चित्रपट चांगला कधी असतो? तो बनवणा-यांचा हेतू चांगला असणं ,त्याला चांगला ठरवायला पुरेसं आहे का? इतर चित्रपट त्याहून वाईट ,किंवा थिल्लर असणं ,त्याला आपसूक चांगला बनवतात का? चित्रपट एखाद्या गंभीर आशयाभोवती गुंफलेला असणं ,त्याला कलाकृती म्हणून चांगलं ठरवतं का? त्याचं बॉक्स आँफिसवरलं यश? माझ्या मते यातली कोणतीही एक वा एकत्रितपणे सर्व गोष्टीदेखील चित्रपटाला चांगलं सिध्द करण्यासाठी पुरेशा नाहीत. हे खरं आहे, की यातली कोणती ना कोणती गोष्ट आपल्याला आवडू शकते ,आणि आपल्यापुरती या चित्रपटाची किंमत खूपच वाढवू शकते. मात्र अशा वेळी या चित्रपटाकडे अधिक चौकसपणे आणि वैयक्तिक आवडिनिवडीपलीकडे जाऊन पाहाणं ,हे आपल्याला चित्रपटाचा दर्जा पूर्णपणे जोखायला मदत करतं.
याच वर्षी मी एक बंगाली फिल्म पाहिली, चॅप्लीन नावाची. आपण चॅप्लीन सारख्या एका अत्यंत बुध्दिवान आणि बुध्दिवादी दिग्दर्शकाची -नटाची , जी एक हसू आणि आसूच्या संगमावरली ढोबळ प्रतिमा करुन ठेवली आहे ,तिला तोड नाही. हा अनिन्दो बॅनर्जी दिग्दर्शित चित्रपटदेखील याच प्रतिमेला पिळणारा होता. यात व्हरायटी एन्टरटेनमेन्ट शोमधे माईमसारखा पांढरा रंग चेह-याला फासून ( हे का कळलं नाही, मूकपटात काम करणारा नट काही माईम नसतो) स्लॅपस्टिक करत चॅप्लिन साकारणारा एक गरीब ( आणि अर्थात बिचारा) माणूस असतो. त्याचा एक सात वर्षांचा मुलगा असतो. पुढे या माणसाचे स्लॅपस्टिक विनोद आणि मुलाला ब्रेन ट्यूमर वा तत्सम आजार होईपर्यंत दुर्दैवाचे दशावतार, आळीपाळीने येतात. गंमत म्हणजे ही अतिशय कॅलक्युलेटिव आणि भडक फिल्मदेखील प्रेक्षकाना आवडली. सामान्य प्रेक्षकालाच नाही, तर विचार करु शकणा-या प्रेक्षकालादेखील, कारण माझ्याबरोबर प्रेक्षकात काही जाणकार दिग्दर्शकही होते ,जे या फिल्मच्या बाजूने हिरीरीने बोलत होते. का, तर चॅप्लिन आणि दु:ख यांचं घिसंपिटं, पण प्रगल्भतेचा आव आणणारं मिश्रण.असो ,चॅप्लीनची प्रतिमा आणि कडू गोड कथानक याच संकल्पनांवर आधारीत ’बर्फी’ ,या ’चॅप्लिन’च्या तुलनेत मास्टरपीसच आहे. पण 'तुलनेत' ,स्वतंत्रपणे नाही.
बर्फी पाहाताना मला पहिला प्रश्न हा पडला ,की ’बर्फी’ला चॅप्लीनच्या प्रतिमेची गरज का पडावी.( बंगाल्यांना चॅप्लिनचं काय प्रेम?) राज कपूरच्या डोळ्यापुढली ट्रँपची प्रतिमा ही मुळात चॅप्लिनने प्रेरित होती, त्यामुळे हा चॅप्लिनबरोबर राज कपूरची आठवण जागवण्याचाही प्रयत्न आहे, हे उघड आहे. मात्र ,हा हिशेब सोडल्यास फार काही कारण दिसत नाही. एक तर चॅप्लिनचा काळ मूकपटांचा असला तरी त्याची ट्रँप व्यक्तिरेखा मूक नाही. त्यामुळे त्या दृष्टिने होणारं जोडकाम अपुरं आहे. तरीहि हे गिमिक मी चालवून घेतलं असतं जर ते टेक्शचरली चित्रपटाबरोबर जात असतं . म्हणजे पूर्ण चित्रपट त्या प्रकारे हाताळला जाता ,तर.तसं काही होत नाही . सुरुवातीची थोडी पळापळ ,सिटी लाईट्सच्या ओपनिंग सिक्वेन्सवरुन घेतलेला अधिकृत चॅप्लिन होमेज मानण्याजोगा पुतळ्याचा प्रसंग आणि मधेच चिकटवल्यासारखे येणारे इन्स्पेक्टरबरोबरचे ( सौरभ शुक्ला) काही प्रसंग सोडता बर्फी चॅप्लिनसारखा वागत नाही.चित्रपटही इतर वेळा स्लॅपस्टिक वापरत नाही. मग हा अट्टाहास कशाला?
बर्फी सुरू झाल्यावर काही वेळात मला वाटायला लागलं ,की आपल्यापर्यंत हा पोचतच नाही आहे. ते काय सांगतायत ते कळतंय पण ते केवळ सांगितलं जातय. पडद्यावर उलगडताना दिसत नाही.एकतर चित्रपटाच्या वर्तमानात चालू होउन मागे जाण्यात , आणि वर स्लॅपस्टिक कसरतीत ,या व्यक्तिरेखा उभ्या करायला त्याला वेळ होईना . पुढे भूतकाळात थोडंफार सेटल झाल्यावरही व्यक्तिचित्रणाचा आनंदच होता. म्हणजे पहा, आपण श्रुती (इलेना डी'क्रूज) गावात आल्यावरच्या बर्फीबरोबरच्या ( रणबीर कपूर) पहिल्या भेटीतली गंमत , मग पुढे तिला त्याचं अपंगत्व समजणं वगैरे समजू शकतो , पण मग गाणी सुरू होतात आणि प्रकरण एकदम चुंबनदृश्य आणि लग्नाच्या मागणी पर्यंत पोचतं. म्हणजे किती ही प्रगती ! तीदेखील आजच्या काळातली नाही ,तर चाळीसेक वर्षांपूर्वीची. ही प्रगती, त्यातून एक आधीच लग्न ठरलेली नॉर्मल मुलगी आणि बोलता वा ऐकता न येऊ शकणारा मुलगा यांच्या नात्यातली प्रगती ,जी कदाचित एका पूर्ण चित्रपटाचा विषय होऊ शकेलशी प्रगती कशी झाली ,ही अजिबात न दिसताही आपण गृहीत धरावी असं चित्रपट सांगतो. का ? कोणाला माहीत.
बरं ,तेवढ्याने भागत नाही. आता तो एक रहस्यमय गोष्ट सांगायला घेतो ,ज्यात एका आँटिस्टिक मुलीचं, झिलमिलचं (प्रियांका चोप्रा) अपहरण आहे . हे रहस्य मुळात इतकं फुटकळ आहे ( आणि कास्टिंगच्या निर्णयाने तर ते रहस्य उरलेलंच नाही) की त्यात थोडी गुंतागुंत करण्यासाठी गोष्ट तीन कालावधींमधे मागेपुढे जायला लागते. तरीही रहस्य पारदर्शकच राहातं हे सोडा.आता ’बर्फी’ एक नवं प्रकरण सुरू करतो जे दाखवणं पहिल्या प्रेमप्रकरणाहूनही अधिक कठीण आहे. तो बर्फी आणि झिलमिलच्या जुजबी मैत्रीचं विश्वासात, गहि-या मैत्रीत आणि अखेर प्रेमात रुपांतर झालेलं दाखवायचं ठरवतो. स्ट्रॅटेजी तीच. काही जुजबी प्रसंग घालायचे आणि गाणी घालत राहायचं.
म्हणजेच दोन अशी नाती ,जी बरीचशी शब्दांवाचून तयार होणं आवश्यक आहे ,ती तयार झाल्याचं गाण्यांच्या ,म्हणजे शब्दांच्याच मदतीने आपल्याला सांगितलं जातं. या सा-याला उत्तम छायाचित्रणाची, रणबीर कपूर आणि प्रियांकाच्या उत्तम , आणि इलेना डिक्रूजच्या सहज अभिनयाची , ब-यापैकी गाण्यांची साथ आहे, पण हे सारं ही नाती बनताना दिसण्याची जागा घेउ शकेल का? मला वाटतं नाही.
थोडक्यात ,चित्रपट जिथे वेळ काढायचा तिथे काढत नाही, आणि फुटकळ रहस्याला नॉन लिनिअर ट्रिटमेन्ट देण्यात घालवतो. दिग्दर्शक अनुराग बसूचा एकूण अप्रोचच मला असा साध्या गोष्टी उगाच कॉम्प्लिकेटेड करण्याचा ,आणि महत्वाच्या गोष्टी बाजूला टाकण्याचा दिसतो. उदाहरणार्थ बर्फी हे नाव. आता हे नाव सरळ गोड वाटल्याने दिलं असं असू शकतं, पण नाही. त्याला एक बॅकस्टोरी. आईचा रेडिओ, मर्फी हे नाव, आईचा मृत्यू ,रेडिओ आणि मुका यामधला विरोधाभास, बोलता न आल्याने बर्फी हा उच्चार....वगैरे ,पण श्रुती बर्फीच्या प्रेमात कशी पडली यासारख्या पटकथेसाठी महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर? काहीच नाही.
नॉन लिनिअर कथानकांना स्वत:ची एक शिस्त असते. ते कधी पुढे -मागे जातात याचं एक तर्कशास्त्र असतं. त्याखेरीज विशिष्ट काळात विशिष्ट व्यक्ती अशा अशा दिसतात या प्रकारचे व्हिजुअल क्लूज असतात. (ज्यांना मला काय म्हणायचंय याचं अधिक स्पष्टिकरण हवं असेल त्यांनी मॅकगिगानचा ’विकर पार्क’ पाहावा. दोन वर्षांच्या कालावधीवर पुढे मागे करणारी गोष्ट सांगताना संपूर्ण क्लॅरीटी ठेवणारा हा चित्रपट साध्या रोमँटिक कॉमेडीचं बेमालूमपणे रहस्यपटात रुपांतर करतो.)बर्फी या शिस्तीकडे दुर्लक्ष करतो आणि ब-याचदा पाहाणा-याला गोंधळात पाडतो.
हा निरर्थक रहस्याच्या तपासात गुंतलेला सिनेमा अखेरच्या पंधरा एक मिनिटात मात्र कथानकाचे धागे चांगले बांधतो आणि समाधानकारक शेवटाची इल्युजन तयार करतो.. ’ते सुखानं नांदू लागले' हे मूळ फ्लॅशबॅक डिव्हाइसमधेच उघड असल्याने , या प्रकारचं कठीण नातं ,लग्नानंतर कसं टिकेल हे आपण विचारू शकत नाही. चित्रपट आधी जसा ते ’जमलं’ ,हे सांगतो ,तसाच आताही ,ते ’टिकलं’ असं सांगून मोकळा होतो.
कदाचित हा चित्रपट दिग्दर्शकाने न लिहिता लेखकाकडून लिहून घेतला असता तर फार बरं झालं असतं. दिग्दर्शकाला चमकदार जागा, वा इन्टरेस्टिंग दृश्यरचना सुचतात, वा उसन्या घेता येतात. मात्र पटकथेचा अर्थाच्या दृष्टिने पूर्ण विचार ,तो ब-याचदा करू शकत नाही. क्वचित अनुराग कश्यप किंवा विशाल भारद्वाज सारखा माणूस लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही करू शकतो, पण हा अपवाद, नियम नव्हे.
’बर्फी’ पाहाताना मला तेच वाटलं जे ’रॉकस्टार’ पाहाताना वाटलं होतं. कथानकात शक्यता असताना , आणि रणबीर कपूरसारखा या पिढीचा सर्वोत्तम नट उपलब्ध असताना पटकथेने चित्रपटाचा घात करणं यासारखी वाईट गोष्ट नाही. पण आपली ही रड रोजचीच आहे. हिंदी चित्रपटांच्या पटकथा सुधारतील ही आशा फोल आहे. पण कधीकाळी त्या सुधाराव्या असं वाटत असेल, तर दिग्दर्शकानी सरसकट त्या लिहिणं बंद करणं ,हे सगळ्यात महत्वाचं पाऊल ठरेल.
- गणेश मतकरी
Read more...