व्हाईट रिबनः न उलगडणा-या रहस्याचा पाठपुरावा

>> Tuesday, March 30, 2010

चित्रपटाच्या दृश्यभाषेविषयी खूप बोललं/लिहीलं गेलं असलं, तरी जेव्हा आशय गुंतागुंतीचा वा काही निश्चित विचार मांडणारा असतो, तेव्हा चित्रपटांनाही संवादाचा आधार घेण्यावाचून पर्याय नसतो. आणि दिग्दर्शकाच्या दृष्टीने त्यात कमीपणा काहीच नाही. ध्वनी, मग तो साऊंड इफेक्ट्स स्वरूपातला असेल, पार्श्वसंगीताने दृश्याला उठाव आणणारा असेल वा प्रत्यक्ष संवादामधून येणारा असेल, चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा तो योग्य प्रकारे वापऱणं आवश्यक आहे. याचीच दुसरी बाजू म्हणजे अतिरेक, जो टाळताच यायला हवा. जसा संवादाचा अतिरेक वाईट, तसाच तो पार्श्वसंगीताचा तसाच दृश्यसंकल्पनांमधल्या कसरतीचा देखील.शब्दांमध्ये वाहवत जाणं जितकं चूक तितकंच दृश्य चमत्कृतींमध्ये आशयाला विसरणं. चांगला दिग्दर्शक हा दृश्य अन् ध्वनी या दोन्ही अंगांचा अचूक, नेमका आणि संयमित वापर करतो. असा वापर हा बहुतेक चांगल्या गोष्टींप्रमाणेच क्वचित पाहायला मिळतो, हे वेगळं सांगायला नको. मी नुकत्याच पाहिलेल्या मायकेल हानेकेच्या ` व्हाईट रिबन ` चित्रपटात तो अभ्यासण्याएवढा उत्तम जमलेला आहे. उदाहरणादाखल एक दृश्य घेऊ. दृश्य म्हणजे एक संवाद आहे. सुमारे तीन मिनीटं चालणारा. एक चार पाच वर्षांचा मुलगा आणि त्याची दहा बारा वर्षांची बहीण यांच्यामधला. संवादाचा विषय आहे `मृत्यू `. मुलाने आजच एका बाईचा मृतदेह पाहिला आहे, आणि त्याच्या मनात काहीतरी चलबिचल झाली आहे. त्याला इच्छा आहे, ती बहिणीकडून अधिक माहिती मिळविण्याची. प्रसंगाची दृश्य मांडणी ही संवादाला पूर्ण महत्त्व देणारी प्रामुख्याने दोन प्रकारात विभागलेली. पहिला एस्टॅब्लिशींग शॉट ज्यात आपल्याला दिसतं की मुलं बसून सूप पिताहेत. हा स्वयंपाकघरातलाच एखादा कोपरा असावा, जिथे टेबल मांडण्यात आलंय. टेबलाला लागून असलेल्या खिडक्यांमधून प्रकाश येतोय.मुलाची आपल्याकडे पूर्ण पाठ, तर मुलीचा चेहरा एका बाजूने दिसणारा. ही पूर्ण चौकट पडद्याच्या मध्यभागी,पडद्याचा साठ टक्के भाग व्यापणारी. उरलेला दोन्हीकडल्या भागात अंधार. परिणाम एखाद्या फ्रेम केलेल्या चित्रासारखा.
मुलगा विचारतो, की, ` आज त्या बाईला काय झालं होतं ?` बहीण विचारात, मग तिच्या लक्षात येतं. ` ती मेली होती.` बहीण सांगते. ` म्हणजे?` मुलगा विचारतो. बहीण जशी ` मरणं म्हणजे काय` याचं स्पष्टीकरण द्यायला लागते, तसा कॅमेरा सरळ क्लोजअप्सवर जातो, अन् संवाद संपेस्तोवर तसाच राहतो. संवाद म्हटलं तर एखाद्या युक्तीवादासारखा पण भाबडेपणी केलेल्या. मरण म्हणजे काय, हे कळल्यावर मुलगा त्यावर उपाय नाही का ? हे विचारतो. त्याच्यासाठी दुसरा धक्का आहे ते सर्वांनाच कधी ना कधी मरावं लागतं, ही माहिती. तो आशेने विचारतो, ` तुला नाही ना मरावं लागणार ? आणि बाबांना ?
मृत्यू त्यांनाही सुटणार नाही असं कळताच पुढचा प्रश्न ` आणि मला?` असा असतो. या सर्वांतून त्याला मरण ही भीतीदायक गोष्ट काय आहे, हे तर कळतंच, वर आई बाहेरगावी गेल्याचं सांगून आपल्याला आजवर फसवलं जात होतं, हेदेखील लक्षात येतं. मुलगा सूपचं बोल टेबलावरून खाली फेकतो. इथे दृश्य संपतं.
अनेक दृष्टींनी हा प्रसंग लक्षात राहण्याजोगा. मुळात चित्रपटच ब्लॅक अँड व्हाईट, अन् पहिल्या महायुद्धाआधीचा काळ दाखणारा असल्याने, एक विशिष्ट वातावरण तर त्यात आहेच, मात्र संवादाचा अर्थपूर्ण भाग लक्षात घेता, त्याला सर्वाधिक महत्त्व देऊन छायाचित्रणाची बाजू गरजेपुरती ठेवणं, पार्श्वसंगीत पूर्णपणे टाळणं, हे विशेष. दोन्ही मुलांचा अभिनय, तो अभिनय वाटतच नसल्याने अधिकच भेदक वाटणारा, आणि संवाद तर फारच उल्लेखनीय. मृत्यूशी पहिली ओळख, आईच्या मरणाचं दुःखं. घरच्यांनी केलेली फसवणूक, असे अनेक टप्पे घेतानाही हे संवाद जराही या मुलांकडून स्वाभाविकपणे अपेक्षित असलेल्या भाषेपलीकडे जात नाहीत. मुलांआडून संवादलेखक डोकावताना दिसत नाही. शब्दांना तत्वज्ञानाचा वास येत नाही. अत्यंत अवघड आशय सांगणारा सोपा प्रसंग म्हणून तो माझ्या कायम लक्षात राहील.
` व्हाईट रिबन`चा विषय मृत्यूशी संबंधित असला, तरी हा संबंध थेट नाही. जसा हानेकेच्या चित्रपटांत तो कधीच नसतो. त्याच्या कॅशे किंवा फनी गेम्समध्येही मृत्यू, हिंसा, रहस्य यांचा सहभाग होता. मात्र त्या चित्रपटांचा अजेंडाही वेगवेगळा होता. इथला अजेंडा आहे तो नैतिक भ्रष्टाचार आणि त्याचा दहशतवादाशी असणारा अप्रत्यक्ष संबंध. हा संबंध लक्षात येतो, तो सुरुवातीच्या निवेदनातून, ज्यात जर्मनीमधल्या या छोट्याशा गावातल्या घटनांचा संबंध लवकरच घडणा-या राजकीय उलाढालींशी अन् महायुद्धाच्या दिशेने होणा-या वाटचालीशी लावलेला आहे. निवेदक आहे तो त्या काळी या गावच्या शाळेत काम करणारा शिक्षक. आज तो या घटना सांगतोय त्या आठवणीतून, त्यातल्या सर्व गोष्टींचा तो साक्षीदार नाही, अन् कदाचित काळाने त्याची स्मरणशक्तीही धुसर केली असेल. मात्र त्याला संबंध दिसतो. अन् या घटना सांगणं गरजेचं वाटतं.
घटना आहेत त्या प्रामुख्याने अपघाताच्या, मरणाच्या, हिंसाचाराच्या. त्यांना सुरुवात होते ती गावच्या डॉक्टरला (मघाच्या प्रसंगातल्या मुलाच्या वडिलांना) झालेल्या अपघातापासून. त्यांचा घोडा कोणीतरी दोन झाडांमध्ये बांधलेल्या तारेला अडखळतो, आणि डॉक्टरांवरचं इस्पितळात पडून राहण्याची पाळी येते. गुन्हेगार सापडत नाही. लवकरच एका अपघातात एका बाईला आपला जीव गमवावा लागतो. अशा घटना घडत जातात, स्पष्टीकरणं मिळत नाहीत. गावात अस्वस्थता, दहशतीचं वातावरण पसरतं. ते लवकर निवळण्याची चिन्हं दिसत नाहीत.
` व्हाईट रिबन`मधल्या शिक्षकाची (ख्रिश्चन फ्रायडेल) प्रेमकथा हा एकमेव रिलीफ चित्रपटात आहे. उरलेल्या भागात सतत काही भयंकर घडत नसलं, तरी तणावाचं वातावरण सर्वत्र पसरलेलं आहे. सत्ताधा-यांची नितीमत्ता, दहशत आणि अत्याचार यांमधला परस्परसंबंध, व्यक्तिगत आयुष्य आणि बाह्यप्रतिमा, क्रौर्य आणि निरागसता यासंबंधातल्या विविध पैलूंशी दिग्दर्शक खेळताना दिसतो. यातल्या निरीक्षणात अन् ते मांडण्याच्या पद्धतीत समर्थ चित्रकर्त्याची हातोटी जाणवत राहते.
तरीही रहस्यप्रेमी प्रेक्षकांना एक सूचना. हानेकचे इतर चित्रपट पाहिलेल्यांना वेगळं सांगायची गरज नाही, पण इतर प्रेक्षकांनी `अपराधी कोण? ` छापाच्या शेवटाची अपेक्षा करू नये. सर्वांना समाधान देणारे सोपे शेवट हा दिग्दर्शक दाखवत नाही. त्याच्या लेखी खरं रहस्य आहे ते आपल्या स्वभावात, विचारात वागण्याच्या पद्धतीत, आणि ते जर उलगडू शकत नसेल, तर छोटेखानी रहस्यांची उकल करण्यात त्याचा रस नाही. यंदा ऑस्करच्या परभाषिक गटात स्पर्धेत असणारा, पण (बहुदा वादग्रस्त सूचकतेमुळे) पारितोषिकप्राप्त न ठरलेला व्हाईट रिबन ` मस्ट सी` आहे यात वादच नाही.


-गणेश मतकरी.

Read more...

कुलकर्ण्यांची ‘विहीर’

>> Monday, March 22, 2010

ढोबळमानाने पाहिलं, तर सिनेमा हा दोन प्रकारांत मोडणारा असल्याचं लक्षात येईल- व्यावसायिक आणि अर्थपूर्ण.व्यावसायिक सिनेमा हा बहुधा त्यातल्या कथानकांचा अन् त्यांच्यात असणाऱ्या मनोरंजन क्षमतेचा गुलाम असतो. त्याचे काही संकेत असतात, काही ढाचे असतात. प्रेक्षकांच्या त्याच्यापासून काही निश्चित अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करणं त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. मात्र यामुळेच उत्तम व्यावसायिक चित्रपटदेखील आशयाची किती खोली गाठू शकेल याला मर्यादा पडते. इथल्या कथा त्यांच्यावर पडलेल्या करमणूक करण्याच्या जबाबदारीने काही ठराविक वर्तुळात फिरत रहातात आणि ‘कॉन्टेक्स्ट’ हा प्रकारच हरवून बसतात.
रंजनापुढे पाश्र्वभूमी, व्यक्तिरेखा, काळ या सर्वच गोष्टी दुय्यम होतात आणि निर्वातात घडणारी गोष्ट असल्यासारखी या चित्रपटांची परिस्थिती होते. ‘हॉलीवूड’ अन् तथाकथित ‘बॉलीवूड’मधल्या अनेक बऱ्यावाईट चित्रपटांबद्दल आपण हे विधान करू शकतो.
याउलट अर्थपूर्ण चित्रपट हे खरोखर मनापासून काही सांगण्याच्या हेतूने केलेले असतात. इथे कथानकांचे आलेख अथवा रंजनमूल्य याहून अधिक महत्त्व दिग्दर्शकाचा दृष्टिकोन थेट आपल्यापर्यंत पोहोचण्याला असतो. इथल्या व्यक्तिरेखांना वाऱ्यावर सोडून दिलं जात नाही. गोड शेवटाची अपेक्षा पुरी करणाऱ्या बाहुल्या अशी त्यांची व्याख्या बनत नाही. इथली पात्रं कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत यातच बहुधा अशा चित्रपटांच्या आशयाची गुरुकिल्ली असते. आपापल्या मातीतल्या गोष्टी सांगणाऱ्या देशोदेशींच्या चित्रपटांमध्ये, ‘वर्ल्ड सिनेमा’मध्ये या प्रकारच्या चित्रपटांचं मोलाचं स्थान आहे. त्यांना असणारी संदर्भाची चौकट हा त्यांचा विशेष आहे.
मराठी सिनेमामध्ये घडत असलेल्या रेनेसान्सविषयी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण हेही लक्षात घ्यायला हवं की वर उल्लेखिलेल्या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या चित्रपटांची वाढती संख्याच ते यशस्वीपणे घडवू शकेल. आपल्याकडे आधीच अस्तित्वात असणाऱ्या बॉलीवूडची मराठी आवृत्ती, प्रेक्षकांचा गरजेपेक्षा अधिक विचार करत वा चॅनल्सना हाताशी धरून जाहिरातबाजीचा मार्ग अवलंबत काढलेला सिनेमा आज तिकीट खिडकीवर चालताना दिसला, तरी तो चित्रपटसृष्टीला मोठं करणार नाही, तर पुढेमागे अडचणीतच आणेल. याउलट अर्थपूर्ण सिनेमा पाहण्याची आवड म्हणा, प्रथा म्हणा, शिस्त म्हणा प्रेक्षकांत तयार झाली, तर केवळ सेलेब्रेटी करमणुकीसाठी ओळखला जाणारा आपला सिनेमा मराठी चित्रपटांतून आपली नवी ओळख तयार करू शकेल. उमेश कुलकर्णींचा दुसरा सिनेमा ‘विहीर’ हे अशा आशयघन चित्रपटांमध्ये जाणाऱ्या वाटेवरलं योग्य पाऊल आहे.
‘विहीर’ हा एक अनुभव आहे. दिग्दर्शकाच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या एका घटनेवर तो आधारित आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि पटकथालेखक गिरिश कुलकर्णी/ सती भावे यांनी एका आठवणीला शक्य तितक्या शुद्ध स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हे काम म्हटलं तर खूपच अवघड आहे. कारण या आठवणीचं स्वरूप फारच तरल आहे. एका शाळकरी मुलाला प्रथमच झालेलं मृत्यूचं दर्शन, त्या धक्क्याने त्याचं छोटेखानी विश्व हादरून जाणं आणि जीवनासंबंधातलं हे कटू सत्य पचवून त्याचं पुन्हा मार्गस्थ होणं ही विहीरच्या केंद्रस्थानी असलेली घटना आहे. इथे नायकाच्या आयुष्यात जे घडतं त्यापेक्षा अधिक महत्त्व त्याला जे जाणवतं त्याला आहे. चांगल्या साहित्यकृतीत सर्व गोष्टी सांगाव्या लागत नाहीत. ‘बिट्वीन द लाइन्स’ वाचणं तिथं शक्य होतं. विहीर असा ‘बिट्वीन द सीन्स’ पाहता येतो. प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्रसंगाइतकंच महत्त्व इथे प्रत्यक्ष न दिसणाऱ्या, पण रचनेतून जाणवणाऱ्या नायकाच्या भावनिक आंदोलनांना येतं.
समीर (मदन देवधर) इथला नायक आहे. समीर पुण्यात राहतो, पण सुटीत गावाला जाणं हा त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. गावात आजी-आजोबांच्या (ज्योती सुभाष, डॉ. मोहन आगाशे) घरी या कुटुंबातले सारेजण एकत्र जमतात, पण समीरच्या लेखी सर्वात महत्त्वाचे आहे ती नचिकेत (आलोक राजवाडे) या त्याच्या मावसभावाशी होणारी भेट. सर्वसाधारण कारणांवरून तंटे-बखेडे उकरत राहणाऱ्या मोठय़ांपेक्षा समीर आणि नचिकेत एकमेकांच्या सहवासात सुट्टी छान घालवतात. शेतातल्या मोठय़ाथोरल्या विहीरीत पोहतानाही त्यांचा वेळ मजेत जातो.
मात्र कधीतरी समीरच्या लक्षात येतं की या सगळ्यात नचिकेतचं मन नाहीये. बहुधा घरच्या कटकटींना कंटाळून वा इतर काही कारणांनी असेल, पण त्याला या सगळ्याचा कंटाळा आलाय. नचिकेतच्या वागण्याचा पुरता अर्थ लागायच्या आतच त्याचा मृतदेह विहीरीत सापडतो. अपघात की आत्महत्या या प्रश्नाचंही नीट उत्तर मिळू शकत नाही. मात्र उत्तर काही असेना, समीरच्या आयुष्यातली पोकळी त्यामुळे भरून निघणार नसते.
विहीरचा अस्सलपणा आपल्याला एका दृष्टिक्षेपात समजतो. सुरुवातीला नचिकेत अन् समीरमधल्या पत्रापत्रीच्या निवेदनातूनच तो दिसायला लागतो. या पत्रातले अन् जोडून येणाऱ्या दृश्यातच तपशीलाचं वातावरण आणि व्यक्तिरेखा जिवंत करायला लागतात. पुढे निवेदनाने ओळखीचा आकार घेतल्यावरही हा अस्सलपणा कमी होत नाही. उमेश कुलकर्णीच्या शैलीत अवकाश जिवंत करण्याची हातोटी आहे. त्याच्या दृश्य चौकटी तर भरगच्च असतातच, वर साऊंड डिझाईनकडे त्याने खास लक्ष दिलेलं जाणवतं. त्याच्या ‘गिरणी’ किंवा ‘थ्री ऑफ अस’सारख्या लघुपटांमध्येही हे स्पष्ट झालेलं आहे. ‘विहीर’मधेही समीरचं पुणं, गावातलं घर, शेतावरली विहीर, अशा जागा त्यांच्या त्यांच्या दृश्यध्वनीसह पूर्णपणे उभ्या राहतात.
विहीरच्या केंद्रस्थानी जरी समीर व नचिकेत असले, तरी त्यात पात्रांची पुष्कळ गजबज आहे. अशा वेळी पटकथाकारांचं अन् दिग्दर्शकाचं काम कठीण असतं. मग पात्रं केवळ कथा पुढे ढकलण्यासाठी घातल्यासारखी वाटण्याची वा दुर्लक्षित राहण्याची शक्यता असते. ‘विहीर’मध्ये तसं होत नाही. मोठं असो वा छोटं, इथलं प्रत्येक पात्रं तिथे असण्याला कारण आहे. यातल्या घटना घडण्याला ही पात्रं अप्रत्यक्षपणे वा प्रत्यक्षपणे जबाबदारही आहेत. त्यांच्यावरचे संस्कार, त्यांच्या वागण्याची पद्धत यांचा चित्रकर्त्यांनी केलेला विचार आपल्याला दिसण्यासारखा आहे. हा विचार चित्रपटाला स्वत:ची ओळख देणारा आहे.अखेर मेटाफिजिकल पातळी गाठणारा विहीरमधला आशय केवळ प्रेक्षागृहात आपल्याला प्रभावित करत नाही तर बाहेर पडल्यावर तो अधिकच गडद होतो. जाणवत राहतो, पिच्छा पुरवतो. कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम नाटय़ाचा आधार न घेता जीवनातलं नाटय़ बाहेर आणण्याची अन् त्याकडे काहीशा त्रयस्थपणे पाहत ते प्रेक्षकांना उलगडून दाखवण्याची या दिग्दर्शकाची हातोटी हा त्याच्या शैलीचा विशेष आहे. त्याच्या ‘वळू’मध्ये चित्रपटाच्या उपहासात्मक संकल्पनेने तो पुरेशा प्रमाणात जाणवला नसला तरी त्याच्या लघुपटांमधून तो स्पष्टपणे पुढे आलेला आहे. तो त्याने जपायला हवा. एकटा ‘विहीर’ एकटा ‘गंध’, एकटा ‘गाभ्रीचा पाऊस’ किंवा एकटा ‘टिंग्या’ भारताबाहेरची आपल्या चित्रपटांची ‘सॉन्ग अ‍ॅण्ड डान्स’ प्रतिमा कदाचित बदलू शकणार नाहीत, मात्र या चित्रपटांचं बनत राहणं हेच आश्वासक आहे. गेली अनेक वर्षे ‘वर्ल्ड सिनेमा’मध्ये दुर्लक्षित असलेलं भारताचं नाव पुन्हा एकदा पुढे येण्याची शक्यता या चित्रपटांनी तयार केली आहे. मात्र केवळ बाहेरचा प्रतिसाद पुरेसा नाही, घरचा प्रतिसाद आवश्यक आहे. तरच हे नवे चित्रकर्ते पुढली मजल गाठण्यासाठी जोमाने तयार होतील.

-गणेश मतकरी (रविवार लोकसत्तामधून)

Read more...

अ‍ॅलिस आणि वन्डरलॅन्ड

>> Sunday, March 14, 2010

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने मला प्रश्न केला की, तिच्या पाच वर्षांच्या मुलीला, नुकताच येऊ घातलेला ``अ‍ॅलिस इन वन्डरलॅन्ड`` दाखवावा का? तिने डिस्नेचा जुना अ‍ॅनिमेटेड अ‍ॅलिस इन वन्डरलॅण्ड पाहिला नव्हता अन् या नव्या सिनेमाची ट्रेलर बघूनच ती थोडी साशंक झाली होती. शाळेत असताना वाचलेल्या लुईस कॅरलच्या मूळ कादंबरी बद्दलची तिची आठवणही, ते सोपं बालसाहित्य असल्याचं सुचवत नव्हती. तिच्या प्रश्नाला मी (नेहमीप्रमाणेच) जरुर दाखव असं उत्तर दिलं.
टिम बर्टनच्या विक्षिप्त फॅन्टसीबद्दल मला आस्था आहे, पण त्यापलीकडे जाऊनही मुलांनी काय पाहावं यावर मर्यादा घालावी असं मला वाटत नाही, हे सल्ल्यामागचं प्रमुख कारण. हिंसेचा अतिरेक हे काही विशिष्ट सिनेमे विशिष्ट वयाच्या मुलांपासून दूर ठेवण्यामागे एक कारण असू शकतं, मात्र तेदेखील सरसकट नियम म्हणून नाही. माझ्यामते मुलांना ज्यात रस आहे ते थोड्या नियंत्रणाखाली पाहू द्यावं. त्यांच्यावर थोडा विश्वास दाखवला, तर त्यांची मतं आपसूकच योग्य पद्धतीने विकसित होतात. विनाकारण घातलेली बंदीच ती भरकटण्याला कारणीभूत ठरू शकते. असो, कमिंग बॅक टू द पॉईंट, अ‍ॅलिस पाहिल्यावर, मी दिलेला सल्ला योग्य होता अशी माझी खात्री पटली.
अ‍ॅलिस इन वन्डरलॅन्ड, लॉर्ड ऑफ द रिंग्ज यासारख्या कादंब-या सांकेतिक अर्थाने मुलांच्या कादंब-या म्हणता येणार नाहीत. जरी त्यांचा जन्म झाला, तो या लेखकांनी काही विशिष्ट मुलांसाठी रचलेल्या गोष्टी म्हणूनच. या कादंब-यांना वजन आलं. वाङमयाचा दर्जा आला तो त्यांच्या लेखकांच्या व्यक्तिमत्त्वातून. त्यांनी या कथानकांना ज्याप्रकारे फुलवलं, त्यामधून. लॉर्ड ऑफ द रिंग्जची एक जवळपास ऐतिहासिक वळणं आणि तपशील असलेली महाकादंबरी झाली, तर अ‍ॅलिसने विनोदाचा प्रगल्भ वापर केला तो एका चमत्कृतीने भरलेल्या जगाचं विक्षिप्त तर्कशास्त्र रचण्यासाठी.
मुलांसाठी केलेली रचना म्हणून आपल्या साहित्याचा बाळबोध वापर, या लेखकांनी केला नाही. त्यामुळेच त्यांचं आकर्षण लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांमधेही टिकून आहे.
अ‍ॅलिस इन वन्डरलॅण्डचं जग आभासाचं आहे. मूळ कादंबरीत छोट्या अ‍ॅलिसला पडलेल्या स्वप्नात तिची वन्डरलॅण्डची सफर होते. या सफरीचं स्वरुपही कथानकाला चढत्या क्रमाने उत्कर्षबिंदूपर्यंत नेण्यापेक्षा अ‍ॅलिस, अन या जगातल्या एकापेक्षा एक चमत्कारिक व्यक्तिरेखा, यांच्यातल्या भेटीगाठीचं, सुसंवाद-विसंवादाचं चित्रण असल्यासारखं आहे. वास्तवापलीकडल्या छुप्या कल्पित विश्वाचा इथे असणारा संदर्भ या कादंबरीतून अजरामर झालेला आहे.
ख-याखु-या ड्रग कल्चरपासून, साहित्य-चित्रपटांपर्यंत अ‍ॅलिस इन वन्डरलँडची टर्मिनॉलॉजी वापरलेली दिसून येते. चित्रपटातलं त्याचं त्यामानाने हल्लीचं लोकप्रिय उदाहरण म्हणून मेट्रीक्सचं नाव घेता येईल, ज्यात वन्डरलॅन्डचे अनेक संदर्भ विखुरलेले पाहायला मिळतील.
टिम बर्टनने अ‍ॅलिस इन वन्डरलॅन्डचं हे मुलांसाठी अन् मोठ्यांसाठी एकत्रितपणे असलेलं मिश्र व्यक्तिमत्त्व जपण्याचा छान प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्याने दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. पहिला आहे तो अ‍ॅलिसचं वय मोठं करण्याचा. इथली अ‍ॅलिस आहे १९ वर्षांची. कादंबरीप्रमाणे शाळकरी नाही. दुसरा बदल आहे तो चित्रपटाला सिक्वल म्हणून संकल्पित करण्याचा, जेणेकरून मूळ कादंबरीतल्या घटनांचा संदर्भ टिकवल्यासारखंही होईल, अन् बर्टन तसंच पटकथाकार लिन्डा वुल्व्हरटन कथानकात हवे ते बदल करण्यासाठी मोकळे राहतील. पहिला बदल समजण्यासारखा आहे. अ‍ॅनिमेशन अन् वास्तवचित्रण (तेही बर्टनेस्क शैलीतलं) यात खूप फरक पडतो. कदाचित सतत लहान नायिकेचा वापर चित्रपटाच्या गडद इमेजबरोबर गेला नसता, अन् परिणामी प्रेक्षकांवरला प्रभाव योग्य त्या प्रमाणात झाला नसता. दुसरा बदल मात्र पूर्णपणे अनावश्यक वाटतो. डिस्नेच्या मूळ चित्रपटाप्रमाणेच इथेही ``अ‍ॅलिस इन वन्डरलॅण्ड``तथा त्याच्या पुढच्या भागाचे ``थ्रू द लुकींग ग्लास``चे संदर्भ वापरले आहेत; मात्र इथे मोठ्या अ‍ॅलिसचं वन्डरलॅन्डला पोहोचणं नुसतं पोहोचणं नसून पुनरागमन आहे. कथेप्रमाणे लहान वयात अ‍ॅलिसची सफर झालेलीच आहे, मात्र ती त्या सगळ्या प्रकाराला स्वप्न समजते आहे. आता वयात आलेल्या अ‍ॅलिसचं (मिआ वासीकोव्स्का) एका बावळट श्रीमंत मुलाशी लग्न होण्याच्या बेतात आहे. या मोक्याच्या प्रसंगी पुन्हा एकदा अ‍ॅलिसची गाठ घड्याळ घेऊन धावणा-या सुप्रसिद्ध पांढ-या सशाशी पडते अन् साहसाला सुरुवात होते.
ज्यांनी मूळ कादंब-या वाचल्या आहेत अन् डिस्नेची १९५१ची निर्मिती पाहिली आहे, त्यांच्या लक्षात येईल की अ‍ॅलिसचं पुनरागमन दाखविण्याचा फार फायदा बर्टनने उठवलेलाच नाही. प्रसंग हे बरेचसे दोन कादंब-या अन् डिस्नेचे चित्रपट यांचा बारकाईने अभ्यास करूनच योजले आहेत. नाही म्हणायला गरज नसताना, अन् केवळ जॉनी डेप अभिनेता म्हणून उपलब्ध झाल्याने मॅड हॅटरची भूमिका अव्वाच्या सव्वा वाढविलेली आहे. पण केवळ या एका बदलासाठी अ‍ॅलिसचं स्टेटस रिमेकवरून सिक्वलवर आणून टाकणं फार हुशारीचं लक्षण नाही. हा एक गोंधळ सोडता अ‍ॅलिसमध्ये नाव ठेवण्याजोगं दुसरं काही सापडू नये.
अ‍ॅलिसचं वय बदलल्याने एक चांगली गोष्ट येथे करता आली आहे. अन् ती म्हणजे अ‍ॅलिसचा केवळ भासमय अनुभव अशा स्वरुपापेक्षा अ‍ॅलिसचं व्यक्तिमत्व घडवणारा, तिच्यात सकारात्मक बदल आणणारा अनुभव असं स्वरूप तिच्या सफरीला मिळालं आहे, अन् हा एक वेगळ्या प्रकारचा ``कमिंग ऑफ एज `` चित्रपट झाला आहे. गंमत म्हणजे मेट्रीक्समध्ये जसे अ‍ॅलिसचे संदर्भ आहेत, तशा अ‍ॅलीसच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख मेट्रीक्समधल्या निओच्या आलेखावरून स्फुरलेला, किंवा निदान त्याच्याशी स्पष्ट साम्य दाखविणारा दिसतो.
आपल्या वास्तवापलीकडे जाणारं छुपं जग असण्याची जाणीव, त्या जगात जाताच तिथला सेव्हीअर/मसीहा हे पद बहाल होणं, काही जणांनी या पदाबद्दलची घेतलेली शंका, नायक/नायिकेची आपण सेव्हीअर नसल्याबद्दल होणारी खात्री, अन् अखेर साक्षात्कार, हे टप्पे आपल्याला दोन्ही व्यक्तिरेखात आढळून येतात. हा ग्राफ ओळखीचा वाटला, तरी तो नायिकेचं व्यक्तिमत्व अधिक खोलात जाऊन उभं करतो, आणि नायिकेला केवळ छान दिसण्यापलीकडे जाऊन काम करण्यासाठी शक्यता तयार करतो.
१९५१चा चित्रपट आठवणा-यांना त्यातल्या ब-याच व्यक्तिरेखांची नवी रुपं इथे पाहायला मिळतील. बर्टनने त्यात रॅडीकल बदल करणं टाळलं आहे. वास्तवाची झाक अन् तांत्रिक सफाई या गोष्टी मात्र आवर्जून आणलेल्या आहेत. व्हाईट रॅबीट, लाल राणी (हेलेना बोनहॅम कार्टर) अन् तिचं पत्त्यांचं सैन्य, चेशायर कॅट, टि्वडल डी/टि्वडल डम, मॅड हॅटर (डेप) चा कंपू , या जुन्या पाहुण्यांबरोबर पांढरी राणी अन् तिचं बुध्दीबळाच्या प्याद्यांचं सैन्य, ड्रॅगनसदृश्य जॅबरवॉकी राक्षस अशा मंडळींचीही हजेरी आहे. ही थ्रू द लुकींग ग्लासमधून उगवलेली इतर पात्रं ही संघर्ष वाढवत नेण्यासाठी अन् ग्रॅन्ड फिनाले घडविण्यासाठी आणण्यात आली आहेत. हे शेवटावर लक्ष देत अ‍ॅक्शन चढवत राहणं काही प्रमाणात कन्व्हेन्शनल प्रेक्षकांची सोय पाहणारं असलं, तरी फसवं म्हणता येणार नाही. अ‍ॅलिसच्या व्यक्तिमत्त्वात होत जाणारा बदल, जो ख-या अर्थाने जुन्या अन् नव्या चित्रपटांमधला वेगळेपणा आहे, तो या संघर्षातूनच अधोरेखित होत गेलेला आहे.
रिमेक किंवा सीक्वल्स यांच्याकडे पाहून मला नेहमीच याची गरज होती का? 'असा प्रश्न पडतो. बर्टनने आपला विक्षिप्तपणा नियंत्रणात ठेवूनही अ‍ॅलिसकडे एका नव्या दृष्टीकोनातून यशस्वीपणे पाहून दाखवलंय. त्यामुळे या रिमेक कम सीक्वलबाबत तरी त्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी देता येईल.


-गणेश मतकरी.

Read more...

इमॅजिनेरीअम ऑफ डॉ. पर्नासस- शेवट गोड नसतानाही...

>> Monday, March 8, 2010



`नथिंग इज पर्मनंट, नॉट इव्हन डेथ` -टोनी, (इमॅजिनेरीअम ऑफ डॉ. पर्नासस)

समजा तुम्ही एक नावाजलेले दिग्दर्शक आहात, आणि हॉलीवूडमध्ये एक मोठा थोरला भव्य सिनेमा दिग्दर्शित करताय. चित्रपटामागची कल्पना विक्षिप्त अन् विचार करायला लावणारी आहे. मात्र विचार करण्याची इच्छा नसणा-या प्रेक्षकांसाठी ढोबळ करमणूक अन् नेत्रसुखही भरपूर आहे. चित्रपटाची आधीपासूनच हवा आहे, त्यातनं मुख्य भूमिकेतला कलाकारही भलताच तेजीत आहे. या तरुण नटाने आधीच ऑस्कर मिळवलंय आणि सध्याच्या बहुचर्चित नटांमध्ये त्याची गणना केली जाते. चित्रपट आर्धा पूर्ण झालाय अन् पुढल्या शूटिंगची तयारी सुरू आहे. वातावरण उत्साहाचं आहे, यशाची खात्री आहे, आणि अशातच एक अडचण उदभवते. जो नट तुमच्या चित्रपटाचा यु.एस.पी. आहे, आणि ज्याला घेऊन तुम्ही आर्धा चित्रपट चित्रितही केलायत, तो अचानक दगावतो. कोणतीही पूर्वकल्पना नसताना. आजार, आघात याशिवाय कोणत्याशा औषधाचा ओव्हरडोस होऊन. या परिस्थितीत तुम्ही काय करू शकाल ? चित्रपट गुंडाळून ठेवाल ? का दुसरा नट घेऊन पुन्हा नव्याने सुरूवात करण्याचा प्रयत्न कराल? का तिसराच काही उपाय कराल ?
हिथ लिजरच्या गेल्या वर्षी अचानक झालेल्या मृत्यूने, टेरी जिलिअमपुढे हाच प्रश्न उभा केला. मॉन्टी पायथन ग्रुपमधून सुरूवात केलेल्या अन् पुढे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या जिलिअमचं वेगळ्या प्रकारच्या आवाहनात्मक चित्रपटांसाठी नाव झालेलं आहे. नियमितपणे चौकटीबाहेरचं काम करणारा दिग्दर्शक असं या दिग्दर्शकाविषयी म्हणणं गैर ठरू नये. मात्र वेगळ्या प्रकारचं काम करणारा असो, वा नेहमीचंच तेच ते काम करणारा. या प्रकारच्या अतिशय प्रॅक्टिकल अडचणींवर उपाय काढणं सोपं थोडंच आहे ?
लीजरच्या मृत्युआधी इमॅजिनेरीअम ऑफ डॉ. पर्नासस या चित्रपटाची संहिता नक्की कशी होती हे कळायला मार्ग नाही. आज जशी ती आहे, त्यापेक्षा ती वेगळी असणार हे नक्की. मात्र वेगळेपणाचं प्रमाण चित्रपट पाहून निश्चित करता येत नाही. जिलिअमने आपला चित्रपट वाचविण्यासाठी अन् त्याचबरोबर लीजरचं अखेरचं काम प्रेक्षकांपुढे ठेवलं जाण्यासाठी चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय तर घेतला. मात्र अर्ध काम बाकी असताना, अन् चित्रपटाच्या शेवटचा भागही अपूरा असताना असा निर्णय घेणं धाडसी होतं. हे काम पूर्ण करण्यासाठी जिलीअमला मदत झाली, ती लीजरच्या तोलाच्या तीन मोठ्या कलावंतांची. ते होते जॉनी डेप, ज्युड लॉ आणि कॉलिन फारेल. त्यांचा सहभाग कसा, कुठे आलां हे पाहण्याआधी चित्रपटाच्या कथासूत्राकडे पाहणे आवश्यक ठरेल.
डॉ. पर्नासस (क्रिस्तोफर प्लमर) हे एक चमत्कारी बुवा आहेत. खरोखरचे चमत्कारी, कारण सैतानाबरोबर (टॉम वाईट्स) सौदा करून त्यांनी अमरत्व मिळविलेलं आहे. अजूनही त्यांची ही सौदेबाजी सुरूच आहे, मात्र सध्या त्यांना होणारं नुकसान हे सहजी सोसण्याजोगं नाही. सैतानाकडून घेतलेल्या वायद्याच्या मोबदल्यात त्यांना आपली मुलगी त्याला देऊन टाकावी लागणार आहे. आणखी केवळ तीन दिवसांनी तिला सोळावं वर्ष लागताच.
पर्नासस यांचं इमॅजिनेरीअम हे त्यांचं उदरनिर्वाहाचे साधन आहे. आपल्या शक्तीच्या जोरावर ते प्रेक्षकाला एका काल्पनिक विश्वाची सफर घडवून आणू शकतात. मात्र ते काल्पनिक विश्व निरुपद्रवी मात्र नाही. या सफरीवर निघालेल्या व्यक्तीने या विश्वात घेतलेले निर्णय, तिला चांगलेच महागात पडू शकतात.
मुलीला वाचविण्याच्या विवंचनेत असलेल्या पर्नाससची गाठ टोनीशी (हिथ लीजर) पडते. तेव्हा कुणीतरी त्याला गळफास लावून पुलाखाली लटकवलेला असतो. पर्नाससच्या चमूने प्राण वाचवलेला टोनी, मुलीचा आत्मा सैतानापासून सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे, असं ठरवतो. मात्र सैतान नगास नग या हिशेबावर चालणारा नसतो. एका मुलीसाठी इतर पाच जण, अशी मागणी तो पर्नाससपुढे ठेवतो.
चित्रपटात लीजरची टोनी ही भूमिका प्रामुख्याने दोन विभागात विभागली जाते. एक भाग घडतो वास्तवात (म्हणजे जिलीअमच्या चित्रपटांना जितपत वास्तव असतं तितपत) तर दुसरा इमॅजिनेरीअमच्या आतल्या काल्पनिक जगात लीजरचा मृत्यू झाला तेव्हा. वास्तव पार्श्वभूमी असणारं चित्रिकरण बहुतांशी झालेलं होतं, अन् संगणकीय पार्श्वभूमी असणारा इमॅजिनेरीअमच्या आत घडणारा भाग बाकी होता. जिलीअमने या विश्वात होणं शक्य असलेल्या बदलांचा फायदा घेतला अन् इमॅजिनेरीअमच्या आतल्या टोनीची भूमिका डेप, लॉ आणि फारेल यांना वाटून दिली.
लीजरच्या मृत्यूविषयी माहिती नसणा-या कोणी जर इमॅजिनेरिअम पाहिला, तर तो या भूमिका विभाजनाकडे दिग्दर्शकीय क्लृप्ती म्हणून पाहील. पण त्याहून अधिक प्रमाणात लीजरची अनुपस्थिती त्याला जाणवणार नाही. हे चित्रपटाचं आणि जिलीअमचं यश.
मात्र त्यापलीकडे जाऊन विचार केला, तर चित्रपटाचं नुकसान अजिबातच झालेलं नाही, असं म्हणता येणार नाही. सैतान आणि देवाचा आत्म्यावरला क्लेम हा विषय आजवर अनेकांनी वापरलेला आहे. फाऊस्टपासून कॉन्स्टंटिनपर्यंत सर्व थरातल्या अन् साहित्यापासून चित्रपटांपर्यंतच्या कलाविष्कारांमधून हा विषय आलेला आहे. इमॅजिनेरीअमचा मूळ फोकसदेखील तोच असावा. पर्नासस आणि मी.निक (सैतान) यांच्यामधला संघर्ष, इमॅजिनेरीअममध्ये शिरलेल्या माणसांनी केलेली भल्याबु-याची निवड, सन्मार्ग अन् भरकटलेल्या पावलांवर होत राहणारं भाष्य, टोनीचा दुटप्पीपणा या सर्व गोष्टी याकडे निर्देश करतात. मात्र जिलीअमच्या पुनर्रचनेत भर आला आहे, को हिथ लीजरला श्रद्धांजली देण्यावर. टोनीचं चित्रपटातलं आगमन गळफास लावलेल्या अवस्थेत असणं हा जरी योगायोग असला, तरी लीजरचं काम शक्य तितकं संकलनमुक्त ठेवणं, इतरांच्या संवादात (उदाहरणार्थ, लेखाच्या सुरुवातीला दिलेलं, जॉनी डेपच्या तोंडी येणारं वाक्य जे एकाच वेळी लीजरच्या मृत्यूनंतर चित्रपट पूर्ण होण्याकडे निर्देश करणारं. म्हणून घेता येईल, किंवा कलावंताच्या अमरत्वाकडे बोट दाखवणारं) या घटनेचे संदर्भ आणणं, लीजरच्या जवळच्या मित्रांना त्याची भूमिका पूर्ण करण्यासाठी वापरणं या सर्व कलाकुसरीत मूळ आशयाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झालं नसेल, तरच नवल. तरीही इमॅजिनेरीअम केवळ एका शोकांत घटनेची आठवण म्हणून उरत नाही, हे विशेष.
चित्रपटाच्या शेवटी पर्नासस लहान मुलांसाठी छोटी पपेट थिएटर्स करून विकताना दिसतो. रस्त्यावरच कोणीतरी विचारतं, ``डझ इट कम विथ हॅपी एन्डीग्ज?`` त्यावर देण्यात येणारं ``कान्ट गॅरेन्टी दॅट`` हे उत्तर आपल्याला पुन्हा वास्तवाची जाणीव करून देतं. मात्र सुखांत नसला तरी खेळ थांबणार नाही, तो चालूच राहील, हे आश्वासन द्यायलाही विसरत नाही.

-गणेश मतकरी.

Read more...

कन्फेशन्स ऑफ डेंजरस माईन्ड - विचित्र चरित्र

>> Monday, March 1, 2010

नेव्हर लेट द फॅक्ट्स स्टॅण्ड इन ए वे ऑफ गुड स्टोरी, असं कोणीतरी म्हटलंच आहे. म्हणजेच कोणत्याही सत्य घटनेविषयी सांगतानाही सत्याचा विपर्यास हा आलाच. आत्मचरित्रांबाबतही हे विधान खरंच आहे. कारण आत्मचरित्र म्हणजे तरी काय, तर व्यक्तीच्या आयुष्याचं त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून मांडलेलं चित्रं. आता एकदा का एखाद्या व्यक्तीचा दृष्टीकोन म्हटला, की त्रयस्थपणा संपला. मग त्यातलं खरं काय अन् खोटं काय हे कोणी ठरवायचं ?
ढोबळमानाने पाहायचं तर वर केलेलं विधान हे ब-याच चित्रपटांनाही जसंच्या तसं लागू पडतं. पण जॉर्ज क्लूनी दिग्दर्शित कन्फेशन्स ऑफ डेंजरस माईन्ड या चित्रपटाला काकणभर अधिकच. हा चित्रपट आधारित आहे तो चक बॅरीस यांनीच आपल्या आयुष्यावर लिहिलेल्या एका पुस्तकावर. आता आपल्याकडे चक बॅरीस हे नाव मोठ्या प्रमाणावर माहिती असण्याचं कारणच नाही; पण अमेरिकेत मात्र काही प्रसिद्ध (आणि कुप्रसिद्ध) गेम शोजचा निर्माता म्हणून हे नाव लोक ओळखून आहेत. डेटिंग गेम, न्यूली वेड्स गेम, आणि द गाँग शो हे त्याचे अधिक गाजलेले गेम शो. हे मूळ शोज आपण पाहिलेले नसले तरी त्यांच्या भारतीय आवृत्त्या मात्र आपण निश्चितच पाहिलेल्या आहेत. एका मुलीने प्रत्यक्ष न पाहता तीन प्रतिस्पर्ध्यांच्या उत्तरावरून स्वतःला लायक जोडीदार ठरवायचा, हे डेटिंग गेमचं स्वरूप यावर आधारित कार्यक्रम एम.टी.व्हीवर पाहता येतात. काही वर्षांपूर्वी द गाँग शोची हमसे बढकर गाँग या भयंकर नावासहित तितकीच भयंकर आवृत्ती आपल्याकडे बनवण्यात आली होती. ती ज्यांनी पाहिली असेल, त्यांना याची मूळ कल्पना मांडणा-या चक बॅरीसला एकाच वेळी लोकप्रियता आणि दूषणं का मिळाली असतील, याची कल्पना करणे सहज शक्य आहे. असो.
एक ब-यावाईट चित्रमालिका बनविणारा एक दिग्दर्शक, एवढीच बॅरीसची गोष्ट असती, तर हा चित्रपट काही फार सांगण्यासारखा बनला असता असं नाही.पण टीव्ही कारकीर्द हा बॅरीसच्या कारकिर्दीचा अर्धाच भाग आहे. आपल्या पुस्तकात बॅरीस म्हणतो, की तो टीव्ही निर्मात्यांबरोबरच सी.आय.ए.चा भाडोत्री मारेकरी म्हणूनही काम करीत असे, आणि त्याने जवळजवळ तेहतीस माणसांना यमसदनाला धाडले आहे. सत्य आणि स्वप्न यांतील पुसटरेषा आहे, ती या विधानाच्या आसपास.
दिग्दर्शक म्हणून जॉर्ज क्लूनी या लोकप्रिय अभिनेत्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आणि तोही अगदी सराईत. क्लूनीने चित्रपटाची रचना सरळ रेषेत केलेली नाही. आपल्या आयुष्यावर हताश झालेला चक १९८१मध्ये एका हॉटेलात दडी मारून बसला होता. त्या काळात चित्रपट सुरू होतो. तिथून भूतकाळात जातो, आणि मग पुन्हा भविष्यात उडी घेतो. या उलटसुलट रचनेत दिखाऊपणाचा भाग जरुर आहे. पण त्याचबरोबर कथेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करून मांडणी करण्याचाही हा काही प्रमाणात जमलेला प्रयत्न आहे.
सध्याचा काळ जुन्या टीव्ही सेलिब्रेटींसाठी फारसा अनुकूल दिसत नाही. कन्फेशन.. हा त्याच दरम्यान आलेल्या ऑटो फोकसची आठवण करून देणारा आहे. ते त्यातल्या नायकाच्या टीव्ही सेलिब्रेटी असण्यानं यात शंकाच नाही. होगान्स हीरोज या एकेकाळच्या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका करणारा बॉब क्रेन हा व्यक्तिगत आयुष्यात सेक्सच्या पूर्ण आहारी गेलेला माणूस होता. त्याची कहाणी सांगणारा ऑटो फोकसही लोकप्रिय व्यक्तीचा समाजातला वावर, त्याचे खासगी आयुष्य यांतला विरोधाभास समर्थपणे मांडतो. अर्थात कन्फेशन्स हा फोकसपेक्षा कितीतरी सौम्य चित्रपट आहे. कारण क्लूनीने पटकथा लेखक चार्ली कॉफमन याच्या मदतीने, बॅरीसच्या पुस्तकातल्या विसंगती आणि त्याची द्विधा मनःस्थिती, हलक्या विनोदाचा वापर करून परिणामकारकपणे वापरल्या आहेत.
कन्फेशन्स जरी पूर्णतः भासाच्या आणि दिवास्वप्नांच्या वाटेला जात नसला, तरी त्याच्या एकूण आशयातच ब्युटीफुल माईंडशी साम्य आहे. गणितज्ञ जॉन नॅश यांच्या कारकिर्दीतलं त्यांचं गणिती संशोधन आणि त्यांना होणारे हेरगिरीचे भास याप्रमाणेच कन्फेशन्समध्ये बॅरीसची टीव्ही कारकीर्द आणि सी.आय.ए प्रकरण यांनी पटकथा व्यापून टाकली आहे. एड हॅरिसच्या त्यातल्या व्यक्तिरेखेसारखीच इथे जॉर्ज क्लूनीची सी.आय.ए. एजंटची व्यक्तिरेखा आहे.फरक इतकाच, की ब्युटीफुल माईंडमधले भास हे भास आहेत, हे स्पष्टपणे सांगितलं जातं. इथं मात्र ख-याखोट्याचा फैसला प्रेक्षकांवर सोडला जातो.
पटकथाकार कॉफमन हे नाव आधुनिक पटकथांमध्ये चांगलंच गाजणारं आहे. बीईंग जॉन माल्कोविच, अ‍ॅडेप्शन यांच्यासारख्या व्यक्तिरेखांवर रचलेल्या फिक्शन(याला फॅक्शन म्हणणे योग्य नाही, कारण इथलं फिक्शन ब-याचदा फॅन्टसीच्या वळणाने जाणारंही असू शकतं.बीईंग जॉन मालकोविचमधली पात्र चक्क अभिनेता जॉन माल्कोविचच्या डोक्यात पोहोचून त्याचं बाहुलं करून टाकतात, आणि अ‍ॅडेप्शनमधल्या कॉफमनच्या स्वतःच्या व्यक्तिरेखेला प्रत्यक्षात जुळा भाऊ असतो.) मध्ये त्याचा हात धरणारं कुणी नाही. त्यामुळेच हे थोडं चमत्कारिक पुस्तक त्याच्या खास पठडीत बसणारं आहे. इथंही शक्य तिथं त्याने आपल्या विक्षिप्तपणाची झलक दाखविलेली आहे. दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न असूनही जॉर्ज क्लूनीची कामगिरी निश्चित वाखाणण्याजोगी आहे. आजवरचा त्यांचा सोडरबर्ग (आऊट आँफ साईट, ओशन्स इलेव्हन, सोलारिज) सारख्या दिग्दर्शकांसोबतचा अनुभव इथं कारणी लागला आहे. एक मात्र आहे. दिग्दर्शन हे नेहमी गोष्ट नकळत पुढे नेणारं असायला हवं. तसं मात्र इथं आढळत नाही. हा प्रयत्न काही वेळा अगदी जाणूनबुजून अमूक एका इफेक्टच्या नादी लागून केल्यासारखा वाटतो. क्लूनीचा हा अत्यंत आर्टी चित्रपट आहे. चमत्कारिक कॅमेरा अँगल्स, मोठ्या कालावधीत पसरलेले आणि भिन्न स्थळकाळ जोडणारे लांबलचक शॉट्स, रंग आणि फोकसचा विविध त-हेने वापर, अशा अनेक युक्त्या या चित्रपटात वापरण्यात आल्यात. बॅरीस टीव्ही सेंटरवर पहिल्यांदा गेल्यावर लांबलचक चालणारा शॉट आहे. जो गर्दी आणि व्यक्तिरेखा वेगवेगळ्या रीतीने एकत्र आणतो. तो या प्रकारच्या चित्रणशैलीची अपेक्षा प्रेक्षकाच्या डोक्यात तयार करतो. ही अपेक्षा पुढे पूर्ण होते. डेटींग गेमला हिरवा कंदील मिळण्याचा प्रसंग, बॅरिसच्या हातून घडणारे खून, टीव्ही सेंटरवरच्या नेपथ्याचा सूचक वापर यांसारख्या काही प्रसंगात तर दिग्दर्शकाचं अस्तित्व अगदी जाणवण्यासारखं आहे; पण अशा प्रसंगाच्या सततच्या हेतूपुरस्सर वापराने प्रेक्षक ज्यांना लगेचच गिमिकी म्हणून मान्य करूनही त्यातली मजा घेऊ शकतो.
या चित्रपटाच्या दृश्य अंगाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. पहिला बॅरीसच्या प्रोड्युसर म्हणून अस्तित्त्वाचा, तर दुसरा मारेकरी म्हणून. या दोघांच्या चित्रणातही क्लूनीने वेगळेपणा राखला आहे. चमत्कृती दोन्ही प्रकारांमध्ये पाहायला मिळते. पण सी.आय.एचा भाग हा अंधारा, खोटा खोटा अधिक रहस्यमय केलेला. ठराविक वेषभूषा, वातावरणनिर्मिती असलेला असा मुद्दाम बी ग्रेड गुन्हेगारीपटांच्या वळणाने नेलेला आहे. विषयातल्या गांभीर्याला सोडून देऊन केलेला विनोदाचा मुक्त वापर, हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. इथे जेव्हा बॅरिस पॅट्रिशिआ (जुलिया रॉबर्टस) या स्त्री हेराला भेटायला जातो, तेव्हा चुकून वेगळ्या टेबलवर जाऊन बसतो. खुणेचं वाक्य विचारतो. अन् चुकीचं उत्तर मिळाल्यावर चमकतो. माफी मागतो आणि पुढच्या टेबलवर जातो. एरवी हेरकथांमधल्या नायकांकडून अपेक्षित नसलेले असे प्रसंगच कन्फेशनमध्ये गंमत आणतात.
अभिनेता दिग्दर्शकांची ही एक गोष्ट मला कधीच नीट कळलेली नाही. त्यांना असं वाटतं, की स्वतः भूमिका केली नाही, तर त्याच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग होईल? पण तरी ब-याचदा हे लोक प्रमुख भूमिका करण्याचं टाळतात. (मेल गिब्सनसारखे अपवाद आहेत) मागे टॉम हँक्सनेदेखील दॅट थिंग यू डूच्या वेळी मुख्य भूमिका टाळून सहायक भूमिका घेतली होती. यात कधी कधी त्यांच्या वयाचाही भाग असतो, पण नेहमीच नाही. क्लूनीने इथे जमलेला नटसंच म्हणजे स्टार व्हॅल्यू आणि अभिनयक्षमता यांचा सुवर्णमध्य आहे.
प्रमुख भूमिकेतल्या सॅम रॉकवेल याने बॅरीसच्या सर्व छटा पूर्ण ताकदीनिशी पडद्यावर आणल्या आहेत. क्लूनी, ज्युलिआ रॉबर्टस् आणि ड्रू बॅरीमोर हा त्रिकोण मुख्यतः सहायक भूमिकांत आहे. पण हे तिघंही जण रॉकवेलच्या शैलीशी जुळवून घेऊन आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या करतात. आणखी दोन स्टार्सचा यात दोन सेकंदाचा गेस्ट अँपिरिअन्सदेखील आहे. यातदेखील क्लूनीची विनोदाची अन् विसंगतीची जाण दिसून येते. डेटिंग गेमच्या स्वरुपात मुलगी ही मुलांना प्रत्यक्ष पाहत नाही. केवळ प्रश्न विचारते. इथे एका भागाचं चित्रिकरण चालू दिसतं जिथं प्रश्नांची पटापट उत्तरं देणारा एक जाडगेला मध्यम रुपाचा मुलगा आहे, तर इतर दोघे निरुत्तर म्हणजे चक्क ब्रॅड पीट आणि मॅट डेमोन आहेत. हा केवळ विनोदासाठी केलेला विनोद नसून, त्यात मुळात त्या गेम शोच्या मर्यादाही दिसून येतात.
क्लूनीने आपल्या चित्रपटाला सरळ विषय न निवडता असला वेगळाच विषय़ निवडणं हा त्याच्या कलात्मक आणि वैचारिक दृष्टीचा पुरावच आहे.(त्याचे वडील गेम शो दिग्दर्शित करत असल्याने, त्याला या विषयाची माहिती आहे, हेदेखील एक छुपं कारण आहे; पण ते तितकं महत्वाचं नाही. त्यानं या विषयाची केलेली आत्मविश्वासपूर्ण हाताळणी या दिग्दर्शकाकडून खूप अपेक्षा निर्माण करते. पुढच्या चित्रपटात मात्र त्यानं शैलीच्या मोहात न सापडता केवळ कथेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
कन्फेशन्सच्याच प्रकारातले चित्रपट त्याला पूर्ण बिघडवून टाकण्याची शक्यताही आहे. ही एक गोष्ट जर तो टाळू शकला, तर हॉलीवूडला एका चांगल्या नटासोबत चांगला दिग्दर्शकही मिळाला, असं म्हणायला हरकत नाही.

-गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP