कन्फेशन्स ऑफ डेंजरस माईन्ड - विचित्र चरित्र

>> Monday, March 1, 2010

नेव्हर लेट द फॅक्ट्स स्टॅण्ड इन ए वे ऑफ गुड स्टोरी, असं कोणीतरी म्हटलंच आहे. म्हणजेच कोणत्याही सत्य घटनेविषयी सांगतानाही सत्याचा विपर्यास हा आलाच. आत्मचरित्रांबाबतही हे विधान खरंच आहे. कारण आत्मचरित्र म्हणजे तरी काय, तर व्यक्तीच्या आयुष्याचं त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून मांडलेलं चित्रं. आता एकदा का एखाद्या व्यक्तीचा दृष्टीकोन म्हटला, की त्रयस्थपणा संपला. मग त्यातलं खरं काय अन् खोटं काय हे कोणी ठरवायचं ?
ढोबळमानाने पाहायचं तर वर केलेलं विधान हे ब-याच चित्रपटांनाही जसंच्या तसं लागू पडतं. पण जॉर्ज क्लूनी दिग्दर्शित कन्फेशन्स ऑफ डेंजरस माईन्ड या चित्रपटाला काकणभर अधिकच. हा चित्रपट आधारित आहे तो चक बॅरीस यांनीच आपल्या आयुष्यावर लिहिलेल्या एका पुस्तकावर. आता आपल्याकडे चक बॅरीस हे नाव मोठ्या प्रमाणावर माहिती असण्याचं कारणच नाही; पण अमेरिकेत मात्र काही प्रसिद्ध (आणि कुप्रसिद्ध) गेम शोजचा निर्माता म्हणून हे नाव लोक ओळखून आहेत. डेटिंग गेम, न्यूली वेड्स गेम, आणि द गाँग शो हे त्याचे अधिक गाजलेले गेम शो. हे मूळ शोज आपण पाहिलेले नसले तरी त्यांच्या भारतीय आवृत्त्या मात्र आपण निश्चितच पाहिलेल्या आहेत. एका मुलीने प्रत्यक्ष न पाहता तीन प्रतिस्पर्ध्यांच्या उत्तरावरून स्वतःला लायक जोडीदार ठरवायचा, हे डेटिंग गेमचं स्वरूप यावर आधारित कार्यक्रम एम.टी.व्हीवर पाहता येतात. काही वर्षांपूर्वी द गाँग शोची हमसे बढकर गाँग या भयंकर नावासहित तितकीच भयंकर आवृत्ती आपल्याकडे बनवण्यात आली होती. ती ज्यांनी पाहिली असेल, त्यांना याची मूळ कल्पना मांडणा-या चक बॅरीसला एकाच वेळी लोकप्रियता आणि दूषणं का मिळाली असतील, याची कल्पना करणे सहज शक्य आहे. असो.
एक ब-यावाईट चित्रमालिका बनविणारा एक दिग्दर्शक, एवढीच बॅरीसची गोष्ट असती, तर हा चित्रपट काही फार सांगण्यासारखा बनला असता असं नाही.पण टीव्ही कारकीर्द हा बॅरीसच्या कारकिर्दीचा अर्धाच भाग आहे. आपल्या पुस्तकात बॅरीस म्हणतो, की तो टीव्ही निर्मात्यांबरोबरच सी.आय.ए.चा भाडोत्री मारेकरी म्हणूनही काम करीत असे, आणि त्याने जवळजवळ तेहतीस माणसांना यमसदनाला धाडले आहे. सत्य आणि स्वप्न यांतील पुसटरेषा आहे, ती या विधानाच्या आसपास.
दिग्दर्शक म्हणून जॉर्ज क्लूनी या लोकप्रिय अभिनेत्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. आणि तोही अगदी सराईत. क्लूनीने चित्रपटाची रचना सरळ रेषेत केलेली नाही. आपल्या आयुष्यावर हताश झालेला चक १९८१मध्ये एका हॉटेलात दडी मारून बसला होता. त्या काळात चित्रपट सुरू होतो. तिथून भूतकाळात जातो, आणि मग पुन्हा भविष्यात उडी घेतो. या उलटसुलट रचनेत दिखाऊपणाचा भाग जरुर आहे. पण त्याचबरोबर कथेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करून मांडणी करण्याचाही हा काही प्रमाणात जमलेला प्रयत्न आहे.
सध्याचा काळ जुन्या टीव्ही सेलिब्रेटींसाठी फारसा अनुकूल दिसत नाही. कन्फेशन.. हा त्याच दरम्यान आलेल्या ऑटो फोकसची आठवण करून देणारा आहे. ते त्यातल्या नायकाच्या टीव्ही सेलिब्रेटी असण्यानं यात शंकाच नाही. होगान्स हीरोज या एकेकाळच्या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका करणारा बॉब क्रेन हा व्यक्तिगत आयुष्यात सेक्सच्या पूर्ण आहारी गेलेला माणूस होता. त्याची कहाणी सांगणारा ऑटो फोकसही लोकप्रिय व्यक्तीचा समाजातला वावर, त्याचे खासगी आयुष्य यांतला विरोधाभास समर्थपणे मांडतो. अर्थात कन्फेशन्स हा फोकसपेक्षा कितीतरी सौम्य चित्रपट आहे. कारण क्लूनीने पटकथा लेखक चार्ली कॉफमन याच्या मदतीने, बॅरीसच्या पुस्तकातल्या विसंगती आणि त्याची द्विधा मनःस्थिती, हलक्या विनोदाचा वापर करून परिणामकारकपणे वापरल्या आहेत.
कन्फेशन्स जरी पूर्णतः भासाच्या आणि दिवास्वप्नांच्या वाटेला जात नसला, तरी त्याच्या एकूण आशयातच ब्युटीफुल माईंडशी साम्य आहे. गणितज्ञ जॉन नॅश यांच्या कारकिर्दीतलं त्यांचं गणिती संशोधन आणि त्यांना होणारे हेरगिरीचे भास याप्रमाणेच कन्फेशन्समध्ये बॅरीसची टीव्ही कारकीर्द आणि सी.आय.ए प्रकरण यांनी पटकथा व्यापून टाकली आहे. एड हॅरिसच्या त्यातल्या व्यक्तिरेखेसारखीच इथे जॉर्ज क्लूनीची सी.आय.ए. एजंटची व्यक्तिरेखा आहे.फरक इतकाच, की ब्युटीफुल माईंडमधले भास हे भास आहेत, हे स्पष्टपणे सांगितलं जातं. इथं मात्र ख-याखोट्याचा फैसला प्रेक्षकांवर सोडला जातो.
पटकथाकार कॉफमन हे नाव आधुनिक पटकथांमध्ये चांगलंच गाजणारं आहे. बीईंग जॉन माल्कोविच, अ‍ॅडेप्शन यांच्यासारख्या व्यक्तिरेखांवर रचलेल्या फिक्शन(याला फॅक्शन म्हणणे योग्य नाही, कारण इथलं फिक्शन ब-याचदा फॅन्टसीच्या वळणाने जाणारंही असू शकतं.बीईंग जॉन मालकोविचमधली पात्र चक्क अभिनेता जॉन माल्कोविचच्या डोक्यात पोहोचून त्याचं बाहुलं करून टाकतात, आणि अ‍ॅडेप्शनमधल्या कॉफमनच्या स्वतःच्या व्यक्तिरेखेला प्रत्यक्षात जुळा भाऊ असतो.) मध्ये त्याचा हात धरणारं कुणी नाही. त्यामुळेच हे थोडं चमत्कारिक पुस्तक त्याच्या खास पठडीत बसणारं आहे. इथंही शक्य तिथं त्याने आपल्या विक्षिप्तपणाची झलक दाखविलेली आहे. दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न असूनही जॉर्ज क्लूनीची कामगिरी निश्चित वाखाणण्याजोगी आहे. आजवरचा त्यांचा सोडरबर्ग (आऊट आँफ साईट, ओशन्स इलेव्हन, सोलारिज) सारख्या दिग्दर्शकांसोबतचा अनुभव इथं कारणी लागला आहे. एक मात्र आहे. दिग्दर्शन हे नेहमी गोष्ट नकळत पुढे नेणारं असायला हवं. तसं मात्र इथं आढळत नाही. हा प्रयत्न काही वेळा अगदी जाणूनबुजून अमूक एका इफेक्टच्या नादी लागून केल्यासारखा वाटतो. क्लूनीचा हा अत्यंत आर्टी चित्रपट आहे. चमत्कारिक कॅमेरा अँगल्स, मोठ्या कालावधीत पसरलेले आणि भिन्न स्थळकाळ जोडणारे लांबलचक शॉट्स, रंग आणि फोकसचा विविध त-हेने वापर, अशा अनेक युक्त्या या चित्रपटात वापरण्यात आल्यात. बॅरीस टीव्ही सेंटरवर पहिल्यांदा गेल्यावर लांबलचक चालणारा शॉट आहे. जो गर्दी आणि व्यक्तिरेखा वेगवेगळ्या रीतीने एकत्र आणतो. तो या प्रकारच्या चित्रणशैलीची अपेक्षा प्रेक्षकाच्या डोक्यात तयार करतो. ही अपेक्षा पुढे पूर्ण होते. डेटींग गेमला हिरवा कंदील मिळण्याचा प्रसंग, बॅरिसच्या हातून घडणारे खून, टीव्ही सेंटरवरच्या नेपथ्याचा सूचक वापर यांसारख्या काही प्रसंगात तर दिग्दर्शकाचं अस्तित्व अगदी जाणवण्यासारखं आहे; पण अशा प्रसंगाच्या सततच्या हेतूपुरस्सर वापराने प्रेक्षक ज्यांना लगेचच गिमिकी म्हणून मान्य करूनही त्यातली मजा घेऊ शकतो.
या चित्रपटाच्या दृश्य अंगाचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. पहिला बॅरीसच्या प्रोड्युसर म्हणून अस्तित्त्वाचा, तर दुसरा मारेकरी म्हणून. या दोघांच्या चित्रणातही क्लूनीने वेगळेपणा राखला आहे. चमत्कृती दोन्ही प्रकारांमध्ये पाहायला मिळते. पण सी.आय.एचा भाग हा अंधारा, खोटा खोटा अधिक रहस्यमय केलेला. ठराविक वेषभूषा, वातावरणनिर्मिती असलेला असा मुद्दाम बी ग्रेड गुन्हेगारीपटांच्या वळणाने नेलेला आहे. विषयातल्या गांभीर्याला सोडून देऊन केलेला विनोदाचा मुक्त वापर, हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. इथे जेव्हा बॅरिस पॅट्रिशिआ (जुलिया रॉबर्टस) या स्त्री हेराला भेटायला जातो, तेव्हा चुकून वेगळ्या टेबलवर जाऊन बसतो. खुणेचं वाक्य विचारतो. अन् चुकीचं उत्तर मिळाल्यावर चमकतो. माफी मागतो आणि पुढच्या टेबलवर जातो. एरवी हेरकथांमधल्या नायकांकडून अपेक्षित नसलेले असे प्रसंगच कन्फेशनमध्ये गंमत आणतात.
अभिनेता दिग्दर्शकांची ही एक गोष्ट मला कधीच नीट कळलेली नाही. त्यांना असं वाटतं, की स्वतः भूमिका केली नाही, तर त्याच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग होईल? पण तरी ब-याचदा हे लोक प्रमुख भूमिका करण्याचं टाळतात. (मेल गिब्सनसारखे अपवाद आहेत) मागे टॉम हँक्सनेदेखील दॅट थिंग यू डूच्या वेळी मुख्य भूमिका टाळून सहायक भूमिका घेतली होती. यात कधी कधी त्यांच्या वयाचाही भाग असतो, पण नेहमीच नाही. क्लूनीने इथे जमलेला नटसंच म्हणजे स्टार व्हॅल्यू आणि अभिनयक्षमता यांचा सुवर्णमध्य आहे.
प्रमुख भूमिकेतल्या सॅम रॉकवेल याने बॅरीसच्या सर्व छटा पूर्ण ताकदीनिशी पडद्यावर आणल्या आहेत. क्लूनी, ज्युलिआ रॉबर्टस् आणि ड्रू बॅरीमोर हा त्रिकोण मुख्यतः सहायक भूमिकांत आहे. पण हे तिघंही जण रॉकवेलच्या शैलीशी जुळवून घेऊन आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या करतात. आणखी दोन स्टार्सचा यात दोन सेकंदाचा गेस्ट अँपिरिअन्सदेखील आहे. यातदेखील क्लूनीची विनोदाची अन् विसंगतीची जाण दिसून येते. डेटिंग गेमच्या स्वरुपात मुलगी ही मुलांना प्रत्यक्ष पाहत नाही. केवळ प्रश्न विचारते. इथे एका भागाचं चित्रिकरण चालू दिसतं जिथं प्रश्नांची पटापट उत्तरं देणारा एक जाडगेला मध्यम रुपाचा मुलगा आहे, तर इतर दोघे निरुत्तर म्हणजे चक्क ब्रॅड पीट आणि मॅट डेमोन आहेत. हा केवळ विनोदासाठी केलेला विनोद नसून, त्यात मुळात त्या गेम शोच्या मर्यादाही दिसून येतात.
क्लूनीने आपल्या चित्रपटाला सरळ विषय न निवडता असला वेगळाच विषय़ निवडणं हा त्याच्या कलात्मक आणि वैचारिक दृष्टीचा पुरावच आहे.(त्याचे वडील गेम शो दिग्दर्शित करत असल्याने, त्याला या विषयाची माहिती आहे, हेदेखील एक छुपं कारण आहे; पण ते तितकं महत्वाचं नाही. त्यानं या विषयाची केलेली आत्मविश्वासपूर्ण हाताळणी या दिग्दर्शकाकडून खूप अपेक्षा निर्माण करते. पुढच्या चित्रपटात मात्र त्यानं शैलीच्या मोहात न सापडता केवळ कथेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
कन्फेशन्सच्याच प्रकारातले चित्रपट त्याला पूर्ण बिघडवून टाकण्याची शक्यताही आहे. ही एक गोष्ट जर तो टाळू शकला, तर हॉलीवूडला एका चांगल्या नटासोबत चांगला दिग्दर्शकही मिळाला, असं म्हणायला हरकत नाही.

-गणेश मतकरी.

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP