पुरस्कारांचे दिवस आणि सेन्साॅरशिप

>> Sunday, February 16, 2014
जानेवारी ते एप्रिल, हा काळ आपल्याकडल्या इंग्रजी चित्रपटरसिकांसाठी चांगला असतो. सामान्यत: केवळ दिखाऊ चित्रपट आणणारे चित्रपट वितरक थोडा काळ आपली गणितं बाजूला ठेवतात आणि समृध्द आशयाला प्राधान्य असलेले चित्रपट आपल्या चित्रपटगृहांमधे पाहायला मिळण्याची शक्यता वाढते. कधीकधी तर आपल्या चित्रपटप्रदर्शकांनी 'जागतिक चित्रपट म्हणजे केवळ हाॅलिवुड' हा बाणा बाजूला ठेवत चक्क इतर देशांच्या चित्रपटांची आयात केल्याचंही दिसून येतं. यात आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही, कारण याचा वितरकांच्या सद्सदविवेकबुध्दीशी काहीच संबंध नाही. उलट यात त्यांची व्यावसायिक मानसिकताच जागृत असल्याचं दिसून येतं.

हा काळ अवाॅर्ड सीझनचा आहे. गेल्या वर्षीच्या कामगिरीची दखल या काळात घेतली जाते.सर्वात प्रथम देण्यात येणारी आणि आॅस्करचा प्रीव्ह्यू मानली जाणारी गोल्डन ग्लोब अवाॅर्ड्स, सर्वात लोकप्रिय मानली जाणारी आॅस्कर्स अर्थात अकॅडमी अवाॅर्ड्स, नंतर ब्रिटीश अकॅडमीची बाफ्टा आणि अमेरिकन इन्डीपेन्डन्ट सिनेमाला दिली जाणारी इन्डीपेन्डन्ट स्पिरीट अवाॅर्ड्स या सार््या मोठ्या पुरस्कारांचा हा काळ. साहजिकच, या काळात या स्पर्धेत असणार््या चित्रपटांची ( मग ते गंभीर असोत वा रंजक) चांगलीच हवा असते. हे पुरस्कार समारंभ टिव्हीवर दाखवणारे चॅनल्स सतत या समारंभांची  हाईप वाढवत नेण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातूनया चित्रपटांची चांगली जाहिरातदेखील होते. साहजिकच, या काळापुरता एक प्रेक्षकवर्ग तयार होत जातो, जो सामान्यत: उपलब्ध प्रेक्षकवर्गाहून मोठा आहे, ज्याला या चित्रपटांची , त्यांच्या विषयांची, त्यांच्याबद्दल तयार झालेल्या मतप्रवाहांची चांगली माहिती आहे, आणि संधी मिळाल्यास तो हे ( आणि यात पारितोषिक नामांकनात असलेले परभाषिक चित्रपटही आले) तिकीट काढून नक्कीच पाहिल. मग अशा परिस्थितीत वितरकांनी गप्प बसून राहाणं, अगदीच मूर्खपणाचं.

परिणामी, या काळात हे सारे नव्याने प्रदर्शित होणारे चित्रपट आपल्याला हक्काने, मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतात. यंदाचच घ्या. गोल्डन ग्लोबची पारितोषिकं याआधीच देण्यात आली आहेत आणि तिथे पारितोषिकप्राप्त ठरलेली स्टीव मॅक्वीनचा '१२ इअर्स अ स्लेव्ह' आणि  डेव्हिड ओ रसेल चा 'अमेरिकन हसल' ही घोडी आॅस्कर स्पर्धेत पुढे असणार याबाबत कोणाच्याच मनात शंका नाही. त्याबरोबरच स्कोर्सेसीचा ' द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट', वुडी अॅलनचा 'ब्लू जॅस्मीन', स्पाइक जोन्जचा 'हर' या आणि अशा अनेक चित्रपटांबद्दलही कुतुहल वाढत चाललय. यातले वुल्फ  तर आपल्याकडे आॅलरेडी प्रदर्शित झालाय , हसल आणि यादीतले इतरही अनेक चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत कोणीही खरा चित्रपटप्रेमी या चित्रपटांना मोठ्या पडद्यावर पाहायची संधी सोडणार नाही. बरोबर?

चूक !

हे उत्तर कोणाला खोटं वाटेल, अतिशयोक्त वाटेल. आतापर्यंतच्या युक्तीवादाला निरर्थक ठरवणारं वाटेल. पण प्रत्यक्ष पाहिलं तर ते अगदी प्रॅक्टीकल म्हणण्यासारखं आहे. कसं ते सांगतो.

हाॅलिवुडचं स्वरुप हे ढोबळमानाने पाहिलं तर आपल्या चित्रपटउद्योगासारखंच आहे. म्हणजे प्रेक्षकांची करमणूक करणं हा आपल्यासारखाच त्यांच्या व्यावसायिक चित्रपटांमागचा अगदी मूलभूत हेतू आहे, आणि त्यातून पैसा मिळवणं हादेखील. आपल्याकडे ज्याप्रमाणे एकेकाळी समांतर चित्रपट होता आणि आजही वेगळा चित्रपट करणार््यांचा एक गट कार्यरत आहे, तसाच त्यांच्याकडे 'इन्डीपेन्डन्ट' या लेबलाखाली हाॅलिवुडबाह्य अस्तित्व टिकवणारा गट आहे. असं जरी असलं, तरीही आशयाच्या शक्यता, प्रेक्षकांची तयारी आणि विषयाचं वैविध्य, या सार््याच बाबतीत, आपण आणि ते यांच्यात खूप फरक आहे. त्यांची संस्कृती, सामाजिक वातावरण, जीवनमान, हेदेखील आपल्याहून वेगळं आहे. काही कमाल मर्यादेत, आविष्कारस्वातंत्र्यावर त्यांचा विश्वास आहे. साहजिकच, ते आशयापासून दृश्ययोजनांपर्यंत जो मोकळेपणा ठेवतात, तो आपल्याकडे चालणं कठीण होऊन बसतं.

आपल्याकडे अनावश्यक टॅबू फार गोष्टींवर आहेत. तुम्ही अमूक विचार मांडू शकत नाही, अमूक राजकीय पक्षाविरोधात बोलू शकत नाही, अमूक धर्माला ( अमूक कशाला, कोणत्याही म्हणू) प्रचलित पारंपारिक दृष्टीकोनापलीकडे जाऊन पाहू शकत नाही, सभ्यतेच्या पारंपारीक भारतीय कल्पनांपलीकडे जाऊन दृश्य दाखवू शकत नाही वगैरे. पारितोषिकप्राप्त चित्रपट हे नियमितपणे यातल्या कोणत्या ना कोणत्या लिखित वा अलिखित नियमाच्या विरोधात जाणारे असतात कारण त्यांची आपल्याला काय पडद्यावर आणायचंय याबद्दल काही एक भूमिका असते, जी सारंच गुळमुळीतपणे मांडत, वय वर्षं आठ ते एेशी, अशा सार्वत्रिक प्रेक्षकवर्गाला कवेत घेणारी नसते. अशा परिस्थितीत  आपल्याला चित्रपटगृहात काय पाहायला मिळेल, अथवा मिळेल का, याची जराही शाश्वती उरत नाही.

या आॅस्करचंच उदाहरण घ्यायचं, तर ' द वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट' आणि  ' अमेरिकन हसल हे दोन्ही चित्रपट त्यांच्या दृश्य संवेदनांतआपल्या सभ्यतेच्या पारंपारिक कल्पनांना आव्हान देणारे आहेत. वुल्फ हा जाॅर्डन बेलफर्ट या भ्रष्ट स्टाॅकब्रोकरची सुरस आणि चमत्कारिक गोष्ट सांगतो, तर हसल १९७०/८० च्या दशकात भ्रष्ट राजकारण्यांना पकडण्यासाठी एफबीआयने दोन चोरांना हाताशी धरल्याची थरारक कथा सांगतो. गंमतीची गोष्ट अशी, की दोन्ही कथा, काही एक प्रमाणात सत्य घटनांवर आधारीत आहेत. वुल्फ बेलफर्ट च्या आत्मचरित्रावरच आधारलाय, तर हसल संपूर्ण अहवाल खरा असल्याचं कबूल करत नसला, तरी याला सत्याचा आधार असल्याचं श्रेयनामावलीतच मांडतो. दोन्ही चित्रपट आपल्याकडे येताना सेन्साॅर बोर्डाच्या तावडीत अडकणार हे या चित्रपटांच्या कथानकाचा गोषवारा वाचताच लक्षात येत होतं, प्रामुख्याने त्यातल्या काही धीट दृश्यांसाठी. वुल्फची काटछाट मी प्रत्यक्षात बघितलेलीच आहे, हसलचं त्या प्रमाणात बिघडणार नाही, पण काहीतरी कापलं जाईल निश्चित. हा अंक प्रसिध्द होईपर्यंत त्याचंही काय बरं वाईट केलं जातंय हेही दिसेलच.

सेन्साॅर बोर्ड हे आपल्या भल्यासाठी आहे, असं आपण गृहीत धरु ( गृहीत धरणंच बरं, सिध्द करणं कठीण) , पण जेव्हा त्यांच्यासमोर या चित्रपटांसारख्या कलाकृती येतात, तेव्हा ते काय दृष्टीकोनातून त्यांचा विचार करतात हे मला पडलेलं मोठच कोडं आहे. हे दोन्ही चित्रपट काही एक गंभीर वळणाचा आशय हसत खेळत मांडणारे आहेत. दोन्ही मोठ्या , गाजलेल्या , आॅस्करविनींग दिग्दर्शकांनी साकारले आहेत, त्यात पहिल्या दर्जाचा, स्वत:च्या भूमिकांकडे अतिशय गंभीरपणे पाहाणारा नटसंच आहे. जेव्हा प्रयत्न या प्रकारचा असतो, तेव्हा आपल्याला चित्रपटातच्या कलात्मक बाजूची जाण असली नसली, तरी त्याकडे थोडं सावधपणे पाहाणं गरजेचं असतं. ही सारी इतकी प्रतिष्ठीत , नावाजलेली , वैचारीक पार्श्वभूमी असणारी मंडळी, जर काही आपल्या चटकन पचनी न पडणारं दाखवत असतील, तर सरळसरळ त्यावर कात्री चालवण्यापेक्षा , त्याकडे पुन्हा एकदा पाहून आपल्या समजण्यात काही घोटाळा तर नाही, हे पाहाणं आवश्यक ठरतं.

बर््याचदा , चित्रपट हे संवाद वा दृश्यशैली विशिष्ट प्रकारची ठेवतात. कधीकधी तर मुद्दाम ती एका टोकाला नेणारी, बिचकवणारी ठेवावी लागते. त्याचा परीणाम हा चित्रपटांना एक टेक्श्चर देण्यासाठी केला जातो, आणि तो डिझाईन करताना दिग्दर्शकाचा काही एक विचार असतो. स्टॅनली कुब्रिकच्या ' द क्लाॅकवर्क आॅरेंज ' मधली प्रक्षोभक दृश्य, किंवा माईक निकोल्सच्या ' क्लोजर'मधली धक्कादायक भाषा अशी कितीतरी उदाहरणं आपण देऊ शकतो  जी प्रत्येक वेळी काही ना काही हेतू मनात धरुन वापरल्याचं आपल्या लक्षात येतं. ही काढण्याची, बदलण्याची, चित्रपटाच्या मूळ परिणामाला धोका पोचेलसं काही करण्याची सेन्साॅर बोर्ड  सदस्यांना गरज का वाटावी?

हे सरळ आहे, की सार््या गोष्टी सर्व वयाच्या प्रेक्षकांसाठी नसतात. पण त्यासाठी तो प्रौढांसाठी मर्यादीत ठेवणं, हे त्यांच्या हातात आहेच. पण एकदा ही वयोमर्यादा निश्चित केली, की पुढे प्रत्येक दृश्य कापत राहाण्यात काय मुद्दा आहे? एकाच वेळी प्रेक्षक समजत्या वयाचा परंतु असमंजस मानण्याची ही कोणती योजना? तसं केल्याने उलटच परिणाम होतो. कापलेल्या जागा काही सहजासहजी लपत नाहीत आणि तयार होणार््या दृश्य खाचखळग्यांनी प्रेक्षक कथेबरोबर समरस होऊ शकत नाही.

त्याखेरीज आणखी एक गोष्ट महत्वाची. ती म्हणजे विशिष्ट दृष्य कापण्यामागचं कारण. चित्रपट हे अनेकदा जे प्रत्यक्ष दाखवतात, त्याहूनही अधिक धक्कादायक गोष्ट सूचित करतात. वुल्फ आॅफ वाॅल स्ट्रीट नग्नता दाखवत असला, तरी प्रत्यक्षात ती नग्नता भयंकर नाही, तर त्यातून दिसणारा समाजाच्या एका स्तराचा अॅटीट्यूड भयंकर आहे. ही दृष्य वापरली जातात ती केवळ आशयाला पूरक म्हणून. त्यांना काढणं हे दिग्दर्शकाच्या हातातलं एक अस्त्र काढून घेण्यासारखं असल्याने योग्य नाही. आणि जर ते ती दृश्य पूरक नसतील, आणि आशयाचा जहालपणा तसाही प्रेक्षकापर्यंत पोचत असेल तर मुळातच ती काढण्यात मुद्दा नाही, कारण अधिक भयंकर आहे तो आशय ,दृष्य नाही . चित्रपटात, चांगल्या दर्जेदार चित्रपटात जे काही दिसेल त्याहून कितीतरी धक्कादायक गोष्टी आज शाळकरी मुलांना इन्टरनेटवर घरबसल्या पाहाता येतात. यावर सेन्साॅर बोर्डाचं काहीही नियंत्रण नाही. मग कलाकृतीचं अवमूल्यन करणारा , आणि स्वत:कडे मोठेपणाची भूमिका घेऊन भल्याभल्यांच्या हेतूविषयी शंका घेणारा हा सेन्साॅरचा फार्स कशासाठी?

याचा परिणाम होतो तो हाच, की या प्री आॅस्कर काळात नवे चित्रपट प्रदर्शित होउनही, अनेक खरे चित्रपटरसिक ते चित्रपटगृहात जाऊन पाहावे का नाही, या संभ्रमात पडतात. खासकरुन संवेदनशील विषयांवरले वा वादग्रस्त चित्रपट. त्यापेक्षा इन्टरनेटवरुन डाऊनलोड करण्याचा मार्ग अवैध असला, तरी कलाकृती मूळच्या रुपात पाहायला मिळण्याचा मोह हा कितीतरी अधिक प्रमाणात असतो. या मंडळींना दोषी ठरवणं हे नक्कीच सोपं आहे, पण मला तरी त्यांच्या तर्कशास्त्रात काही चूक दिसत नाही. निदान या चित्रपटांकडे पाहाण्याच्या आपल्या सरकारी, कायदेशीर धोरणात , कलाप्रांताचा निश्चित विचार करून काही बदल घडवल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही.
-गणेश मतकरी
 (Grihaswaminimadhun)

3 comments:

Anonymous,  February 17, 2014 at 12:55 AM  

मला वाटतेय कि आपले सेन्सोर बोर्ड जरा समंजसपणा दाखवतेय. मी wolf, hustle आणि slave थेटरमध्ये पहिले. Slave मध्ये तर फुल फ्रंटल न्युडीटी मोठ्या पडद्यावर होती. प्रणय दृश्ये कापली असतील कदाचित, बघावे लागतील आता PC वर.

Unknown February 17, 2014 at 6:35 AM  

Hello,

I was searching for "Cinema Paradiso" from the archive however couldn't find it. I will really appreciate if you could provide link here. Thanks a lot!

Digamber Kokitkar February 18, 2014 at 6:55 AM  

Gele te divas jevha aplya la avdicha chitrapat aapan release jhalya var cinemagruhat jaun pahaycho. But now due to Internet we can watch the movies before release in theaters which i do most of the times coz kahi movies javlchya theater madhye release hot nahit, far kami divas ani kami shows madhye release hotat (eg. Her) so, best is download and watch, pan theater madhye baghnyachi maja kahi aurach.Sensor board kadhi sudharnar (Mr. Rakesh Kumar yancha intervie mirror madhye vachla hota mhanun)mahit nahi. Pan apan navin paryay shodhayla pahijet.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP