लिपस्टीक आणि मुक्तीची गरज

>> Friday, July 28, 2017




अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शीत लिपस्टीक अंडर माय बुरखा हा चित्रपट मी पहायला गेलो, तेव्हा रात्री पावणेअकराचा शो असूनही बऱ्यापैकी गर्दी होती. फिल्म सुरु होताहोताच, साताठ तरुणांचा एक ग्रुप आला आणि मोठमोठ्याने बडबड करत आमच्या रांगेत शिरला. चित्रपट सुरु झाला आणि लक्षात आलं, की या ग्रुपच्या चित्रपटाबद्दल काही वेगळ्याच कल्पना असाव्यात. झालेले वाद, काहिशी सेन्सेशनल म्हणण्यासारखी ट्रेलर, आणि आपल्या दिव्य बोर्ड आॅफ सर्टिफिकेशनने दिलेलं ‘ फक्त प्रौढांसाठी,’ हे सर्टिफिकेट, यावरुन त्यांनी सिनेमाला यायचं ठरवलं असावं.

सिनेमा भोपालमधल्या एका जुन्या हवेलीत रहाणाऱ्या, विविध वयाच्या , कौटुंबिक परिस्थितीतल्या चार महिलांची, त्यांच्या अवेकनिंगची , जागं होण्याची गोष्ट सांगतो. यात सेक्शुअल अवेकनिंग हा एक भाग झाला, मात्र प्रामुख्याने जाग्या होणाऱ्या जाणीवा आहेत त्या स्त्रीत्वाच्या , स्वातंत्र्याच्या, त्यांच्यावर आजवर लादल्या गेलेल्या भूमिकांमधून बाहेर पडणं आवश्यक वाटण्यासंबंधातल्या. यातली बुवाजी ( रत्ना पाठक शाह ) ही हवेलीच्या मालकांच्या कुटुंबातली ज्येष्ठ महिला आहे. भोपाळ गॅस हल्ल्यानंतर वाचलेल्या कुटुंबातल्या लहान मुलांना वाढवताना, ती पुऱ्या हवेलीचीच बुवाजी होऊन बसलेली आहे. इतकी, की बुवाजी या नावापलीकडे आपली ओळख आहे, हेच ती विसरलेली. ( आपलं उषा हे नाव तिला आठवतं, आणि आपण बुवाजीपलीकडे कोणीतरी आहोत याची आठवण होते , तो प्रसंग अभिनयासाठी खास उल्लेखनीय) . बुवाजी लपूनछपून वाचत असलेली ‘लिपस्टीक वाले सपने’, ही खोटी खोटी ग्लॅमरस, सेक्सी, रोमॅंटीक कादंबरी , आपल्याला चित्रपटभर सतत एेकवली जाते. रोजी, हे या कादंबरीतल्या प्रमुख पात्राचं नाव.

या चित्रपटातली इतर पात्र काहीशी अशी. शिरीन ( कोंकणा सेनशर्मा ) ही डोअर टु डोअर सेल्सगर्ल आदर्श पत्नीच्या भूमिकेत अडकलेली, तर काॅलेज विद्यार्थिनी रिहाना ( प्लबिता बोरठाकूर) ही आदर्श मुलीच्या. शिरीनचा गल्फला येऊन जाऊन असलेला नवरा ( सुशांत सिंग) तिला मुलं, प्रेग्नन्सी आणि गर्भपात यांच्या चक्रात अडकवून स्वत: हवं ते करायला मोकळा आहे. रिहाना आपल्या मुक्त विचारांना काॅलेजमधे शोधण्याचा प्रयत्न करत, आपल्या कडक शिस्तीच्या घरात कशीबशी जगतेय. चौघीतली त्यातल्यात्यात मुक्त आहे ती ब्युटीशीअन लीला ( आहाना कुम्रा ) पण तिचं स्वातंत्र्य हे फसवं आहे. ती प्रियकर ( विक्रांत मासी ) आणि होणारा नवरा ( वैभव तत्ववादी ) या दोन पुरुषांमधे अडकलीय. तिचं शरीर हवं ते करायला स्वतंत्र असलं, तरी या दोघांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा या तिला बांधून ठेवतायत. चित्रपट या चौघींचा मुक्तीच्या संकल्पनेपर्यंत येण्याचा प्रवास मांडतो. त्या खरच मुक्त होऊ शकतील का,हा सोप्या सुखांत सिनेमांना पडणारा  प्रश्न बाजूला ठेऊन, मुक्तीची गरज लक्षात येणं म्हणजेच मुक्ती, असं लिपस्टीक म्हणतो.
सिनेमा जसा पुढेपुढे जायला लागला तेव्हा माझ्या रांगेतला तरुणांचा ग्रुप अस्वस्थ झाला. सिनेमात सेक्शुअल संदर्भ असणारे प्रसंग होते, पण साध्या ,यू सर्टिफिकेटवाल्या हिंदी सिनेमांमधूनही ज्या आकर्षक आणि प्रेक्षकाला चाळवणाऱ्या पद्धतीने स्त्रियांना सादर केलं जातं ते इथे होत नव्हतं. इथे स्त्रीदेहाचं प्रदर्शन नव्हतं. इथला सेक्स हा त्या स्त्रीयांच्या जीवनाचा भाग होता. कधी त्यांनी निवडलेला, तर कधी त्यांच्यावर लादला गेलेला. एरवी आपण जे स्वप्नरंजन पसंत करतो ते इथे नव्हतं, तर इथे होती घुसमट. परिस्थितीतून, नात्यांमधून, स्त्री पुरुषांना आपापली जागा ठरवून देणाऱ्या समाजरचनेतून आलेली.

जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला अडचणीची वाटते अस्वस्थ करते, तेव्हा आपण त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमात पडतो. प्रेक्षक जेव्हा संभ्रमात पडतात, तेव्हा हमखास येणारी प्रतिक्रिया असते ती हसणं आणि टिंगल करणं ही. या ग्रुपनेही ही टिंगल सुरु केली. मधे शेरेबाजी करायची. सेक्सचा उल्लेख आला की हसायचं, असले प्रकार सुरु केले. मध्यंतरापर्यंत त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या सिनेमाच्या अपेक्षेने आलो, तो हा नाही. मग त्यांना वेगळाच प्रश्न पडला. ‘ बाकी सब तो ठीक है भई, मगर ये रोजी कौन है?’ एकजण म्हणाला, आणि चर्चा रंगली.
ही ‘रोजी’ आपल्याला चित्रपटात पहिल्यांदा भेटते तेव्हा पडद्यावर रिहाना असते. तीही बुरख्यासह. आपण सेकंदभर विचार करतो की या मुस्लीम पात्राचं नाव रोजी कसं? पण मग आपल्या लक्षात येतं, की रोजीचा उल्लेख चारातली कोणतीही व्यक्तीरेखा समोर असताना येतोय. रोजी हे पात्र बुवाजी वाचत असलेल्या कादंबरीतलं आहे, हे आपल्याला कळायला थोडा वेळ जातो. पण हळूहळू लक्षात येतं की या पात्राचा, या निवेदनाचा, सगळ्याच व्यक्तीरेखांशी अप्रत्यक्ष पण महत्वाचा संबंध आहे. रोजीचं पात्र चित्रपटातल्या व्यक्तीरेखांच्या आयुष्यातल्या विसंगती दाखवून देत  , स्वप्न आणि वास्तव यातला फरक अधोरेखित करत रहातं. रोजीचं आयुष्य, वागणं, हे स्वप्नवत आहे, सुंदर आहे, तसं खऱ्या आयुष्यात होत नाही , हे सांगतं, पण चित्रपटाच्या अखेरीला हे स्पष्ट करतं, की शेवटी ही स्वप्नच आपल्याला जगायची प्रेरणा देत असतात. खोट्या रोमॅंटीक प्रेमकथा, किंवा  चित्रपट यांना आपण खरं समजत नाही, पण त्यातल्या नायक- नायिकांच्या जागी मनातल्या मनात स्वत:ला पाहू शकतो. ही स्वप्नांची दुनिया, ही आपल्या आजूबाजूच्या कंटाळवाण्या वास्तवाला पर्याय असते. ते आपलं आयुष्य नसलं, तरी आपल्या आयुष्यात रंग भरण्याचं काम या गोष्टी करतात. एका परीने लिपस्टीक अंडर माय बुरखामधली कोणतीच व्यक्तीरेखा रोजी नाही, पण दुसऱ्या बाजूने असंही म्हणता येईल, की यातली प्रत्येक व्यक्तीरेखाच रोजी आहे. निदान तिच्यापुरती, तिच्या नजरेतून का असेना.
चित्रपटाचं लिपस्टीक अंडर माय बुरखा हे नाव त्यातल्या लिपस्टीक आणि बुरखा या परस्पर विरोधी भासणाऱ्या प्रतिमांनी , तसच बुरखा या  मुस्लिम समाजाशी जोडलेल्या वेशामुळे निव्वळ सेन्सेशनल वाटावं म्हणून देण्यात आलंय असं वाटू शकतं, मात्र प्रत्यक्षात हे नाव प्रतीकात्मक आणि अगदीच अर्थपूर्ण आहे. स्त्रीयांची वरवर दिसणारी, अनेकदा सामाजिक बंधनांखाली झाकलेली  प्रतिमा आणि त्यांचं स्वत:च्या नजरेतलं व्यक्तिमत्व , हा विरोधाभास हे प्रतीक सहजपणे मांडतं.
हा चित्रपट मामी चित्रपट महोत्सवात दाखवला गेला तेव्हाच तो टाकाऊ नसणार हे लक्षात आलं होतं, पण बरेचदा या प्रकारचे चित्रपट पटकन गायब होतात. कधी आले कधी गेले कळत नाही. लिपस्टीक अंडर माय बुरखाला अनेक प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याबद्दल आपण श्री पहलाज निहलानी आणि त्यांचं फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड यांचे आभारच मानायला हवेत. अर्थात अशा प्रसिद्धीचा एक तोटाही असतो.  अशा चित्रपटाबद्दल लोकांच्या ज्या टोकाच्या अपेक्षा तयार होतात, ज्या प्रत्यक्ष आस्वादात अडचण ठरण्याची शक्यता असते. बुरखाचंही काही प्रमाणात तसं झालय. त्याला स्त्रीवादी म्हणून डोक्यावर घेणारे काही जण आहेत, तसेच त्यात फार दम नाही म्हणणारे काही जण आहेत. भलत्या अपेक्षांनी चित्रपट पाहून त्यात ‘ तसं ‘ काही नव्हतं यामुळे निराश होणारेही अनेक जण आहेत. मला या चित्रपटात काय आहे असं विचारलं तर मी म्हणेन की तो खरा आहे. तो स्त्रीवादावरला लास्ट वर्ड आहे का? तर खचितच नाही. सर्वसाधारण आयुष्य जगू पहाणाऱ्या पण त्यातही अनंत अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या सामान्य स्त्रीयांची ही गोष्ट आहे. पण बेगडी सिनेमांच्या जगात ती आपल्यापुढे समाजाचं खरं प्रतीबिंब मांडू पहाते. ते पूर्ण समाजाचं नसेल, एका वर्गाचं, एका स्तराचं असेल, पण म्हणून ते चुकीचं ठरत नाही. त्यात पुरुषांच्या केवळ नकारात्मक छटा आल्यात असं कोणी म्हणेल आणि काही प्रमाणात ते खरंही आहे. मात्र आलेल्या छटा समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात यावर कोणाचं दुमत नसावं. तुमचं आयुष्य या चित्रपटातल्या व्यक्तीरेखांच्या तुलनेत खूप मोकळं असेल तर आनंद आहे, पण असलं तरीही आजूबाजूला डोळे उघडून पहा, यातलं कोणी ना कोणी तुम्हाला जरुर दिसेल. कदाचित अनपेक्षितपणे, तुमच्या अगदी जवळचच कोणीतरी.


-गणेश मतकरी


0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP