स्वप्न आणि सत्याचं पॅकेज डील

>> Sunday, May 1, 2016

 
 गेल्या लेखातच मराठी चित्रपटांना असणाऱ्या दोन प्रकारच्या प्रेक्षकांबद्दल मी बोललो होतो. एक असा प्रेक्षक, जो केवळ मनोरंजनापलीकडे काही पहाण्याची तयारी ठेवत नाही. चित्रपट यशस्वी व्हायला ज्याचा सहभाग अपेक्षित आहे, आवश्यक आहे , पण पैसे वसूल होण्याची खात्री असल्याशिवाय हा मुळात चित्रपटाला हजेरीच लावत नाही. दुसरा, अधिक व्यासंगी  प्रेक्षक, जो  वेगळ्या प्रकारचे सिनेम पहायला तयार असतो, पण अशा चित्रपटांची वितरणाची पोच अनेकदा मर्यादित असते आणि हा प्रेक्षक दर वेळी त्या चित्रपटांपर्यंत पोचू शकतोच असं नाही. या दोन्ही प्रकारचे प्रेक्षक मराठीत मुबलक आहेत, पण सामान्यत: चित्रपट यातल्या कोणत्यातरी एका प्रकारच्या प्रेक्षकाला डोळ्यांसमोर ठेवून बनवला जातो. या प्रेक्षकांच्या आवडी एकमेकांपेक्षा संपूर्णपणे वेगळ्या आहेत, त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही आणि एका चित्रपटाचा प्रेक्षक दुसऱ्याला हजेरी लावण्याची शक्यताही कमीच. नागराज मंजुळेचा सैराट अनपेक्षित ठरतो, तो या पार्श्वभूमीमुळे.

या दिग्दर्शकाचा पहिला चित्रपट 'फॅंड्री' चित्रपटगृहात लागण्याआधी चोखंदळ प्रेक्षकांनी महोत्सवांमधून बघून त्याची दखल घेतली होती. समाजाच्या खालच्या स्तरातल्या एका मुलाचं तपशीलात आणि अस्सल व्यक्तिचित्र असलेला हा चित्रपट प्रदर्शित होताना, त्याच्या प्रसिद्धीसाठी जी ट्रेलर दाखवण्यात आली, ती मात्र तो एखादी प्रेमकथा असल्याचा इफेक्ट आणणारी. या ट्रेलरमुळे चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला ( आणि व्यावसायिक दृष्ट्या हे योग्य पाऊल असल्याचं सिद्ध झालं), तरी अनेक प्रेक्षकांनी त्यांची दिशाभूल झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. याचीच उलट बाजू ही, की वेगळ्या अपेक्षेने जाउनही अनेक प्रेक्षकाना त्यांच्या परिचिताबाहेरचं काही पहायला मिळालं आणि चित्रपट आवडूनही गेला. तरीही हे मान्य करायलाच हवं, की फॅंड्री उत्तम असतानाही, तो जे आहे ते सोडून वेगळा असल्याचा आभास, त्याची प्रसिद्धी निर्माण करुन गेली. सैराट बद्दल लिहीताना हे आठवायचं कारण हे, की सैराटची ट्रेलर देखील एखाद्या प्रेमकथेसारखी आहे. ती फॅंड्रीप्रमाणे संपूर्ण दिशाभूल करणारी मात्र अजिबातच नाही, कारण सैराट ही खरोखरच प्रेमकथा आहे. आपल्याला प्रसिद्धीसाठी वापरण्यात आलेल्या गाण्यांमधून आणि आता आठवडाभर आधी रिलीज झालेल्या ट्रेलरमधून जो भाग दाखवण्यात आला, तो   त्याच स्पिरीटमधे चित्रपटात वापरलेला आहे. असं असतानाही एक गंमत आहे. या पहायला मिळालेल्या भागातून दिसणारं सैराटचं चित्र अपुरं आहे.

आपल्या व्यावसायिक सिनेमांची प्रेम या विषयाकडे पहाण्याची पद्धत ही नायक नायिकेचं एकत्र येणं यालाच महत्व देणारी असते, आणि ते घडणं, हाच चित्रपटाचा सुखांत मानला जातो. त्यांच्या मते हे प्रेम जमताना ज्या लटपटी खटपटी होतात त्यातूनच प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, होऊ शकतं. मिलन हा त्याचा उत्कर्षबिंदू. यानंतर काय होतं हे बिनमहत्वाचं. समांतर वळणाच्या काही चित्रपटांनी नायकनायिकेचं नातं सुखांतापलीकडे नेण्याचा प्रयत्न करुन पाहिला आहे, पण सर्वसाधारण रसिकाचा इन्टरेस्ट सतत काही नाट्यपूर्ण घडत असल्याशिवाय टिकत नाही, आणि तो टिकवण्यासाठी सतत काही घडवत रहाणं , हे नात्याच्या प्रामाणिक चित्रणावर कृत्रिमता लादल्यासारखं होतं जे समांतर वळणाच्या चित्रपटांना नको वाटतं. सैराट चित्रपट आपली प्रेमकथा मांडताना तद्द्न व्यावसायिक आणि अस्सल समांतर हे दोन्ही दृष्टीकोन वापरुन पहातो. त्याचा परिणाम म्हणून हा चित्रपट जवळजवळ दोन स्वतंत्र भागात विभागला जातो. एक भाग हा अधिक पारंपरिक पद्धतीने प्रेम जमण्याच्या, नायक नायिका जवळ येण्याच्या प्रक्रियेकडे पहातो. तर दुसरा भाग या प्रेमाला वास्तवाच्या चौकटीत आणून बसवण्याचा प्रयत्न करतो.

सैराट मधला अवखळ प्रेमाचा भाग हा कोणालाही आवडेल असाच आहे. सैराटची जाहिरात करण्यात आलीय ती याच भागाला केंद्रस्थानी ठेवून, आणि त्यामुळे ती अपूर्ण असली, तरी फसवणारी म्हणता येणार नाही. हा कथाभाग पाहिला तर तो फारसा नवीन नाही. आर्ची ( रिंकु राजगुरु) आणि पर्श्या (आकाश ठोसर) या दोघांचं प्रेम जुळतं. दोघांच्या परिस्थितीत मात्र बराच फरक. ती गावच्या पुढाऱ्याची मुलगी, तर तो गरीब घरातला. दोघं चोरुन भेटायला लागतात, पण दिवस जातात तसतसे अधिक धीटही होतात. मित्र मैत्रिणींचे धोक्याचे इशारे मनावर न घेता प्रकरण वाढत जातं. आणि मग एक दिवस....एनी वे ! मुद्दा इतकाच, की या भागात येणारी कथा तशी ओळखीचीच आहे, पण ती सजवण्याची पद्धत विशेष आहे. दिग्दर्शकाने हे सारं सुंदर, स्वप्नवत, रोमॅंटीक करण्यासाठी, ' एव्हरी ट्रिक इन द बुक ' वापरली आहे. नाॅस्टॅल्जिक वळणाचे प्रसंग, छायाचित्रणातल्या करामती, उत्तम संगीत, लोकप्रिय गाणी , नवे चेहरे या सगळ्यातून सैराट भरधाव पुढे जात रहातो. बाॅलिवुड वळणाची फॅन्टसी डोळ्यासमोर ठेवून हा संपूर्ण भाग आकाराला आला आहे. याचं एक कारण प्रेक्षकाला गुंतवणं नक्कीच आहे, पण दुसरं असही असू शकतं, की जितके आपण या कल्पनाविलासात अडकतो, तितका आपल्याला जमिनीवर आणणारा वास्तववादी भाग अधिक त्रास देतो. हा त्रास होणं अपेक्षित आहे, तो टाळून चालणार नाही. पण सैराट त्याशिवाय पूर्ण होणार नाही. हे एक पॅकेज डील आहे म्हंटलं तरी चालेल. स्वप्न आणि सत्य याचं.


गेल्या काही दिवसात आपल्याकडे दाक्षिणात्य चित्रपटांवरून स्फूर्ती घेऊन काहीबाही करण्याची अनिष्ट फॅशन आली आहे. मात्र बहुतेक वेळा ही नक्कल फार ढोबळ गोष्टींची असते. मेलोड्रामा, भडक दृश्ययोजना, अनावश्यक विनोद, स्लो मोशन हाणामाऱ्या, या प्रकारचं काहीतरी दाक्षिणात्य नावाखाली आलेलं आपल्याला दिसतं. पण दाक्षिणात्य चित्रपट काही केवळ याच प्रकारचे नसतात. प्रादेशिक पार्श्वभूमीवर हळूवार प्रेमकथा मांडणारे आणि त्यांना वास्तवाची चौकट देणारे चित्रपट आपल्या पहाण्यात आहेतच. मणीरत्नमचे 'रोजा', 'बाॅम्बे' यासारखे चित्रपट आठवले, तर आपल्याला या प्रकारचच गणित दिसून येईल. तेलुगु चित्रपटाचाच रिमेक असलेल्या 'एक दुजे के लिए'चं रुपही याच प्रकारचं होतं, म्हणजे पहिला भाग अतिशय रंजक वळणाची हळवी प्रेमकथा, आणि त्यानंतर त्यावर होणारं वास्तवाच आक्रमण. सैराटपुढे या प्रकारचे काही थेट संदर्भ आहेत का हे कळायला मार्ग नाही, पण असल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. अर्थात, संदर्भ जर योग्य रीतीने वापरण्यात आले, तर ते वापरण्यात गैर काहीच नाही. हे दाक्षिणात्य चित्रपट आणि सैराट यात एक फरक मात्र आहे, तो म्हणजे त्यातलं एका प्रकारच्या निवेदनातून दुसऱ्यात बदलत जाणं, हे त्यामानाने हलकेच आहे. सैराटमधला स्विचओव्हर हा निश्चित कळण्यासारखा आहे, ज्यामुळे तो अदृश्य राहू शकत नाही. प्रेक्षकाला तो लगेच जाणवतो.

हे लिहून देतेवेळी प्रेक्षकांनी सैराटला कसा रिस्पाॅन्स दिलाय याची मला कल्पना नाही. रिस्पाॅन्स म्हणजे तिकिट खिडकीवर नाही, कारण झीची निर्मिती असल्याने, नागराज मंजुळेचं नाव, बर्लिन महोत्सव वारी इतरही  पुरेशी प्रसिद्धी झाल्याने तो पहायला प्रेक्षक येणार, याविषयी माझ्या मनात शंका नाही.मला कुतूहल आहे, ते तो पाहिल्यावर आलेल्या प्रतिक्रियेचं. मला वाटतं, अलीकडे आपल्या प्रेक्षकाना प्रतिक्रिया देण्याची फार घाई असते. तो नि:संशय त्यांचा हक्कच आहे. मात्र पटकन निष्कर्षावर येण्याआधी थोडा विचार केला, तर अनेकदा  चित्रपट काय म्हणतोय हे त्यांच्याच अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येउ शकतं. बहुतेक चित्रपटांचा आपल्यावर झालेला परिणाम हा एका सोप्या गोष्टीवरुन कळण्यासारखा असतो. आणि ती म्हणजे, तुमची त्या चित्रपटातल्या पात्रांबरोबर होणारी भावनिक गुंतवणूक. एखाद्या चित्रपटातली पात्र तुम्हाला आवडली, तर त्यांचं काय होणार याची काळजी तुम्हाला सतावते, त्यांचं शेवटी चांगलंच व्हावं या विचारात तुम्ही असता. सैराट मधे हे होतं का? तुम्ही आर्ची आणि पर्श्याच्या प्रेमात पडता का?
तुम्ही स्वत:च या प्रश्नाचं उत्तर शोधून पहा !
- गणेश मतकरी

3 comments:

unique Creative May 14, 2016 at 6:50 AM  

सैरट चे मीडियाने भरपूर कौतुक केले.
पण शहरी समाजाने सोशियल मीडियावर याचे भाष्या केले नाही. यात जातपात भेद नाही फक्त आहे तो शहरी वा ग्रामीण चा फरक जाणवतो. काय वाटते? मला हा फरक प्रकर्षाने जाणवला. शहरी माणसाला हा चित्रपट आवडला पण तो व्यक्त करत नाही

आपण फक्त जातिभेद यावर समाजाची विभागणी करतो पण येथे वेगळे दिसले.
(हे मी सिनेमा बद्दल बोलत नाही. मी सिनेमा पहला मला आवडला. पण मास सिकॉलजी बद्दल बोलतो आहे)

ganesh May 19, 2016 at 8:47 PM  

शहरी समाज यावर बोलला नाही असं नाही वाटलं मला. तो मोठ्या प्रमाणात चालला याचं कारण प्रचंड ग्रामीण रिस्पाॅन्स हे मात्र आहे. नाहीतर इतर शहरी हिच प्रमाणे तीस पस्तीस कोटींवर थांबला असता.

arti June 7, 2016 at 3:36 AM  

Sairat has many small and beautiful moments, which capture hearts. Also it portrays a very strong woman in Archie, who stands for her decisions. Who also shows maturity as and how life progresses and situations change.
But somehow still, it promotes teen age love and being rebel. This age is to concentrate on studies or careers and to achieve things. The reality can be much more dangerous than whats shown in Sairat and in three to four years, without education....it is almost impossible to go and book a flat. It potrays wrong image for tenagers, f they underestimate the struggle or if they feel their sturggle was romantic.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP