क्लोज्ड कर्टन आणि इराणी शोकांतिका

>> Monday, January 20, 2014



चित्रपटमहोत्सव, ही  सवयीची नसल्यास गोंधळून सोडणारी गोष्ट असते. जुन्यातले चांगले चित्रपट पाहायचे, तर रेट्रोस्पेक्टीव, कन्ट्री फोकस यासारख्या अनेक विभागांकडे वळता येतं , पण नव्यातले चांगले चित्रपट शोधणं , निदान माझ्या अनुभवाप्रमाणे, वाटतं तितकं सोपं नाही. एकतर बरेच चित्रपट नवे, अप्रदर्शित असल्याने, आपल्याला त्यांच्याबद्दल फार काही माहीत नसतं. त्याशिवाय दिवसाच्या चाळीस पन्नास खेळांत आपण फार तर तीन ते पाच पाहू शकणार असल्याने , प्रमाण पाहाता चांगले  चित्रपट चुकण्याची शक्यताच अधिक. सुदैवाने आता अनेक महोत्सवात हजेरी लावल्यावर आणि अनेक चंागले चित्रपट चुकवल्यावर माझीही काही गणितं ठरली आहेत. त्यातली एक, कोणालाही करण्यासारखी युक्ती म्हणजे चित्रपटाच्या गोष्टी वा त्यांनी मिळवलेल्या पारितोषिकांकडे लक्ष न देता दिग्दर्शक आणि त्यांचा ट्रॅक रेकाॅर्ड पडताळून पाहायचा. त्या दृष्टीने पाहाताना यंदाच्या गोवा महोत्सवात जी महत्वाची नावं समोर आली, त्यात इराणी दिग्दर्शक जफर पनाहीचं नाव बरच वर होतं. त्यामुळे त्याचा बर्लिन महोत्सवात गाजलेला, आणि त्यांचं पटकथेचं सर्वोच्च पारितोषिक पटकवणारा 'क्लोज्ड कर्टन' पाहायचा हे ठरुन गेलं.

असं दिसून येतं, की मर्यादा, अडचणी, या बहुतेक वेळा कलावंताची कला अधिक धारदार करतात. सेन्साॅरशिप त्यांच्या कलाकृतींमधून प्रतिकांची योजना करायला आणि आशयमूल्य वाढवायला भाग पाडते, साधनांच्या मर्यादा त्यांच्याकडून अचूक आणि मोजक्या सामग्रीत फोकस्ड अशा स्वरुपाचं काम करुन घेतात, राजकीय आपत्ती त्यांना अन्यायाशी सामना करायला शिकवते. अशा बिकट परिस्थितीत काम करणारा कलावंत हा नेहमीच आपण काय करतोय, ते करण्यामागे आपली भूमिका काय, आणि ते करण्याचा हाच सर्वात योग्य मार्ग आहे का, अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना दिसतो.  त्याचं कामही निश्चित स्वरुपाचं आणि पूर्ण विचारांती पार पाडलेलं दिसतं.

या प्रकारच्या कामाची अनेक उदाहरणं आपल्याला चित्रपटक्षेत्रात पाहायला मिळतात. महायुध्दानंतरच्या बेचिराख इटलीमधे फोफावलेला नववास्तववाद, पारंपारिक संकेतांना कंटाळून चित्रपटांकडे नव्या नजरेने पाहाताना फ्रेन्च न्यू वेव्हच्या समीक्षक-दिग्दर्शकांनी शोधलेले स्वस्त - झटपट पर्याय, हाॅलिवुडला नकार देताना अमेरिकन इन्डीपेन्डन्ड चित्रपटांनी केलेले नवे प्रयोग, इराणी राजवटीच्या कडक सेन्साॅरशिप धोरणाला चकवताना इथल्या दिग्दर्शकांनी आशयसूत्रांवर दिलेला भर, अशी अनेक उदाहरणंं आपल्याला शोधल्यास सापडतील. 'क्लोज्ड कर्टन' हा या परंपरेतलाच चित्रपट मानावा लागेल.

कर्टनकडे वळण्यापूर्वी थोडं पनाहीविषयी, कारण एका अर्थाने क्लोज्ड कर्टन हा मुळी सिनेमाच नाही, तो दिग्दर्शकाच्या मनोवस्थेचच एक प्रतिक आहे.

जफर पनाही हा एके काळचा अब्बास कायरोस्तामी या नव्या इराणी चित्रपटांमधल्या मोठ्या दिग्दर्शकाचा सहायक, त्यामुळे त्याच्या कामावर कायरोस्तामीचा प्रभाव जाणवण्यासारखा आहे. दृश्यरुप आणि आशय या दोन्ही बाबतीत. १९९५ मधल्या कान चित्रपटमहोत्सवात पारितोषिकप्राप्त ठरलेल्या 'द व्हाईट बलून' या पहिल्याच चित्रपटाने पनाही एकदम प्रकाशात आला. पुढे द मिरर(१९९७) किंवा द सर्कल ( २०००) अशा सातत्याने केलेल्या चांगल्या वास्तववादी चित्रपटांमधून त्याचं नाव जगभर झालं आणि चित्रपटमहोत्सवांमधून त्याच्या चित्रपटांना नेहमी मागणी राहीली. इराणी राज्यकर्त्यांचा मात्र त्याच्यावर राग होता तो त्याने आपल्या चित्रपटातून मांडलेल्या तत्कालिन इराणी वास्तवामुळे. गरीबी, सामान्य माणसांपुढल्या अडचणी, स्त्रीयांबद्दलचं धार्मिक आणि सामाजिक धोरण, अशा मुद्द्यांना तो नेमाने हात घालत असल्याने जगभरात तो देशाची प्रतिमा मलीन करतोय अशी भावना त्याच्याबद्दल होतीच. तिची तीव्रता वाढत गेली आणि बर््याच छोट्या मोठ्या कुरबुरींनंतर २०१० मधे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. त्याला दोषी मानून सहा वर्ष कैद आणि वीस वर्ष चित्रपटनिर्मितीवर बंदी अशी असंस्कृत शिक्षा ठोठावण्यात आली. अर्थात, पनाही त्यामुळे गप्प बसला नाही.

गेल्या दोन तीन वर्षात, आपल्या शिक्षेविरोधात अपील केलेल्या पनाहीने इराणी कायद्याला न जुमानता दोन चित्रपट केले. आधीच प्रखर वास्तवदर्शनावर भर असणार््या पनाहीचे हे दोन चित्रपट, हे फिक्शनला केवळ मांडणीच्या विचाराकरता वापरणारे आणि इराणी कायद्याला सरळच आव्हान देणारे आहेत. त्यातला पहिला, जवळ जवळ माहितीपट म्हणण्यासारखा 'धिस इज नाॅट ए फिल्म' हा खटल्यानंतरच्या दिवसांतल्या दिग्दर्शकाच्या आयुष्याकडे पाहाणारा चित्रपट . गुप्तपणे चित्रित केलेला आणि केकमधे लपवलेल्या युएसबी ड्राईव्हमधून देशाबाहेर काढून कान महोत्सवात दाखवलेला. 'क्लोज्ड कर्टन' देखील त्या  चित्रपटाप्रमाणेच पनाहीच्या जीवनातल्या चालू टप्प्याकडे पाहातो पण प्रत्यक्ष जगण्यापेक्षा त्याच्या डोक्यात चाललेल्या विचारांवर फोकस ठेवून. कलाकाराला कलेशिवाय जगणं शक्य आहे का ?वास्तव आणि कला यात वरचढ कोण आणि त्यांचं अस्तित्व खरोखर एकमेकांपासून आलिप्त असू शकतं का?  असे प्रश्न या चित्रपटात मांडले जातात.

इराणी चित्रपटांचा एक खास चाहाता वर्ग आहे ज्यात मी स्वतःला मानत नाही. वास्तववाद चांगलाच आहे पण केवळ जीवनदर्शन म्हणजेच सिनेमा असं मला वाटत नाही. तरीही काही दिग्दर्शकांसाठी वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला ठेवणं आवश्यक असतं. हा दिग्दर्शक त्या प्रकारात मोडतो.

क्लोज्ड कर्टनची सुरुवात ही इराणी वळणाच्या टिपीकल लाँग टेकने होते, एका घराच्या फ्रेन्च विंडोतून दिसणार््या दृश्यापासून. लांबवर एक गाडी येऊन थांबते, मग दोन माणसं उतरतात, सामान सुमान घेतात. मग आधी एक नंतर दुसरा असं करत हळूहळू घराच्या दिशेने यायला लागतात. आपण पाहात राहातो. कॅमेरा ना हलत, ना त्या लोकांच्या जवळ जात. सारं चाललय त्या गतीने सुरू राहातं.

 थोडं विषयांतर करायचं तर मी म्हणेन, की चांगले चित्रपट पाहायचे तर अशा विविध गतींबरोबर जुळवून घेण्याची तयारी ठेवावी लागते. सर्व चित्रपट एकाच प्रकारचे असतील आणि आपल्याला आवडेल ते आणि तेवढच त्यात असेलसं मानणं हे आपला अनुभव संकुचित करणारं आहे. आपल्याकडे  मोठ्या प्रमाणात दिसणारा प्रेक्षक आणि समीक्षक यांमधला विसंवाद हा बराचसा दोन्ही बाजूंच्या केवळ आपल्या प्राथमिक वैयक्तिक आवडीनिवडीना धरून राहण्यातून आलेला आहे. त्यांची क्षितीजं विस्तारणं हा त्यावरचा एक उपाय मानता येईल. असो.

तर गाडीतून उतरणार््यांपैकी एकच जण, या समुद्रकिनार््याजवळच्या बंगलीवजा घरात मुक्कामासाठी आलेला असतो. आल्याआल्याच तो( कम्बोजिआ पार्तोवी, चित्रपटाचा सहदिग्दर्शक),  घरभरचे सारे पडदे बंद करुन टाकतो. मग हळूच जवळच्या बॅगेतून लपवून आणलेला कुत्रा बाहेर काढतो. इराणी धर्मवाद्यांच्या विरोधाला न जुमानता आपण पाळलेला कुत्रा वाचवायचाच असा त्याचा निश्चय असतो, आणि ओढलेले पडदे हे प्रथमदर्शनी तरी त्याच कारणासाठी असतात.  लवकरच तो टक्कल करुन आपल्या रुपात जमेल तेवढा बदल करतो. बैठक मारतो आणि लिहायला बसतो. आता आपल्याला कळतं की हा पटकथाकार आहे.

 रात्रीच्या वेळी मेलिका ( मरयम मोकादम) आणि रेजा ( हदी सईदी) हे भाऊबहीण रहस्यमय रीत्या अवतरतात. पोलिसांचा ससेमिरा चुकवून ते तेवढ्यापुरते बंगलीत आश्रयाला आलेले.  रेजा मेलिकाला बंगलीतच ठेवून बाहेर पडतो. वर लेखकाला ती सुईसाईडल असल्याचं सांगून तिच्यावर लक्ष ठेवायला सांगतो. मात्र मेलिकाचं बोलणं वागणं लेखकाला संशयास्पद वाटतं. हे रहस्य वाढत चाललयसं वाटतावाटताच स्वतः दिग्दर्शक जफर पनाहीच बंगलीत अवतरतो आणि चित्रपटाला वेगळीच कलाटणी मिळते.

पिरान्देलोने १९२१ मधे लिहिलेल्या ' सिक्स कॅरेक्टर्स इन सर्च आॅफ अॅन आॅथर ' ( आपल्याकडलं नाव 'नाटककाराच्या शोधात सहा पात्रे' ) नाटकात सामाजिक वास्तवाशी जोडलेली सहा पात्रं पिरान्देलोच्याच 'द रुल्स आॅफ द गेम' नाटकाच्या तालमीत घुसून आपली कथा पूर्ण करण्यासाठी नाटककाराच्या शोधात असल्याचा दावा करतात आणि स्टीवन किंगच्या डार्क टाॅवर मालिकेतल्या 'साँग आॅफ सुझॅना' या पाचव्या भागात (२००४)कादंबरीचे नायक थेट स्टीवन किंगच्या घरात शिरून तो मालिका पूर्ण करेल याची खात्री करुन घेतात. याच प्रकारची वास्तव कल्पिताची सरमिसळ ही क्लोज्ड कर्टनच्या मुळाशी आहे. त्यातला पूर्वार्ध  हा वास्तवाशी संबंधित परंतु तरीही काल्पनिक आशय रेखाटतो, तर उत्तरार्ध स्वतः पनाहीबरोबर ( ते बंगलीवजा घर त्याच्याच तर मालकीचं असतं) त्याच्यावरल्या आपत्तीचा विचार करतो. मात्र तो करतानाही कल्पित भागातली मेलिका आणि लेखकाची पात्र पनाहीला खुणावत राहातात. मेलिका वास्तवाचं नैराश्य अधोरेखित करत सुचवते, की यातून सुटण्याचा मृत्यू हा एकच उपाय आहे, तर कुत्र्याला वाचवून पडद्यांनी झाकलेल्या घरात राहाणारा, अन परिस्थिती सुधारण्याची वाट पाहाणारा आशावादी लेखक हा त्याही परिस्थितीत आपला कलात्मक विचार जागा ठेवतो.

क्लोज्ड कर्टन हा कलावंताच्या अस्तित्वाचाच प्रश्न मांडतो. लेखकाने, कवीने , साहित्यिकाने, कलावंतांनी कोणत्याही परिस्थितीत आशावादी असावं का, तसं असणं शक्य आहे का? त्यासाठी वेळप्रसंगी वास्तवाशी तडजोड करुन ? त्याच्याकडे दुर्लक्ष करुन? कोणत्या थराला गोष्टी जाईपर्यंत तो हे करु शकेल? आणि एकदा का हे अशक्य झालं की मग पुढे काय?

केवळ चित्रपटाच्या अवकाशात पाहायचं, तर क्लोज्ड कर्टन शोकांत नाही. तो त्या परिस्थितीतही आपली सकारात्मक बाजू जागी ठेवतो. जफर पनाही अजून झुंजायला तयार असल्याचं सुचित करतो. त्याच्या डोक्यातला आत्महत्येचा विचार सध्या तरी तो अमलात आणणार नाही हे दाखवून देतो. मात्र आजच्या काळात एखाद्या जागतिक किर्ती मिळवलेल्या महत्वाच्या दिग्दर्शकाच्या मनात असा विचार येऊ पाहाणं, हीदेखील एक शोकांतिकाच नाही तर काय !
- ganesh matkari

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP