बिग नथिंग- न्वार कॉमेडी
>> Sunday, April 25, 2010
`It is not funny that a man should be killed, but it is sometimes funny that he should be killd for so little, and that his death should be the coin of what we call civilization`- Raymond chandler (The simple art of murder- an assay)
गुन्हेगारी साहित्याची दर्जात्मक हाताळणी आणि त्यातलं समाजाचं प्रतिबिंब यातला परस्परसंबंध विषद करणा-या चॅन्डलरच्या लेखातलं हे उधृत. सुसंस्कृत वाचकालाही दर्जेदार गुन्हेगारी साहित्य का मोहात पाडतं, या प्रश्नाचं अचूक उत्तर देणारं, एका परीने हे उधृत चित्रपटांनाही लागू आहे. खासकरून ज्या प्रकारच्या साहित्याविषयी चॅन्डलर लिहितो आहे, त्याला समांतर असणा-या चित्रप्रकारातल्या, अर्थात `फिल्म न्वार`मधल्या.
या विधानातला `फनी` हा शब्द काही सरसकटपणे `विनोदी` या अर्थाने वापरण्यात आलेला नाही, हे उघड आहे. मात्र काही चित्रपटांमध्ये मात्र तो खरोखरंच त्या अर्थाने वापरला जाऊ शकतो. २००६मध्ये आलेला `बिग नथिंग` हे त्याचं चपखल उदाहरण आहे. `बिग नथिंग` ही कोणत्याही एका विशिष्ट प्रकारात बसणारी फिल्म नसल्याने मी तिला `न्वार कॉमेडी` हे `फिल्म न्वार` अन् `ब्लॅक कॉमेडी` या दोन प्रकारांचं एकत्रिकरण साधणारं नाव देईन. न्वार या शब्दाचा थेट अर्थ `ब्लॅक` हाच असला, तरी फिल्म न्वार विषयी थोडीफार माहिती असणा-यांना सहज लक्षात येईल की चित्रपटांचे हे दोन प्रकार परस्परांपासून फार वेगळे आहेत. ब्लॅक कॉमेडीमध्ये त्याज्य विषयांना विनोदाने हाताळण्याची परंपरा आहे, तर फिल्मन्वार एका विशिष्ट शैलीतील गुन्हेगारी कथानकं, गडद दृश्यशैली अन् तितक्याच गडद आशयाच्या माध्यमातून मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. न्वार चित्रपटांमध्ये दृष्टिकोनांमधल्या विसंगतीतून येणारा विनोद असू शकतो, मात्र नायक-नायिकेपासून सर्वांना काळ्या रंगात रंगवणा-या न्वार चित्रपटांच्या वाट्याला प्रांसंगिक, संवादी विनोद क्वचित जातो. बिग नथिंगचा वेगळेपणा आहे, तो हाच.
चित्रपटाची सुरुवात ही `फिल्म न्वार` शैली ओळखता येईल अशा पद्धतीने होते. अंधा-या रात्री एक गाडी एका कड्यापाशी येऊन थांबते. आतून तीन व्यक्ती उतरतात. गाडीची डिकी उघडतात, थोड्याशा उजेडात आपल्याला असं दिसतं की या तिघांतले दोन पुरुष आहेत, तर एक बाई. डिकीत दिसणारी गोष्ट (अन् या प्रकारच्या चित्रपटात तिथे काय असणं अपेक्षित आहे, हे आपण जाणतोच.) त्यांना चकीत करते. वळणावळणाच्या रस्त्यांवरून गाडी परत जायला निघते. पार्श्वभूमीला नायकाचा आवाज येतो, `माय नेम इज चार्ली वुड. आय थिंक आय मेड ए बिग मिस्टेक.`
दृश्यातला प्रत्यक्ष अंधार, गुन्हेगारी चित्रपटांचा तपशील, नायकाचा व्हाईसओव्हर आणि त्यातून येणारा नकारात्मक सूर या सर्व गोष्टी चित्रपट न्वार पद्धतीचा असण्याकडे निर्देश करतात. मात्र त्याला विसंगत ठरवते ती एक गोष्ट. समोर दिसणारे नट. हे परिचित चेहरे आहेत सायन पेग (शॉन ऑफ द डेड, हॉट फझ) आणि डेव्हिड श्विमर (फ्रेंड्स मालिकेतला रॉस) या दोन गाजलेल्या विनोदी नटांचे, जे या वातावरणात दिसणं अपेक्षित नाही. ही विसंगत गोष्टच चित्रपटाचा पुढला भाग कसा असेल याची झलक दाखविते.
इथला नायक आहे चार्ली (डेव्हिड श्विमर), एक अयशस्वी लेखक. चार्लीची पत्नी पोलिसात आहे. मात्र तिच्या एकटीच्या पगारावर घर चालणं कठीण, म्हणून चार्ली एका कॉल सेन्टरमध्ये नोकरी धरतो. तिथे त्याची गाठ पडते गसशी (सायमन पेग). आपल्या मुलीच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज असलेल्या गसची योजना असते, ती कॉल सेन्टरमधून मिळविलेल्या माहिती आधारे रेव्हरन्ड स्मॉल्सना ब्लॅकमेल करण्याची. या योजनेत तो चार्लीला आणि जोसी मॅकब्रूम (अॅलिस इव्ह) या वेट्रेसला सामील करून घेतो. खून-मारामारीविना पैसे मिळवायचे आणि उर्वरीत आयुष्य सुखात घालवायचं या कल्पनेने गसबरोबर जाणा-या चार्लीला, आपली , ` बिग मिस्टेक.` लवकरच ध्यानात येते. रेव्हरन्डपासून सुरूवात होऊन पडत जाणा-या बळींची संख्या वाढायला लागते, आणि आपल्या जीवावरही लवकरच बेतणार हे चार्लीला स्वच्छ दिसायला लागतं.
कथासूत्राच्या बाबतीत `बिग नथिंग` हा डॅनी बॉईलच्या शॅलो ग्रेव्हशी किंवा सॅम रायमीच्या `ए सिम्पल प्लान`शी साधर्म्य साधणारा आहे, मात्र पटकथेच्या ठेवणीत तो या दोघांपेक्षाही खूपच वेगळा म्हणावा लागेल. दिग्दर्शक आणि सहपटकथाकार जाँ-बाप्तिस आन्द्रेआ याने घटनांचा वेग आणि टप्पे हे एखाद्या फार्सला शोभण्यासारखे ठेवले आहेत. प्रमुख भूमिकांमध्ये विनोदी अभिनेत्यांना घेणंदेखील त्याच्या या योजनेशी सुसंगत. मात्र हा विनोद चित्रपटाच्या केंद्रस्थानी असणा-या आशयाच्या गांभीर्याशी तडजोड करीत नाही.
दिग्दर्शनातील एक गोष्ट मात्र मला खटकली. सध्या अनेक चित्रपटांत कॅमेरा स्थिर ठेवायचा आणि कथानक आपल्या चालीने उलगडू द्यायला दिग्दर्शक कचरताना दिसतात. सतत काही हालचाल दिसली पाहिजे. दृश्य चमत्कृती जाणवल्या पाहिजेत असा अट्टाहास दिसून येतो. त्या पठड़ीला जागून इथेही दिग्दर्शक अधेमधे अॅनिमेशन किंवा स्प्लिट स्क्रीनचा वापर करताना दिसतो. पण इथे तो आवश्यक वाटत नाही. एम टीव्ही संस्कृतीने मुळात सुरू केलेला, अन टीव्ही उद्योगातून हळूहळू चित्रपटांत उतरलेला हा क्लुप्तीबाजपणा बहुतेकदा चुकीच्या गोष्टीकडे लक्ष वेधणारा, अन् परिणामाला मारक ठरण्याची शक्यता असते. सुदैवाने बिग नथिंगमध्ये त्याचा अतिरेक होत नाही.
रेमन्ड चॅन्डलरच्या म्हणण्याप्रमाणे चांगली गुन्हेगारी कथा ही गुन्ह्याला वास्तवाच्या चौकटीत आणून बसवते. तो घडवणारी माणसं, त्यांची पार्श्वभूमी, त्यांना तो करण्यासाठी भाग पाडणारी कारणं या सगळ्याला तत्कालिन समाजाचा एक संदर्भ आणून देते. `बिग नथिंग`मधे मला विशेष हाच वाटला की तो हे अमूक एका प्रमाणात का होईना करू पाहतो. रिसेशन, कॉल सेंन्टर्सचा अतिरेक, वैवाहिक समस्या, इन्टरनेट पोर्नोग्राफी अशा अनेक तुकड्य़ांमधून तो चित्रपटाच्या घटीताला एक कॉन्टेक्स्ट आणून देतो. मुळात वास्तववादाचा आव आणणारे चित्रपटही हे सातत्याने करू शकत नाहीत. मग उघडच कल्पितकथा मांडणा-या चित्रपटाने ते करावं हे कौतुकास्पदच ठरावं.
-गणेश मतकरी. Read more...