पुन्हा स्टार वाॅर्स- सनातन मूल्यांचा वैज्ञानिक ताळमेळ

>> Monday, May 5, 2014


(हे माझं पहिलं चित्रपट परीक्षण. महानगरच्या १९ सप्टेंम्बर १९९७ च्या अंकात आलेलं, सतरा वर्षांपूर्वीचं, त्याकाळातही वीस वर्षं जुन्या असणार््या चित्रपटाचं. तोवर मी चित्रपटांविषयी लिहीण्याची कल्पनाही केलेली नव्हती. पुढल्या आठवड्यापासून लिहायला लाग असं निखिल वागळेंनी सांगितल्यावर मी नवा कोणता चित्रपट येतोय याची चौकशी केली, तर ती होती रीमास्टर केलेली , स्टार वाॅर्स चित्रत्रयीची मूळ आवृत्ती, स्पेशल एडीशन. इतका गाजलेला आणि मला आवडणारा चित्रपट पहिल्या परीक्षणाला मिळणं हे मला खूप आॅस्पिशस वाटलं. यानंतर मी चित्रपटसमीक्षा रेग्युलरली सुरु केली. काल स्टार वाॅर्स फॅन सेलिब्रेट करत असलेला 'स्टार वाॅर्स डे ' होता. ४ मे ही तारीख, कारण ' मे द फोर्थ ' या तारखेचं ' मे द फोर्स बी विथ यू' , या मालिकेतल्या प्रसिध्द वचनाशी असणारं साम्य. त्या निमित्ताने हा लेख उत्खननात शोधला. तो मिळाला हेच आश्चर्य. या स्पेशल एडीशननंतर स्टार वाॅर्स प्रीक्वल आपल्याला पाहायला मिळाली आणि आता डिस्ने त्याच्या सीक्वल्स वर काम करतय. लवकरच तीही पाहयला मिळतील. या विषयावर मी अधिक विस्तृत लेख पुढे लिहीला. ज्यात यातल्या मिथमेकींगविषयी, हिडन फोर्ट्रेस सारख्या चित्रपटांच्या किंवा मॅटीने सिरीअल्सच्या ल्युकसला प्रभावित करणार््या संदर्भांविषयी बरंच आहे.तो लेख माझ्या 'फिल्ममेकर्स' पुस्तकात संग्रहीत आहे. पण हा पहिलाच प्रयत्न. त्यामुळे तसा ढोबळ असून माझ्यासाठी स्पेशल)


आपल्यापैकी बहुतेकांना ' स्टार वाॅर्स ' हा चित्रपट माहित असेल. अनेकांनी तो पाहिलादेखील असेल. पण माझ्यासारख्या अनेक जणांना पाहाण्याची इच्छा असूनही तो चित्रपटगृहात, त्याच्या पूर्वीच्या दिमाखदार रुपात पाहाणं शक्य नव्हतं. कारण जुन्या झालेल्या प्रती.
यावर उपाय म्हणजे अर्थात छोटा पडदा, जो कधीच भव्य चित्रपटांना न्याय देऊ शकत नाही. आज प्रथम प्रदर्शनानंतर वीस वर्षांनी 'स्टार वाॅर्स' आपल्यासमोर येत आहे. त्याच्या मूळ प्रतीहूनदेखील अधिक सुधारित स्वरुपात. त्यामागचे श्रम आहेत ते दिग्दर्शक जाॅर्ज ल्यूकस, 'इंडस्ट्रिअल लाईट अॅन्ड मॅजिक'चे तंत्रज्ञ आणि अर्थातच ट्वेन्टीएथ सेंचुरी फाॅक्स यांचे. त्यानिमित्तानं या चित्रपटाचं मूल्यांकन पुन्हा एकदा होणं जरुरीचं वाटतं.
मुळात हा चित्रपट प्रदर्शित झाला तो १९७७ मधे. त्यावेळी नुकत्याच बसल्ल्या व्हिएतनाम युध्द आणि वाॅटरगेट प्रकरणाच्या धक्क्यातून सावरणार््या जनतेला ही काहीशी पलायनवादी, काळ्या-पांढर््या रंगात रंगवलेली, ढोबळ तत्वज्ञान सांगणारी अद्भुतरम्य परीकथादिलासा देणारी वाटली आणि ' स्टार वाॅर्स' सर्वाधिक उत्पन्न मिळवणार््या चित्रपटांच्या यादीत दुसर््या क्रमांकावर जाऊन बसला. याचे पुढचे दोन भागदेखील ( द एम्पायर स्ट्राईक्स बॅक आणि रिटर्न आॅफ द जेडाय) चांगलेच यशस्वी ठरले. यात रंगवलेला सुष्ट आणि दुष्ट यांच्यातला कालातीत झगडा आणि सादरीकरणाची आधुनिक तंत्र लोकांच्या इतकी पसंतीला उतरली की ही परीकथा, आधुनिक पुराणकथेच्या, माॅडर्न मायथाॅलाॅजीच्या दर्जाला जाऊन पोचली.
ही कथा घडते, ती विश्वातल्या दुसर््या एखाद्या आकाशगंगेत, आणि तिला पार््श्वभूमी आहे, ती त्या जगातले निर्दय राज्यकर्ते आणि त्याना विरोध करणारे बंडखोर यांच्यातल्या लढ्याची. बंडखोरांनी राज्यकर्त्यांच्या नकळत एका ग्रहावर आपला तळ केला आहे. त्याची माहिती मिळवण्यासाठी ग्रॅन्ड माॅफ टार्कीन ( पीटर कुशिंग) आणि डार्थ वेडर ( डेव्हिड प्राऊस चा प्रत्यक्ष वावर, मात्र आवाज जेम्स अर्ल जोन्स यांचा) हे राज्यकर्त्यांचे सैन्यप्रमुख बंडखोरातल्या राजकन्या लिआ( कॅरी फिशर) ला ताब्यात घेतात. तत्पूर्वी ती आपले दोन यंत्रमानव सी- थ्रीपीओ आणि आर टू - डी टू यांना मदतीच्या आशेने अंतराळात सोडते. ते दोघं एका पृथ्वीसदृश ग्रहावर ल्यूक स्कायवाॅकरला (मार्क हॅमिल) सापडतात. तो आणि ओबी वान कनोबी( अॅलेक गिनेस)  हा जेडाय पंथाचा योध्दा, एका तिरसट आणि पैशांसाठी काही करायला तयार असणार््या, पण मुळच्या सुस्वभावी हान सोलो ( हॅरीसन फोर्ड) या यानचालकाच्या मदतीने तिला सोडवण्याच्या मोहिमेवर निघतात. यानंतरच्या घटना म्हणजे अतिशय वेगाने आणि स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने नेहमीच्या गोड शेवटापर्यंत होणारा प्रवास.
तुटपुंजी कथा आणि व्यक्तिरेखांवर आधारलेल्या या चित्रपटाचं यश हे दिग्दर्शकाने कल्पिलेल्या , शक्य कोटीतल्या वाटणार््या वीरपुरुष आणि दानव यांच्या विश्वातच आहे आणि ओघानेच ते प्रत्यक्षात आणण्यासाठी वापरण्यात आलेल्या तत्रज्ञानात. हे तंत्रज्ञान हा या चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे एवढंच म्हणणं योग्य नाही कारण खरं तर हे  तंत्रज्ञान म्हणजेच स्टार वाॅर्स.
आजपासून वीस वर्षांपूर्वी आजच्या इतक्या मोठ्या प्रमाणात काॅम्प्युटरचा उपयोग होत नसताना माॅडेल्स , बॅकप्रोजेक्शनच्या मदतीने केलेला हा चित्रपट ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. अर्थात, यंदा प्रदर्शित होणारी ' स्पेशल एडीशन' असल्याने यात ल्युकसने मूळ चित्रपटातल्या त्रुटी तर सुंधारल्या आहेतच, वर काही ठिकाणी नवी भरही टाकली आहे. उदाहरणादाखल बोलायचं, तर यात जाबा द हट् या राक्षसी परग्रहवासियाबरोबर हान सोलोचा एक प्रसंग आहे. मूळ चित्रपटात नसलेल्या पण चित्रित केल्या गेलेल्या या प्रवेशातल्या मूळ जाबाला पूर्ण काढून टाकून दिग्दर्शकाने संगणकीय मदतीने नवा जाबा तयार केलाय. त्याला दिलेला नवा आवाज आणि हॅरीसन फोर्डचा वीस वर्षांपूर्वीचा आवाज याचा मेळ घालणं ही एक कसोटी ठरल्यास नवल नाही.
या चित्रपटाचा एक गुण (आणि दोषही) म्हणजे यातली काळ्या पांढर््या रंगातली पात्र. त्यांना इतर छटा नाहीत. खरं तर त्यांना पात्रांएेवजी प्रवृत्ती म्हणता येईल. सर्व कथा घडते, ती नायकांच्या दृष्टीकोनांतून. त्यामुळे सर्व भाव भावना देखील ल्यूकच्या भाबड्या आशावादापुरत्या, सोलोच्या तिरसट चांगुलपणापुरत्या, लिआच्या निरागस धैर्यापुरत्या , आणि सी-थ्रीपीओ, आर टू- डी टूच्या मिश्कील मैत्रीपुरत्या मर्यादीत राहातात. त्यामुळेच की काय, पण ही भविष्यवादी वैज्ञानिका शेवटी सनातन मूल्यांनाच कवटाळते.
मार्क हॅमिलने ल्यूक चांगला उभा केला आहे. त्याचा नवखेपणा पण आल्या प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी, त्याचा 'फोर्स' या दैवी उर्जाक्षेत्रावर वाढत जाणारा विश्वास हा चित्रपटाचा पाया मानता येईल. लिआच्या भूमिकेत कॅरी फिशर दिसते छान, मात्र तिची केशरचना पृथ्वीवासियांच्या वरताण आहे.
सर्वात लक्षात राहातो, तो मात्र फोर्डचा सोलो. ही त्याच्या सुरुवातीच्या भूमिकांपैकी एक. काहीशा 'इंडिआना जोन्स' छापाच्या या भूमिकेने त्याला चांगलाच हात दिला. आजच्या फोर्डच्या चहात्यांना त्याची ही खूपच तरुण आवृत्ती आवडल्याशिवाय राहाणार नाही. वेडरच्या भूमिकेत खरं महत्व आहे ते वेश आणि आवाज यांना. त्याचा मुखवट्यासह असणारा काळा पेहराव, हा हाॅलिवुडमधल्या अजरामर वेशभूषांमधला एक आहे. जोन्सचा आवाजही स्टार वाॅर्सच्या खास आकर्षणातला एक मानला जातो.
इतरांच्या वेशभूषांचे ठळक तीन भाग पडतात. नायकाच्या बाजूला पायघोळ अंगरखे , झगे असे पौराणिक पध्दतीचे, खलनायकांच्या बाजूला युनिफाॅर्म्स. त्याखेरीज परग्रहवासी. त्यांचे प्रकार तर विचारुच नका. असो.
हा या शतकातला एक महत्वाचा चित्रपट. त्याचं स्वागत करायलाच हवं.
- ganesh matkari 

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP