक जे जे ऍब्रम्सने आपल्या दृश्य संकल्पनांपासून व्यक्तिरेखा रंगवण्यापर्यंत मघा सांगितलेले दोन हेतू डोळ्यांसमोर सतत ठेवलेले आहेत. "रेट्रो फ्युचर' नावाने ओळखली जाणारी एक शैली आहे. ज्यात भविष्यकाळ साकारला जातो, पण भूतकाळात कल्पिल्याप्रमाणे . इथली दृश्य योजना त्याच प्रकारची आहे. व्हिज्युअल, मारामाऱ्या, साहसदृश्य यात नवी सफाई आणि गुंतागुंत आहे, प्रेक्षकांसाठी ओळखीच्या गोष्टी भरपूर आहेत. मूळ यान, त्यातला कॅप्टन्स ब्रिज फार बदललेला नाही. वेशभूषा किंवा यानाचा अंतर्भाग यामध्येही मुळापासून केलेला बदल नाही.
व्यक्तिरेखांचे स्वभाव त्यांची ओळख करून देतानाच सूचित करण्यात आले आहेत. हे प्रसंग अन् त्यांचे संवाद इतके चपखल आहेत की जुन्या प्रेक्षकांना जुने मित्र भेटल्याचा आनंद व्हावा. अपवाद स्कॉटीच्या भूमिकेतल्या सायमन पेगचा. हे कास्टिंग मध्यंतरी बॉन्ड मालिकेत "क्यू'च्या भूमिकेसाठी जॉन क्लेजला घेतलं होतं, त्याची आठवण करून देणारं आहे. हा विनोद काहीसा परका आहे. स्वाभाविक नाही.
हीच योजना कर्क आणि स्पॉक या प्रमुख नायकांनाही लागू पडते. इथे स्पॉक हा परिचित प्रेक्षकांसाठी केलेला आहे. बराचसा मुळाबरहुकूम. त्यात भर म्हणून निमॉयच्या वृद्ध स्पॉकचीही वर्णी आहेच. याउलट पाईनचा कर्क खूपच वेगळा आहे.विल्यम शॅटनर नक्कल करण्याचा इथे प्रयत्न नाही, तर हा कर्क काहीसा अधिक तडफदार, भडक डोक्याचा, मात्र विनोदबुद्धी शाबूत असलेला आहे. तरूण (आणि "बाल') प्रेक्षकांना जवळचा वाटणारा.
स्टार ट्रेक ज्या हेतूने नव्या भरारीला सिद्ध झालं, ते हेतू यशस्वी झाले आहेत यात शंका नाही. आपल्याकडचा प्रतिसाद गृहीत न धरताही ही निर्मिती यंदाच्या यशस्वी चित्रपटातली एक आहे. आपल्याकडे फार प्रतिसाद नसल्याचा तोटा अखेर आपल्यालाच होणार आहे. आपल्याकडची वितरण पद्धती ही प्रेक्षक प्रतिसादावर अवलंबून असल्याने आजही अमेरिकेतले मोजके चित्रपटच आपल्याकडे आयात होतात. भविष्यात विज्ञानपटही या आयातीतून वगळले गेलेले मला तरी आवडणार नाहीत. तुम्हाला आवडेल?
- गणेश मतकरी