प्रिझनर्स , अर्थात ' अपराधी कोण? '

>> Tuesday, November 19, 2013


हाॅलिवुडमधे जशी समर ब्लाॅकबस्टर चित्रपटांचा वर्ग आहे, तसाच एक चांगल्या आशयघन चित्रपटांचाही वर्ग आहे. हे चित्रपट तुलनेने कमी प्रमाणात असले, तरी सामाजिक मूल्यव्यवस्थेवरलं भाष्य, समस्यांची उत्तम मांडणी, सखोल व्यक्तिरेखा अशी अनेक वैशिष्ट्य या चित्रपटांत पाहायला मिळतात. नावाजलेले दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी वेळोवेळी आपल्या लोकप्रिय प्रतिमांना छेद देऊन अशा चित्रपटांवर काम केलेलं दिसतं. आॅस्करच्या नामांकनांमधे या जातीचे बरेच चित्रपट पाहायला मिळतात. यातलाच एक उपप्रकार आहे तो गुन्हेगारीचा वरवरच्या आणि कथनात्मक अंगापलीकडे जाउन विचार करणार््या सिनेमाचा. या सिनेमात गुन्ह्याला महत्व आहे पण ते तो कसा केला वा कुणी केला याचा छडा लावण्यापुरतं मर्यादित स्वरुपाचं नाही. त्याला तो समाजाच्या ज्यावर्गात घडला त्याचा संदर्भ आणून देणं, त्या प्रकारच्या गुन्हेगारीची सार्वत्रिक कारणं शोधण्याचा प्रयत्न करणं, गुन्हेगाराच्या मनाचा माग घेणं वा बळी किंवा गुन्हेगार यांच्या वैचारीक उलाघालीचा तपास करणंं, असे बरेच उद्योग हे चित्रपट करतात.   जोनाथन डेमचा ' द सायल्ेन्स आॅफ द लॅम्ब्स' , डेविड फिंचरचा ' झोडिअॅक', क्लिन्ट इस्टवुडचा 'मिस्टीक रिव्हर' किंवाा बेन अॅफ्लेकचा ' गाॅन बेबी गाॅन' ही अशा चित्रपटांची काही उदाहरणं. दिग्दर्शक डेनिस विलेन्यूवचा ' प्रिझनर्स' या प्रकारातच मोडतो.
प्रिझनर्सची रचना, त्यातले प्रमुख प्लाॅट पाॅईन्ट्स आणि उलगडा पाहाता त्याला 'हूडनीट' (whodunit)च म्हणावं लागेल मात्र त्यतलं रहस्य लगेचच कळलं नाही, ( किंबहुना ते चांगलं असल्याने लक्षात यायला बर््यापैकी वेळ लागतो आणि अनेकांना त्याचा उलगडा चित्रपटाने सांगेपर्यंत न होणंही शक्य आहे) तरीही त्यात रहस्यपट म्हणून ( लक्षात घ्या- रहस्यपट म्हणून, चित्रपट म्हणून नाही) मला एक वीक पाॅईन्ट वाटतो. त्यात गुन्हेगार कोण हे आपल्याला चटकन कळलं नाही तरी कोण गुन्हेगार नाही, हे लक्षात येणं सहज शक्य आहे. याच मार्गावर पुढे विचार केला तर एलिमिनेशनने रहस्यभेद होऊ शकतो मात्र चित्रपटातल्या नाट्याची मदार ही मुळातच रहस्यभेदावर अवलंबून नाही. विषयाचा गडदपणा, परिस्थितीतून उद्भवणार््या गुन्ह्याला समांतर शक्यता आणि व्यक्तिचित्रण ,खासकरून जॅकमन आणि गिलेनाल यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांचं व्यक्तिचित्रण, हे प्रिझनर्सचे स्ट्राँग पाॅईन्ट्स आहेत.
चित्रपट अडीच तासाचा, म्हणजे तसा मोठा आहे, आणि खेळीमेळीच्या वातावरणात किंवा सेट अप वर फार वेळ फुकट न घालवता तो विषयाला तो अगदी लगेचच हात घालत असल्याने त्यातला तणावाचा भागही खूपच मोठा आहे. त्यात काही भाग व्हायलन्ट निश्चितच आहे पण तो अनावश्यक आहे असं कोणालाही म्हणता येणार नाही.
डोव्हर आणि बर्च या दोन कुटुंबात चांगली मैत्री. थँक्सगिव्हींगला एकमेकांच्या घरी जाण्याची पध्दत. यंदाही केलर ( ह्यू जॅकमन) आणि ग्रेस ( मारिआ बेलो) डोव्हर, आपल्या  मुलांसह फ्रँकलिन ( टेरेन्स हाॅवर्ड) आणि नॅन्सी ( वियोला डेव्हिस) बर्च कडे जाऊन पोचतात . मोठी मंडळी गप्पात रंगली असताना आणि मोठी मुलं टिव्ही पाहात असताना अॅना आणि बर्च कुटुंबातली धाकटी जाॅय ,कुठेतरी निसटतात. लवकरच लक्षात येतं की त्या नाहीशा झालेल्या. पोलिसांना बोलावलं जातं. डिटेक्टिव लोकी ( जेक गिलेनाल) प्रकरणाचा ताबा घेतो.  संशय येतो तो त्या सुमारास या भागात असलेल्या अॅलेक्स ( पाॅल डानो) या तरुणावर. पण अटक केल्यावर लक्षात येतं की बिचार््याची बौध्दिक वाढ बेताची, दहाएक वर्षाच्या मुलाएवढी आहे आणि असा योजनाबध्द गुन्हा तो करणं शक्य नाही. मात्र यावर केलरचा विश्वास बसत नाही. पोलिसांना जमलं नाही ते तो स्वतः करुन दाखवायचं ठरवतो आणि कबुलीजबाब मिळवण्यासाठी स्वतःच अॅलेक्सचं अपहरण करतो.
प्रिझनर्समधे दोषी / निर्दोषी किंवा न्याय/ अन्याय या संकल्पनांशी केलेला खेळ आहे. या संकल्पनांचा सांकेतिक विचार काय पध्दतीने केला जातो आणि ती व्याख्या परिपूर्ण आहे का असा विचार चित्रपट करतो. अॅलेक्स घटनास्थळी उपस्थित होता हे खरं पण तो अपराधी असल्याचा कोणताही पुरावा नाही. तरीही केलरच्या मते तो गुन्हेगार आहे. त्याने कबुलीजबाब दिलेला नाही, मात्र त्याने काय फरक पडतो, तो त्याच्याकडून वदवून घेता येणं शक्य नाही का? मुलींची वेळेत सुटका करणं हा केलरचा हेतू म्हंटलं तर योग्यच, पण वेळ जातो तसा हा हेतूही निमित्तमात्र होत जातो, आणि केलरचं वागणं टोकाला, नियंत्रणापलीकडे जातं. अॅलेक्स जर निर्दोष असेल, तर केलरलाच गुन्हेगार म्हणायला हरकत नाही, आणि खरं तर अॅलेक्स दोषी असला तरीही त्यामुळे केलरचं वागणं जस्टीफाय होत नाही. दोषाचं प्रत्यारोपण करुन दहशतवादी भूमिका स्वीकारणं आणि 'बळी तो कान पिळी' या न्यायाने कमकुवत घटकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं हे अमेरिकेचं नवं युध्दविषयक धोरण आपल्याला केलरची वागणूक पाहून आठवणं हे सहज शक्य आहे,  आणि अर्थातच हा योगायोग नसावा.
केलर आणि लोकी या यातल्या सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखा. आणि त्यांच्यातला तोल हाच खरा चित्रपटाचा तोल. मूळ अपहरणाच्या घटनेतलं नाट्य, त्यानंतरचा भावनिक संघर्ष, टाॅर्चर सारख्या भडक होण्याची शक्यता असणार््या घटना या सगळ्यामुळे चित्रपट मेलोड्रॅमॅटीक होण्याची शक्यता खूपच होती. ती टळते ती केलरची व्यक्तिरेखा खूपच तपशीलात रंगवल्याने.   सध्या हाॅलिवुडमधे अनेक नट असे आहेत जे पूर्ण फॅन्टॅस्टिक ते पूर्ण वास्तववादी अशा रेंजच्या भूमिका  सारख्याच गंभीरपणे उभ्या करतात. टोबी मॅग्वायर, डॅनीएल क्रेग, राॅबर्ट डाउनी ज्यु. अशी अनेक नावं घेता येतील. ह्यू जॅकमन हे त्यातलंच महत्वाचं नाव. एक्स-मेन मधे कोणत्याही संकटाला लीलया तोंड देणार््या वुल्वरीनचा माज केलरमधे नावालाही दिसत नाही. दोन्ही भूमिकांमधे हिंसा अंगभूत असली, तरी हा अभिनेता ज्या पध्दतीने पटकथेच्या मागणीला रिअॅक्ट होतो, ते संपूर्णपणे विरुध्द टोकांचं म्हणता येईल. ही भूमिका पूर्ण ग्रे शेड्समधली आहे , आणि केलरचं पात्रं पुढल्या भागात अधिकाधिक गडद होत जातं. असं असतानाही जॅकमन त्याच्याबद्दलची आपली सहानुभूती शाबूत ठेवतो. त्याची असहायता आपल्यापर्यंत पोचवतो.
लोकी हे गिलेनालच्या व्यक्तिरेखेचं नाव त्याच्या लो की परफाॅर्मन्सचं सूचक वाटण्यासारखं आहे. अशा रहस्यकथांमधे व्यक्तिरेखांची वजनं सामान्य कथानकांपेक्षा वेगळीच असतात. डिटेक्टीवचं पात्र स्वतःकडे खूप महत्व घेतं मात्र ते प्रत्यक्ष नाट्याला जबाबदार नसून केवळ काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणारं, बरचसं ब्लॅन्ड असतं.  त्यामुळेच होम्स पासून पाॅयरोपर्यंत डिटेक्टीव्जची सर्व पात्र ही खास चमत्कृतीपूर्ण रंगवली जातात. त्यांच्या मध्यवर्ती भूमिका या कंटाळवाण्या होणार नाहीत हे पाहाण्याचा हा प्रयत्न असतो. लोकी असा विक्षिप्तपणा बरोबर घेऊन येत नाही. तो सामान्य, गरजेपुरतं बोलणारा, पण अतिशय सेन्सिबल आणि हुशार इन्वेस्टिगेटर आहे. त्याचं तसं असणं हे पटकथेतल्या केलरच्या पात्राला काउंटरपाॅईन्ट देतं. कथेला वास्तवाशी बांधून ठेवतं. गिलेनाल हे पूर्णपणे आेळखतो. तो हिरो होण्याचा प्रयत्न करत नाही. जॅकमनचा केलर आणि गिलेनालचा लोकी पूर्ण चित्रपटाची दिशा, त्याचा फोकस ठरवतात आणि टिकवून धरतात. सर्वच उत्तम परफाॅर्मन्समधे हे दोघं खास चमकतात. आॅस्करला यातल्या एकाची किंवा दोघांचीही वर्णी लागणं सहज शक्य आहे.
किंबहुना या दोघांची, कशाला, आॅस्कर वाॅचमधे रस असणार््यांनी हा चित्रपट लक्षात ठेवावा. त्यातली इतर नावंही स्पर्धेत राहाण्याची खूप शक्यता आहे.
-  गणेश मतकरी 

Read more...

द अॅक्ट आॅफ किलिंग- असाही एक कलावंत

>> Monday, November 11, 2013


एका सामान्य वस्तीतल्या दुमजली घराची गच्ची. मध्यमवर्गीय. नवी मंुबई किंवा पुण्याच्या उपनगरांत चालून जाईल अशा प्रकारची, पण इंडोनेशिआतली. गच्चीचा काही भाग उघडा, काही भागावर छप्पर टाकलेलं. एक काटकुळासा माणूस आपल्याला काहीतरी सांगतोय. आपल्याला म्हणजे हा माहितीपट बनवणार््या दिग्दर्शकाला. माणूस तसा वृध्द, पण चपळ. सांगताना त्याच्या चेहर््यावर एक प्रकारचा अभिमान. आपल्या कर्तुत्वाचा, आपल्या हुशारीचा. तो आपल्याला सांगतोय, ते आपल्या इतर सहकार््यांबरोबर तो माणसं कशी मारायचा, ते.
पहिले काही दिवस ते लोकांना बेदम मारत असत, मरेस्तवर. म्हणजे खरच मरेस्तवर. अतिशयोक्ती नाही. पण या पध्दतीचा खूप त्रास होता. सगळीकडे रक्त, मग ते साफ करणं मुश्कील. मग या माणसाने त्यावर एक तोडगा काढला.
वृध्दाच्या चेहर््यावर त्याचा हुशारीबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसतो. गच्चीच्या एका बाजूला एक लोखंडी खांब आहे, तिथे तो आपल्याला नेतो. मग एक लांबलचक तारेचं भेंडोळं काढतो. त्याच्या एका बाजूला छोटंसं लाकडी फळकूट. मग तो आपल्या एका माणसाला प्रात्यक्षिकात मदत करण्यासाठी बोलावतो. या मदतनीसाच्या चेहर््यावरही आपल्या बाॅसच्या कर्तुत्वाचं कौतुक आहेच. तो आनंदाने खांबाला टेकून खाली बसतो. तारेचं एक टोक खांबाला बांधलं जातं, मग मदतनीसाच्या गळ्याभोवती गुंडाळलं जातं. मग वृध्द ते फळकूट दोन्ही हातात पकडून खेचल्याचा अभिनय करतो. पाहिलंत? स्वच्छ मृत्यू. तारेने गळा आवळून. उगाच कचरा नको. एफिशिअन्सी महत्वाची. इतक्या लोकांना मारायचं तर एफिशिअन्सी ही हवीच, नाही का?
ही डाॅक्युमेन्टरी आहे जोशुआ ओपनहायमरची 'द अॅक्ट आॅफ किलिंग'. इन्डोनेशिआमधे, १९६५/६६ च्या सुमारास लाखांच्या घरात कम्युनिस्टांच्या राजकीय कारणासाठी हत्या करणार््या काही कर्तबगार मारेकर््यांवर हा आज टाकलेला प्रकाशझोत. मघाच्या वर्णनातला वृध्द यांमधलाच एक. आजही राजकीय वजन टिकून असलेलं हे नाव. म्हणतात, की त्याने व्यक्तिशः हजार माणसांना मारलं. बर््याच जणांना तारेने गळा आवळून, पण इतर मार्गही होते.
जेनोसाईड हा विषय आजकाल इतक्या अंगानी इतक्या चित्रपटांमधून पाहायला मिळतोय की त्या विषयाचीच भीती वाटावी. पूर्वी केवळ गंभीर पातळीवर केलेलं ( लाईफ इज ब्युटीफूल सारखे क्वचित अपवाद वगळता) नाझी क्रौर्याचं चित्रण चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात दाखवलं. आजही, हाॅलोकाॅस्टला या विषयात स्थान आहेच, पण 'एक्स मेन मालिका , एन्डर्स गेम' सारखे मुलांना , नवतरुणांना डोळ्यासमोर ठेवून केलेले चित्रपट, 'होमलँड, २४' सारख्या रहस्य/ अॅक्शन प्रधान मालिका, 'द अॅक्ट आॅफ किलिंग' सारखी या संकल्पनेतल्या विसंगती, विक्षिप्तपणा समोर आणणारी डाॅक्यूमेन्टरी, हे सारं पाहिलं, की जेनोसाईड हा विषय प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे किती सार्वत्रिक परिणाम करुन राहीलाय हे जाणवतं.
' द अॅक्ट आॅफ किलिंग' हे एक अजब रसायन आहे. प्रथमदर्शनी हा माहितीपट  राजकीय हत्याकांडाकडे पाहाण्याचा संपूर्ण त्रयस्थ दृष्टीकोन निवडतो. यातले मारेकरी, प्रामुख्याने अन्वर आणि आदि झुलकाद्री हे स्वतःला मुळातच गुन्हेगार मानत नाहीत. त्यांचा मूळ उद्योग सिनेमा तिकिटांचा काळा बाजार करण्याचा. राजकीय घडामोडींनी त्यांना  मारेकरीपदी  बढती मिळाली आणि ती यांनी स्वीकारली. ज्या निर्वीकारपणे ते तिकिटं ब्लॅक करत होते, त्याच निर्विकारपणे त्यांनी लोकांचे गळे आवळायला सुरुवात केली. ओपनहायमर कुठेतरी हा निर्वीकारपणा पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि तो निर्विकारपणा हाच या सार््या प्रकरणातला सर्वात अंगावर येणारा भाग आहे.
हे लोक स्वतःला गुन्हेगार समजत नाहीत. एक प्रकारचे योध्दे समजतात. आपल्या कामाचा, आपण पसरवलेल्या दहशतीचा त्यांना अभिमान आहे. दिग्दर्शक या अभिमानाचा  फायदा घेतो आणि या मंडळीना त्यांची धाडसी कारकिर्द पडद्यावर आणायला सांगतो. किंबहुना त्यांना हे सारं पुन्हा अभिनीत करण्यासाठी, चित्रीत करण्यासाठी प्रोत्साहन देतो. एका बाजूने भयंकर गुन्हेगारी वास्तव आणि दुसर््या बाजूने गँगस्टरपटात शोभण्यासारखी, थोडी या खुन्यांच्या आठवणीतून अवतरलेली आणि थोडी त्यांच्या चित्रपटप्रेमाने प्रभावित झालेली ,त्यांनीच रंगवलेली दृश्य अशा दोन रुळांवरुन या माहितीपटाची  गाडी आलटून पालटून जाते.
चित्रपटाचं दिग्दर्शन आणि माहितीपटाचं दिग्दर्शन यात फरक आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन हे खूप तपशिलात जाऊन ठरवणं आणि त्याबरहुकूम जसंच्या तसं करणं शक्य असतं. माहितीपटाचं दिग्दर्शन थोडं अनप्रेडिक्टेबल असतं. त्यात मांडल्या जाणार््या विचारांची दिशा ठरवणं हे यातलं प्रमुख दिग्दर्शन. या विशिष्ट माहितीपटाच्या बाबतीत तर ते करणं ही तारेवरची कसरत करण्याइतकंच कठीण म्हणावं लागेल. इथे अन्वरच्या सहकार््यांत  १९६५/६६ च्या घटनांबद्दल वेगवेगळे दृष्टीकोन पहायला मिळतात. काहिंना त्यांचा अभिमान वाटतो, काहिंना ते चुकलं असं वाटतं, काहिंना या माहितीपटात सामील होणंच पटत नाही. चित्रकर्त्यांना इथे असणारा धोका तर दुहेरी स्वरुपाचा आहे. एकतर त्यातला विचार योग्य पध्दतीने पोचतो आहे की नाही हा, आणि दुसरा अधिक थेेट. अखेर ज्यांनी हजारो माणसं मारली आहेत, त्यांना आणखी पाच दहा माणसानी काय फरक पडणार!
चुकीच्या गोष्टींचं ग्लोरीफिकेशन हा चित्रपटात नेहमीच आढळणारा एक मोठा प्रश्न आहे. एखाद्या कृत्याचा ,वागणुकीचा, वृत्तीचा कथानकात निषेध करायचा मात्र प्रत्यक्षात मिळणारा स्क्रीन टाईम, तिच्या चित्रणात आलेली नाट्यपूर्णता, सहभागी कलावंतांचं ग्लॅमर या गोष्टींमुळे त्या कृत्याला, वागणुकीला, वृत्तीला प्रसिध्दीच द्यायची असं चित्रपटांत बर््याचदा होतं. या माहितीपटांत जरी परिचित चेहरे नसले तरी त्यातली खलपुरुषांना आपली भूमिका मांडू देण्याची, आणि नंतर त्यांच्या 'फिल्म विदिन फिल्म' डिव्हाईसमधे त्यांना ते सादर करायला लावण्याची कल्पना ही भलत्या दृष्टीकोनाला उठाव देण्याची शक्यता तयार करते. त्यातून अन्वर हे खरोखरच वेधक व्यक्तिमत्व आहे, गोदारच्या मिशेलपासून टेरेन्टिनोच्या व्हिन्सेन्ट व्हेगापर्यंत कॅरीज्मॅटिक गँगस्टरांच्या परंपरेत बसणारं. मात्र 'अॅक्ट आॅफ किलिंग'चा आलेख असं ग्लोरीफिकेशन होऊ देत नाही. तो या मंडळींच्या गुन्ह्यांचं गांभीर्य त्यांच्या वागण्यातला, त्यांच्या रिएनॅक्टमेन्टमधला विक्षिप्तपणा दाखवतानाही शाबूत ठेवतो.
सामान्यतः माहितीपटांत (अपवाद वगळता) चित्रण दिसतं ते वास्तववादी स्वरुपातलं. मात्र इथलं चित्रण थोडं तर््हेवाईक आहे. त्याचे विविध प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो अगदी नेहमी दिसणारा, प्रत्यक्ष जीवनदर्शनातून येणारा वास्तववाद. यात मुलाखती, चर्चांसारखा भाग असल्याने,  चित्रपटाच्या वैचारिक कसरती याप्रकारात दिसतात.
 दुसरा प्रकार आहे तो चित्रकर्त्यांकडून मॅनिप्यूलेट झालेल्या वास्तवाचा. हे उघड आहे की दिग्दर्शकाची भूमिका अन्वर आणि कंपनीचं कौतुक करणारी नाही. मात्र ती तशी असल्याचा आभास त्याने अन्वर आणि कंपनीला गाफिल ठेवण्यासाठी निर्माण केला आहे. या आभासाचाच एक भाग म्हणून या गुन्हेगारांनाच त्यांच्या गुन्ह्याचं कल्पित चित्रण करायला लावण्याचा घाट घातला जातो जो चित्रकर्त्यांच्या इन्टरफिअरन्सशिवाय शक्य नाही. म्हणजे हे वास्तव असलं, तरी सोयीस्करपणे बदललेलं वास्तव आहे.
 तिसरा प्रकार आहे तो फँटसीचा, कॅमेरात पकडलेल्या हत्या आणि मारेकरी बनवत असलेल्या कथित चित्रपटीय दृश्यांचा. हा भाग खूपच गडद आणि आपल्याला एक वेगळा विचार करायला लावणारा आहे. या दुष्टांवरचा प्रभाव जर चित्रपटांचाच असेल, तर आजवर आपण चित्रपटांच्या आविष्कारस्वातंत्र्याच्या बाजूने बोलत होतो त्यात तथ्य ते काय ? सारीच माणसं चित्रपटांच्या प्रभावाखाली असतात , पण वाईट माणूस या प्रभावाचा वापर अधिक प्रभावीपणे करतो असं तर हा माहितीपट सांगत नाही?
मी 'द अॅक्ट आॅफ किलिंग' पाहून चांगलाच अस्वस्थ आलो. हे संपूर्ण नाटक असेल का? ओपनहायमरच्या डोक्यातून आलेलं काहीतरी त्याने खर््याखोट्याच्या सरमिसळीतून मांडलं असेल का? पण तसं असल्यास त्याचा पुरावा मला मिळाला नाही. त्यावर लिहीलं, बोललं गेलेलं सारं, हे सारं खरं असल्याचं गृहीत धरणारं आहे. एखाद्या चित्रपटाइतकं चमत्कृतीपूर्ण असलं तरीही. म्हणतात ना, 'ट्रुथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन', त्यातलाच प्रकार !
-गणेश मतकरी

Read more...

शाळेच्या दिवसातला सिनेमा

>> Sunday, November 3, 2013



परवाच मी माझ्या नववीतल्या मुलीला विचारलं, तुला ' चेन्नई एक्सप्रेस बघायचाय का?'
तो लागला तेव्हा मी पाहिला नव्हता आणि तिनेही तो पाहाण्याची इच्छा प्रदर्शित केली नव्हती, ती एस आर के ची बर््यापैकी फॅन असूनही ! सध्या मी ठरवलय की निदान तो एक माहिती म्हणून पाहायचा. अधिकृतपणे टिका करायची, तर ते करावंच लागतं. मी आपलं सरळपणे तिलाही विचारलं, की मी पाहायचा विचार करतोय, तर तुला पाहायचाय का? तिने माझ्या डोक्याची शंका आल्यासारखं माझ्याकडे पाहिलं, आणि म्हणाली, ' नाऊ व्हाय वुड आय वाॅन्ट टु डू दॅट?' माझ्या कलाविचाराबद्दल शंका उपस्थित होऊनही, ती या प्रकारचा रोखठोक विचार करु शकते याचा मला आनंद झाला हे वेगळं सांगायला नको. मी शाळेत असताना इतपत सरळ विचार करायचो का, हे मला सांगता येणार नाही.
शाळेतल्या दिवसात सर्वांप्रमाणेच माझ्यावरही खूप काॅन्ट्रॅडिक्टरी प्रभाव होते हे आठवतं, ज्या सगळ्यांचीच मला माझी मतं बनवायला काही प्रमाणात मदत झाली. सर्वात मोठा प्रभाव होता, तो हिंदी चित्रपटांचा. का कोण जाणे, पण या पाहाण्यात काही सुसूत्रता नव्हती. टिव्हीवर जुने आणि थिएटर्समधे नवे चित्रपट सरसकट पाहिले जायचे. लागतील तसे, म्हणजे माझ्या आठवणींप्रमाणे तरी त्यात काही आवडीनिवडीचा भाग असेलसं वाटत नाही. टिव्हीवर फार चाॅईस नव्हताच . शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी. मराठी सिनेमा मी जुना किंवा तमाशाविषयी नसलेला असला, तर पाहायचो. तमाशाविषयीचे सांगत्ये एेका, पिंजरा वगैरे मी तेव्हा बघितलेत, पण बहुधा या प्रकारच्या चित्रपटांचा मला कंटाळा होता. मला जुने एेतिहासिक, किंवा राजा परांजपे/गोसावी मंडळींचे सिनेमे आवडायचे. प्रभातचेही तुकारामपासून कुंकूपर्यंत अनेक सिनेमे ते व्हा मी आवडीने पाहिले. हिंदी मात्र मुख्यतः स्टार्सच्या जोरावर पाहिले जायचे. बाबाही टिव्ही वरल्या सिनेमातला हा बघ, तो नको वगैरे सांगायचे. त्यांनी सांगितलेल्या सिनेमांमधले मधुमती पासून पेडगावचे शहाणेपर्यंत अनेक चित्रपट क्लासिक्स म्हणण्यासारखे होते.
थिएटर्समधले सिनेमे, ही आईची मक्तेदारी होती. तिला हिंदी सिनेमे आवडायचे. त्यामुळे मला आणि सुप्रियाला ते पाहायला मिळायचे. बाबा काही विशेष वेगळ्या आणि शक्यतर इंग्रजी चित्रपटाना न्यायचे. आणि क्वचित फिल्म सोसायटीतल्या चित्रपटांनाही. माझ्या आजोबांचा हाॅलिवुड आणि काही प्रमाणात जागतिक चित्रपटांचा चांगला अभ्यास होता. ते सांगायचे खूप. त्यांच्याबरोबर चित्रपटाला गेल्याचं मात्र आठवत नाही. (म्हणजे त्यांनी नेल्याचं. पुष्कळ पुढे, मी आर्किटेक्चरला असताना पपा - ताई , म्हणजे माझे आजोबा -आजी, यांच्याबरोबर मी आणि पल्लवीने ' सायलेन्स आॅफ द लॅम्ब्ज' पाहिल्याचं आठवतय. )पपांबरोबर पुस्तकप्रदर्शनांना फिरणं मात्र खूप होत असे. पुढे प्रत्येक पुस्तक प्रदर्शनाला जाण्याची माझी आवड त्यातनच तयार झाली.
मी कधीच हुशार विद्यार्थी कॅटेगरीत नव्हतो, माझी बहीण सुप्रिया त्यातली होती.  हा वेल नोन फॅक्ट होता. त्यामुळे मी डाॅक्टर इंजिनीअर होईनशी कोणाची अपेक्षाही नव्हती. त्यामुळे मला वाचणे , सिनेमे ,नाटकं पाहाणे याला भरपूर वेळ असायचा. या दिवसांतला एक सिनेमा आवडता म्हणून शाॅर्टलिस्ट करणं खरोखर कठीण आहे. मात्र करायचाच तर मी गुरु दत्त चा 'प्यासा' करीन.
अशी शक्यता आहे, की कोणाला ही आवड 'इन रेट्रोस्पेक्ट' वाटेल. म्हणजे मला हा चित्रपट पुढे आवडायला लागला, पण मी शाळेत असताना तो पाहिल्याने मी आवड तेव्हाची म्हणतोय असं काहीतरी. थिएटर्समधे अमिताभचे नवे आणि टिव्हीवर राज कपूर , किशोर कुमार, शम्मी कपूरचे जुने सिनेमे सतत पाहायला मिळत असताना हा गंभीर सिनेमा का आवडेल, असं वाटू शकतं, पण पार्श्वभूमी सांगितली ती त्यासाठीच.
टिव्हीवर पाहिला तेव्हाही 'प्यासा' तसा जुनाच होता.  बघण्याआधी बाबांनी त्यविषयी सांगितलं होतं. त्यातली गाणी तर माहित होतीच. पण जेव्हा मी तो पाहायला बसलो, तेव्हा त्यातल्या वातावरणाने माझा पूर्ण ताबा घेतला. त्याची गोष्ट, त्याला पूरक काहीसं गुदमरुन टाकणारं वातावरण, संवाद आणि गाणी यानी नेहमीच्या हिंदी फिल्म्सपलीकडलं काहीतरी पाहायला, एेकायला मिळाल्यासारखं झालं. तेव्हा मी जो गुरु दत्तचा फॅन झालो तो कायमचाच. नंतर मी त्याचा टिव्हीवरला एकही सिनेमा सोडला नाही. नंतर एका महोत्सवात, त्याचे बाकी सारे सिनेमेही पाहून घेतले. माणूस जिनीअस खराच. त्याच्या अकाली मृत्यूने त्याने आपल्या चित्रपटांचं कधी भरुन न निघणारं नुकसान केलं.
पुढल्या काळात मी स्वतःला या माध्यमाविषयी थोडंफार स्वशिक्षित करुन घेतलं. पण त्यामुळे माझं या चित्रपटाविषयीचं मत बदललं नाही. मला प्यासा ला मोठं बनवण्यातले इतर वाटेकरी निश्चित दिसून आले. झपाटणार््या वातावरणामागचा प्रमुख हात असलेले छायाचित्रकार  व्ही के मूर्ती, लेखक अब्रार अल्वी, गाण्यांना जबाबदार साहिर लुधियानवी आणि एस डी बर्मन, आणि इतरही. मात्र त्यामुळे माझा गुरु दत्त विषयीचा आदर कमी झाला नाही. कारण याच काळात मला दिग्दर्शकाचं महत्वही समजलं होतं.
 चित्रपट हे टीम वर्क आहे. लेखक किंवा चित्रकार त्यांची कला एकट्याच्या कर्तुत्वावर उभी करतात. तसा चित्रपट उभा करणं हे एकट्यादुकट्याचं काम नाही. चित्रपट अनेक घटकांचा बनलेला असतो. सुटे घटक उत्तम असून उपयोग नसतो. चित्रपटाचा परिणाम साधायचा तर हे घटक सांधणारा, या घटकांना त्याच्या स्वतंत्र मूल्यांपलीकडे नेऊन वेगळ्या उंचीवर पोचवणारा दिग्दर्शक हवा असतो हेही माझ्या लक्षात आलं होतं.
आज प्यासा बघताना मला काही गोष्टी माहीत आहेत, काही जाणवतात.  गुरु दत्तच्या खर््या आयुष्यातल्या शोकांतिकेची छाया चित्रपटावर पडलेली दिसत राहाते, काही ठिकाणी ( विशेषतः ' जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहाँ है' गाण्यासारख्या काही जागांवर) त्याचं थोडं प्रीची, थोडं भडक होणं जाणवतं, प्यासाचा शेवट काही प्रमाणात प्रेस्टन स्टर्जेसच्या 'सलीवन्स ट्रॅवल्स' वर आधारीत असल्याचंही मला माहीत आहे. परंतु जादुगाराच्या युक्त्या माहीत असणं वेगळं आणि त्याच्या नजरबंदीपासून आलीप्त राहाणं वेगळं. प्यासा बघताना आजही मी असा आलिप्त राहू शकत नाही. गुरु दत्तची जादूच अखेर प्रभावी ठरते.
निदान शाळेतल्या दिवसातली माझी ही एक आवड तरी अगदी योग्य होती, असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो.
 - गणेश मतकरी.

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP