सेन्साॅर आणि आपण

>> Thursday, August 11, 2016काही महिन्यांपूर्वी सेन्साॅर बोर्डाने दोन सिनेमे संमत केले. संमत म्हणजे आपल्या मर्जीने, त्यांना जसे वाटले तसे. या दोघातला एक होता अलेहान्द्रो इन्यारितूचा ' द रेवेनन्ट' तर दुसरा होता टाॅड हाइन्सचा 'कॅरल'. रेवेनन्ट आणि कॅरल हे दोन्ही चित्रपट समीक्षकांनी कौतुक केलेले आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्यातल्या रेवेनन्टला यंदाच्या आॅस्करला बारा नामांकनं होती, तर कॅरलला सहा. हे एवढ्याचसाठी सांगतोय की हे कुठले असे तसे चित्रपट नाहीत, ज्यांना केवळ अश्लील वा वादग्रस्त दृश्य दाखवून गल्ला जमवायचा असेल. आता सेन्साॅरने यांना संमत करताना काय कट्स दिले तेही पाहू.

रेवेनन्ट ही १९ व्या शतकात घडलेली, आणि सत्यघटनांची पार्श्वभूमी असणारी साहस/सूडकथा आहे. त्यात हिंसा जरुर आहे, पण ही हिंसा कुठेही करमणूकीचं सोंग आणत नाही. खून , युध्द, यासारख्या परिचित अंगावर येणाऱ्या दृश्याबरोबरच यात अगदी वेगळ्या प्रकारचा व्हायलन्ही पहायला मिळतो. ग्लास ही लिओनार्डो डिकाप्रिओने उभी केलेली व्यक्तिरेखा प्रचंड थंडीपासून बचाव करण्यासाठी मृत घोड्याच्या शरीराचा ब्लॅंकेटसारखा वापर करते, या प्रकारचे अंगावर येणारे प्रसंगही आहेत. याची सेन्साॅर बोर्डाने सुचवलेल्या कट्सची लिस्ट पाहिली तर मात्र आश्चर्य वाटेल कारण फार थोड्या कट्सवर त्याची सुटका झालीय. 'बिच' आणि 'बिग टिट्स' हे दोन शब्द त्यात म्यूट केलेत ( अर्थात हे कापलेले शब्द सेन्साॅर सर्टिफिकेटच्या नेटवरच्या काॅपीत तुम्ही वाचू शकता, किंवा आता मी लिहिलेत तिथेही) आणि डिकाप्रिओच्या पार्श्वभागाचा एक शाॅट कापलाय. कॅरल ही दोन स्त्रियांमधली प्रेमकथा आहे, १९५० च्या सुमारास घडणारी. केट ब्लॅंचेट आणि रुनी मारा या आजच्या दोन महत्वाच्या अभिनेत्रींनी त्यात प्रमुख भूमिका केल्या आहेत. सेन्साॅर बोर्डाने कॅरलमधे एक मोठा सेक्स सीन काढलाय, त्याबरोबर एक किसिंग सीन पण कमी केलाय आणि 'सन आॅफ ए बिच' का अशीच कुठली तरी शिवी कापलीय.

आता या दोन चित्रपटांकडे पाहिलं, तर ते दर्जेदार म्हणून सर्वमान्य असताना, आणि दोघांनाही 'फक्त प्रौंढांसाठी ' हे सर्टिफिकेट लागू केलेलं असताना, भिन्न प्रकारची ट्रिटमेन्ट का? रेवेनन्ट सारखी सूडकथा ही कॅरल सारख्या प्रेमकथेहून खरोखरच अधिक सौम्य आहे का?

याला खरं तर काही उत्तर नाही. मनमानी कारभार ही सेन्साॅर बोर्डाची पध्दतच आहे आणि त्यात त्यांना आपलं काडीचंही चुकलय असं वाटत नाही. त्यांचा एक थम्ब रुल म्हणजे थेट दिसणारं कितिही क्षुल्लक असलं तरी कापायचं पण इम्प्लाईड गोष्टी, कितितरी अधिक भयानक असल्या तरी सोडून द्यायच्या.
आता इथे या दोन उदाहरणांमधेच पाहिलं, तर आपल्याला कितीतरी गोंधळ सापडतील. एक नेहमीचा गोंधळ म्हणजे हे दोन्ही चित्रपट प्रौढांसाठी आहेत ना? मग त्यापुढे या प्रकारचे  कट्स देण्याची काय आवश्यकता आहे? प्रौढ प्रेक्षक इतका असमंजस आहे का की पडद्यावरल्या दृश्यांचा ( त्याही पोर्नोग्राफिक नाही तर विचारपूर्वक चित्रित केलेल्या दृश्यांचा) , किंवा त्याहीपेक्षा विनोदी म्हणजे शिव्यांचा त्याच्या मनावर वाईट परिणाम होईल? अशा शिव्या, ज्या आपल्याला रस्त्यावर, टिव्हीवर, क्वचित शाळाकाॅलेजातदेखील एेकायला मिळू शकतात , पुस्तकं, इन्टरनेटवर तर प्रश्नच नाही.

चित्रपटांमधे येणाऱ्या शिव्या, खरं तर केवळ शिव्याच नाही, तर प्रत्येक गोष्ट ही काही एका विचाराने केलेली असते. शिव्या देणाऱ्या वक्तीची पार्श्वभूमी काय? धूम्रपान करणारी व्यक्ती कोणत्या मनस्थितीत आहे? प्रेमाची उत्कटता दाखवण्यासाठी शरीरसंबंध दाखवण्याची आवश्यकता आहे का आणि असल्यास किती प्रमाणात? हिंसा कोणत्या पध्दतीने किती दाखवावी? परिणाम पोचण्यासाठी तिचं कितपत गडद असणं आवश्यक आहे? या सगळ्याचा एक विचार चांगल्या दिग्दर्शकांनी केलेला असतो.आपल्याकडे मात्र सावधपणा हा एकच विचार या सगळ्याचं नियंत्रण करताना वापरलेला दिसतो. मग दिग्दर्शक स्पीलबर्ग असो, स्कोर्सेसी असो, टेरेन्टिनो किंवा इन्यारितू.

असं असतानाही मग रेव्हेनन्ट आपल्या हिंसक दृश्यांसह (जी प्रेमदृश्यांहून नक्कीच अधिक बिचकवणारी आहेत)  का सुटला? याचं एक कारण हे असावं , की या दृश्यांना कोणत्या लेबलाखाली टाकायचं, हे सेन्साॅरला कळलं नसावं. हिंसाचार आपल्याकडे काही प्रमाणात खटकतो, खासकरुन तो टेरेन्टिनोच्या चित्रपटांसारखा कसलीच फिकीर न ठेवता चित्रित केला असेल तर . ( टेरेन्टिनोलाही याची झळ त्याच्या हेटफूल एटच्या वेळी लागलीच. ) मात्र तो कापतानाही पारंपारिक हाणामारी फाॅरमॅट हा अपेक्षित असतो. रेव्हेनन्टमधल्या अनेक दृश्यांना हा परिचित आकार नाही. मग ती कलेचं लेबल लावून सोडायची, का सामाजिक दुष्परिणामांकडे बोट दाखवून कापायची याबद्दल काही दुमत झालं असावं , ज्यामुळे बराचसा चित्रपट वाचला. लिओनार्डोचा पार्श्वभाग बहुधा सेक्स रिलेटेड प्रसंगाच्या विस्तृत विभागाखाली अडकला असावा.

सेक्स हा आपल्याकडचा टॅबू आहे. प्रत्यक्ष सेक्स, आणि त्याच्या जवळपासचे जेन्डर रिलेटेड इश्यूज, होमोसेक्शुअॅलिटी , यातलं काही आलं, की आपल्याकडे चित्रपट हा आॅटोमॅटीकली प्रौढांसाठी ठरतो. मग त्यात प्रत्यक्षात काही एक्स्प्लिसीट चित्रण असण्याचीही गरज नसते. केवळ सेक्ससंबंधी कशालाही कापलं जातं. मुलांवर दुष्परिणाम ही आज चित्रपटेतर माध्यमांमधून मुक्त संस्कार होण्याच्या काळात अगदीच अनाठायी वाटणारी भीती त्यांना वाटते. ही भीती एकूण समाजातच आहे. चित्रपट बालिश पध्दतीने सेन्साॅर करणं हा या भीतीचा एक भाग, पण मुळातच या गोष्टी लपवणं, त्याबद्दल मोकळेपणी नं बोलणं, मुलांना माहिती चुकीच्या सोर्सेसकडून मिळणं यातूनच आपल्याकडे या विषयासंबंधीत सामाजिक अस्थिरता तयार झालेली आहे. या अस्थिरतेतून, आणि टॅबू असल्यामुळे आकर्षित होऊनच आजकालची मुलं दुसऱ्या टोकाला जायला उद्युक्त होत असतील का? बलात्काराच्या गुन्ह्यासाठी पकडल्या जाणाऱ्या अंडरएज आरोपींची वाढती संख्या तरी हेच सांगते.

सेन्साॅर बोर्डाचा मला स्वत:ला एक चमत्कारिक अनुभव मध्यंतरी आला. मी एक शाॅट नावाची शाॅर्ट फिल्म केली होती ज्याच्या विषयात होमोसेक्शुअॅलिटी सूचित होती, जरी होमोसेक्शुअॅलिटी हा तिचा विषय नव्हता. दोन स्त्री व्यक्तिरेखांमधला संवाद एवढच त्याचं स्वरुप होतं. माझ्या दृष्टीने तर फिल्मचा हेतू हा वेगळाच होता. प्रत्येकाच्या डोक्यात स्वत:विषयीची एक प्रतिमा असते, जी कायम टिकतेच असं नाही. ती प्रतिमा भंगण्याचा क्षण पकडणं एवढाच या फिल्ममागचा हेतू होता. फिल्म एका भारतीय महोत्सवासाठी पाठवायची म्हणून सेन्साॅरला पाठवली, तर कळलं की ते प्रौढांसाठी सर्टिफिकेट घ्यायला सांगताहेत. मी दचकलोच. जाऊन भेटलो तर कळलं की होमोसेक्शुअॅलिटीशी संबंध असल्याने तसा निर्णय आहे. मी म्हणालो, अहो त्यात नुसती चर्चा आहे, आक्षेप घेण्यासारखं काय आहे? शिवाय सध्या टिव्हीवर एक हिंदी मालिका चालतेय त्यात लेस्बिअन कॅरेक्टर आहे, फ्रेन्ड्स वगैरेसारख्या आपल्याकडे नियमित दिसणाऱ्या मालिकांमधेही असे विषय स्पर्श केले जातात. या मालिका सर्व वयाची मुलं आवडीने पहातात. पण कमिटीच्या निर्णयापुढे काही चालणार नव्हतं. मग त्यांचा माणूस म्हणाला रिवायजिंग कमिटीला द्या, तिथे होईल पास. तशी ती झाली, पण युए सर्टिफिकेटसह. पण मला कळेना , की मूळ कमिटी इतकी बाळबोध का असावी, की ज्यांना साधी चर्चादेखील मुलांनी एेकू नये असं वाटावं ? आणि नंतरही सरळ यु सर्टिफिकेट द्यायला काय हरकत आहे? सेक्स एजुकेशन शिक्षणक्रमाचा भाग असण्याच्या काळात हे बावळटपणाचं नाही का? हे करुन अल्पवयीन मुलांचं रक्षण होतं म्हणायचं, की त्यांना एका मागासलेल्या कोषात ठेवलं जातं म्हणायचं?

माझ्या अगदीच निरुपद्रवी फिल्मबाबत हा अनुभव असेल, तर कॅरलसारख्या लेस्बिअन प्रेम हाच विषय असणाऱ्या चित्रपटाला ते टोकाचे निर्णय लावणार, आणि काटछाट करणार हे ओघानच आलं. सेक्सबाबत टोकाची, तर हाणामारीबाबत किंचित मवाळ भूमिका, ही बोर्डाची पध्दत आधीच्या डेडपूल चित्रपटातही दिसली, ज्यात नग्नदृश्यांना सरळ कात्री होती, भाषा सुधारण्यासाठी शब्दच्या शब्द काढून टाकले होते, त्यामुळे आपल्याला ही वाक्य समजूनच घ्यायला लागत होती. हिंसाचार मात्र बराचसा इन्टॅक्ट होता. याआधी बाॅन्डच्या स्पेक्टर या चित्रपटाच्या वेळीही चुंबनदृश्य खूप वेळ चालतात ( कोणाच्या हिशेबाने?) असं सांगून कापली होती आणि हाणामाऱ्या तशाच ठेवल्या होत्या हे देखील आपल्याला माहीत आहेच. गंमत म्हणजे कॅरल हा तरी प्रौढ ( आशय समजण्यातल्या प्रगल्भतेच्या दृष्टीने- काय पहावं काय पाहू नये या आवडीनिवडीचा भाग म्हणून नाही) प्रेक्षकांसाठी केलेला चित्रपट. पण डेडपूल काय किंवा बाॅन्ड काय, हे तर साधारण सर्व वयाच्या प्रेक्षकाना आवडतील असे चित्रपट. मग हे कापताना सेन्साॅरचा विचार नक्की काय असतो हे कळायला मार्ग नाही. सर्व जनता ही उठवळ मनोवृत्तीची आणि जे दिसेल ते पाहून चेकाळणारी आहे, असा काही समज असावा का?

जे पहायला वाईट, जे वाईट पध्दतीचा संस्कार करेल, ते टाळा असं म्हणणं सोपं आहे, पण पारंपारिक निवेदनशैलीत ते कसं करणार ? अगदी रामायणातही रावण होताच. रामायणावर आधारित चित्रपटात रावणच दाखवू नका असं म्हणणं, किंवा त्याने केलेली दुष्कृत्य दाखवू नका असं म्हणणं, कितपत न्याय्य? जर केवळ रेखीव पध्दतीने आपण वरवरचं कथानक मांडत असलो तर गोष्ट वेगळी, पण वास्तववादी पध्तीने काही सांगायचं, तर गोष्ट परिणामकारक पध्दतीने मांडण्याचं पुरेसं स्वातंत्र्य चित्रकर्त्यांना मिळायलाच हवं. काळी बाजू पुरेशा स्पष्टपणे समोरच आली नाही, तर पांढऱ्या बाजूच्या अंतिम विजयाची महती प्रेक्षकांना कळणार कशी. नायकाचा चांगुलपणा ठळपणे समोर येतो तो खलनायकाच्या दुष्कृत्यांच्या पार्श्वभूमीवर. सगळेच सज्जन झाले, तर आपल्याला अतिपरिचित असलेल्या नायक विरुध्द खलनायक या रचनेलाच बासनात बांधून ठेवावं लागेल.

या प्रकारच्या उपद्रवी मानसिकतेचीच एक मवाळ आवृत्ती म्हणजे चित्रपटादरम्यान दिसणाऱ्या पाट्या . ' धूम्रपान आरोग्याला अपायकारक आहे' वगैरे. तिथे तो खलनायक सिगरेट ओढत खुनाच्या योजना आखत असला तरी चालतं. त्याला आमची काहीच हरकत नाही. पण धूम्रपान? नाव नको ! चित्रपट एेन रंगात आलेला असताना आपण हा चित्रपट पहातोय, हे सारं काल्पनिक आहे, याची जाणीव करुन देत रसभंग करणाऱ्या या पाट्या म्हणजे ब्रेश्टीयन एलिअनेशन तंत्राचा अद्भूत आधुनिक नमुनाच. जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेश्टने आपल्या नाट्यप्रयोगांमधे प्रेक्षकांना कथेबद्दल विचार करत ठेवण्यासाठीच वेळोवेळी कथेतून बाहेर खेचण्याचे, रमण्याएेवजी निरीक्षकाच्या भूमिकेत नेण्याचे अनेक प्रयोग आपल्या कामात करुन पाहिले. आज भारतात आपल्या कामाचा प्रसार या पध्दतीने राष्ट्रीय पातळीवर होतोय हे पाहून त्याला नक्कीच आनंद झाला असता.

हे असं सगळं का होतं, हे मला अजूनही लक्षात आलेलं नाही. सिनेमाला ज्या त्या गोष्टीसाठी जबाबदार धरायची आपल्याकडे पध्दत आहे हे मला माहीत आहे, आणि दर अपराध हा हिंदी, इंग्रजी सिनेमातले धडे घोकूनच होतो, हा ही आपला पारंपरिक विश्वास आहे. आर्ट इमिटेट्स लाईफ आपण मानत नाही , तर वास्तवच कलेवरुन नियमितपणे प्रेरणा घेत असल्याचं आपण गृहीत धरुन आहोत. ( सत्य बहुदा याच्या मधे कुठेतरी असावं. आर्ट इमिटेट्स लाईफ इमिटेट्स आर्ट .......असं वाटोळं फिरणारं हे चक्र असावं आणि त्यात कधी एक दुसऱ्याची नक्कल करत असेल, तर कधी दुसरा एकाची असा माझा तरी समज आहे) तरीही मला एक वाटतं, की प्रत्यक्ष गुन्हे प्रेरीत करण्यासाठी चित्रपटांना एक वास्तववादाची पुसट का होइना, पण चौकट आवश्यक आहे,  आणि ती चौकट नसेल, म्हणजेच चित्रपट फार उघडपणे , डेडपूल किंवा बाॅन्ड प्रमाणे फॅन्टसी वळणाने जात असेल, तर त्यापासून थेट गल्लोगल्ली प्रेरणा मिळणं अशक्य आहे. नाही म्हणायला अशा चित्रपटांवरुन प्रेरणा घेत सुपरहिरो अवतारात खांद्यावर टाॅवेल लटकवून शाळकरी मुलांनी उंचावरुन उडी मारणं, यासारख्या गोष्टी तर घडतच असतात, पण त्याला एक प्रकारचा अपघात म्हणता येईल. तोही शंभरातल्या नव्वद केसेसमधे टाळता येण्याजोगा. या प्रकारच्या प्राथमिक स्वरुपाच्या प्रभावाचा आक्षेप घ्यायचा तर आपल्याला कल्पित कथा सादर करणं मुळातच बंद करावं लागेल आणि केवळ माहितीपटसदृश चित्रपट करावे लागतील.

चित्रपट पाहून त्यांचा चुकीचा प्रभाव पडण्यासाठी वास्तववादाची चौकट आवश्यक आहे हे मी म्हणतो, ती कुठली, तर सांगतो. हा वास्तववाद म्हणजे सत्यजित राय किंवा मृणाल सेन यांच्या चित्रपटासारखा शंभर टक्के वास्तववाद नाही, जिथे प्रत्यक्ष शक्यतांपलीकडे आयुष्य जाऊच शकणार नाही. हा वास्तववाद भारतीय व्यावसायिक चित्रपटांच्या पलायनवादी दृष्टीकोनाशी जोडलेला आहे. यात वास्तवाचा एक वरवरचा आभास तर आहे, पण या आभासापलीकडे गेलेल्या अनेक शक्यता या चित्रपटात सूचित होतात. सुखांत शेवट असो, वा काळजाला हात घालणारा शोकांत, सामान्य मध्यमवर्गीय आयुष्यापलीकडे पोचणारा या सिनेमांचा रोख असतो. नायक हा तर बोलूनचालून प्रेक्षकाचा प्रतिनिधी, त्यामुळे प्रेक्षकाचं आयुष्य अधिक ग्लॅमरस कसं करता येईल याबद्दलच्या काही शक्य वाटणाऱ्या कल्पनाही त्यात असतात, आणि  प्रेक्षकाला प्रेरणा मिळू शकते , ती अशा शक्य कोटीच्या आसपास फिरणाऱ्या अतिरंजीत कल्पनांमधूनच. एकदा का अशा हायब्रीड वास्तववादाची आपल्याला सवय झाली, की आपण त्यात गुंततो, त्यातल्या गोष्टी आपल्याला सरावाच्या होऊन जातात. मग तिथल्या नायकासारखं संमतीशिवाय नायिकेच्या मागे फिरणं वास्तवातही चालून जाईल असं वाटायला लागतं, किंवा भरधाव नियमांची पर्वा न करता मनमानी गाड्या चालवणं, वा कोणी आपलं एेकत नसल्यास त्याविरोधात कायदा हातात घेणं हेदेखील. सुपरहिरोपटांसारख्या फॅन्टसी चित्रपटांमधेही नायकाची अमुक तमुक शक्ती आपल्याला मिळावी असं पाहणाऱ्याला  वाटू जरुर शकतं, पण ते वास्तव नाही, हेदेखील त्याच्या मनात पक्क बसलेलं असतं. त्यामुळे अशा सरळसरळ कळण्याजोग्या कल्पनारम्य चित्रपटांना कात्री लावणं मुळातच अनावश्यक वाटतं.

कदाचित याहून खटकण्यासारखा आहे तो टिव्हीवरुन आपल्या घराघरात पोचणारा जुनाट विचार आणि संस्कृतीबद्दलच्या कालबाह्य कल्पना यांचा एकत्रित डोस. सासू- सूनांचे अनावश्यक खटके, अर्थ विसरुन टिआरपीच्या नादात साजरे केले जाणारे सणवार, कर्तव्याबद्दलच्या बाळबोध कल्पनांनी भारलेले नायक नायिका, खुळचट कारस्थानं करणारे घरगुती खलनायक , आणि हे सारं एखाद्या ड्रगच्या अंमलाखाली असल्यासारखं पाहून घेणारा, कलामूल्यापासून दूर जात पारंपारिक तेच उत्तम अशा विचारात अधिकाधिक फसत जाणारा प्रेक्षक हे काही एका विचारापोटी केलेल्या कितीही हिंसक चित्रपटाहून तितीतरी अधिक धोकादायक आहे.

चित्रपटातल्या  काटछाटीने काय साध्य होतं , तर काहीच नाही. जर भावी पिढीवर  या चित्रपटांमधून वाईट संस्कार होतील अशी भीती वाटत असेल तर  संपूर्ण पिढीलाच नजरकैदेत ठेवायला हवं. याला कारण म्हणजे संस्कार करण्याची क्षमता असणाऱ्या सिनेमाहून अधिक प्रभावी, अशा इतर अनेक गोष्टी त्यांच्याजवळ आज आहेत. त्यातल्या दोन चटकन सांगण्यासारख्या गोष्टी म्हणजे इंटरनेट आणि गेमिंग. या दोघांचा प्रभाव वेगळ्या पध्दतीचा आहे, पण भीती वाटून घ्यायची म्हंटलं, तर तितकाच धोकादायक.

खरं म्हणजे यातला इंटरनेट, हा एक मुद्दाच सेन्साॅर बोर्डाचं अस्तित्व अनावश्यक ठरवण्यासाठी पुरेसा आहे. सेन्साॅर बोर्ड हल्ली जरा अधिकच मन लावून काम करतय, हे अगदी साधेसाधे मराठी चित्रपटही युए ( किंवा क्वचित ए देखील) रेटिंग घेऊन अवतरतायत यावरुन लक्षात येईल. मग हाॅलिवुड वगैरेची तर बातच नको. गंमत म्हणजे ज्या मुलांपासून हे चित्रपट दूर ठेवण्यासाठी हे सेन्साॅर बोर्ड झटतय, त्या मुलांना काही महिन्यातच या सर्व आणि इतर शेकडो चित्रपटांच्या न काटछाट केलेल्या आवृत्त्या इन्टरनेटवर उपलब्ध होतायतच. आयट्यून्स वरुन खरेदी करणं, नेटफ्लिक्स सारखे चॅनल्स यांमुळे हे आता राजमार्ग झालेले आहेत. आणि आडमार्गाला जायचं तर विचारुच नका. तिथे जे उपलब्ध आहे त्याला तोडच नाही. मग या परिस्थितीत, घराघरात सर्व वयाच्या प्रेक्षकाला जे उपलब्ध आहे, ते १८ वर्ष वयावरच्या लोकांपर्यंत आणताना सेन्साॅरने का लाजावं हा प्रश्न उरतोच.

व्हिडिओ गेम्सचं आजचं स्वरुप हे आशय नियंत्रित करु पहाणाऱ्या मंडळींच्या लक्षात आलंय का, हा दुसरा तितकाच महत्वाचा प्रश्न. फोन्स, आयपॅड, यासारख्या छोट्या आणि त्यामानाने सिम्प्लीफाईड आवृत्त्यांबरोबरच कन्सोल गेमिंग हा एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. एक्स बाॅक्स , प्ले स्टेशन यासारखे कन्सोल्स आणि कम्प्यूटर्स यांवरचे खेळ या लोकांनी पाहिले आहेत का? चित्रपटात ज्या गोष्टी पाहायला सेन्साॅर बोर्ड आक्षेप घेतं, त्यातल्या बऱ्याच गोष्टी खेळणारी व्यक्ती नायकाच्या भूमिकेतून करु शकते. माणसं मारणं, गाड्या उडवणं, गुन्ह्यांच्या लुटुपुटीच्या योजना आखणं, खेळातल्या व्यक्तिरेखांना धमकावणं, असं सर्व काही इथे शक्य आहे. याचा परिणाम काय आणि किती खोलात जाऊ शकतो , याची चित्रपटांबरोबर तुलनाही होणारं नाही.

या दोन्ही माध्यमांना मी स्वत: आक्षेप घेत नाही, कारण पलायनवाद आणि करमणूक या दोन गोष्टी त्यांच्या मुळाशी आहेत. गेम्समधे व्हायलन्स असतो हे खरं, पण रिफ्लेक्सेस सुधारणं, स्ट्रॅटेजीचा विचार किंवा कथनशैलीचे धडे, आणि इतरही अनेक गोष्टी यातून शिकण्यासारख्या आहेत.

चित्रपटांमधेही काय, कशासाठी कापावं हे ठरवणं बोर्डाला वाटतं तितकं सोपं नाही. डेडपूलसारख्या ( किंवा मागे आलेल्या किक-अॅस सारख्या चित्रपटातही) भाषा, किंवा हिंसा, हा एक प्रकारच्या दृक्श्राव्य शैलीचा भाग आहेत. कुब्रिकच्या क्लाॅकवर्क आॅरेन्जमधे सेक्स आणि व्हायलन्स मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याच्या मुळाशी प्रश्न आहेत ते सामाजिक नीतीमत्तेशी जोडलेले. विल ग्लकच्या इझी ए मधल्या शाळकरी नायिकेचं, स्वत:च्या खोट्या प्रेमप्रकरणाची  जाहिरात करणं बेजबाबदारपणाचं वाटलं , तरी ते समजून घ्यायला हाॅथाॅर्नच्या द स्कार्लेट लेटर चा संदर्भ आवश्यक आहे. जेसन रिटमनच्या जुनो मधे पंधरा वर्षांची नायिका गरोदर असणं, याकडे आपल्याला धोक्याच्या घंटेपलीकडे जाऊन एका मनस्वी मुलीची प्रेमकथा म्हणून पाहता आलं पाहीजे.

या वरवर धोकादायक वाटणाऱ्या चित्रपटांमधलं काही कापणं, वा त्यांना वयोमर्यादांच्या तिढ्यात अडकवणं हे नुसतं या चित्रपटांचा परिणाम कमी करत नाही, तर चुकीच्या गोष्टींकडे प्रेक्षकाचं लक्ष वेधतं. याआधी जो प्रेक्षक एक गोष्ट म्हणून या चित्रपटाकडे बघत होता, तो आता काही दडवलेलं काहितरी म्हणून नव्याने त्याकडे पाहायला लागतो. मग ही दडवलेली गोष्ट कोणती हे तो इंटरनेटवर शोधतो आणि पाहून टाकतो. म्हणजे मूळ हेतू साध्य तर होत नाहीच वर उलटच काहीतरी होतं.

सेन्साॅरची ही मनमानी रोखण्यासाठी सध्या काही पावलं उचलली जातायत हे आश्वासक आहे. श्याम बेनेगलांच्या हाताखाली स्थापन केलेली कमिटी काही वेगळ्या विचाराने या संपूर्ण प्रोसेसकडे कसं पहाता येईल याबद्दलचा रिपोर्ट सरकारपुढे मांडण्याच्या बेतात आहे. सेव्ह अवर सिनेमा या मोहिमेतून त्यांनी सामान्य प्रेक्षकांकडूनही सूचना मागितल्या होत्या, ज्या त्यांनी आपल्या रिपोर्टमधे विचारातही घेतल्या आहेत. यातून सेन्साॅरच्या दृष्टीकोनात काही मूलभूत फरक पडेल का? माहित नाही. मला स्वत:ला सेन्साॅर बोर्ड असण्याचीच गरज वाटत नाही. वयोमर्यादेचं बंधन जरुर असावं, ज्याने विषयाच्या गरजेप्रमाणे योग्य प्रेक्षकापर्यंत पोचणं अधिक सोपं होईल. पण एकदा ही मर्यादा निश्चित झाली की पुढे चित्रपटात कोणताही बदल सुचवण्याचा हक्क चित्रपटबाह्य संस्थेला नसावा. ही मर्यादाही काहीशी शिथील ठेवत मुलांनी काय पहावं याची जबाबदारी पालकांवर सोडण्याची शक्यताही विचारात घेण्यासारखी आहे. त्यामुळे बोर्डाच्या मनमानी कारभाराला कायमचा आळा बसेल.

मला विचाराल तर आज गरज लोकांपासून काही लावण्याची नाही, तर जे त्यांच्यासमोर आहे, ते काय दृष्टिकोनातून पहाणं योग्य ठरेल, याविषयी बोलण्याची आहे. आपण जे बघतोय, त्याला काॅन्टेक्स्ट आणण्याची आहे. लपवाछपवीचे दिवस आता गेले हे जितक्या लवकर आपण मान्य करु , तितक्या लवकर आपण या माध्यमाकडे मोकळेपणाने, केवळ त्यातल्या कलामूल्यांसाठी , एका नव्या दृष्टीकोनातून पाहू शकू.
- गणेश मतकरी
(रुपवाणीमधून ) 

1 comments:

Vivek Kulkarni August 12, 2016 at 3:02 AM  
This comment has been removed by the author.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP