पीके- सफाईदार म्हणायचा इतकच !

>> Monday, December 22, 2014



स्पॉयलर वॉर्निंग- मला वाटतं आता पीकेच्या विषयात काही रहस्य उरलेलं नाही. तरीही त्याचा विषय , किंवा विषयापेक्षाही पार्श्वभूमी आपल्या चित्रपटांसाठी नवी असल्याने जर तुम्ही पाहिला नसाल तर नं वाचलेलं उत्तम. कारण इथे प्रचंड प्रमाणात स्पॉयलर आहेत.

राजकुमार हिरानी हा सध्याच्या अत्यंत सफाईदार ( चांगल्या अर्थानेच, पण ...) आणि व्यवसायिक वर्तुळातल्या चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट पहाताना कंटाळा येत नाही. तुम्ही कथेला बांधलेले रहाता. विपुल परकीय संदर्भ असले तरी ते हुशारीने लपवले जातात आणि सामान्यत: प्रेक्षक खूष होईल हे पाहिलं जातं. बहुतेकदा काही सामाजिक आशयही मांडला जातो. त्याच्या पहिल्या दोन चित्रपटांत सफाईबरोबर एक स्पॉन्टेनिईटी होती. काहीतरी नवंच आपण पाहातोय असा भास होता. थ्री इडिअट्समधे तो कुठेसा हरवला. चित्रपटामागची मेहनत, पटकथेतली जुळवाजुळव जाणवायला लागली. तरीही, इडिअट्समधे हे चालून गेलं. सारं ओळखीचं असलं  तरी पाहाताना त्यात उस्फूर्तपणा वाटत होता. शिवाय आधीच्या चित्रपटांइतका नसला, तरी  पटकथेचा दर्जा हा खूपच चांगला होता. सर्व व्यक्तिरेखांना पुरेसे लक्षवेधी ट्रॅक्स, फ्लॅशबॅक्सचा चांगला वापर आणि उत्तम गाणी हे तर होतच. परफॉर्मन्स हा बोनस. तोही सर्वांचा तुल्यबल. अगदी शर्मन जोशीपासून करीना कपूर पर्यंत. या तीन उत्तम चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर पीके निराशा करतो, हे वेगळं सांगायला नको.
मला पीकेची थोडी आधीपासून काळजी होती. मागे एका मुलाखतीत आमिर खानला पीके व्यक्तिरेखेच्या विस्फारलेल्या डोळ्यांचं कौतुक करताना, आणि हे काहीतरी फारच वेगळं केलय या सुरात बोलताना मी एेकलं, तेव्हापासूनच. पात्राने डोळे नं मिटणं, हा व्यक्तिरेखेचा युएसपी ? सिरीअसली? हिरानीचा ट्रॅक रेकॉर्ड पाहून मी तेव्हा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण आता त्याची आठवण झाली ती झालीच.
पीके चित्रपटाचा विषय काय मानायचा? ती पृथ्वीवर अडकलेल्या परग्रहवासियाची गोष्ट आहे, की धर्माला आव्हान देणाऱ्या एका रॅशनल विचारवंताची? कारण यात एक अगदी मूलभूत विसंगती आहे. ती म्हणजे हे दोन स्वतंत्र चित्रपट आहेत. पीके हा परग्रहवासीयाच्या आगमनापर्यंत गोष्टी प्रत्यक्ष दाखवतो , मात्र पुढे साय फाय अँगल खुंटीला टांगून धर्मविषयक तत्वचिंतन वापरतो. पीके ( खान) हा परग्रहावरुन आला असं मानलं तर त्याचे तपशील इतके तकलादू का?  पीके मुळात इतका आपल्यासारखा कसा ?टेलिपथीने बोलणाऱ्या लोकांची स्वरयंत्र इतकी विकसित कशी ?  त्याने पृथ्वीवर येताना बरोबर काहीच आणलं कसं नाही? यानसंपर्कासाठी असलेलं यंत्र इतकं वेडगळ पध्दतीने का लावण्यात आलं होतं? मुळात तो पृथ्वीवर येतोच कशासाठी? त्याचं येणं काही अपघाती नाही  , म्हणजे त्यामागे कारण हवं, काही योजना हवी. पृथ्वीवासियांशी संपर्कानंतर काय करावं,वा तो संपर्क नं येण्यासाठी काय योजना करावी हा विचार हवा. यातलं काही पीकेमधे विचारातच घेतलेलं दिसत नाही. हिचहायकर्स गाईडमधल्या फोर्ड प्रीफेक्टची तयारीही याहून कितीतरी अधिक होती.
सायन्स फिक्शन मधे नेहमीच एक प्रश्न विचारला जातो की आपण परग्रहवासियांचे वंशज तर नाही? तंतोतंत आपल्यासारखा दिसणारा परग्रहवासी असणारा हा चित्रपट तो विचारत नाही. बालपटांमधे हा निष्काळजीपणा एकवेळ मी चालवून घेईन, पण जो चित्रपट अर्ध्याहून अधिक वेळ तर्काच्या आधारे युक्तीवाद केल्याचा दावा करतो त्यात निश्चित नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ग्रहाची वैज्ञानिक प्रगती इतकी उत्तम , तिथून आलेला परग्रहवासी हा आपला हरवलेल्या रीमोटवर तोडगा म्हणून काय शोधेल? देव का वैज्ञानिक? खासकरुन त्याला जर भाषा अवगत असेल, तर तिचा वापर तो शास्त्रज्ञांना पटवण्यासाठी करेल, का सेल्फप्रोक्लेम्ड गुरुवर्यांशी वायफळ वाद घालण्यासाठी? खरंतर एखाद्या शास्त्रज्ञाकडून  माहिती ट्रान्स्फर करुन स्वत:च रिमोट बनवणं सोपं नाही का?
बरं, पीकेचं हे जगावेगळं असणं दाखवल्यानंतर उरलेला चित्रपटभर पीके काय करतो, तर त्या वेगळेपणाचा जराही वापर न करता धर्मसंस्थांना आव्हान देतो. या भागातला पीके, फॉर ऑल प्रॅक्टीकल पर्पजेस, सामान्य माणूस आहे, ज्याचा जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन काहीसा अजब आहे. या भागापुरतं पीकेचं व्यक्तीमत्व आणि त्याचा जग्गूशी ( शर्मा) संवाद,  के-पॅक्स या उत्तम चित्रपटावरुन प्रेरित असावा असं मानायला जागा आहे. गंमत म्हणजे चित्रपटाचं एकूण रुप पहाता, इथेही के-पॅक्सप्रमाणे नायकाचं परग्रहवासी असणं - नसणं संदिग्ध ठेवलं असतं, तर त्याच्या या रिकामपणच्या उद्योगाला अर्थ तरी आला असता, पण तसंही होत नाही.
आता हे सगळं लाक्षणिक ठरवत पीकेचं एलिअन स्टेटस केवळ कथेला निमित्त आहे, असं मानलं, तर या निमित्ताच्या आंधारे चित्रपट प्रत्यक्ष कोणता वेगळा विचार मांडतो? तर कोणताही नाही. यातला धर्मविषयक चर्चेचा भाग ओ माय गॉड मधे येऊन गेल्याचं मी एेकलय ( मी ओ माय गॉड पाहिलेला नाही) पण ते सोडा , लगे रहो मुन्नाभाई मधे सौरभ शुक्लानेच वठवलेली ज्योतिषाची भूमिका आणि तिला मुन्ना ने दिलेलं आव्हान याचीच ही स्केलने मोठी केलेली आवृत्ती नाही का? पीकेचं स्वत:चं व्यक्तीमत्व तरी नवं कुठे आहे? सर्व गोष्टींचा तर्कशुध्द विचार करु पाहाणारा आणि सतत प्रश्न विचारत रहाणारा हा थ्री इडिअट्समधला रांचोच का म्हणू नये ? आता तो ओळखू येऊ नये म्हणून त्याला भोजपुरी बोली दिली ( जी तो जग्गूचा हात पकडून कधीही बदलू शकतो पण बदलत नाही) आणि डोळे न मिचकावणं वगैरे काही मॅनॅरिझम दिले,की ही व्यक्तिरेखा लगेच वेगळी होते का? शिवाय लगे रहो मुन्नाभाईच्या पटकथेचे पडसाद या चित्रपटात सतत जाणवतात ते वेगळच. नायकाच्या आयुष्यात त्याला स्वाभाविक वाटणारी पण जगाला चमत्कारिक वाटेलशी एक गोष्ट असणं ( पीकेचं परग्रहवासी असणं आणि मुन्नाला गांधी दिसणं) , त्या निमित्ताने त्याने समाजातल्या विसंगतींना तोंड फोडणं, सत्याचा आग्रह धरणं, त्याच्या चळवळीच्या निमित्ताने सारा समाज त्यात सामील होणं, नायक आणि त्याचा विरोधी यांचा सार्वजनिक मंचावर सामना होणं, ही संपूर्ण रचना दोन्ही चित्रपटात आहे. तरीही यात मुन्नाभाई वरचढ ठरतो कारण ती पटकथा मुन्नाचं रहस्य सर्वांसमक्ष फोडून त्याला अंतिमत: केवळ वैचारिक पातळीवर जिंकण्याची संधी देते. पीके या पातळीला पोचूच शकत नाही. तो आपला विवादात पीकेलाच विजयी ठरवून सोपा मार्ग स्वीकारतो.
या चित्रपटाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तो अतिशय प्रेडीक्टेबल आहे. कदाचित मुळातच परग्रहवासीयाला हिंदी चित्रपटात आणणं ही एक गोष्ट सोडली तर त्यात अनपेक्षित काही नाही. तो आपली करमणूक करत नाही असं नाही. आमीर खान एका मर्यादेत चांगला अभिनेता आहे, त्यामुळे आपल्या परीने तो स्वत: आणि चित्रपटही करमणूक करतो, पण ती प्रामुख्याने गॅग्जच्या पातळीवर. चुटके आपल्या जागी ठीक असतात, हसवतातही, पण ते पूर्ण चित्रपटाच्या एकसंध परीणामाची जागा घेऊ शकत नाहीत. खासकरुन मूळ आशयाची तसा परिणाम साधणं ही गरज असताना.
मला हा चित्रपट टाईमपास या पातळीवर ठिक वाटला. त्यापलीकडे जाण्याच्या शक्यता त्यात होत्या, ज्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मी असा विचार करुन पाहिला, की चित्रपट राजकुमार हिरानीचा असणं या अपेक्षाभंगाला कितपत जबाबदार आहे? समजा पूर्णत: बाष्कळ चित्रपट करणाऱ्या डेव्हिड धवनसारख्या एखाद्या दिग्दर्शकाने तो केला असता तर आपण आहे ते बरं मानून त्यातल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करु शकलो असतो का? तसं वाटत नाही. कदाचित अपेक्षाभंगाचं प्रमाण कमी झालं असतं, पण त्रुटी या ढळढळीत दिसत असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं नसतच.
 आज पीके हा यशस्वी चित्रपट मानला जातोय. प्राप्ती आणि कौतुक या दोन्ही पातळीवर. अपयशाचे तोटे  फारच असतात, पण अशा काही चित्रपटांचं यश हेही तोट्याचाच एक भाग असतं. लगेच न जाणवणारा हा तोटा  चित्रकर्त्यांच्या एकूण मार्गाबद्दलच शंका उपस्थित करतो. हिरानीचा पुढला चित्रपट हा या मार्गावर शिक्कामोर्तब करणारा असेल. त्यापूर्वी काही सुधारणा व्हावी, ही अपेक्षा.
- ganesh matkari 

Read more...

गणेश मतकरी यांना ‘सिनेमॅटिक’साठी पुरस्कार

>> Wednesday, December 10, 2014


 मुंबई : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस आणि भेंडे कुटुंबीय यांच्यातर्फे देण्यात येणारा सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कार लेखक गणेश मतकरी यांना जाहीर झाला आहे. मतकरी यांच्या 'सिनेमॅटिक' या समीक्षाग्रंथासाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून तो २६ डिसेंबर रोजी वांद्रे एमआयजी क्लबच्या सभागृहात प्रसिद्ध दिग्दर्शक अरुण खोपकर यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. ११ हजार १११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विलास खोले, नीरजा, अवधूत परळकर यांच्या परीक्षक समितीने पुरस्कारासाठी 'सिनेमॅटिक'ची एकमताने निवड केली, असे समितीचे निमंत्रक अशोक कोठावळे यांनी कळवले आहे.


पुरस्कारानिमित्ताने सिनेमॅटिकवर अवधूत परळकर यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी लिहिलेला शब्दबंध पुन्हा येथे सादर करीत आहोत.



असा सिनेमा असतो, राजा!
अवधूत परळकर 
टाइमपास इतकंच उद्दिष्ट असलेल्या प्रेक्षक-मानसिकतेतून आपल्या देशात टाइमपास व्यापारी सिनेमा जन्माला आला आहे. त्यानं आपलं सांस्कृतिक विश्व कसं नि किती व्यापून टाकलं आहे ते आपण अनुभवत आहोत. या टाइमपास सिनेसंस्कृतीला उधाण आणणारी टाइमपास सिनेसमीक्षाही जन्माला आली आहे. अशा सवंग वातावरणात या कलाप्रकाराविषयी गंभीरपणे बोलू लिहू पाहणारा; या कलाप्रकाराचं खरंखुरं व्यक्तिमत्व, आणि गाभा अभ्यासूपणे समजून घेऊ पाहणारा गणेश मतकरी हा लेखक जन्माला येणं ही नवलाची घटना आहे. 'सिनेमॅटिक' नावाचं पुस्तक लिहून या तरुण लेखकानं सिनेमा पाहायचा आपला दृष्टिकोन, सिनेकलाकृतीच्या आस्वाद प्रक्रियेविषयीची आपली भूमिका वाचकांसमोर मांडली आहे. सिनेमाचं आपलं आकलन आणि चिंतन वाचकांसमोर मांडता मांडता सिनेमाकडे कसं पाहावं याची प्रगल्भ जाणीव हे पुस्तक वाचकांत निर्माण करतं.
सिनेमाचा आशय, त्यातील भिन्न प्रवाह, आशयाची विविध रूपं, तो पडद्यावर सादर करण्याची दिग्दर्शकांची शैली यावरली उद्बोधक चर्चा सिनेमॅटिकमध्ये विखुरलेली आहे. या निमित्तानं लेखक सिनेनिमिर्तीची पार्श्वभूमी, प्रतिमा रचनेची शैली याबद्दलचं निवेदन आणि त्यावरलं लेखकाचं भाष्य असा हा लेखनप्रवास आहे. 'सिनेमॅटिक'ला बुजुर्ग सिनेसमीक्षक अरुण खोपकर यांची अप्रतिम प्रस्तावना आहे. ती गणेश मतकरींच्या सिनेमाच्या पॅशनबद्दल बोलते; त्यांच्या दृष्टिमागच्या आधुनिक वृत्तीबद्दल, त्यांच्या समीक्षेतल्या मानवतावादी मूल्यांबद्दल बोलते; आणि त्याही पलीकडे जाऊन सिनेमा कले-संदर्भात स्वतंत्र विचार मांडते.
गणेश मतकरींच्या व्यासंगाचा आणि संवेदनशील निरीक्षणाचा प्रत्यय या पुस्तकात पानोपानी येतो. रहस्यपट, युद्धपट, समांतर सिनेमा, मराठी सिनेमा इत्यादी विषयावर मतकरींनी स्वतंत्र प्रकरणं लिहून त्या संदर्भातली आपली निरीक्षणं स्वच्छपणे मांडलीत. मतकरींचं या विषयाचं चौफेर ज्ञान, वरपांगी दिसणाऱ्या घटनांच्या पलीकडे जाऊन सिनेवस्तूचा विचार करण्याची त्यांची वृत्ती हे सर्व त्यांच्या निरीक्षणातून डोकावतं. विशिष्ट सिनेमाचं आपल्याला झालेलं आकलन इतरांपेक्षा वेगळं असेल तर ते निर्भयपणे मांडतात, आपली भूमिका, किंवा विशिष्ट तांत्रिक संज्ञा नीट समजावी म्हणून चित्रपटांची उदाहरणं देतात. रहस्यपटांबद्दल लिहितांना फिल्म न्वारचा नुसता उल्लेख करून ते थांबत नाहीत. 'फिल्म न्वार' ही काय संकल्पना आहे हे दाखले देऊन समजावून सांगतात. भूतकाळातील रहस्य दडवलेला नायक, रहस्यमय तरुणी, सज्जन व्यक्तीचा पूर्ण अभाव ही न्वार सिनेमाची वैशिष्ट्यं चटकन सांगून टाकतात. तसा प्रत्येक चित्रपट रहस्यप्रधान असतो, तरीही आपण त्याला रहस्यपट म्हणत नाही हे सांगून ते रहस्यपटाची लक्षणं आपल्या विचारार्थ मांडतात. 'सिटिझन केन' चित्रपटाची एक बाजू रहस्यपटाची असली तरी त्याला रहस्यपटात का जमा करायचं नाही, हे सांगतात. हिचकॉकचा वेगळेपणा सांगून प्रेक्षकांना खिळवण्यासाठी तो आपल्या चित्रपटात कशा जागा तयार करत असे; लहान लहान प्रसंग मालिकां-मधून रहस्य वाढवत नेणं त्याला कसं आवडायचं हे उदाहरणांसहीत मांडतात. क्षणाच्या हुशारीपेक्षा सातत्यानं परिणाम वाढवणं हे मोलाचं कसं, त्यामुळे श्यामलनच्या 'सिक्स्थ सेन्स' या लोकप्रिय चित्रपटापेक्षा त्याचा 'साईर्न' हा चित्रपट अधिक दजेर्दार कसा ठरतो हे मतकरी पटवून देतात.
' एक्झॉसिर्स्ट' हा सिनेमा सामान्य भयपट म्हणून मी मोडीत काढला होता. मतकरींनी या चित्रपटावर सोळा पानी मजकूर लिहून त्याचं असाधारणपण इतक्या प्रभावीपणे निदर्शनास आणून दिलं आहे की ते वाचून या चित्रपटाविषयीचा माझा प्रतिकूल पूर्वग्रह नष्ट झाला. 'एक्झॉसिर्स्ट'च्या निमिर्तीची आणि त्यामागच्या पार्श्वभूमीची मतकरींनी सांगितलेली कथा हा या पुस्तकातला सर्वात वाचनीय भाग आहे.
युद्धपटांचा त्यांनी घेतलेल्या आढाव्याबद्दलही असंच म्हणावं लागेल. सुरवातीचे युद्धपट जनतेनं युद्धाला पाठिंबा देण्यासाठी काढले गेल्यानं त्यात कसा प्रचारकीपणा येत गेला; युद्धाला बाळबोध संघर्षाचं रूप कसं दिलं गेलं हे सांगून काळानुसार युद्धपट कसे बदलले हे मतकरी स्पष्ट करत जातात. युद्धपटाचा वापर थ्रीलर, रोमान्स, ब्लॅक कॉमेडीसाठी कसा केला जाऊ लागला हेही दाखवून देतात. जिंकलेले आणि हरलेले याच्या पलीकडे जाऊन युद्धपट माणुसकीचा संदेश देऊ लागले; युद्धाचा फोलपणा दाखवू लागले; युद्धाविषयी तिटकारा निर्माण करू लागले हे बदल लेखकानं छान टिपलेत. सुरवातीच्या काही युद्धपटातली युद्धं कशी चेहरा हरवलेली होती; पाहायला नेत्रसुखद, उत्तम कोरिओग्राफ केलेल्या यातल्या युद्ध प्रसंगामध्ये लढणाऱ्या सैनिकाला काय वाटत असेल याचा विचार त्यात नव्हता असं त्यांनी म्हटलं आहे. प्लॅटून चित्रपटाच्या दिग्दर्शकानं सैनिकांमधली सामान्य माणसं पडद्यावर उभी केली असं सांगून 'प्लॅटून' हा पहिला वास्तव युद्धपट कसा हे त्यांनी त्यातल्या इतर तपशीलांसह पटवून दिलं आहे. युद्धांचं तंत्र बदललं तरी माणसांनी माणसांना मारणं हे कधीच बदललं नाही त्यामुळे कोणत्याही संवेदनशील चित्रर्कत्यानं केलेला चित्रपट हा युद्धविरोधी चित्रपटच असणार. युद्ध म्हणजे मृत्यू हेच आज हॉलिवुडच्या युद्धपटांना सांगायचं आहे अशा शब्दात ते या प्रकरणाचा शहाणा शेवट करतात.
सिनेमाचे, त्यामागील वैचारिक भूमिकांचे त्यांनी टिपलेले बारकावे त्यांच्या अभ्यासूपणाची आणि तीक्ष्ण निरीक्षण शक्तीची साक्ष पटवणारे आहेत. आज भयपट पुन्हा स्पेशल इफेक्टस आणि रक्ताच्या थारोळ्यात हरवून गेले आहेत या त्यांच्या विधानाशी कोणीही सहमत होईल.
मतकरींची काही मतं प्रवाहाविरुद्ध वाटतील. किंबहुना तशी ती आहेतच. पण त्यात जितका ठामपणा आहे तितकीच विनम्रता आहे. मराठी सिनेमावर लिहिलेल्या प्रकरणात मतकरींनी मराठीतल्या नव्या चित्रपटाच्या लाटेचं-नव्या दिग्दर्शकांचं स्वागत केलं आहे. पण जोगवा, नटरंगसारख्या बेगडी वास्तवपटांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वैचारिक स्टेटमेंट केल्याचा आव आणणारे पण प्रत्यक्षात तद्दन व्यावसायिक वळणाचे असे हे सिनेमे दिशाभूल करणारे आहेत असं इशारेवजा विधान त्यांनी केलं आहे. प्रेक्षकांना आपल्या भूमिकांचा आणि मतांचा फेरविचार करायला लागेल असा मजकूर या पुस्तकात अनेक जागी सापडतो. सोपं आणि स्वीकारण्याजोगं लॉजिक मांडून, त्याला चपखल उदाहरणांची जोड देऊन अपारंपरिक विचार वाचकांच्या गळी उतरवण्याची मतकरींची हातोटी दाद देण्याजोगी आहे.
प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टींमधून अर्थापर्यंत पोहोचायचं तर डोकं खाजवणं भाग पडेल असं 'डिमेन्शन्स ऑफ डायलॉग' या श्वान्कमायरच्या अफलातून लघुपटावर लिहिताना लेखकानं म्हटलंय. - हे खरं पाहता पुस्तकात उल्लेखलेल्या अनेक कलाकृतींबाबत हे बोलावं लागेल. तुलनेसाठी, संदर्भासाठी आणि उदाहरणासाठी मतकरींनी या पुस्तकातून जो सिनेमा समोर ठेवला आहे तो सर्वसाधारण मराठी सिनेप्रेक्षकांच्या पाहण्या-बोलण्यातला सिनेमा नाही. फिल्म फेस्टिव्हलला नियमानं हजेरी लावणारे फिल्म सोसायटी चळवळीतले लोक, अभ्यासू समीक्षक, यांना परिचित असलेला हा सिनेमा आहे. या मंडळींची सिनेमाविषयीची समज वाढवण्याची ताकद या लेखनात निश्चित आहे.
तौलनिक निरीक्षणासाठी लेखकानं वारंवार उल्लेखलेली विदेशी चित्रपटांची आणि दिग्दर्शकांची उदाहरणं या वर्तुळाबाहेरील वाचकांना मात्र गोंधळून टाकायची शक्यता आहे. माध्यमाकडे गांभीर्यानं पाहू इच्छिणारा; या माध्यमाची बलस्थानं जाणून घेण्यात स्वारस्य असलेला वर्ग या वाचकातही आहे. कलानिष्ठ सिनेमातल्या विविध कलात्मक प्रयोग जाणून घ्यायला या वाचकांना या पुस्तकाची मदत होईल. मराठी प्रेक्षकांची दृश्यसाक्षरता वाढवणारे चित्रपट आता मराठीत निघू लागले आहेत. गणेश मतकरींनी परिश्रमपूर्वक लिहिलेलं 'सिनेमॅटिक' हे पुस्तक टेक्स्टबुकप्रमाणे या प्रेक्षकांच्या कलाजाणीवांच्या विकासाला उपयोगी पडू शकेल. कदाचित सिनेमॅटिक सुस्वरूप आणि सुबुद्ध सिनेमाचं नवं दालन त्यांच्या समोर खुलं करेल. 'असा सिनेमा असतो राजा' असा साक्षात्कार त्यांना होऊ शकेल.
नव्या तंत्रज्ञानानं, डिजिटल क्रांतीनं या क्षेत्रात आज नवे आयाम निर्माण केले आहेत, आणि बराच गोंधळही उडवून दिला आहे. अखेरच्या प्रकरणात भविष्यात होऊ घातलेल्या या उलथापालथीची मतकरींनी दखल घेतली आहे. या बदलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्वागतशील पण सावध आहे. तंत्रज्ञानाची ही घोडदौड आशयाला तुडवून पुढं जाणार आहे का हा प्रश्न आपल्याप्रमाणे त्यांनाही भेडसावतो आहेच.
सिनेमॅटिक, गणेश मतकरी / प्रकाशक :
 मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस 

पृष्ठं : १७२ / किंमत : ३०० रु.


Read more...

एक्झोडस- गॉड्स अॅन्ड किंग्ज- डेमिल विरुध्द स्कॉट

>> Sunday, December 7, 2014


मी सेसिल बी डेमिल चा टेन कमान्डमेन्ट्स (१९५६) पाहिला तो खूपच उशिरा, १९९० च्या आसपास. तोही थिएटरमधे नाही, तर व्हिडीओ कसेट वर.त्याची लांबी एवढी प्रचंड (२२० मिनिटं) की तो एका कसेटवर रहातही नव्हता. मला तो असा पहावा की नाही अशी शंका तेव्हा आल्याचं आठवतं. कारण तो आधीच पाहिलेल्या माझ्या बहिणीकडून आणि इतरांकडून त्याविषयी फार उत्तम गोष्टी एेकल्या होत्या आणि तो परिणाम कुठला टिव्हीवर यायला, असं आपलं वाटलं होतं. पण कुतूहल जास्त होतं. शिवाय तेव्हा मी लिहीत नसल्याने ,फर्स्ट इम्पॅक्टचा विचारही फार गंभीरपणे केला नाही. माझ्या आठवणीप्रमाणे, कॉलेज सबमिशनचं काहितरी काम करतच एकीकडे मी तो पहायला सुरुवात केली पण थोड्याच वेळात इतका गुरफटलो, की पहिला तास उलटायच्या आत इतर सगळी कामं बाजूला पडलेली होती.

टेन कमान्डमेन्ट्समधला सर्वात प्रभावी प्रसंग हा इजिप्तचं सैन्य मागे लागलेलं असताना मोझेसने समुद्र दुभंगून आपल्या अनुयायांना पार नेण्याचा, हे निश्चित आणि आजही हा प्रसंग थरारून सोडतो. त्याआधीचा चमत्कारांचा भागही असाच गुंगवणारा, पण केवळ हे स्पेशल इफेक्ट्स, ही त्या चित्रपटाची ताकद म्हणणं अन्यायकारक होईल. त्याचा खरा इन्टरेस्टिंग भाग होता,तो त्यातली प्रचंड लांबलचक कथा आणि अनेक पात्रं, उपकथानकं धरुन तिचं तपशीलात रंगवली जाणं.

मुळात या कथेचे सरळ चार भाग आहेत.मोझेसचं इजिप्तचा राजपुत्र म्हणून असलेलं आयुष्य, जन्मरहस्याच्या उलगड्यानंतरची हद्दपारी आणि गृहस्थाश्रम, इजिप्तमधल्या गुलाम हिब्रू समाजाला सोडवण्यासाठी त्याचं परत येणं, आणि अखेर सुटकेनंतरचा कमान्डमेन्ट्स मिळेपर्यंतचा भाग. चमत्कार हे प्रामुख्याने यातल्या तिसऱ्या भागात येतात पण एकूणच निर्मितीच्या, अभिनयाच्या बाबतीत डेमिलचा चित्रपट सुरुवातीपासून अखेरपर्यंत दर्जेदार आहे. त्यातली अनेक छोटीमोठी पात्र त्यातल्या पटकथेच्या घट्ट वीणेमुळे आपल्याला कायम लक्षात रहातात.

चित्रपटाचा जेव्हा रिमेक होतो, तेव्हा त्यात नवीन काय आहे हा प्रश्न महत्वाचा ठरतो. मग ते काही असू शकतं. एखादं नवं तंत्र, तंत्रज्ञान, दिग्दर्शकाला जाणवलेली एखादी नवी बाजू, काहीही. याच विषयावरचा प्रिन्स ऑफ इजिप्ट (१९९८) आला तेव्हा त्यातल्या अॅनिमेशनचा रेखीव वापर , त्यांनी उचललेलं भव्यतेचं परिमाण आणि माध्यमाने तयार होणारी नवा बालप्रेक्षक मिळण्याची शक्यता या गोष्टी त्यात वेगळ्या होत्या. जेव्हा हाच प्रश्न आपण एक्झोडस- गॉड्स अॅन्ड किंग्ज बाबत विचारतो, तेव्हा त्याचं पूर्ण समाधानकारक उत्तर मिळत नाही. खासकरुन त्यातला रिडली स्कॉटसारख्या लक्षवेधी दिग्दर्शकाचा आणि मोझेसच्या भूमिकेत क्रिश्चन बेलसारख्या मोठ्या अभिनेत्याचा सहभाग लक्षात घेतो तेव्हा.

वेगळेपणा असणारी एक उघड गोष्ट एक्झोडस करतो, ती म्हणजे मुळातच तो पटकथा कॉम्पॅक्ट करतो. त्यातला फोकस तर नावाप्रमाणेच तो गुलामांच्या मुक्तीवर आणतोच, पण पहिल्या आवृत्तीतल्या अनेक पात्रं , उपकथानकांनाही तो कात्री लावतो, त्यामुळे कथा प्रामुख्याने द्विपात्री होते. या मार्गाने चित्रपट 'टेन कमान्डमेन्ट्स' हून वेगळा होतो आणि वेळही आटोक्यात येतो हे खरं, पण त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची व्यकितिरेखांबरोबरची भावनिक गुंतवणूक बरीचशी कमी करतो. त्यातला वाद बराचसा तात्विक पातळीवर येतो, कोरडा होतो. दुसरा महत्वाचा बदल आहे तो देवाकडे आणि त्याच्या आदेशांकडे पहाण्याच्या दृष्टीत.हा भाग मला मूळ चित्रपटाहून चांगला वाटला कारण इथे स्कॉटचं चित्रण केवळ धर्मवेडं नाही, तर आख्यायिकेतल्या विसंगती अधोरेखित करणारं , क्रौर्याला सूचकतेमागे न दडवता उघड्यावर आणणारं आहे. 'टेन कमान्डमेन्ट्स'मधला देव आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देत नाही. इथे मात्र देवाला निश्चित रुप आहे. लहान मुलाचं. हे रुप देवाच्या हट्टाला, प्रसंगी दिसणाऱ्या क्रौर्याला अतिशय चपखल बसतं. त्याच्यापुढे मोझेसचं हतबल होणं आपण समजू शकतो.

देवाने इजिप्तवर संकटं आणणं आणि त्याच्या विरोधात रॅमसीस ने केलेलं क्रौर्याचं प्रदर्शन, हा या हकिगतीचाच महत्वाचा भाग, पण 'टेन कमान्डमेन्ट्स'ने तो फार त्रासदायक न करता शोभवून नेला होता. 'एक्झोडस’तसं करणं टाळतो. इथली अनेक दृश्य  बिचकवून सोडणारी आहेत. मगरींनी बोटीवर केलेला हल्ला, सडलेल्या माशांनी लाल झालेलं पाणी, रॅमसीस ( जोल एडगरटन) ने अनेक निरपराधांना फासावर लटकवणं, अशा अनेक प्रसंगांचं चित्रण हे प्रभावी आहे. अशा वेळी भारतीय कलाकृतींचा देवाकडे अन एकूणच धार्मिक गोष्टींकडे घाबरत घाबरत पहाण्याचा अप्रोच खास जाणवतो/खटकतो. आपल्या देवाने पडद्यावर असा रुद्रावतार धारण केला तर चित्रपट सेन्सॉरकडून पुढे सरकतील का, धर्माच्या नावाखाली अभिव्यक्ती दाबण्याच्या प्रयत्नातल्या विविध संघटना ते चालू देतील का आणि शेवटी आपला प्रेक्षक ते किती पाहून घेईल, असा प्रश्न पडतो.

या सगळ्या दृश्ययोजनात ,अन खासकरुन पुढच्या 'पार्टींग ऑफ द रेड सी' नावाने लोकप्रिय असणाऱ्या समुद्र दुभंगण्याच्या प्रसंगात जाणवतं, की हे प्रसंग खरोखर घडते, तर कसे घडते, याचा दिग्दर्शक विचार करतोय. पण तसं असतानाही इथे एक मोठी अडचण येतेच. त्याचा दृष्टीकोन हा रॅडिकली वेगळा नाही. मायकेल मूरकॉकच्या ’बिहोल्ड द मॅन’मधे जीझस हा सर्वसामान्य माणूस असल्याचं दाखवून लेखकाने आता या महापुरुषाची इतिहासातली जागा कोण घेणार, असा पेच तयार केला होता. तसा दैवी अंश पुसून टाकणारा एखादा घटक स्कॉट पटकथेत आणू शकत नाही. मोझेसच्या पहिल्या देवदर्शनानंतर काही काळ असा आभास तयार होतो, की स्कॉट, हा देव केवळ मोझेसच्या डोक्यात होता असं म्हणतोय की काय? मोझेसने धनगराची काठी टाकून तलवार उचलणं, किंवा देवाने ' मला सेनापती हवाय' असं म्हणणही त्या दिशेने सुसंगत होतं.तसं झालं असतं तर चित्रपट खूपच वेगळा झाला असता. पण जशी मिरॅकल्सची कक्षा वाढते, तसा देवाचा प्रत्यक्ष सहभाग अपरिहार्य ठरतो.अखेर मोझेसला समुद्र दुभंगायला हवा असेल, तर देवाचं अस्तित्व हा केवळ मानसशास्त्रीय घटक ठरु शकत नाही.

तरीही आपल्या दोन नायकांचं, मोझेस आणि रॅमसीसचं व्यक्तिचित्रण मात्र ’एक्झोडस’ खूपच प्रभावीपणे करतो.टेन कमान्डमेन्ट्समधेही ते लक्षणीय होतं यात वाद नाही, पण तिथे ते एकरंगी, प्रवृत्तीच्या दर्शनासारखं होतं. इथे या दोघांच्या व्यक्तीमत्वातली गुंतागुंत तपशीलात येते, विशेषत: मोझेसच्या. त्याला 'आपण कोण आहोत?' हा मुळातच सतावणारा प्रश्न, स्वार्थ आणि कर्तव्य यांतून तयार होणारी द्विधा मनस्थिती, प्रसंगी देवाचं पटत नसतानाही असहाय्यपणे घडेल ते पहात रहावं लागणं ,हे त्याला नेहमीच्या धीरोदात्त नायकापेक्षा वेगळा ठरवतं.

दुसरी विशेष गोष्ट आहे ती म्हणजे रिडली स्कॉटच्या चित्रपटात गेली काही वर्ष सातत्याने दिसणाऱ्या युध्दविरोधी विचारांचे पडसाद.हिंसाचाराला आपल्या चित्रपटात नित्य स्थान देतानाही रिडली स्कॉटचे हल्लीचे चित्रपट हिंसा हा उपाय नाही, या निष्कर्षावर येऊन पोचले आहेत. किंगडम ऑफ हेवन, ग्लॅडीएटर सारख्या चित्रपटात हे स्पष्ट दिसून आलय. एक्झोडसमधेही हा विचार जाणवेलशा पध्दतीने येतो.

या चित्रपटाचा अखेरचा भाग हा त्याचा कदाचित सगळ्यात मोठा दोष मानता येईल. बाकी भागात डेमिल आवृत्तीपेक्षा स्कॉट आवृत्ती कशी वेगळी आहे हे सरळ दिसतं, इथे ते दिसलं नसतं , कारण घटना कमी आणि स्पष्ट आहेत. कदाचित या कारणाने, पण स्कॉट हा भाग फार चटकन उरकतो. घटना तुकड्यातुकड्यात येतात.शेवटाचं वजन त्यांना येत नाही. कदाचित हा भाग अधिक वेळ घेत रंगवला असता तर चित्रपट अधिक एकसंध झाला असता. अर्थात याला पुरावा काही नाही, आता आपण केवळ अंदाजच करु शकतो.

जर कोणी डेमिल आणि स्कॉटच्या आवृत्त्यांची गुणात्मक तुलना विचारली, तर मात्र मी उत्तर द्यायचं टाळेन. कमान्डमेन्ट्सने आपली गुणवत्ता सिध्द केलीच आहे, पण नवं फार न देताही, एक लक्षवेधी प्रयत्न या सदरात एक्झोडस बसू शकतो. पुढल्या काळात यातला कोणता चित्रपट टिकून राहील याचा विचार केला, तर मात्र कमान्डमेन्ट्सचंच नाव एकमताने पुढे येईल असं वाटतं.
- ganesh matkari

Read more...

इन्टरस्टेलर- एक तारांकित चिंतन

>> Saturday, November 15, 2014



इफ इट कॅन बी रिटन, ऑर थॉट, इट कॅन बी फिल्म्ड.
स्टॅनली कुब्रिक

आपल्याकडला बहुसंख्य प्रेक्षक ( आणि काही प्रमाणात समीक्षक देखील)  'इमोशनल मेलोड्रामा ' या लेबलाखाली न बसणाऱ्या कोणत्याही चित्रपटाला शून्य महत्व देतो. गंमत म्हणजे, त्याचं हे तर्कशास्त्र  अनेक हास्यास्पद हिंदी मसालापटांना गरजेपेक्षा अधिक महत्व आणून देतं, आणि अनेक उत्तमोत्तम चित्रपटांकडे केवळ ते वेगळ्या वाटेवर असल्यामुळे दुर्लक्ष केलं जातं.  हे अगदी थ्रिलर्स वगैरेच्या बाबतीतही होतं पण भय, फँटसी आणि सायन्स फिक्शन, हे या दुर्दैवी समजुतीचे कायमचे बळी.सायन्स फिक्शन तर खासच. खरं तर या चित्रप्रकाराचा वेष धारण करुन  फ्रित्झ लान्गच्या मेट्रोपोलिस ( १९२७) पासून शेन कारुथच्या प्रायमर (२००४) पर्यंत  अनेक विचारप्रवर्तक चित्रपट येऊन गेले आहेत, जे आपल्या खिजगणतीत नाहीत. इन्टरस्टेलर हे त्यातलं अगदी नवं उदाहरण. पहिल्या प्रथमच आपल्याकडे चटकन उचललं गेलेलं, त्यातल्या दिग्दर्शकाभोवतीच्या वलयामुळे.

क्रिस्टोफर नोलन हा आजच्या सर्वात लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक मानावा लागेल. आपल्याकडेही हे नाव परकं नाही. 'मेमेन्टो' (२०००) सारख्या निवेदनशैलीतच मूलभूत प्रयोग करणाऱ्या चित्रपटापासून ते नाव अचानक जगभरात गाजायला लागलं आणि मध्यंतरी येऊन गेलेल्या 'द प्रेस्टीज , इन्सेप्शन, डार्क नाईट चित्रत्रयी' सारख्या चित्रपटांनी त्याच्या कर्तुत्वाची कमान चढती असल्याचं वारंवार सिध्द केलं. 'इन्टरस्टेलर'शी जेव्हापासून नोलन जोडला गेला ( त्याआधी हा चित्रपट अशाच दुसऱ्या कर्तबगार दिग्दर्शकाकडे होता, स्टीवन स्पीलबर्गकडे) तेव्हापासूनच या चित्रपटाला प्रचंड प्रेक्षकवर्ग असणार , हे ठरुन गेलं. एकदा कुतूहल वाढल्यावर चित्रपटाविषयी वाचलं गेलं आणि त्याचा विषय कळताच दुसरा एक चित्रपट राहून राहून आठवायला लागला.

चंद्रावरल्या स्वारीच्या एक वर्ष आधी , १९६८ मधे , विज्ञानकथालेखक आर्थर सी क्लार्क आणि विविध चित्रप्रकार लीलया हाताळणारा दिग्दर्शक स्टॅनली कुब्रिक या दोघांच्या सहयोगातून बनलेल्या '२००१ ए स्पेस ओडीसी' या विज्ञानपटाला आजवरचा सर्वात महत्वाचा विज्ञानपट मानता येईल यात शंका नाही. अवकाश दृष्यांचा क्रांतिकारी वापर, त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध असणं, वैज्ञानिक संकल्पनांचा भडीमार आणि जवळपास प्रायोगिक म्हणता येईलशी  पटकथा, यांमुळे तो अजरामर झाला. आजही या चित्रपटाचं नाव मानाने घेतलं जातं. 'इन्टरस्टेलर' वरचा '२००१' चा प्रभाव हा त्याच्या प्रसिध्दीत वापरलेल्या दृश्यांवरुनही दिसून येत होता. पण केवळ चांगला प्रभाव  चांगला चित्रपट बनवण्यासाठी पुरेसा नसतो. मला प्रश्न होता तो हा, की 'इन्टरस्टेलर' या प्रभावापलीकडे जाऊ शकेल का? किंबहूना त्याला वैचारिक शक्यता आणि दृश्यक्रांतिसंदर्भात आजच्या युगाचा '२००१:ए स्पेस आेडीसी' मानता येईल का?

थोडक्यात सांगायचं, तर तसं मानायला जागा आहेही आणि नाहीही.

'२००१' सारखाच 'इन्टरस्टेलर'चा अवाकादेखील प्रचंड आहे. तो सुरु होतो, तो एका अनिंश्चित भविष्यकाळात. पृथ्वीचा अंत समीप आलाय. मोठी शहरं, दळणवळण संपुष्टात आलय आणि मानवजात शेतकरी बनून छोट्या वस्त्यांमधे कशीबशी तग धरतेय. यातल्याच एका शेतावर कूपर (मॅथ्यू मेकनोइ) आपल्या मर्फ आणि टॉम या दोन मुलांबरोबर रहातोय. कूपर मुळचा पायलट , पण आता आपला वैभवशाली भूतकाळ विसरुन नाईलाजाने शेतकरी बनलेला. नकारात्मक होत चाललेल्या समाजासमोर त्याच्यासारख्या तंत्रविशारदाना काही किंमत उरलेली नाही. एकदा अपघातानेच त्याला  गुप्तपणे तग घरुन राहिलेल्या नासा संस्थेचा शोध लागतो. त्यातूनच संधी मिळते , ती मानवजात टिकून रहाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नव्या पृथ्वीसदृश ग्रहाच्या शोधात निघायची. मात्र प्रश्न हा अाहे, की नवा ग्रह सापडून त्यावर पृथ्वीवासियांना हलवण्याची सोय होईपर्यंत मानवजात शिल्लक राहिलशी काय गॅरेन्टी?

इन्टरस्टेलरला लक्षात येण्याजोगे तीन अंक आहेत. पहिला घडतो पृथ्वीवर, दुसरा अवकाशात, ग्रह शोधण्याच्या प्रयत्नात. तर तिसरा आणि अखेरचा अंक हा जवळपास मेटॅफिजिकल मानता येईलसा आहे. यात मांडलेल्या कल्पना - म्हणजे मानवाच्या आयुष्यातली  काळाची भूमिका, परग्रहवासीयांशी संपर्काच्या शक्यता, भविष्याकडे पहाण्याची दृष्टी, माणूस आणि यंत्र यांचं सहजीवन, अवकाशयुगातले नवे टप्पे, अशा अनेक. त्यातल्या बऱ्याच संकल्पना या '२००१' शी साधर्म्य साधतात असं आपल्या लक्षात येईल. तरीही, '२००१' ने आणि काही प्रमाणात कार्ल सेगनच्या कादंबरीवर आधारीत 'कॉन्टॅक्ट'ने (१९९७ , दिग्दर्शक रॉबर्ट झेमेकिस)  ज्याप्रमाणे विचाराला जागा तयार करुन प्रत्यक्ष अर्थाशी खेळणं प्रेक्षकावर सोपवलं तसं 'इन्टरस्टेलर' करत नाही, उलट तो प्रत्येक प्रश्नाला निश्चित उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. काही जणांच्या मते हाच इन्टरस्टेलरमधला मोठा दोष आहे. मला तसं वाटत नाही.

नोलनच्या आधीच्या कामाकडे पाहिलं तर तो हे का करतो, हे सहज लक्षात येतं. केवळ कल्पनाशक्तीत स्थान असणाऱ्या गोष्टींना वास्तवाच्या गणितात बसवायचा प्रयत्न , हा त्याचा जुना खेळ आहे. 'प्रेस्टीज'मधली जादू आणि 'डार्क नाईट' मधली सुपरहीरो संकल्पना यांना त्याने ज्या पध्दतीने स्पष्टीकरणाच्या, वास्तववादाच्या चौकटीत बसवलं, ते पाहिलं, की याविषयी शंका उरत नाही. 'इन्टरस्टेलर' मागेही हीच कल्पना आहे, की केवळ कल्पनाविलास हे स्वरुप न ठेवता सिध्द आणि सैंध्दांतिक विज्ञानाचा वापर करुन अंतराळप्रवास आणि मानवापुढे भविष्यात तयार होणारी संभाव्य आव्हानं नव्याने मांडण्याचा प्रयत्न करायचा.

चित्रपट सुरु झाल्याझाल्याच आपल्या लक्षात येतं की तो केवळ स्पेशल इफेक्ट्सच्या जोरावर आपल्याला दिपवत नसून काहीतरी निश्चित वैज्ञानिक विचार आणण्याचा प्रयत्न करतोय.  रिलेटिविटी, वर्महोल्स, ब्लॅकहोल्स, यासारख्या हार्ड कोअर वैज्ञानिक संकल्पना चित्रपट समजवून सांगतो, त्यावर चर्चा घडवतो आणि त्यांच्या चित्रणातही शक्य तितका प्रामाणिकपणा दाखवतो. हे शक्य व्हावं म्हणून नोलनने ज्येष्ठ थिअरॉटिकल फिजिसिस्ट किप थॉर्न यांची मदतही घेतलीय. यामुळे काही वेळा पात्र एरवीच्या चित्रपटांच्या प्रमाणाला सोडून कितीतरी अधिक अवघड बोलतात, पण ते सारं तुम्हाला तसंच समजणं आवश्यक नाही. हा विचारांचा भाग तुम्हाला समोर दिसणाऱ्या दृश्यांना तर्काचा आधार आहे, हे दाखवून देतो. ही जाणीव पहाणाऱ्याच्या डोक्यात तयार होणं, हे अंतिम परीणामासाठी पुरेसं आहे. या संकल्पनांच्या आधारे काही आश्चर्यकारक दृश्यरचनाही साकारल्या जातात. उदाहरणार्थ ब्लॅक होल चं नव्या सिध्दांताच्या आधारे केलेलं चित्रण, किंवा तिसऱ्या अंकात येणारा, काळाला वेगळी मिती असल्याचं प्रत्यक्ष दाखवणारा बुकशेल्फ सिक्वेन्स. या पातळीवरचं विचारमंथन  एका  चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचणं '२००१' लाही साध्य झालं होतं यात शंका नाही,  पण त्यातली प्रकरणं ही बऱ्याच अंशी सुटी अन केवळ संकल्पनेच्या पातळीवर जोडलेली होती. त्याचं कथानक पूर्णपणे खेचून नेणारा एक नायक तिथे नव्हता. याला मी गुण किंवा दोष म्हणणार नाही, पण एवढच म्हणेन की 'इन्टरस्टेलर'मधे त्याचा नायक कूपर हा एक मोठा अँकर असल्याने तो प्रेक्षकासाठी अधिक सोपा, मूलभूत पातळीवर गुंतवणारा होतो, जे '२००१' मधे बहुतांशी होऊ शकत नाही .

आता यापलीकडे जाणारी एक गोष्ट आणि ती मला वाटतं सर्वात महत्वाची. ती म्हणजे विज्ञानपटाचा बाज बाजूला ठेवूनही इन्टरस्टेलर पहाणं शक्य आहे. कोणी म्हणेल, की आतापर्यंत त्यातल्या वैज्ञानिक बाजूच्या खरेपणाबद्दल बोलणारा आणि आजवरच्या सर्वात थोर विज्ञानपटाशी त्याची तुलना करणारा मी, अचानक त्याच्या विज्ञानाला बाजूला का ठेवतोय. तर तसं नाही. विज्ञान तर आहेच. पण त्यापलीकडे जाऊन माणसाच्या दुर्दम्य आशावादाची आणि लढ्याची जी गोष्ट इथे मांडली जाते, तिला 'इन्टरस्टेलर'मधे खूपच महत्व आहे. त्यातलं साहस हे केवळ धैर्याच्या पातळीवरचं नाही. त्याला एक सतत जाणवणारी माणूसपणाची किनार आहे. यातल्या व्यक्तीरेखा परीपूर्ण नाहीत पण खऱ्या आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्यात मानवी स्वभावाची सर्व वैशिष्ट्य आपल्याला दिसतात. बुध्दीनिष्ठ निग्रहापासून हळव्या मैत्रीपर्यंत आणि स्वार्थी महत्वाकांक्षेपासून संपूर्ण विरक्तीपर्यंत सर्व पैलूंचा यात स्वीकार आहे. आपण कोण आहोत याविषयीचं हे एक चिंतन म्हणता येईल.

'इन्टरस्टेलर' हा नोलनचा आजवरचा सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट म्हणावा का? निश्चितच. पण त्याचबरोबर , सर्वाना तो सारख्या पातळीवर झेपणार नाही हे उघड आहे. पण चित्रपट जेव्हा परिचित प्रांत सोडून वेगळं काही करायला जातात तेव्हा ती एक शक्यता संभवतेच. मला विचाराल, तर चित्रपट कळला/ न कळला, आवडला / न आवडला यापेक्षा तुमच्यासाठी तो एक नवा अनुभव घेऊन आला की नाही याला अधिक महत्व आहे. आणि त्या कसोटीवर उतरणारं, या चित्रपटाहून अधिक उत्तम उदाहरण आपल्याला क्वचितच मिळेल.

-गणेश मतकरी
- mata madhun

Read more...

गॉन गर्ल- अर्थात , सुखी संसाराचा मंत्र !

>> Sunday, November 2, 2014

( स्पॉयलर वॉर्निंग- गॉन गर्ल विषयीचं कोणतंही निरीक्षण हे तुम्हाला त्यातल्या रहस्याची पूर्वसूचना देऊ शकतं. त्यामुळे चित्रपट पाहून मग वाचणं उत्तम. )

जिलिअन फ्लिनची 'गॉन गर्ल' ही कादंबरी तिच्या इतर कादंबऱ्यासारखीच एका शब्दात वर्णन करता येण्यासारखी आहे, आणि तो म्हणजे 'ट्विस्टेड'. अर्थात, चांगल्या अर्थाने. तिचं काम हे जवळपास चक पालानकच्या ( फाईट क्लब, सर्व्हायवर, चोक, ललबाय , हॉन्टेड इत्यादी)वळणाचं आहे, पण तो हाताळत असणारे विषय अधिक मोठे आणि सोश्योपोलिटीकल वजन असणारे असतात. त्यामानाने, फ्लिनची झेप अजून तरी न्वार छापाच्या व्यक्तिगत गुन्हेगारी कथानकांपलीकडे जात नाही. गॉन गर्ल बद्दल थोडक्यात सांगायचं तर ही एका लग्नाची गोष्ट आहे. मात्र या दोघांचं नातं हे आपल्या परिचित परीघाच्या बाहेर डोकावणारं आहे.

डेव्हिड फिन्चर या कादंबरीचं रुपांतर दिग्दर्शित करणार हे कळलं तेव्हा मी तत्काळ ही कादंबरी वाचून काढली. कादंबरी फारच उत्तम , आणि वाचकाला बांधून ठेवणारी आहे. पण ती वाचताच , ' याचं रुपांतर कसं शक्य आहे !' असा पहिला प्रश्न पडतो. कारणं दोन. पहिलं म्हणजे यात निक आणि एमी या पतीपत्नीचं ऑल्टरनेट निवेदन आहे. तेही दोघांच्या निवेदनात काळाचं अंतर राखून. त्यातही  निकचं निवेदन थोड्याच दिवसांचा कालावधी व्यापतं पण एमीचा डायरी फॉरमॅट अनेक वर्षांमधल्या घडामोडी मांडतो. कादंबरीच्या अर्ध्यावर ही रचनाही बदलते. हे बदल कादंबरीत समजून घेणं शक्य होतं, पण चित्रपटात ते उतरवणं सोपं नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे अनरिलाएबल नरेशन हा या कादंबरीतला महत्वाचा घटक आहे. साहित्यातलं निवेदन हे खरं निवेदन असतं, ते कोणीतरी गोष्ट सांगितल्यासारखं असतं. प्रत्यक्ष काही दाखवायचं नसल्याने  रहस्य टिकवणं फार कठीण नसतं. चित्रपटात प्रत्यक्ष घटना दिसणं अपेक्षित असतं, त्यामुळे फसवाफसवी कठीण असते. असं असतानाही, गॉन गर्लचं रुपांतर उत्तम जमलय. विशेष म्हणजे,पटकथा रुपांतर स्वत: फ्लिननेच केलय.

चित्रपट हा बराचसा कादंबरीला प्रामाणिक आहे. कादंबरीची बरीच वैशिष्ट्य त्यात आहेत. अनरिलाएबल नरेशन किंवा व्यक्तिरेखांनी केलेली दिशाभूल तर त्यात आहेच, पण तपशीलात न जाताही पाळलेला एकूण आलेख , रचनेतलं साधर्म्य, आजच्या काळाने बदललेले प्रेम, त्याग यासारख्या संकल्पनांचे अर्थ, या गोष्टीही आहेत. गॉन गर्लमधे रहस्य आहे पण ते हूडनीट प्रकारचं नाही. त्याएेवजी दृष्टीकोनांमधल्या बदलांचा त्याच्याशी अधिक संबंध अाहे. गुन्हा झाला का? काय झाला? कोणी केला? या प्रश्नांची उत्तरं आवश्यक असली तरी हे प्रश्न गॉन गर्लच्या केंद्रस्थानी नाहीत. केंद्रस्थानी आहेत ती बदलती मूल्य, व्यक्तींची, तसंच त्या ज्या समाजात रहातात त्या समाजाची देखील. त्यामुळे इथे रहस्याला अनावश्यक महत्व येत नाही. सारी रहस्य शेवटावर आणून उकलली जात नाहीत, तर टप्प्याटप्प्यावर उलगडत पटकथेला नव्या दिशा दिल्या जातात. चित्रपटाचा प्रभावदेखील त्यामुळे रहस्यपटाच्या पलीकडे रहातो.

चित्रपट सुरु होतो तो निक डन ( बेन अॅफ्लेक) ला आपली पत्नी एमी ( रोजामन्ड पाईक) नाहीशी झाल्याचं लक्षात येतं त्या दिवसापासून. तो तडकाफडकी पोलिसांना बोलावतो, पण जसजसा तपास चालू होतो, उलट निक बद्दलचा संशयच वाढायला लागतो. आपल्याला प्रथमदर्शनी साध्यासुध्या वाटणाऱ्या, कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी गावात येऊन राहाणाऱ्या निकच्या वरवरच्या काळजीमागेही काही छुपा हेतू असेलसं वाटायला लागतं. काही नवी रहस्य उघड होतात. लवकरच आपली खात्रीच होते, की एमी गायब होण्यामागे निकचाच हात आहे. पण तेवढ्यात निवेदनाचा दृष्टीकोन पालटतो आणि एमीभोवती संशयाचं वलय तयार व्हायला लागतं.

गॉन गर्लचं पुस्तक आणि चित्रपट हे दोन्ही वाचका-प्रेक्षकाला कसं मॅनिप्युलेट करावं याचा उत्तम धडा आहेत. कोणती गोष्ट उघड करावी, कोणती लपवावी, काय प्रकारे गोष्टी मांडल्या की त्याचा इष्ट परीणाम होईल, हे पटकथा अचूक जाणते. पटकथेत खास करुन कठीण आहे, ते त्यातल्या प्रमुख पात्रांविषयी सहानुभूती तयार करणं. एकतर त्यांच्या वागणुकीचा जराही भरवसा देता येत नाही आणि  दुसरं म्हणजे वैयक्तिक स्वार्थ सोडता त्यांच्या वागण्याला दुसरं स्पष्टीकरण नाही. इतकी आत्मकेंद्री पात्रं क्वचितच कोणत्या कथाप्रधान माध्यमात भेटतात. तरीही या व्यक्तीरेखांशी आपली मैत्री होते. आपण त्यांचं वागणं बरोबर आहे असं म्हणणार नाही, पण आपण त्यांना समजून घेऊ शकतो. हे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार या साऱ्यांचच यश आहे.

हा चित्रपट विविध चित्रप्रकारांना एकत्र आणतो. कधी तो तपासपटाच्या, वा पोलिस प्रोसिजरलच्या वळणाने जातो, तर कधी सायकॉलॉजिकल थ्रिलरसारखा वाटतो. सर्वात लक्षणीय म्हणजे तिसऱ्या अंकात तर त्याची चक्क ब्लॅक कॉमेडी होते. हा तुलनेने छोटा तिसरा अंक काही जणांना रहस्याच्या दृष्टीने अनावश्यक वाटण्याची शक्यता आहे पण खरं तर तो एकूण चित्रपटाचा ज्या पध्तीने अन्वयार्थ लावतो ते पाहाण्यासारखं आहे. किंबहुना तो या चित्रपटाचा वेगळेपणाही म्हणता येईल. त्यातली टिका, त्यातलं निरीक्षण हे केवळ या दोन प्रमुख व्यक्तिरेखांबद्दलचं नसून अधिक व्यापक, एकूण काळावरचं , समाजावरचं आहे. गंमतीची गोष्ट ही, की त्यात मांडलेलं एक सूत्र ( चित्रपटात चमत्कारिक पध्दतीने येत असलं, तरीही) लग्नसंस्थेला सरसकट अप्लाय करता येण्यासारखं आहे. ते म्हणजे संसार टिकवायचा, तर जोडीदाराला कधीही गृहीत धरू नये. एकमेकांचा सतत विचार करणं, आपल्याला त्याची पर्वा आहे याची जाणीव त्यालाही करुन देणं, हे आवश्यक आहे. नातं टिकवणं ही सोपी गोष्ट नाही.

गडद आशयाची मुळातच हौस असलेल्या फिन्चरला( फाईट क्लब, सेवन, झोडीअॅक , द गेम)  हा चित्रपट अतिशय योग्य आहे यात शंकाच नाही. मात्र त्याने आपली तांत्रिक चतुराई मर्यादीत ठेवून बराचसा भाग साध्या पध्दतीने ,क्लुप्त्या टाळून चित्रीत केलाय. ते चित्रपटाच्या प्रभावाच्या दृष्टीने योग्यही आहे, कारण संहितेतली गुंतागुंत त्यामुळे अधिक स्पष्टपणे पोचू शकते. संहितेचा धीटपणा मांडताना त्याने कुठेही तडजोड न केल्याचं एेकीवात आहे, मात्र आपल्या पडद्यावर आलेली आवृत्ती सेन्सॉरच्या कात्रीतून कशीबशी सुटून बरंच काही गमावून आली आहे. त्यामुळे या क्षणी ते पडताळून पाहाणं अशक्य आहे.

तरीही, यंदाचा एक चांगला, डोक्याला चालना देणारा चित्रपट म्हणून गॉन गर्ल चं कौतुक करणं आवश्यक आहे. आणि त्याने दिलेल्या सुखी संसाराच्या (!) मंत्रासाठी त्याचे आभार मानणं देखील.

- ganesh matkari

Read more...

प्यार वाली लव्ह स्टोरी- रोमिओ, जुलिएट आणि दुनियादारी

>> Saturday, October 25, 2014



( स्पॉयलर वॉर्निंग- खासच अनइमॅजिनेटीव्ह वाचका प्रेक्षकासाठी या लेखात कदाचित काही स्पॉयलर असू शकतील. पण फार ढोबळ स्वरुपाचे. )

मी पुणे मिरर साठी मराठी चित्रपटांचं परीक्षण करत नसतो, तर ' प्यार वाली लव्ह स्टोरी' नामक सिनेमा पाहिला असता की नाही, मला माहीत नाही. बहुधा नसताच पाहिला. रिव्ह्यू लिहायचे नसले की आपल्याला हवं ते पाहाण्याचं, खरं तर नको ते नं पाहाण्याचं स्वातंत्र्य असतं, जे फारच आकर्षक आहे. मात्र त्यात एक तोटा असतो. केवळ हवं ते पाहिल्यामुळे आपलं बिग पिक्चरकडे दुर्लक्ष होतं. आपण आपल्या आवडत्या चित्रपटांमंधे रमून एकूण चित्रपटसृष्टीचं काय चाललय हे विसरुन जाण्याची शक्यता तयार होते. मी मुळात मिररची असाईनमेन्ट स्वीकारली त्यामागच्या कारणांत बिग पिक्चरकडे लक्ष ठेवता यावं, आपण नक्की कुठे आहोत नी कुठे जातोय हे स्पष्ट दिसावं,  हे एक प्रमुख कारण होतं.

स्पष्ट बोलायचं तर मराठी चित्रपटाकडे पाहाता, एका चांगल्या चित्रपटाला दोन बरे आणि सात वाईट हे प्रमाण सध्या तरी दिसतय, जे तसं माझ्या अपेक्षेप्रमाणेच आहे. प्यार वाली लव्ह स्टोरी यातल्या कोणत्या वर्गात बसतो हे मला अतिशय निपक्षपातीपणे विचारलं तर मी त्याला तिसऱ्या गटांत टाकणं टाळेन आणि दुसऱ्या गटात घेईन. थोडक्यात , तो बरा चित्रपट मानेन.

चित्रपटांचं परीक्षण करताना मी अनेकदा चित्रकर्त्याला अपेक्षित प्रेक्षक कोण आहे याला महत्व देतो, जे अनेकांना पटत नाही, पण ते योग्य आहे. परीक्षण हे सर्वसामान्य प्रेक्षकाला चित्रपट काय प्रकारचा आहे हे कळावं आणि तो पहावा किंवा नाही, हे ठरवण्याची सोय व्हावी यासाठी असतं. त्यावर जर मी वैयक्तिक आवडीनिवडी लादल्या, तर ते योग्य होणार नाही. मागे एका मोठ्या वर्तमानपत्रात लिहीणाऱ्या विदुषी केवळ आपली आवड ( म्हणजे नातेसंबंधावर आधारीत आणि कलात्मक चित्रपट) सोडून सर्वाना झोडायच्या . त्यांचा स्टार वॉर्सच्या तिसऱया भागाचा रिव्ह्यू हा परीक्षण कसं करु नये याचा सर्वोत्तम नमुना म्हणून माझ्या मनावर कोरलं गेलाय. केवळ त्यांना नातेसंबंधावरला चित्रपट आवडतो म्हणून स्टार वॉर्स मालिका वाईट ठरत नाही. तिचा स्वतंत्र प्रेक्षक आहेच. तो कोण आहे या नजरेतून ते परीक्षण आवश्यक नाही का? त्या चित्रप्रकाराच्या ,शैलीच्या जवळ जाऊन चित्रपट पहाणं हे योग्य. असो. 'प्यार वाली लव्ह स्टोरी'ला कोणता प्रेक्षक अपेक्षित आहे असा विचार केला तर उत्तर मिळेल,  दुनियादारीचा. आणि हा फारच प्रचंड प्रेक्षकवर्ग आहे यात शंका नाही.

आपल्या यशस्वी दिग्दर्शकांचं समीक्षकांना मूर्ख ठरवणारं एक आर्ग्युमेन्ट नेहमी असतं, ते म्हणजे आम्ही एन्टरटेनर्स आहोत आणि आम्ही अभ्यासकांसाठी नाही तर सामान्य माणसांसाठी चित्रपट बनवतो. यात  मोठा गोंधळ आहे, तो म्हणजे समीक्षकांना ( आणि परीक्षकांनीही) करमणूकप्रधान चित्रपट आवडत नाहीत हा समज. फक्त त्यांची एक माफक अपेक्षा असते की चित्रपटांनी करमणूक करतानाही लोकांना मूर्ख समजू नये. या चित्रपटाचा दिग्दर्शक संजय जाधवदेखील चित्रपटातल्या त्रुटींकडे दुर्लक्ष करताना सामान्य माणसाचा कौल घेणार हे उघड आहे. मात्र या चित्रपटात ते एकवेळ चालून जाऊ शकेल कारण यात पूर्ण चित्रपटाला बांधणारी एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे त्यात घेतलेला  रोमिओ अॅन्ड जुलिएट या अजरामर नाट्यकृतीचा आधार. हा आधार चित्रपटाचा एकूण प्रभाव टिकवतो, वाढवतो, आणि चित्रपटाला सुसह्य करतो.


दुनियादारी प्रमाणेच प्यार वाली देखील पिरीअड फिल्म आहे मात्र पिरीअड तितका जुना नाही, नव्वदच्या दशकातला आहे. मुंबईतल्या एका छोटेखानी वस्तीत चित्रपट घडतो. इथे हिंदू मुसलमान गुण्यागोविंदाने पण स्वतंत्र चाळीत रहातात. मुसलमानांमधला दादा आहे कादर ( उपेन्द्र लिमये) तर हिंदूंमधे पश्या ( समीर धर्माधिकारी) . पश्याचं नंदिनीशी ( उर्मिला कानिटकर कोठारे) लग्न ठरतं आणि पश्याचा भाऊ अमर ( स्वप्नील जोशी) त्यात सामील व्हायला येतो. अमर येताक्षणीच कादरच्या बहिणीच्या , आलियाच्या ( सई ताम्हनकर) प्रेमात पडतो. तीही यथावकाश त्याच्या प्रेमात पडते. पण पुढे काही हालचाल होईपर्यंत आलियाच्या वडीलांनी तिचं लग्न दुसऱ्याशी ठरवलेलं असतं. लग्नाच्या धामधुमीतच मुंबईतल्या दंगलींना तोंड फुटतं आणि परिस्थिती अधिकच बिघडते.

मरणानंतर अनेक शतकं उलटल्यावरही शेक्सपिअरचा जागतिक चित्रपटांवरचा, त्याच्यावेळी अस्तित्वातही नसलेल्या या माध्यमावरचा प्रभाव पाहिला की चक्रावायला होतं. नुकत्याच आपल्याकडे येऊन गेलेल्या राम लीला आणि हैदर नंतरच हे माहितीतलं तिसरं शेक्सपिअर रुपांतर, तेही फक्त यावर्षातलं. शेक्सपिअरला आहे तसा घ्या वा त्यातल्या प्रमुख संकल्पना वापरा, तपशील / संवाद मुळासारखे ठेवा वा बदलून टाका, त्याचा परिणाम हा रहातोच. इथेही तो आहेच. जाणवण्यासारखा.

'प्यार वाली लव्ह स्टोरी' चा प्रेक्षक, हा करमणूकप्रधान चित्रपटाचा प्रेक्षक आहे हे तर झालंच, पण तो चित्रपटाकडून अतिशय किमान अपेक्षा ठेवणारा प्रेक्षकही आहे. त्याला चित्रपटात नेहमीचा मसाला , म्हणजे कॉमेडी, हाणामाऱ्या, प्रेम, गाणीबजावणी वगैरे लागतं पण ते ढोबळ स्वरुपाचं. संहितेत काही विचार, कलामूल्य असण्याची त्याला गरज भासत नाही. चटका लावणाऱ्या शोकांतिकेचं 'प्यार वाली लव्ह स्टोरी' असं गुलछबू नाव असण्यात काही गैर वाटत नाही कारण मुळात ते नाव त्यांनाच आकर्षित करण्यासाठी दिलेलं आहे हे तो जाणून आहे. त्याला चित्रपटाकडून ना कलात्मक दृष्टी अपेक्षित आहे, ना सोफेस्टिकेशन. उलट टाळीबाज संवाद, व्यक्तिरेखेबरोबर नं जाणारे विनोद, प्रत्येक दृष्यातली रंगाची आतषबाजी , क्षणभर उसंत नं देणारं ढणाढणा संगीत, हे सारच त्यांना चालणार आहे. त्याबद्दल त्यांची तक्रार नाही.

आता मुळात चित्रपटात हे सारं इतक्या ढोबळ पध्दतीने का मांडलं , यावर 'प्यार वाली' चा एक्स्क्यूज काय असावा?  तर हे सारं असं मांडलय, कारण या मांडणीला तयार प्रेक्षक उपलब्ध आहे. समजा सिनेमा अधिक संयत असता , व्यक्तिरेखा अधिक खोल असत्या, संवाद वरवरचे नसून अर्थपूर्ण असते, तर तो चालला असता याची काय गॅरेन्टी? त्यापेक्षा जे गेल्या चित्रपटात यशस्वी ठरलं आहे ते चालू दे. फॉर्म्युला तसाच राहू दे. इफ इट अेन्ट ब्रोक, डोन्ट फिक्स इट.

'प्यार वाली' बरा आहे की नाही, तो चालणार का नाही, यापेक्षा मला वाटतं ही जुन्याला धरुन रहाण्याची वृत्ती हा इथला खरा कळीचा प्रश्न आहे ज्यावर आपण स्वतंत्रपणे विचार करायला हवा. हा केवळ आपल्याकडेच आहे असं नाही. हिंदी व्यावसायिक चित्रपटांमधे तर तो आपल्याहूनही अधिक बिकट स्वरुपात आहे. प्रेक्षक अमुक प्रकारचा आहे या निरीक्षणावरुन त्याच त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत राहायची असेल, तर चित्रकर्त्यांच्या सर्जनशीलतेचा उपयोग काय? आणि प्रेक्षक सुधारत नाही ही जबाबदारीदेखील अखेर  चित्रकर्त्यांचीच नाही का? प्रेक्षकांना जर ठराविक वळणाच्याच गोष्टी पहायला मिळाल्या तर तो सुधारणार तरी कसा?

असं असूनही, मी 'प्यार वाली लव्ह स्टोरी'ला अगदी बाजूला टाकणार नाही. त्याच्या मूळ कथासूत्रामुळे वा आणखी कशाने, पण आजकाल चित्रपटीय रोमान्सच्या नावाखाली आपल्याला ज्या  फुटकळ चित्रपटांना पहावं लागतं त्यापेक्षा या चित्रपटाची प्रवृत्ती ही मूळातच अधिक जोरकस आहे. कथानकाची वीण फार पक्की नसली तरी वीण आहे. कलाकार चांगले आहेत, त्यातल्या बहुतेकाना करायला काही आहे. मला सर्वात अधिक आवडलं ते उर्मिला कानिटकर कोठारेचं छोटेखानी काम. या व्यक्तिरेखेत सातत्य नाही, आणि तिची चित्रपटाच्या सुरुवातीची प्रतिमा पुढे ढेपाळत जाते, पण तो दोष संहितेचा आहे, अभिनेत्रीचा नाही. इतर नटसंचही चांगलाच आहे. पटकथा, दिग्दर्शनाने जर निश्चित मागणी केली असती , तर ती पूर्ण करण्याची ताकद असणारा .

'प्यार वाली' याच नट आणि तांत्रिक संचात अधिक उंची गाठू शकला असता का? निर्विवादपणे. पण ती गाठायची तर परिचीत प्रेक्षकांच्या सेफ्टी नेटचा आधार सोडण्याची तयारी हवी. चित्रपट आशयघन नसेल तर हरकत नाही पण करमणुकीतही काय दर्जात्मक सुधारणा होऊ शकते हे पडताळून पहाता आलं पाहीजे. निदान ते होऊ शकतं असा विश्वास पाहिजे. आज तो फार कमी मराठी चित्रपटांमधे दिसतो. तो अधिक दिसायला लागेल तेव्हा चित्रपटांचं प्रमाणही बदलायला लागेल. पण या झाल्या जरतरच्या गोष्टी. आजचं काय, हा प्रश्न उरतोच !

- ganesh matkari

Read more...

कुंपणावरुन

>> Monday, October 6, 2014





ललित ' अॉक्टोबर २०१४ मधल्या स्वागत स्तंभासाठी लिहीलेला लेख-

आठवतं तेव्हापासून मला मतकरींचा मुलगा म्हणून आेळखतात. मतकरी म्हणजे अर्थातच रत्नाकर मतकरी. हा आडनाव पुरेसं अनयुजवल असल्याचा अॅडव्हान्टेज ( आणि क्वचित डिसअडव्हान्टेज), कारण पूर्ण नाव सांगताच मतकरी कनेक्शन समोर यायचंच. शाळा काॅलेजमधे असताना याचा खूपच फायदा. थोडा कमी अभ्यास चालून जाणं, थोडा बेशिस्तपणा खपून जाणं वगैरे. पुढे पुढे ,' तू नाही का लिहीत, बाबांसारखं?' वगैरे अनावश्यक प्रश्न. ज्याची उत्तरं अर्थातच नम्रपणे नकारार्थी, कारण लिहिणं हा माझ्या महत्वाकांक्षेचा भाग कधीच नव्हता. वाचन मात्र खूप. आमच्याकडली चिकार पुस्तकं, त्यात भर म्हणून पपांकडली पुस्तकं. पपा म्हणजे ज्येष्ठ नाट्यसमीक्षक माधव मनोहर. माझ्या आईचे वडील. वाचनाबरोबर नाटकं, सिनेमे पाहाण्याची आवड. अनेक घरात मुलांनी वरचा नंबर काढावा या अपेक्षेने क्लासेस वगैरे सुरु होतात आणि  बिचारी मुलं सिनेमे पाहाण्यात मागे पडतात. तसं काही माझं झालं नाही.

आमच्याकडे बालनाट्य आणि सूत्रधार या संस्थांमुळे सतत नाटकांचं वातावरण असल्याने नाटकात काम वगैरे, बाय डिफाॅल्ट. करायचं आहे का वगैरे प्रश्न नाही. गरज असली ,भूमिका असली, की उभं राहायचं. पण माझ्या मते मला हा इन्टरेस्टही फार तयार झाला नसावा. कधीतरी माझ्या डोक्यात ( तेही कुठून कोणाला माहीत) आर्किटेक्ट व्हायचं आलं आणि मग त्या शिक्षणादरम्यान मी ती कामंही बंद केली. पुढे चित्रमालिकांदरम्यान बाबांना मदत करायला लागलो, पण तो पडद्यामागे, समोर नाही.

या सगळ्या काळात बाबा आणि पपा यांनी कोणत्याही दिशेला जाणूनबुजून ढकललं नाही. दोघांचाही तसा व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास, त्यामुळे ज्याला जे वाटेल ते करु द्यावं असा कल. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या लेखनक्षेत्रात , म्हणजे क्रिएटीव रायटिंग आणि क्रिटिसिजम मधे नावाजलेल्या या माणसांनी, मला कधीही 'अमुक कर' असं सुचवलं नाही. मात्र त्यांच्याबरोबर फिजिकली असल्याचा फायदा हा झालाच. त्यांच्या ( आणि त्यांच्याबरोबरच्या ) गप्पा, चर्चा, पपांची पुस्तकांबद्दलची रेकमेन्डेशन्स, बाबांची नाट्यवाचनं या सगळ्यामधून काहीतरी आपोआप डोक्यात शिरलं असणारंच, कारण पुढे वयाच्या सव्वीसाव्या वर्षी मी जेव्हा चित्रपटसमीक्षा लिहायला लागलो, तेव्हा मी ती खूपच सहजपणे लिहीली.

या सुमारास, म्हणजे १९९७ मधे, मी आर्किटेक्ट होऊन नोकरीला लागलो होतो. माझ्याच आर्किटेक्चर स्कूलला जुनिअर असलेल्या पल्लवी देवधरशी लग्नं झालं होतं. तीन वर्ष एका कामानिमित्ताने गोव्यात काढून नुकताच मुंबईत आलो होतो. आपलं महानगरचे तत्कालिन संपादक निखिल वागळे माझ्या वडिलांचे चांगले मित्र होते. एकदा आमच्याकडे आले असताना असंच काही बोलणं निघालं आणि त्यांनी मला ,'तू आमच्याकडे इंग्रजी चित्रपटांची परीक्षणं का करत नाहीस?' असं सुचवलं. पुढल्या आठवड्यापासनं मी ' अॅक्सिडेन्टल समीक्षक' झालो तो झालोच. पुढे वागळे संपादन करीत असलेला दिवाळी अंक अक्षर आणि मीना कर्णिक संपादन करत असलेला चंदेरी यातही मी नियमितपणे चित्रपटविषयक लेख लिहायला लागलो. ललित लेखनाची शक्यताही पडताळून न पाहाता.

समीक्षेला लेखन म्हणायचं की नाही, हे मला माहीत नाही किंवा दुसर््या शब्दात सांगायचं तर समीक्षक हा लेखक असतो का ? किंवा मानला जातो का? जावा का? हे मला माहीत नाही. पण या प्रकारचं लेखन मी बर््यापैकी केलं. वृत्तपत्रीय समीक्षा, सदरलेखन आणि मोठे लेखही. दरम्यान पाहाण्याचा ,चित्रपटांविषयी वाचनाचा अवाका वाढवत नेला. प्रभात चित्रमंडळ चा सभासद होऊन जागतिक चित्रपटांकडे अधिक डोळसपणे पाहायला लागलो. माझं वाचन लेखन वाढण्यात अरुण खोपकरांसारख्या ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक/ दिग्दर्शकांची खूप मदत झाली.

वृत्तपत्रीय किंवा साप्ताहिकातल्या चित्रपटसमीक्षेला मर्यादा असते हे मान्य पण मला स्वतःला हा प्रकार खूप इन्टरेस्टिंग वाटतो. पारंपारिक फाॅरमॅट ला चिकटलं नाही, तर थोडक्या जागेतही बरंच काही सांगण्यासारखं असतं.  मुळात तुम्हाला स्वतःला जी गोष्ट इन्टरेस्टिंग वाटेल त्यावर तुम्ही फोकस ठेवला, तर जागा हा फार मोठा मुद्दा उरत नाही. माझं महानगर आणि साप्ताहिक सकाळ मधलं लेखन मला या दृष्टीने मोठ्या लेखांपेक्षाही अधिक आवडायचं. अशा या समीक्षेची माझी तीन पुस्तकं प्रकाशित झाली. 'फिल्ममेकर्स' आणि 'सिनेमॅटीक'मधे मोठे लेख, तर महानगरमधे येणार््या एका स्तंभाचं पुस्तकरुप असणारं 'चौकटीबाहेरचा सिनेमा'. तरीही, पुस्तकरुपात प्रकाशित नसलेलं बरच आहे.

माझ्या या लिखाणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मॅजेस्टीक आणि अक्षर सारख्या चांगल्या प्रकाशनांनी जिव्हाळ्याने काढल्याचा फायदाही झाला. वृत्तसमीक्षा आणि सदरलेखन  विशेषतः तरुण वर्गाला खूप आवडलं. ते माझ्यापर्यंत पोचलं, ते मात्र नंतर लिखाण ब्लाॅगवर यायला लागलं त्या सुमारास. ब्लाॅग, फेसबुक, याला बरेच जण रिकामपणचा उद्योग समजले, तरी मला तसं वाटत नाही. लिहीणारा आणि वाचणारे, यांच्यात संवाद घडायचा, तर ही माध्यमं फार उत्तम आहेत. अर्थात, त्या वापरावरही नियंत्रण हवं.

मी आमच्या घरच्या प्रोजेक्ट्समुळे , मग ती नाटकं ,चित्रमालिका असोत, किंवा गेल्या वर्षी नॅशनल अवाॅर्ड मिळालेला इन्वेस्टमेन्ट चित्रपट असो, समीक्षेकडे केवळ प्रेक्षकांच्या खुर्चीतून पाहू शकत नाही. तसा मी कुंपणावर बसलेला समीक्षक आहे असं म्हणता येईल. चित्रपटांकडे दोन्ही बाजूने पाहाणारा, पण तरीही प्रॅक्टिकल प्राॅब्लेम्स हा दर्जा घसरण्याचा एक्स्क्यूज न मानू शकणारा. पपा असते, तर त्यांच्या मार्गदर्शनाने माझ्या लिहीण्याच्या प्रकारात काही फरक पडला असता का? तसं नाही वाटत.
आपल्याकडे गंभीरपणे लिहिण्यात, मग ते कोणत्याही प्रकारचं असो, एक मोठी अडचण असते, ती म्हणजे अर्थकारण. त्यामुळे पूर्णवेळ लिहीणं हे अनेक लेखकांना शक्य होत नाही. माझ्या स्वतःच्या वडीलांनी त्यांच्या विपुल लिखाणातून अन खासकरुन नाट्यलेखनातून हे करुन दाखवलं. मला त्या प्रमाणात न लिहीताही हवा तेव्हा, हवा तितका वेळ उपलब्ध करुन देता येतो तो मात्र पल्लवीमुळे. घराची थेट जबाबदारी तिने उचलल्याने, माझ्या वेळाचा मुक्त वापर करणं मला शक्य तरी होतं. तिने स्वतःहून हे ठरवलं नसतं, तर मी सध्या करतो त्याच्या अर्ध्या प्रमाणातही काम करु शकलो असतो का, ही शंकाच आहे. आणि ही महत्वाची गोष्ट करुनही ती घरच्या प्रोजेक्ट्समधेही गुंतलेली असतेच. अगदी लिहीलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यापासून ते निर्मितीत सक्रीय सहभाग घेण्यापर्यंत अनेक बाबतीत.
मला माझ्या लिहिण्यात, किंवा एकूणच, एक गोष्ट नेहमी जाणवते, की काम डोक्यावर दिलं, आणि डेडलाईन दिली, तर ते होतं, अन्यथा होण्याची गॅरेन्टी नाही. बहुधा त्यामुळेच, अनेक वर्ष डोक्यात असूनही , कोणी डेडलाईन न दिल्याने मी क्रिएटीव रायटींगचं मनावर घेतलं नाही. बाबांप्रमाणेच माझी बहीण सुप्रिया लिहीत होतीच. आता कोणी लिहीण्याबद्दल विचारलं, तर सुप्रियाने आणि मी , ललित आणि समीक्षा अशी डिपार्टमेन्ट वाटून घेतल्याचं मी सांगायला लागलो होतो. पण ते सांगण्यापुरतं. आपणही लिहून पाहावं असा विचार डोक्यात यायला लागला होता. त्याला मुहूर्त मिळाला, तो इन्वेस्टमेन्ट नंतरच्या काळात मोकळा वेळ असताना.
या वेळी मी दोनतीन दिवस बसून एक कथा लिहून काढली. काहीशी सेमी आॅटोबायग्राफिकल पण तपशील हा मुद्दा नव्हता. मुद्दा होता, तो मला माझ्या आजूबाजूचा आजचा  बदलता मध्यमवर्ग जसा दिसतोय तसा मांडायचा होता, हा. मी इंग्रजीच्या तुलनेत मराठी कमी वाचत असल्याने, मला आजच्या साहित्यात या वर्गाबद्दल कसं, काय लिखाण झालय याची कल्पना नव्हती. त्यामुळे आपल्याला जे दिसतय ते मांडून पाहू अशी कल्पना होती. एक कथा पूर्ण होताच तिला जोडणार््या इतर कथाही दिसायला लागल्या आणि कथा-कादंबरीच्या मधल्या फाॅर्ममधलं काही डोळ्यासमोर आलं. हे लिखाण 'अनुभव' मासिकाने कथामालिकेच्या स्वरुपात प्रकाशित केलं आणि  समकालीन प्रकाशनाने ते नुकतंच  ' खिडक्या अर्ध्या उघड्या', नावाने पुस्तकरुपात प्रसिध्द केलंय.
सध्या मिळणारा प्रतिसाद ललित लेखन पुढे चालू ठेवावं असं वाटायला लावणारा आहे. साहित्यिक आणि समीक्षकाकडून ते चांगलं रिसीव्ह होतय, पण त्याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे साधा वाचकही त्यातल्या प्रयोगाबियोगाचा विचार न करताही ते आहे तसं वाचून पाहातोय आणि त्याला ते आहे तसं आवडतंय. त्या आनंदात मी नवीन काही लिहायला घेतलंही आहे.
पुढे काय करावं हे निश्चित नाही, पण निश्चित कशाला असायला हवं. या दोन्ही प्रकारातलं लेखन सुरु ठेवून पाहू पुढे आणखी काय नवीन करता येतं ते !


- गणेश मतकरी

Read more...

हैदर- अस्वस्थ व्हा !

>> Saturday, October 4, 2014



दर्जातलं सातत्य, या एका पातळीवर पाहायचं, तरी विशाल भारद्वाजची शेक्सपिअर चित्रत्रयी थक्क करुन सोडणारी आहे. शेक्सपिअरमधे मुळात व्यावसायिक वळणाचं नाट्य पुरेपूर असलं, तरी तो रुपांतरीत करायला सोपा अजिबातच नाही. त्याच्या नाटकांमधले तपशील, रचनेचे बारकावे, व्यक्तित्रणावरची हुकूमत आणि त्याच्या शोकांतिकांमधे अधिक जाणवणारी, पण सर्वच नाटकात असणारी गुंतवून ठेवणारी कथनशैली या सगळ्याला न्याय देणं सोपं नाही. आॅर्सन वेल्स पासून राल्फ फाईन्स पर्यंत आणि सर लाॅरेन्स आॅलिविएपासून इथन हाॅकपर्यंत  जगभरातल्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी आणि नटांनी आजवर नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांमधे शेक्सपिअर समर्थपणे उभा केला आहे. विशाल भारद्वाजचे मकबूल, ओंकारा आणि आता हैदर हे मॅकबेथ, आॅथेल्लो आणि हॅम्लेट या तीन सुप्रसिध्द शोकांतिकांची रुपांतरं मांडणारे चित्रपट, या चांगल्या रुपांतरांत सहजच घेता येतील.
सध्याच्या नव्या हिंदी सिनेमातलं भारद्वाज हे अपवादात्मक नाव आहे.या मंडळींमधल्या बहुतेकांचा हेतू हा काहीशा व्यक्तीगत, गंभीर पण मिनिमल स्वरुपाच्या गोष्टी सांगण्याचा आहे. याऊलट भारद्वाजचे चित्रपट भव्य आणि अभिजात वळणाचे असून प्रयाेगशीलदेखील आहेत. मोठे स्टार्स, नाट्यपूर्ण कथानकं, वादग्रस्त विषय असं सारं असूनही ते कधीही व्यावसायिकतेला वाहिलेले दिसत नाहीत. कलाकृतीचा विचार प्रथम आणि आस्वादकाचा दुय्यम असा या खऱ्या कलावंताचा दृष्टीकोन आहे.
जर भारद्वाजच्या चित्रत्रयीत दर्जात्मक क्रम लावायचा तर मी हैदरला इतर दोन चित्रपटांच्या मधे ठेवेन. ओंकाराचा नंबर सर्वात वर लावीन. याला उघड कारण रसास्वादाची क्षमता हे आहे. ओंकारा ही आॅथेल्लोचं यथार्थ रुपांतर तर होताच वर तो सर्वांना सरसकट आवडेलसा व्यावसायिक चित्रपट होता. गाणी म्हणा, परिचित रुपातले आवडणारे परफाॅर्मन्स, सैफची ( त्याला भलता आत्मविश्वास देऊन गेलेली ) नकारात्मक भूमिका असे सर्वसामान्य प्रेक्षकाला आवडतीलसे घटक असूनही ते उत्तम रुपांतर होतं. इतर दोघांचं वळण हे तितकं व्यावसायिक नाही. हैदर बाबत बोलायचं तर त्याचं काहीसं अव्यावसायिक असणं हे हॅम्लेटशीच जोडलेलं आहे. हॅम्लेट करायला तितका सोपा नाही कारण मुळात ही तशी पॅसिव्ह व्यक्तिरेखा आहे. तो नायक आहे, भला माणूस आहे, पण स्वत:हून तो काही करु पहात नाही. कोणीतरी सांगणं, परिस्थितीने नाईलाज करणं या गोष्टी त्याला काही करायला भाग पाडतात. दुसरं म्हणजे प्रत्यक्ष घटनांपेक्षा मानसिक द्वंद्व हा इथला महत्वाचा भाग आहे. आपल्याकडल्या नायकांना सामान्यत: प्रोअॅक्टीव गोष्टी जमतात आणि प्रेक्षकांनाही तीच अपेक्षा असते. नायकाने चार लोकाना बडवून काढलं की आपण खूष होतो. तो आपल्या कृतीच्या योग्यायोग्यतेचा विचार करायला लागणं आपल्याला झेपत नाही. त्यामुळे हैदरचं खरं आव्हान आहे ते हा असा ( टोकाचा) विचारी नायक आपल्यापुढे शक्य तितक्या प्रामाणिकपणे आणणं हे.

दुसरं, आणि तितकच मोठं आव्हान आहे ते विशाल भारद्वाजने निवडलेली गडद पार्श्वभूमी. नव्वदच्या दशकातलं काश्मीर आणि त्याची दुभंगलेली अवस्था ही शक्य तितकी खरी उतरवण्यासाठी भारद्वाजने पत्रकार पीर यांची मदत घेऊन शक्य तितकं अस्सल चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीचा विशेष हा, की ती हैदरच्या मनातल्या गोंधळाला एक वेगळा पैलू देते. काश्मीरच्या जनतेचं कोण आपला नं कोण परका या गोंधळात अडकणं, हे हैदरच्या आपल्याच लोकांनी केलेल्या विश्वासघाताचं आणखी एक रुप ठरतं आणि चित्रपटाचा आशय विस्तारतो.
हैदरची गोष्ट बहुतेकाना परिचित असावी, अर्थात हॅम्लेट माहीत असल्यास. इथला हैदर ( शाहीद कपूर) आपल्या दहशतीच्या छायेतल्या गावी परततो तेव्हा त्याला कळतं की त्याच्या डाॅक्टर वडिलांना दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरुन भारतीय सेनेने पकडून नेलय. अशातच तो आपल्या आईला ( तबू ) काकाबरोबर ( के के ) नको इतक्या जवळकीने वागताना पाहातो आणि विश्वासघाताच्या जाणीवेने त्रस्त होतो. वेडापिसा होऊन आपल्या वडिलांचा शोध घेणाऱ्या हैदरला  आपल्या पत्रकार मैत्रिणीच्या ( श्रध्दा कपूर , त्यातल्यात्यात बेताचा अभिनय) मार्फत एक निरोप मिळतो आणि पित्याच्या मृत्यूला काका कारणीभूत असल्याचं लक्षात येतं. सूडाच्या भावनेने पेटलेला हैदर बदला तर घ्यायचं ठरवतो, पण त्याची मनोवस्थाच त्याला दगा देणार अशी चिन्ह दिसायला लागतात.
हॅम्लेटचं नाव जगातल्या अशा मोजक्या क्लासिक्समधे घेता येईल ज्यांचे अनेक तपशील, ती न वाचणाऱ्या पहाणाऱ्यांनाही माहीत आहेत. रुपांतरांमधून, वेळोवेळी इतरांनी वापरलेल्या संदर्भांमधून आणि एकूण लोकप्रियतेमधून ती सर्वांपर्यंत पोचलेली आहे. ' टु बी आॅर नाॅट टु बी' हे स्वगत आणि हॅम्लेटची हातात कवटी धरलेली मूर्ती तर प्रसिध्द आहेच, वर त्यातला नाटकाचा प्रसंग, हॅम्लेटच्या बापाचं भूत अशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत. यातल्या बहुतेक गोष्टी, चित्रपटाचा वास्तव पार्श्वभूमीचा धागा शाबूत ठेवत आणण्याचा यशस्वी प्रयत्न लेखन/ दिग्दर्शनात दिसतो. बापाच्या भूतासाठी काढलेली पळवाट तर फारच जमलेली आहे आणि प्रथमदर्शनी तिने दचकवलं तरी पुढे ती अधिकाधिक योग्य वाटत जाते. नाटकाची जागा घेणारं 'बिस्मिल' हे गाणं बाॅलिवुड परंपरेत चपखल बसतं हा त्याचा विशेष आहे तसंच मर्यादाही. विशेष अशासाठी , की गाणं आणि सादरीकरण दोन्हीतही ते उत्तम आहे आणि मूळ प्रसंगाचा परिणाम ते साधू शकतं. मर्यादा अशासाठी की एरवीच्या वास्तव प्रकृतीबरोबर हे ( किंवा टु बी आॅर नाॅट टु बी ची रस्त्यातली आवृत्ती देखील) तितकं जात नाही. आणि ज्यांनी कर्ज किंवा ओम शांती ओम पाहिलेत त्याना हे गाणं सहजच त्या दोन चित्रपटांतल्या अशाच प्रसंगांची आठवण करुन देतं.
प्रसंगांप्रमाणेच व्यक्तिरेखांचही इथलं रुपांतर चोख आहे. गर्टरुड ( आई ) आणि क्लाॅडीअस ( काका) पासून रोझान्क्रान्झ आणि गिल्डनस्टर्न ( दोन सलमान ) पर्यंत सर्व महत्वाच्या व्यक्तिरेखाना इथे समांतर पात्रयोजना आहे. बदललेल्या आशयस्वरुपामुळे घटनांच्या कालावधीत थोडं पुढेमागे करण्यात आलय, पण शब्दश: रुपांतर हे इथे अभिप्रेत नाही. या तिन्ही चित्रपटांत मूळ कलाकृतीला नव्या संदर्भांमधे बसवण्यात आलय आणि ते करायचं तर तर असे काही बदल आवश्यक आहेत.
काही जणांना चित्रपटाचा पूर्वार्ध हा संथ वाटतो आणि तो तसा आहे देखील. बरेच बाॅलिवुड चित्रपट कथेत शिरताच घटना घडवायला सुरुवात करुन वेगाचा आभास आणतात कारण सामान्य व्यावसायिक प्रवृत्तीच्या हिंदी चित्रपटांना काॅन्टेक्स्ट आवश्यक नसतो. त्या कथा कुठेही कशाही घडू शकतात. शिवाय घटना घडवणं ,एका पाॅइन्टपासून दुसऱ्यापर्यंत प्रवास करणं , हे प्रमुख सूत्र असतं. तसं इथे करणं शक्य नाही  कारण हैदरने तसं करणं हे त्याच्या मूळ प्रकृतीलाच इजा पोचवणारं ठरलं असतं. इथला पहिला भाग हा पार्श्वभूमी उलगडणं आणि त्या पार्श्वभूमीचं हैदरच्या मनोव्यापारांशी समांतर असणं स्पष्ट करतो. हे पटेलसं करायचं तर वेळ हा लागणार. ज्यांना तो घालवण्याची इच्छा नसेल त्यांनी आपण कोणते चित्रपट काय हेतूने पाहातो यावर पुनर्विचार करणं आवश्यक आहे.
शाहीद कपूर आणि तबू, या दोघांचा हा चित्रपट आहे. लांबी पाहिली तर शाहीदचा, पण तबूशिवाय त्याचा तोल राहाणार नाही. श्रध्दा कपूर वगळता, बाकी सहाय्यक नटसंचही चांगला आहे, पण तो कायम दुय्यमच राहातो. शाहीद चांगला अभिनेता असून त्याला रोमान्स आणि विनोदावर फुकट घालवलं जातं हे आपण जाणतोच.भारद्वाजच्या कमीने मधे शाहीद होता पण ती भूमिका इतकी लक्षवेधी नव्हती. हैदरमधली आहे. लंगडा त्यागीने जशी सैफच्या कारकिर्दीला वेगळी दिशा दिली तशी हैदर शाहीद कपूरच्या कारकिर्दीला देण्याची शक्यता दिसते.
हैदरचा शेवट हा भारतीय प्रेक्षकाची परीक्षा घेणारा आहे. तो सुखांत तर नाहीच , वर वैयक्तिक विध्वंसाची नवी गणितं मांडणारा आहे. बाॅलिवुड वळणाचे शेवट आपण बाजूलाच ठेवू, पण नव्या वळणाच्या गँग्ज ऑफ वसेपूर सारख्या चित्रपटाच्या शोकांतातही एक प्रकारचा विजय गृहीत धरलेला आहे. हैदरमधे या प्रकारचं समाधान नाही. प्रेक्षकाचं अस्वस्थ होणं ,ही यावर संभवणारी त्यातल्यात्यात संयत प्रतिक्रिया. ही कितीही टोकाला जाऊ शकते. पण चित्रपटाने अस्वस्थ करणं, विचार करायला लावणं यात वाईट काय आहे ? वेगळा अनुभव देण्याची खरोखर क्षमता असणारे चित्रपट क्वचित मिळतात. मग जेव्हा ते येतात, तेव्हा त्या अनुभवाला नाकं नं मुरडता सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहीजे. तेव्हा पहा आणि अस्वस्थ व्हा. सततच्या कृत्रिम आनंदावर हादेखील उतारा ठरु शकेल.

- -ganesh matkari

Read more...

चित्रपट रसास्वादाची गरज

>> Sunday, August 17, 2014


आपल्याकडे आस्वाद या गोष्टीला तशीही फार कमी किंमत आहे, मग तो चित्रपटांचाच असं नाही. माझ्या मते आपल्याला साहित्य, कला या  सर्वच प्रांतात महत्व वाटतं, ते समजून घेण्यापेक्षा मत देण्याला. चित्रपटात ते जरा जास्त प्रमाणात आहे इतकंच. आणि एका परीने ते साहजिकच आहे.
लहानपणापासून आपल्यासमोर साहित्य आणि एकूण कलांना सादर केलं जातं ते काहीशा गांभीर्याने, तेही मोठे लेखक, कलावंत यांच्या जुजबी माहितीसह. शाळांमधून या विषयांना मान असतो. हे सारं कोणत्या का मार्गाने होईना पण आपल्या संस्कृतीशी संबंधित आहे असं वलय या विषयांभोवती असतं. साहित्यात गोष्टीही सांगितल्या जात असल्या तरी पालकांच्या मनातला काही साहित्यकृतींचा, साहित्यिकांविषयीचा आदर कुठेतरी मुलांपर्यंत पोचतो. तीच गोष्ट काही प्रमाणात कलेची. विरंगुळ्यापेक्षा तंत्रासाठी, चित्रकाराच्या, शिल्पकाराच्या नावासाठी या कलाकृती पाहिल्या जातात. त्यांना महत्व दिलं जातं. चित्रपटांचं असं होत नाही.
घरात पहिल्यापासूनच आपल्याला शिकवणी मिळते की हे सारं करमणुकीसाठी आहे, खरं तर ते नं पाहाता अभ्यासच केलेला बरा. चित्रपट ही कलाही असली तरी त्यातल्या खर््या मास्टर्सच्या कलाकृती आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि चित्रपटगृहात दिसणारं सारंच एका पठडीचं असतं. त्यावर चर्चा होत नाही, गप्पा होतात. मतं व्यक्त केली जात नाहीत, शेरेबाजी केली जाते. त्यासंबंधी समीक्षा वाचली जात नाही, गाॅसिप वाचला जातो.
 या परिस्थितीत चांगले चित्रपट पाहण्याची शिस्त तयार होणार कशी?अन ती तयार झाली नाही तर चांगला प्रेक्षक तयार होणार कसा? आणि प्रेक्षकच बनला नाही, तर त्याला पाहाण्यासाठी चित्रपट निर्माण करणार कोण ? सध्या आपल्याकडलं एकूण आणि खासकरुन मराठी चित्रपटांचं वातावरण पाहिलं तर दिसतं, की आज आपल्याकडे चांगला चित्रपट कोणता याविषयीही काही प्रमाणात संभ्रम आहे. काहींच्या मते केवळ गंभीर वा सामाजिक समस्या मांडणारा चित्रपटच खरा आणि व्यावसायिक चित्रपट टाकाऊ तर काही जण ब्लाॅकबस्टरच्या प्रेमात राहून कोणत्याही वेगळ्या प्रयत्नाला शिव्या देणारे. खरं तर असा सरसकट 'सब घोडे बारा टक्के' करणारा दृष्टीकोनच चुकीचा आहे. चित्रपट चांगला का वाईट, हे तो कोणत्या प्रेक्षकाला डोळ्यासमोर ठेवून केलाय यावर ठरत नाही, त्याचा विषय गंभीर का विनोदी यावर ठरत नाही, तो तिकीट खिडकीवर चालला का पडला यावर ठरत नाही. ते ठरवण्यासाठी तुमची चित्रपटाकडे पाहाण्याची एक दृष्टी तयार व्हावी लागते.
चित्रपटाकडे करमणूक म्हणून पाहाण्यात काहीच हरकत नाही , पण करमणूकीची व्याख्या आपण काय करतो याचाही विचार हवा. केवळ पारंपारिक मेलोड्रामा, हाणामार््या वा खुर्चीतून पाडणारा विनोद हीच करमणूक नव्हे. चित्रपटाने तुम्हाला त्याच्या कथानकात अडकवणं, गुंतवणं हीदेखील करमणूकच झाली. मग त्यासाठी  चित्रपट वरवरच्या ढोबळ पारंपारिक युक्त्या वापरो वा नवीनच एखाद्या मार्गाने तुम्हाला आकर्षित करो. त्यातून करमणूक व्हावी हे मान्य केलं, तरी चित्रपटाचा आस्वाद केवळ  गोष्ट समजून घेण्यात, संवादांना दाद देण्यात, वा एखाद्या तयारीच्या नायकाचा़ अभिनय पाहाण्यात संपत नाही. ती तर सुरुवात असते. आपण जितकं खोलवर पाहू तितक्या अधिक गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात. कधी वरवर कथेत वाहवत जाताना न समजून आलेल्या दिग्दर्शन , छायाचित्रण, संकलनासारख्या गोष्टींचं निरीक्षण आपल्याला माध्यमाचं नवं आकलन करुन देतं,  कधी आशयाचा एखादा छुपा पैलू आपल्याला नव्याने दिसून येतो, तर कधी या चित्रकर्त्याच्या इतर कामाबरोबर घातलेली सांगड आपल्यासाठी चित्रपटाचा वेगळाच अर्थ लावून जाते. अर्थातच हे सारं केवळ तुम्ही ठरवून होत नाही, होणार नाही. त्यासाठी निश्चित प्रयत्न होणं आवश्यक आहे.
गेल्या दहा वर्षांमधे मराठी चित्रपटांनी घेतलेली झेप ही लक्षणीय आहे. मात्र आज आपण ज्या पातळीला आहोत त्याहून वर जायचं, वा त्याच पातळीला राहायचं तरीही केवळ आपले निर्माता दिग्दर्शक तयारीचे असून भागणार नाही. त्यांची तयारी हवीच , पण त्यांच्या कामाला योग्य तो प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांकडून मिळायला हवा. तो मिळायचा तर प्रेक्षकाने आपली दृष्टी तयार करायला हवी.
म्हंटलं तर हे कठीण नाही. आज परिस्थिती खूप बदललेली आहे. आपल्याला पाहाण्यासाठी जगभरचा सिनेमा आज उपलब्ध होऊ शकतो. तीच गोष्ट पुस्तकांची. चित्रपटाचा रसास्वाद शिकवणारी उत्तमोत्तम पुस्तकं आज उपलब्ध आहेत. चांगल्या वेबसाईट्स आहेत.  मात्र ही झाली साधनं. नुसती ती असून भागणार नाही. आपल्या बाजूनेही प्रयत्न हवा. केवळ पुस्तकांचा सल्ला आंधळेपणाने न स्वीकारता, किंवा हाताला लागेल तो नवा चित्रपट केवळ मिळतोय म्हणून डाऊनलोड न करता आज प्रेक्षकाने विचारांची एक दिशा ठरवण्याची गरज वाटते.
मला वाटतं चित्रपटाचा जाणीवपूर्वक रसास्वाद घेणं ही आज काळाची गरज होऊन बसलेली आहे. तिच्याकडे आज केलेलं दुर्लक्ष केवळ आपली प्रेक्षक म्हणून वाढ थांबवणार नाही, तर नव्या प्रयत्नांना मिळणार््या प्रतिसादाला आडकाठी करुन एकूण मराठी चित्रपटउद्योगालाही ते संकटात आणू शकतं.
चित्रपटाचं जाणीवपूर्वक रसास्वाद घेण्याचं कौशल्य ‘चित्रपट रसास्वाद’ शिबिरांतून मिळू शकतं.

मुंबईत प्रभात चित्र मंडळातर्फे असं शिबिर येत्या १८ ते २३ आॅगस्ट दरम्यान पु लं देशपांडे अकॅडमी मधे घेण्यात येणार आहे. त्याच्या अधिक माहितीसाठी ०२२- २४१३१९१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
त्याखेरीज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीजचा महाराष्ट्र चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट रसास्वादाच्या ‘कार्यशाळा’ घेतल्या जातात. अशीच एक कार्यशाळा येत्या १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर्पयत पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. www.nfaipune.gov.in या संकेतस्थळावर त्याची अधिक माहिती उपलब्ध आहे.



- गणेश मतकरी

Read more...

लय भारी' च्या निमित्ताने

>> Sunday, July 20, 2014

 गेल्या दहा वर्षांत मराठी चित्रपटांनी भारतीय चित्रपटउद्योगात आपलं स्वतःचं स्थान तयार केलंय. राष्ट्रीय पुरस्कारांमधे लक्षात येण्याजोगा सहभाग, करमणूकीबरोबरच विषयांच्या वेगळेपणाला आणि नवं काही करुन पहाण्याला स्थान, सामाजिक जाणीव, दिग्दर्शकीय दृष्टीकोनाला असणारं महत्व यामुळे प्रादेशिक चित्रपटांमधे  महाराष्ट्राचं नाव सध्या पुढे आहे. बाॅलिवुडच्या अधिक चमकदार, अधिक ग्लॅमरस चित्रपटांच्या बरोबर राहून आपण हे करुन दाखवतोय यामुळे कौतुक अधिक. दुर्दैवाने, अजुनही आपल्या प्रेक्षकांचा दृष्टीकोन बर््याच अंशी पारंपारिक करमणुकीच्या पलीकडे गेलेला नाही. त्यामुळे वेगळ्या चित्रपटांना हवा तितका प्रतिसाद अजुनही मिळत नाही. तरीही आज वेगळ्या वाटेने जाणारा संवेदनशील चित्रपट ( उदा- गाभ्रीचा पाऊस, गंध, विहीर, वास्तुपुरुष) आणि थोडा परिचित ढंगाचा पण चांगली  करमणूक करणारा प्रेक्षकप्रिय चित्रपट ( उदा- बालक पालक,डोंबिवली फास्ट, दे धक्का,यलो) हे दोन प्रवाह पूर्ण मराठी चित्रपटउद्योगाचा तोल राखून आहेत.   आपल्या चित्रपटगृहांमधली निशिकांत कामत दिग्दर्शित आणि रितेश देशमुख अभिनित ' लय भारी'ची ब्लाॅकबस्टर एन्ट्री ही या पार्श्वभूमीवर पाहायला हवी.
 काही चित्रपट क्रिटिक प्रुफ असतात. म्हणजे समीक्षकांच्या मतांचा ते चालण्या न चालण्याशी काहीही संबंध नसतो. त्यांची आधीपासूनच एक हवा असते, प्रेक्षकांना त्याच्याबद्दल उत्साह असतो, निर्मात्यांची भारी ताकद त्यांना शक्य तितक्या अधिक जनतेपर्यंत पोचवायला तयार असते, त्यामुळे चित्रपट कमालीची कमाई करणार हे जणू ठरलेलंच असतं.  ' लय भारी' असा असणार याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती.
 मला आधीपासूनच या चित्रपटाबद्दल कुतुहल होतं. कारणं दोन. दिग्दर्शक आणि नायक. निशिकांत कामतचे 'डोंबिवली फास्ट' आणि 'मंुबई मेरी जान' मला खूप आवडलेले आणि करायला बर््यापैकी अवघड चित्रपट आहेत. रितेश देशमुखही निःसंशय उत्तम अभिनेता आहे, ज्याचा व्हायला हवा होता तितका आणि तसा वापर तो काम करतो त्या हिंदी चित्रपटांनी आजवर तरी करुन घेतलेला नाही. हे दोघं एकत्र येऊन मराठीत एक चांगला चित्रपट करू पाहातायत ही गोष्ट छानच होती. 'लय भारी' बाबत  एक गोष्ट मुळातच स्पष्ट आहे. ती म्हणजे या चित्रपटाशी संबंधित मंडळींमधल्या कोणाचाही आपण कसं काहीतरी आशयसंपन्न करतोय असं दाखवण्याचा मुळीच दावा नव्हता, नाही. त्यांनी आपली बाजू आधीच स्पष्ट केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हा एक तद्दन व्यावसायिक चित्रपट आहे. जसे हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपट असतात, त्या वळणाचा. मराठीत तो असण्याचा वेगळेपणा असलाच तर हाच, की हुकूमी मनोरंजनाचं हे टोक आपण याआधी कधीच गाठलं नव्हतं.
खरं पाहाता, चांगल्या व्यावसायिक चित्रपटात वाईट काहीच नाही, मग तो हाॅलिवुडचा असो वा मराठी ! सार््यांनीच आशयघन चित्रपट केले तर ज्याला निव्वळ मनोरंजन हवंय, तो साधासुधा प्रेक्षक काय करेल? या मुद्दयात तथ्य आहे यात शंकाच नाही, पण अनेकदा ते व्यावसायिक चित्रकर्त्यांकडून कन्टेन्ट बेस्ड चित्रपटांच्या विरोधात, आणि सामान्य चित्रपटांना जस्टीफाय करण्यासाठी वापरलं जातं, जे योग्य नाही. दुसरा एक मुद्दा म्हणजे तद्दन व्यावसायिक चित्रपटांच्या बळावरच निर्माते म्हणा, दिग्दर्शक म्हणा, अधिक प्रायोगिक प्रयत्नांना पोसू शकतात. हेही मान्य. पण मनोरंजनाच्याही पातळ्या असतात, आणि कोणता चित्रपट कोणत्या पातळीवर उभा आहे, याने फरक पडतो. सर्व व्यावसायिक चित्रपटांना सरसकट एक न्याय लावता येत नाही. त्याशिवाय खरोखर किती व्यावसायिक निर्माते यशस्वी चित्रपटांच्या जोडीला  वेगळ्या प्रयोगांना थारा देतात हाही संशोधनाचा भाग. फँड्री, हा अलीकडचा एक चांगला अपवाद.
मुळात रंजनवादी चित्रपटांना विरोध कोणाचाच नाही, प्रेक्षकांप्रमाणेच समीक्षकही ते आनंदाने पाहातात. माझ्या स्वतःच्या खास आवडत्या चित्रपटांमधे 'स्टार वाॅर्स'पासून 'अंदाज अपना अपना' पर्यंत आणि 'ओम शांती ओम' पासून 'संत तुकाराम' पर्यंत अनेक उत्तम व्यावसायिक चित्रपटांची नावं आहेत. मात्र विशिष्ट प्रेक्षकवर्गाची करमणुक यापलीकडे जाऊनही चांगल्या व्यावसायिक चित्रपटाच्या दर्जाचे काही निकष असायला हवेत. सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही हिशेबात, गणितात , वर्गात न बसता, त्याचं एक चांगला चित्रपट म्हणून काही स्थान असायला हवं. आणि ' लय भारी ' तसा सहज असू शकला असता.
'लय भारी' मधे मला खटकलेली गोष्ट ही, की तो पाहाताना  गणित मांडून केल्याचा भास होतो. अमुक दर्जाचा दिग्दर्शक, अमुक दर्जाचा स्टार, अमुक हिंदी चित्रपटांमधे हिट झालेली फाॅर्म्युला गोष्ट ( प्रमुख पात्राचं एका रुपात नष्ट होऊन दुसर््या रुपात अवतरणं हा प्रकार केवळ राकेश रोशनच्याही चित्रपटात नित्यनेमाने असतो. 'खून भरी माँग' पासून 'कहो ना प्यार है' पर्यंत मुबलक उदाहरणं. शिवाय इतर दिग्दर्शकांचे सिनेमे वेगळेच) , गाण्यांच्या ठरलेल्या जागा आणि प्रकार, धार्मिक घटकांचा लोकप्रिय वापर, विनोदा पासून हाणामार््यांपर्यंत नेहमीचा मसाला, वगैरे. स्वतंत्रपणे यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. मात्र चांगला चित्रपट नेहमीची गोष्ट सांगतानाही आपल्यापुढे काही नवं मांडत असल्याचा आभास निर्माण करेल, आपल्याला गुंतवून ठेवेल, पुढे काय होणार याविषयी कुतुहल निर्माण करेलशी अपेक्षा असते. ते 'लय भारी' करत नाही. हाताशी उत्तम कलावंत, तंत्रज्ञ असूनही नाही.  किंबहुना ते करण्याची त्याला गरज वाटत नसावी. नेहमीचा लोकप्रिय आणि हमखास यशस्वी मसाला देणं ही त्याने स्वतःपुढे घातलेली मर्यादा आहे, जो तो सफाईदारपणे देतो. त्या पातळीवर तो यशस्वी आहेच. जर आपण त्याच्याकडून जास्त अपेक्षा करत असलो, तर ती आपली चूक, त्याची नाही.
चित्रपटात काही नवीन नसलं तरी सारेच संबंधित लोक आपापल्या कामात हुशार असल्याने, आणि निर्मिती मूल्य अ दर्जाची असल्याने एका काॅम्पीटन्सी लेव्हलवर आपण तो पाहू शकतोच. कामत आणि देशमुख यांचा वाटा महत्वाचा, पण इतरही. गाणी, साऊन्डट्रॅक, अभिनय या सर्वच बाबतीत कलावंत आणि बाकी टीम हुशार आहे. मात्र त्यांच्या परफाॅर्मन्सवरही निश्चितपणे काहीच नं सांगू पाहाणार््या  संहितेच्या मर्यादा पडतात.
 लय भारी यशस्वी झाला- होणारच होता, त्याबद्दल मला फार काही म्हणायचं नाही. माझ्यापुढला प्रश्न आहे तो वेगळाच. या चित्रपटाने जर हे सिध्द केलं, की प्रेक्षकाला नवं काही न देता, वा तसा आभासही निर्माण न करता, केवळ आॅटोपायलटवर बनवलेल्या चित्रपटाचं स्वागत आपला प्रेक्षक नव्याने केलेल्या कोणत्याही प्रयत्नापेक्षा अधिक जोरात करतो, तर हा यशस्वी मराठी चित्रपट बनवण्याचा मापदंड ठरणार नाही का? असं झालं तर आजच्या  मराठी चित्रपटसृष्टीवर त्याचा कोणता परिणाम होईल?
गेल्या काही वर्षात मराठीत अनेक व्यावसायिक चित्रपट आलेले आहेत आणि त्यांनी बर््यापैकी व्यवसायही केला आहे. स्वतः निशिकांत कामत, राजीव पाटील, रवी जाधव, सतीश राजवाडे, महेश मांजरेकर, संतोष मांजरेकर या आणि इतरही अनेक दिग्दर्शकांनी असा मराठी व्यावसायिक चित्रपट उभा केलाय, जो रंजनमूल्य असणारा असेल, व्यावसायिक चौकटीतला असेल, पण थेट हिंदीची नक्कल करणारा किंवा प्रेक्षकाला हातचा धरणारा नसेल. तो प्रेक्षकाला कसं गुंतवायचं याचा दर वेळी नव्याने विचार करेल. डोळे मिटून फाॅर्म्युला अप्लाय करणार नाही. स्वतः रितेश देशमुखची निर्मिती असणारे 'बालक पालक' आणि 'यलो' देखील या चांगल्या व्यावसायिक चित्रपटांमधलेच मानायला हवेत.
लय भारी'  हा सारा प्रयत्नच अनावश्यक ठरवेल, अशी शक्यता आहे. आता पुढे या चित्रपटाचे जे काॅपीकॅट्स येतील त्यांना अशी मेहनत करण्याची गरजच वाटणार नाही. त्यांना काय करायचं हे आधीच माहीतेय. उगाच नावीन्य, कलात्मक मांडणी, निवेदनशैली, या अनावश्यक गोष्टींचा विचार करण्यात वेळ फुकट का घालवा?
दुसरी भीती आहे ती याहूनही थोडी अधिक गंभीर.
चित्रपट निर्मिती हा अखेर व्यवसाय असल्याने आर्थिक यश हे महत्वाचं आहेच, त्यात वाद नाही. पण त्यासाठी काय किंमत मोजली जाऊ शकते? यापूर्वी सोप्या फाॅर्म्युलाच्या मागे धावून चित्रपटउद्योग धोक्यात आलेला मराठी चित्रपटसृष्टीने दोन वेळा पाहिला आहे. आधी तमाशापटांच्या काळात, आणि पुढे विनोदी चित्रपटांच्या लाटेत. हे सारं मागे टाकून गेल्या दहा वर्षात आपण मराठी चित्रपटसृष्टी नव्याने उभी केलीय.  आता जर हिंदी/दाक्षिणात्य मेलोड्रामाची अशीच एखादी लाट आली तर हे सारं धुवून निघायला वेळ लागणार नाही.  मग आज असलेली मराठी चित्रपटाची नवी ओळख ,वेगळं स्थान या सगळ्याचं काय होणार? की तात्पुरत्या व्यावसायिक यशापलीकडे या सार््याची किंमत गौण आहे?
 सामान्यतः एखादा चित्रपट चालला वा पडला याने चित्रपटसृष्टीला फरक पडत नाही. पण जर त्या चित्रपटाचं भवितव्य हे अनेक चित्रपटांबरोबर जोडलं जाण्याची शक्यता असेल, तर विचार व्हायला हवा. कारण मग  प्रश्न म्हातारी मेल्याचं दुःख करुन संपत नाही, काळ सोकावण्याच्या शक्यतेकडे निर्देश हा करावाच लागतो.
- गणेश मतकरी

Read more...

लय भारी- मराठीतला हिंदी चित्रपट

>> Monday, July 14, 2014


गेल्या आठवड्यात मी एका चॅनलच्या साईटवर सादर केलेला निशिकांत कामत दिग्दर्शित, रितेश देशमुख अभिनित लय भारीचा रिव्ह्यू पाहिला आणि खालच्या कमेन्ट्स पाहून हादरलो. रिव्ह्यू अतिशय बॅलन्स्ड होता. कुठेही सिनेमाला मुद्दाम खाली ओढण्याचा प्रयत्न नव्हता. चित्रपटाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही मुद्दे त्यात नीट मांडले होते. वर स्टार देताना थोडं चांगल्या मुद्द्यांकडे झुकून तीन स्टार दिले होते. असं असतानाही, कमेन्ट करणार््या जवळपास सर्वांनी रिव्ह्यू, तो देणारा समीक्षक आणि चॅनल या सर्वांना अतिशय वाईट शब्दात संबोधलं होतं. शिव्याच दिल्या होत्या म्हणा ना !

 याला माझी पहिली रिअॅक्शन होती ती ही, की जर सामान्य प्रेक्षकाना प्रामाणिक समीक्षेची हीच किंमत असेल, तर उगाच ती करुन वेळ फुकट घालवण्यात काय अर्थ आहे? दुसरा प्रश्न हा की हे , अशा कमेन्ट करणारे लोक कोण आहेत? यांना खरोखर अगदी सोप्या शब्दात केलेलं चित्रपटाबद्दलचं विवेचनही समजत नाही आहे? का या लोकांची काही दैवतं या चित्रपटाशी संबंधित असल्याने त्यांना या दैवतांनी केलेली कोणतीही गोष्ट केवळ डोक्यावर घेण्यासारखीच वाटते? का मराठी चित्रपट थोडाफार त्यांच्या आवडत्या हिंदी चित्रपटाकडे जाण्याचा प्रयत्न इथे करताना दिसत असल्याने त्या मार्गात कोणतीही आडकाठी त्यांना नको आहे? जे असेल ते असो, ही मनोवृत्ती फार काळजीचं कारण आहे हे निश्चित.

गेली दहा वर्ष, मराठीत खूप चांगलं काम झालय आणि गेल्या शतकाच्या अखेरीला मृतप्राय मानला जाणारा चित्रपट आज अर्थपूर्ण, आशयघन काही देणारा चित्रपट म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळखला जातोय. त्याचबरोबर आपल्या चित्रपटात बर््यापैकी करमणूक करणारी एक व्यावसायिक शाखाही आहे. आणि जोपर्यंत ती चांगली हेल्दी करमणूक करतेय, तोवर तिला आक्षेप घेण्यासारखंही काही नाही. मात्र मला जर आज मराठी चित्रपटांचा  वैशिष्ट्यपूर्ण भाग कोणता विचारलं, तर मी खास प्रादेशिक टच असलेल्या , आशयघन , पुरेशा प्रेक्षक प्रतिसादाला न जुमानता काही नवं सांगू पाहाणार््या चित्रपटाचं नाव घेईन, शंभर कोटी क्लबात घुसण्याच्या नादात बाॅलिवुडची सही सही नक्कल करणार््या चित्रपटांचं नाही. आणि का घ्यावं, ते करणारे आणि आपल्यापेक्षा अधिक मोठ्या बजेटमधे, अधिक मोठे स्टार घेऊन आणि अधिक भव्य परिणाम साधणारे लोक आहेतच की हिंदीत, मग त्याची पुसट झेराॅक्स पुन्हा मराठीत कशाला हवी? त्यापेक्षा व्यावसायिक चित्रपटातही अस्सल मराठी काय करता येईल असा प्रयत्न होण्याची गरज आहे. दैवतांना जर अर्थपूर्ण काही करायचं नसेल तर निदान त्यांनी नव्या प्रकारचा चांगली करमणूक असलेला चित्रपट का करु नये?

या दृष्टीने पाहायचं तर रितेश देशमुखने आधी निर्माण केलेले दोन्ही चित्रपट 'बीपी' आणि 'यलो' हे चांगले आहेत. हे व्यावसायिक प्रयत्न आहेत परंतु हिंदीची नक्कल करण्याचा मोह त्यामधे नाही. उलट काही वेगळं करुन पाहण्याचा प्रयत्न आहे. स्वतः मराठी पडद्यावर  उतरताना मात्र रितेशने ( की त्याच्या सहनिर्मात्यांनी?) कोणतीही रिस्क घ्यायची नाही असंच ठरवलय.

खरं सांगायचं, तर 'लय भारी' बद्दल माझ्या मनात थोडी अढी तयार झाली ती त्याचं नाव एेकूनच. मला नावं चित्रपटाच्या थीमशी जुळणारी असली की आवडतात . स्वतःचं कौतुक करणारी आणि मग कशीतरी चित्रपटाशी जोडलेली नावं मला मुळातच आवडत नाहीत. चित्रपट चांगला असेल तर लोक कौतुक करतीलच, ते करण्यासाठी तुम्हाला शब्दही पुरवण्याची गरज नाही. पण या चित्रपटाने मुळातच शंकेला जागाच ठेवायची नाही असं ठरवलेलं. सर्वच गोष्टी अगोदरच सिध्द हव्यात, उगाच नवं काही करण्याचा प्रयत्न कशाला, हा लय भारीचा मंत्र आहे. त्यामुळे सर्व जमेल तितकं लोकप्रिय उचला आणि चिकटवा, हा पटकथेचा एकच नियम.

चिकटवलेल्या गोष्टी अशा - थ्रिलरला चांगला (आणि हिंदीतही काम केलेला) दिग्दर्शक , मोठा ( हिंदीत काम करणारा) स्टार, हिंदी चित्रपटात राकेश रोशनने लोकप्रिय केलेला ( एका रुपातला नायक- मरुन किंवा अदरवाईज- नव्या रुपात परतण्याचा ) फाॅर्म्युला ,अर्थात तोही हिंदीत लोकप्रिय असलेला; बाॅलिवुड आणि साऊथच्या चित्रपटासारख्या मारामार््या , बाॅलिवुड पध्दतीच्या गाण्यांच्या सिचुएशन्स ( भक्तीगीतापासून, नायिकेने खलनायकाला गुंगवण्यासाठी केलेला नाच, वगैरे), एकूण सारं बाॅलिवुड शैलीतलं. मराठी काय, तर अर्थात भाषा.आणि विठ्ठलाचा संदर्भ घेऊन क्वचित प्रसंगी वापरलेलं वारीचं वातावरण. तेही चिकटवल्यासारखं. बाकी सारं हिंदी. अगदी पाहुणे कलाकारही हिंदीच. या सगळ्यामुळे चित्रपटाचा परिणाम हा अर्थातच एक नेहमीचा मसाला हिंदी व्यावसायिक चित्रपट पाहिल्याचा आहे. इतका पारंपारिक वळणाचा की हिंदीतही हल्ली कोणी इतका टिपीकल चित्रपट करायला धजावू नये. पण आपल्याकडे तयार प्रेक्षक उपलब्ध आहे, जो नव्या मराठी प्रयत्नाची किंमत न ठेवता या जुन्या हिंदी मसाल्याला डोक्यावर घेईल.

गोष्ट परिचित. निंबाळकर घराणं प्रतिष्ठीत, श्रीमंत, पण प्रतापराव निंबाळकर ( उदय टिकेकर)आणि सुमित्रादेवी ( तन्वी आजमी) यांना  मूल नाही. मग नवससायास वगैरे. मग विठ्ठलाच्या कृपेने मूल होतं. हा प्रिन्स( रितेश) प्रिन्स परदेशात गाणी म्हणून मायदेशी परततो आणि वडिलांना हातभार लावणार इतक्यात त्याच्या चुलतभावाच्या ( शरद केळकर) दुष्ट कारवाया सुरु होतात. ज्यानी संपूर्ण निंबाळकर कुटंुबच धोक्यात येतं. मदत मिळते ती बर््यापैकी उशीर झाल्यावर, पण थेट पंढरपुरावरुन.

ज्यांनी 'कस्मे वादे' पासून 'कहो ना प्यार है' पर्यंत मृत नायकाच्या अशक्य पुनरागमनाचे शेकडो चित्रपट पाहिले आहेत, त्यांना अपरिचित असा इथे एकही क्षण नाही. किंबहुना तो नसणं हीच इथली योजना आहे. सार््या यशस्वी चित्रपटांचा अर्क असलेली ही पटकथा आहे. त्यात नवीन काही असेल तरी कसं? पण चित्रकर्त्यांना तेच अपेक्षितदेखील आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा लाइट आहे, म्हणजे विनोद, रोमान्स वगैरे. दुसरा हाणामार््या. पहिला लांबतो, दुसरा त्यामानाने वेगवान आहे. मात्र शेवट ( अनइन्टेन्शनली) गंमतीदार आहे. विठ्ठलाचं रुप असणार््या नायकाच्या हातून तर खलनायक मारायचा नाही, पण तो मरायला तर हवा, शिवाय देवाघरचा न्यायही दाखवायचा. अशा पेचातून मार्ग काढायचा, तर थोडी क्रिएटीव (!?) लिबर्टी हवीच.

चित्रपटात काही नवीन नसलं तरी सारेच संबंधित लोक आपापल्या कामात हुशार असल्याने, आणि निर्मिती मूल्य अ दर्जाची असल्याने एका काॅम्पीटन्सी लेव्हलवर आपण तो पाहू शकतोच. कामत आणि देशमुख यांचा वाटा महत्वाचा, पण इतरही. गाणी, साऊन्डट्रॅक, अभिनय या सर्वच बाबतीत कलावंत आणि बाकी टीम हुशार आहे. मात्र त्यांच्या परफाॅर्मन्सवरही निश्चितपणे संहितेच्या मर्यादा पडतात.

'लय भारी' बाॅक्स आॅफीसवर छान कमवतोय हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे निर्मात्यांनी जे मनाशी ठरवलं, ती योजना अत्यंत यशस्वी ठरली यात वादच नाही. पण प्रश्न हा, की मुळात ही योजनाच का ठरवली गेली. ज्यांच्याकडे कल्पनाशक्ती आहे, साधनं आहेत, पैसा आहे, त्यांनी केवळ पैसा मिळवणे या मर्यादीत महात्वाकांक्षेला धरुन नवनिर्मिती करावी का? आणि उद्या त्यांच्या या यशाला भुलून इतर निर्मातेही याच मार्गावर जायला लागले, आणि आज मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पातळीवर असलेलं नाव पुन्हा दिसेनासं झालं, तर त्याला जबाबदार कोण?

- ganesh matkari 

Read more...

हाच खेळ उद्या पुन्हा- 'एज आॅफ टुमाॅरो'च्या निमित्ताने

>> Sunday, June 22, 2014


चित्रपट हा सामान्यत: गोष्ट सांगतो. साहाजिक आहे, कारण कला म्हणून मान्यता असलेलं आणि वयाची शंभरी ओलांडलेलं हे माध्यम,आजही व्यावसायिक यशाकरता त्याच्या सामान्यजनांचं 'मनोरंजन ' करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. त्यामुळे कोणताही चित्रपट कलेच्या निकषांवर किती प्रमाणात उतरतो, यापेक्षा तो चांगली गोष्ट, वेधक पध्दतीने सांगून प्रेक्षक खेचू शकतो का, याला चित्रपटउद्योगात अधिक महत्व आहे.

आता अधिकाधिक लोकाना आवडायचा, तर या चित्रपटांच्या निवेदनशैलीलाही ,काही आकार, रचना हवी, जी सामान्यत: आपल्याला दिसते ती रचनेत अभिप्रेत असणार््या, कालानुसार सरळ रेषेत उलगडणार््या तीन अंकांच्या स्वरुपात. हे अंक म्हणजे सेट अप, काॅन्फ्लिक्ट आणि रेझोल्यूशन. पहिल्या अंकात व्यक्तिरेखांचा परीचय आणि संघर्षाकडे निर्देश, दुसर््या अंकात प्रत्यक्ष संघर्ष, आणि अखेर तिसर््या अंकात संकटाचं निवारण , या प्रकारची रचना आपण नित्यनेमाने चित्रपटांत पाहू शकतो. मात्र सर्वच चित्रकर्त्यांना या रचनेने स्वत:ला बांधून घ्यावंसं वाटत नाही. मग अशा वेळी हे दिग्दर्शक, पटकथाकार काही वेगळ्या मार्गाची निवड करतात.

नाॅन लिनीअर शैलीत गोष्ट सांगणं, म्हणजे प्रत्यक्ष घटनाक्रमाचा आधार सोडून देऊन जे सांगायचं आहे त्या आशयसूत्राला महत्व देत काळाविरुध्द केलेली रचना ,ही एकेकाळी जितकी अनपेक्षित होती तितकी आता वाटत नाही. कथा पूर्ण उलट्या क्रमाने मांडणार््या क्रिस्टोफर नोलनच्या 'मेमेन्टो'ने (२०००) ही शैली आपल्याकडे खूप लोकप्रिय केली पण प्रत्यक्षात पहायचं तर वास्तव आणि कल्पित, काल आणि अवकाश याचे सारे संदर्भ पुसून टाकणार््या १९६१च्या ' लास्ट इयर अॅट मेरीअॅनबाद' पासून ते क्विझ शोच्या निमित्ताने नायकाच्या संपूर्ण आयुष्याची कथा मांडणार््या २००८ च्या 'स्लमडाॅग मिलिअनेअर' पर्यंत या प्रकारातली इतर अनेकानेक उदाहरणं आपल्याला पाहाता येतील. गंमतीची गोष्ट म्हणजे अशा चित्रपटांनी घटनाक्रमात काळाची साथ सोडली, तरीही आशयाच्या दृष्टीकोनातून हे चित्रपटही ( सन्मान्य अपवाद वगळता) तीन अंकांचं भान सोडताना दिसत नाहीत. हे लक्षात घेतलं तर मी आता ज्या चित्रप्रकाराविषयी बोलणार आहे त्याचा वेगळेपणा लक्षात येईल.

हा चित्रप्रकार नाॅनलिनीअर चित्रपटांचीच एक उपशाखा आहे.या चित्रपटांत एक संपूर्ण पण छोटा कथाभाग दिसतो.घटनांची एक साखळी, जी पात्रांच्या परीचयापासून सुखांतापर्यंत ( किंवा शोकांतापर्यंत) सर्व महत्वाचे टप्पे घेईल. मात्र हा कथाभाग म्हणजे संपूर्ण चित्रपट नव्हे.चित्रपट हा या कथाभागाकडे त्रयस्थपणे पाहातो, त्या कथानकाचे टप्पे तपासून बघतो, यातल्या घटना अमुक पध्दतीनेच घडणं शक्य आहे का इतरही काही शक्यता संभवतात याचा विचार करतो आणि अखेर या कथाभागाच्याच विविध आवृत्त्या सादर करतो. चित्रपट तयार होतो, तो या सर्व आवृत्त्यांचा एकत्रितपणे विचार करुन.

आता चित्रपटाची ही ढोबळ रचना मांडली तरी ती वापरणारे सारेच चित्रपट एकसारखे होतात का, तर नाही ! या चित्रपटांच्या दिग्दर्शकांचा विचार , त्यांच्यापुरतं या चित्रपटांचं आशयसूत्र, हे या चित्रपटांना एकमेकांपेक्षा खूप वेगळं करुन सोडतं. मला वाटतं अशा काही प्रमुख चित्रपटांची उदाहरणं माझा मुद्दा स्पष्ट करतील.

अकिरा कुरोसावाच्या राशोमाॅन (१९५०) मधे आपल्याला दिसते ती बलात्कार आणि दरोडा यांभोवती फिरणारी एक कथा, जी त्यात सहभागी दरेक व्यक्तीच्या दृष्टीकोनाप्रमाणे वेगवेगळी घडते. पण ही सांगताना कुरोसावाचा भर हा खरं काय घडलं हे शोधण्यावर नाही, तर तो आहे मुळात सत्य हेच व्यक्तीसापेक्ष असतं, हा मुद्दा मांडण्यावर. हेराॅल्ड रामीस आपल्या 'ग्राउन्डहाॅग डे' (१९९३) च्या कडवट नायकाला एका छोट्याशा गावात अडकवून तोच दिवस पुन्हा पुन्हा जगायला लावतो, पण त्यादरम्यान तो विचार करतो तो मनुष्यस्वभावाचा, 'भला माणूस' ही काय चीज असावी, याचा. टाॅम टायक्वरच्या जर्मन 'रन लोला रन' (१९९८) मधली लोला आणि तिचा प्रियकर मानी त्यांच्या आयुष्यातला वीस मिनिटांचा कालावधी शोकांत आणि सुखांत शेवटासह विविध मार्गाने जगताना आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण किती महत्वाचा असतो याचा प्रत्यय आणून देतात, आणि डन्कन जोन्सच्या ' सोर्स कोड' (२०११) मधली ट्रेन बाॅम्बिंगची तीच परंतु आवृत्तीगणिक बदलत जाणारी घटना वास्तवाच्या विदारक संदर्भाने येणार््या तत्वचिंतनात्मक दृष्टीला ,रहस्याची डूब देऊन जाते. हा चित्रप्रकार इतका महत्वाचा आहे, की त्यात येणारे चित्रपट मोजके असले तरी उठून दिसणारे आहेत. वर उल्लेखलेल्यातला ' सोर्स कोड' वगळता प्रत्येक चित्रपट आज अभिजात मानला जातो.'अभिजात' या पदवीसाठी 'सोर्स कोड' थोडा अधिक गुंतागुंतीचा असावा. पण त्यालाही कल्ट स्टेटस आहेच. या थोरामोठ्यांच्या पार्श्वभूमीवर याच आकृतीबंधातला डुग लिमानचा 'एज आॅफ टुमाॅरो ' आणखी वेगळं तरी काय करणार, हा प्रश्न मला ट्रेलर पाहाताच पडला.

एकाच गोष्टीच्या काही बदलांसह होणार््या पुनरावृत्तीची कल्पना खास दृश्य माध्यमाला सोयीची वाटते, ती कदाचित दृश्य चौकटींमधे असलेल्या, वर्णन टाळूनही थोडक्यात अनेक तपशील मांडण्याच्या हातोटीमुळे असेल. मात्र गंमतीचा भाग हा, की 'एज आॅफ टुमाॅरो', हे साहित्यकृतीचं रुपांतर आहे. जपानमधे 'लाईट नाॅव्हेल' म्हणून शाळाकाॅलेजच्या मुलांना टारगेट करणारा एक प्रकार आहे.कमी लांबी, साधा आशय पण लक्षवेधी विषय, गतीमान निवेदन, सचित्र आवृत्त्या , असं या 'हलक्याफुलक्या कादंबर््यांचं' स्वरुप. ' आॅल यू नीड इज किल' ही हिरोशी साकुराझाका यांची कादंबरी त्यातलीच एक. साहजिकच, आपल्या चित्रपटआवृत्तीतही ही कादंबरी आशयाला फार खोली नसलेली, पण चित्तथरारक आहे.

मघा सांगितलेल्या चित्रपटातल्या ग्राऊंडहाॅग डे, आणि सोर्स कोड, यांचं एज आॅफ टुमाॅरोशी रचना आणि संकल्पनेच्या दृष्टीने थेट साम्य आहे. त्याखेरीज त्यावर 'मेट्रिक्स'पासून 'एलिअन्स'पर्यंत आणि 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन'पासून 'स्टारशिप ट्रूपर्स'पर्यंत अनेक दृश्य प्रभाव दिसतात. पण चित्रपट या प्रभावांखाली दबून जात नाही. आशयाला नसलेली खोली तो पटकथेची गुंतागुंत वाढवून आणि अनेक प्रासंगिक शक्यतांचा विचार जागरुकपणे करत भरुन काढतो. कथेला पार्श्वभूमी आहे, ती मानवजात आणि परग्रहवासी, यांमधल्या युध्दाची. (परग्रहाचं नाव काढताच इन्टेलेक्चुअल मंडळींनी नाकं मुरडण्याची गरज नाही.फँटसी चित्रपटही डोक्याचा वापर करणारे असू शकतात) असो!

तर  मेजर केज (टाॅम क्रूज) हा नावापुरता सैनिक.जीवाला जपणारा आणि पर्यायाने रणभूमीपासून शक्य तितक्या दूर राहण्याचा प्रयत्न करणारा. एकदा मात्र पेचात पकडून त्याची युध्दभूमीवर रवानगी केली जाते. युध्दभूमीवर पोचल्यावर काही मिनिटांतच त्याच्या लक्षात येतं, की शत्रूने पृथ्वीवासियांसाठी रचलेला हा सापळा आहे, ज्यात हार अटळ आहे. अर्थात, हे कळून फायदा नसतो. थोडाफार लढण्याचा प्रयत्न करतंच त्याला वीरमरण येतं. पण केजसाठी मृत्यू ही सुटका नसते. उलट तो पुन्हा त्याच सकाळी जागा होतो आणि दिवसभरच्या घटना घडल्या त्याच क्रमाने तशाच घडायला लागतात. छावणीत जागं व्हायचं, वरिष्ठांकडून अपमान करुन घ्यायचा, युध्दावर निघायचं आणि पुन्हा  येईल त्या मार्गाने मरुन जायचं अशा लूपमधेच तो अडकतो. यापासून त्याला सुटकेचा एक मार्ग दिसतो, तो म्हणजे शौर्यासाठी नावाजली जाणारी सैनिक रिटा व्रटास्की ( एमिली ब्लन्ट). मात्र अडचण ही, की केजची रिटाशी जुजबीही ओळख नसते. आणि ती करुन घेऊन आपली चमत्कारिक अडचण तिला सांगायला, त्याच्याकडे फक्त एकच दिवस असतो.

राशोमाॅन मधल्या घटनांच्या पुनरावृत्त्या या फक्त त्या त्या व्यक्तीचा दृष्टीकोन मांडणार््या आहेत , म्हणजेच 'त्या त्या व्यक्तिरेखाच्या म्हणण्यानुसार जे घडलं ते असं'ही त्या चित्रपटामागची कल्पना आहे , रन लोला रन 'असं घडण्याची शक्यता आहे, किंवा तसं' असं म्हणतो तर ग्राउंडहाॅग डे' कसं ते माहित नाही, पण हे असं घडलं' असं सांगतो.त्यामुळे हे तिन्ही चित्रपट घटनेला महत्व देतात, स्पष्टीकरणाला नाही. याउलट 'सोर्स कोड' आणि 'एज आॅफ टुमाॅरो' यांमधे एका महत्वाच्या बाबतीत साम्य आहे आणि ते म्हणजे त्यात निर्माण होणारी परिस्थिती ही पूर्णपणे काल्पनिक का होईना, पण स्पष्टीकरणात बसणारी आहे.इथल्या नायकांना आपण या लूपमधे अडकल्याची जाणीव आहे , आपण कशामुळे अडकलो हे माहित आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची शक्यता त्यांना दिसते आहे.त्यामुळे हे दोन्ही चित्रपट आपल्याला प्रोटॅगनिस्टच्या लढ्यात इतर तीन चित्रपटांहून किंचित अधिक पारंपारिक पध्दतीने अडकवतात. नायकाचा विजय हा इथे महत्वाचा ठरतो. दुसर््याही एका गोष्टीत या दोघांत साम्य आहे, ते म्हणजे नायक या घटना पुन्हा पुन्हा जगत असताना त्या घटनांमधे येणार््या स्त्रीच्या भूमिकेचा आलेख. ती स्त्री ही घटना तिच्यापुरती एकदाच जगतेय त्यामुळे नायक जरी तिला अधिक काळासाठी , म्हणजे 'एज आॅफ टुमाॅरो' मधे तर वर्षभर वा त्याहून अधिक , ओळखत असला तरी ती त्याला केवळ काही तासांपुरती ओळखतेय . त्यामुळे त्यांच्यातलं बदलत जाणारं नातं हा चित्रपटाचा महत्वाचा भाग. ( ज्यांनी पीटर सेगालचा '५० फस्ट डेट्स' पाहिलाय त्यांना त्यातल्या नायक नायिकेच्या नात्याशीही या चित्रपटाचं साम्य वाटेल) .

मी असा विचार करत होतो की हल्ली आलेले हे दोन चित्रपट आणि आधीचे यांमधे आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत इतका स्पष्ट बदल कसा? आणि याआधी तशी मुख्य प्रवाहातली नसलेली ही कल्पना अचानक 'ब्लाॅकबस्टर' फाॅरमॅटमधे कशी पोचली, तर त्यामागे एक कारण दिसतं, ते म्हणजे वाढत चाललेली गेमिंग संस्कृती. 'एज आॅफ टुमाॅरो' मधे हे खूप स्पष्ट जाणवतं. आजकाल अॅक्शन गेम्सचं प्रमाण खूप आहे, ज्यात खेळणारा हा कायमच अतिशय हुशार संगणकाशी खेळतो आणि अनेकदा मृत्यूमुखी पडल्याखेरीज पुढची लेव्हल गाठणं त्याला अशक्य होऊन बसतं. मात्र ही प्रगती शक्य होते, ती गेम प्रत्येक टप्प्यावर 'सेव्ह' होऊ शकल्याने. एज आॅफ टुमाॅरो मधलं केजचं छावणीत जागं होणं हा असाच एक सेव्ह पाॅईन्ट आहे. तिथपासून खेळ सुरू होतो आणि हरला तर पुन्हा त्या ठिकाणी परतणं शक्य आहेच.

सोफेस्टिकेटेड गेमिंग हे आज चित्रपटाशी स्पर्धा करतय हे तर आपण जाणतोच. खेळणार््याला हिरो करुन सोडणारा या खेळांमधला इन्टरॅक्टीव भाग चित्रपट नकलू शकत नसल्याने, मात्र चित्रपटांची भव्यता गेम्स घेऊ शकत असल्याने आज ना उद्या अॅक्शन गेम्स हे अॅक्शन चित्रपटांची जागा घेतील हे स्पष्ट दिसतय. या हरत्या लढाईमधला आजची हार उद्यावर टाकणारा एक लक्षवेधी प्रयत्न, म्हणून आपण 'एज आॅफ टुमाॅरो' चं नक्कीच कौतुक करु शकतो.
- गणेश मतकरी

Read more...

जाहिरातींचा प्रश्न

>> Sunday, June 15, 2014

 चित्रपटांचे पोस्टर्स हे त्या त्या दिग्दर्शकाच्या भूमिकेची साक्ष देणारे असावेत असं माझं एक आवडतं मत आहे आणि बहुसंख्य प्रमाणात ते खरंही आहे, असं मानता येईल. पोस्टर डिझाईन हे थोडं एक्जरसाईझसारखं असतं. चित्रपटाला अमुक अमुक गोष्ट म्हणायचीय, मांडायचीय. मग हीच गोष्ट तुम्ही एकुलत्या एका दृश्यप्रतिमेतून कशी मांडाल? हे आव्हान पोस्टर्स डिझाईन करणार््यांपुढे असतं. हे करण्याचे अनेक मार्ग असतात. मार्टीन स्कोर्सेसीच्या 'टॅक्सी ड्रायव्हर' च्या पोस्टरवरली रस्त्यावरल्या दिव्यांच्या प्रकाशात पार्क केलेल्या टॅक्सीपुढे उभ्या राॅबर्ट डी निरोची प्रतिमा, या व्यक्तिरेखेचा एकटेपणा वातावरणातून आणि मांडणीतून आपल्यापुढे उभा करते, पल्प फिक्शनचा पोस्टर त्याच जातीच्या पुस्तकाचं काल्पनिक कव्हरच आपल्या डोळ्यासमोर आणतो तर व्हर्टिगोच्या पोस्टरवरली भौमितीक रचना, नायकाच्या फोबिआलाच सूचीत करते. हे सारे पोस्टर्स, मूळ चित्रपटाची जान कशात आहे, हे थोडक्यात पण  अचूक रीतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. मात्र पोस्टर्स या एकाच प्रकारचे असतात का? तर नाही.

इन्टरनेटवर थोडं अभ्यासपूर्ण सर्फींग केलं की आपल्याला काही चित्रपटांचे अतिशय गंमतीदार पोस्टर्स पाहायला मिळतात. या पोस्टर्सचा अनेकदा मूळ चित्रपटाशीही काही थेट संबंध असत नाही, मात्र ते पाहाणार््याच्या मनात उत्सुकता तयार होईल, असे मात्र जरुर असतात. राॅबर्ट आॅल्टमनच्या '३ वुमेन' चा अमेरिकेतला पोस्टर त्यातली महत्वाची क्षणचित्र रेखाटणारा होता, पण याच चित्रपटाच्या पोलिश पोस्टरमधे चमचा, सुरी आणि काटा यांची सांगड स्त्रीयांच्या चेहर््याशी घालून कलात्मक परिणाम साधला होता.' रेडर्स आॅफ द लाॅस्ट आर्क' च्या जपानी पोस्टरवर चित्रपटाचा दिग्दर्शक स्पीलबर्ग आणि निर्माता जाॅर्ज ल्युकस यांचंच मोठं छायाचित्र होतं, तर गोदारच्या 'वीकेन्ड' च्या जर्मन पोस्टरमधे केवळ काळ्या पार्श्वभूमीवर केलेला टायपोग्राफीचा प्रयत्न होता. आता ही पोस्टर्स दिग्दर्शकाच्या दृष्टीशी प्रामाणिक असतील असं म्हणावं का, तर खचितच नाही. ही परदेशी वितरणानिमित्त चित्रपटाच्या जाहिरातींमधे केलेल्या बदलाची उदाहरणं मनोरंजक ठरतात कारण ती आपल्याला दिग्दर्शकाविषयी न सांगता, प्रेक्षकांविषयी सांगतात.
सामान्यत: दिग्दर्शक हा आपल्या प्रांतातल्या आपल्याशी समविचारी प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो. त्यामुळे त्या प्रेक्षकासाठी केलेली जाहिरात ही अधिक थेट, अधिक प्रामाणिक, चित्रपटामागचा विचारच समोर मांडणारी असावी अशी त्याची भूमिका असते. तो स्वत: त्यात अधिक मोकळेपणाने सामील असल्याने त्याचं या गोष्टींवर नियंत्रणही असू शकतं. याऊलट परदेशी गेलं की ही गणितं बदलतात. परदेशी प्रेक्षकांचा, एकूण चित्रपटांकडे पाहाण्याचा आणि विशिष्ट वळणाच्या चित्रपटांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन हा मूळ इन्टेन्डेड प्रेक्षकापेक्षा वेगळा, अगदी दुसर््या टोकाचाही असू शकतो. कधी पडद्यावरल्या अभिनेत्यांपेक्षा दिग्दर्शकाची लोकप्रियता अधिक  असते, कधी हाॅलिवुडसारख्या व्यावसायिक चित्रपटांना अधिक मागणी असते, कधी आशयाची प्रक्षोभकता या प्रेक्षकांना  चित्रपटगृहाकडे वळवू शकते, तर कधी प्रयोगांबद्दलही त्यांना आकर्षण असू शकतं. त्याशिवाय वितरण कोणत्या प्रकारचं आहे यानेही प्रेक्षकांचा दृष्टीकोन बदलू शकतो. व्यावसायिक चित्रपटाच्या प्रेक्षकाला जे आपलं वाटेल, तेच, तसंच चित्रपट महोत्सवांच्या प्रेक्षकाना आपलं वाटेल असं सांगता येणार नाही ( किंबहूना बहुतेक उदाहरणांत, वाटणार नाही असंच सांगता येईल) . त्यामुळे या चित्रपटांची पब्लिसिटी डिझाईन करताना दिग्दर्शकाच्या मूळ भूमिकेला बाजूला सारुन, त्यापलीकडे विचार केला जातो. या डिझाईनवर प्रभाव असतो, तो त्या,त्या ठिकाणच्या प्रेक्षकाना आेळखणार््या वितरकांचा, निर्मात्यांचा. दिग्दर्शकाचा हेतू मांडण्यापेक्षा, प्रेक्षक चित्रपटाकडे कसा खेचून आणता येईल हे पाहाण्याचा हा प्रयत्न असतो.
अर्थात, मूळ चित्रपटाशी सपशेल विसंगत असे पोस्टर्स केवळ दुसर््या देशांसाठीच केले जातात असंही नाही. कधीकधी , ते आपल्याच प्रेक्षकासाठीही असतात. खासकरुन जेव्हा चित्रपट प्रेक्षकाश्रयासाठी तडजोडी न करता बनवला जातो, तेव्हा त्याचं वितरण हे चित्रकर्त्यांसमोर प्रश्न उभा करतं. चित्रपटाला कला म्हणून महत्व आहे यात वाद नाही, पण ही कला हा ग्रुप एफर्ट असल्याने आणि त्यात पैशांची उलाढालही मोठ्या प्रमाणात असल्याने ती कधीच बासनात ठेवून दिली जात नाही. ती प्रेक्षकांपर्यंत पोचावी, असं सार््यांनाच वाटत असतं, मात्र जेव्हा विशिष्ट चित्रपटाला केवळ त्याच्या अंगभूत गुणांवर प्रेक्षक मिळणं कठीण होईल असं वाटतं, तेव्हा मग या चित्रपटाच्या जाहिरातीचा काही वेगळा विचार करणं आवश्यक ठरतं. या प्रकारच्या काहीशा फसव्या मार्केटींग योजनेचं माझं आवडतं उदाहरण म्हणजे भारतीय वंशाचा हाॅलिवुड दिग्दर्शक एम नाईट श्यामलन याचा ' साईन्स'.
साईन्स येण्याआधी 'सिक्स्थ सेन्स' चित्रपटाने श्यामलनचं नाव घराघरात पोचवलं होतं. आणि लोक त्याच्याकडून विशिष्ट प्रकारच्या चित्रपटाची अपेक्षा करत होते. साईन्स हा मुळात फिलाॅसाॅफिकल वळणाचा चित्रपट होता. देवाचं अस्तित्व, श्रध्देचं स्वरुप अशा विषयाची यात चर्चा होती . माझ्या मते याची मूळ प्रेरणा , इन्गमार बर्गमनचा ' विन्टर लाईट' चित्रपट असणार, मात्र आपल्या फॅन्टसी घटक घालण्याच्या योेजनेमुळे श्यामलनने त्यात परग्रहवासीयांची योजना केली होती. चित्रपट उत्तमच होता. माझ्या मते तो श्यामलनचा सर्वोत्कृष्टच आहे. असो,आता गंमत अशी होती, की परग्रहवासीयांचा पृथ्वीवर हल्ल्याचा प्रयत्न अशी पार्श्वभूमी असतानाही मुळात चित्रपटात भव्य विज्ञानपटांना साजेशी एकही गोष्ट नव्हती. टिव्हीवर अस्पष्ट दिसणारी काही दृश्य,बरीचशी गूढ वातावरणनिर्मिती, आणि अगदीच मोजक्या दृश्यांत येणारा एक परग्रहवासी सोडला तर सारा वेळ शेतावरल्या एका घरात घडणारा हा चित्रपट , वैचारिक चित्रपट पाहाणारे आणि विज्ञानपट पाहाणारे ,या दोन्ही गटांनाही परकाच वाटण्याची शक्यता होती. मग याची जाहिरात करताना चित्रपट वैचारिक नसून परग्रहवासियांच्या हल्ल्याविषयीच असल्याचं भासवण्यात आलं. पोस्टरवर अवकाशातून दिसणारी पृथ्वी, त्यावर परग्रहवासियांशी जोडण्यात येणार््या क्राॅप सर्कल्स सारखे आकार आणि ' इट्स नाॅ लाईक दे डिन्ट वाॅर्न अस' अशी भव्य युध्द सूचित करणारी टॅग लाईन, अशी पोस्टर्सची रचना करण्यात आली. बिग बजेट सायन्स फिक्शन पाहाण्याच्या आशेने चित्रपट पाहायला गेलेले प्रेक्षक अर्थात चित्रपट पाहून अवाक झाले, पण काही वेगळं पाहाण्याची तयारी असलेल्याना चित्रपट आवडला, चालला. स्ट्रॅटेजी यशस्वी झाली.
हे सगळं माझ्या डोक्यात काही दिवस घोळतय, काही म्हणजे काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित चित्रपटाने निवडलेल्या, याच प्रकारच्या, प्रेक्षकाना विषयाबाबत अंधारात ठेवण्याची स्ट्रॅटेजीनंतर.

फँड्री हा मुळात महोत्सवातून गाजलेला चित्रपट, अतिशय प्रामाणिक पणे केलेला. एका आडगावात राहाणार््या जब्या , या कैकाडी समाजातल्या मुलाचं विश्व त्यात साकारलेलं. विश्व एकाच वेळी दोन तर््हांनी दिसणारं. वास्तववादी आणि काहीसं प्रतीकात्मक/ काव्यात्म. एका परीने प्रत्यक्षातलं जग या मुलाच्या नजरेत ज्या प्रकारे उतरत, ते तसंच्या तसं पडद्यावर आणण्याचा प्रयत्न. या मुलाच्या आयुष्यातले अनेक पैलू यात येतात. त्याची कौटंुबिक पार्श्वभूमी, त्याचं शालू नावाच्या वरच्या जातीच्या मुलीवर बसलेलं एकतर्फी प्रेम, गावातले जातीभेद आणि त्याच्या समाजाला मिळणारी अपमानास्पद वागणूक, वगैरे वगैरे, पण ते पैलू केवळ जब्यापुरते. त्याला या मुद्द्यांचं जितपत आकलन होऊ शकतं, तितपतच चित्रपटात आपल्याला दिसतं. त्यापलीकडे जाऊन चित्रपट ना समाजोपयोगी भाष्य करायला जात, ना खोटी प्रेमकथा रंगवून सांगत. तो या प्रतिनिधीक व्यक्तिरेखेची जडणघडण मात्र मन लावून मांडतो. आता असा काहीसा संमिश्र आशय असणारा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा कसा?
संबंधितांनी यावर काढलेला उपाय हा बराचसा साईन्सची आठवण करुन देणारा आहे.
आपल्याकडे, फार वेगळ्या पोस्टर्सची परंपरा नाही. चित्रपटाच्या वातावरणाची किंचित झाक आणि अभिनेत्यांचे मोठेमोठे चेहरे, हा वर्षानुवर्ष चालत आलेला फाॅर्म्युलाच आजही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे फँड्रीचा वेगळेपणा बाजूला करुन त्याला त्याच पारंपारिक डिझाईनमधे बसवायचं असं या मंडळीनी ठरवलं. असं डिझाईन, जे परिचित असेल, पण कोणताही निश्चित विचार मांडणार नाही, वेगळेपणासाठी उठून दिसणार नाही. प्रयोग म्हणून चित्रपट पाहण्याची इच्छा नसणार््या पण चांगल्या चित्रपटाची अपेक्षा करणार््या प्रेक्षकाला मात्र  ते पाहिल्याबरोबर पटण्यासारखं असेल.
अर्थात, फँड्रीमागे झी सारखी मोठी संस्था उभी असल्याने, त्यांनी हा विचार केवळ पोस्टरपुरता ठेवला नाही, तर त्यांनी पूर्ण चित्रपटच कसा वेगळा नाही, तर प्रेक्षकांच्या अतिशय परिचित अशा आणि 'शाळकरी प्रेम ' फाॅर्म्युलाचाच अवतार आहे हे दाखवून देण्यासाठी त्याच वळणाची ट्रेलरही केली आणि अजय अतुल सारख्या लोकप्रिय संगीतकारांकडून त्या वळणाचं गाणंही बनवून पब्लिसिटीसाठी वापरलं. टु गिव्ह द क्रेडीट व्हेअर ड्यू, त्यांनी हे केलं ते केवळ मार्केटींगच्या पातळीवर. त्यापुढे जाऊन त्यांनी चित्रपटात गाणी घालणं वा इतर काही थेट बदल केले नाहीत. तो जसा होता तसाच ठेवला. त्यांच्या युक्त्यांचाही, व्यावसायिक दृष्टीकोनातून फायदाच झाला, कारण मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आला आणि त्यांनी चित्रपट पाहिला. मूळात दिशाभूल करण्याच्या तंत्राने आकर्षित झालेला प्रेक्षक हा वेगळाच चित्रपट पाहाण्याच्या अपेक्षेने येत होता, त्यामुळे हे योग्य होतं असं शंभर टक्क्े म्हणता येणार नाही, पण त्यामुळे फँड्रीला त्याचा फायदा झाला हे खरच.
आता प्रश्न हा, की फँड्रीचं ( किंवा साईन्सचंही) यश हे कलात्मक का व्यावसायिक? कारण दिशाभूल केल्याने काही प्रेक्षक नाराज झाला तरी उरलेल्यांना चित्रपट आवडला हे खरच, आणि कदाचित कँपेन गंभीर असती, तर ती पाहून यांतला किती प्रेक्षक चित्रपटाला आला असता? मग या प्रेक्षकापर्यंत एक चांगला आणि त्यांनाही आवडेलसा चित्रपट नेण्याचं कामही, शेवटी या चमकदार , थोड्या फसव्या मार्केटींगने केलं असंच म्हणता येईल, नाही?
मग तात्पर्य काय ? एन्ड जस्टीफाईज द मीन्स? ज्याचा शेवट गोड, ते सारं गोड? मला वाटतं तसंच काहीतरी !
-  गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP