उलगडण्याजोगं कोडं

>> Sunday, May 30, 2010


सर्व्हेलन्स चित्रपटाला `सर्व्हेलन्स` हे नाव का देण्यात आलं असेल हे फारसं स्पष्ट नाही. म्हणजे रुढार्थाने हा शब्द `नजर ठेवणे` या अर्थाने वापरला जातो, तसा तो इथे सहजासहजी वापरता येणार नाही, अन् वापरायचाच, तर चांगल्यापैकी कसरती कराव्या लागतील. `सर्व्हेलन्स`ची दिग्दर्शिका आहे जेनिफर लिन्च, जिचं आडनाव, हे तिच्या वडिलांच्या चमत्कृतीपूर्ण, विक्षिप्त, झपाटून सोडणा-या, डोक्याचा खूप वापर करायला लावणा-या अन् काही बाबतीत विकृत चित्रपटांमुळे खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. डेव्हिड लिन्च इथे कार्यकारी निर्माता म्हणून हजर आहे, पण त्याच्या चित्रपटांमधलं मेटाफिजिकल चक्रव्यूह इथे पाहायला मिळत नाही. इथे कोडं आहे, पण ते अधिक सोपं, शोधण्याजोगं उत्तर असलेलं.
`सर्व्हेलन्स` हा जेनिफर लिन्चचा दुसरा चित्रपट. २००८मधला. पहिला ' बॉक्सिंग हेलेना ' १९९३मध्ये बॉक्स आँफिसवर आपटल्यावर चिक्कार विश्रांती घेऊन आलेला. अर्थात हेलेनाच्या अपयशाला प्रेक्षकांनाही जबाबदार धरता येणार नाही. प्रेमकथेच्या गोंडस नावाखाली आपल्या प्रिय व्यक्तीचं अपहरण करून तिचे हात पाय तोडणा-या डॉक्टरची गोष्ट कोणाला पाहायला आवडेल? हेलेना वरून हे स्पष्ट झालं की लिन्चकडून त्याच्या मुलीने घेतलेल्या गुणांमध्ये `वादग्रस्तता, धक्कातंत्र अन् विकृतीचा अंश` यांचा निश्चित समावेश आहे. आपल्या दुस-या चित्रपटातही तिने या गोष्टी कायम ठेवल्या आहेत. मात्र निदान आता आशयात सिम्बॉलिझमचा आव आणला जात नाही. सर्व्हेलन्स हा क्राइम थ्रिलर आहे, अन् त्या लेबलाखालीच तो दाखविला जातो.
एकाच घटनेकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन मांडणा-या चित्रपटांचा मूळ पुरूष म्हणजे अकिरा कुरोसावाचा राशोमॉन (१९५०). `सर्व्हेलन्स`देखील त्याच्या अनेक वंशजांपैकी आहे. मात्र एका महत्त्वाच्या फरकासह. हा फरक कोणता ते आपण नंतर पाहू.
राशोमॉन प्रमाणेच इथे एक गुन्हा अन् संबंधित साक्षीदारांनी आपल्या आठवणीतून दिलेली, कधी मेळ बसणारी, तर कधी न बसणारी स्पष्टीकरणं असा कथानकाचा मूळ आकार आहे.
घटनास्थळ आहे ते अमेरिकेतल्याच एका वैराण भागातलं छोटेखानी गाव अन् त्याच्या हद्दीत येणारा गाडीरस्ता. होणारा गुन्हा हा दोन मुखवटाधारी गुन्हेगारांनी पसरवलेल्या जाळ्याचाच एक भाग आहे, पण चित्रपट सुरू होताना तो आधीच घडून गेलाय, आदल्या दिवशी. साक्षीपुरावे तपासण्यासाठी गावात आलेत एफ.बी.आय.चे दोन अधिकारी. सॅम हॅलोवे (बिल पुलमन) आणि एलिझाबेथ अ‍ॅन्डरसन (ज्युलिआ ओरमान्ड). पोलीस स्टेशनवर तिन्ही साक्षीदार कडेकोट बंदोबस्तात आहेत. एक आहे पोलीस ऑफिसर जॅक बेनेट (केन्ट हार्पर) ज्याच्या पार्टनरचा कालच्या घटनेत बळी गेलाय. दुसरी आहे ड्रग अ‍ॅडिक्ट तरुणी बॉबी प्रेस्कॉट (पेल जेम्स) जिचा मित्र मारला गेलाय; तर शेवटची साक्षीदार आहे स्टेफनी (रायन सिम्पकिन्स) जिचं पूर्ण कुटुंबच तिला अंतरलंय.
साक्षीदारांना वेगवेगळ्या खोल्यांत बसवलं जातं अन् प्रश्नोत्तरं सुरू होतात. आता चित्रपट प्रत्यक्ष गुन्हा अन् पोलीस स्टेशन यांच्यात मागे पुढे जायला लागतो. सत्य समोर यायला लागतं.
राशोमॉन अन् सर्व्हेलन्समधल्या वरवर सारख्या वाटणा-या क्लृप्तीत फरक आहे, तो चित्रपटाला काय सांगायचं याचा. राशोमॉन प्रेक्षकांना चार पूर्णपणे वेगळ्या आवृत्त्या दाखवितो आणि त्यातली कोणती आवृत्ती खरी घडली याकडे निर्देश करत नाही, कारण त्याला भाष्य करायचं ते ` सत्य ` या संकल्पनेवर. कुरोसावाच्या मते सत्य हे व्यक्तिगत आहे. प्रत्येकजण कोण आहे अन् कुठल्या जागेवरून घटनांकडे पाहतोय यावर त्याची आवृत्ती अवलंबून आहे, त्या त्या व्यक्तीपुरती खरी.
याउलट सर्व्हेलन्समध्ये आवृत्त्यांत पडणारा फरक हा वरवरचा, अन् केवळ जबान्यांमध्ये दिसणारा आहे. सत्य काय आहे हे चित्रपट जाणतो. प्रेक्षकांपुढे दिसणारा फ्लॅशबॅक प्रत्यक्ष घटना जशी घडली तशी दाखवितो. त्यामुळे इथे राशोमॉनसारखा तात्त्विक मुद्दा उपस्थित होत नाही, तर केवळ या विशिष्ट कथानकापुरतं त्याचं स्थान राहतं.
चाणाक्ष प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे चांगला एक्सरसाइज आहे. चित्रपटात एक रहस्य आहे, जे शेवटाकडे उघड केलं जातं, मात्र साधारण पहिली पंधरा वीस मिनिटं आपण लक्ष देऊन चित्रपट पाहिला, तर काय असेल ते स्पष्ट करणा-या अनेक गोष्टी आपल्यालाही दिसून येतात. ` संशय न येणारी व्यक्तीच गुन्हेगार` हा नियम लावून ओळखता येणा-या रहस्यभेदापेक्षा अधिक समाधान देणारं आहे.
मला सर्व्हेलन्स दोन गोष्टींसाठी अधिक आवडला. एक म्हणजे त्याच्या पटकथेत फाफटपसारा पूर्णपणे टाळलेला आहे. दोन दिवसांत दोन ठिकाणी काही तासांच्या कालावधीत घडणा-या यातल्या घटना आहेत. चित्रपट केवळ त्या घटनांकडे लक्ष देतो. त्यासाठी तो पार्श्वभूमी तयार करण्याच्या फंदात पडत नाही. कथेचे धागेदोरे घटनेच्या स्थलकालाच्या चौकटीबाहेर जाऊ देत नाही, शेवटानंतरही तो घटनांना काही कॉन्टेक्स्ट देण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचं कॉम्पॅक्ट/बंदीस्त असणं आणि अखेरपर्यंत राहणं, हे प्रेक्षकांवर पडणा-या प्रभावाच्या दृष्टीने फायद्याचं आहे.
दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे दोन दिवसांतल्या दृश्य भागात साधलेला फरक. पोलीस स्टेशनमध्ये घडणारं कथानक हे जवळजवळ रिअल टाइम, म्हणजे प्रत्यक्षात घडायला लागणा-या वेळाइतकाच वेळ पडद्यावर घेऊन केल्याचा आभास आणणारं आहे. ते पात्रांच्या आठवणींशी संबंधित नसल्याने त्याला एक त्रयस्थ दृष्टिकोन आहे. त्याची दृश्यशैली साधी आहे. दृश्य चौकटींचा वापर हा छोट्या पोलीस स्टेशनातली थोडी अडचणींची, सामानाने भरलेली जागा अशा पद्धतीने दाखविण्यासाठी करण्यात येते, की जो आदल्या दिवसाच्या निवेदनशैलीशी विरोधाभास साधणारा अन् शेवटाकडे वातावरणातल्या क्लास्ट्रोफोबिया वाढवत नेणारा आहे. याउलट आदल्या दिवसाचं, म्हणजे गुन्ह्यांचं चित्रण हे जरी घटना घडल्या तशा दाखवणारं असलं, तरी ते त्या त्या पात्राच्या साक्षीसोबत उलगडत जातं. त्यामुळे ते उलगडताना विशिष्ट व्यक्तिरेखेला साजेसा टिन्ट,कलर, लेन्सेस यांचा वापर दिग्दर्शिकेने केला आहे. जो हे चित्रण पोलीस स्टेशनपेक्षा खूपच वेगळं ठरवतो. इथले मोकळे रस्ते, ढगांनी भरलेलं आकाश, दृश्य चौकटींचा भव्यपणा हादेखील दोन निवेदनांतला वेगळेपणा अन्डरलाईन करतो.
एवढं असूनही मी म्हणेन की सर्व्हेलन्स सर्वांना पाहायला आवडणार नाही. तो जे दाखवतो यापेक्षा जे सूचित करतो ते अधिक अस्वस्थ करणारं आहे. त्यादृष्टीने पाहता पोलीस स्टेशनवरचा शेवटचा प्रसंग खूपच त्रासदायक आहे. या प्रकारची वर्णनं यापूर्वी बेस्टसेलर लिस्टवर मिळणा-या सिडनी शेल्डन सारख्या लोकप्रिय कादंबरीकारांच्या पुस्तकातून येऊन गेली आहेत, मात्र वाचणं वेगळं अन् प्रत्यक्ष पाहणं वेगळं.
सर्व्हेलन्सचा शेवट गुन्हेगारांनी दाखविलेल्या माफक दयाबुद्धीवर होतो. मात्र त्याला सुखांत म्हणणं फारसं योग्य ठरणार नाही. अमेरिकन स्मॉल टाऊन्सच्या शांत आवरणाखाली दडलेली विकृती अन् हिंसा हे डेव्हिड लिन्चच्या चित्रपटात अनेकदा येणारं सूत्र. इथे त्यातला सामाजिक व मानसशास्त्रीय विचार न येता केवळ त्याचं प्रकटीकरण दिसून येतं. मात्र इतपत सुधारणा ही कदाचित जेनिफर लिन्चला एक दिशा मिळाल्याचीही ही खूण असेल. अर्थात लिन्चचा पुढचा चित्रपट म्हणजे मल्लिका शेरावत स्टारर `हिस्स...`, ही आपल्या नागिन टाईप चित्रपटाची अमेरिकन आवृत्ती प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना, तिच्याविषयी कोणतंही सकारात्मक विधान करणं, हे आज तरी एक धाडसच ठरेल.

-गणेश मतकरी.

Read more...

वेगळ्या मार्गावरचे चित्रपट आणि बटरफ्लाय इफेक्ट

>> Sunday, May 23, 2010

माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंगी त्याला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. आपला मार्ग ठरवत राहावा लागतो. या निर्णयाचे आपले भविष्य निवडण्याचे क्षणच आपल्या आयुष्याला आकार देत असतात. जाणता-अजाणता काही वेळा हे निर्णयाचे क्षण मोठे असतात. तर कित्येकदा अगदी क्षुल्लक. हे क्षणच सध्या अनेक चित्रकर्त्यांना झपाटून राहिल्याचं दिसतं. देशोदेशीच्या चित्रपटात हा धागा सातत्याने दिसतो. `बटरफ्लाय इफेक्ट` हेच या धाग्याचे एक रुप आहे.

मला खात्री आहे, की कोणत्याही प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून विशिष्ट अपेक्षा असतात, तशाच चित्रपटाच्याही त्याच्या प्रेक्षकांकडून असतात. यातली प्रमुख अपेक्षा ही असते (किंवा असायला हवी) की प्रेक्षक मोकळ्या मनाने, कोणतीही आडकाठी किंवा पूर्वग्रह मनात न ठेवता चित्रपट बघेल आणि त्याला प्रेक्षकाची करमणूक करण्याची पूर्ण संधी देईल. एखाद्या विशिष्ट प्रकारात बसणा-या चित्रपटांच्या बाबतीत ( म्हणजेच विज्ञानपट म्हणा किंवा रोमॅंटिक कॉमेडी म्हणा) हे सहज शक्य असतं. कारण या चित्रपटांचा प्रेक्षक मुळातच ठरलेला असतो; पण जेव्हा हे प्रकार एकमेकांत मिसळायला लागतात आणि गुंतागुंत वाढते, तेव्हा मात्र चित्रकर्त्यांची मदार असते ती प्रेक्षकाच्या भलेपणावर आणि बुद्धिनिष्ठतेवर. अशा परिस्थितीत अनेकदा प्रेक्षकवर्ग कमी असायला चित्रकर्त्यांची हरकत नसते, जोवर तो चित्रपटाला अमूक एका प्रमाणात स्वातंत्र्य देईल.
हल्ली या प्रकारचे गुंतागुंतीचे चित्रपट वाढत चालल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि या प्रकाराला समीक्षकांबरोबर प्रेक्षकांचाही प्रतिसाद चांगला असल्याचीही लक्षणं आहेत. मात्र त्यामुळे विशिष्ट कल्पना घेऊन चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांची निराशा होते, हेही तितकंच खरं. उदाहरणार्थ क्लींट इस्टवूडचा `मिस्टिक रिव्हर` या तीन मित्रांच्या गोष्टीकडे केवळ एक खुनाचं रहस्य म्हणून पाहणा-यांना निराश करून गेला. या व्यक्तिप्रधान चित्रपटातलं रहस्य ही खरं तर दुय्यम बाब होती. परिस्थितीचा माणसावर होणारा परिणाम, भूतकाळाचा वर्तमानाशी असणारा संबंध, मानसिक आघाताचं दूरगामी स्वरूप अशा अनेक पैलूंचं चित्रण ही या चित्रपटाची खास बात होती. अशाच प्रकारचा तद्दन रहस्यपटाचं सोंग घेतलेला आणखी एक चित्रपट म्हणजे जेम्स मॅन्गोल्डचा `आयडेन्टिटी`. यात एका पावसाळी रात्री मोटेलमध्ये जमणारे अनोळखी प्रवासी आणि एकेकाचे होणारे खून पाहून कोणालाही अगाथा ख्रिस्तीच्या रहस्य कादंब-यांची आठवण व्हावी. प्रत्यक्षात आयडेन्टिटीमध्ये रहस्य होतं, पण ते प्रामुख्याने मनोविश्लेशणात्मक. त्याचा नेहमीच्या तपासकथांशी जराही संबंध नव्हता.

मागे प्रदर्शित झालेल्या मनोज नाईट श्यामलनच्या साईन्सचाही प्रकार असाच होता. साईन्सने जाहिरातींमधून प्रेक्षकांची दिशाभूल केली असंही म्हणता येईल, पण एक चांगला चित्रपट असल्याने एवढा गुन्हा त्याला माफ करायला हरकत नाही. साईन्सच्या जोरदार जाहिराती पाहून प्रेक्षकांना वाटलं, की हा परग्रहवसीयांनी पृथ्वीवर केलेल्या हल्ल्याचा जबरदस्त चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार, `इन्डिपेन्डन्स डे`सारखा. त्यातून प्रमुख भूमिकेत अँक्शन स्टार मेल गिब्सन, मग काय बघायलाच नको! प्रत्यक्षात साईन्समध्ये परग्रहवासी जरूर होते, पण साईन्सचा विषय होता तो एका नास्तिक बनलेल्या धर्मगुरूचा पुन्हा देवावर बसणारा विश्वास. आपल्या पृथ्वीवरच्या अस्तित्त्वामागे काही प्रयोजन आहे, याविषयी त्याची होणारी खात्री. स्पेशल इफेक्ट साईन्समध्ये अतिशय कमी प्रमाणात होते. त्यामुळे इन्डिपेन्डन्स डे सारखा चित्रपट पाहायला मिळेल, या आशेने गेलेला प्रेक्षक फसला, पण इतरांना चांगला आणि वेगळा अनुभव घेता आला.
आज हे सगळं आठवायला झालेलं कारण म्हणजे नुकताच पाहिलेला ब्रेस गुबर्ट या दिग्दर्शकद्वयाचा `बटरफ्लाय इफेक्ट`. या चित्रपटावर बरीच उलटसुलट मतं व्यक्त करण्यात आली होती. हा चित्रपट पाहणा-या अनेकांना असं वाटण्याची शक्यता आहे, की हा विज्ञानपट आहे. कालप्रवासाच्या विसंगतीशी संबंधित विज्ञानपट आहे, केवळ त्यातल्या प्रवासाच्या तपशीलाकडे चित्रकर्त्यांनी दुर्लक्ष केलं. हे तितकंसं बरोबर नाही. एक तर बटरफ्लाय इफेक्टची जात ही विज्ञानपटापेक्षा भयपटाच्या अधिक जवळ जाणारी आहे, पण तरीही हा ना भयपट आहे, ना विज्ञानपट. माणसाच्या आयुष्यात अनेक प्रसंगी त्याला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. आपला मार्ग ठरवत राहावा लागतो. या निर्णयाचे आपले भविष्य निवडण्याचे क्षणच आपल्या आयुष्याला आकार देत असतात. जाणता-अजाणता काही वेळा हे निर्णयाचे क्षण मोठे असतात. तर कित्येकदा अगदी क्षुल्लक. हे क्षणच सध्या अनेक चित्रकर्त्यांना झपाटून राहिल्याचं दिसतं. देशोदेशीच्या चित्रपटात हा धागा सातत्याने दिसतो. `बटरफ्लाय इफेक्ट` हेच या धाग्याचे एक रुप आहे.
माणसाची निर्णयक्षमता, अपघात, संधी आणि भविष्याचं धूसर स्वरूप यावर आजवर आलेले चित्रपट आणि बटरफ्लाय इफेक्ट यामध्ये तरी एक महत्त्वाचा फरक आहे तो मांडणीचा. पोलीश दिग्दर्शक किसलोस्कीचा ब्लाईंड चान्स (१९८२) पीटर हॉवीटचा स्लायडिंग डोअर्स( १९९८) आणि टॉम टायकरचा रन लोला रन(१९९९) ही या सूत्रावर आधारलेली सर्वात प्रसिद्ध उदाहरणं. मात्र या तीनही उदाहरणांमध्ये त्यातल्या प्रमुख पात्रांचे निर्णय अन् आधारित भविष्य ही एकमेकांत मिसळत नाहीत, तर स्वतंत्र कथानकांच्या रुपात येतात.
बटरफ्लाय इफेक्टचा प्रयत्न आहे, तो या बदलाच्या शक्यता तथाकथित लिनियर स्वरुपात, म्हणजे एकाच सलग गोष्टीत दाखविण्याचा. सायन्स फिक्शनच्या पायावर पाय पडला आहे, तो याच दिग्दर्शकीय निर्णयाने. इव्हान ट्रेबोर्न (अँश्टन कचर) हा आहे इफेक्टचा नायक. त्याच्या भूतकाळात काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अन् या प्रसंगांशी संबंधित काही भाग त्याच्या आठवणीतच नाही. अचानक इव्हानला शोध लागतो की एका विशिष्ट मार्गाने आपण भूतकाळात जाऊन हे प्रसंग पुन्हा अनुभवू शकतो. या घटनांबाबत इव्हान आपल्या केली या मैत्रिणीशी बोलतो आणि अचानक ती आत्महत्या करते. केलीला वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून इव्हान भूतकाळातले दुर्दैवी अनुभव बदलता येतात का हे पाहण्याचं ठरवतो, त्यात तो यशस्वीही होतो, पण भूतकाळातल्या बदलांनी तयार होत जाणारा नवा भविष्यकाळ हा अधिकच विदारक असतो.
एका काळातल्या व्यक्तींनी दुस-या काळात जाऊन बदल केल्याच्या ज्या काही विज्ञानकथा आहेत, त्यामध्ये तयार होणारा नवा वर्तमानकाळ हा नेहमीच मोठ्या प्रमाणात बदललेला असतो. नारळीकरांची गंगाधरांचे पानिपत ही गोष्ट वाचलेल्यांना हे पटेल. यातला नायक भूतकाळात जात नाही, पण एका समांतर विश्वात जातो. जिथे पानिपतची लढाई मराठ्यांनी जिंकली आणि पुढला इतिहास वेगळ्याच मार्गाने गेला आहे. एक अशीही गोष्ट आठवते, की एक माणूसु पूर्वैतिहासिक काळात गेला असताना एका झुरळाला चिरडतो. ज्याचा परिणाम होतो, तो संपूर्ण मानवजातीच्या विनाशात. आजवर अशा कथा वाचल्याने या चित्रपटात भूतकाळाशी केलेला खेळ जेव्हा चार मित्र अन् त्यांचे पालक यांच्याशी संबंधित राहिलेला दिसतो. तेव्हा विज्ञानकथांच्या चाहत्यांना ते खटकल्याशिवाय राहत नाही.
बटरफ्लाय इफेक्ट पाहताना हेच लक्षात घेण्याची गरज आहे, की कालप्रवाहाशी खेळ ही केवळ यातल्या प्रमुख व्यक्तिरेखेच्या बदलत्या निर्णयांना सलग कथानकात बसवण्यासाठी रचलेली क्लृप्ती आहे. हा विज्ञानपट नाही, तर आपल्या आयुष्यातल्या घटनांशी संबंधित `कॉज अँड इफेक्ट` पाहण्याचा हा एक निमव्यावसायिक प्रयोग आहे.केवळ `बटरफ्लाय इफेक्ट` किंवा `साईन्स` यांच्यासारख्या एखाददुस-या चित्रपटाच्या बाबतीत नव्हे, तर आपण नेहमीच चित्रपट पाहताना मन कोरं ठेवणं हे जरुरीचं आहे. कोणता चित्रपट कधी कोणत्या वळणांनी जाईल हे सांगता येत नाही, आणि केवळ आपल्या अपेक्षित वळणांनी तो गेला नाही याचं दुःख करण्यापेक्षा त्यानी घेतलेली वळणं अनपेक्षित असली तरी कथेला न्याय देणारी आहेत का, हे पाहणं कधीही अधिक वेधक नाही का? चित्रपट आपल्या बाजूने जर प्रेक्षकांना नवीन काही देण्याचा प्रयत्न करीत असेल, तर तो अव्हेरून प्रेक्षकाला काही साध्य तर होणार नाहीच, वर दिवसेंदिवस या माध्यमाच्या प्रयोगशीलतेला खीळ पडत जाईल, हे स्पष्ट आहे.
-गणेश मतकरी.

Read more...

रोमॅण्टिक फॉर्म्यूला आणि दोन प्रेमपट !

>> Monday, May 17, 2010

घिशापिट्या फॉर्म्युल्यांच्या बाबतीत हॉलीवूड काही बॉलीवूडहून कमी नाही. युद्धपटांपासून सूडपटांपर्यंत आणि विनोदी चित्रपटांपासून रोमॅन्टिक कॉमेडीपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये फॉर्म्युलांचा सातत्याने वापर दिसतो. त्यांच्या आणि आपल्यात फरक आहे तो हा की आपल्यापेक्षा त्यांच्याकडे प्रयोगशील दिग्दर्शकांची संख्या किंचित अधिक आहे आणि फॉर्म्युले वापरले तरी त्यांच्या मांडणीत वैविध्य आणून तोच तो पणा लपवायची हातोटीदेखील.
आता रोमॅन्टिक कॉमेडीच घ्या ना! नायकाने नायिकेला भेटणं, मग प्रेम, मग गैरसमज आणि अखेर समझोता या वन लाईनवर हॉलीवूडने शेकडो चित्रपट बनवले आहेत. मात्र, ते बनवताना ज्या चित्रकर्त्यांनी नावीन्य शोधण्याचा प्रयत्न केला. अशाच चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे आणि या चित्रपटांची संख्या बॉलीवूडने हेवा करण्याजोगी नक्कीच आहे. आता अशा प्रत्येक चित्रपटाची आठवण काढायची तर ग्रंथच लिहावा लागेल. त्यामुळे मी केवळ त्यातल्या प्रातिनिधिक अशा दोन चित्रपटांचा उल्लेख करतो. एक आहे `व्हेन हॅरी मेट सॅली` आणि दुसरा `समथिंग्ज गॉट्टा गिव्ह`. ज्यांनी दिग्दर्शक रॉब रायनर यांचा `व्हेन हॅरी मेट सॅली` पाहिला असेल, त्यांना निश्चित लक्षात आलं असेल, की त्याच्या गोष्टीचा साचा मी वर सांगितलेलाच होता, पण त्यातला बदल होता तो मैत्री आणि प्रेम यातल्या ख-या अन् काल्पनिक फरकाच्या आधारे घडविलेला. फॉर्म वेगळा असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी सुरुवातीचा काही भाग खर्ची घातला होता. हॅरी आणि सॅली (मेग रायन) यांची अखेर मैत्री होण्यापर्यंतच्या अनेक भेटींचा ज्यात सॅलीचं हॅरीविषयीचं वाईट मत हळूहळू बदलून ते दोघे चांगले मित्र होतात. पण हॅरीच्या मते एक स्त्री आणि एक पुरूष चांगले मित्र कधीच होऊ शकत नाहीत. कारण शारीरिक आकर्षण कायमचं मध्ये येतच राहतं.
या चित्रपटात एक छान गोष्ट होती, ती म्हणजे गोष्टीच्या अधेमधे येणा-या अत्यंत ख-या-खु-या वाटणा-या जोडप्यांचे काही मुलाखतवजा शॉट्स. या मंडळींची पहिली भेट कशी झाली, प्रेमाचं लग्नात पर्यवसान कधी झालं वैगैरे सांगणारी. चित्रपट संपतो तो हॅरी आणि सॅलीच्या अशाच मुलाखतीने. मला वाटतं मागे चोप्रांच्या एका चित्रपटाच्या सुरुवातीला (बहुतेक दिल तो पागल है, पण खात्री नाही.) असे वेगवेगळ्या जोडप्यांचे शॉट्स दाखविण्यात आले आहेत. त्यांनी ते चालू कथानक तोडून दाखवणं मात्र टाळलं. बहुदा आपल्या प्रेक्षकांना ते अति वाटेल असा अंदाज असावा.
मात्र, या सर्व गोष्टी हॅरी-सॅलीची खासियत नव्हेत. त्या केवळ पूरक आहेत, या चित्रपटाची खासियत आहे, होती ती त्यातले संवाद. १९८९ मध्ये ताजे वाटणारे संवाद आजही त्यांची जादू टिकवून आहेत, यातच सगळं आलं. प्रेम, मैत्री, आकर्षण, शरीरसंबंध यावर अतिशय गंमतीशीर पण अचूक टीका करणं शक्य आहे, हे या चित्रपटानं दाखवलं. हे संवादच चित्रपटाला पुढची कित्येक वर्ष जिवंत ठेवतील.
समथिंग्ज गॉट्टा गिव्ह`देखील कदाचित अनेक वर्षे जिवंत राहील, पण संवादासाठी निश्चितच नाही. उलट संवादाच्या बाबतीत हा चित्रपट थोडा कमकुवत आहे म्हटलं तरी चालेल. संवादातल्या नावीन्याचा अभाव, पटकथेचं शेवटल्या भागात रेंगाळणं आणि लेखक/दिग्दर्शक असणा-या नॅन्सी मेयर्स यांनी टाळलेली शेवटच्या भागाची काटछाट, या दोषांनी अखेर चित्रपट जवळजवळ हातचा जाण्याची वेळ आली आहे. पण चांगला जमलेला पहिला पाऊण भाग अन् व्यक्तिचित्रणातले अचूक तपशील यांनी चित्रपटाला चांगलाच हात दिला आहे. मूळ आलेख इथेही भेट-गैरसमज-समझोता हाच आहे,पण या चित्रपटातल्या दोन गोष्टी नेहमीच्या रोमॅन्टिक कॉमेडीपेक्षा खास वेगळ्या आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे इथले नायक आणि नायिका तरुण नाहीत, तर चांगले पन्नास-साठ वर्षांचे आहेत. तरुण प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरविण्याची शक्यता गृहित धरूनही मेयर्सनी हा जुगार खेळला आहे. आजवर हॉलीवूडच्या चित्रपटांत मध्यमवयीन स्त्रियांना प्रामुख्याने दुय्यम सहाय्यक भूमिकांमध्ये टाकण्याची प्रथा आहे. ब्रॅण्डो, पचिनोपासून ते खुद्द जॅक निकोल्सनपर्यंत अनेक मध्यमवयीन नटांनी चित्रपट पेलल्याची उदाहरणं आहेत. केवळ भूमिकेची लांबीच नव्हे ग्लॅमरस नायक म्हणून त्यांचं चित्रिकरण केलेलं दिसतं. सुझान सॅरेंन्डन किंवा मेरिल स्ट्रीपसारख्या काही नायिका सोडल्या, तर हे भाग्य इतर नायिकांना मिळाल्याचं दिसत नाही. शिवाय त्या दोघींच्या भूमिकाही त्यांच्या सेक्शुअँलिटीकडे दुर्लक्ष करणा-या, केवळ व्यक्तिमत्त्वावर आधारित असतात. या चित्रपटात मात्र डाएन किटनच्या एरिका या व्यक्तिरेखेचं चित्रण सर्वच बाबतीत प्रमुख नायिका म्हणून करण्यात आलेलं आहे. तेही इतक्या ठामपणे की ग्लॅमरस मध्यमवयीन नायिकांचा नवा ट्रेण्ड हॉलीवूडमध्ये प्रचलित झाला तर आश्चर्य वाटणार नाही इतका.
हे कळीचे मुद्दे पाहिले, तर या चित्रपटाचं नावीन्य काय आहे, ते अचूक ध्यानात येईल. कथानायक आहे हॅरी लॅन्गर (जॅक निकोल्सन) या त्रेसष्ट वर्षांच्या तरुणाची प्रसिद्धी आहे ती केवळ तरुण मुलींबरोबर फिरण्यासाठीची. आपल्या मुलीच्या वयाच्या मॅरीन बेटी (अमान्डा पीट) बरोबर तिच्या बीच हाऊसवर गेला असताना हॅरीची अपघातानेच तिच्या आईशी, एरिका (डायन किटन)शी भेट होते. सुरुवातीली विळ्या-भोपळ्याचं सख्य असलेल्या हॅरी आणि एरिकाला जवळ येण्यासाठी कारणीभूत ठरतो तो हॅरीला भलत्या वेळी आलेला हार्ट अ‍ॅटॅक. शहरात लगेच हलवणं शक्य नसल्यानं शुश्रुषेची जबाबदारी येऊन पडते ती एरिकावर. पुढे काय होणार हे प्रेक्षकांना माहिती असलं तरी हॅरी अन् एरिकाला उमजायला अर्थातच खूप वेळ लागतो.पटकथेच्या लांबीबरोबरच चित्रपटाचा दुसरा प्रॉब्लम आहे तो म्हणजे पहिल्या भागातली घटनांची घाई अन दुस-या भागातलं रेंगाळणं. कदाचित या प्रसंगांची पुनर्रचना अधिक ठरली असती. असो.
तर मुद्दा हा की हॉलीवूडच्या रोमॅन्टिक कॉमेड्या गेली अनेक वर्षे जैसे थे आहेत, अन् त्यामध्ये येणारं वेगळेपण हे त्याला दिग्दर्शकाने अन् लेखकाने आपल्या सर्जनशीलतेनुसार आणलेलं आहे. जुन्या रचनेतला ताजेपणा आणण्याचं हे गणीत हल्ली आपल्याकडेही ब-यापैकी जमायला लागलं आहे. हल्लीचे चित्रपट पाहता ही मंडळी आपल्या परदेशी बंधूभगिनींप्रमाणेच आपल्या धंद्याला फेसलिफ्ट देण्यात पारंगत होताना दिसत आहेत. सो फार सो गुड!

-गणेश मतकरी.

Read more...

द प्रिन्सेस अ‍ॅण्ड द वॉरिअर - पूर्वनियोजित योगायोग

>> Sunday, May 9, 2010

आयुष्य म्हणजे काय? निव्वळ एक योगायोगांची मालिका, का कुणा विधात्याने रचलेली एका विशिष्ट हेतूकडे घेऊन जाणारी पूर्वनियोजित साखळी, जिचा प्रत्येक टप्पा हा पुढल्या टप्प्याकडे बोट दाखविणारा आहे? आजवर तत्त्ववेत्यांपासून चित्रकर्त्यांपर्यंत अनेकांनी या दोन्ही बाजूंना आपल्य़ा परीने मजबूत करण्याचा आपल्या कामातून प्रयत्न केला आहे. माझ्या आवडीचे या वादाला पूरक असणारे १९९८चे दोन चित्रपट म्हणजे टॉम टायक्वरचा जर्मन `रन लोला रन` अन् पीटर हॉविटचा अमेरिकन `स्लायडिंग डोअर्स`. हे दोन्ही चित्रपट जर/तरचा अफलातून खेळ खेळणारे. लोला अन् तिचा मित्र मनी यांच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या वीस मिनीटांना तीन वेगवेगळ्या पद्धतीने घडविणारा `रन लोला रन`, तर हेलन क्वेलीच्या एके सकाळी ट्रेन पकडण्या/सुटण्यामधून तयार होणा-या दोन आवृत्त्या दाखविणारा `स्लायडिंग डोअर्स` हे दोन्ही चित्रपट आयुष्याला योगायोग किती वेगळ्या वळणांवर नेतो हे दाखवत असले, तरी दोघांत एक मोठा फरक आहे. लोलाचा युक्तिवाद आहे, तो आयुष्याला केवळ योगायोग म्हणून सोडणारा, तर स्लायडिंग डोअर्सचा शेवट हा पूर्वनियोजित भविष्याकडे बोट दाखवणारा. याचा अर्थ, हे दोन्ही चित्रपट आधी उल्लेखलेल्या वादाच्या प्रत्येकी एक बाजूचं प्रतिनिधित्व करणारे आहेत.
यातल्या रन लोला रनच्या दिग्दर्शकाचा २००० साली केलेला पुढचा चित्रपट म्हणजे ` द प्रिन्सेस अ‍ॅण्ड द वॉरिअर`. लोला आणि प्रिन्सेसमध्ये साम्य आहेही अन् नाहीही. आहे अशासाठी की तो प्रमुख भूमिकेत लोलाची भूमिका साकारणा-या फ्रान्का पोटेन्तला घेऊन पुन्हा एकदा योगायोग अन् आयुष्यातल्या लागणा-या अनपेक्षित वळणांचा खेळ मांडतो. नाही अशासाठी की इथे लोलासारखी एम.टी.व्ही संस्कृतीतली भरधाव व्हिज्युअल्स नाहीत, किंवा निवेदनातील जाणीवपूर्वक आणलेली पुनरावृत्ती नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे इथे टायक्वरचा कल, हा पूर्वनियोजिततेकडे झुकत चाललेला दिसतो. आपल्या हातून घडणारी प्रत्येक गोष्ट कितीही क्षुल्लक असली, तरी `ग्रॅन्ड स्कीम ऑफ थिंग्ज`मध्ये तिला काही ना काही स्थान निश्चित आहे असा विचार प्रिन्सेसमध्ये डोकावतो.
चित्रपटाची नायिका सिसी (फ्रान्का पोतेन्त) एका सायकिएट्रिक वॉर्डमध्ये नर्स आहे. इथले सर्व पेशन्ट तिच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अवलंबून आहेत. नायक बोदो (बेनो फरमान) हा निवृत्त सैनिक मात्र आयुष्यातल्या एका शोकांत घटनेनंतर भलत्या मार्गाला लागलेला. सध्या त्याचा भाऊ अन् तो मिळून एक बँक दरोड्याची योजना आखतायत. रन लोला रनची नक्कीच आठवण होईल अशा एका प्रसंगात पोलिसांपासून पळणा-या बोदोमुळे एक अपघात ओढवतो. या अपघाताचा बळी असते सिसी, जी गुदमरल्या अवस्थेत ट्रकखाली अडकून राहते. आपणच अपघाताला कारणीभूत आहोत हे लक्षात न येणारा बोदो या ट्रकखाली लपतो, अन सिसीची जीव वाचवायला कारणीभूत ठरतो.
जीवदान मिळालेल्या सिसीला या योजनेमागे दैवी हात दिसतो . अन् ती बोदोचा पिच्छा पुरवायला लागते. मात्र बोदोला सिसीचं गळ्यात पडणं समजत नाही. शिवाय पूर्वीच्या कटू आठवणी विसरून सिसीला आपलं म्हणणं त्याला शक्य होणार नसतं. लोलाप्रमाणेच टायक्वरने या चित्रपटातही थ्रिलर्समध्ये शोभण्यासारखे घटक, पार्श्वभूमी यांचा वापर केला आहे. अपघात, मनोरुग्णालयातलं वातावरण, आत्महत्या/खून/खूनाचा प्रयत्न, बँक दरोडा अशा अनेक गोष्टींमध्ये झटपट थ्रिलरचा वास आहे, मात्र पटकथा किंवा दिग्दर्शनात या प्रकारची रचना दिसून येत नाही. इथे गतीला महत्त्व नाही, तर विचारांना आहे. अन् ते स्पष्ट होण्यासाठी जिथे गतीचा त्याग करणं आवश्यक आहे, तेथे तो करायला दिग्दर्शकाची ना नाही. `प्रिन्सेस`मध्ये तयार होणारा तणाव हा प्रामुख्याने व्यक्तिरेखांच्या भावनांमधून तयार होणारा अन् त्यांच्यात जोडल्या जाणा-या वा तुटणा-या नात्यांमधून बळकट होणारा आहे.
इथे अ‍ॅक्शनला वाव असून तो वापरण्यात आलेला नाही. पटकथेचा सर्वात वेधक भाग आहे, तो सिसी अन् बोदो यांना एकत्र बांधणा-या योगायोगांचा, जे सिसीवर एका मैत्रिणीने सोपवलेल्या साध्या कामापासून सुरू होऊन थेट बोदोच्या पूर्वायुष्यातल्या कळीच्या प्रसंगांपर्यंत पसरलेले दिसून येतात. त्यांच्या गुंतागुंतीच्या मांडणीने सिसीचा सारं पूर्वनियोजित असल्याचा संशय तर जस्टीफाय होतोच,वर आपण नकळत आपल्या आयुष्यातल्या योगायोगांचाही त्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतो.
जवळ जवळ पाऊण चित्रपट हा काहीशा स्टायलाईझ्ड पण वास्तववादी शैलीत घडविल्यानंतर शेवटाकडे मात्र ` द प्रिन्सेस अ‍ॅण्ड द वॉरिअर` मेटाफिजिकल होतो. मात्र हे मेटाफिजिकल होणं दुर्बोध नाही. तर आशयातून सुचवल्या जाणा-या कल्पनांनाच प्रत्यक्ष दाखविल्यासारखं याचं स्वरूप आहे. या चित्रपटाविषयी मागे एकदा वाचनात आलं होतं, की शेवटाकडचा भाग हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जाऊ शकतो. अन् त्याचा अर्थही त्याप्रमाणे बदलत जातो. हे विधान मला मात्र पटलं नाही. याउलट तो मला खूपच स्पष्ट वाटला. दुसरा एक अर्थ इथे काढला जाऊ शकतो, नाही असं नाही, पण तो संहितेतल्या घटनांचा विपर्यास होऊ शकेल.
सध्या टायक्वर आणि पोतेन्त हे दोघंही हॉलीवूडमध्ये आल्याने बरेच `मेन स्ट्रीम` झालेले दिसतात. टायक्वरचा `इन्टरनॅशनल` गेल्या वर्षी प्रदर्शित झाला, अन् पोतेन्तही अनेक चित्रपटात छोट्यामोठ्या (बहुदा छोट्याच अधिक) भूमिका करताना दिसते. मात्र मेन स्ट्रीम झाल्याचा म्हणावा तसा फायदा दोघांनाही झालेला नाही. टायक्वरच्या आधीच्या चित्रपटांइतकी झेप इंटरनॅशनलने घेतली नाही, बहुदा त्याच्या सांकेतिक `थ्रिलर` असण्यानेच. टायक्वरचा पुढला घोषित चित्रपट मात्र त्याच्या पूर्वीच्या कामाला साजेसा असण्याची शक्यता आहे. डेव्हिड मिचेलच्या `क्लाऊड अ‍ॅटलस` या कादंबरीचं रुपांतर असणारा हा चित्रपट, मूळ कादंबरीच्या एकात एक जाणा-या कथामालिकेसारख्या स्वरुपाने, अन् मेट्रीक्स चित्रत्रयीचे दिग्दर्शक असणा-या वाचोस्की बंधूंच्या निर्मितीशी संबंधित असण्याने टायक्वरला आपली ताकद सिद्ध करण्याची संधी देईल अशी अपेक्षा आहे.


-गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP