पण काळ सोकावतो !

>> Sunday, April 3, 2016
गेली काही वर्ष मराठी चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमधला सहभाग हा जाणवण्यासारखा आहे. मराठी भाषेच्या चित्रपटाचं पारितोषिक तर हक्काचच असतं, पण ते सोडूनही आपल्याला दहा बारा पारितोषिकं मिळालेली असतात. मराठी चित्रपटात कामं करणारे आणि चोखंदळ रसिक यांच्यासाठी ती अभिमानाची गोष्टही आहेच. राष्ट्रीय पुरस्कारादरम्यानचा माझा एक नेहमीचा अनुभव आहे. पुरस्कारांची घोषणा होताच सोशल नेटवर्क आणि वर्तमानपत्रांमधल्या वाचकांच्या पत्रांमधून एक मोठा विरोधी सूर लागतो. सामान्यत: केवळ करमणुकीसाठी चित्रपट पहाणारे प्रेक्षक आणि ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर सारखे लोकप्रिय पुरस्कार यांमधला फरक कळत नाही अशा प्रेक्षकांचा यात पुढाकार असतो. मराठी नावं चिकार दिसली तरीही यातले अनेक चित्रपट प्रदर्शित झालेले नसतात, किंवा झाले असले, तरी त्यांच्या समांतर वळणाचं असल्याने बाॅक्स आॅफिसवर त्यांनी फार कमाई केलेली नसते. मग या प्रेक्षकांचा प्रश्न असतो, की प्रदर्शितच नं झालेल्या चित्रपटाला काय म्हणून बक्षिस द्यायचं? किंवा आम्ही अमुक चित्रपट पाहिला आणि आम्हाला काही तो आवडला नाही. मग त्याला बक्षिस? असं असूच शकत नाही. हे नक्कीच काहितरी सेटींग आहे.

असं झालं, की निदान सोशल नेटवर्कवर त्याला उत्तरं देण्याचं काम मी नित्यनेमाने करतो. उत्तर साधं आहे. प्रत्येक पुरस्काराचे काही एक निकष असतात. आणि त्यानुसार पारितोषिकं दिली जातात. फिल्मफेअर/स्क्रीन या प्रकारचे पुरस्कार हे लोकप्रिय चित्रपटांवर लक्ष ठेवणारे आणि हिंदी चित्रपटांसाठी असतात. तर राष्ट्रीय पुरस्कार हे देशभरातल्या चित्रपटाचा विचार करणारे, आणि कलात्मक दृष्टीकोन, आशय, यासारख्या गोष्टींनाही मानणारे असतात. पुरस्कार मिळण्यासाठी चित्रपट प्रदर्शित झालेला असण्याची गरज नसते, त्यांचा स्पर्धेत समावेश हा प्रदर्शनाच्या तारखेने नाही तर सेन्साॅर सर्टिफिकेटवरच्या तारखेनुसार होतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे आॅडिअन्स अवाॅर्ड नाही, त्यामुळे सर्वसाधारण प्रेक्षकाने पाहिला, नं पाहिला याने त्याला काही फरक पडत नाही. याची निवड चित्रपटाशी संबंधित जाणकार मंडळींकडून होत असते. लोकप्रियतेचा निकष इथे ग्राह्य मानला जात नाही . अर्थात , हे उत्तर दर्जा सांभाळत दिल्या जाणाऱ्या चिकित्सक निकालाला लागू पडतं. या वर्षी ते देण्यात काही मुद्दाच उरलेला नाही. यंदा राष्ट्रीय पुरस्काराने माझी चांगलीच पंचाईत केलीय , ती बाहुबली- द बिगिनिंग या ब्लाॅकबस्टर चित्रपटाला, सर्वोच्च मान असणारा सुवर्ण कमळ पुरस्कार देऊन! या पुरस्काराला डिफेन्ड करणं शक्यच नाही. आणि ते करण्याची गरजही वाटत नाही. पण मग आजवर माझा या पुरस्काराबद्दल गैरसमज होता की काय? आणि यंदाची सर्वोत्कृष्ट चित्रपट वगळून इतर निवड? तिचं काय करायचं?

या वेळच्या पुरस्कारांमधे असं दिसतं, की त्यावर व्यावसायिक सिनेमांचा ठसा आहे. सर्वोत्कृष्ट पुरस्कार जरी दाक्षिणात्य चित्रपटाने पटकवला असला, तरी इतर पुरस्कारांमधे सर्वोत्कृष्ट अभिनेता ( बच्चन,पिकू) , अभिनेत्री ( कंगना, तनू वेड्स मनू २) , दिग्दर्शक ( भंसाली, बाजीराव मस्तानी) अशी बाॅलिवुडची वर्णी लागलेली आहे. त्यामानाने प्रादेशिक चित्रपटांची निवड सरळ, अधिक योग्य वाटते. यातला मराठी पुरस्कार मिळवणारा रिंगण काही मी अजून पाहिलेला नाही, पण इतर प्रादेशिक चित्रपटांमधे महत्वाची वाटणारी नावं दिसताहेत, त्यामुळे, प्रादेशिक जुरीने आपलं काम चोख केलं असावं असं वाटायला जागा आहे. सेन्ट्रल कमिटीने मात्र असं का केलं, हे कळायला मार्ग नाही. हे विधान स्पष्ट करायचं, तर आपल्याला निवड प्रक्रियेकडे थोड्या तपशीलात पहावं लागेल.

राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरीचं काम हे दोन टप्प्यात चालतं. प्रादेशिक समिती आणि केंद्र समिती. प्रादेशिक समित्या पाच असतात, दक्षिणेतल्या अनेक भाषा आणि मुबलक चित्रपटांमुळे त्यांच्यासाठी दोन, तर पूर्व, पश्चिम आणि उत्तर विभागासाठी प्रत्येकी एक एक. या दर समितीत पाच सदस्य असतात. त्यात विभागातले आणि विभागाबाहेरचे यांचं मिश्रण असतं, तसंच विभागातल्या अधिकाधिक भाषांचं प्रातिनिधित्व असावं, असा प्रयत्न असतो. यामुळे, कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराची शक्यता, ही कमी होत जाते. या समित्या यादीतले चांगले चित्रपट निवडतात, तसच इतर पुरस्कारांसाठी नावं सुचवतात. या सुचनांसह पाचही प्रादेशिक कमिट्यांचे चेअरमन, हे नवे सभासद असणाऱ्या केंद्र समितीत सहभागी होतात, आणि मग एकत्रितपणे निकाल लावला जातो. हा प्रोसेस पाहिला तर लक्षात येतं, की प्रादेशिक पातळीवरचं काम, हे शक्य तितक्या त्रयस्थपणे, केवळ दर्जापलीकडे काही नं पहाता होतं, आणि यंदाही ते तसं झालं असावं असं वाटायला जागा आहे. पुढे केंद्र समितीत काय झालं, याबद्दल तुमचा अंदाज, हा माझ्यापेक्षा कितीसा वेगळा असणार?

या निकालावरची व्यावसायिक सावली पहाता प्रामुख्याने एक प्रश्न विचारला जातो, आणि तो म्हणजे व्यावसायिक चित्रपटांमधे वाईट काय? त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळायला काय हरकत आहे? चित्रपटांना हरकत काहीच नाही, त्यांना यश वा पुरस्कार मिळायलाही हरकत नाही. मात्र राष्ट्रीय पुरस्कार असे सरसकट व्यावसायिक वर्तुळात वाटले जायला हरकत जरुर आहे.

आॅस्कर पुरस्कारांकडे व्यावसायिक चित्रपट उद्योगाचे, त्या उद्योगासाठी दिले जाणारे पुरस्कार म्हणून पाहिलं जातं (जरी या वर्षी त्यांनीही स्पाॅटलाईट सारख्या साध्या , सकस आशय असणाऱ्या चित्रपटाला दिलं, हे विसरता येत नाही) , आणि त्यात नं बसणारा, दर्जाचा मान राखणारा विभाग हा परभाषिक पुरस्कारांचा आहे. याचा अर्थ सर्वसामान्य निकषात नं बसणाऱ्या चित्रपटाचा मान लक्षात रहावा म्हणून त्यासाठी वेगळा विभाग घडवणं, ही चांगल्या पुरस्कारांची प्रथा आहे. आता राष्ट्रीय पुरस्कारात असा कोणता वेगळा विभाग घडवलेला आहे, तर तो आहे लोकप्रिय चित्रपटांचा ( यंदाचा विजेता बजरंगी भाईजान). याचा दुसरा अर्थ हा, की लोकप्रिय सिनेमा हा इथला अपवाद आहे, नियम नाही. त्याचा मान जरुर ठेवावा, पण त्याच्या आहारी जाऊ नये.

तुम्ही जर डिरेक्टोरेट आॅफ फिल्म फेस्टिवल्स आॅफ इंडीआ च्या वेबसाईटवर जाऊन या पुरस्कारांना लावले जाणारे निकष पाहिलेत, तर लक्षात येईल, की मीनिंगफुल, किंवा अर्थपूर्ण चित्रपटांचा प्रसार हा या पुरस्कारांमागचा हेतू आहे. गेल्या काही वर्षात आलेल्या सूचना, चर्चा, यांवरुन आता तांत्रिक प्रगती, सौंदर्यदृष्टी, असे इतर निकषही यात समाविष्ट झाले आहेत. मात्र या इतर निकषांचा सहभाग अर्थपूर्ण निर्मिती 'एेवजी' करण्यात आलेला नाही, तर आशयघन 'असण्याबरोबरच' लावल्या जाणाऱ्या या अधिकच्या कसोट्या आहेत.

बाहुबली आशयघन नाही. ही साधी सूडकथा आहे. तीही परिचित मसाल्याचा पुरेपूर वापर करत घडवलेली.तिचा तांत्रिक भाग आपल्या चित्रपटांच्या मानाने उजवा आहे, पण केवळ त्यासाठी तिला सर्वोच्च पारितोषिक मिळावं का? निश्चितच नाही.

काहींचा युक्तीवाद असाही आहे, की पुरस्कारांमधे हा कलात्मक, तो व्यावसायिक असा भेदभाव कशाला? चांगला, किंवा वाईट या दोनच प्रकारचे चित्रपट का मानू नयेत? यावर मी म्हणेन की तसे ते मानणं हे स्वत:लाच फसवल्यासारखं होईल. चित्रपट चांगले - वाईट असतातच, मात्र प्रेक्षकानुनयी चित्रपट, आणि स्वतंत्र, नवा विचार, दृष्टीकोन मांडणारे चित्रपट, हे दोन विभाग त्याहूनही मोठे आणि दुर्लक्ष नं करण्यासारखे आहेत. राष्ट्रीय पुरस्कार हे यातल्या दुसऱ्या प्रकारासाठी दिले जातात आणि ते तसे दिले जाणं हीच अपेक्षा आहे. बाहुबली या प्रकारात मोडत नाही.

बाहूबलीच्या विजयाने पुढल्या काळात फरक पडू शकतो का, तर निश्चितच. आज या निकालाने एक पायंडा पडला आहे, जो आता बदलता येणार नाही. आता पुढल्या काळातही अशी नावं पुरस्कारासाठी येतच रहाणार आहेत, आणि बाहुबलीचा विजय, हे व्यावसायिक चित्रपटाची बाजू लढवणाऱ्या ज्युरीसदस्यांच्या हातातलं हुकूमाचं पान बनून जाणार आहे. त्यातल्यात्यात दिलासा हा, की ही कमिटी पुढल्या वर्षी अशीच रहाणार नाही. दरवर्षीप्रमाणे, हे सदस्य जाऊन पुढल्या वर्षी नवे सदस्य येतील. आशा करुया की निदान हे नवे मेम्बर तरी या पुरस्कारांमागचा खरा हेतू जाणणारे आणि त्याचा आदर करणारे आणि तसा स्टॅन्ड घेणारे असतील. आपली स्वतंत्र ओळख जपणाऱ्या पुरस्कारांचं हे नव्याने होऊ घातलेलं बाळबोधीकरण टाळण्याचा याहून वेगळा मार्ग मला तरी आत्ता दिसत नाही. म्हातारी तर आता मेलीच आहे, तेव्हा ते दु:ख करत रहाण्यापेक्षा काळ सोकावणार नाही हे पहाण्यालाच आता खरं महत्व आहे!
-गणेश मतकरी

1 comments:

Shree Ram Mohite April 23, 2016 at 5:47 AM  

पूर्णत: सहमत !!!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP