एक्झोडस- गॉड्स अॅन्ड किंग्ज- डेमिल विरुध्द स्कॉट

>> Sunday, December 7, 2014


मी सेसिल बी डेमिल चा टेन कमान्डमेन्ट्स (१९५६) पाहिला तो खूपच उशिरा, १९९० च्या आसपास. तोही थिएटरमधे नाही, तर व्हिडीओ कसेट वर.त्याची लांबी एवढी प्रचंड (२२० मिनिटं) की तो एका कसेटवर रहातही नव्हता. मला तो असा पहावा की नाही अशी शंका तेव्हा आल्याचं आठवतं. कारण तो आधीच पाहिलेल्या माझ्या बहिणीकडून आणि इतरांकडून त्याविषयी फार उत्तम गोष्टी एेकल्या होत्या आणि तो परिणाम कुठला टिव्हीवर यायला, असं आपलं वाटलं होतं. पण कुतूहल जास्त होतं. शिवाय तेव्हा मी लिहीत नसल्याने ,फर्स्ट इम्पॅक्टचा विचारही फार गंभीरपणे केला नाही. माझ्या आठवणीप्रमाणे, कॉलेज सबमिशनचं काहितरी काम करतच एकीकडे मी तो पहायला सुरुवात केली पण थोड्याच वेळात इतका गुरफटलो, की पहिला तास उलटायच्या आत इतर सगळी कामं बाजूला पडलेली होती.

टेन कमान्डमेन्ट्समधला सर्वात प्रभावी प्रसंग हा इजिप्तचं सैन्य मागे लागलेलं असताना मोझेसने समुद्र दुभंगून आपल्या अनुयायांना पार नेण्याचा, हे निश्चित आणि आजही हा प्रसंग थरारून सोडतो. त्याआधीचा चमत्कारांचा भागही असाच गुंगवणारा, पण केवळ हे स्पेशल इफेक्ट्स, ही त्या चित्रपटाची ताकद म्हणणं अन्यायकारक होईल. त्याचा खरा इन्टरेस्टिंग भाग होता,तो त्यातली प्रचंड लांबलचक कथा आणि अनेक पात्रं, उपकथानकं धरुन तिचं तपशीलात रंगवली जाणं.

मुळात या कथेचे सरळ चार भाग आहेत.मोझेसचं इजिप्तचा राजपुत्र म्हणून असलेलं आयुष्य, जन्मरहस्याच्या उलगड्यानंतरची हद्दपारी आणि गृहस्थाश्रम, इजिप्तमधल्या गुलाम हिब्रू समाजाला सोडवण्यासाठी त्याचं परत येणं, आणि अखेर सुटकेनंतरचा कमान्डमेन्ट्स मिळेपर्यंतचा भाग. चमत्कार हे प्रामुख्याने यातल्या तिसऱ्या भागात येतात पण एकूणच निर्मितीच्या, अभिनयाच्या बाबतीत डेमिलचा चित्रपट सुरुवातीपासून अखेरपर्यंत दर्जेदार आहे. त्यातली अनेक छोटीमोठी पात्र त्यातल्या पटकथेच्या घट्ट वीणेमुळे आपल्याला कायम लक्षात रहातात.

चित्रपटाचा जेव्हा रिमेक होतो, तेव्हा त्यात नवीन काय आहे हा प्रश्न महत्वाचा ठरतो. मग ते काही असू शकतं. एखादं नवं तंत्र, तंत्रज्ञान, दिग्दर्शकाला जाणवलेली एखादी नवी बाजू, काहीही. याच विषयावरचा प्रिन्स ऑफ इजिप्ट (१९९८) आला तेव्हा त्यातल्या अॅनिमेशनचा रेखीव वापर , त्यांनी उचललेलं भव्यतेचं परिमाण आणि माध्यमाने तयार होणारी नवा बालप्रेक्षक मिळण्याची शक्यता या गोष्टी त्यात वेगळ्या होत्या. जेव्हा हाच प्रश्न आपण एक्झोडस- गॉड्स अॅन्ड किंग्ज बाबत विचारतो, तेव्हा त्याचं पूर्ण समाधानकारक उत्तर मिळत नाही. खासकरुन त्यातला रिडली स्कॉटसारख्या लक्षवेधी दिग्दर्शकाचा आणि मोझेसच्या भूमिकेत क्रिश्चन बेलसारख्या मोठ्या अभिनेत्याचा सहभाग लक्षात घेतो तेव्हा.

वेगळेपणा असणारी एक उघड गोष्ट एक्झोडस करतो, ती म्हणजे मुळातच तो पटकथा कॉम्पॅक्ट करतो. त्यातला फोकस तर नावाप्रमाणेच तो गुलामांच्या मुक्तीवर आणतोच, पण पहिल्या आवृत्तीतल्या अनेक पात्रं , उपकथानकांनाही तो कात्री लावतो, त्यामुळे कथा प्रामुख्याने द्विपात्री होते. या मार्गाने चित्रपट 'टेन कमान्डमेन्ट्स' हून वेगळा होतो आणि वेळही आटोक्यात येतो हे खरं, पण त्यामुळे चित्रपट प्रेक्षकांची व्यकितिरेखांबरोबरची भावनिक गुंतवणूक बरीचशी कमी करतो. त्यातला वाद बराचसा तात्विक पातळीवर येतो, कोरडा होतो. दुसरा महत्वाचा बदल आहे तो देवाकडे आणि त्याच्या आदेशांकडे पहाण्याच्या दृष्टीत.हा भाग मला मूळ चित्रपटाहून चांगला वाटला कारण इथे स्कॉटचं चित्रण केवळ धर्मवेडं नाही, तर आख्यायिकेतल्या विसंगती अधोरेखित करणारं , क्रौर्याला सूचकतेमागे न दडवता उघड्यावर आणणारं आहे. 'टेन कमान्डमेन्ट्स'मधला देव आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देत नाही. इथे मात्र देवाला निश्चित रुप आहे. लहान मुलाचं. हे रुप देवाच्या हट्टाला, प्रसंगी दिसणाऱ्या क्रौर्याला अतिशय चपखल बसतं. त्याच्यापुढे मोझेसचं हतबल होणं आपण समजू शकतो.

देवाने इजिप्तवर संकटं आणणं आणि त्याच्या विरोधात रॅमसीस ने केलेलं क्रौर्याचं प्रदर्शन, हा या हकिगतीचाच महत्वाचा भाग, पण 'टेन कमान्डमेन्ट्स'ने तो फार त्रासदायक न करता शोभवून नेला होता. 'एक्झोडस’तसं करणं टाळतो. इथली अनेक दृश्य  बिचकवून सोडणारी आहेत. मगरींनी बोटीवर केलेला हल्ला, सडलेल्या माशांनी लाल झालेलं पाणी, रॅमसीस ( जोल एडगरटन) ने अनेक निरपराधांना फासावर लटकवणं, अशा अनेक प्रसंगांचं चित्रण हे प्रभावी आहे. अशा वेळी भारतीय कलाकृतींचा देवाकडे अन एकूणच धार्मिक गोष्टींकडे घाबरत घाबरत पहाण्याचा अप्रोच खास जाणवतो/खटकतो. आपल्या देवाने पडद्यावर असा रुद्रावतार धारण केला तर चित्रपट सेन्सॉरकडून पुढे सरकतील का, धर्माच्या नावाखाली अभिव्यक्ती दाबण्याच्या प्रयत्नातल्या विविध संघटना ते चालू देतील का आणि शेवटी आपला प्रेक्षक ते किती पाहून घेईल, असा प्रश्न पडतो.

या सगळ्या दृश्ययोजनात ,अन खासकरुन पुढच्या 'पार्टींग ऑफ द रेड सी' नावाने लोकप्रिय असणाऱ्या समुद्र दुभंगण्याच्या प्रसंगात जाणवतं, की हे प्रसंग खरोखर घडते, तर कसे घडते, याचा दिग्दर्शक विचार करतोय. पण तसं असतानाही इथे एक मोठी अडचण येतेच. त्याचा दृष्टीकोन हा रॅडिकली वेगळा नाही. मायकेल मूरकॉकच्या ’बिहोल्ड द मॅन’मधे जीझस हा सर्वसामान्य माणूस असल्याचं दाखवून लेखकाने आता या महापुरुषाची इतिहासातली जागा कोण घेणार, असा पेच तयार केला होता. तसा दैवी अंश पुसून टाकणारा एखादा घटक स्कॉट पटकथेत आणू शकत नाही. मोझेसच्या पहिल्या देवदर्शनानंतर काही काळ असा आभास तयार होतो, की स्कॉट, हा देव केवळ मोझेसच्या डोक्यात होता असं म्हणतोय की काय? मोझेसने धनगराची काठी टाकून तलवार उचलणं, किंवा देवाने ' मला सेनापती हवाय' असं म्हणणही त्या दिशेने सुसंगत होतं.तसं झालं असतं तर चित्रपट खूपच वेगळा झाला असता. पण जशी मिरॅकल्सची कक्षा वाढते, तसा देवाचा प्रत्यक्ष सहभाग अपरिहार्य ठरतो.अखेर मोझेसला समुद्र दुभंगायला हवा असेल, तर देवाचं अस्तित्व हा केवळ मानसशास्त्रीय घटक ठरु शकत नाही.

तरीही आपल्या दोन नायकांचं, मोझेस आणि रॅमसीसचं व्यक्तिचित्रण मात्र ’एक्झोडस’ खूपच प्रभावीपणे करतो.टेन कमान्डमेन्ट्समधेही ते लक्षणीय होतं यात वाद नाही, पण तिथे ते एकरंगी, प्रवृत्तीच्या दर्शनासारखं होतं. इथे या दोघांच्या व्यक्तीमत्वातली गुंतागुंत तपशीलात येते, विशेषत: मोझेसच्या. त्याला 'आपण कोण आहोत?' हा मुळातच सतावणारा प्रश्न, स्वार्थ आणि कर्तव्य यांतून तयार होणारी द्विधा मनस्थिती, प्रसंगी देवाचं पटत नसतानाही असहाय्यपणे घडेल ते पहात रहावं लागणं ,हे त्याला नेहमीच्या धीरोदात्त नायकापेक्षा वेगळा ठरवतं.

दुसरी विशेष गोष्ट आहे ती म्हणजे रिडली स्कॉटच्या चित्रपटात गेली काही वर्ष सातत्याने दिसणाऱ्या युध्दविरोधी विचारांचे पडसाद.हिंसाचाराला आपल्या चित्रपटात नित्य स्थान देतानाही रिडली स्कॉटचे हल्लीचे चित्रपट हिंसा हा उपाय नाही, या निष्कर्षावर येऊन पोचले आहेत. किंगडम ऑफ हेवन, ग्लॅडीएटर सारख्या चित्रपटात हे स्पष्ट दिसून आलय. एक्झोडसमधेही हा विचार जाणवेलशा पध्दतीने येतो.

या चित्रपटाचा अखेरचा भाग हा त्याचा कदाचित सगळ्यात मोठा दोष मानता येईल. बाकी भागात डेमिल आवृत्तीपेक्षा स्कॉट आवृत्ती कशी वेगळी आहे हे सरळ दिसतं, इथे ते दिसलं नसतं , कारण घटना कमी आणि स्पष्ट आहेत. कदाचित या कारणाने, पण स्कॉट हा भाग फार चटकन उरकतो. घटना तुकड्यातुकड्यात येतात.शेवटाचं वजन त्यांना येत नाही. कदाचित हा भाग अधिक वेळ घेत रंगवला असता तर चित्रपट अधिक एकसंध झाला असता. अर्थात याला पुरावा काही नाही, आता आपण केवळ अंदाजच करु शकतो.

जर कोणी डेमिल आणि स्कॉटच्या आवृत्त्यांची गुणात्मक तुलना विचारली, तर मात्र मी उत्तर द्यायचं टाळेन. कमान्डमेन्ट्सने आपली गुणवत्ता सिध्द केलीच आहे, पण नवं फार न देताही, एक लक्षवेधी प्रयत्न या सदरात एक्झोडस बसू शकतो. पुढल्या काळात यातला कोणता चित्रपट टिकून राहील याचा विचार केला, तर मात्र कमान्डमेन्ट्सचंच नाव एकमताने पुढे येईल असं वाटतं.
- ganesh matkari

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP