पॅन्स लॅबिरीन्थ - युद्धवास्तवाचा चक्रव्यूह
>> Thursday, November 30, 2017
चित्रपटात मुलं असली, म्हणजे तो मुलांचा सिनेमा होतो का? उघडच नाही. व्हिटोरिओ डे सिकाच्या बायसिकल थिव्ज पासून ते नागराज मंजुळेच्या फॅन्ड्रीपर्यंत अशी अनेक उदाहरणं देता येतील की ज्यात मुलांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत, पणत्यातला आशय हा प्रामुख्याने मोठ्यांनी पहावा म्हणून, त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून लिहिला गेलेला आहे. मग याचा अर्थ असा घ्यायचा का की मोठ्यांचा सिनेमा आणि मुलांचा सिनेमा, म्युचुअली एक्सक्लुजिव प्रकार आहेत? मुलं आणि मोठे यांनाएकत्रितपणे सखोल, आणि तरीही रंजक काही दाखवेल, असे सिनेमे बनणारच नाहीत? तर तसंही म्हणता येणार नाही. तसे सिनेमे आहेत, पण ते मुलांना दाखवायचे तर मोठ्यांनी थोडं उदार धोरण ठेवणं आवश्यक आहे.
मुलांसाठी कोणतीही गोष्ट म्हंटली, की आपण सावरुन बसतो. मग त्यात अमुकच असायला हवे, तमुक चालणार नाही, त्यात करमणूक हवी, शक्यतर गंभीर काही नकोच, पण असेलच, तर ढोबळ संदेश हवा, अशी आपल्या मोठ्यांची बाळबोध मतंआहेत. प्रत्यक्षात, मुलांना चालणार नाही असं काही नसतं. आता इंटरनेट युगात तर ती खरोखरच मोठ्यांच्या नाकावर टिच्चून मनाला येईल ते बघत असतात, पण त्याआधीही, साहित्य, रोजची वर्तमानपत्र किंवा टिव्हीवरच्या बातम्या, ती सरसकटपहात असलेले हिंदी सिनेमा, यातून त्यांचं कितीतरी ‘प्रौढ’ शिक्षण झालेलं असतच. अगदी साध्या परीकथा म्हंटल्या, तरी अलिबाबाने बुधल्यात गरम तेल ओतून चाळीस चोरांना मारणं, हेन्सेल आणि ग्रेटेलनी त्यांना मारु पहाणाऱ्या चेटकीला खलासकरणं, रेड रायडिंग हूडच्या लांडगा मागे लागणं, आणि स्नो व्हाईटला राजपुत्राने चुंबन घेऊन जागं करणं, यासारख्या कथांमधे पुरेसा ‘मच्युअर कन्टेन्ट’ नाही का? त्यामुळे मला वाटतं सर्वांना सर्व पाहू द्यावं. विशेषत: ते तुम्हाला व्यक्तीश: चांगलं वाटतअसेल, तर नक्कीच. या प्रकारचा, मुलांनी पहावा का पाहू नये या प्रकारचा वाद संभवणारा एक चित्रपट माझ्या सर्वोत्कृष्ट जागतिक चित्रपटांच्या शाॅर्ट लिस्ट मधे अनेक वर्ष आहे. पुरेशा वाॅर्निंगसह मी तो वेळोवेळी मुलांना दाखवलेलाही आहे.त्याचाही आशय हा प्रामुख्याने मोठ्या प्रेक्षकाला अधिक प्रमाणात पोचेल असा असला, तरी त्याच्या गोष्टीतली काव्यमयता, फॅन्टसीचा वापर, आणि लहान, दहा बारा वर्षांची त्याची साहसी नायिका आॅफेलिआ, या गोष्टी त्याला मुलांपासून दूरठेवणं अवघड करतात. गिआर्मो डेल टोरो या दिग्दर्शकाचा हा स्पॅनिश चित्रपट, पॅन्’स लॅबिरीन्थ (२००६).
गिआर्मो डेल टोरो या दिग्दर्शकाचा, मी फार जुना फॅन आहे. करमणूक मूल्य आणि भव्यता, हे त्याच्या चित्रपटांचे ठरलेले विशेष असतात. फॅन्टसी हा त्याचा आवडता चित्रप्रकार. त्याचे स्पेनमधे केलेले क्रोनोस, द डेव्हिल्स बॅकबोन , आणि पॅन्’सलॅबिरीन्थ, हे अमेरिकेत केलेल्या हेलबाॅय ( भाग१/२), ब्लेड २, पॅसिफिक रिम वगैरेहून अधिक अर्थपूर्ण आहेत, पण त्याचा संबंध दिग्दर्शकाच्या गुणवत्तेपेक्षा त्या त्या व्यवसायाच्या आर्थिक आडाख्यांशी आहे. आपल्याकडे एक समज आहे कीआशयघन काही द्यायचं तर ते वास्तववादी चित्रपटांनीच. फॅन्टसीत कसला आला आशय? डेल टोरो हे खोटं ठरवत असला, तरी आपल्याकडे अजूनही तो महत्वाचा दिग्दर्शक मानला जात नाही. पॅन्’स लॅबिरीन्थ गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात दाखवला गेला, तेव्हादेखील आपल्या बऱ्याच चित्रपट अभ्यासकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करुन तुलनेने अतिशय सर्वसामान्य चित्रपटांचं भरभरुन कौतुक केलेलं मी पाहिलं आहे. हा एक दृष्टीकोन आहे, तो बदलणं सहजासहजी शक्य होणारनाही. पण आपण शक्यतर अशा थम्ब रुल्सकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करावा. कोणताही चित्रपट आपल्याला काय देतो हे त्या चित्रपटाकडे देण्यासारखं किती आहे यावर अवलंबून असतच, पण आपल्याकडे त्यातलं काय आणि किती घेण्याचीक्षमता आहे यालाही नक्कीच महत्व आहे.
पॅन्’स लॅबिरीन्थ ही एका बाजूने अगदी ‘ कोणे एके काळी’ प्रकारची मुलांची गोष्ट आहेत. त्यात जादू आहे, पऱ्या आहेत, राजे राण्या आहेत, राजकन्या आहेत आणि मुख्य म्हणजे राक्षसही आहेत. १९४४ च्या युद्धग्रस्त स्पेनमधे वाढणाऱ्या आॅफेलिआया मुलीच्या आयुष्याला अचानक फुटणारा फाटा, आणि त्यातून तिच्यापुढे उलगडलेलं एक नवं विश्व, यांची ही कहाणी आहे. मात्र दुसऱ्या बाजूने ही कथा आहे ती जुलमी फ्रॅन्कोइस्ट राजवटीने आपल्याला असलेला विरोध मोडून काढण्यासाठीचालवलेल्या प्रयत्नाची, सामान्य माणसांवर होणाऱ्या अत्याचारांची, आणि त्याविरोधात उभ्या ठाकलेल्या काही मोजक्या लोकांची. फॅन्टसीत ज्या प्रकारे राजे राण्या राक्षस आहेत, तसे आॅफेलिआ ज्या वास्तवात रहाते तिथेही आहेत. आणिचित्रपटातला कळीचा मुद्दा आहे तो हा, की आॅफेलिआ अनुभवत असलेली ही दोन्ही विश्व खरीच आहेत, का वास्तवातली कटूता सहन न होणाऱ्या आॅफेलिआने आपल्यापुरता कल्पनेत जगण्याचा पर्याय शोधून काढलाय? यातलं खरं काय, खोटंकाय, आणि एका विश्वातली घटना ही दुसऱ्यावर किती परिणाम करु शकेल याचा माग हा चित्रपट काढतो.
आॅफेलिआ ( इवाना बकेरो ) आपल्याला पहिल्यांदा भेटते, ती आपल्या गरोदर आईबरोबर ( आरिआड्ना गिल), कॅप्टन विडाल ( सर्गी लोपेज) च्या युद्धछावणीवर जात असताना. विडालशी तिच्या आईने दुसरं लग्न केलं असतं, आणि त्याची इच्छाअसते की मुलाचा जन्म छावणीवरच व्हावा. विडालचं वागणं एखाद्या हुकूमशहासारखं असतं. आपल्या इच्छेपलीकडे त्याला काहीच दिसत नाही. छावणीवर आॅफेलिआची मर्सेडीज ( मेरीबेल वर्दू) हिच्याशी मैत्री होते आणि ती लपून छपून रानातलपलेल्या बंडखोरांना मदत करतेय हे आॅफेलिआ कोणालाच सांगत नाही. छावणीशेजारी एखाद्या चक्रव्यूहासारखी रचना असलेली एक पुरातन वास्तू, एक लॅबिरीन्थ असतो. या जागी आॅफेलिआची गाठ पडते ती फाॅन या निसर्गदैवताशी. फाॅनआॅफेलिआच्या कानावर तिचं जन्मरहस्य घालतो. ती म्हणे मागच्या कोणत्याशा जन्मात भूगर्भातल्या एका राज्याची राजकन्या असते. त्या जगातले तिचे वडील आजही तिच्या प्रतिक्षेत असतात. मात्र त्या जगात जायचं तर पौर्णिमा येण्याच्या आतआॅफेलिआला तिच्यावर सोपवलेली तीन कामं पूरी करावी लागणार असतात. आॅफेलिआ अर्थातच या कामांसाठी तयार होते.
मूळ स्पॅनिशमधे चित्रपटाचं नाव ‘एल लॅबिरीन्तो डेल फाउनो’ किंवा ‘ द लॅबिरीन्थ आॅफ द फाॅन ‘ असं आहे. आता मुळात यात ‘ पॅन’ कुठून आला हे माहीत नाही कारण पॅन आणि फाॅन दोन्ही दैवतं ग्रीक असल्याने उगाचच एकाएेवजी दुसरं घालणंअनावश्यक वाटतं. दोन्हींचा प्रकार निसर्गदेवतांचा पण पॅनची प्रतिमा ही थोडी सेक्शुअल पैलू असलेली आहे, त्यामुळे तर हा बदल अगदीच अतर्क्य वाटतो.
पॅन्’स लॅबिरीन्थमधली जी मध्यवर्ती कल्पना तिला व्हिक्टर एरीसने १९७३ मधे दिग्दर्शीत केलेल्या ‘ द स्पिरीट आॅफ द बीहाईव’ या चित्रपटाचा थोडका, पण लक्षात येण्याजोगा आधार आहे. दोन्ही चित्रपट फ्रॅन्कोइस्ट काळातल्या स्पेनमधे घडणारेआणि राजकीय धोरणावर टिका करणारे आहेत, दोन्हींमधे प्रमुख भूमिकेत लहान मुलगी आहे जी वास्तव आणि कल्पित यांच्या सरमिसळीत सापडलेली आहे. तरीही, लॅबिरीन्थ हा बीहाईव हून खूपच वेगळा आहे. बीहाईव काहीसा संथ, प्रायोगिकआणि प्रश्नांची सरळ उत्तरं देणं टाळणारा आहे. लॅबिरीन्थ सर्वच बाबतीत अधिक आहे. तो अधिक व्यावसायिक आहे, अधिक गुतवणारा आहे. त्यातली कल्पित कथा आणि अराजक ही दोन्ही कथासूत्र तर्कशुद्ध चौकटीत पूर्णत: फुलवलेली आहेत.लॅबिरीन्थचा शेवटही त्यामुळे अधिक भिडणारा आहे. डेल टोरो ने २००१ मधे दिग्दर्शीत केलेला ‘द डेव्हिल्स बॅकबोन’ देखील काही प्रमुख कल्पनांबाबत लॅबिरीन्थ सारखाच आहे. पण तो प्रयत्न याच्याइतका लोकप्रिय होऊ शकला नाही.
पॅन्स लॅबिरीन्थ एकदा बघून आपल्याला पूर्ण तपशीलात कळणं अशक्य आहे. त्यातले मुद्दे कळतील, कथानक कळेल, पण त्यातला तपशील, ज्या विविध पातळ्यांवर तो गोष्ट सांगतो, ते सारं नीट कळायचं तर त्याला पुन्हा पुन्हा पहाण्याची गरजआहे. यातली एखादी साधी कृतीही अर्थाच्या दृष्टीने प्रगल्भ असू शकते. एक उदाहरण घ्यायचं, तर आॅफेलिआच्या पहिल्या प्रवासाचं घेता येईल. आईला बरं वाटत नसल्याने, या प्रवासादरम्यान गाड्या एके ठिकाणी थांबतात. आई आणि आॅफेलिआदोघंही खाली उतरतात. इकडे तिकडे पहाताना आॅफेलिआला एक दगड सापडतो. ती तो उचलते. थोडं पुढे गेल्यावर तिला एक जुनाट शिल्प लागतं . हा एक चेहरा असतो, ज्याच्या डोळ्याच्या जागी भोक पडलेलं असतं. आॅफेलिआला सापडलेलातुकडा या डोळ्याच्या भागाचाच असतो. ती शिल्पावर डोळा बसवते आणि क्षणार्धात शिल्पाच्या तोंडाच्या जागच्या छिद्रातून एक काडीकिड्यासारखा दिसणारा चमत्कारी किडा बाहेर येतो. हा किडा तिला फाॅनकडे नेण्याला पुढे कारणीभूत ठरतो. याप्रसंगातली डोळ्याचा तुकडा मिळण्याची, तो जागेवर बसवण्याची कृती अर्थपूर्ण आहे. खासकरुन आॅफेलिआच्या आयुष्याला तिथे लागणारं वळण लक्षात घेतलं, तर. शिल्पातला डोळा हे दृष्टीचं प्रतीक आहे. तो सापडणं आणि आॅफेलिआला एकनवी नजर प्राप्त होणं हे तर्काला धरुन आहे. पुढे डोळ्याचा असाच पण याहून भयकारी वापर पेल मॅन या व्यक्तिरेखेच्या प्रसंगातही आहे. या प्रकारचे अर्थ शोधण्यासारख्या जागा या सिनेमात अनेक आहे. विडालचं पाॅकेटवाॅच, फाॅनने दिलेल्या मुळीवरटाकण्याचं रक्त, असे अनेक प्रसंग आणि प्रतीकं सांगता येतील. पण यातलं सर्वात महत्वाचं प्रतीक आहे ते विडालच्या व्यक्तीरेखेचच.
विडाल हा स्पेनमधे आलेल्या फॅशिस्ट राजवटीचं प्रातिनिधीत्व करतो. हे आॅफेलिआचे सावत्र वडील हा या चित्रपटातला खलनायक आहे. त्याचं क्रौर्य, त्याचा स्वार्थ, त्याची सत्तेची हाव, ही जागोजाग दिसते. विडाल हा आॅफेलिआच्या वास्तवाचा भागआहे. पण आपण असंदेखील म्हणू शकतो, की फाॅनने सांगितलेल्या दोन कामांमधे आॅफेलिआला भेटणारे राक्षस हे दुसरे तिसरे कोणी नसून विडालच आहेत. केवळ तिथलं त्यांचं अस्तित्व, हे स्पष्ट नं मांडता प्रतिकांमधे लपवलेलं आहे.
विडालच्या दोन बाजू आहेत. आॅफेलिआच्या आईचा हात धरुन, तिला गरोदर करुन , त्याने आॅफेलिआच्या व्यक्तिगत आयुष्यात केलेला प्रवेश ही त्याची पहिली बाजू, तर आंधळ्या सत्तेचा प्रतिनिधी, ही त्याची दुसरी बाजू. फाॅन आॅफेलिआला जीकामं सांगतो, त्यातलं पहिलं आहे, ते रानातल्या एका सुकत चाललेल्या झाडाच्या मुळाशी असलेल्या ढोलीत जाऊन तिथल्या महाकाय बेडकाने गिळंकृत केलेली चावी मिळवणं. या झाडाचा आकार, हा स्पष्टपणे गर्भाशयाच्या आकाराचा आहे.ढोलीचा अर्थ मी वेगळा सांगायची गरज नाही. आणि बेडकाने गिळलेली चावी आणि विडालने आपल्या ताब्यात घेतलेली स्टोअररुमची चावी, या दोघांमधेही साम्य आहे. त्यामुळे आॅफेलिआला थेट त्रास देणारी विडालची वैयक्तिक बाजू, राक्षसीबेडकाच्या प्रतिकात दिसते.
दुसरं प्रतिक आहे ते पेल मॅन या राक्षसाचं. डेल टोरोने एकीकडे म्हंटलय की त्याच्या शेजारी बसून चित्रपट पहात असलेला प्रसिद्ध भयकथाकार स्टीवन किंगदेखील पेल मॅनला पडद्यावर पाहून दचकला. यावरुनही पेल मॅन किती भीतीदायक असेलयाची कल्पना येऊ शकते. इथे आॅफेलिआवर सोपवलेलं काम आहे ते एका ठिकाणून एक धारदार चाकू चोरण्याचं. हा चाकू जिथे ठेवलाय, त्याच्या जवळच एका प्रचंड टेबलावर साधारण माणसासारखाच दिसणारा पेल मॅन बसलाय. पेल मॅन समोरप्रचंड मेजवानी रचलेली आहे, पण ती त्याला दिसत नाही. साहजिक आहे, त्याला दिसण्यासाठी डोळेच नाहीत. किंवा त्याच्या चेहऱ्यावर नाहीत असं म्हणू. त्याचे डोळे त्याच्या समोर, एका बशीत ठेवलेले आहेत. वेळ येताच हा राक्षस ते डोळे उचलतो,आणि तळहातांना असलेल्या दोन खाचांमधे घालतो. आता हात चेहऱ्यापुढे धरुन त्याला सावज हेरणं शक्य होतं. स्वत:पुढे मेजवानी वाढलेली असताना लहान निरुपद्रवी मुलीवर हल्ला करणारा पेल मॅन, हे राजसत्तेचं, धर्मसत्तेचं प्रतीक आहे. म्हणजेविडाल जी बाजू लढवतोय, त्याचं जे राजकीय रुप आहे, तेच या पेल मॅनच्या रुपाने आपल्याला दिसते. ढोलीतला बेडूक आणि पेल मॅन यांना एकत्रितपणे पाहिलं तर विडालची ही वेगळी आवृत्ती आपल्यासमोर येते. आता ही आवृत्ती आॅफेलिआलाका दिसावी? तिच्या एरवीच्या आयुष्याचच तर हे भासमय प्रतिबिंब नाही?
हे भासमय प्रतिबिंब वाटायचं आणखी एक कारण आहे ते घटनांमागच्या दुहेरी स्पष्टीकरणांमधेही. चित्रपटात एका प्रसंगी आॅफेलिआला आईच्या बाळंतपणाची फार काळजी वाटायला लागते, काहीतरी बरं वाईट होईल असं वाटायला लागतं. यावरउपाय म्हणून फाॅन तिला एक मुळी देतो जिचा काही प्रमाणात आईची तब्येत सुधारण्यासाठी उपयोगही होतो. आॅफेलिआ स्वत:पुरता समज करुन घेते तो हाच, की फाॅनचा उपायच लागू पडला. आता या दिवसात तब्येत बिघडण्याला छावणीवरयेतानाचा लांबचा प्रवास, किंवा सुधारण्याला डाॅक्टरची ट्रीटमेन्ट, अशी सोपी, पटण्यासारखी कारणंही चित्रपट देतो, जी वास्तवाला धरुन आहेत. या दोन्ही उत्तरांच्या असण्यामुळे आपण प्रेक्षकही खरं काय घडतय या ठाम निष्कर्षाकडे येऊ शकतनाही.
माझा अनुभव असा आहे, की जेव्हा चित्रपटाचा अर्थ लावण्याचं काम प्रेक्षकांवर सोपवलं जातं, तेव्हा दिग्दर्शक आपल्या बाजूने काही सूचक जागा अशा ठेवतात, की ते स्वत: कोणत्या बाजूला अधिक झुकतायत हे चाणाक्ष प्रेक्षकाच्या लक्षात यावं.इथेही तशा जागा आहेत, आणि स्वत: गिआर्मो डेल टोरोने आपला प्रेफरन्स काही मुलाखतींमधून सांगितलेलाही आहे. तरीही मला विचाराल, तर जी मजा त्यातल्या दोन्ही बाजूंच्या एकत्रित अस्तित्वात आहे, तेवढी कुठलीतरी एक बाजू निवडण्यातनाही.
लॅबिरीन्थचा दृश्य भाग हा उत्तम आहे, पण तो अमेरीकन चित्रपटांमधल्या चकचकाटाहून पुष्कळच वेगळा आहे. दोन बाबतीत. सौंदर्य आणि पाॅलिश. अमेरिकन चित्रपटात पऱ्या, देव वगैरे गोष्टी आल्या की त्या अगदी गोंडस, सुंदर दाखवल्या जातात.इथलं चित्रण त्याच्या उलट आहे.फाॅन हे दैवत मुळातच कमरेखाली बोकडाचं शरीर असणारं आहे, पण इथे तो ज्या प्रकारे दिसतो, ते पाहून हा नायिकेच्या बाजूचा आहे का विरोधी बाजूचा, असा संभ्रम पडावा. फाॅन आणि पेल मॅनची रंगभूषा, वेषभूषायाला जबाबदार आहे, पण त्याबरोबर त्या पात्राचा वावर देखील. अतिशय लवचिक वावरातून अनेक महत्वाच्या भूमिका केलेल्या पण आपल्याला चेहऱ्याने फार परिचित नसणाऱ्या डग जोन्सनेच या (दोन्ही) भूमिका केल्या आहेत. स्टार वाॅर्स सारख्याचित्रपटांमधे अलीकडे जशी पूर्ण अॅनिमेटेड पात्र वापरली जातात, तशी या दोन व्यक्तिरेखांनाही वापरता आली असती, पण डेल टोरो ला संगणकापेक्षा गोष्टी शक्य तितक्या प्रत्यक्ष घडवायला आवडतात. त्याचा हा एकूणच दृष्टीकोन आहे, आणित्यामुळेच चित्रपटात बेडूक, छोट्या पऱ्या वगैरेलाही थेट संगणकातून नं आणता, स्टाॅप मोशन अॅनिमेशन, किंवा अॅनिमेट्राॅनिक्स यासारखे उपाय वापरले आहेत, ज्यात बरोबरच्या कलाकारांना या कल्पित व्यक्तिरेखांबरोबर प्रत्यक्ष काम करता येईल.केवळ रंगीत पडद्यापुढे एकट्याने अभिनय करावा लागणार नाही.
लॅबिरीन्थमधला फॅन्टसीचा भाग इतका स्पष्ट असताना मुलांनी पहायला कोणाचा विरोध का असावा असं एवढा भाग वाचून कोणाला वाटेल. तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की यात दाखवलेला हिंसाचार आणि भीतीचे प्रसंग हे ग्राफीक आहेत. मुलांसाठीसोपे केलेले नाहीत. आता त्यात अनावश्यक रक्तपात टाळलेला आहे, पण तरीही ते चित्रीत करण्याची पद्धत अंगावर येणारी आहे. वेळोवेळी हिंसा थेट नं दाखवता सूचक केली आहे, उदाहरणार्थ डाॅक्टरने पाय अॅम्प्यूट करण्याचा प्रसंग. पण विडालएका गावकऱ्याला बाटलीने मारतो तो प्रसंग, किंवा मर्सेडीज विडालवर उलटते तो प्रसंग, अशा जागा मुलांनाच का, मोठ्यांनाही बघायला त्रासदायक आहेत. पेल मॅनचं दर्शन तर लहान मुलांना नक्कीच घाबरवेल. पण असं सगळं असतानाही मी म्हणेनकी पॅन्’स लॅबिरीन्थ मुलांनी जरुर पहावा, त्यांची ( आणि पालकांची )तयारी असल्यास. त्यातलं सगळच त्यांना कळलं नाही, तरी जे कळेल तेही दूरगामी परिणाम करणारं असेल.
-
गणेश मतकरी
Read more...