द ताश्कंद फाईल्स - हू बेनिफिट्स ?

>> Thursday, April 18, 2019


राजकीय कारस्थान या विषयावर एक फिल्म आहे. राष्ट्रप्रमुखाचा मृत्यू , त्या मृत्यूभोवती तयार झालेलं संशयाचं वातावरण आणि त्याच्या मुळाशी असलेलं राजकीय कारस्थान हा चित्रपटाचा प्रमुख विषय आहे. काही वर्षांनंतर या मृत्यूबद्दलची काही विशेष माहिती एका व्यक्तीच्या हातात पडते आणि ती व्यक्ती तपास सुरु करते. तपासादरम्यान फार वरच्या गोटातल्या लोकांचे हात यात गुंतल्याचं तिच्या लक्षात येतं. जीवाची पर्वा करता ती या घटनेची पाळंमुळं बाहेर काढते, विरोधी विचारांशी, तिच्या वाटेत समस्या उभ्या करणाऱ्या उच्चपदस्थांशी लढते आणि खरं काय झालं असावं याचं एक नॅरेटीव तयार करते. या राष्ट्रप्रमुखाला कोणी मारलं असावं, त्याच्या मृत्यूमागे कोणाचा फायदा असेल आणि सगळं प्रकरण दाबून टाकण्याची क्षमता कोणाकडे आहे या प्रश्नांची ती उत्तरं शोधते आणि वेळ येताच सर्वांपुढे उभं राहून बेधडकपणे तिला दिसलेलं सत्य मांडून दाखवते. ही फिल्म फार सुंदर आहे आणि अजून पाहिली नसलीत तर जरुर पहा. मी बोलतोय ते अर्थातच विवेक अग्निहोत्रीच्या ताश्कंद फाईल्सबद्दल नाही तर आॅलिव्हर स्टोनच्याजेएफके’ (१९९१) बद्दल

केनेडीच्या हत्येनंतर त्यामागचं कारस्थान शोधण्याच्या न्यू आॅर्लीन्सचा डिस्ट्रिक्ट ॲटर्नी जिम गॅरीसन ( चित्रपटात केविन काॅसनर ) याच्या प्रयत्नांवर ही जवळपास साडेतीन तास लांबीची फिल्म आधारलेली आहे. जेएफके मधे एक पात्र विचारतंव्हाय वाॅज केनेडी किल्ड? हू बेनिफिटेड? हू हॅज पाॅवर टू कव्हर इट अप?’ , ताश्कंद फाईल्सचा प्रयत्नही आपले द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल हेच प्रश्न विचारण्याचा आहे. फरक एवढाच, की केनेडीची हत्या ही खरीखुरी झाली होती आणि ती कोणी केली असेल हाच प्रश्न होता. शास्त्रीजींच्या केसमधे अधिकृत नोंद ही हार्ट अटॅकची आहे. अर्थात फिल्मला यामुळे काहीच फरक पडत नाही. तिची हा खून असल्याची खात्री आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या पोस्टरवरची टॅग लाईनवाॅज शास्त्री किल्ड?’ असं विचारत नाही तरहू किल्ड शास्त्री?‘ एवढाच प्रश्न विचारते. याहू’   चं उत्तरही फिल्ममेकर्सना माहीतच आहे. ते सिद्ध करण्याची त्यांना फारशी गरज वाटत नाही. ‘चित्रपटाने केलेले दावे सिद्ध झालेले नाहीतअशा अर्थाचा छोटा डिस्क्लेमर त्यांना कायदेशीर बाबींमधून मुक्त करतो.  

जेएफके मधला गॅरीसनने केलेला तपास आणि आरोप, आणि ताश्कंद फाईल्स मधल्या रागिणीने ( श्वेता बसू प्रसाद ) केलेला तपास आणि आरोप यात फरक असा , की जेएफकेला सत्याचा आधार आहे. गॅरीसनने उभी केलेली केस ही खरोखर कोर्टात चालली होती, आणि त्याचा युक्तीवाद हा त्याच्या तपासातून पुढे आलेला होता. ताश्कंद फाईल्स मुळात काल्पनिक असल्याने त्याला प्रत्यक्ष काहीही सिद्ध करणं फार आवश्यक  वाटत नाही.चमत्कृतीपूर्ण आणि सध्याच्या राजकीय वातावरणाला पोषक  असे चमकदार आरोप तो करत जातो.   फेसबुकवर जशा कोणाच्यातरी लेखांच्या लिंक देऊन आरोप केले जातात तशी यातली रागिणी ऐकीव माहितीवर केस मांडते. त्यातल्यात्यात पुरावे म्हणता येतील अशा गोष्टी आहेत पुस्तकांमधून केलेल्या दाव्यांच्या. पण ही पुस्तकं ज्यांनी लिहिली त्या व्यक्ती आता साक्ष देऊ शकत नाहीत, आणि या पुस्तकांमधल्या विधानांची सत्यासत्यताही कधी पडताळली गेलेली नाही

ताश्कंद फाईल्सच्या रचनेतल्या  ‘ट्वेल्व ॲंग्री मेनचित्रपटाशी साम्य असलेल्या भागावर बऱ्याच परीक्षणांमधून कमेन्ट आली आहे, आणि ती योग्य आहे. चित्रपटाचा बराचसा भाग एका कमिटीमधल्या चर्चेचा आहे. हा ट्वेल्व ॲंग्री मेन मधून घेतल्याचं अगदी सहजपणे लक्षात येतं. काही विशिष्ट क्षण, किंवा व्यक्तीरेखांचे तपशील आपल्याला मूळ चित्रपटातल्या जागांची आठवण करुन देतात. मूळ नाटका/चित्रपटात १२ ज्युरर्स एका केसमधल्या आरोपीने आपल्या वडीलांचा खून केला किंवा नाही यावर चर्चा करतायत. हे बारा जण समाजातल्या विशिष्ट प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करतात. इथे त्या प्रवृत्ती राजकीय स्वरुपाच्या आहेत. त्यांच्यामधे जी चर्चा घडते त्यातून चित्रपटातले मुद्दे समोर येतात, आणि शास्त्रीजींचा मृत्यू नैसर्गिक होता वा हत्या, याबद्दल मत मांडलं जातं. पण हे सगळं असलं तरी माझ्या मते जेएफके हीच चित्रपटामागची प्रमुख प्रेरणा आहे. जेएफके चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्या जोरावर अमेरिकन सरकारने एका पॅनलची स्थापना केली ज्यामार्फत या केससंबंधातल्या कोणत्या क्लासिफाईड कागदपत्रांना जनतेपुढे ठेवता येईल याबद्दल निर्णय व्हावा. ताश्कंद फाईल्सचा अजेंडाही असाच भव्य आहे. पण शास्त्रीजींची केस रिओपन होण्याआधी किंवा होण्यापेक्षा त्यांचं लक्ष्य विशिष्ट राजकीय पक्षाच्या विरोधात जनमत तयार करुन येत्या निवडणूकांवर परिणाम करणं हे आहे. परिणाम होईल का नाही हे माहीत नाही, पण समीक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादाला जुमानता विशिष्ट राजकीय मतप्रणालीच्या जनतेकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागलेला आहे

यात लक्षात घेण्यासारख्या दोनतीन मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे चित्रपटाचा असा हेतू असण्यात काही गैर आहे का?दुसरं म्हणजे  आशयातून ते मुद्दा पोचवण्यात यशस्वी होतात का, आणि तिसरी म्हणजे  त्याचा चित्रपट म्हणून दर्जा. ज्या समीक्षकांनी त्याला विरोध केलाय त्यांनी प्रामुख्याने चित्रपट म्हणून असलेल्या ( किंवा नसलेल्या ) दर्जाला तो केला आहे. चित्रपटाच्या बाजूने बोलणारे तो कसा जबरदस्त थ्रिलर आहे वगैरे बोलतायत पण आपल्याकडे गंभीर विषय म्हणजे चांगला सिनेमा असं मानायची मुळातच प्रथा आहे. त्यात विशिष्ट विचारधारेच्या समर्थकांना आवडेलसं त्यात बरच काही आहे

दिग्दर्शकाने विशिष्ट हेतूने चित्रपट बनवण्याच काहीच गैर नाही. जर तो चित्रपट म्हणून जमलेला असेल, तर तो अतिशय दूरगामी परिणाम करणारा आणि धोरणात्मक बदल घडवणारा असू शकतो, हे जेएफके च्या उदाहरणावरुनच स्पष्ट होतं. पण ते असतानाही  चित्रपटात एक कथानक चांगल्या रितीने मांडलं जावं अशी एक मूलभूत अपेक्षा असते. जर ते गेलं नाही, तर नुसते मुद्दे हे कथेची जागा घेऊशकत नाहीत. मग ते स्वतंत्रपणे जोडलेले ( या केसमधे ओढूनताणून जोडलेले ) मुद्देच वाटू शकतात. मी जेव्हा ऐकलं, की लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूसंबंधातल्या रहस्यावर आधारीत चित्रपट येतोय, तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया सकारात्मक होती. त्यामुळेच प्रतिकूल समीक्षा असतानाही मी तो पाहिला

चित्रपटाच्या सुरुवातीलाच रागिणीची ओळख होते तीचलता हैपत्रकारिता करणारी पत्रकार म्हणून. तिने एक खोटी बातमी केल्याने संपादक तिच्यावर वैतागलेला आहे. एका निनावी फोनकाॅलनंतर तिच्याकडे एक पार्सल पोचतं ज्यात शास्त्रीजींच्या हत्येसंबंधातले तमाम पेपर्स आहेत. त्यांच्या आधारे आणि गुगलवर थोडा रिसर्च (!) करुन रागिणी स्टोरी तयार करते आणि झटकन सर्वोच्च पातळीवरुन तिला प्रतिसाद मिळतो. गृहमंत्री नटराजन ( नासीरुद्दीन शाह) यांच्या हुकूमावरुन एक चौकशी समिती नेमली जाते ज्यात सरकारच्या बाजूचे आणि विरोधातले लोक असतात. ताश्कंद करारावर सही झाल्यावर त्या रात्री नक्की काय घडलं याचा छडा लावण्याचा हा प्रयत्न असतो. रागिणीचीही कमिटीत वर्णी लागते

बऱ्याच समीक्षकांनी चित्रपटाचं नॅरेटीव एकसंध नसल्याची तक्रार केली आहे, आणि ते खरं आहे. पण त्याचं कारण म्हणजे दिग्दर्शकाने चित्रपटाचा स्वतंत्रपणे विचार केलेला नाही. जेएफके आणि ट्वेल्व ॲंग्री मेन च्या स्क्रिप्ट्सची पानं पिसून एक कथानक तयार केलं आणि मग त्या दोन्हीमधले मूळ सिनेमाचे संदर्भ काढून शास्त्रीजींच्या केसचे तपशील जोडले तर जे काय होईल तसा साधारण हा प्रकार आहे. हे दोन्ही चित्रपट वापरण्याची कल्पना चांगली आहे पण ते वापरण्यामागे काही विचार हवा. ( पहा- रेनमेकर नाटक आणि आनंद सिनेमा यांच्या एकत्र येण्यातून तयार झालेला कल हो हो, ज्याचे तुकडे आपल्याला सांगेपर्यंत लक्षात येत नाहीत ) जेएफके आणि ट्वेल्व अॅंग्री मेन या दोन्ही सिनेमांचा टाईप पूर्ण वेगळा आहे. जेएफके सगळ्याभर फिरतो, तपास करतो, थिअरीज मांडतो, आणि शेवटी कोर्टात गॅरीसनने केलेल्या क्लोजिंग आर्ग्युमेन्टने संपतो. ट्वेल्व ॲंग्री मेन मधली ज्युरी निर्णय लागेपर्यंत खोलीबाहेर पडू शकत नाही आणि तोच त्याचा मुद्दा आहे. ताश्कंद फाईल्समधे कधी तपास आणि कधी समिती असं एकामागे एक येतं, त्यामुळे दोन्ही किती गंभीरपणे होतय, त्याची टाईमलाईन काय याचा पत्ता लागत नाही. त्यात दर दोन मिटींगच्या मधे रागिणी जाते आणि शोधणं जवळजवळ अशक्य असलेल्या लोकांशी सहज गाठीभेटी घेऊन येते, वेळप्रसंगी परदेशात जाऊनही. ते जे सांगतात ते रागिणी रिले करते. कल्पना करा, इतक्या वर्षांपूर्वी घडलेली केस रिक्रिएट करणं, त्याच्याशी संबंधित व्यक्ती शोधणं, त्यांच्याकडून माहिती; अशी माहिती जी सरकारकडे नाही तरी किंवा  त्यांनी ती दाबून तरी टाकलीय, मिळवणं , त्यातून एक पटण्यासारखं चित्र उभं करणं हे इतकं सोपं आहे का ? पण समितीच्या चर्चा चित्रपटाचा एवढा वेळ घेतात, की प्रत्यक्ष तपास दाखवायला वेळ होत नाही. बरं, जरी रागिणीचे सर्व मुद्दे खरे मानले, तरीही ते तिच्यापर्यंत ज्या सहजतेने पोचतात, तोच एका कारस्थानाचा भाग असू शकत नाही का

चित्रपटाचा शेवट जेएफके प्रमाणेच रागिणीच्या एका मोठ्या भाषणाने आहे ज्यात ती सारे मुद्दे एकत्र करुन काय घडलं याचं एक चित्र उभं करते. आता या भाषणात  काहीच मुद्दे  नाहीत का ? तर तसं नाही. आहेत. आणि खरं तर हे मुद्दे घेऊन याहून इन्टरेस्टिंग फिल्म ( उदाहरणार्थतलवारच्या जातीची, त्या दर्जाची ) होऊ शकली असती. इथे मात्र ते तपासाअंती आल्यासारखे येता दिग्दर्शक आणि पटकथाकारांच्या मर्जीनुसार आल्यासारखे येतात. मुळात रागिणीच्या सोर्सने तिच्यासारख्या कॅजुअल ॲटीट्यूड असलेल्या पत्रकाराची निवड एवढी महत्वाची माहिती देण्यासाठी का केली इथपासून चित्रपटाबद्दलच्या प्रश्नांना सुरुवात आहे. हा सोर्स कोण याचं उत्तर चित्रपट शेवटी ट्विस्ट असल्यासारखं देतो. पण तरीही त्या सोर्सने तिची निवड का केली हे पुरेशा स्पष्टपणे कळत नाहीच. चित्रपटातल्या व्यक्तीरेखा या चित्रपटाचा तथाकथित मेसेज , म्हणजेकाॅंग्रेस भ्रष्ट आहेहा मेसेज देण्यासाठी रिग्ड आहेत. मुळातच ज्या व्यक्तीरेखा तो खून अाहे या मताच्या आहेत, त्यांना सकारात्मक रंगवलं जातं, तर ज्या नैसर्गिक मृत्यूला पाठिंबा देतात त्यांना नकारात्मक पद्धतीने सादर केलं जातं. जर चित्रपटाकडे सारे पुरावे आहेत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, तर याची गरज काय

पटकथेची रचना, दिग्दर्शन आणि अभिनय यातलं काहीच मला पटलं नाही, माझ्यापर्यंत पोचलं नाही. विशेषत: अभिनय . श्वेताचं काम आपण यापूर्वी  ‘मकडीआणिइकबालया दोन्ही उत्तम सिनेमात पाहिलय, पण तीच ही मुलगी का असा संशय येण्याइतकं हे काम हास्यास्पद झालय. पल्लवी जोशी आणि पंकज त्रिपाठीचा अपवाद वगळता इतरांची कामंही यथातथाच. मिथून चक्रवर्ती भडक आणि नासीरुद्दीन शाह नको इतकं संयत काम करतात. का ? कोण जाणे.

चित्रपटाला जो पाठिंबा मिळतोय त्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे विस्मृतीत गेलेल्या शास्त्रीजींची आठवण तो जागी करतो. हे चांगलं आहे. शास्त्रीजींचं काम देशाला पुढे नेणारं होतं आणि त्यांनी तेव्हा घेतलेल्या निर्णयांचं महत्व आज आपल्याला कळतय. या नेत्याबद्दल गौरवोद्गार जरुर निघावेत, आणि या चित्रपटाच्या निमित्ताने ते होतय. दुसरं कारण आहे ते विशिष्ट राजकीय विचारांना असलेला पाठींबा. या मताचे प्रेक्षक प्रेक्षागृहात असल्याचं जाणवतं. त्यांच्या प्रतिसादावरुन ते स्पष्ट होतं. सेक्युलरिझम सारख्या शब्दाला ते हसतात. काही ठिकाणी टाळ्या वाजवतात. यामुळे चित्रपट आज एका विशिष्ट प्रेक्षकासाठी असल्याचं जाणवतं आणि चित्रपट म्हणून त्याचं मूल्य घटतं. ती एक प्राॅपगंडा फिल्म असल्याचं लक्षात येतं. मी आताही म्हणेन की हा विषय चांगला आहे. पण एका पक्षाचं राजकारण पुढे ढकलण्यासाठी त्याचा वापर व्हायला नको होता. तो फिल्म म्हणूनही चांगला असता, तर मला आवडलं असतं

- गणेश मतकरी

Read more...

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP