शाळेच्या दिवसातला सिनेमा

>> Sunday, November 3, 2013



परवाच मी माझ्या नववीतल्या मुलीला विचारलं, तुला ' चेन्नई एक्सप्रेस बघायचाय का?'
तो लागला तेव्हा मी पाहिला नव्हता आणि तिनेही तो पाहाण्याची इच्छा प्रदर्शित केली नव्हती, ती एस आर के ची बर््यापैकी फॅन असूनही ! सध्या मी ठरवलय की निदान तो एक माहिती म्हणून पाहायचा. अधिकृतपणे टिका करायची, तर ते करावंच लागतं. मी आपलं सरळपणे तिलाही विचारलं, की मी पाहायचा विचार करतोय, तर तुला पाहायचाय का? तिने माझ्या डोक्याची शंका आल्यासारखं माझ्याकडे पाहिलं, आणि म्हणाली, ' नाऊ व्हाय वुड आय वाॅन्ट टु डू दॅट?' माझ्या कलाविचाराबद्दल शंका उपस्थित होऊनही, ती या प्रकारचा रोखठोक विचार करु शकते याचा मला आनंद झाला हे वेगळं सांगायला नको. मी शाळेत असताना इतपत सरळ विचार करायचो का, हे मला सांगता येणार नाही.
शाळेतल्या दिवसात सर्वांप्रमाणेच माझ्यावरही खूप काॅन्ट्रॅडिक्टरी प्रभाव होते हे आठवतं, ज्या सगळ्यांचीच मला माझी मतं बनवायला काही प्रमाणात मदत झाली. सर्वात मोठा प्रभाव होता, तो हिंदी चित्रपटांचा. का कोण जाणे, पण या पाहाण्यात काही सुसूत्रता नव्हती. टिव्हीवर जुने आणि थिएटर्समधे नवे चित्रपट सरसकट पाहिले जायचे. लागतील तसे, म्हणजे माझ्या आठवणींप्रमाणे तरी त्यात काही आवडीनिवडीचा भाग असेलसं वाटत नाही. टिव्हीवर फार चाॅईस नव्हताच . शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी. मराठी सिनेमा मी जुना किंवा तमाशाविषयी नसलेला असला, तर पाहायचो. तमाशाविषयीचे सांगत्ये एेका, पिंजरा वगैरे मी तेव्हा बघितलेत, पण बहुधा या प्रकारच्या चित्रपटांचा मला कंटाळा होता. मला जुने एेतिहासिक, किंवा राजा परांजपे/गोसावी मंडळींचे सिनेमे आवडायचे. प्रभातचेही तुकारामपासून कुंकूपर्यंत अनेक सिनेमे ते व्हा मी आवडीने पाहिले. हिंदी मात्र मुख्यतः स्टार्सच्या जोरावर पाहिले जायचे. बाबाही टिव्ही वरल्या सिनेमातला हा बघ, तो नको वगैरे सांगायचे. त्यांनी सांगितलेल्या सिनेमांमधले मधुमती पासून पेडगावचे शहाणेपर्यंत अनेक चित्रपट क्लासिक्स म्हणण्यासारखे होते.
थिएटर्समधले सिनेमे, ही आईची मक्तेदारी होती. तिला हिंदी सिनेमे आवडायचे. त्यामुळे मला आणि सुप्रियाला ते पाहायला मिळायचे. बाबा काही विशेष वेगळ्या आणि शक्यतर इंग्रजी चित्रपटाना न्यायचे. आणि क्वचित फिल्म सोसायटीतल्या चित्रपटांनाही. माझ्या आजोबांचा हाॅलिवुड आणि काही प्रमाणात जागतिक चित्रपटांचा चांगला अभ्यास होता. ते सांगायचे खूप. त्यांच्याबरोबर चित्रपटाला गेल्याचं मात्र आठवत नाही. (म्हणजे त्यांनी नेल्याचं. पुष्कळ पुढे, मी आर्किटेक्चरला असताना पपा - ताई , म्हणजे माझे आजोबा -आजी, यांच्याबरोबर मी आणि पल्लवीने ' सायलेन्स आॅफ द लॅम्ब्ज' पाहिल्याचं आठवतय. )पपांबरोबर पुस्तकप्रदर्शनांना फिरणं मात्र खूप होत असे. पुढे प्रत्येक पुस्तक प्रदर्शनाला जाण्याची माझी आवड त्यातनच तयार झाली.
मी कधीच हुशार विद्यार्थी कॅटेगरीत नव्हतो, माझी बहीण सुप्रिया त्यातली होती.  हा वेल नोन फॅक्ट होता. त्यामुळे मी डाॅक्टर इंजिनीअर होईनशी कोणाची अपेक्षाही नव्हती. त्यामुळे मला वाचणे , सिनेमे ,नाटकं पाहाणे याला भरपूर वेळ असायचा. या दिवसांतला एक सिनेमा आवडता म्हणून शाॅर्टलिस्ट करणं खरोखर कठीण आहे. मात्र करायचाच तर मी गुरु दत्त चा 'प्यासा' करीन.
अशी शक्यता आहे, की कोणाला ही आवड 'इन रेट्रोस्पेक्ट' वाटेल. म्हणजे मला हा चित्रपट पुढे आवडायला लागला, पण मी शाळेत असताना तो पाहिल्याने मी आवड तेव्हाची म्हणतोय असं काहीतरी. थिएटर्समधे अमिताभचे नवे आणि टिव्हीवर राज कपूर , किशोर कुमार, शम्मी कपूरचे जुने सिनेमे सतत पाहायला मिळत असताना हा गंभीर सिनेमा का आवडेल, असं वाटू शकतं, पण पार्श्वभूमी सांगितली ती त्यासाठीच.
टिव्हीवर पाहिला तेव्हाही 'प्यासा' तसा जुनाच होता.  बघण्याआधी बाबांनी त्यविषयी सांगितलं होतं. त्यातली गाणी तर माहित होतीच. पण जेव्हा मी तो पाहायला बसलो, तेव्हा त्यातल्या वातावरणाने माझा पूर्ण ताबा घेतला. त्याची गोष्ट, त्याला पूरक काहीसं गुदमरुन टाकणारं वातावरण, संवाद आणि गाणी यानी नेहमीच्या हिंदी फिल्म्सपलीकडलं काहीतरी पाहायला, एेकायला मिळाल्यासारखं झालं. तेव्हा मी जो गुरु दत्तचा फॅन झालो तो कायमचाच. नंतर मी त्याचा टिव्हीवरला एकही सिनेमा सोडला नाही. नंतर एका महोत्सवात, त्याचे बाकी सारे सिनेमेही पाहून घेतले. माणूस जिनीअस खराच. त्याच्या अकाली मृत्यूने त्याने आपल्या चित्रपटांचं कधी भरुन न निघणारं नुकसान केलं.
पुढल्या काळात मी स्वतःला या माध्यमाविषयी थोडंफार स्वशिक्षित करुन घेतलं. पण त्यामुळे माझं या चित्रपटाविषयीचं मत बदललं नाही. मला प्यासा ला मोठं बनवण्यातले इतर वाटेकरी निश्चित दिसून आले. झपाटणार््या वातावरणामागचा प्रमुख हात असलेले छायाचित्रकार  व्ही के मूर्ती, लेखक अब्रार अल्वी, गाण्यांना जबाबदार साहिर लुधियानवी आणि एस डी बर्मन, आणि इतरही. मात्र त्यामुळे माझा गुरु दत्त विषयीचा आदर कमी झाला नाही. कारण याच काळात मला दिग्दर्शकाचं महत्वही समजलं होतं.
 चित्रपट हे टीम वर्क आहे. लेखक किंवा चित्रकार त्यांची कला एकट्याच्या कर्तुत्वावर उभी करतात. तसा चित्रपट उभा करणं हे एकट्यादुकट्याचं काम नाही. चित्रपट अनेक घटकांचा बनलेला असतो. सुटे घटक उत्तम असून उपयोग नसतो. चित्रपटाचा परिणाम साधायचा तर हे घटक सांधणारा, या घटकांना त्याच्या स्वतंत्र मूल्यांपलीकडे नेऊन वेगळ्या उंचीवर पोचवणारा दिग्दर्शक हवा असतो हेही माझ्या लक्षात आलं होतं.
आज प्यासा बघताना मला काही गोष्टी माहीत आहेत, काही जाणवतात.  गुरु दत्तच्या खर््या आयुष्यातल्या शोकांतिकेची छाया चित्रपटावर पडलेली दिसत राहाते, काही ठिकाणी ( विशेषतः ' जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहाँ है' गाण्यासारख्या काही जागांवर) त्याचं थोडं प्रीची, थोडं भडक होणं जाणवतं, प्यासाचा शेवट काही प्रमाणात प्रेस्टन स्टर्जेसच्या 'सलीवन्स ट्रॅवल्स' वर आधारीत असल्याचंही मला माहीत आहे. परंतु जादुगाराच्या युक्त्या माहीत असणं वेगळं आणि त्याच्या नजरबंदीपासून आलीप्त राहाणं वेगळं. प्यासा बघताना आजही मी असा आलिप्त राहू शकत नाही. गुरु दत्तची जादूच अखेर प्रभावी ठरते.
निदान शाळेतल्या दिवसातली माझी ही एक आवड तरी अगदी योग्य होती, असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो.
 - गणेश मतकरी.

3 comments:

Ayub Attar November 5, 2013 at 11:26 PM  

प्यासा उत्तम आहे हे सर्वमान्य आहे , पण येथे आम्हाला तुमच्या नजरेतून बगायचं आहे . नहेमी सारखा लेख वाटत नाही .

ganesh November 6, 2013 at 5:36 AM  

nehmisarkha nahich ahe .
This was written for s post on my school group. so it is not really analytical. its more like a memory.

Abhijit Bathe January 25, 2014 at 2:32 AM  

Good to see you without your "critic" glasses and to know that you were no differne than the scores of other movie buffs. One of your better articles! Wish all others were as easy to read as this one!!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP