यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची- एका नेत्याचं स्क्रॅपबुक

>> Sunday, March 16, 2014हा चित्रपट पाहिल्यापासून मी गोंधळात पडलो आहे. जे पाहिलं ते मला पटलं नाही, आवडलं नाही, हे मला माहीत आहे. पण प्रश्न तेवढाच नाही. आपल्याला आवडणारा दिग्दर्शक जेव्हा या प्रकारे आपल्याला कळणारच नाही असं काही करतो, तेव्हा वेगवेगळे प्रश्न पडतात. सामना , सिंहासन पासून अनेक चांगले चित्रपट देणार््या डाॅक्टर जब्बार पटेलांसारख्या दिग्दर्शकाने इतकं तर्कशून्य काही करणं कसं शक्य आहे? की तसं करण्यामागे दिग्दर्शकाचा काही विचार, मांडणीबद्दलच्या काही नव्या संकल्पना आहेत ज्या आपण समजून घेऊ शकलो नाही? मग आपल्या पहाण्यात, समजण्यात काही मूलभूत घोटाळा तर झाला नसेल ना? या विचारातच मी गेले तीन चार दिवस आहे. समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही.

फिल्म थिअरीच्या टेक्निकॅलिटीमधे न जाताही आपण जर ढोबळमानाने चित्रपटाच्या कथनशैलीकडे पाहिलं तर त्यात दोन घटकांचा विचार केलेला दिसून येतो. ते म्हणजे मूळ कथा आणि चित्रपटासाठी योजलेलं कथानक ( किंवा प्लाॅट). मूळ कथा ही कितीही मोठी असू शकते, अगदी अनेक वर्षांचा कालावधी व्यापणारीही. पण या कथेतून चित्रपटाचा प्लाॅट निवडणं, हे या चित्रपटाला खरा अर्थ आणून देतं. हे करताना दिग्दर्शकाने आपली भूमिका ठरवणं, आपल्याला काय सांगायचय याचा विचार करणं हे आवश्यक असतं. ते एकदा त्याच्यापुरतं ठरलं की चित्रपटाचा आराखडा काय प्रकारे केला जावा हे स्पष्ट होतं. ते करताना कधी त्याला महत्वाच्या घटना निवडून अनावश्यक भाग काढावा लागतो, कधी प्रसंगांची रचना अर्थाला प्राधान्य देऊन मागे पुढे करावी लागते, कधी एखाद्याच घटनेवर फोकस करुन इतर भाग पार्श्वभूमी म्हणून वापरावा लागतो. हे काय घ्यावं आणि कसं घ्यावं याचं गणित चित्रपट कसा होणार हे ठरवण्यासाठी कारणीभूत असतं.

हे गणित अधिक अवघड होतं ते चित्रपट चरित्रपट असेल तेव्हा, कारण चरित्रपट करायचा असं ठरलं की कथानायकाचं पूर्ण आयुष्य हेच कथा म्हणून उपलब्ध असतं. त्यातून दोन ते तीन तासांचा काळ कसा निवडायचा? प्रत्येक दिग्दर्शक याचं वेगवेगळ्या प्रकारे उत्तर काढतो. गांधीजींचं आयुष्य पाहिलं तर स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित ( अटेनबरोचा 'गांधी'), त्याआधीचा काळ दाखवणारा ( बेनेगलांचा 'मेकिंग आॅफ महात्मा') आणि गांधीजींच्या त्यांच्या मुलाबरोबरच्या विसंवादाचं चित्रण करणारा ( फिरोज खानचा ' गांधी, माय फादर') अशा तीन भूमिकांमधून केलेले चित्रपट आपल्याला दिसतात. या सार््यांची प्रेरणा गांधीचींचं चरित्र हीच आहे, पण प्रत्येकाने केलेली घटनांची, कालावधीची निवड त्यांना वेगळं करते. इतरत्रही हिटलरच्या अखेरच्या दिवसांवर आधारलेला ' डाउनफाॅल ' किंवा चे गेवारा बंडखोर होण्याआधीच्या काळातली त्याच्या वैचारिक बैठकीची सुरुवात दाखवणारा ' मोटरसायकल डायरीज ' असे उत्तम फोकस्ड प्रयत्नही अापल्याला पाहायला मिळतात. मुद्दा हाच, की तुमची भूमिका जितकी स्पष्ट, तितका तुमचा चित्रपट ती अचूक रित्या प्रेक्षकापुढे पोचवू शकतो.

आपल्याकडे सामान्यत: चरित्रपट , खासकरुन राजकीय चरित्रपट म्हंटलं, की फोकस्ड चित्रपटांएेवजी मोठ्या कालावधीचा पसारा मांडण्याची, अन त्यात या व्यक्तीच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीचा आढावा घेण्याची पध्दत आहे. त्यात वाईट वा चूक काहीच नाही. तसं करुनही उत्तम चरित्रपट होऊ शकतो हे गांधीने सिध्द केलेलंच आहे. त्याशिवायही केतन मेेहताचा 'सरदार' किंवा  स्वत: पटेलांचाच ' आंबेडकर' असे बर््यापैकी प्रयत्नही आहेत. 'यशवंतराव चव्हाण' मात्र हे यशस्वीपणे करु शकत नाही.

यशवंतराव कशा पध्दतीने मांडला जावा याबद्दल पटकथेत मुळातच काही गोंधळ आहेत. त्यांचं कौटंुबिक आयुष्य दाखवावं का राजकीय?  निवेदन प्रथमपुरुषी, त्याच्या स्वत:च्या नजरेतून उलगडणारं असावं का त्रयस्थ-तटस्थ? झाल्या घटना आहेत तशा मांडाव्या का त्यावर भाष्य करावं? कोणत्या घटनांना अधिक महत्व द्यावं आणि कोणत्या बाजूला ठेवाव्यात? कथाशैली नाट्यपूर्ण असावी का वास्तववादी?अशा सर्वच पातळ्यांवर या चित्रपटाचं काही ठरत नाही.

मुळात कथानकाला काळाचा संदर्भ देण्यासाठी, यशवंतरावांच्या वागण्याबोलण्यावर टिप्पणी करण्यासाठी एक प्राध्यापक ( नाना पाटेकर) आणि त्याच्याकडे यशवंतरावांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेण्यासाठी आलेली दोन मुलं, असं फ्रेमिंग डिव्हाईस वापरलेलं आहे. या मुलांनी यशवंतरावांबद्दलची पुस्तकं वाचली आहेत, पण त्यांचं आत्मचरित्रात्मक लिखाण मात्र त्यांनी का कोण जाणे वाचलेलं नाही. त्यांचं 'कृष्णाकाठ' कसं वाचायलाच हवं होतं, अशी प्रस्तावना प्राध्यापक करतो आणि यशवंत दहा वर्षांचा असल्यापासून गोष्ट सुरु होते.

इथे पहिला प्रश्न हा, की असं का? कारण फ्रेम गोष्टीप्रमाणे मुलं यशवंतरावांच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलायला आली आहेत. कृष्णाकाठ उत्तम चरित्र असेल पण त्यातल्या या लहानपणच्या तपशीलाचा या मुलांना काय फायदा? त्यामुळे मग ही प्रस्तावना या भागाला खरंतर गैरलागू. असो. एकदा का आपण भूतकाळात गेलो की प्राध्यापकांचा आवाज जाऊन तिथे यशवंतराव स्वत: बोलायला लागतात. नंतर तेही कमी का काय म्हणून एक शाहीरही येउन जातो. एव्हाना आपण या निवेदनपध्दतीच्या तर्कशुध्दतेचा विचार सोडून दिलेला असतो, आणि जे होईल ते ते पाहावे या निष्कर्षावर आलेले असतो.

चित्रपटाचे ढोबळमानाने दोन भाग पडतात. आणि हे खरोखरच संपूर्णपणे वेगळे भाग आहेत. मांडणी , आशय, पोत, या सार््याच दृष्टीनी. पहिला भाग छोटा यशवंत मोठा होऊन लग्न वगैरे करुन राजकारणात पडेस्तवर चालतो. हा भाग टेक्श्चरली साधारणत: जुन्या ध्येयवादी मराठी चित्रपटांसारखा आहे आणि त्यात गाण्यांची रेलचेल आहे. इतकी, की आपण म्युझिकल पाहात असल्याचाच इफेक्ट यावा. या भागातले राजकारणाचे, व्यक्तीरेखांचे संदर्भ बरेच लुटपुटीचे वाटतात. संवादही खरे वाटण्यापेक्षा नाट्यपूर्ण वाटतात. यशवंतचं ( आेम भूतकर) मधेच राजसंन्यास किंवा ज्युलिअस सीझरमधला प्रवेश करुन दाखवणं, जेलमधल्या नामांकित व्यक्तीरेखांचे चतुर संवाद, भलतीकडे येणारी गाणी ,यांमुळे हा सगळा भाग अनावश्यकपणे डेकोरेटीव होऊन जातो. त्यात काहीकाही अतिशय भावस्पर्शी जागा आहेत. वेणूताईंना अपत्य होणार नाही हे कळताच यशवंतरावांनी ते सहजपणे समजून घेणं ,यासारख्या जागा त्यांच्या दिलदारपणाची साक्ष आहेत. पण सततच्या नाट्यपूर्णतेत, हे नाजूक क्षण हरवून जातात.

दुसरा भाग आहे तो यशवंतराव (आता अशोक लोखंडे, विक्रम गायकवाडांच्या रंगभूषेच्या सहाय्याने केलेली  उत्तम कामगिरी) मेनस्ट्रीम राजकारणात उतरतात. हा खरा महत्वाचा भाग आहे, पण याचा प्राॅब्लेम आहे तो घटनांच्या गर्दीने काॅन्टेक्स्ट हरवून जाण्याचा. यशवंतराव हे व्यक्ती म्हणून आणि राजकारणी म्हणूनही मोठे, सच्चे आणि कर्तबगार होते ( असायचं त्या काळात असं सुध्दा !) हे मी एेकलेलं आहे पण मला याचे तपशील माहित नाहीत. त्यांच्या कार्यावर भर असणारा चरित्रपट ते कार्य उलगडून दाखवेल ही माझी अपेक्षा होती, जे तो करत नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतली यशवंतरावांची भूमिका, दिल्लीमधली त्यांची कारकिर्द, पंतप्रधानपदी पोचण्याची शक्यता असताना त्यांचा इंदिरा गांधींबरोबर (सुप्रिया विनोद) झालेला विसंवाद या सार््याला मांडताना एक दिशा येण्याची गरज होती. त्यांची भारतीय राजकारणाकडे पाहाण्याची दृष्टी, त्यांच्यावर झालेल्या टिकेमागची कारणं, नंतरच्या काळात वैफल्यग्रस्त होणं, या सार््याला एक काॅन्टेक्स्ट येण्याची गरज होती. कदाचित प्राध्यापकाचं भाष्य हे देऊ शकलं असतं, पण हे पात्र बर््याच वेळा फार सुपरफिशिअली वापरलं गेलेलं दिसतं. उदाहरणार्थ यशवंतरावांच्या राजकीय आयुष्यातल्या चाली प्रतिचाली अधोरेखित करण्यासाठी मधेच एकदा प्राध्यापक बुध्दीबळ खेळताना दिसतात. आता विद्यार्थ्यांना एका राजकीय विषयावर मार्गदर्शन करणारा प्राध्यापक चर्चा करताकरता मधेच बुध्दीबळ खेळेल? तेही बोलणं सुरुच ठेवून? या प्रकारची दिखाऊ दिग्दर्शकीय कामगिरी डाॅक्टरांसारख्या महत्वाच्या दिग्दर्शकाकडून अपेक्षित नव्हती. आणि वेळोवेळी दाखवलेल्या श्यामची आई, घाशीराम कोतवाल आणि नटसम्राट मधल्या भागांचं काय? मला वाटतं त्याविषयी न बोललेलंच बरं.

हा सारा भाग प्रामुख्याने दबतो, तो बातम्यांच्या मार््याने. या काळात अमुक अमुक बातम्या राजकीय महत्वाच्या होत्या असं सांगून आपल्यावर हेडलाईन्सचा भडीमार केला जातो आणि त्या त्या वेळच्या यशवंतरावांच्या वक्तव्याची दखल घेतली जाते. या बातम्यांमधे चीनबरोबरचं युध्द असो वा पाकिस्तानबरोबरचं वा दिल्लीत पोलिसदलाने केलेला संप असो, सगळ्यालाच सारखं महत्व मिळतं, आणि त्यावरच्या यशवंतरावांच्या प्रतिक्रिया एखाद्या न्यूजरील पलीकडची खोली गाठू शकत नाहीत. या प्रतिक्रियांपलीकडे जाऊन यशवंतरावांना जवळून पाहाणं चित्रपटाला शक्य होत नाही. या सार््या भागाचा परिणाम चरित्रपटाचा नाहीच नाही, माहितीपटाचाही नाही, तर एखादं वृत्तपत्रातली कटींग्ज चिकटवलेलं स्क्रॅपबुक चाळल्यासारखा वाटला. वजनदार, पण खोलात न जाणारा.

या चित्रपटातलं डिजिटल काम इतकं वरवरचं आणि उग्र का, हा खरं तर एका वेगळ्या लेखाचा विषय व्हावा. कथा सहजपणे प्रेक्षकापर्यंत पोचवणं हे चित्रपटाचं खरं काम असतं आणि त्यासाठी तांत्रिक चातुर्याचा उपयोग हा मदत म्हणून आणि स्वत:कडे लक्ष न वेधणारा असायला हवा. इथे संगणकीय चातुर्य बेताच्या कुवतीचं आणि सतत आपलं अस्तित्व अधोरेखित करणारं झालं आहे. सतत रंगीत अन कृष्णधवल रंगसंगतीत बदल करत राहाणं, रक्ताच्या कलात्मक ( ? ) चिळकांड्या, मधेच चित्रांचा वापर, एका प्रसंगातले संगणकीय पक्षी आणि इंद्रधनुष्य ,प्रेेक्षकांना डोईजड होणार््या हेडलाईन्सची सरबत्ती, अत्र्यांसाठी उगाच तयार केलेली वर्तमानपत्री पार्श्वभूमी वगैरे. दिग्दर्शकाने जसं अदृश्य असायला हवं, तसं व्हिजुअल इफेक्ट्स वाल्यांनीही. तरच त्यांचं काम प्रेक्षकाचा रसभंग न करता परीणामात भर टाकणारं ठरेल.

हा चित्रपट का पाहावा याची फार कारणं मी देउ शकणार नाही. लोखंडेंनी अक्षरश: जिवंत केलेले यशवंतराव चव्हाण हे एक कारण. कास्टिंग आणि रंगभूषा यांची चांगली कामगिरी हे दुसरं. प्रत्यक्ष यशवंतरावांची पुण्याई हेच कदाचित तिसरं कारण ठरु शकलं असतं. पण ती पुण्याई जर चित्रपट आपल्यापर्यंत पोचवूच शकत नसेल, तर या कारणात तरी अर्थ काय राहिला?

- गणेश मतकरी

1 comments:

Mahendra Teredesai March 17, 2014 at 11:20 PM  

Very APT criticism… Commendable...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP