रशमोरः अँडरसनच्या जगात

>> Tuesday, December 22, 2009

वेस अँडरसन या दिग्दर्शकाच्या अनेक फिल्म्स पाहूनही प्रेक्षकाला त्या नक्की कशाविषयी आहेत याविषयीचा संभ्रम राहण्याची शक्यता आहे. म्हटलं तर त्यांना काही प्रमाणात गोष्ट असते, म्हटलं तर विनोदाला काही प्रमाणात स्थान असतं, ब-यापैकी लोकप्रिय अभिनेते असतात, मात्र त्यांना व्यावसायिक कॉमेडी चित्रपट म्हणता येणार नाही. कथाप्रधान नाही, बेतीवदेखील नाही. अँडरसनचा किती मोठा प्रेक्षकवर्ग आहे याची मला कल्पना नाही,पण त्याचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट हा कल्ट वर्गात मोडणारा आहे, अन् एक विशिष्ट वर्ग त्याचे चित्रपट पाहतो हे निश्चित. मी स्वतः त्याच्या रॉयल टेटनबॉम्ब्स (२००१), दि लाईफ अँक्वेटिक विथ स्टीव झिस् (२००४), दि दार्जिलिंग लिमिटेड (२००७) हे पूर्ण लांबीचे चित्रपट पाहिले आहेत. आणि दार्जिलिंगशी जोडलेली शॉर्ट फिल्म हॉटेल शेवालिअरदेखील.
त्याने दिग्दर्शित केलेला दुसरा चित्रपट, रशमोर (१९९८) मात्र माझ्या त्यामानाने हल्ली पाहण्यात आला. त्याविषयी ऐकून होतो, अन् अलीकडे त्यावरचं विकीपिडीआ साईटवरलं आर्टिकल वाचताना अँडरसनच्या चित्रपटांच्या वेगळेपणाकडे बोट ठेवणारा एक क्लू मिळाला.
विथ रशमोर,वेस अँडरसन अँन्ड ओवेन विल्सन (प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि रशमोर तसेच रॉयल टेटनबॉम्ब्सचा सहपटकथाकार) वॉन्टेड टू क्रिएट देअर ओन स्लाईटली हायटन्ड रिअँलिटी, लाईक रोआल्ड डाल चिल्ड्रन्स बूक, असे ते वाक्य होतं. बहुदा अँडरसन किंवा विल्सनच्या एखाद्या मुलाखतीचा संदर्भ असलेलं.
रोआल्ड डालटचा अँडरसन वरचा प्रभाव हे जसं त्याने डालची फँन्टॅस्टीक मि.फॉक्स ही मुलांची कादंबरी रुपांतरीत करण्यामागचं कारण असू शकतं, तसंच ते अँडरसनच्या चित्रपटातल्या विक्षिप्त वास्तववादामागचं देखील नक्कीच असणार. डालच्या मुलांच्या/किंवा मोठ्यांच्याही कादंब-या वाचणा-यांना हे ठाऊक आहे की त्यातलं वास्तव हे वास्तवाचा आभास असणारं, पण प्रत्यक्षात त्यांच्या कर्त्याच्या खास चष्म्यातून पाहिलेलं असतं. त्यातल्या पात्रांची स्वतःची अशी चमत्कारिक तर्कशास्त्र असतात. जी प्रत्यक्ष जगात चालून जाणार नाहीत. ही पात्रं, त्यांचे उद्योग आणि त्यांनी व्यापलेलं जग हे डालच्या चाहत्यांना प्रिय आहे. अँडरसनच्या चित्रपटांत या जगाचं निश्चितपणे दिसणारं प्रतिबिंब आहे. रशमोरमध्ये तर खासंच.
रशमोरचा नायक आहे महागड्या शाळेत शिष्यवृत्तीवर शिकणारा मॅक्स फिशर (जेसन श्वार्त्झमन), मॅक्सचं अभ्यासात जराही लक्ष नाही, मात्र एक्स्ट्रा करिक्युलर अँक्टिव्हिटीजमध्ये त्याचा हात धरणारं कुणीही नाही. तलवारबाजीपासून ते रंगभूमीपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याला रस आहे, आणि यातल्या प्रत्येक छंदांसाठी असलेल्या गटाचा (किंवा गट नसल्यास तो तयार करायलाही मॅक्स एका पायावर तयार आहे.) तो प्रमुख आहे. साहजिकच, त्याला अभ्यासासाठी वेळ मिळणार तरी कसा. मात्र या गोष्टींचे त्याला दुःख नाही.
मॅक्सचा आविर्भाव हा आपण खूपच घरंदाज असल्याचा. आपले वडील न्हावी नसून सर्जन असल्याचं तो सर्वांना सांगतो. या आपल्या डोक्यातल्या किंवा समाजातल्या वर्गभेदाचाही तो फार विचार करीत नाही.
अशा या मॅक्सचं आपल्याहून पुष्कळ मोठ्या, खालच्या वर्गांना शिकविणा-या शिक्षिकेवर प्रेम बसतं. रोजमेरी क्रॉस ( आँलिविया विलिअम्स) ते एकतर्फी असल्याचं, अन् मॅक्स वयाने खूप लहान असल्याचं वारंवार सुचवते. पण काही उपयोग होत नाही. तिला मिळवायच्या प्रयत्नात मॅक्सची हर्मन ब्लूम या उद्योगपतीशी मैत्री होते. ब्लूम (बिल मरी) मॅक्सला मदत करता करता स्वतःच रोजमेरीच्या प्रेमात पडतो आणि मॅक्सचं डोकं फिरतं.
हायस्कूलवर आधारलेले अनेक फॉर्म्यूला चित्रपट आपण पाहिले आणि रशमोर पाहिला, तर आपल्या लक्षात येईल की फॉर्म्यूला मधले काही घटक (उदाहरणार्थ अभ्यास न करणारा हुशार मुलगा. विद्यार्थ्यांचं शिक्षिकेवर प्रेम. इत्यादी) त्यात जरुर असले, तरी रचनेसाठी अन् व्यक्तिरेखेसाठी तो फॉर्म्यूला वापरत नाही. किंबहूना तपशिलात व्यक्तिचित्रण हाच त्याच्या रचनेचा भाग आहे. त्यामुळे पुढे, पुढे म्हणजे मॅक्स अन ब्लूममध्ये वैर झाल्यावर जेव्हा चित्रपट रचनेच्या, किंवा काही निश्चित घडवण्याच्या आहारी जातो तेव्हा तो दिग्दर्शकाच्या हातून निसटायला लागतो.
मॅक्सची व्यक्तिरेखा ही तिच्या विरोधात जाणा-या अनेक गोष्टी दाखवूनही चांगली वाटवणं अँडरसनने साधलं आहे. त्याच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी, म्हणजे जितक्या छंदांना तो एकाचवेळी जोपासतो ते किंवा त्याने केलेल्या नाटकांचे विषय अन् सादरीकरण (शाळेच्या रंगमंचावर साकारलेली अत्यंत वास्तववादी इफेक्ट्स अन् हिंसेच्या दर्शनासकट असणारी गँगस्टर्स किंवा युद्धासारख्य़ा विषयांची हाताळणी. हे खरंतर एरवी अशक्य आहे. मात्र अँडरसनच्या जगात मॅक्सला ते करता येतं, मॅक्सच्या नाटकांना शक्य वाटवण्यासाठी केलेला तपशील तर हिंदी चित्रपट दिग्दर्शकांनी जरूर पाहावा. आपल्याकडल्या सिनेमात स्टेज शोच्या नावाखाली वाटेल तेवढ्या मोठ्या सेटवर (उघडपणे स्टुडिओत लावलेल्या) भलीथोरली नृत्य दाखवून प्रेक्षकांचे शॉट अधेमधे लावण्याची एक मूर्ख प्रथा अनेक वर्षे आहे. त्या तुलनेत रशमोरमधल्या नाटकांतील नेपथ्याची, फॉल्स पर्स्प्रेक्टीव्हची जाण ही वाखाणण्याजोगी आहे.
रशमोर सर्वांना आवडेल अशी शक्यता नाही. अँडरसनच्या इतर चित्रपटांप्रमाणेच हा देखील एका विशिष्ट प्रेक्षकालाच डोळ्यासमोर ठेवून बनवलेला आहे. मात्र एक गोष्ट मी जरूर म्हणेन, की पाहणा-या प्रत्येकाला त्यातलं काही ना काही जरूर आवडेल. त्याचं जवळजवळ अर्ध्यापर्यंत सहजपणे उलगडणारं कथानक, बिल मरीला इन्डीपेन्डन्ट सिनेमा मधला महत्त्वाचा अभिनेता म्हणून सुरुवात करून देणारी ब्लूमची व्यक्तिरेखा,मॅक्सचं वास्तव आणि फँटसीच्या सीमारेषेवरचं जग, या आणि अशा अनेक गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत. आपल्याला त्यातली कोणती अधिक आवडते ते ज्याचं त्याने ठरवावं.
-गणेश मतकरी.

Read more...

सिनेमा ऍट दी एन्ड ऑफ द युनिव्हर्स

>> Thursday, December 10, 2009


मागे एकदा मी एका लेखात डग्लस ऍडम्सच्या "हिचहायकर्स गाईड टु दी गॅलेक्‍सी' या अद्‌भुत विनोदी वैज्ञानिकेचा उल्लेख केला होता. "रेस्टॉरंट ऍट दी एन्ड ऑफ दी युनिव्हर्स' ही त्यातलीच एक अफलातून संकल्पना. काळ आणि विज्ञानाशी अतिशय गमतीदारपणे; पण स्वतःचे एक निश्‍चित तर्कशास्त्र वापरून खेळणाऱ्या या कादंबरी मालिकेतील हे रेस्टॉरंट, जगाच्या विनाशाच्या क्षणासमीप उभे आहे. मात्र, कालप्रवाहाबाहेरच्या एका कृत्रिम बुडबुड्यात (याच तर्काला धरून दुसरे एक रेस्टॉरंट बिग बॅन्गच्या क्षणासमीपदेखील उभे आहेच. मात्र कादंबरीतील पात्रे प्रत्यक्ष भेट देतात, ती याच एका ठिकाणाला) या ठिकाणाहून जगाच्या विनाशकाळी होणारा विध्वंस आपल्या सुरक्षाकवचाबाहेर न जाता वर उत्तमोत्तम खाण्यापिण्याचा अन्‌ संगीताचा आस्वाद घेत घेत पाहता येतो. या विध्वंसाच्या भव्यतेच्या, निसर्गाच्या रौद्ररूपाच्या आकर्षणाबरोबरच आपण स्वतः प्रत्यक्ष त्या घटकेला तिथे नसल्याचा आनंदही या सुरक्षित आस्वादकांना होत असेल का? नक्कीच! 2012 च्या प्रेक्षकांनाही काहीसा याच प्रकारचा आनंद मिळत असल्यास नवल नाही.
या आनंदाचे मुक्त हस्ते वितरण करणारा दिग्दर्शक म्हणून कोणाचा सत्कार करायची वेळ आली, तर दिग्दर्शक रोलन्ड एमरिक इतका उत्तम उमेदवार मिळणार नाही. इन्डिपेन्डन्स डे (1996), गॉडझिला (1998), द डे ऑफ्टर टुमॉरो (2004) आणि आता 2012 (2009) या आपल्या सर्वांत यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपटांमधून त्याने "विध्वंसाचे प्रलयकारी दर्शन', हा आपला "युनिक सेलिंग पॉईंट' करून टाकला आहे. वर दिलेले चित्रपट प्रदर्शित झालेल्या वर्षांकडे पाहता लक्षात येईल, की यातले दोन चित्रपट 11 सप्टेंबर 2001 च्या आधीचे आहेत; तर उरलेले दोन नंतरचे. मात्र, सर्वांमध्ये मनुष्यहानी, प्रसिद्ध लॅंडमार्क इमारतींचे जमीनदोस्त होणे, वास्तववादी नसणारे परंतु थक्क करून सोडणारे स्पेशल इफेक्‍ट्‌स या सर्वांनाच स्थान आहे. याचा अर्थ, 9/11च्या भयकारी रिऍलिटी टीव्ही शोचा ना दिग्दर्शकांच्या संवेदनशीलतेवर परिणाम झाला, ना प्रेक्षकांच्या अभिरुचीवर, असा काढावा का?
"ऍपोकॅलिप्स' किंवा सगळ्याचा अंत घडवणारा विनाश, हा विषय गेले काही दिवस सातत्याने चित्रपटात हजेरी लावताना दिसतो आहे. एमरिकचे तीन चित्रपट, त्याखेरीज "आर्मागेडन', "डीप इम्पॅक्‍ट'सारखे मिटीओराईट (मार्फत) पृथ्वी उद्‌ध्वस्त करणारे `ट्वेल मन्कीज'सारखे जैविक अस्त्रांचा वापर करणारे, "28 डेज लेटर'सारखे रोमरोच्या झोम्बी फॉर्म्युल्याचे पुनरुज्जीवन करणारे, "टर्मिनेटर' किंवा "मेट्रिक्‍स'सारखे यंत्रयुगात मानवजातीचा विनाश शोधणारे... एक ना दोन, असे कितीतरी चित्रपट गेल्या काही वर्षांत याच सूत्राभोवती फिरताना दिसताहेत. "9'सारख्या मुलांच्या चित्रपटालाही हा विषय दूरचा नाही आणि "ऍन इन्कन्व्हिनिअन्ट ट्रूथ' किंवा "इलेवन्थ अवर'सारख्या माहितीपटांनाही आज पृथ्वीला वेळीच सावध होण्याचा इशारा देण्याची गरज वाटते आहे. "रोड' किंवा "बुक ऑफ इलाय'सारख्या आगामी चित्रपटांमध्येही डोकावत असणारा हा विषय पुढची काही वर्षे निदान 2012 (वन वे ऑर अनदर) सरेपर्यंत तरी हॉलिवूडसेन्ट्रीक चित्रसृष्टीपासून फारकत घेईल, असे वाटत नाही.
मात्र, या विषयाची हाताळणी ही, वाढणारे बजेट अन्‌ स्पेशल इफेक्‍ट्‌सचा दर्जा, यापलीकडे जाऊन अधिक वास्तववादी होताना दिसत नाही. जे "9/11' नंतर काही प्रमाणात होईल अशी अपेक्षा होती. मॅट रिव्हजने आपल्या "क्‍लोवरफिल्ड' या मॉन्स्टर मुव्हीमध्ये याचे पडसाद आणून हे काही प्रमाणात साधले. स्पेशल इफेक्‍ट्‌स वापरून किंवा स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचा शिरच्छेद करूनही त्याने क्‍लोवरफिल्डला (प्रामुख्याने छायाचित्रणाच्या तंत्राचा उत्तम वापर साधून) कायम सामान्य जनतेच्या दृष्टिकोनात रुजवले आणि एक वेगळा चित्रपट दिला. बाकी दिग्दर्शकांनी मात्र वास्तववादाशी जवळीक ही जाणूनबुजून टाळलेली दिसते.
चित्रपटनिर्मात्यांना वा दिग्दर्शकांना पडद्यावर काय आणणे "रिस्की' वाटते अन्‌ काय "सेफ' वाटते, यामध्येदेखील याचे थोडे कारण दडलेले आहे. बहुतेकदा चित्रपट हे मुळातच वास्तवापेक्षा पलायनवादी रंजनावरच आपले प्रेक्षक मिळवतात. त्यामुळे नजीकच्या भूतकाळातल्या विदारक सत्याची आठवण टाळणे, हेच त्यांना अधिक योग्य वाटते. हे असे काही खरेच घडू शकते, असे वाटू देण्यापेक्षा "एकदा काय झाले.... (किंवा एकदा काय होईल....) शैलीतील गोष्ट प्रेक्षकांना दाखवणे, हे व्यवसायाच्या दृष्टीने अधिक परवडणारे असते, असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे प्रेक्षक खऱ्या दहशतीपासून दूर राहून करमणुकीच्या पातळीवर चित्रपट पाहू शकतो.
"2012' मागचे तर्कशास्त्र यापेक्षा वेगळे नाही. हे चित्रपट बहुधा (बहुधा अशासाठी, की "ट्‌वेल्व्ह मन्कीज'सारखे उत्तम अपवाददेखील असू शकतात) "व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट' या प्रकारचे असतात. त्यांच्या जाहिराती किंवा ट्रेलर्स पाहिले, की त्यात काय आहे, याची आपल्याला पूर्ण कल्पना येते आणि चित्रपटगृहात जे पाहायला मिळते, ते या कल्पनेला दुजोरा देणारेच असते. 21 डिसेंबर 2012 या तारखेला जगाचा अंत ओढवेल किंवा त्याचे स्वरूप मूलभूत पातळीवर आमूलाग्र बदलेल, असे भविष्य मायन संस्कृतीने वर्तविलेले आहे. त्याचाच आधार घेऊन हा विनाश मोठ्या प्रमाणात दाखवायचा, हा चित्रकर्त्यांचा उद्देश. तोच मोठ्या पडद्यावर पाहून स्वतःला प्रभावित करून घेण्याचा प्रेक्षकांचाही उद्देश. या पलीकडे जाऊन अधिक वरची सांस्कृतिक कलास्वादात्मक पातळी गाठण्याचा उद्देश या चित्रपटात संभवत नाही. एका परीने त्यामुळे त्याचे गणितही सोपे होते. प्रेक्षकाची दिशाभूल होण्याचा प्रश्‍नच उरत नाही.
मी 2012 पाहिला तेव्हा मला याची पूर्ण कल्पना होती. केवळ छानसे स्पेशल इफेक्‍ट्‌स मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील, एवढीच माझी माफक अपेक्षा होती. इफेक्‍ट्‌स थोडे फार अनइव्हन असूनही, ती पुरी झाली, असे मी म्हणू शकतो. तरीही एका बाबतीत पटकथेने माझी थोडी निराशा मात्र केली. एमरिकच्या वर सांगितलेल्या चित्रपटात "इन्डीपेन्डन्स डे' सोडून इतर दोन चित्रपट मला तितकेसे आवडले नव्हते. त्याचे कारण म्हणजे गोष्ट कमालीची बाळबोध असूनही "इन्डीपेन्डन्स डे'ने चित्रपटातला ताण चढविण्याचे काही निश्‍चित टप्पे ओळखले होते. त्या दृष्टीने पटकथा अधिकाधिक वेधक केली होती. विध्वंसाचा भाग सोडूनही मधला एरिया 51 वरचा भाग किंवा अखेरचा संघर्ष पुरेसे रंगले होते. त्यातल्या व्यक्तिरेखाही थ्री डिमेन्शनल नसल्या, तरी आपल्याला पकडून ठेवणाऱ्या होत्या. प्रचंड मोठी "स्केल', हीदेखील ID-4 (इंडिपेन्डन्स डे)मध्ये प्रथमच वापरण्यात आल्याने नवीन होती.
2012 मध्ये स्केल वापरून जुनी झालेली आहे. ती आता अधिकच मोठ्या प्रमाणात, अधिक भव्य आहे, हे खरे; पण त्यामुळे अनेकदा ती "अति' वाटणारी. त्याखेरीज कथानकाला टप्पे हे जवळपास नाहीतच. म्हणजे संकटाची चाहूल देणारा सेटअप, विविध पार्श्‍वभूमीवर येणारी अनेक बारीकसारीक पात्रे, हे तर थेट "इन्डीपेन्डन्स डे'वरूनच आल्यासारखे आहे; पण एकदा विध्वंसाला सुरवात झाली, की दिग्दर्शक त्यात इतका रमतो, की पुढे नोहाच्या कथेप्रमाणे आर्कसचा सबप्लॉट असला, तरी तो पुरेशा ताकदीने उभा राहत नाही. खरे तर या भागातला सांस्कृतिक ठेवा कसा तयार होतो, या संबंधातले काही विचार किंवा संस्कृती विरुद्ध पैसा यामधला संघर्ष, असे काही मुद्दे लक्षवेधी जरूर आहेत; पण ते पुढे खुलवलेले दिसत नाहीत. अर्थात, मी मघा म्हटल्याप्रमाणे जाहिरात जे प्रॉमिस करते, ते चित्रपट जरूर दाखवतो. तिथे तक्रारीला फारशी जागा नाही.
तरीदेखील मी एका वेगळ्या विनाशकालीन चित्रपटाची वाट पाहतो आहे, जो केवळ कल्पनाविलासापेक्षा, जर खरोखरच अशी वेळ आल्यास काय होईल, याचा पुरेशा गंभीरपणे विचार करेल अन्‌ मग त्या वेळी लोकांपुढे येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी आणि नैतिक प्रश्‍न यावर काही भाष्य करू पाहील. त्यात स्पेशल इफेक्‍ट्‌स वा प्रत्यक्ष विनाश मोठ्या प्रमाणात असण्याचीही गरज नाही; पण मानव त्या अंतिम क्षणी आपल्यापुढचे कोणते पर्याय तपासून पाहतो आहे, अन्‌ आपला आजवरच्या अस्तित्वाचा काय ताळेबंद लावतो आहे, याचा प्रामाणिकपणे आढावा घेईल. आजवर जगात अनेक भल्याथोरल्या संस्कृतींचा अस्त हा अतिशय अनपेक्षितपणे ओढवला आहे. आपणही त्याला अपवाद असू, असे समजण्याचे कारण नाही. त्या शक्‍य कोटीतल्या अस्ताचे चित्रण जर एखादा चित्रपट करणार असेल, तर तो महागातल्या महाग स्पेशल इफेक्‍ट्‌सहून अधिक मोठा परिणाम करून जाईल, हे नक्की.
-गणेश मतकरी

Read more...

भांडारकर फॉर्म्युला आणि "जेल'

>> Sunday, December 6, 2009

एखाद्या उद्योगाची वा समाजव्यवस्थेची पार्श्‍वभूमी घेऊन तिचा वापर कथा सांगण्यासाठी करायचा, हा फॉर्म्युला आपल्याकडे ताजा वाटणारा असला, तरी "अनहर्ड ऑफ' म्हणण्यासारखा नक्कीच नाही. आर्थर हेली या प्रसिद्ध लेखकाने जवळपास आपलं पूर्ण करिअर हे या प्रकारची पार्श्‍वभूमी वापरून त्यापुढे नाट्यपूर्ण कथानकं सांगणाऱ्या कादंबऱ्यांसाठी वापरलं. हॉटेल, मनीचेंजर्स, इव्हनिंग न्यूज, स्ट्रॉंग मेडिसीन यांसारखी त्याच्या कादंबऱ्यांची नावंदेखील त्या कोणत्या उद्योगाचा वापर पार्श्‍वभूमी म्हणून करतात, हे स्पष्ट करायला पुरेशी आहेत. विशिष्ट उद्योगाच्या अत्यंत किचकट तपशिलात जाऊन वापर अन्‌ त्यातून वाचकाला आपण नुसतंच रंजन करून न घेता, त्याबरोबरच काही विशिष्ट माहिती मिळवतो आहोत असा आभास तयार करणं, ही त्याच्या कादंब-यांची खासीयत. (या प्रकारचा वापर मायकेल क्रायटनने आपल्या ज्युरासिक पार्क, एअरफ्रेम, रायजिंग सन, प्रे वगैरे काही टेक्‍नो थ्रिलर्ससाठीदेखील केला. त्याखेरीज एकाच एका व्यवसायिक पार्श्‍वभूमीला चिकटून राहणारी रॉबिन कुक किंवा जॉन ग्रिशमसारखी मंडळीही पार्श्‍वभूमीच्या तपशिलाचा वापर कथानकासाठी एक वास्तव चौकट उभी करण्यासाठी सातत्याने करताना दिसून येतात. हेली हे प्रमुख उदाहरण एवढ्याचसाठी, की दर कलाकृतीसाठी वेगळी पार्श्‍वभूमी, अन्‌ ते स्पष्ट करणारी नावं, हा संदर्भ इथे महत्त्वाचा आहे.) चित्रपटात हे त्या मानानं नवं. म्हणून थोडं वेगळं वाटणारं.
मधुर भांडारकरनं हिंदी चित्रपटांचा आर्थर हेली होऊन दाखण्याचा चंग बांधल्याचं आपल्या यापूर्वीच लक्षात आलं असेल. चांदनी बारच्या यशानंतर त्याचा प्रत्येक चित्रपट हा निराळी पार्श्‍वभूमी धरून, त्यातल्या खाचाखोचा शोधून, सामाजिक सत्यकथनाच्या आवेशात पुढे आला. चित्रपटांमध्ये येणाऱ्या कथानकाचाही फॉर्म्युला ठरून गेला. प्रमुख व्यक्तिरेखेची (बहुतेक चित्रपटात स्त्री, पण अपवाद आहेत.) ओळख, तिचा एक ढोबळ ट्रेट ठरवणं (म्हणजे प्रामाणिकपणा, महत्त्वाकांक्षी असणं इतपत), मग पार्श्‍वभूमीशी संबंधित प्लॉटचा गुंता रचणं, इतर छोटी-मोठी पात्रं, त्यांची उपकथानकं वगैरे. शेवटाला म्हणावा असा नियम नाही. मात्र व्यक्तिरेखेत बहुधा आमूलाग्र बदल होणं अपेक्षित. (पुन्हा इथंही अपवाद आहेत.) मात्र यशस्वी फॉर्म्युलावर आधारित प्रत्येक चित्रपट यशस्वी असतो असं नाही. चांदनी बार, पेज 3, कॉर्पोरेट आणि फॅशन हे त्याचे निर्विवादपणे जमलेले चित्रपट. इतरांना तेवढं यश मिळालेलं दिसत नाही. भांडारकरच्या नुकत्याच आलेल्या "जेल'ची गणनाही या अयशस्वी चित्रपटांच्या वर्गातच करावी लागेल.
याचं एक प्रमुख कारण हे मला पार्श्‍वभूमीच्या निवडीत दिसतं. अशा चित्रपटांसाठी पार्श्‍वभूमी निवडताना दोन प्रकारची काळजी घेणं आवश्‍यक आहे. एक तर ती नावीन्यपूर्ण हवी अन्‌ दुसरी म्हणजे घटनाचा चढता आलेख ठेवण्याइतका विस्तृत अवकाश तिच्यात अंगचाच हवा. सत्ता आणि जान मधली राजकीय अन्‌ पोलिसी जगाची बॅकग्राऊंड आता इतकी जुनी झालेली आहे, की पटकथा खूपच वैशिष्ट्यपूर्ण असल्याखेरीज केवळ विषय चित्रपटाला तारणार नाही. ट्रॅफिक सिग्नल आणि जेलमध्ये पार्श्‍वभूमीचा अवाकाच फार मर्यादित आहे. एकदा का इथला पात्रपरिचय आणि मांडणी झाली, की पुढे काय घडू शकतं याला मर्यादा आहेत. आता जेलचंच उदाहरण पाहू.
जेलचा नायक आहे पराग मनोहर दीक्षित अर्थात नील नितीन मुकेश. हा एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे; पण तो एकूण ज्या प्रकारे वागतो आणि बोलतो त्यावरून त्याला बुद्धी बेताचीच असावी. त्याच्या रूममेटचं सतत त्याच्या फोनवरून ड्रगडीलर्सना फोन करणं अन्‌ त्याच्या गाडीचा वापर ड्रग ट्रॅफिकिंगसाठी करणं त्याच्या बिलकूल लक्षात येत नाही, अन्‌ लवकरच तो जेलमध्ये येऊन पडतो. आता एकदा तो जेलमध्ये आला, की पुढे काय? तर फॉर्म्युला!
जेलच्या आजूबाजूला कथानक घडवणं हे अधिक सोपं आहे, जसं यात थोडक्‍यात येणारं, पण मूळ कथानकाकडून दर्जेदार असं "गनी' नावाच्या कैद्याचं कथानक आहे. (कदाचित "चांदनी बार'च्या काळात भांडारकरनं तेच मूळ कथानक म्हणून वापरलं असतं; पण सध्या त्याची प्रोटॅगॉनिस्ट निवडण्यामागची दृष्टी बदललेली दिसते.) मात्र सर्व चित्रपट जर जेलमध्ये घडवायचा, तर नुसते प्रसंग रचण्याची नसून खऱ्याखुऱ्या लेखकाची आवश्‍यकता आहे. "जेल'मध्ये काहीच घडत नाही. तुरुंगातून सत्ता चालवणारा भाई, एक राजकारणी, एक ज्योतिषी, एक काउंटरफिटर अशी काही सरधोपट पात्रं भेटतात. नवाब (वाया घालवलेला मनोज वाजपेयी), गनीसारखे काही मुळात सज्जन; पण परिस्थितीच्या कचाट्यात वगैरे सापडलेले किंचित कमी सरधोपट कैदी भेटतात. पण केवळ या पात्राच्या भेटीगाठी म्हणजे चित्रपट कसा होईल? त्याला काही दिशा, आलेख, चढउतार नकोत का? बरं, पराग दीक्षित ही व्यक्तिरेखाच मुळात दम नसलेली. तिच्या जेल जाण्यातही परिस्थितीपेक्षा वकिलाच्या बेजबाबदारपणाचाच हात अधिक दिसतो. मात्र वकील बदलला हे कळण्यासाठी पराग, त्याची मैत्रीण (मुग्धा गोडसे) आणि आई यांना चित्रपटभर वेळ जाऊ द्यायला लागतो.
एक वेळ मूळ पात्रं सोडा, निदान जेलबद्दल तरी दिग्दर्शक काही विधान करेल अशी अपेक्षा, पण तीही पूर्ण होत नाही. निरपराध्यांना अडकवणारी कायदे व्यवस्था, जेलची अवस्था अन्‌ तिथल्या कैद्यांची परिस्थिती याबद्दल आपण वर्तमानपत्रात वाचून जितकी माहिती मिळवू शकू, तितकीच "जेल' पाहून आपल्याला मिळते. आर्थर हेलीच्या किंवा मायकेल क्रायटनच्या रिसर्चचा तपशील पाहिला तर तुलनेने हे प्रमाण काहीच नाही. आणि केवळ तपशीलदेखील पुरेसा नाही. चित्रकर्त्याने या तपशिलाचा वापर साधन म्हणून करायला हवा, जे दिसतंय त्या पलीकडे जाणारा आशय मांडण्यासाठी. पण कदाचित या दिग्दर्शकाकडून आपण फार अधिक अपेक्षा ठेवत असू.
"जेल' हाच विषय असणारे, पण त्यापलीकडे जाऊन मानवी प्रवृत्तीवर भाष्य करणारे, तरीही रंजन हाच प्रमुख हेतू असलेले दोन चित्रपट हॉलिवूडसारख्या व्यावसायिक चित्रसृष्टीतून काही वर्षांपूर्वी आले होते. दोन्ही स्टीफन किंगच्या साहित्यावर आधारित होते, दोन्ही फ्रॅन्क डेराबोन्टने दिग्दर्शित केले होते अन्‌ दोन्ही सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर नामांकनात होते. 1994 च्या शॉशान्क रिडेम्पशनला ते ऑस्कर मिळालं; पण 1999 च्या "द ग्रीन माईल'चं हुकलं. यातल्या कथानकामध्ये (खास करून ग्रीनमाईलच्या) फॅन्टसीला जरूर जागा होती; पण व्यक्तिरेखा, तुरुंगाच्या सेट अपचा वापर आणि स्वतंत्र घटकांपलीकडे जाणारी आशयाची झेप, या दोन्ही बाबतींत ते जरूर पाहण्यासारखे होते.
वरवरच्या वास्तवाच्या पांघरुणाखाली निरर्थक चित्रपट बनवण्यापेक्षा फॅन्टसीच्या आधाराने लांबचा पल्ला गाठता येत असेल, तर तेच केलेलं काय वाईट? ते करताना फॉर्म्युल्यापलीकडे जाऊन स्वतंत्र विचाराची अधिक आवश्‍यकता पडेल. पण प्रत्येक फॉर्म्युला हा सतत, सारख्या प्रमाणात यशस्वी झालेला दिसत नाही आणि धोका पत्करायचाच असेल, तर तो पुनरावृत्तीसाठी पत्करण्यापेक्षा मुळातच सर्जनशील निर्मितीसाठी का पत्करू नये?
- गणेश मतकरी

Read more...

बॉबीः ऐतिहासिक-अनैतिहासिक

>> Friday, December 4, 2009


बॉबीचं (२००६)वर्णन हे मुख्य धारेतला प्रायोगिक चित्रपट असं सहजपणे करता येईल. प्रायोगिक अशासाठी, की त्याला सांकेतिक रचना नाही. म्हणण्यासारखं कथानक नाही. केवळ एका ऐतिहासिक घटनेचा संदर्भ आहे. पण केवळ संदर्भ. कारण चित्रपटभर आपण ज्या घटना पाहतो, त्यांचा या घटनेशी किंवा त्यात दिसणा-या व्यक्तिरेखेशी काही संबंध नाही. किंबहूना या इतर घटनाक्रमाला सत्याचा काही आधार नाही. यातली पात्रं ही काल्पनिक आहेत. ही काल्पनिक पात्रं एका हॉटेलमध्ये दिवसभर घडणा-या घाडामोडी दाखवितात आणि ती आपापल्या स्वतंत्र कथासूत्रात बांधलेली आहेत. या प्रत्येक कथासूत्राची लांबी स्वतंत्रपणे १०-१२ मिनिटांहून अधिक नसेल, पण चित्रपट बनतो या कथासूत्राच्या एकत्र येण्यातून. क्वचित एका कथेतील पात्र दुस-यात जातं, नाही असं नाही, पण एरवी या गोष्टी स्वतंत्रपणे पाहण्यासारख्या आहेत.
चित्रपटाला मुख्य धारेतला म्हणता येईल तो प्रामुख्याने त्यात भाग घेणा-या कलावंतांमुळे. ही छोटी छोटी कथानकं हॉलीवू़डच्या मोठ्यात मोठ्या स्टार्सनी उभी केली आहेत. चित्रपटाची गंमतही या मोठ्या ता-यांना छोट्या (किंवा काही वेळा सूक्ष्म) भूमिकांत बघण्यातही आहे.
चित्रपटाचं नाव हे उघडच फसवणारं आहे. गांधी, हॉफी, माल्कम एक्स किंवा अली यांसारखे प्रसिद्ध व्यक्तिरेखांच्या नावाचा वापर करणारे चित्रपट हे सामान्यपणे त्या त्या व्यक्तिविषयी सांगणारे, ब-याच प्रमाणात चरित्रात्मक असतात. बॉबी हे नाव आहे १९६८मध्ये होऊ घातलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जॉन एफ केनडींचे बंधू रॉबर्ट एफ केनडी यांचं. ज्यांची ४ जून १९६८ रोजी कॅलिफोर्नियामधल्या अँबेसेडर हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. या हॉटेलमध्येच त्यांचं प्रसिद्धी कार्यालय होतं आणि हा दिवस त्यांच्या एका छोट्या राजकीय विजयाचा दिवस होता. राष्ट्राध्यक्षपदाकडे नेणारं आणखी एक पाऊल. दुर्दैवाने हे पाऊल त्यांचं, अखेरचं ठरलं. आपल्याकडे फार माहिती नसलं तरी बॉबी केनड़ी हे अमेरिकेतलं तसं लोकप्रिय नाव आहे आणि अनेकांचा विश्वास आहे की जर ते निवडून आले असते तर युद्धबंदीबरोबर अनेक सकारात्मक गोष्टी घडवून त्यांनी देशाचं स्वरूप आमूलाग्रपणे बदललं असतं.
बॉबी चित्रपट घडतो अँबेसेडर हॉटेलमध्ये. जिथे रात्री केनडी येणं अपेक्षित आहे. तुकड्या तुकड्यांत केनडींच्या त्या दिवसभरातल्या हालचालींची माहितीही तो आपल्याला देतो. हे प्रत्यक्ष चित्रिकरण असल्याने केनडींची भूमिका कोणा अभिनेत्याने केली नसून पडद्यावर दिसणारे प्रत्यक्ष बॉबी केनडीच आहेत, मात्र हा भागही चित्रपटांच्या इतर कथासूत्रांच्याच लांबीचा असल्याने बॉबीदेखील या स्टारकास्टचाच एक भाग म्हणावे लागतील आणि त्यांची गोष्ट छोट्या कथानकांपैकी एक. इतर स्टार्समध्ये विलियम एच. मेसी (हॉटेल मॅनेजर), शेरोन स्टोन (त्याची पत्नी), हीदर ग्रॅहेम (त्याची प्रेयसी आणि टेलिफोन आँपरेटर), ख्रिश्चन स्लेटर (नुकताच नोकरीवरून काढलेला असिस्टंट मॅनेजर), डेमी मूर (कायम नशेत असणारी गायिका), अँथनी हॉपकिन्स (निवृत्त डोअरमन), लॉरेन्स फिशबर्न ( शेफ), हेलन हण्ट आणि मार्टिन शीन (समारंभासाठी आलेलं जोडपं), लिंडसे लोहान आणि एलाया वूड (स्वतःच्या लग्नासाठी हॉटेलात उतरलेलं जोडपं) आणि अँश्टन कचर (ड्रग डीलर) यांची वर्णी लागते. ही यादी संपूर्ण नाही, पण एकंदर स्वरूपाची कल्पना याययला पुरेशी आहे. दिग्दर्शक एमिलिओ एस्तवेज स्वतःही अभिनेता असल्याने त्याने स्वतःही एक भूमिका (डेमी मूरच्या नव-याची) केली आहे.
चित्रपट बॉबी केनेडीच्या अखेरच्या दिवसांवर असून आणि अर्थातच त्यांच्या हत्येने संपत असून, तो त्यांच्यापासून दूर घडवणं हा कलात्मक निर्णय म्हणून योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्दा आहे, पण आहे त्या परिस्थितीत तो त्यावेळच्या अमेरिकेचं चित्रं चांगल्यारीतीने रेखाटतो हे खरं. त्यावेळी असलेले जनतेपुढचे प्रश्न, व्हिएतनाम युद्धामुळे आलेली अंदाधुंदी, वर्णभेदाचा नवा टप्पा, बदलते सामाजिक प्रवाह, नव्या (आणि काही अंशी वैफल्यग्रस्त) पिढीचा स्वैराचार, स्वातंत्र्याच्या कल्पना या सगळ्या गोष्टींना तो एकत्र करतो आणि शेवटच्या केनेडींच्या भाषणाचा प्रभावी वापर. या परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि समस्यांवर त्यांच्या मनात असणारे तोडगे आपल्यापुढे मांडण्यासाठी करतो. केनेडींचं हे चित्र सकारात्मक आणि पूर्णपणे एकतर्फी आहे हे मान्य, पण त्या क्षणापुरता चित्रपट आपल्याला इतिहासातल्या एका निर्णायक क्षणावर नेऊन पोहोचवतो आणि या माणसाला न मिळालेल्या संधीची हळहळ वाटायला लावतो. ऐतिहासिक नसूनही एका व्यक्तीच्या विचारांचं दर्शन घडवणारा विचार म्हणून बॉबी उल्लेखनीय वाटतो.
-गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP