`द फाईव्ह ऑबस्ट्रक्शन्स` - उसनं पारतंत्र्य

>> Sunday, September 5, 2010


कलावंत हा ख-या अर्थाने स्वतंत्र असू शकतो का? रसिकांची दाद, ही त्याच्या दृष्टीने आवश्यक नसेल, अन् आपली कला ही केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवण्याची त्याची इच्छा नसेल, तर उघडंच नाही. कारण एकदा का आपण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद गृहीत धरला की, तो कलावंताच्या कार्यपद्धतीमध्ये, त्याच्या कलासाधनेमागच्या विचारात या ना त्या प्रकारे अडथळे निर्माण करू शकतो. त्याची कला जितकी अधिक लोकाभिमूख, तितकी त्याच्यावरची बंधनं वाढण्याची शक्यता. केवळ रसिकांच्याच नव्हे, तर समाजाचा, राजकीय परिस्थितीचा, त्याच्या विशिष्ट कलासाधने संबंधातल्या परंपरांचा असा वेगवेगळा विचार करणं मग या कलावंताला भाग पडतं, अन् मग त्याच्या कलेच्या स्वरूपात बदल संभवू शकतो. मात्र एखाद्या कलावंतानेच जर दुस-या ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंताच्या कलाविष्कारावर बंधनं घालायची ठरवली तर ? या बंधनातून निर्माण होणारा आविष्कार कसा असेल? तो कलाकार या बंधनांचाच सकारात्मक उपयोग करून घेऊ शकेल, का या मर्यादांच्या ओझ्याखाली दबून जाईल? डेनिश चित्रपट दिग्दर्शक लार्स व्हॉन ट्रायर आणि त्याचा एके काळचा गुरू यर्गन लेट यांनी केलेला `द फाईव्ह ऑबस्ट्रक्शन्स`(२००३) नावाचा प्रयोग यातल्या काही प्रश्नांची उत्तरं नक्की देऊ शकेल.
स्वैराचार आणि बंधनं या दोन्हींचं लार्स व्हॉन ट्रायरला वावडं नाही. सर्व नियम झुगारणारे एपिडेमिक, ब्रेकिंग द व्हेव्हज किंवा अ‍ॅन्टीक्राईस्ट सारखे चित्रपट बनवणारा आणि त्याचबरोबर शुद्घ सिनेमाच्या शोधात दिग्दर्शकांवर अनेक प्रकारची बंधने घालणा-या डॉगमे स्कूलचा कर्ता असणारा ट्रायर कायमच वादाच्या छायेत राहिलेला आहे. इथे त्याने बंधनात अडकवण्यासाठी योर्गन लेट आणि त्याची १९६७मध्ये गाजलेली शॉर्ट फिल्म `द परफेक्ट ह्यूमन` यांची निवड केली आहे.
`द फाईव्ह ऑबस्ट्रक्शन्स` मागची कल्पना खास आहे. परफेक्ट ह्यूमन ही ट्रायरची आवडती फिल्म. फिल्म म्हणजे एका विशिष्ट काळाच्या संवेदना अन् संकेताला जागणारी एक पुरूष अन् एक बाई यांचा वावर तसंच त्यांचं, त्यांच्या शरीराचं, स्वतंत्रपणे अन् एकत्रितपणे वागण्याचं, त्रयस्थपणे एखाद्या प्रायमरमधे शोभेलसं केलेलं हे वर्णन, व्यक्तीला जवळजवळ वस्तूप्रमाणे भासवणारं. हा झाला मुक्त कलाविष्कार. अर्थात त्या काळाच्या अन् संस्काराच्या चौकटीतला. आता ट्रायरला तो बदलून टाकायचा आहे. बदललेली गोष्ट चांगलीच असावी ही त्याची इच्छा नाही, अपेक्षाही नाही. मात्र या बदलातून काय नवीन घडेल, हे त्याला पाहायचंय. ऑबस्ट्रक्शन्सच्या निमित्ताने ट्रायरने निवृत्त आयुष्य जगणा-या लेटला पाचारण केलं अन् त्याच्यासमोर एक आव्हान ठेवलं. परफेक्ट ह्यूमन पुन्हा बनवायची. ती देखील एकदा सोडून पाच वेळा. प्रत्येकवेळी ट्रायर काही अटी घालेल. त्या अटी, ती बंधनं लेटला पाळावीच लागतील. ट्रायर अन् लेट मधली ही चर्चा इथे आपल्याला प्रत्यक्ष दिसते. अनियोजित, जशी घडली तशी प्रत्यक्ष चित्रित केलेली. परफेक्ट ह्यूमनचा थोडा भागही दाखविला जातो. आणि मग आव्हानाचा पहिला टप्पा सुरू होतो. अटी घातल्या जातात. पहिल्या फिल्ममधल्या कोणत्याही शॉटची लांबी बारा फ्रेम्सहून (अर्ध्या सेकंदाहून) अधिक असू नये. तिचं चित्रण क्युबामध्ये, कोणत्याही कृत्रिम नेपथ्याशिवाय केलं जावं. मूळ फिल्ममध्ये निवेदकाने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं इथे दिली जावीत. इत्यादी. ट्रायर मिश्किलपणे हसून दाखवतो, लेट विचारात पडतो, आणि आपण या प्रयोगात गुंतायला लागतो.
ऑबस्ट्रक्शन्सची रचना ही तशी अगदी साधी आहे. दोन चित्रकर्त्यांमधली चर्चा, लेटने केलेली थोडी पूर्वतयारी, मग प्रत्यक्ष फिल्म पहाणं (त्या दोघांबरोबरच आपणही) तिच्यावर ट्रायरची रिअ‍ॅक्शन, अन् चक्र पुढे चालू, असा काहीसा हा प्रकार आहे. मात्र प्रेक्षकाला, अगदी सामान्य प्रेक्षकापासून चित्रपंडितांपर्यंत प्रत्येकालाच त्यात घेण्यासारखं बरंच आहे. ट्रायर अन् लेट या दोघांमधली चर्चा, त्यांचे फिल्ममेकिंगबद्दलचे विचार, ट्रायरने ठरविलेले पेच, अन् त्यावर लेटने शोधलेली उत्तरं, त्यासंबंधी त्यांनी केलेले युक्तीवाद अन् घातलेले वाद इतका भागदेखील स्वतंत्रपणे आपल्या विचारांना खाद्य पुरविणारा आहे. यातून त्यांचे दृष्टिकोन त्यांच्या विचारांची पद्धत स्पष्ट होते. अर्ध्या सेकंदाचे शॉट वापर, जगातल्या सर्वात वाईट ठिकाणी पण प्रत्यक्षात जागा न दाखवता फिल्म चित्रित कर ( ही जागा म्हणजे मुंबईतील वेश्यावस्ती! ) अ‍ॅनिमेशनचा वापर कर, याप्रकारच्या नियमांमधून आपल्याला चित्रपटाचं स्वरूप किती प्रकारच्या तपशीलांवर अन् दिग्दर्शकीय नियंत्रणावर अवलंबून असतं हे दिसून येतं.
प्रत्यक्ष फिल्म्सदेखील स्वतंत्रपणे पहाण्यासारख्या आहेत. एकच रचना, एकच ढोबळ विषय, एकच दिग्दर्शक असूनही इतर बदलत्या घटकांमुळे चित्रपट किती बदलतो हे पहाण्यासारखं आहे. गंमत म्हणजे यात सर्वाधिक , अन् सर्वात कठीण बंधनं ही पहिल्या खेपेला घातली जातात, जी सर्व फिल्म्समध्ये सर्वोत्कृष्ट अन् मूळ दृष्टिकोनाशी सर्वात प्रामाणिक झाली आहे. कोणत्याही बंधनाशिवाय, चित्रित केलेल्या, अन् स्प्लिट स्क्रीन्स सारख्या अधिक अद्ययावत क्लृप्त्यांचा, श्रीमंती निर्मितीमुल्यांचा वापर केलेल्या फिल्म नं. ३पेक्षाही ही अधिक स्पष्टपणे व्यक्त होणारी आहे. मग याचा अर्थ कलावंतांवरची बंधनं ही त्याला अधिक सर्जनशील बनवतात असा काढावा का ? जर कलावंताने या बंधनाला मर्यादा न मानता त्यांचा सकारात्मक नजरेने विचार केला तर निश्चितच. मग हे उसनं पारतंत्र्यदेखील त्याच्या कलेला वाकवू शकत नाही. उलट त्याच्यासाठी अनेक नवी दारं उघडू पाहतं.

-गणेश मतकरी.

2 comments:

sushama September 6, 2010 at 3:21 AM  

अरे काय अफलातून चित्रपट शोधून काढतोस तू ? the way magnate attracts iron unique films get attracted to u :-) हा तर मोठ्या स्क्रीनवरच बघायला हवा.

ganesh September 9, 2010 at 7:55 AM  

That's an interesting idea. Anyway, ideally one would always prefer the large screen,but we have such a limited choice there....

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP