न भावलेला बर्फी

>> Monday, September 17, 2012


चित्रपट चांगला कधी असतो? तो बनवणा-यांचा हेतू चांगला असणं ,त्याला चांगला ठरवायला पुरेसं आहे का? इतर चित्रपट त्याहून वाईट ,किंवा थिल्लर असणं ,त्याला आपसूक चांगला बनवतात का? चित्रपट एखाद्या गंभीर आशयाभोवती गुंफलेला असणं ,त्याला कलाकृती म्हणून चांगलं ठरवतं का? त्याचं बॉक्स आँफिसवरलं यश? माझ्या मते यातली कोणतीही एक वा एकत्रितपणे सर्व गोष्टीदेखील चित्रपटाला चांगलं सिध्द करण्यासाठी पुरेशा नाहीत. हे खरं आहे, की यातली कोणती ना कोणती गोष्ट आपल्याला आवडू शकते ,आणि आपल्यापुरती या चित्रपटाची किंमत खूपच वाढवू शकते. मात्र अशा वेळी या चित्रपटाकडे अधिक चौकसपणे आणि वैयक्तिक आवडिनिवडीपलीकडे जाऊन पाहाणं ,हे आपल्याला चित्रपटाचा दर्जा पूर्णपणे जोखायला मदत करतं.
याच वर्षी मी एक बंगाली फिल्म पाहिली, चॅप्लीन नावाची. आपण चॅप्लीन सारख्या एका अत्यंत बुध्दिवान आणि बुध्दिवादी दिग्दर्शकाची -नटाची , जी एक हसू आणि आसूच्या संगमावरली ढोबळ प्रतिमा करुन ठेवली आहे ,तिला तोड नाही. हा अनिन्दो बॅनर्जी दिग्दर्शित चित्रपटदेखील याच प्रतिमेला पिळणारा होता. यात व्हरायटी एन्टरटेनमेन्ट शोमधे माईमसारखा पांढरा रंग चेह-याला फासून ( हे का कळलं नाही, मूकपटात काम करणारा नट काही माईम नसतो) स्लॅपस्टिक करत चॅप्लिन साकारणारा एक गरीब ( आणि अर्थात बिचारा) माणूस असतो. त्याचा एक सात वर्षांचा मुलगा असतो. पुढे या माणसाचे स्लॅपस्टिक विनोद आणि मुलाला ब्रेन ट्यूमर वा तत्सम आजार होईपर्यंत दुर्दैवाचे दशावतार, आळीपाळीने येतात. गंमत म्हणजे ही अतिशय कॅलक्युलेटिव आणि भडक फिल्मदेखील प्रेक्षकाना आवडली. सामान्य प्रेक्षकालाच नाही, तर विचार करु शकणा-या प्रेक्षकालादेखील, कारण माझ्याबरोबर प्रेक्षकात काही जाणकार दिग्दर्शकही होते ,जे या फिल्मच्या बाजूने हिरीरीने बोलत होते. का, तर चॅप्लिन आणि दु:ख यांचं घिसंपिटं, पण प्रगल्भतेचा आव आणणारं मिश्रण.असो ,चॅप्लीनची प्रतिमा आणि कडू गोड कथानक याच संकल्पनांवर आधारीत ’बर्फी’ ,या ’चॅप्लिन’च्या तुलनेत मास्टरपीसच आहे. पण 'तुलनेत' ,स्वतंत्रपणे नाही.
बर्फी पाहाताना मला पहिला प्रश्न हा पडला ,की ’बर्फी’ला चॅप्लीनच्या प्रतिमेची गरज का पडावी.( बंगाल्यांना चॅप्लिनचं काय प्रेम?) राज कपूरच्या डोळ्यापुढली ट्रँपची प्रतिमा ही मुळात चॅप्लिनने प्रेरित होती, त्यामुळे हा चॅप्लिनबरोबर राज कपूरची आठवण जागवण्याचाही प्रयत्न आहे, हे उघड आहे. मात्र ,हा हिशेब सोडल्यास फार काही कारण दिसत नाही. एक तर चॅप्लिनचा काळ मूकपटांचा असला तरी त्याची ट्रँप व्यक्तिरेखा मूक नाही. त्यामुळे त्या दृष्टिने होणारं जोडकाम अपुरं आहे. तरीहि हे गिमिक मी चालवून घेतलं असतं जर ते टेक्शचरली चित्रपटाबरोबर जात असतं . म्हणजे पूर्ण चित्रपट त्या प्रकारे हाताळला जाता ,तर.तसं काही होत नाही . सुरुवातीची थोडी पळापळ ,सिटी लाईट्सच्या ओपनिंग सिक्वेन्सवरुन घेतलेला अधिकृत चॅप्लिन होमेज मानण्याजोगा पुतळ्याचा प्रसंग आणि मधेच चिकटवल्यासारखे येणारे इन्स्पेक्टरबरोबरचे ( सौरभ शुक्ला) काही प्रसंग सोडता बर्फी चॅप्लिनसारखा वागत नाही.चित्रपटही इतर वेळा स्लॅपस्टिक वापरत नाही. मग हा अट्टाहास कशाला?
बर्फी सुरू झाल्यावर काही वेळात मला वाटायला लागलं ,की आपल्यापर्यंत हा पोचतच नाही आहे. ते काय सांगतायत ते कळतंय पण ते केवळ सांगितलं जातय. पडद्यावर उलगडताना दिसत नाही.एकतर चित्रपटाच्या वर्तमानात चालू होउन मागे जाण्यात , आणि वर स्लॅपस्टिक कसरतीत ,या व्यक्तिरेखा उभ्या करायला त्याला वेळ होईना . पुढे भूतकाळात थोडंफार सेटल झाल्यावरही व्यक्तिचित्रणाचा आनंदच होता. म्हणजे पहा, आपण श्रुती (इलेना डी'क्रूज) गावात आल्यावरच्या बर्फीबरोबरच्या ( रणबीर कपूर)  पहिल्या भेटीतली गंमत , मग पुढे तिला त्याचं अपंगत्व समजणं वगैरे समजू शकतो ,  पण मग गाणी सुरू होतात आणि प्रकरण एकदम चुंबनदृश्य आणि लग्नाच्या मागणी पर्यंत पोचतं. म्हणजे किती ही प्रगती !  तीदेखील आजच्या काळातली नाही ,तर चाळीसेक वर्षांपूर्वीची. ही प्रगती, त्यातून एक आधीच लग्न ठरलेली नॉर्मल मुलगी आणि बोलता वा ऐकता न येऊ शकणारा मुलगा यांच्या नात्यातली प्रगती ,जी कदाचित एका पूर्ण चित्रपटाचा विषय होऊ शकेलशी प्रगती कशी झाली ,ही अजिबात न दिसताही आपण गृहीत धरावी असं चित्रपट सांगतो. का ? कोणाला माहीत.
बरं ,तेवढ्याने भागत नाही. आता तो एक रहस्यमय गोष्ट सांगायला घेतो ,ज्यात एका आँटिस्टिक मुलीचं, झिलमिलचं (प्रियांका चोप्रा) अपहरण आहे . हे रहस्य मुळात इतकं फुटकळ आहे ( आणि कास्टिंगच्या निर्णयाने तर ते रहस्य उरलेलंच नाही) की त्यात थोडी गुंतागुंत करण्यासाठी गोष्ट तीन कालावधींमधे मागेपुढे जायला लागते. तरीही रहस्य पारदर्शकच राहातं हे सोडा.आता ’बर्फी’ एक नवं प्रकरण सुरू करतो जे दाखवणं पहिल्या प्रेमप्रकरणाहूनही अधिक कठीण आहे. तो बर्फी आणि झिलमिलच्या जुजबी मैत्रीचं विश्वासात, गहि-या मैत्रीत आणि अखेर प्रेमात रुपांतर झालेलं दाखवायचं ठरवतो. स्ट्रॅटेजी तीच. काही जुजबी प्रसंग घालायचे आणि गाणी घालत राहायचं.
म्हणजेच दोन अशी नाती ,जी बरीचशी शब्दांवाचून तयार होणं आवश्यक आहे ,ती तयार झाल्याचं गाण्यांच्या ,म्हणजे शब्दांच्याच मदतीने  आपल्याला सांगितलं जातं. या सा-याला उत्तम छायाचित्रणाची, रणबीर कपूर आणि प्रियांकाच्या उत्तम , आणि इलेना डिक्रूजच्या सहज अभिनयाची , ब-यापैकी गाण्यांची साथ आहे, पण हे सारं ही नाती बनताना दिसण्याची जागा घेउ शकेल का? मला वाटतं नाही.
थोडक्यात ,चित्रपट जिथे वेळ काढायचा तिथे काढत नाही, आणि फुटकळ रहस्याला नॉन लिनिअर ट्रिटमेन्ट देण्यात घालवतो. दिग्दर्शक अनुराग बसूचा एकूण अप्रोचच मला असा साध्या गोष्टी उगाच कॉम्प्लिकेटेड करण्याचा ,आणि महत्वाच्या गोष्टी बाजूला टाकण्याचा दिसतो. उदाहरणार्थ बर्फी हे नाव. आता हे नाव सरळ गोड वाटल्याने दिलं असं असू शकतं, पण नाही. त्याला एक बॅकस्टोरी. आईचा रेडिओ, मर्फी हे नाव, आईचा मृत्यू ,रेडिओ आणि मुका यामधला विरोधाभास, बोलता न आल्याने बर्फी हा उच्चार....वगैरे ,पण श्रुती बर्फीच्या प्रेमात कशी पडली यासारख्या पटकथेसाठी महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर? काहीच नाही.
नॉन लिनिअर कथानकांना स्वत:ची एक शिस्त असते. ते कधी पुढे -मागे जातात याचं एक तर्कशास्त्र असतं. त्याखेरीज विशिष्ट काळात विशिष्ट व्यक्ती अशा अशा दिसतात या प्रकारचे व्हिजुअल क्लूज असतात. (ज्यांना मला काय म्हणायचंय याचं अधिक स्पष्टिकरण हवं असेल त्यांनी मॅकगिगानचा ’विकर पार्क’ पाहावा. दोन वर्षांच्या कालावधीवर पुढे मागे करणारी गोष्ट सांगताना संपूर्ण क्लॅरीटी ठेवणारा हा चित्रपट साध्या रोमँटिक कॉमेडीचं बेमालूमपणे रहस्यपटात रुपांतर करतो.)बर्फी या शिस्तीकडे दुर्लक्ष करतो आणि ब-याचदा पाहाणा-याला गोंधळात पाडतो.
हा निरर्थक रहस्याच्या तपासात गुंतलेला सिनेमा अखेरच्या पंधरा एक मिनिटात मात्र कथानकाचे धागे चांगले बांधतो आणि समाधानकारक शेवटाची इल्युजन तयार करतो.. ’ते सुखानं नांदू लागले' हे मूळ फ्लॅशबॅक डिव्हाइसमधेच उघड असल्याने , या प्रकारचं कठीण नातं ,लग्नानंतर कसं टिकेल हे आपण विचारू शकत नाही. चित्रपट आधी जसा ते ’जमलं’ ,हे सांगतो ,तसाच आताही ,ते ’टिकलं’ असं सांगून मोकळा होतो.
कदाचित हा चित्रपट दिग्दर्शकाने न लिहिता लेखकाकडून लिहून घेतला असता तर फार बरं झालं असतं. दिग्दर्शकाला चमकदार जागा, वा इन्टरेस्टिंग दृश्यरचना सुचतात, वा उसन्या घेता येतात. मात्र पटकथेचा अर्थाच्या दृष्टिने पूर्ण विचार ,तो ब-याचदा करू शकत नाही. क्वचित अनुराग कश्यप किंवा विशाल भारद्वाज सारखा माणूस लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही करू शकतो, पण हा अपवाद, नियम नव्हे.
’बर्फी’ पाहाताना मला तेच वाटलं जे ’रॉकस्टार’ पाहाताना वाटलं होतं. कथानकात शक्यता असताना , आणि रणबीर कपूरसारखा या पिढीचा सर्वोत्तम नट उपलब्ध असताना पटकथेने चित्रपटाचा घात करणं यासारखी वाईट गोष्ट नाही. पण आपली ही रड रोजचीच आहे.  हिंदी चित्रपटांच्या पटकथा सुधारतील ही आशा फोल आहे. पण कधीकाळी त्या सुधाराव्या असं वाटत असेल, तर दिग्दर्शकानी सरसकट त्या लिहिणं बंद करणं ,हे सगळ्यात महत्वाचं पाऊल ठरेल.
- गणेश मतकरी

25 comments:

lalit September 18, 2012 at 3:20 AM  

lekha tar nehami pramane chhan hotach pan tyattil don mude pharach avadle pahila mahnje chitrapatacha darja baddl che likhan ani tulanattamak master peace ...lekhacha shewat tar apratim ahe patakathakarala pata var shthan milayala haav.

Vivek Kulkarni September 18, 2012 at 7:44 AM  

तुम्ही जे नेहमी म्हणत असता आणि गेल्या कित्येक वर्षात घसा फोडून अन शाई आटवून सांगताय की पटकथा भक्कम करा ते ह्या लोकांच्या लक्षात येत नाहीये कारण स्वतःच्या मर्यादित सर्जनशीलतेवर खुश असणारे आणि कुपमंडूक वृत्तीचे बळी असणारे हे चित्रपटकर्ते दोन आठवड्यात मिळणाऱ्या पैशामुळे आत्मपरीक्षण करायचं विसरलेत. त्यामुळेच एका मागून एक चांगल्या कथानकाचा कचरा होतो.
डर्टी पिक्चर आणि रॉकस्टारच्या वेळी तुम्ही सांभाळलेला संयम या वेळी फटाकदिशी फुटला. या वेळी तुमचा सूर खूपच चिडका आणि नाराजीचा होता खासकरून शेवटच्या दोन परिच्छेदात. तो अगदी टिपेला पोचला होता.

हेरंब September 18, 2012 at 8:20 AM  

बघितला नाहीये अजून. लवकरच बघेन. (आधी विकर पार्क बघतो)..

पहिला संपूर्ण परिच्छेद "चित्रपट चांगला कधी असतो?...." पासून ते ".... चित्रपटाचा दर्जा पूर्णपणे जोखायला मदत करतं." प्रचंड प्रचंड प्रचंड पटला !! बऱ्याच जणांचा हा घोळ शाळा चित्रपटाबाबत झाला होता.

शेवटच्या कळकळीने लिहिलेल्या परिच्छेदाशीही सहमत एक्सेप्ट "रणबीर कपूरसारखा या पिढीचा सर्वोत्तम नट"... या बाबतीत असहमत :)

ganesh September 18, 2012 at 9:33 AM  

Thanks Lalit.

Vivek ,the observations and objections are factual . dont know about the soor.

Heramb, you have a choice between wicker park and L'appartement. L'appartement is the original french film. Park is a remake .

हेरंब September 18, 2012 at 10:22 AM  

Ok. Then L'appartement it is. Thanks Ganesh.

Chaitanya Joshi September 18, 2012 at 1:34 PM  

सगळीकडून बर्फीच कौतुक ऐकत असताना ब्लॉगचं टायटल वाचलं आणि उत्सुकतेनेच वाचायला घेतला. भारी होता ब्लॉग! हे पटकथा किंवा कथेतील जंप्स खरंच आपल्याकडच्या चित्रपटात कायम असतात...:(

या सगळ्यात एकच झालंय..माझी बर्फी बघायची इच्छा जवळपास संपलीय :|

हेरंब September 18, 2012 at 7:08 PM  

गणेश, सर्वप्रथम 'द अपार्टमेंट' सुचवल्याबद्दल प्रचंड धन्स. प्रचंड प्रचंड आवडला.

"नॉन लिनिअर कथानकांना स्वत:ची एक शिस्त असते. ते कधी पुढे -मागे जातात याचं एक तर्कशास्त्र असतं. त्याखेरीज विशिष्ट काळात विशिष्ट व्यक्ती अशा अशा दिसतात या प्रकारचे व्हिजुअल क्लूज असतात." हे अगदी अगदी पटलं. दोन वर्षात काय काय घडू शकतं आणि मुख्य म्हणजे ते किती हुशारीने दाखवता येऊ शकतं याचं उत्तम उदाहरण. अपार्टमेंट बघितल्यानंतर विकर पार्क बघायला घेतला पण तो जवळपास फ्रेम-टू-फ्रेम रिमेक आहे. त्यामुळे बंद केला. आता बर्फी सावकाश बघेन कधीतरी ;)

Anushree Vartak. अनुश्री वर्तक September 18, 2012 at 8:04 PM  

ganesh , liked ur post. fakta
mala asa vatla..ki realtionship evolution dakhavtana director ne je jumps marlet..te actors chya maryada olkhun marlet..
its brilliance in patches because he had limited stock.. ranbir thik ahe..
pan baki doghi nchi acting jem tem ahe..in their scenes ..i kept anticipating the spoilers..those jumps have saved the movie..

ganesh September 18, 2012 at 8:15 PM  

Anushree , your observation is interesting ,though I don't believe that to be the case. directors have a very stong control on the film and even with limited talent, they can bring out the best in the film. I have no doubt about Ranbir's talent. it will keep on proving itself over the time, and I don't see anything in the actresses which will make them so bad they wont be able to handle relationship sequences. they are difficult to conceive but not difficult in terms of acting ,if you think about it.also ,this obviously is a screenplay screw up . if someone would have written the sequences , Basu would have been able to handle them easy.

ganesh September 18, 2012 at 8:37 PM  

Also, another far more obvious thing is that if u have a difficult script, take better actors . not dumb down the script. do u really think removing these crucial episodes actually 'saved' the film?

aativas September 20, 2012 at 4:33 AM  

'बर्फी'चा गाजावाजा ऐकून आश्चर्य वाटायाला लागलं होतं - ते दूर झालं!

Suhas Diwakar Zele September 20, 2012 at 10:35 PM  

शब्दशः सहमत... :) :)

Abhi September 22, 2012 at 10:05 AM  

बर्फी ऑस्करसाठी nominate झालाय !
तुमच्या मते कुठला सिनेमा योग्य होता ?
(just curious)

ganesh September 22, 2012 at 9:26 PM  

Abhi, we have a tradition of sending ordinary films with influential producers who will ultimately have no chance of coming within the final 5. Devdaas, Eklavya, Jeans, Paheli ,even Taaren Zamin Par can be included in the same category as TZP's subject ,though new to us ,was nothing special for academy. the logical first choice this year was Gangs of Wasseypur. a more compromised choice could have been Paan Singh Tomar. Barfi is one of the most idiotic choices. For american committee ,it is just a patchwork of scenes from many films they have seen and a flawed one at that. the only worst choice would have been Eega, a south indian hilarious thriller of hero reincarnating as a CG fly. I can't imagine how that one even made the short list.

Rajesh Pusalkar September 24, 2012 at 8:15 AM  

I saw the movie yesterday. I totally agree with you. I found myself at hand's distance with the movie.Couldn't get involved thoroughly. The technique of flashback-which Gulzar so masterfully uses & weaves the story very well,I found it here so very disconnected.And I thought there were too many co-incidences in the movie.Even in a small city, they both stay together without being noticed & in a big city like Calcutta, Jhilmil doesn't get lost, but safely returns to Muskaan.Shruti & Barfi also manage to bump time & again in to each other. The sequence in which Barfi goes to dance with Shruti & he expects crowd to clap- is difficult for a deaf & mute person to expect. Only saving grace is Priyanka & Ranbir. And Ileana's effortless, natural acting comes as a pleasant surprise. Our Oscar committee considers movies based on some physical illness or disability as a criterion for sending them for Oscars, it seems!

Keyur Seta September 25, 2012 at 9:56 AM  

Dear Ganesh,

I was a part of the audience at the Pratisanvad discussion which got over less than two hours back.

Although you kept saying you don't speak much, whatever you spoke was very interesting.

I just searched your name in Google and landed on your blog. And I must say, it's very interesting indeed. Would surely visit regularly. And I totally agree on your views on Barfi! and also the decision of sending it to Oscars.

Warm regards,

Keyur

lalit September 26, 2012 at 8:43 AM  

You watched Eega movie. I watched this movie because movie release time I was in Hyderabad. South effects made me go there. :) It come in short list. It is very funny decision by our committee. it consist of many non logic concept from starting e.g is the dish tv reflection of light. And agree with the other choice Paan Singh Tomar.

ganesh September 27, 2012 at 5:08 AM  

Thanks Keyur. I thought I had replied your comment but I don't see it here. Anyway, I had some serious public speaking issues a few years ago, and Santosh's comment in the beginning had that reference. still , the push of Prabhat, few lectures in colleges etc has sort of made me better at this stuff. I still speak almost exclusively in complex sentenses and my father has a complain that I use too many English words, but I don't see them as a problem anymore. My Marathi is not as good as it could have been and I prefer to use simple English than difficult Marathi. so there. :)

Lalit ,I assume that you are asking me to see the film Eega which I won't .I have seen the promo and I know exactly what it is. In fact I thought it was a joke till I read that this was an actual film and the makers were very proud of the effects. It is very funny ( unintentionally) and has some seriously bad CG work. I am not sure how or why it was considered but maybe it was not an actual short list but all entries submitted by producers. who knows !

Sachin Powar October 1, 2012 at 5:10 AM  

Nice to see the different perspective and to know what a really good should deliver.
'शाळा', 'देऊळ', वर आपलं मत वाचायला आवडेल :)

ganesh October 1, 2012 at 11:07 AM  

I had written on Deool only as a FB note in English. Don't know if the link can open directly, but you can try .

http://www.facebook.com/notes/ganesh-matkari/deool-a-matter-of-belief/10150375328888999

Did not write on Shaala as it received the national award for best Marathi. I was on the regional jury (Eastern region , not western which includes marathi) for the awards and did not want to express contradictory views.

Sachin Powar October 3, 2012 at 6:59 AM  

Thanks for the facebook link. Liked the note :)
I think 'Shaala' is good in some of the technical aspects but its not a great movie I believe (I know many would differ). Most of the success was nostalgia I feel :)

अमित दत्तात्रय गुहागरकर October 15, 2012 at 10:46 PM  

बर्फी तसा काही ग्रेट सिनेमा नाहीए, पण हल्लीच्या सिनेमांपेक्षा (म्हणजे साउथच्या मारधाड सिनेमांच्या रिमेकच्या लाटेत) निश्चित वेगळा आहे. सिनेमाचं चित्रीकरण छान आहे, संगीतसुद्धा श्रवणीय आहे. सिनेमातील रहस्य मात्र अगदी फुटकळ आहे, या गोष्टीशी सहमत.

Keyur Seta October 15, 2012 at 11:18 PM  

You welcome Ganesh. Your comment is an encouragement because I have some very serious public speaking issues. I can sing in front of a large audience but when it comes to speaking, I don't know what happens to me. Good to see you sharing it honestly.
And it is a good idea to use simple English instead of difficult Marathi.

By the way, when someone mentioned the concept of Eega on FB few months back, eve I thought is was a joke :)

Cheers,

Keyur

ganesh October 16, 2012 at 10:07 PM  
This comment has been removed by the author.
ganesh October 16, 2012 at 10:09 PM  

Amit, I don't subscribe to the 'vasrat langdi gay ' logic, ie if everyone else is bad, then what is borderline ok must be considered good. what is average is average .halli javal javal sarva cinemanchi cinematography changli aste and music is ok as well ,though lifted like everything else. still, if the film doesn't work at it's most crucial levels, it doesn't work for me.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP