सुपर 30 बद्दल अनेक मतं संभवतात. स्पेक्ट्रमच्या दोन्ही टोकांवरची. काही जण त्याला ग्रेट फिल्म, हृतिकचा बेस्ट परफाॅर्मन्स म्हणतील, तर काही त्यातल्या चुका दाखवून कपाळावर हात मारतील. सत्य या दोघांच्या मधे कुठेतरी आहे.
सुपर 30 चा सर्वात मोठा गुण म्हणा, किंवा दोष म्हणा, हा आहे की तो मनोरंजक करणं , आणि प्रेक्षक खेचणं एवढाच त्याच्या निर्मितीमागचा हेतू आहे, आणि केवळ त्या हेतूशी तो प्रामाणिक आहे. नायकाच्या भूमिकेसाठी मूळच्या आनंद कुमारसारख्या बिल्कूल न दिसणाऱ्या हृतिक रोशनला घेणं हे या स्ट्रॅटिजीप्रमाणेच झालेलं आहे. पण तेवढच नाही. त्याबरोबरच चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्याचं चरित्रात्मक मूळ काॅम्प्रोमाईज करतात. सुपर 30चं टेक्श्चर हे एका टोकाला ‘तारे जमीं पर’ चं बरचसं विश्वसनीय वास्तव तर दुसऱ्या टोकाला ‘होम अलोन’ चा भाबडेपणा आणि बाळबोध फॅन्टसी यामधे कुठेतरी हेलकावे खाताना आपल्याला दिसतं. हाती घेतलेला विषय आणि त्यात खरोखर असलेल्या शक्यता आणि भावनांसह एका वास्तववादी साहसाला मांडत, आज घराघरात समजू शकेल असं काही सांगण्याची शक्यता मात्र या चित्रपटात वाया दवडली जाते.
सुपर 30 ही आनंद कुमार या गरीब विद्यार्थ्यांसाठी सुपरहिरो ठरलेल्या शिक्षकाची ओरिजिन स्टोरी आहे आणि ती एंजाॅय करायची तर तिचं वास्तवातलं मूळ विसरलेलच बरं . गरीब परिस्थितीतल्या आनंद कुमारच्या स्वत: परदेशी जाऊन शिक्षण घेण्याच्या स्वप्नावर पाणी पडल्यानंतर तो बाजारु बनलेल्या कोचिंग क्लासात शिकवून शिक्षक म्हणून नाव काढतो आणि आपल्यासारख्याच गरिब परिस्थितीतून आलेल्या मुलांना आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी तयार करणारा आणि हे काम मोफत करणारा एक अभ्यासवर्ग कसा तयार करतो याची ही थोडक्यात कथा आहे.
ही कथा जर वास्तववादी पद्धतीने आणि खरोखर आनंद कुमारच्या आयुष्याला प्रामाणिक रहात सांगितली असती, तर तिच्यात खरोखर इन्टरेस्ट वाटण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. हा वर्ग सुरु करताना त्याने आर्थिक बाजूंचा काय विचार केला होता ? त्याला होणारा विरोध हा काय प्रकारचा आहे आणि त्याला आनंद कसं तोंड देतो ? या मुलांच्या ॲडमिशनचा प्रश्न सुटला तरी ही पहिलीच पायरी आहे, त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचं काय होतं ? ही वेगवेगळ्या पार्श्वभूमीची मुलं वर्गात एकत्र येऊन या कठीण परिक्षेला सामोरं जाताना त्यांच्यात काय प्रकारचं सहजीवन, स्पर्धा दिसून येते ? असे अनेक प्रश्न पडू शकतात ज्यांची धड उत्तरं सिनेमाला द्यायचीच नाहीत. आनंद कुमारच्या वर्गाची वादग्रस्त बाजू , त्याच्या दाव्यांना आव्हान देणारे यांचा विचार तर आपोआपच बाजूला पडतो कारण चित्रपट अभ्यासवर्गाच्या पहिल्या वर्षापर्यंतच आहे. पण ते वगळूनही बाकी गोष्टी मांडता आल्या असत्याच .
त्याऐवजी या सिनेमाचं धोरण हे नाट्य आणि रंजकता या पुरतं मर्यादित ठेवल्याचं आपल्याला दिसतं. मग कधी हे भावनिक नाट्य असेल, कधी सूडनाट्य, कधी प्रेमकथा तर कधी सरळ काॅमेडी . आनंदकुमारचा केवळ ढाचा वापरुन डिस्नीच्या प्रकारचं एखादं ॲडव्हेन्चर या व्यक्तीभोवती गुंफावं तसा हा प्रकार आहे. चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या भागात हे बरचसं जमून जातं. पण उत्तरार्धात मात्र काही जागा अशा आहेत ज्या जराही पटू नयेत. होळीच्या दिवशी केलेलं नाटक हे एक, आणि हाॅस्पिटलवरचा हल्ला हे दुसरं. इतरही जागा आहेत. यातलं काहीच प्रत्यक्षात घडलं असेल आणि असलच तर असच घडलं असेलसं वाटत नाही. आणि नसेल, तर केवळ लोकांना गुंतवायला असली ढोबळ करमणूक कशाला ? ती पूर्ण काल्पनिक सिनेमात पहातोच की. इथे चांगला विषय आणि हृतिक रोशन यांना एकत्र आणत प्रेक्षकांना खेचायची अप्रतिम संधी असताना ती अशी तद्दन खोट्याखोट्या करमणूकीवर का वाया घालवायची ?
मला त्यात आणखी एक गोष्ट खटकली म्हणजे आनंद कुमारने केलेला गरीबांचा विचार आपण समजू शकतो , पण श्रीमंत घरातल्या चांगल्या अभ्यासू मुलांचं काय ? तीस मुलांवर लक्ष केंद्रीत करताना ट्यूशन क्लासेसच्या माध्यमातून अनेकांना तो जे मार्गदर्शन करु शकत होता त्याचं काय ? केवळ व्यवस्थापनात भ्रष्ट लोक आहेत म्हणून विद्यार्थी तर वाईट ठरत नाहीत ना ? चित्रपटात तर एक विद्यार्थी आनंदला विचारतोही , की मी श्रीमंत आहे यात माझी काय चूक ? त्यावर जसा आनंद उत्तर देत नाही, तसा या प्रश्नाचं उत्तर देणं चित्रपटही टाळतो. ‘ अब राजा का बेटा राजा नही बनेगा, अब राजा वही बनेगा, जो हकदार हो’ हे चित्रपटाचं ब्रीदवाक्य आहे, पण या श्रीमंत मुलांमधेही काही हकदार असतीलच की . गरीबांना जसं पैशामुळे चांगल्या शिक्षणापासून वंचित रहावं लागत होतं, तसं श्रीमंतांना चांगले शिक्षक न मिळाल्याने रहावं लागलं, तर तो अन्याय नाही का ? चित्रपट पैसेवाल्या सर्वांना जे कमीत काढतो तेही एक प्रकारचं सरसकटीकरणच आहे. यात एका प्रसंगी हाॅस्पिटलमधला प्यून एका डाॅक्टरला सुनावतो आणि म्हणतो की हा डोनेशनवाला डाॅक्टर आहे , त्याला काही येत नाही. म्हणजे ? प्रवेश घेताना डोनेशन घेतलं असेल तर त्या डाॅक्टरला काॅलेजमधे काहीच शिकवलं जात नाही का ? शिवाय हा डाॅक्टर प्रायव्हेट प्रॅक्टीस न करता या गरीब हाॅस्पिटलात काम करतोय यात त्याचं काहीच श्रेय नाही का? थोडक्यात सांगायचं तर वरवर केलेली सकारात्मक आणि नकारात्मक शेरेबाजी हा सुपर 30 चा दोषच आहे.
असं असतानाही चित्रपट केवळ कल्पनेची भरारी म्हणून पाहवतो का ? तर पाहवतो. करमणूक करणं एवढा मर्यादीत हेतू असायला काही हरकत नाही. आणि दिग्दर्शक म्हणून विकास बहलने केवळ त्या नजरेनेच सिनेमा बनवला आहे हे मुळातच समजून घ्यायला हवं. हृतिक रोशनचं काम मला चांगलं वाटलं. त्याची बोलण्याची शैली काहीशी विचित्र वाटते हे खरं आहे, पण एकदा तिची सवय झाली की आपल्याला त्रास होत नाही. मृणाल ठाकूरची नायिकेची भूमिका लहान आहे, पण ती लक्षात रहाते. भूमिकेच्या लांबीपेक्षाही त्या भूमिकेचा दोष ती टिपिकल आहे हाच म्हणावा लागेल. विद्यार्थ्यांच्या भूमिकांमधे अनेक चांगले कलाकार आहेत. ते वेस्ट होतात असं म्हणता येणार नाही, कारण ते लक्षात रहातात. त्यांना करायला मात्र फार कमी गोष्टी आहेत. पंकज त्रिपाठी मात्र फुकटच घालवला आहे.
या चित्रपटाचा एक ठळक गुण म्हणजे तो एका चांगल्या उपक्रमाकडे लक्ष वेधतो. त्याकडे लक्ष वेधतानाच तो आपल्या समाजातल्या, शिक्षणक्षेत्रातल्या काही अनिष्ट प्रवृत्तींवर ताशेरे ओढतो, हेही अगदीच दुर्लक्ष करण्यासारखंही नाही. चित्रपट पहाताना हे लक्षात ठेवून पाहाणं कदाचित पुढे होणारा अपेक्षाभंग टाळू किंवा निदान कमी करु शकेल.
-
गणेश मतकरी
0 comments:
Post a Comment