आजोबाचा धडा
>> Sunday, May 18, 2014
'एवढ्या माणसांच्या गर्दीत माणसासारखं वागणारा हा एकटाच, म्हणून आजोबा !'
एका बिबट्याचं नामकरण 'आजोबा' असं का केलं, या प्रश्नाचं 'आजोबा चित्रपटात दिलं जाणारं हे उत्तर. वरवर पाहाता प्रगल्भ, काहीतरी सांगू पाहाणारं वाटेलसं, पण प्रत्यक्षात निरर्थक.हे नाव खरं का दिलं मला माहित नाही (गोष्टी एेकून आहे), पण त्या नावामागे काही विचार असेल तरी तो हा कसा असेल? एखादा प्राणी माणसासारखा वागला तर त्याचं नाव 'माणूस' शब्दाशी समानार्थी देता येईल, पण ' आजोबा' ? शिवाय नाव देताना तो कसा वागेल याची आपल्याला माहिती थोडीच असते? आणि खरं तर तो बिबट्या बापडा वन्य प्राण्यासारखाच वागतो. कोणाला कारणाशिवाय त्रास देत नाही, गरजेपुरतीच शिकार करतो, इत्यादी. इतक्या सज्जन प्राण्याला माणूस म्हणणं हाही खरं तर अपमानच की ! असो!
मी या उत्तराचा खास उल्लेख अशासाठी केला, की ' आजोबा' हा संपूर्ण चित्रपट याच वळणाचा आहे. आपण काहीतरी खास वेगळं,कलात्मक करतोय असा अविर्भाव असलेला पण प्रत्यक्ष फार मुद्दा नसणारा.
सुजय डहाकेच्या ' शाळा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाबद्दल मला विशेष प्रेम नाही. त्याच्या ( राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या) पटकथेचा प्राॅब्लेम हा होता की ' शाळा' कादंबरीतला दरेक प्रसंग चित्रपटात आणण्याची तिची धडपड होती. त्यामुळे चित्रपटासाठी घटनांची निवड हा प्रकारच नव्हता.परिणामी चित्रपट माध्यम आणि त्याचा परिचित कालावधी यासाठी चित्रपट खूपच भरगच्च ( चांगल्या अर्थाने नाही) झाला होता. 'आजोबा'चा प्राॅब्लेम उलटा आहे. त्याच्याकडे चित्रपटाला चालाविशी कल्पना आहे, पण प्रत्यक्ष घटना नाहीत. ज्या आहेत त्यातल्या जंगलातल्या ,बिबट्याबरोबरच्या घटना ते काही कारणामुळे ( प्रत्यक्ष चित्रण वेळखाऊ/ अवघड असेल, बजेट अवाक्याबाहेरचं असेल, स्वस्त परिणामकारक तंत्रज्ञान उपलब्ध नसेल, वा आणखी काही) दाखवू शकत नाहीत. आणि ज्या दाखवू शकतात त्या फारच रुटीन ,काहीच नाट्यमय घडण्याची शक्यता नसणार््या आहेत.
मुळात एका बिबट्याने ( अगेन्स्ट आॅल आॅड्स) केलेला प्रवास, हा विषय असणारा, आणि तशी जाहीरात करणारा चित्रपट हा प्रत्यक्ष बिबट्याचं केवळ स्टाॅक फूटेज (बर््याच प्रमाणात, काही अपवादात्मक प्रसंग वगळता) वापरुन करायचा म्हंटल्यावर जी अडचण होईल ती या चित्रपटाची आहे. घटना आहे पुण्याजवळच्या टाकळी ढोकेश्वर गावची जिथल्या विहीरीत एक बिबट्या पडतो.'आजोबा' असं नामकरण झाल्यावर, पूर्वा ( उर्मिला मातोंडकर ) या रिसर्चरच्या मदतीने त्याला़ माळशेजजवळ जंगलात सोडलं जातं,ते त्याला ट्रॅक करण्यासाठी शेपटीत चिप ( का सिमकार्ड ?) बसवल्यानंतर. पहिले काही दिवस सिग्नल मिळत नाही अन जेव्हा मिळतो तेव्हा पूर्वाच्या लक्षात येतं की आजोबा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
सत्य घटनेवर आधारित एका बिबट्याचा हा प्रवास दाखवण्याची कल्पना चांगलीच आहे , पण वाईल्ड लाईफ चित्रणच नसेल तर तो दाखवायचा कसा? मग त्यासाठी आजोबा काही युक्त्या करतो. हा चित्रपट वन्यजीव संशोधक विद्या अत्रेय यांच्या अनुभवावर आधारीत आहे. त्यांच्यावर बेतलेल्या पूर्वा या व्यक्तिरेखेला प्रमुख भूमिका देऊन चित्रपट मुळातच बिबट्याचा़ स्क्रीन टाईम कमी करतो.कथेच्या दृष्टीने हे तितकंसं योग्य नाही, कारण प्रत्यक्ष घटनात अॅक्टीव भाग होता बिबट्याचा, आणि विद्या यांचा सहभाग प्रामुख्याने निरीक्षकाचा होता. त्यामुळे पटकथा करताना वजनाची विभागणी आजोबाकडे झुकणारी हवी होती. इथे कारभार उलटा आहे. (कल्पना करा, संजयला प्रमुख भूमिका देऊन घडवलेलं महाभारत, किंवा काही टेकड्यांच्या स्टाॅक फूटेजच्या सहाय्याने केवळ ठाकूरच्या हवेलीत घडवलेला शोले ! मान्य, की ही उदाहरणं टोकाची आहेत, पण त्यातून मुद्दा स्पष्ट व्हावा.)आता आजोबाची भूमिका कमी केली तरी जंगल पूर्ण काढणंही शक्य नाही. काहीतरी दाखवायला तर लागणार. मग चित्रपट माफक खर््या फूटेजच्या जोडीला इतर काही युक्त्या वापरतो.
खर््या प्रसंगांना चालण्याजोगं साधारण व्हिडीओ गेम लेव्हलचं वास्तवसदृश अॅनिमेशन, वाईट अॅनिमेटेड बालचित्रपटांसारखं ( अगदी छोटा भीम लेव्हल) बिबट्याच्या प्रवासातल्या मुख्य घटना दाखवणारं अॅनिमेशन, एरीअल शाॅट्स, सूचक कॅमेरा अँगल, डिजिटल नकाशावरला कायम गैरहजर सिग्नल, जमेल तितका स्टिल फोटोंचा वापर असं काही बाही दाखवत आजोबाचा प्रेझेन्स आणण्याचा प्रयत्न चित्रपट करत राहातो. आजोबाबद्दल लिहीताना अनेकांनी त्यापेक्षा 'नॅशनल जाॅग्रफिक ' पाहा असं म्हटलय, त्यामागे कारण आहे. लोकांना हल्ली घरबसल्या आजोबा मधल्या केससारख्या अनेक केसेस आणि त्यांच्याबरोबर न घाबरता तन्मयतेने काम करणारे लोक यांचं अस्सल आणि वास्तव असूनही नाट्यपूर्ण चित्रण रोज पाहायला मिळतं. मग त्यांना असली जुळवाजुळव का खटकू नये?
खरं सांगायचं तर मलाही हे झेपलं नाही. जे खरं दाखवायला हवं, ते जर तुम्हाला दाखवता येणार नसेल, तर त्या विषयावर चित्रपट करायला घ्यावाच का? जेव्हा ते दाखवता येईल अशी तुमची खात्री होईल तेव्हा विषय वापरावा.बरं, जर जंगलात चित्रण शक्य नसेल तर पूर्वा ही व्यक्तिरेखा आशयाच्या दृष्टीने महत्वाची करण्याची कल्पनाही वाईट नव्हती. तिचे आईशी संबंध, व्यक्तिगत आयुष्य , सहकार््यांबरोबरची वागणूक , तिच्यावर होणारी टिका ,या सार््यातून एक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा उभी करता आली असती. पण इथे भूमिकेला येते ती लांबी, खोली नाही.
या भूमिकेसाठी उर्मिला मातोंडकरची निवड का केली असेल हे लक्षात यायला अवघड नाही. नावाभोवतालचं वलय प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करु शकतं. त्यात जेव्हा विषय वेगळा असेल तेव्हा तर नक्कीच मदत होऊ शकते.पण नुसतं नाव पुरेसं नाही. उर्मिलाची बोलण्याची पध्दत कृत्रिम आहे. एक पवित्रा घेऊन ती बोलतेय, किंवा उपदेश करतेय असं वाटतं. हे अधिक जाणवतं , ते बरोबर हृषिकेश जोशी, ओम भूतकर ( पूर्वाच्या सहकार््यांच्या भूमिकेत) सारखे अतिशय सहज नैसर्गिक अभिनय करणारे अभिनेते असतात तेव्हा. कदाचित पटकथा चांगली असती तर आपण पूर्वाच्या व्यक्तिरेखेत अधिक गुंतू शकलो असतो आणि मग ही अभिनयातली विसंगती आपल्याला इतकी खटकली नसती. पण ही झाली जरतरची गोष्ट.
आहे त्या स्थितीत पटकथेची परिस्थिती बिकट आहे. आजोबावर तर ती छायाचित्रणाच्या मर्यादांमुळे अधिक काळ रेंगाळू शकत नाही आणि पूर्वाच्या ट्रॅकमधे काही म्हणता काहीच घडत नाही. संशोधक ग्रुपचं आजोबावर नजर ठेवणं हेदेखील तसं गंमतीदार आहे. कारण नजर बहुतेकदा प्रत्यक्ष नसून कम्प्यूटरवरल्या डिजिटल ट्रॅकरवर ठेवली जाते. अर्ध्याहून अधिक वेळ त्यांना सिग्नल मिळत नाही. मिळतो तेव्हा सारेच जल्लोष करतात.उरलेला वेळ काळजी. मग रँडमली वेगवेगळ्या जागी फिरतात जिथे आजोबा असावा असं त्यांना वाटतं, किंवा ट्रॅकरच्या सहाय्याने कळतं. पूर्वा अधेमधे ती कशी आजोबाच्या वाटेतल्या अडचणी दूर करणार आहे, यावर धीरोदात्त भाषणं करते, मात्र ती प्रत्यक्ष काय करते, तर काहीच नाही. उदाहरणार्थ एकदा तिला नाशिक जवळ आजोबाचा सिग्नल मिळतो आणि तो हायवे क्राॅस करेल म्हणून सारे तिथे ठिय्या देऊन बसतात. पुढे कधीतरी तो क्राॅस करतो, पण कधी, ते यांना कळतही नाही. सारा वेळ हाच प्रकार .
मुळात विद्या अत्रेय यांच्या दृष्टीने संशोधन म्हणून हा अनुभव इन्टरेस्टिंग आणि मोलाचा आहे , पण प्रेक्षकासाठी केवळ 'रिसर्च' हा चित्रपटाचा विषय म्हणून इन्टरेस्टिंग आहे का? खासकरुन 'एका वाघाचा प्रवास' हा विषय दाखवण्याचा दिग्दर्शकाचा दावा असताना ?
खरी घटना, खर््या व्यक्तिरेखा असताना त्यांचं चित्रण स्टाॅक पध्दतीने करण्याची एक पध्दत अलीकडे काही मराठी आणि हिंदी चित्रपटात दिसायला लागलीये. आजोबामधेही हा प्रकार आहे.म्हणजे एकदा आईशी बोलताना पूर्वा तिला 'इतकी वर्षं काम केल्यावर आत्ता कुठेतरी यश दिसायला लागलंय' या प्रकारचं ( हे शब्दश: नाही, मी पॅराफ्रेज केलय) बोलते, किंवा पूर्वाचे मार्गदर्शक ( दिलीप प्रभावळकर, सुमारे दोन मिनिटांच्या भूमिकेत) तिचं ,' तू हे काम करतेयस म्हणून पुढच्या पिढ्याना फायदा होणार आहे' ( पुन्हा पॅराफ्रेज्ड) असं कौतुक करतात. आता पूर्वाच्या एकूण कामातली ही एक छोटी केस. तिला आजोबा सापडला तो अपघाताने आणि ती माहिती जमवतेय ती तशी रुटीन.ही तिची वन्स इन ए लाईफटाईम केस नाही( किंवा असल्यास ते जाणवत तरी नाही)त्यामुळे तिच्या आप्तांशी असं नाट्यपूर्ण बोलणं खरं वाटत नाही. सार््यानी असं छापील, ओळखीचं , अपेक्षित बोलल्याने सारं घडवलेलं वाटायला लागतं. अस्सल वाटत नाही. हृषिकेश जोशीच्या व्यक्तिरेखेला फाॅरेस्ट डिपार्टमेन्टमधे काम करुन दुर्बिण माहीत नसणं यासारखे अविश्वसनीय तपशील, ओम भूतकरचं अनावश्यक प्रेमप्रकरण हे सारंच चित्रपटाचा परिणाम कमी करत आणतं.
या सार््यापलीकडे जाऊन कौतुक करण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. पहिली आहे तो विषयाचा खूपच वेगळेपणा. पारंपारिक कथनशैलीशी फारकत घेऊन मराठी चित्रपटात अपेक्षित नसलेलं काही बनवायला घेण्याचा आत्मविश्वास हा खासच महत्वाचा. पण केवळ वेगळा विषय पुरेसा नाही , तो सादरही तसाच व्हायला हवा.
दुसरी कौतुकास्पद गोष्ट म्हणजे चित्रपटाचं सोफेस्टिकेशन. बेकार अॅनिमेशन वगळता तो सतत चांगला दिसतो,वेगळा वाटतो. कदाचित अधिक मोठं बजेट आणि वेळ खर्च करुन यातून एक खूप चांगला चित्रपट होऊ शकला असता असं वाटवणार््या जागाही इथे आहेत. नाही तो एकसंध परिणाम.
या दिग्दर्शकाचे पहिले दोन्ही प्रयत्न मला वैयक्तिक दृष्ट्या पटले नसले तरी त्याची दिशा बरोबर आहे असं मी म्हणू शकेन. त्याच्या उद्दीष्टापर्यंत मात्र तो पोचल्याचं अजून दिसत नाही. अर्थात, सर्वांच्याच प्रवासात अडचणी असतात, महत्व आहे ते तो प्रवास करत राहाण्याला.या चित्रपटात तरी दुसरं काय सांगितलय? 'आजोबा'पासून हा एक धडा तरी आपण नक्कीच घेऊ शकतो.
-- ganesh matkari Read more...