द किड

>> Tuesday, April 16, 2019
बालचित्रपट म्हणजे मुलांसाठी केलेला सिनेमा. खरं सांगायचं, तर मुलांचा असा वेगळा सिनेमा असायचं कारण नाही. आपल्याकडे तर नाहीच नाही, कारण आपल्याकडे मोठ्यांसाठी केलेले बरेच हिंदी सिनेमा हे मुलांनाही बालिश वाटतील अशा पद्धतीचे असतात. आता काही काही सिनेमा असतातही समजायला थोडे कठीण, मंदगतीने पुढे सरकणारे, मुलांच्या मनात काही नवे प्रश्न उभे करणारे, क्वचित त्यांना धक्काही देऊ शकणारे, पण ते अपवाद. बहुतेक चांगले चित्रपट हे जसे मोठ्यांना आवडू शकतात तसे मुलांनाही. आणि अर्थातच मुलांना आवडू शकतात, तसे मोठ्यांनाही

अलीकडे मी पाहिलय, की ब्लॅक अॅन्ड व्हाईट चित्रपट पहाण्याचा मुलांना कंटाळा येतो. यात आश्चर्य वगैरे काहीच नाही, त्यामागाचं साधं कारण म्हणजे सवय. मी शाळेत होतो, तेव्हा रंगीत चित्रपट असले, तरी टिव्ही रंगीत नव्हता, त्यामुळे सरसकट सर्वांनाच ब्लॅक ॲन्ड व्हाईट पहाण्याची सवय होती. आजकाल काळं पांढरं वापरलं जातं ते क्वचित, आणि तेही काही विशेष, काही गंभीर गोष्टींना वजन यावं म्हणून. त्यामुळे आपल्या मनात ही रंगसंगती काहीतरी जुनं, काहीतरी गंभीर याच्याशी जोडलेली आहे. प्रत्यक्षात हे काही खरं नाही. जसे रंगीत चित्रपट चांगले आणि वाईट, टाईमपास आणि कंटाळवाणे, विनोदी आणि गंभीर, असे सगळ्या प्रकारचे असू शकतात, तसे ब्लॅक ॲन्ड व्हाईट चित्रपटही असू शकतात. ते पहायची तयारी असली की झालं. चार्ली चॅप्लिनचा किडहा नुसता रंगाशिवायच नाही, तर ध्वनीशिवायचाही आहे. आणि खरं म्हणजे तीच त्याची गंमत आहे

चार्ली चॅप्लिन हे नाव सर्वांना परिचयाचं आहे. अलीकडे त्याचे चित्रपट पूर्वीइतके पाहिले जात नसतील, पण तरीही हे नाव विसरण्यासारखं नाहीच. खरं तर मी सांगेन की चॅप्लिनचा हा एकच नाही, तर जवळजवळ प्रत्येक सिनेमा पहाण्यासारखा आहे. आपल्याकडे विनोदासाठी चॅप्लिनचं नाव घेतलं जातं आणि त्याचे चित्रपट विनोदी होते हे खरच आहे, पण पुढल्या काळात, चित्रपट बोलायला लागल्यावर चॅप्लिनचा सिनेमा गंभीर होत गेला. ‘माॅंसिए वर्दूकिंवालाईम लाईटसारखे चित्रपट हे अतिशय गंभीर आशय मांडणारे चित्रपट आहेत. त्यातही विनोदांना जागा आहेच, पण केवळ हसवणं इतका मर्यादित हेतू त्याच्या चित्रपटांनी कधीच ठेवला नाही. त्याच्या शाॅर्ट फिल्म्स नुसत्या हसवणाऱ्या असत हे खरं आहे, पण चित्रपटांकडे तो वळला तो विनोदी प्रसंगमालिका आणि गंभीर नाट्यपूर्ण संघर्ष यांचा तोल सावरतच. १९२१ चा किड हा त्याचा पहिला पूर्ण लांबीचा ( म्हणजे साधारण तासाभराचा ) चित्रपट आणि त्यातही हे स्पष्टच दिसतं

किडची गोष्ट काय, तर अगदी साधी. एका गरीब माणसाला रस्त्यावर सोडून दिलेलं एक तान्हं बाळ सापडतंमुलाला सोडल्याचा पश्चात्ताप झालेली आई त्याला शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते, पण तिला ते सापडत नाही. इकडे माणूस त्या बाळाला आपल्या मुलासारखा वाढवतो, आणि आपल्यासारखच कठीण परिस्थितीतही, समाधानाने जगायला शिकवतो. आता या गोष्टीकडे पाहून वाटतं, की कदाचित ती खूपच गंभीर असेल, पण प्रत्यक्षात सिनेमात हास्य आणि नाट्यमयता या दोन्हीला जागा आहे. चॅप्लीनने आपल्या शाॅर्ट फिल्म्समधूनट्रॅम्पही व्यक्तीरेखा तयार केली होती. आपल्याला परिचित असलेला त्याचा छोटी हिटलरछाप मिशी, टोपी आणि कधीकधी हातात काठी असलेला अवतार, हा याच व्यक्तिरेखेचा आहे. ट्रॅम्प गरीब आहे. त्याची रहाण्याखाण्यापिण्याची, म्हणजे सगळ्याचीच बोंब आहे. पण आहे त्यातून मागे हटता, तो अडचणीत मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न, चॅप्लीनच्या विनोदनिर्मितीसाठी साधन ठरतात. किड आधी ही ट्रॅम्पची व्यक्तिरेखा तेवढ्यापुरती हसवायची. पण तीच व्यक्तिरेखा वापरत चॅप्लिनने इथे हाडामासाचा माणूस उभा केला

किड मधला ट्रॅम्प, त्याचं छोटंसं घर, आणि त्यात तो आणि चारपाच वर्षाचा मुलगा ( जॅकी कूगन ) यांचं रहाणं यातून बरीचशी विनोदनिर्मिती साधली जाते. त्या काळात संवाद नसल्याने बराचसा विनोद हा शब्दावाचूनचा , हालचाली, प्रतिक्रिया, प्रसंगातून तयार झालेल्या शक्यता यांना वापरणारा होता. किडमधलं याचं लोकप्रिय उदाहरण म्हणजे त्यातल्या जोडगोळीने पैसे मिळवण्यासाठी चालवलेला उद्योग. या उद्योगात ट्रॅम्प बनवतो फुटक्या काचा बदलणारा. पण काचा बदलण्याची पुरेशी कामं दिवसभरात मिळणार कशी? तर ती तयार करण्याचं काम मुलगा करतो. मुलाने दगड मारुन काचा फोडायच्या आणि ट्रॅम्पने सहजच तिथून जात असल्यासारखं दाखवत फुटकी काच बदलायचं काम घ्यायचं, अशा रीतीने हा उद्योग सुरु होतो. चॅप्लिन प्रत्येक प्रसंग कसा विविध पद्धतीने वापरता येईल याचा कसा विचार करतो, हे या प्रसंगात फार छान दिसून येतं. इथे गंमत आणण्यासाठी तो एका पोलिसाची व्यक्तिरेखा आणतो. मग हा पोलिस, मुलगा आणि ट्रॅम्प यांच्यामधे ज्या विविध पद्धतीने सामना होतो, त्यातून खरी गंमत तयार होते

आपण चित्रपटाला दृश्य माध्यम म्हणतो, पण ते म्हणताना आपल्याला शब्दांचा किती फायदा असतो हे विसरुन जातो. गोष्ट सांगताना शब्द ती सोपी करतात. मूकपटांमधे शब्द नव्हतेच असं नाही. पण ते एखाद दुसऱ्या वाक्यापुरते, ते सुद्धा बोललेले नाही, तर लिहून दाखवलेले. मग केवळ त्यांना वापरुन व्यक्तिरेखांची ओळख करुन द्यायची, प्रसंगाची पार्श्वभूमी उभी करायची, गुंतागुंतीच्या कल्पना मांडायच्या हे कठीणच काम. पण तेव्हाचे चांगले दिग्दर्शक हे सहज करुन दाखवायचे. किडमधेच सुरुवातीच्या काही मिनिटात आईने सोडून दिलेलं बाळ ट्रॅम्पपर्यंत पोचणं, आणि सोडलं त्या जागी  परत जाऊनही आईला सापडणं असा प्रसंग आहे. त्यात चॅप्लिन गाडीचा छान वापर करतो. इथल्या आईला वाटतं की आपल्या मुलाला चांगलं आयुष्य मिळावं, म्हणून ती त्याला सोडते एका श्रीमंताच्या घराबाहेर, पण तिथे दारापर्यंत सोडलं, तर कोणीतरी थांबवेलशी भीती. मग ती बाळाला सोडते, ती घरासमोर पार्क केलेल्या त्या गाडीत. थोड्या वेळात दोन भुरटे चोर ही गाडी पळवतात, आणि गाडीत मूल आहे हे लक्षात येताच त्याला रस्त्यावर सोडून देतात, जिथे ते ट्रॅम्पला सापडतं, सोडलं त्या जागेपासून दूर. अशाच प्रकारे त्याने सिटी लाईट्स सिनेमातही गाडीचा छान वापर केलाय. तिथला प्रसंग आहे तो एका अंध फुलवालीला हा गरीब माणूस खरा श्रीमंत आहे असं वाटवून देण्याचा. आता हे दाखवणार कसं? तर फुलवाली जिथे बसलीय, तिथे समोरच पार्क केलेली एक गाडी दिसते. रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक. या ट्रॅफिकमधून रस्ता क्राॅस करणंही कठीण झालेला हा ट्रॅम्प त्या पार्क केलेल्या गाडीच्या एका बाजूने आत शिरतो आणि दुसरीकडून उतरतो. गाडीच्या दाराचा आवाज ऐकून फुलवाली त्याला श्रीमंत माणूसच समजते, आणि फुलं घेण्याची विनंती करते

किडकाय, किवासिटी लाईट्सकाय किंवामाॅडर्न टाईम्सकाय, चॅप्लिनच्या प्रत्येक सिनेमात आपण सर्व वयाच्या प्रेक्षकांना आनंद देणारं काही ना काही पाहू शकतो. तेवढी ब्लॅक ॲन्ड व्हाईटची भीती मात्र आपण सोडून द्यायला हवी

-

ganesh matkari


0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP