उलगडण्याजोगं कोडं

>> Sunday, May 30, 2010


सर्व्हेलन्स चित्रपटाला `सर्व्हेलन्स` हे नाव का देण्यात आलं असेल हे फारसं स्पष्ट नाही. म्हणजे रुढार्थाने हा शब्द `नजर ठेवणे` या अर्थाने वापरला जातो, तसा तो इथे सहजासहजी वापरता येणार नाही, अन् वापरायचाच, तर चांगल्यापैकी कसरती कराव्या लागतील. `सर्व्हेलन्स`ची दिग्दर्शिका आहे जेनिफर लिन्च, जिचं आडनाव, हे तिच्या वडिलांच्या चमत्कृतीपूर्ण, विक्षिप्त, झपाटून सोडणा-या, डोक्याचा खूप वापर करायला लावणा-या अन् काही बाबतीत विकृत चित्रपटांमुळे खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. डेव्हिड लिन्च इथे कार्यकारी निर्माता म्हणून हजर आहे, पण त्याच्या चित्रपटांमधलं मेटाफिजिकल चक्रव्यूह इथे पाहायला मिळत नाही. इथे कोडं आहे, पण ते अधिक सोपं, शोधण्याजोगं उत्तर असलेलं.
`सर्व्हेलन्स` हा जेनिफर लिन्चचा दुसरा चित्रपट. २००८मधला. पहिला ' बॉक्सिंग हेलेना ' १९९३मध्ये बॉक्स आँफिसवर आपटल्यावर चिक्कार विश्रांती घेऊन आलेला. अर्थात हेलेनाच्या अपयशाला प्रेक्षकांनाही जबाबदार धरता येणार नाही. प्रेमकथेच्या गोंडस नावाखाली आपल्या प्रिय व्यक्तीचं अपहरण करून तिचे हात पाय तोडणा-या डॉक्टरची गोष्ट कोणाला पाहायला आवडेल? हेलेना वरून हे स्पष्ट झालं की लिन्चकडून त्याच्या मुलीने घेतलेल्या गुणांमध्ये `वादग्रस्तता, धक्कातंत्र अन् विकृतीचा अंश` यांचा निश्चित समावेश आहे. आपल्या दुस-या चित्रपटातही तिने या गोष्टी कायम ठेवल्या आहेत. मात्र निदान आता आशयात सिम्बॉलिझमचा आव आणला जात नाही. सर्व्हेलन्स हा क्राइम थ्रिलर आहे, अन् त्या लेबलाखालीच तो दाखविला जातो.
एकाच घटनेकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन मांडणा-या चित्रपटांचा मूळ पुरूष म्हणजे अकिरा कुरोसावाचा राशोमॉन (१९५०). `सर्व्हेलन्स`देखील त्याच्या अनेक वंशजांपैकी आहे. मात्र एका महत्त्वाच्या फरकासह. हा फरक कोणता ते आपण नंतर पाहू.
राशोमॉन प्रमाणेच इथे एक गुन्हा अन् संबंधित साक्षीदारांनी आपल्या आठवणीतून दिलेली, कधी मेळ बसणारी, तर कधी न बसणारी स्पष्टीकरणं असा कथानकाचा मूळ आकार आहे.
घटनास्थळ आहे ते अमेरिकेतल्याच एका वैराण भागातलं छोटेखानी गाव अन् त्याच्या हद्दीत येणारा गाडीरस्ता. होणारा गुन्हा हा दोन मुखवटाधारी गुन्हेगारांनी पसरवलेल्या जाळ्याचाच एक भाग आहे, पण चित्रपट सुरू होताना तो आधीच घडून गेलाय, आदल्या दिवशी. साक्षीपुरावे तपासण्यासाठी गावात आलेत एफ.बी.आय.चे दोन अधिकारी. सॅम हॅलोवे (बिल पुलमन) आणि एलिझाबेथ अ‍ॅन्डरसन (ज्युलिआ ओरमान्ड). पोलीस स्टेशनवर तिन्ही साक्षीदार कडेकोट बंदोबस्तात आहेत. एक आहे पोलीस ऑफिसर जॅक बेनेट (केन्ट हार्पर) ज्याच्या पार्टनरचा कालच्या घटनेत बळी गेलाय. दुसरी आहे ड्रग अ‍ॅडिक्ट तरुणी बॉबी प्रेस्कॉट (पेल जेम्स) जिचा मित्र मारला गेलाय; तर शेवटची साक्षीदार आहे स्टेफनी (रायन सिम्पकिन्स) जिचं पूर्ण कुटुंबच तिला अंतरलंय.
साक्षीदारांना वेगवेगळ्या खोल्यांत बसवलं जातं अन् प्रश्नोत्तरं सुरू होतात. आता चित्रपट प्रत्यक्ष गुन्हा अन् पोलीस स्टेशन यांच्यात मागे पुढे जायला लागतो. सत्य समोर यायला लागतं.
राशोमॉन अन् सर्व्हेलन्समधल्या वरवर सारख्या वाटणा-या क्लृप्तीत फरक आहे, तो चित्रपटाला काय सांगायचं याचा. राशोमॉन प्रेक्षकांना चार पूर्णपणे वेगळ्या आवृत्त्या दाखवितो आणि त्यातली कोणती आवृत्ती खरी घडली याकडे निर्देश करत नाही, कारण त्याला भाष्य करायचं ते ` सत्य ` या संकल्पनेवर. कुरोसावाच्या मते सत्य हे व्यक्तिगत आहे. प्रत्येकजण कोण आहे अन् कुठल्या जागेवरून घटनांकडे पाहतोय यावर त्याची आवृत्ती अवलंबून आहे, त्या त्या व्यक्तीपुरती खरी.
याउलट सर्व्हेलन्समध्ये आवृत्त्यांत पडणारा फरक हा वरवरचा, अन् केवळ जबान्यांमध्ये दिसणारा आहे. सत्य काय आहे हे चित्रपट जाणतो. प्रेक्षकांपुढे दिसणारा फ्लॅशबॅक प्रत्यक्ष घटना जशी घडली तशी दाखवितो. त्यामुळे इथे राशोमॉनसारखा तात्त्विक मुद्दा उपस्थित होत नाही, तर केवळ या विशिष्ट कथानकापुरतं त्याचं स्थान राहतं.
चाणाक्ष प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे चांगला एक्सरसाइज आहे. चित्रपटात एक रहस्य आहे, जे शेवटाकडे उघड केलं जातं, मात्र साधारण पहिली पंधरा वीस मिनिटं आपण लक्ष देऊन चित्रपट पाहिला, तर काय असेल ते स्पष्ट करणा-या अनेक गोष्टी आपल्यालाही दिसून येतात. ` संशय न येणारी व्यक्तीच गुन्हेगार` हा नियम लावून ओळखता येणा-या रहस्यभेदापेक्षा अधिक समाधान देणारं आहे.
मला सर्व्हेलन्स दोन गोष्टींसाठी अधिक आवडला. एक म्हणजे त्याच्या पटकथेत फाफटपसारा पूर्णपणे टाळलेला आहे. दोन दिवसांत दोन ठिकाणी काही तासांच्या कालावधीत घडणा-या यातल्या घटना आहेत. चित्रपट केवळ त्या घटनांकडे लक्ष देतो. त्यासाठी तो पार्श्वभूमी तयार करण्याच्या फंदात पडत नाही. कथेचे धागेदोरे घटनेच्या स्थलकालाच्या चौकटीबाहेर जाऊ देत नाही, शेवटानंतरही तो घटनांना काही कॉन्टेक्स्ट देण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याचं कॉम्पॅक्ट/बंदीस्त असणं आणि अखेरपर्यंत राहणं, हे प्रेक्षकांवर पडणा-या प्रभावाच्या दृष्टीने फायद्याचं आहे.
दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे दोन दिवसांतल्या दृश्य भागात साधलेला फरक. पोलीस स्टेशनमध्ये घडणारं कथानक हे जवळजवळ रिअल टाइम, म्हणजे प्रत्यक्षात घडायला लागणा-या वेळाइतकाच वेळ पडद्यावर घेऊन केल्याचा आभास आणणारं आहे. ते पात्रांच्या आठवणींशी संबंधित नसल्याने त्याला एक त्रयस्थ दृष्टिकोन आहे. त्याची दृश्यशैली साधी आहे. दृश्य चौकटींचा वापर हा छोट्या पोलीस स्टेशनातली थोडी अडचणींची, सामानाने भरलेली जागा अशा पद्धतीने दाखविण्यासाठी करण्यात येते, की जो आदल्या दिवसाच्या निवेदनशैलीशी विरोधाभास साधणारा अन् शेवटाकडे वातावरणातल्या क्लास्ट्रोफोबिया वाढवत नेणारा आहे. याउलट आदल्या दिवसाचं, म्हणजे गुन्ह्यांचं चित्रण हे जरी घटना घडल्या तशा दाखवणारं असलं, तरी ते त्या त्या पात्राच्या साक्षीसोबत उलगडत जातं. त्यामुळे ते उलगडताना विशिष्ट व्यक्तिरेखेला साजेसा टिन्ट,कलर, लेन्सेस यांचा वापर दिग्दर्शिकेने केला आहे. जो हे चित्रण पोलीस स्टेशनपेक्षा खूपच वेगळं ठरवतो. इथले मोकळे रस्ते, ढगांनी भरलेलं आकाश, दृश्य चौकटींचा भव्यपणा हादेखील दोन निवेदनांतला वेगळेपणा अन्डरलाईन करतो.
एवढं असूनही मी म्हणेन की सर्व्हेलन्स सर्वांना पाहायला आवडणार नाही. तो जे दाखवतो यापेक्षा जे सूचित करतो ते अधिक अस्वस्थ करणारं आहे. त्यादृष्टीने पाहता पोलीस स्टेशनवरचा शेवटचा प्रसंग खूपच त्रासदायक आहे. या प्रकारची वर्णनं यापूर्वी बेस्टसेलर लिस्टवर मिळणा-या सिडनी शेल्डन सारख्या लोकप्रिय कादंबरीकारांच्या पुस्तकातून येऊन गेली आहेत, मात्र वाचणं वेगळं अन् प्रत्यक्ष पाहणं वेगळं.
सर्व्हेलन्सचा शेवट गुन्हेगारांनी दाखविलेल्या माफक दयाबुद्धीवर होतो. मात्र त्याला सुखांत म्हणणं फारसं योग्य ठरणार नाही. अमेरिकन स्मॉल टाऊन्सच्या शांत आवरणाखाली दडलेली विकृती अन् हिंसा हे डेव्हिड लिन्चच्या चित्रपटात अनेकदा येणारं सूत्र. इथे त्यातला सामाजिक व मानसशास्त्रीय विचार न येता केवळ त्याचं प्रकटीकरण दिसून येतं. मात्र इतपत सुधारणा ही कदाचित जेनिफर लिन्चला एक दिशा मिळाल्याचीही ही खूण असेल. अर्थात लिन्चचा पुढचा चित्रपट म्हणजे मल्लिका शेरावत स्टारर `हिस्स...`, ही आपल्या नागिन टाईप चित्रपटाची अमेरिकन आवृत्ती प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना, तिच्याविषयी कोणतंही सकारात्मक विधान करणं, हे आज तरी एक धाडसच ठरेल.

-गणेश मतकरी.

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP