`परफ्युमः द स्टोरी ऑफ मर्डरर' - नाकाची गोष्ट

>> Sunday, September 20, 2009

काळ, काम आणि वेगाची धावती त्रैराशिकं मांडणारा `रन लोला रन` ज्यांनी पाहिला असेल, त्यांचा `परफ्युमः द स्टोरी ऑफ मर्डरर' हा चित्रपट त्याच दिग्दर्शकाचा आहे यावर विश्वास बसणार नाही. अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटात कथासूत्रांची पुनरावृत्ती झालेली दिसून येते. पण निदान या चित्रपटाच्या बाबतीत तरी दिग्दर्शक टॉम टायक्वरने वेगळीच दिशा निवडलेली दिसते. परफ्युम हा तसा अगदी नवा चित्रपट आहे. नावावरून विषयाचा अंदाज न येऊ शकणारा, मात्र सुरुवातीपासूनच बेसावध प्रेक्षकाला जाळ्यात ओढणारा.
पॅट्रिक सस्कीन्डच्या ज्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे, ती लोकप्रिय जरूर आहे. मात्र माध्यमांतर करण्यासाठी अतिशय कठीण. अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी ती वापरण्याचा प्रयत्न यापूर्वी करून रद्द केलेला आहे. पण टायक्वरने मागे न हटता हे जमवलेले दिसतं. रुपांतर कठीण आहे याचं कारण म्हणजे परफ्युममधील प्रत्येक गोष्ट ही गंधाशी संबंधित आहे. या चित्रपटाच्या नायकाचं नाक हे नको इतकं शक्तिशाली आहे आणि हे नाकच चित्रपटातल्या ब-याच घटनांच्या मुळाशी आहे. नायकाची गंधावरची आसक्ती आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी, ही लिहिण्यात येणं सोपं आहे. पण मितभाषी नायकाचे मनोव्यापार आणि त्याचा वासांशी असणारा संबंध, केवळ दृश्यांतून येणं कठीण.
परफ्युम मुळात सांगतो ती सतराव्या शतकातल्या फ्रान्समधली एका सीरिअल किलरची कल्पित गोष्ट. सीरिअल किलरवरचे चित्रपट अमेरिकेत लोकप्रिय असले तरी हा नेहमीच्या चित्रपटांत गणता येणार नाही. वातावरणापासून ते गुन्हेगारांच्या व्यक्तिमत्त्वापर्यंत आणि गुन्ह्यांमागच्या कारणांपासून ते शेवटाकडे अचानक बदलणा-या आशयाच्या रोखापर्यंत हा चित्रपट अनेक बाबतीत वेगळा आहे. जॅक द रिपर केसवर आधारलेल्या फ्रॉम हेलशी त्याचे थोडे साम्य आहे, पण ते अधिकतर दृश्यशैलीपुरतं मर्यादित.
अक्षरशः गटारात जन्मलेला ग्रेनॉल (बेन विशॉ) मोठा होतो तो दृष्टी किंवा स्पर्शाहून अधिक शक्तिशाली आणि सर्वव्यापी अशी वास घेण्याची ताकद असणारं घाणेंद्रीय घेऊनच. त्याला स्वतःचा असा कोणताच गंध नाही, कदाचित त्यामुळे उसन्या गंधांचं त्याला अप्रूप असेलही. टॅनरीमध्ये गुलामी करताना, तो एक काळ गाजवलेल्या बाल्दिनी (डस्टीन हॉफमन) या अत्तर बनवणा-याकडे कामाला राहतो आणि आपला गंधावरचा अंमल सिद्ध करतो. मात्र अशी कृत्रिम अत्तरं बनवण्यापेक्षा जिवंत गोष्टींचा अंश मिळवून त्यापासून एक नवा सुगंध बनवण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असते. ग्रास शहरी गेल्यावर ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा एक मार्ग त्याला सापडतो. तो म्हणजे खून. सौंदर्यवतींच्या शरीरातून त्यांचा अंश मिळविण्याचा हा प्रयत्न ग्रासमध्ये मोठीच घबराट पसरवतो. आणि नग्नावस्थेत सापडणा-या या मुलींवर काही अत्याचारही झालेले नाहीत, हे कळताच शहरवासी अधिकच गोंधळून जातात.
परफ्युमच्या आशयातला सर्वाधिक लक्षवेधी भाग आहे तो त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखेच्या मानसिक आंदोलनाचा. ग्रेनोलला भल्या बु-याची चाड नाही. केवळ हवं तसं अत्तर बनवणं एवढंच तो जाणतो आणि जे बनवण्यासाठी जी किंमत द्यावी लागेल ती देण्याची त्याची तयारी आहे. गुन्हेगाराचा वरवरचा प्रामाणिक हेतू आणि त्यात डोकावणारी अपरिहार्य विकृती यांचे इथले चित्रिकरण हे भयानक आहे. बेन विशॉच्या दिसण्यातल्या भाबडेपणा ही व्यक्तिरेखा अधिकच यंत्रवत आणि उमजण्यापलीकडे करून टाकतो.
वेळोवेळी जेव्हा नायकाच्या शक्तीचा वापर होतो आणि सामान्य माणसाच्या कुवतीपलीकडे जाऊन तो आपलं नाक वापरतो, तेव्हा दिग्दर्शकाचा कॅमेराही मुक्त होतो आणि नायकापर्यंत पोहोचणा-या वासांचा माग ठेवतो. स्वच्छंद वापर आपल्याला तो दाखवतो, जे केवळ शब्दात वर्णन करून अपुरं वाटेल. हा कॅमेराचा वापर आणि विषयाच्या ग़डदपणाला दिग्दर्शकाने पडद्यावर दिलेलं स्थान या दोघांना परफ्युमचा विशेष मानता येईल. ग्रासमधले अंधारे कोपरे, छायाप्रकाशाचा खेळ, तुटक प्रतिमांतून आणलेली गती यासारख्या घटकांतून टायक्वर जणू ग्रॅनोलच्या अंधा-या मनाला समांतर दृश्यरचना बांधतो.
नॉयडा हत्याकांड आणि बिअर मॅन यांच्या सनसनाटी बातम्यांमुळे आपल्याकडे सीरियल किलर हा विषय प्रकाशात आला. त्याचवेळी त्याचा विचारही नकोसा वाटणारा होता. परफ्युमचा असल्या विकृत सत्यघटनांशी काही संबंध नसला आणि गुन्ह्यांचा भरही शारीरिक गोष्टींपलीकडचा असला तरी त्याच्या नायकाची थंड योजनाबद्धता आणि मनाची जडणघडण आपल्याला कुठेतरी भोवतालच्या अस्वस्थ वर्तमानकाळाची जाणीव करून देते हेदेखील खरंच.
-गणेश मतकरी.

3 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) September 23, 2009 at 1:33 AM  

असे रहस्यमय चित्रपट मला आवडतात. कथा वाचून उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या चित्रपटाची सीडी बाजारात उपलब्ध आहे किंवा नाही, याबद्दल काही माहिती देऊ शकाल का?

ganesh September 23, 2009 at 11:29 AM  

it used to be commonly available till a few days back. sadhya mahit nahi.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) September 25, 2009 at 3:11 AM  

चित्रपट पाहिला. सुंदरच आहे. कथानायकाने इतर कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ उद्देशपूर्तीसाठी केलेले खून पाहताना समर्थनीय वाटतात, हेच या चित्रपटाचं यश आहे.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP